प्रकरण १०
भूकंप कशानी होतात?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील
‘व्हॉट इज अन अर्थक्वेक?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९
पुस्तक वाचत, टीव्ही बघत
किंवा कॉम्प्यूटरवर गेम खेळत तुम्ही आरामात बसलेले आहात,अचानक भूगर्भातून घू घू
असे आवाज येतात आणि खोली गदागदा हलायला लागते. टांगलेला दिवा झोके घ्यायला लागतो.
शेल्फातल्या वस्तू खळकन् खाली पडतात. खुर्च्या टेबलं आपापली जागा सोडतात. तुम्हीही
खुर्चीतून खाली कोसळता. दोन मिनिटाच्या या कल्लोळानंतर सारं शांत शांत होतं. ही
शांतता भेदत कुठूनतरी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो, लांब कुत्री भुंकायला
लागतात...! स्वतःला सावरत तुम्ही उठता, घर कोसळलं नाही हे नशीबच म्हणायचं असा
विचार करता. भूकंप आणखी थोडा जरी मोठा असता तरी घर कोसळलं असतं नक्कीच.
भूकंप होतच असतात. हे
पुस्तक लिहायला घेतलं त्याच सुमारास कॅरिबिअन बेटात प्रचंड मोठा भूकंप झाला,
हैतीची राजधानी पोर्ट औ प्रिन्स भुईसपाट झाली. अडीच हजार लोकं गेली आणि कित्येक
बेघर, निराधार, रस्त्यावर किंवा मदत छावण्यात अजूनही निवारा शोधत आहेत.
ह्याच पुस्तकावर अखेरचा हात
फिरवताना जपानच्या ईशान्येला समुद्रात भूकंप झाला. यातून उद्भवलेल्या त्सुनामी
लाटेच्या तडाख्यात किनाऱ्यावरची गावंच्या गावं वाहून गेली. हजारो बळी गेले,
कोट्यवधी निराश्रित झाले आणि अणुभट्टीत स्फोट झाल्यामुळे प्रचंड हानी झाली.
भूकंप आणि त्सुनामी हे
जपानमध्ये नित्याचंच. त्सुनामी हा शब्दही मूळचा जपानीतलाच आहे. पण एवढा मोठा दणका
हा ताज्या आठवणीत पहिलाच. हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबाँम्ब हल्यानंतर जपाननी
अनुभवलेला हा तिसरा प्रलयकल्लोळ असं वर्णन खुद्द जपानच्या पंतप्रधानांनी केलं.
प्रशांत महासागराकाठी नेहमी भूकंप होतात. जपानच्या आधी महिनाभर न्यूझीलंडच्या
ख्राईस्टचर्चलाही असाच जबरदस्त भूकंप झाला होता. पॅसिफिकच्या काठाला ‘रिंग ऑफ फायर’
(अग्नी-वर्तूळ) असं सार्थ नाव आहे. या वर्तुळावर भूकंप आणि ज्वालामुखी नेहमीचेच. कॅलीफोर्निया
आणि अमेरिकेचा पश्चिम किनारा ह्या वर्तुळाचाच भाग. १९०६ सालचा सॅन फ्रॅन्सिस्कोचा
भयाकारी भूकंप असाच आजही इतिहासात स्थान
राखून आहे. लॉस एन्जेल्स शहरही असंच, भूकंपाच्या काठावर वसलेले आहे. सॅन अॅड्रीज
भेगेवर हे शहर आहे.
भूकंप होतो म्हणजे
जमीनीच्या लाटा लाटा सरकत जातात. अगदी पाण्यावर लाटा उठाव्यात तसंच. तुम्ही
जमिनीवर असता आणि लाटा खूप पसरट असतात त्यामुळे त्या ‘दिसत’ नाहीत तुम्हाला.
तुम्हाला फक्त पायाखालची जमीन हादरलेली जाणवते.
भूकंप का होतात, कधी होतात,
भेग म्हणजे काय हे सारं आपण पुढे पहाणारच आहोत. तत्पूर्वी काही मिथककथा लक्षात
घेऊ.
भूकंप मिथके
दोन इतिहासप्रसिद्ध भूकंपांबद्दलच्या
कथा आपण आधी पाहू.
गावातील पाप वाढलं, हिब्रू
देवाचा कोप झाला आणि सोडोम आणि गोमोराह
ह्या दोन गावांचा भूकंपात नाश झाला; अशी एक यहुदी कथा आहे. दोन्ही गावात मिळून लॉट
एवढा एकच पुण्यात्मा होता. देवदूतामार्फत देवानी लॉटला सावध केलं. त्याला सोडोमबाहेर
पडायला सांगितलं. तो आणि त्याचे कुटुंब जेमतेम शेजारच्या टेकडीवर पोहोचले असतील
नसतील तोच देवाचा प्रकोप सुरु झाला. मागे वळून बघायचं नाही अशी अट असतानाही
लॉटच्या पत्नीनी मागे पाहीलंच. तात्काळ तीचं रुपांतर एका मिठाच्या खांबात झालं.
आजही हा खांब पर्यटकांना दाखवतात.
चार हजार वर्षापूर्वी इथे
खरोखरच मोठा भूकंप झाल्याचं काही पुरातत्ववेत्यांचं मत आहे. भूकंपाच्या सत्यकथेभोवती
गुंफलेली ही मिथ्यकथा आहे तर.
जेरीकोच्या पतनाची
बायबलमधील कथाही अशीच खऱ्याखुऱ्या भुकंपाभोवती विणलेली दिसते. मृत समुद्राच्या उत्तरेला
जेरीको हे शहर, जगातलं एक सर्वात प्राचीन शहर आहे. अगदी आजही इथे भूकंप होतच
असतात. इथे केंद्रीत असलेल्या १९२७ च्या भूकंपानं २५ किमी दूरच्या
जेरुसलेममध्ये शेकडो बळी घेतले होते.
हिब्रूंच्या कथेप्रमाणे
हजारोवर्षापूर्वी जोशुआ या कथानायकाला जेरीको जिंकून घ्यायचं होत. जेरीकोची तटबंदी
अगदी चिरेबंदी होती. ह्या तटाला भगदाड पाडणे जमेना तेंव्हा त्यानी आपल्या सहकाऱ्यांना
जोरजोरात ओरडायला आणि तुतारी, भेरी फुंकायला सांगितलं.
ह्या आवाजानी त्या तटबंदीला
भेगा पडल्या आणि लवकरच ती कोसळली. जोशुआच्या सैन्यानी आत प्रवेश करून तिथले
स्त्री, पुरुष, मुलबाळं, जनावरं, अशी प्रछन्न, सरेआम, कत्तल केली. वर जाळपोळ करून सगळ्याची
राखरांगोळी केली. वाचलं ते फक्त सोनंनाणं. देवाच्या आदेशानुसार सगळं त्याला
वहाण्यात आलं. जेरीकोनगरीच्या लोकांची अशी ससेहोलपट व्हावी हे तो जोशुआच्या श्रींची
इच्छा होती म्हणे.
जेरीकोला इतके भूकंप होतात
की अशाच एखाद्या भूकंपानंतरच ही कथा प्रसवली गेली असेल. कधीकाळच्या विनाशकारी
भूकंपाच्या आठवणी पिढ्यापिढ्या कथासरितेच्या रूपानी वहात राहिल्या. अर्थातच त्यावर
काळाची आणि कल्पनाशक्तीची पुटं चढली. त्यातूनच जोशुआच्या शौर्याची आणि
रणवाद्यांच्या आवाजी चढाईची मिथककथा जन्माला आली.
अश्या खऱ्याखोट्या भूकंपानंतर
निर्माण झालेल्या किती कथा सांगाव्यात. भूकंप का होतात हे समजावून घेण्याचा
लोकांचा हाही एक प्रयत्न.
जपानमध्ये भूकंप खूप
त्यामुळे भूकंपकथाही खूप. नमाझुच्या (हा एक मोठा मासा आहे.) पाठीवरतीच जपानची भूमी
तरंगत होती. नमाझूनी शेपूट हलवली की भूकंप ठरलेला.
जपानहून हजारो किलोमीटर
दक्षिणेला, न्यूझीलँड बेट आहेत. युरोपीय लोकांनी इथे बस्तान बसवण्याआधी काही शतकं,
इथे छोट्या छोट्या होडक्यातून माओरी लोक पोहोचले होते. त्यांच्यामते, ‘रु’देवाच्या
जन्मावेळी जेंव्हा धरा गरोदर होती, तेंव्हा ‘रु’च्या गर्भातल्या हालचालीमुळे
धरणीकंप सुरु झाले ते अजून होतात.
उत्तर सायबेरियाच्या
टोळीमते, पृथ्वी ही एका स्लेजवर आहे, कुत्री ही स्लेज ओढताहेत, ‘तुल’देवाच्या
हातात ह्या स्लेजचे वेग आहेत. त्या कुत्र्यांनी पिसवा चावल्यामुळे ‘जर्रा खाजवा
की’ असं केलं की झालं; डळमळले भूमंडळ.
पश्चिम आफ्रिकेच्या
लोककथेप्रमाणे पृथ्वी एका तबकडी सारखी आहे. एकाबाजूला एका पर्वताचा आधार आहे आणि
दुसऱ्याबाजूला एका राक्षसाचा. राक्षसपत्नीनी आभाळ तोलून धरले आहे. प्रेमाचं भरतं
आलं की हे दोघं आपापली कामं सोडून एकमेकाला कडकडून मिठी मारतात आणि... परिणाम उघडच
आहे.
इतर टोळ्यांच्यामते पृथ्वी
म्हणजे एका राक्षसाचं शीर आहे, जंगल म्हणजे त्याचे केस, प्राणी आणि आपण हे त्या
केसातल्या उवा, लिखा, पिसवांसारखे. हा राक्षस शिंकला की भूकंप ठरलेलेच.
आता मात्र भूकंपाची कारणं
आपल्याला माहित आहेत, आता सत्यान्वेशनाची वेळ आली आहे.
भूकंप म्हणजे नक्की काय?
हे समजावून घेण्याआधी
आपल्याला भूकवच आणि त्याच्या हालचालींची माहिती करून घ्यावी लागेल.
जगाचा नकाशा तुम्ही पाहिलाच
असेल. आफ्रिकेचा , दक्षिण अमेरिकेचा आकार तुम्हाला ठाऊकच आहे. त्या दोहोमध्ये
अटलांटिक महासागर पसरला आहे. ऑस्ट्रेलीयाही आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. त्याच्या
आग्नेयेला न्यूझीलँड बेटं आहेत. इटली नकाशात एखाद्या बुटासाखी दिसते. अगदी
शेजारच्या सिसिलीच्या ‘बॉल’ला केव्हाही लाथ घालायच्या बेतात असलेली. न्यू-गिनीबेटंही
दिसायला, पक्ष्यासारखी दिसतात. युरोपचा नकाशा आत कितीही बदलला तरी युरोपखंडाची बाह्य
रेषा कायम आहे, चांगल्या माहितीची आहे
आपल्या. साम्राज्य येतात जातात, देशांच्या सीमा बदलतात, पण खंडांच्या बाह्यरेषा
जशाच्या तशाच रहातात. नाही का? नाही. ह्याही बदलतात. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे.
अतिशय संथपणे कूर्मगतीनी ही हालचाल होते. आल्प्स, रॉकी, अॅन्डीज, किंवा
हिमालयासारखे गिरीराजही संथपणे, गीरीगतीनी हालत असतात. मानवी इतिहासाच्या दृष्टीनी
हे पर्वत जैसे थे असतात. मानवाचा इतिहास हा पृथ्वीचं वयोमान पहाता अगदीच किरकोळ काळ
आहे. लिखित इतिहास हा जेमतेम ५००० वर्षाचा आहे. कोटीभर वर्ष मागे जाउनही, खंडांची
रचना फारशी वेगळी नसेल. पण शंभर कोटीवर्षापूर्वी काय बरं दिसेल? दक्षिण अटलांटिक महासागर
हा समुद्र्धुनी शोभावा एवढा अरुंद असेल. आफ्रिकेतून उडी ठोकून दक्षिण अमेरिकेला
पोहत पोहोचता येईल. ग्रीनलँड आणि युरोपच्या सीमा भिडलेल्या असतील. ग्रीनलँडच्या
दुसऱ्या बाजूला कॅनडा अगदी लगटून असेल. भारतीय उपखंड तर आशियाबाहेर असेल. तो आफ्रिकेच्या
दक्षिणेला टेकलेला आढळेल.
जगाच्या नकाशाकडे बघता बघता
तुम्हाला कदाचित जाणवलं असेल की आफ्रिकेचा आणि दक्षिण अमेरिकेचा किनारा एकमेकात
फिट्ट बसणारा आहे. पन्नास कोटी वर्षापूर्वी हे दोन्ही खंड खरोखरच एकाच महाकाय
खंडाचे भाग होते.
अफ्रिका आणि दक्षिण अमेरिका
एकत्र होतेच पण त्यांच्याच साथीला मादागास्कर, भारत, आणि अंटार्क्टीकाही होते. याच
अंटार्क्टीकाच्या विरुद्धबाजूला ऑस्ट्रेलिया
आणि न्यूझीलँड चिकटलेले होते. या साऱ्या महाखंडाला गोंडवन असं नाव आहे. या
गोंडवनखंडाचे खंड खंड होत होत आताची रचना तयार झालेली आहे.
शुद्ध लोणकढी थाप वाटते ना
ही कथा? महाकाय खंडच्या खंड हजारो किलोमीटर सरकतात हे आक्रीतच की. पण असं झालं हे
आपल्याला माहित आहे आणि कसं झालं तेही माहित आहे.
खंड कसे सरकतात?
खंड एकमेकांपासून लांबच
जातात असं नाही तर ते एकमेकाला धडकासुद्धा मारतात. दोन खंडांची धडक झाली की त्याठिकाणी,
गगनाला गवसणी घालणारे उंचच उंच पर्वत उभे रहातात. भारत आणि आशियाखंडाच्या धडकेतून
हिमालय निर्माण झाला आहे. पण भारत आशियाला धडकला इतक्या सरधोपटपणे हे सांगणं चुकीचं
आहे. धडक झाली ती ‘प्लेट्स’ची. प्लेट्स म्हणजे खंडांचे शंख पाठीवर घेतलेल्या
गोगलगायी. या प्लेट्स असतात समुद्रतळाशी. यांच्या पाठीवर खंड वसलेले आहेत. प्लेट्सबद्दल
आपण पुढे पहाणारच आहोत. सध्या खंड लांब जाणे आणि धडकणे हे कसं घडतं ते पाहू आपण.
धडक, टक्कर वगैरे म्हटलं की
आपल्याला दोन गाड्यांची टक्कर आठवते. इतक्या झटपट इथे काही घडत नाही. खंडांची/प्लेट्सची
हालचाल अगदी संथगतीनी चालते. नखांकडे कितीही टक लावून पाहिलं तरी ती वाढल्याचं
दिसत नाही, पण दर दोन चार आठवड्यानी मात्र काढावी लागतात. तसंच हे. आफ्रिका आणि
दक्षिण अमेरिका एकमेकांपासून लांब सरकताना दिसत नाहीत. मात्र ५० कोटी वर्षानंतर बघावं
तर हे आपले लांब सरकलेले.
नखं रोज थोडीथोडी वाढतात.
खंडांच्या हालचालीचं तसं नाही. ते मधूनच झटका आल्यासारखे बरेच हालतात, मग पुन्हा
बराच काळ शांतता. पृथ्वीच्या पोटात ह्या काळात दाब वाढत जातो, काही काळानी पुन्हा
हालचाल होते. हालचाल झाली की हा दाब कमी होतो.
अशा या हालचाली म्हणजेच
भूकंपाचे धक्के हे तुम्ही ओळखलंच असेल.
पण हे ज्ञान आपल्याला झालं
कसं? कळलं कसं हे? तीही एक रंजक कथाच आहे.
अफ्रिका आणि दक्षिण अमेरिका
वगैरे खंडांच्या कडा ह्या एकमेकात फिट्ट बसतात हे अनेकांच्या लक्षात आलं होतं. पण
निव्वळ योगायोग, ह्या पलीकडे ह्याचं कारण सापडत नव्हतं. शतकभरापूर्वी, आल्फ्रेड
वेगेनेर ह्या जर्मन शास्त्रज्ञानी, खंड सरकतात अशी एक बंडखोर कल्पना मांडली. बऱ्याच
जणांनी त्याला वेड्यात काढलं. प्रचंड गलबतासारखे खंड हलत असतात असं त्यानी सुचवलं.
आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टीका हे सारे खंड आधी एकत्र
होते. पुढे ते सरकत सरकत लांब लांब गेले. वेगेनेरची भरपूर चेष्टा झाली. पण अखेर
त्याचंच म्हणणं खरं ठरलं. जे हसले त्यांचे दात दिसले.
भरभक्कम पुरावा असलेली आजची
प्लेट टेक्टॉनिक थिअरी आणि वेगेनेरनी सुचवलेली थिअरी यात फरक आहे. आफ्रिका, दक्षिण
अमेरिका, भारत, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टीका हे एकेकाळी एकत्र होते आणि
नंतर हळूहळू विलग झाले ही त्याची अटकळ बरोबरच होती. पण त्यानी सुचवलेली कारणं आणि
आज माहित असलेली कारणं भिन्न आहेत. खंड हे पृथ्वीच्या पोटातील लाव्हाच्या
समुद्रावर तरंगत तरंगत सरकतात अशी त्याची कल्पना होती. आधुनिक विचारानुसार खंड
हलतात ते त्यांच्या तळाशी असलेल्या प्लेट्स हलतात म्हणून. पाठीवर खंडांचे शंख
मिरवणाऱ्या ‘गोगलगायी’ म्हणजे ह्या प्लेट्स.
खंड म्हणजे निव्वळ
पाण्याबाहेर डोकावणारी जमीन. ह्या जमिनीचा पाया बराच बराच रुंद आहे. वर डोकावतं ते
खंड-नगाचं टोक फक्त. आफ्रिका खंड अफ्रिका-प्लेटवर आहे. आपल्याला दिसतो तो ‘अफ्रिका
खंड’, ह्याचा पाया असलेली अफ्रिका प्लेट ही दृश्य खंडापेक्षा कितीतरी ऐसपैस पसरलेली
आहे. पार दक्षिण अटलांटिक महासागराच्या मध्यापर्यंत ही अफ्रीकेची प्लेट आहे. तिथून
पुढे दक्षिण अमेरिकेची प्लेट सुरु होते. हिच्या पाण्याबाहेर डोकावणाऱ्या भागाला
आपण दक्षिण अमेरिका खंड म्हणतो. भारतीय उपखंड हा एका वेगळ्याच प्लेटवर आहे.
ऑस्ट्रेलियाची एक प्लेट आहे. युरेशिया प्लेटीवर युरोप आणि आशिया आहे अर्थात भारत
वगळून. आफ्रिकेच्या आणि युरेशियाच्या सापटीत अरबी प्लेट आहे. उत्तर अमेरिका आणि
ग्रीनलँड आपल्या पाठीवर वागवणारी, आणि उत्तर अटलांटिकच्या तळाशी निम्यापर्यंत
पसरलेली उत्तर अमेरिकेची प्लेट आहे. काही प्लेटींवर तर पाण्याबाहेर दिसणारा भागच
नाही. त्या संपूर्णपणे पाण्याखालीच आहेत. उदाः पॅसिफिक तळाची, पॅसिफिक प्लेट.
दक्षिण अमेरिका आणि अफ्रिकेच्या
प्लेटमधली भेग ही दक्षिण अॅटलँटीकच्या तळाशी आहे. दोन्ही खंडांच्या आपल्याला
दिसणाऱ्या कडांपासून कैक मैल दूर आहे. समुद्रतळ हाही ह्या प्लेट्सचा अविभाज्य भाग
आहे. इथे असतो अती कठीण खडक. मग दीडशे कोटी वर्षापूर्वी हे खंड एकमेकाला बिलगून
होते हे शक्य आहे? वेगेनर म्हणाला होता की हे खंडच हलत आहेत. प्लेटची कल्पना
तेंव्हा नव्हती. आता प्लेट हलतात हे मान्य झालं आहे. ह्या प्लेट लांब लांब
जाण्यासाठी त्या एका कडेनी वाढत असल्या पाहिजेत. म्हणजे? ह्या खडकांच्या प्लेटी
वाढतात बिढतातकी काय?
समुद्रतळ पसरत जातो?
हो. मोठ्या मोठ्या
विमानतळावर सरकते जिने असतात. तसे सरकते पट्टेही असतात. विमानतळावर आपापलं अवजड
समान घेऊन कितीतरी अंतर चालत जावं लागत. इथे पट्ट्यांचा छान उपयोग होतो. सामानासकट
आपण पट्ट्यावर चढलं की सरकत सरकत काही अंतर पुढे. हे पट्टे छोटे असतात. कल्पना
करा, काही हजार किलोमीटर रुंद, पार आर्टिक प्रदेशापासून अॅन्टार्टीक प्रदेशापर्यंत
रुंद असा पट्टा असेल तर? आणि चालण्याच्या गतीनी नाही, तर नखं वाढतात त्या वेगानी
हा सरकत असेल तर? दक्षिण अमेरिका आणि तिच्या पायीची प्लेट ही आफ्रिका आणि तिच्या
पायीच्या प्लेटीपासून लांब जाते आहे. ह्या दोन प्लेट्स म्हणजे दोन महाकाय सरकते
पट्टे आहेत. अटलांटिक महासागरात हे दक्षिणोत्तर असे आहेत. समुद्रतळाशीच ही संथ
हालचाल होते आहे.
आफ्रिकेच्या प्लेटचं काय?
ती कोणत्या दिशेला सरकते आहे?
आफ्रिका वहाणारा सरकता पट्टा हा दक्षिण अमेरिकेच्या विरुद्ध दिशेला सरकतो आहे. आफ्रिका खंड हा
पूर्वेकडे सरकतो आहे तर दक्षिण अमेरिका खंड पश्चिमेला सरकतो आहे. मग ह्या दोन्ही
प्लेट जिथे एकमेकांना भिडतात तिथे काय चालू आहे? पुन्हा एकदा सरकत्या पट्ट्याची
याद काढा. त्यावर पाउल ठेवतो त्या तिथे हा पट्टा गोल फिरत असतो. जमिनीतून त्याचा
अदृश्य भाग सरसर वर येत असतो आणि पुढे ढकलला जात असतो. दुसऱ्या टोकाशी हा पुन्हा जमिनीखाली
गायब होतो. जमिनीखालून पुन्हा पहिल्या ठिकाणी येतो. हा पट्टा असा गोल गोल फिरत
रहातो. कल्पना करा की दोन विरुद्ध बाजूला सरकणारे पट्टे आहेत. अशा पट्ट्यावर उभं राहिलेल्या
माणसांतील अंतर हे वाढतंच जाणार.
जमिनीच्या भेगेतून जसे हे
पट्टे वर येतात, तशीच भेग अटलांटिक सागराच्या तळाशी आहे. दक्षिणोत्तर पसरलेली.
याला म्हणतात मिड अटलांटिक रिज. ह्या भेगेतून वर येणारे दोन पट्टे विरुद्ध बाजूला
सरकत जातात. आफ्रिकेचा पट्टा आफ्रिकेला घेऊन पूर्वेकडे सरकतो आहे तर दक्षिण
अमेरिकेचा पट्टा दक्षिण अमेरिकेसकट पश्चिमेकडे सरकतो आहे. विमानतळावरच्या
पट्ट्याप्रमाणेच सागरतळीचे हे पट्टे पृथ्वीच्या पोटात शिरतात आणि गोल फिरून
दुसऱ्या टोकाला पुन्हा बाहेर येतात.
पुन्हा विमानतळावर गेलात की
या पट्ट्यावर चढण्यापूर्वी स्वतः आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिका आहोत अशी कल्पना
करा. दुसऱ्या टोकाशी उतरताना तो पट्टा जमिनीत गायब होताना दिसेल. जमिनीखालून हा
पट्टा आता पुन्हा पहिल्या ठिकाणी सरकणार आहे.
विमानतळावरचे हे पट्टे
विद्युतशक्तीवर फिरतात. खंडांचे शंख पाठीवर घेऊन सरकणाऱ्या ह्या प्लेट्स नामक
गोगलगायींना शक्ती कुठून मिळते? पृथ्वीच्या पोटात कन्व्हेक्शन करंट असतात आणि
ह्याच आधारावर ह्या प्लेट्स सरकतात. कन्व्हेक्शन करंट म्हणजे काय?
चहाचं आधण ठेवलं की नीट पहा
तुम्ही. आधी तळाचं पाणी गरम होतं. गरम पाणी हलकं असतं. हे वर येतं. त्याची जागा खाली जाणारं
वरचं, त्या मानानी गार असलेलं पाणी घेतं. तापमानातील फरकामुळे वर-खाली असा फिरणारा
एक प्रवाह निर्माण होतो. ह्याला म्हणतात कन्व्हेक्शन करंट.
कोणत्याही द्रव अथवा
वायुरूप पदार्थात असे प्रवाह निर्माण होऊ शकतात. पण जमिनीच्या पोटात असे प्रवाह?
तिथे कुठे द्रव पदार्थ आहे? आहे ना. अगदी पाण्यासारखा नाही पण साधारण मधासारखा
घट्टसर द्रावच आहे पृथ्वीच्या पोटात. तिथे उष्णताच इतकी आहे की खडक-बिडक सगळं काही
तिथे द्रव-अवस्थेतच आहे. ही उष्णता पृथ्वीच्या केंद्रातून येत असते. मधूनच ह्या
तप्त द्रवाला पृष्ठभागावर वाट मिळते, आपण म्हणतो ज्वालामुखीचा स्फोट झाला.
उष्णतेचं इंजिन
प्लेट्स ह्या खडकांच्या
बनलेल्या आहेत आणि ह्यांचा बहुतेक भाग पाण्याखाली असतो. ह्या प्लेटची जाडी काही
किलोमीटर असते. पृथ्वीच्या या आवरणाला म्हणायचं अश्मावरण. (खडकांचे आवरण
Lithosphere) ह्याच्या खाली आहे तो मधाळ द्रव पदार्थ. ह्याच्यावरच प्लेटची होडकी
तरंगत आहेत अशी कल्पना करा. अंतरीच्या उष्णतेमुळे त्या मधाळ द्रावणात विविध प्रवाह
तयार होत आहेत. ह्याच्या परिणामी प्लेट्स सरकत आहेत.
समुद्रातले किंवा वाऱ्याचे
प्रवाह जसे अती गुंतागुंतीचे असतात असेच हे धरणीच्या पोटातले प्रवाहही खूप
गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे प्लेट्स काही चक्रात बसल्यासारख्या गोल गोल फिरत
नाहीत. प्रवाह पतित होऊन त्या वेड्या वाकड्या कशाही ढकलल्या जातात. दूर जातात, टकरा
घेतात, घासून जातात, एकमेकींच्या खालीवर सरकतात. ह्या साऱ्याचा आपल्याला येणारा
अनुभव म्हणजे, भूकंप. रौद्रभीषणच असतात भूकंप, उलट आश्चर्य याचं वाटतं की बरेचदा
ते सौम्य असतात.
जेंव्हा एखादी प्लेट
दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकते तेंव्हा त्याला सबडक्शन म्हणतात. आफ्रिकेची प्लेट
युरेशियाप्लेट खाली ढकलली जाते आहे. ह्या मुळे इटलीत भूकंप फार. अशा कडांवर
ज्वालामुखी तयार होतात. इटलीतील व्हेसुव्हियस पर्वतातील, प्राचीन रोमच्या पोम्पेई
शहराचा घास करणारा ज्वालामुखी, याचाच परिणाम. नगाधिराज हिमालय हा ही भारतीय उपखंड
युरेशियन प्लेटच्या खाली सरकल्याचाच परिणाम.
सुरवातीला आपण सॅन अॅड्रीज भेगेबद्दल
पाहिलं. ह्या भागात भूकंप होतात आणि येत्या दहा वर्षात खूप
मोठा भूकंप अपेक्षित आहे. ही भेग म्हणजे
पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकन प्लेटांमधली भेग. दोन्ही प्लेट्स वायव्वेला सरकत
आहेत. उत्तर अमेरिकेच्या प्लेटवर सॅन फ्रान्सिस्को वसलेलं आहे आणि पॅसिफिक प्लेटवर
लॉस एँजल्स. पण पॅसिफिक प्लेटचा वेग जास्त आहे. सरकत सरकत लॉस एँजल्स हे एक दिवस
सॅन फ्रान्सिस्कोनजीक पोहोचेल अशी अपेक्षा आहे. अर्थात हे चित्र बघायला आपल्यापैकी
कोणीच असणार नाही.
No comments:
Post a Comment