Friday, 10 September 2021

बाई आणि बाटली

 

बाई आणि बाटली  

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

तिनी जे काही सांगितलं तो एक सांस्कृतिक धक्काच होता मला. रोज ती कित्येक पेग दारू रिचवत होती. आता तिला पाचवा महिना चालू होता आणि बाळावर  दारूचे दुष्परिणाम होणार नाहीत असं औषध तिला हवं होतं. दारू न सोडता!

त्या बाईचं मोठं आश्चर्य वाटलं मला. कारण बाटलीचा प्रॉब्लेम तिनी मोकळेपणानी सांगितला  होता. पण मोकळेपणाबरोबरच निव्वळ पाश्च्यात्यांचा समजला जाणारा  हा सामाजिक प्रश्न, आपल्याही किती निकट आला आहे ही जाणीवही मला आश्चर्याचा धक्का देऊन गेली. 

 मुळात आपल्याकडे बायका फार कमी दारू पितात. सॉरी, फार बायका, कमी दारू पितात!! सॉरी, सॉरी; आपल्याकडे बायका, फारशा दारू पीत नाहीत. जमलं बुवा. पाहिलंत सोमरसाच्या नुसत्या नामस्मरणानी लेखणी झोकांडया खायला लागली..!!!

पण ह्या स्त्रीचा प्रश्न ऐकताच मला इंग्लंडमधील एका खटल्याची गोष्ट आठवली. मायभू इंग्लंडपोटी जन्मलेली एक कन्या चक्क आईच्याच राशीला लागली. या  कन्यकेने आपल्या आईविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला.  तिचं म्हणणं असं की,  ‘माझ्या वेळेला दिवस गेले असताना, या बाईने इतकी दारू ढोसली, इतकी दारू ढोसली, की त्याचे दुष्परिणाम, आता मला भोगायला लागत आहेत!!  सबब आईने मला नुकसान भरपाई द्यावी.  दारूमुळे गर्भावर दुष्परिणाम होतात हे आईला माहित होतं पण तरीदेखील ती पीतच राहिली.  याचा अर्थ तिने मला जाणून-बुजून इजा  केली आहे.  त्यामुळे मी नुकसान भरपाईला पात्र आहे.’

‘आणि, आईने नाही दिली तर राहिलं, पण गरोदर बायकांनी दारू पिऊ नये असं सरकारचं  आरोग्य खातंच सांगतंय, आपलीच धोरणे नीटपणे अंमलात आणण्यात कुचराई केल्याबद्दल, सरकारने तरी नुकसान भरपाई द्यावी’; अशी आग्रही मागणी केली.

आई महावस्ताद. ती म्हणाली, ‘हो, हो, प्यायली मी  दारू. रोज आठ कॅन बियर आणि अर्धी बाटली व्हॉडका एवढी प्यायली. त्यात काय? मी व्यसनमुक्ती केंद्रात अॅडमिट होते, तिथे आहे हे रेकॉर्ड.   पण त्याच्याशी हीचा  काय संबंध? ही  जल्म तरी झालं होतं का वोss  तवा?’  आणि मातृपक्षाचा हाच मुद्दा कळीचा ठरला.

गरोदर स्त्रीला ‘स्वतंत्र व्यक्ती’ म्हणून अधिकार आहेत, पण गर्भस्थ बाळाला ‘स्वतंत्र व्यक्ती’ अशी कायदेशीर मान्यता नाही. सबब ‘अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीला इजा’ हे कसं शक्य आहे?  बाळाच्या पालन-पोषण-संरक्षणाची जबाबदारी कायद्याने आईवडिलांवर आहे. पण ते मूल जन्माला आल्यानंतर. ही जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा होतोय किंवा आईबाप अक्षम आहेत, असं लक्षात आलं, तर बाळाचा ताबा सरकार आपल्याकडे घेऊ शकतं.  पण हा नियम गर्भावस्थेत लागू होत नाही.

भारतीय कायद्यानुसार देखील गर्भावस्थेत  बाळाला ‘स्वतंत्र व्यक्ती’ म्हणून कायदेशीर मान्यता नाही.  अन्यथा गर्भपात करणे  हा खुनाचा गुन्हा ठरला असता आणि ‘कायदेशीर गर्भपात’ हा प्रकार अस्तित्वातच येऊ शकला नसता.

शिवाय त्या माऊलीने असाही पावित्रा  घेतला की; गरोदर असो वा नसो, दारू पिणे हा  त्या त्या स्त्रीचा वैयक्तिक निर्णय आहे; त्याचं काय? एका  सज्ञान नागरिकाच्या, दारू पिण्याच्या ‘व्यक्तिस्वातंत्र्यात’  इंग्लंडातले कोणतेही कोर्ट ढवळाढवळ करू शकत नाही. तिच्या वैयक्तिक निवडीबद्दल कोर्टानी तिला  शिक्षा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

खालच्या कोर्टाने केली शिक्षा.  लेकीच्या बाजूने निकाल दिला. यावर ‘ज्यूरीने कसाही निकाल दिला असला  तरी मी पूर्ण निर्दोषी आहे, असेच माझी मनोदेवता मला अद्याप सांगत आहे. सृष्टीवर या कोर्टापेक्षा श्रेष्ठ असलेल्या परमेश्वरी सत्तेचे प्रभुत्व आहे. माझ्या हालअपेष्टांनीच  मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीला यावे असा ईश्वरी संकेत दिसतो  आहे.’ असा एक लंबाचौडा युक्तिवाद तीने केला म्हणे. हे वाचताच  चाणाक्ष वाचकांना पुढची ओळ लक्षात आलीच असेल. नसेल तर;  ‘सबब दारू पिणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळवणारच!!!’; असंही  काहीबाही  ती बाई म्हणाली असण्याची शक्यता आहे. 

खटला वरच्या कोर्टात गेला. करता  करता  ‘स्वतंत्र व्यक्ती’ आणि ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हे दोन मुद्दे विचारात घेत,   अंतिम निर्णय आईच्या बाजूने लागला.

 पण हे होईपर्यंत अनेक बारीक-सारीक मुद्द्यांचा अटीतटीनी  कीस पाडला गेला.

कन्या पक्षाने हिरीरीने आपलं म्हणणं मांडलं. समजा कारखान्यातून झालेल्या जलप्रदूषणामुळे नदीकाठच्या गावी अनेक बाळं मतिमंद निपजली, तर कारखानदाराला  नुकसान भरपाई द्यावी लागते. ती बाळं काही प्रदूषणाचा मुहूर्त साधून लगेच जन्म घेत नाहीत. इजा  होते तेंव्हा आणि पुढेही  काही महीने ती गर्भस्थच असतात. पण तरीही कारखानदाराला दोषी धरले जाते. जेव्हा ती मुलं जन्माला येतात,   तेंव्हाच त्यांच्यातील दोष लक्षात येतात आणि त्यांचा संबंध प्रदूषणाची जोडला जातो तेव्हाच हा विधी निर्णय शक्य होतो. तेंव्हा ‘अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीला इजा झाल्यास नुकसान भरपाई मागता  येत नाही’, हा मुद्दा पोकळ आहे.

त्यातल्या त्यात अन्य कोणी गर्भाला इजा केली, तर निर्णय करणे  तुलनेने सोपं  आहे.  उदाहरणार्थ मारहाण झाल्यामुळे वार सुटून गर्भपात झाला, तर निवाडा सोपा आहे.  पण आईच्याच  कृतीने ज्या वेळेला बाळामध्ये काही विकृती निर्माण होते त्यावेळेला निर्णय करणे आव्हानात्मक आहे.

यावर मातृपक्षाने बरेच मुद्दे मांडले.  समजा एखाद्या बाईला डास चावल्याने झिका व्हायरसने ग्रासले, त्यामुळे तिच्या मुलाचे डोके लहानच राहीले, तर मग मच्छरदाणी वापरली नाही म्हणून आईवर खटला भरायचा का? आईला आणि एकूणच बाईला, तुम्ही असं कशाकशासाठी आणि कुठवर जबाबदार धरणार आहात? दारुड्या आईने अपत्याला भरपाई द्यायची तर आधीच जेमतेम असलेली आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार. म्हणजे त्या पोराचं वाईटच अधिक होणार.  शिवाय कौटुंबिक वाद सुरू होतील ते वेगळेच. आज एकदा हा पायंडा पडला की उद्या इंग्लंडभर अशा खटल्यांचं पेव फुटेल. ब्रिटनमध्ये बेवड्या बायकांचं प्रमाण काही कमी नाही!

आणि काय सांगावं, उद्या समजा आई म्हणाली  की विशिष्ट सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीमुळे मला दारूचे व्यसन जडलं; सबब सरकारनेच  मुळात मलाच  नुकसान भरपाई द्यावी; तर? तर मोठी आफतच ओढवेल. आणि खटला भरणाऱ्या मुलांनी उद्या समजा आईबरोबरच दारू विकणारे  दुकानदार, विकायला परवानगी देणारे सरकार आणि दारू निर्माण करणारे कारखानदार यांनाही प्रतिवादी केलं तर? परिस्थिती आणखी गुंतागुंतीची  होईल. मुळात गरोदरपण म्हणजे भलताच गुंतागुंतीचा मामला असतो.  यात  कायदेशीर, नैतिक आणि तात्विक धागे गुंतले की गुंता अजूनच वाढतो.

मातेच्या मदिरापानाचे गर्भावर अनेक अनिष्ट परिणाम होतात. मात्र अमुक इतकी दारू प्यायली की अमुक इतका त्रास होतो असं गणित मांडता येत नाही. दारू पिणाऱ्या प्रत्येक बाईच्या प्रत्येक  मुलाला त्रास होईल असंही  नाही. दारू पिऊन सुद्धा स्वतःला किंवा मैत्रिणीला धडधाकट मूल झालं असेल तर तो योगायोग समजावा. कारण सुमारे पाच टक्के बाळांमध्ये हे दोष आढळतात. ह्यांना म्हणतात, ‘फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसीज/सिंड्रोम’.  याचा अर्थ, ‘दारूमुळे बाळावर दिसणारे विविध परिणाम’.  

वारुणी वारेतून बाळापर्यंत जाते.  अर्थातच आईच्या मानाने एखाद दुसराच असलेला पेग बाळाच्या मानाने ‘आउट’ करणारा असतो.  दारुवर उत्तरक्रीया, लिव्हरमध्ये होणं अपेक्षित असतं. पण बाळाचे लिव्हरही बालच असते.  बाल यकृताला ही जबाबदारी पेलवत नाही. मग दारू बाळाच्या शरीरात साठून रहाते आणि विविध अवयवांना त्याचे भोग भोगावे लागतात.  बाळाची वाढ खुंटते. ऊंची कमी रहाते.  मेंदूची वाढ नीटस होत नाही. बौद्धिक उंचीही कमी राहते. आकलन यथातथा आणि वर्तनही  विचित्र असतं.  नकटी, बारीक डोके, पातळ ओठ अशी त्यांची  चेहरेपट्टी,  वेगळीच दिसते.

जन्मतः या साऱ्या त्रासाचे निदान करणे  महा मुश्किल.  शिवाय झालेला त्रास दुरुस्त करणेही अवघड. लवकर निदानाचा उपयोग आलेल्या अपंगत्वावर मात कशी आणि कितपत  करता येईल हे दाखवून देण्यापुरताच होतो.  त्यामुळे प्रतिबंध हाच खरा उपाय, हे अगदी खरं आहे.

खरंतर तुम्ही पीत असाल तर तसं डॉक्टरांना स्पष्टपणे सांगायला हवं. बहुतेक डॉक्टर अधूनमधून का होईना पीत असतात आणि पीत नसले, तरी  अचानक ते तुम्हाला नीतिमत्तेचे धडे देतील अशी शक्यता कमीच. त्यामुळे डॉक्टरांकडे दारूबद्दलचा कबुलीजबाब द्यायला बिचकू नका. आल्या प्रसंगाला, झाल्या आजाराला, तोंड देणे, तोंड द्यायला शिकवणे, हेच डॉक्टरांचं  काम.  कोणाही  पतीतेच्या पापाची मोजदाद करण्याचे काम डॉक्टरांचं  नाही. आणि कोणी चित्रगुप्ताची खतावणी पुढ्यात ओढून जमाखर्च लिहायला लागलेच तर तुम्ही सरळ  डॉक्टर बदला.   

एकदा दिवस राहू द्यायचा निर्णय घेतला की त्या निर्णयाबरोबरच दारू सोडायचा निर्णय घेणे  उत्तम.  कारण सुरवातीचे काही महिने बाळाचे निरनिराळे अवयव तयार होत असतात आणि त्या दरम्यान तुम्ही दारू पीत राहिलात तर अवयव तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो.

आधी नाही तर,  निदान दिवस राहिले रे राहिले की दारू बंद करायला हवी. आपलं आपण ठरवून  असं करणं जमत नसेल तर मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला हवी. 

इतके दिवस केली नसेल तर आज हे वाचल्यापासून बंद करा. काही तरी फायदा होईलच. उगीच, आता तसंही उशीर झालाय, आता काय उपयोग, असा विचार करू नका. बाळाच्या मेंदूची वाढ नऊ महीने चालूच असते त्यामुळे आज दारू प्यायचं  बंद केलं, तरीही त्याचा काहीना काही फायदा हा होतोच

मी तर फक्त बियर घेते किंवा वाईनच   घेते, त्यात काय एवढं? असा कॉलेजीय युक्तिवाद करू नका.  दारू याचा अर्थ वैद्यकीय परिभाषेमध्ये अल्कोहोल असलेलं कोणतेही पेय. काही तथाकथित साध्याशा पेयांमध्ये बियरपेक्षाही जास्त ‘दारू’ असते.  त्यामुळे सुरक्षित दारू असा प्रकार संभवत नाही. एकच प्याला चालेल का?, नवव्या महिन्यात चालेल का?, पहिले तीन महिने वगळून एरवी  चालेल का?, असले प्रश्नही गैरलागू आहेत.  अमुक इतक्या प्रमाणात चालेल आणि तमुक इतक्या वेळा चालेल, अशी परिस्थिती नाही.  थोड्याच वेळा घेतलेली थोडीशी दारूसुद्धा वाईटच; फक्त खूप वेळा घेतलेल्या खूप दारूपेक्षा कमी वाईट; एवढंच.

मद्यपी माता आणि त्यांची मदिरा बाधा झालेली मुले,  हा प्रश्नच उद्भवू नये म्हणून बऱ्याच गोष्टी करता येतील. एक  म्हणजे लोकशिक्षण.  एकूणच समाजातून दारूचे प्रमाण कमी करणे,  प्रसूतिपूर्व सल्लामसलतीच्या वेळी याबद्दल प्रबोधन करणे, व्यसनी महिलांना गर्भनिरोधक, गर्भपात सहज उपलब्ध होतील असं  पाहणे वगैरे.

वरील उपाययोजनांबद्दल वाद असण्याचे कारण नाही. पण पाश्चात्य देशांत चर्चिल्या जाणाऱ्या काही सूचना मात्र वादग्रस्त आहेत. उदाहरणार्थ गरोदर महिलांना दारूच विकली जाणार नाही असा कायदा करणे किंवा त्यांना कायद्याने गर्भपात करायला भाग पाडणे किंवा  प्रसूती होईपर्यंत त्यांना चक्क सुधारगृहात डांबणे.

गोची अशी आहे की सुधारगृहाचा बागुलबुवा असला, तर अशा बायका गरज असूनही मुळात दवाखान्यातच  जाणार नाहीत आणि असल्या कायद्यामुळे त्या बायका आणि होणारी बाळं  यांची अधिकच आबाळ होईल. पिणाऱ्या आयांनी बाळाला इजा व्हावी या हेतूने दारू प्यायलेली नसते तर बरेचदा दारू पिणे ही व्यसनी  व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक गरज असते.  व्यसनग्रस्त व्यक्ती ही स्वतःच आजारी असते. तिला स्वतःलाच मदतीची गरज असते.  असं असताना तिच्या कृतीचे गुन्हेगारीकरण करणं कितपत योग्य आहे?

असे अनेक प्रश्न आहेत. आपल्या रुद्राक्ष संस्कृतीत हा प्रश्न अजून फारसा गंभीर नाही. आपल्याकडे बाई ही बाटलीपासून सहसा चार हात लांबच असते.  पण द्राक्ष आणि रुद्राक्ष संस्कृतीचे मीलन होते आहे. संस्कृतीमंथन सुरू आहे. या मंथनातून सुरा बाहेर येणारच  आहे. तिचं नेमकं काय करायचं हे आधीच ठरवलेलं बरं.    

 

पूर्व प्रसिद्धी

लोकसत्ता

चतुरंग पुरवणी

११/९/२०२१

 

 

 

 

No comments:

Post a Comment