Monday 27 September 2021

पाळण्यातील परिणीता!!??

 

पाळण्यातील परिणीता!!??

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

 

 

तिचं नाव परिणिता. पहिल्यांदा आली तेंव्हा दोन वर्षाची होती. आईच्या कडेवर बसून होती पण दिसायला पाच वर्षाची दिसत होती. माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. जोरात भोकड पसरलेला. शेवटी बापानी  तिला बाहेर नेली.

मी सहजच आईला विचारलं, ‘नाव परिणिता  का हो ठेवलंत? परिणिता म्हणजे काय?’ हा प्रश्न त्या माऊलीला आजवर  कोणी विचारला  नव्हता आणि तिलाही आजवर पडला नव्हता. ‘कायतरी पिक्चर ऐ!’ आई  पुटपुटली. पण हा प्रश्न तिला नकोच होता. तिच्या पुढ्यातला प्रश्न जास्त  महत्वाचा होता. ती म्हणाली; 

‘तिसरं लागलंय, पण परवापासून अंगावरचं जातंय परिणिताला!!’

काहीतरी लागलं असेल, खरचटलं असेल म्हणून त्यांनी दोन  दिवस घरातच काढले होते. आज त्रास वाढला तेंव्हा त्यांना भलभलत्या शंका यायला लागल्या होत्या. लेकीला  कोणी काही केलं तर नसेल ना, वगैरे; मग   त्यांनी दवाखान्याचा रस्ता धरला होता. बऱ्याच प्रयत्नानी मी तिला तपासली. तिला चक्क पाळी आली होती.

पाळण्यातच ‘विवाहिता’ नाव ठेवलेल्या मुलीला पाळण्यातच पाळी आली होती!! हा विचित्र काव्यगत अपघात पाहून मी थोडा चक्रावलो, थोडा हेलावलो. 

इतक्या लवकर पाळी म्हणजे कुणालाही हादरून जायला होणारच. तिच्या आई- वडिलांचे नेमकं हेच झालं.

होतं असं कधी कधी. अशा मुलींची (आणि मुलांची) खूप कुचंबणा होते.  वयात येण्याचे, शरीर उमलण्याचे मेंदूतले रासायनिक संदेश वेळेआधीच सुसाट सुटतात. वसंत ऋतु येण्यापूर्वीच ऋतुप्राप्ती! सटासट ऊंची काय वाढते, पटापट मूड काय बदलतात, काखेत-जांघेत लव काय धरते, आवाज काय फुटतो, छाती काय फुगते,  पोक काढूनही छाती लपता लपत नाही. वर्गात अगदी थोराड दिसतात अशा  मुली.  डाव्या मनगटाचा एक्सरे काढून हाडांचं  वय जोखता  येतं. अशा पेशंटमध्ये हे भलतेच जास्त निघते. लहान वयात ‘मोठी झालेली’ ही मुलं सुरवातीला उंचच उंच वाढतात.  पण ह्यांच्या हाडातील वाढीची पेरं (Epiphysis) झटपट घट्टही होतात. मग वाढ लवकरच थांबते. अंतिमतः  मोठेपणी अशा व्यक्ति बुटक्याच रहातात. निदान आणि उपचार  लवकर झाले तर सरासरी ऊंची गाठता येते मात्र उशिरा निदान झाले की सगळेच वेळापत्रक कोलमडते. अंतिम उंची खुजीच रहाते. उपचार सुरू करताना ही बाबही विचारात घ्यावी लागते. ही कसरत साधण्यासाठी प्रसंगी संप्रेरक-शास्त्र-निष्णात (Endocrinologist) डॉक्टरांची मदत  घ्यावी लागते.  

उपचाराने स्तन, काखेत/जांघेत वाढणारे केस आणि शारीरिक ऊंचीची वाढ रोखून धरली जाते.  वयात येताना होणारा  मानसिक हलकल्लोळही रोखला जातो. अकाली कौमार्य आल्याने येणारी वेगळेपणाची भावना, कुचंबणा, चिंता,  वैताग, लैंगिकतेचे प्रश्न  यामुळे मुलींइतकीच आई-बापांसाठीही ही परिस्थिती आव्हानात्मक असते. चारचौघात हस्तमैथुन करणे, मुलांमध्ये लिंग ताठर होणे वगैरे सारखे प्रश्न तर भलत्याच संवेदनशीलतेने हाताळावे लागतात.   ह्या इवल्या इवल्या पिल्लांना समजावायचं कसं हा मोठा गहन प्रश्न असतो.

वर्गात आपणच वेगळे आहोत हे लक्षात येताच ही मुलं मनात कुढत रहातात.  ‘बाकीच्या मुलांना हे असं सगळं होणारच आहे, फक्त काही वर्षानंतर’; असं त्यांना परोपरीनी समजावावे लागते.  कधी आपल्या थोराड बांध्याच्या जोरावर इतरांवर शिरजोरी करतात. मग समवयस्क मुलं यांना बिचकून मैत्री टाळतात. हे सारं शाळेतल्या बाईंशी बोलून सांगावं लागतं.   वयाने छोटी आणि दिसायला मोठी अशी ही मुलं; आजूबाजूच्या लहानथोरांनी, ही ‘लहान’ आहेत याची सतत जाणीव ठेवावी लागते. यांच्या दिसण्यावरून त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चूक आहे.

 एक्सरे, एमआरआय वगैरे सर्व सोपस्कार करूनही, कौमार्याची ही वावटळ अशी अवेळी का सुटते?; हे कोडं बहुतेकदा कोडंच राहतं. पण तपासण्या करायला तर हव्यातच. क्वचित मेंदूत गाठी वगैरे असतात. त्यावर रीतसर उपचार करता येतात.  नेमके कारण कळले नाही तरीही उपचार करता येतात. नियमित उपचाराने सगळेच प्रश्न सुटत नाहीत पण उपरोल्लेखित जंजाळातून जरा मोकळीक मिळते.

शारीरिक वाढ योग्य वयापर्यंत थोपवणे आणि आवश्यक ते मानसिक बळ देणे ह्या दुहेरी हेतूने उपचार केले जातात.

हयात GnRH अॅनलॉग गटातील औषधे वापरली जातात. ह्यामुळे पिट्यूटरी ग्रंथीतून स्त्रवणारे ईस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन, हे पाळी सुरू करणारे संप्रेरक, बंद होतात आणि अकाली कौमार्याची गाडी थांबते. ही औषधे नियमित घ्यावी लागतात. अधून मधून घेण्याने उलटाच परिणाम दिसू शकतो.

*************************

 

अर्थात परिणिताची केस अगदीच वेगळी होती. पण आजकाल बरेच पालक नऊ-दहा वर्षाच्या मुलींला पाळी आली की काळजीत पडतात. मुलींच्या बाबतीत आठ वर्ष (आणि मुलांमध्ये ९ वर्ष)  वयाच्या आत जर कौमार्यप्राप्ती झाली तरच ते वावगं समजलं जातं. आपल्याकडे मुलांना मिळणारे पोषण सुधारले आहे आणि अशा सुपोषित मुलांत तारुण्यही लवकर येतं. तेंव्हा आठव्या वर्षानंतर पाळी येणं हे नॉर्मल आहे. सोळावं वरीस नव्हे तर नववं-दहावं वरीस सुद्धा धोक्याचं ठरू शकतं. त्याचा फार बाऊ न करणं, त्या मुलीला विश्वासात घेऊन योग्य ती माहिती देणं, पाळीचा काही त्रास झाला तर उपचार करणं (आणि आता आपण आजी आजोबा होण्याचा मार्ग किंचित प्रशस्त झाला म्हणून प्रसन्न होणं!) एवढंच करावं लागतं.

क्वचित कधीतरी पाळी येत नाही पण लेशवृद्धी आणि स्तनवृद्धी मात्र लवकर झालेली असते. एखाद्या बाजूचा स्तन अधिक फुगीर झालेला असतो. योग्य काळी वयात येतानाही बरेचदा असे दिसते. कालांतराने समसमान वाढ होते.      अशावेळी बहुतेकदा काहीही औषधोचार लागत  नाही. तुका म्हणे उगी रहावे हे धोरण योग्य ठरते.

आपल्याला काहीतरी गंभीर व्याधी जडली आहे असं उगीचच  त्या मुलीला वाटता कामा नये. यासाठी कुटुंबाला मात्र काही पथ्य सांभाळावी लागतात. आईने, त्या चिमूरडीच्या नकळत,  रक्तस्त्राव, स्तनाच्या आकारात अचानक वाढ, लाली वगैरेंवर  बारीक लक्ष ठेवायला हवे. असं काही दिसले तर पुन्हा सल्ला घ्यायला हवा. त्या लहानगीसमोर ह्या विषयीची चर्चा टाळली पाहीजे. बरेचदा आईबाबा ऐकतात पण कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी हा सल्ला धुडकावून लावतात. त्यांच्या जिभेला  चाप  बसेल इतपत लागट बोलवच लागतं. हे कर्तव्य डॉक्टरने बिनदिक्कत पार पाडायचे आहे.   

असो, कितीही शिकले आणि कितीही उलगडे झाले तरीही जनन, वयात येणे आणि प्रजनन  ह्याचा  अचंबा संपता  संपत नाही. हे  सगळं घडतं कसं?; असा नेहमीच अचंबा वाटतो. मग एखादी परिणिता  येते. निसर्गाने साधलेले हे संतुलन किती नाजुक आहे, याची जाणीव होते.  मग इतकी गुंतगुंतीची रचना इतक्या क्वचित कशी बिघडते याचा अचंबा वाटत रहातो.    

 

पूर्वप्रसिद्धी

लोकमत

सखी पुरवणी

28/9/2021

 

 

 

No comments:

Post a Comment