प्रकरण ९
कुणीतरी तरी आहे का तिथे?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या
‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील
‘आर वी अलोन?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो.क्र. ९८२२० १०३४९
माझ्या माहितीप्रमाणे
परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल प्राचीन कथा, कल्पना जवळपास नाहीतच. आपल्याला दिसतं, जाणवतं
किंवा ज्ञात आहे त्यापेक्षा हे विश्व खूप खूप विशाल आहे, ही जाणीव अगदी अलीकडची.
त्यामुळेच की काय प्ररग्रहवासी आणि त्यांचं पृथ्वीवर येणं हे आजकालच्या कथांचे
विषय. पुराणकथात हे नाहीत. पृथ्वी आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात हे स्पष्ट
झालं इसवीसन १५०० च्या पुढे मागे. पण ताऱ्यांची प्रचंड संख्या, त्यांच्यातली अशक्य
अंतरं, हे कुणाच्या कल्पनेत तर नाहीच पण स्वप्नातही आलं नव्हतं; मग दूरस्थ आकाशगंगांची
तर बातच सोडा. इतकंच काय पण एखादा जेव्हा ‘वर’ म्हणून बोट करतो, समजा पुण्यात,
तेंव्हा पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला वसलेल्या माणसाच्या दृष्टीनी, समजा ब्राझीलमधे,
तीच दिशा ‘खाली’ असते. हेही अगदी अलीकडचं आकलन. आधी अशी समजूत होती की वर म्हणजे
सगळीकडे एकच दिशा असते. वर आभाळापल्याड स्वर्ग असतो. वर स्वर्गात देव रहातात...!
परग्रहावरच्या जरी नाहीत,
तरी परलोकीच्या अनेकानेक चित्र विचित्र जीवांच्या कथा मात्र आहेत. पाताळातले
राक्षस आहेत, स्वर्गातले तुंबरू आहेत, पाण्यातळीच्या अप्सरा आहेत, शिवाय भूतंखेतं
आहेत, आत्मे आहेत... मोठी यादी आहे. पण हे सारे इथे, तीन लोकांत. परग्रहावर, किंवा
आपल्यापेक्षा वेगळ्याच विश्वातल्या मिथककथा पोथ्यापुराणात जवळपास नाहीतच. आजच्या
आधुनिक, शहरी कथाविश्वाच्या, मात्र त्या अविभाज्य भाग आहेत. अशा आधुनिक मिथककथाही
खूप अभ्यासनीय असतात. आपल्या देखत एखादी मिथककथा जन्म घेते. तिचा उगम आणि विकास
शोधता येतो. ह्या प्रकरणात आपण आधुनिक मिथककथा पाहू या.
‘हेवन्स गेट’ (स्वर्गद्वार)
नावाच्या कॅलीफोर्नियातील एका पंथाच्या सर्वच्या सर्व ३९ सदस्यांनी, मार्च ९७ ला
विषप्राशन करून, एकसाथ आत्महत्या केली. परग्रहावरून येणारं यान आपले आत्मे
वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे अशी त्यांची ठाम खात्री होती. त्यावेळी हॅलेचा
धूमकेतू दिसत होता. त्याच्या सोबतच हे यान येणार आहे असं त्यांच्या अध्यात्मिक
गुरुनी त्यांना सांगीतलं होतं. ते यान पहायला त्यांनी एक दुर्बीणसुद्धा मागवली. त्यातून
यान काही दिसलं नाही. असली मोडकी दुर्बीण पाठवल्याबद्दल दुकानदाराला दोष देत, त्यांनी
ती परत पाठवली. ज्याअर्थी यान दिसलं नाही त्या अर्थी दुर्बीणच मोडकी असणार, असा
त्यांचा युक्तीवाद.
ह्यांचा गुरु, मार्शल अॅपलव्हाईट,
हायचा तरी ह्या चक्रम कल्पनांवर विश्वास होता का? ह्यालाही खरंच असं वाटत होतं?
हो. अगदी प्रामाणिकपणे वाटत होतं. कारण त्यानीही इतरांबरोबर विष घेतलं. आत्महत्या
केली. खरंतर हे असले बुवा बहुतेकदा बायांच्या मागे असतात. पण इथे ह्या अॅपलव्हाईट
साहेबानी आणि इतर काहींनी स्वतःची वृषणं (पुरूषबीज आणि टेस्टोस्टेरॉन ग्रंथी)
काढून घेतली होती. तेंव्हा बाईच्या नादानं हे झालं नाही खास.
अशा मंडळींचा विज्ञानकथांवर
जाम जीव असतो. हेवन्स गेटचे सदस्य ‘स्टार ट्रेक’चे चहाते होते. अशा विज्ञानकथांचा
तर सध्या महापूरच आलाय. बहुतेक वाचक एक ललितकृती म्हणून या कथा वाचतात, त्यातल्या
कल्पनांना दाद देतात, त्यातल्या अद्भुताचा आनंद घेतात आणि सोडून देतात. काही मात्र
वहावत जातात. आपल्याला परग्रहवासीयांनी पकडलं आहे असं ते प्रामाणिकपणे समजतात. पुराव्याच्या
कुठल्याही सुतावरून परग्रह गाठतात ही लोकं.
एका गृहस्थांचा नाकाचा
घुळणा सारखा फुटायचा! त्याचं म्हणणं, परग्रहवासीयांनी त्यांच्या नाकात एक
ट्रान्समीटर बसवला असून, त्याच्या मदतीनी ते त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून
आहेत. इतकंच काय, आपण आपल्या आई वडीलांपेक्षा जरा सावळे आहोत, कारण आपण निम्मे परलोकपुत्र
आहोत असाही त्यांचा ग्रह होता. एरवी तुमच्या आमच्या सारख्या, साध्याशा असणाऱ्या,
अनेक अमेरिकनांना असं वाटतं की त्यांना उडत्या तबकड्यात नेऊन त्यांच्यावर काही
प्रयोग करण्यात आले आहेत. राखाडी रंगाच्या, मोठ्या डोक्याच्या, अख्या डोक्याभोवती
डोळे असलेल्या आक्रमकांनी, यांचे मेंदू ताब्यात घेतले आहेत. ह्या सगळ्या अपहरण
कथांचं मिळून आता एक आधुनिक पुराणच तयार झालंय म्हणाना. जुन्यापुराण्या पुराणाइतकच हेही चमत्कारीक आणि
चमत्कृतीपूर्ण. पण हे पुराण अगदी अलीकडचं. तुम्ही यातल्या पुराणपुरुषांशी जाऊन
बोलू शकता. अगदी सभ्य, शहाणीसुरती, चार लोकांसारखी ही माणसं. त्यांना परग्रहनिवासी
भेटल्याचं ती तुम्हाला आग्रहपूर्वक सांगतील, त्यांचं वर्णन ऐकवतील, ह्यांच्या
शरीरात प्रयोगासाठी सुया खुपसताना ते एकमेकांत (अर्थात इंग्लिशमधे) काय बोलत होते
हेही सांगतील.
अशा अपहरण कथांचा सुसान
क्लान्सी ह्या मानसोपचारतज्ञ बाईंनी बराच अभ्यास केला आहे. सगळ्यानाच जे घडलं ते
सुसंगतपणे आठवतं असं नाही. ज्यांना धड काही सांगता येत नाही त्यांच्याकडे याचीही
कारणमीमांसा हजर असते. ह्या परग्रहवासियांनी प्रयोग संपल्यावर, त्याची स्मृती
नाहीशी करण्याची काळजी घेतलीच असणार, नाही का? मग ते एखाद्या हिप्नॉटिस्टकडे वगैरे
जातात आणि गेलेली ही स्मृती परत येते म्हणे.
गेलेली स्मृती परत मिळवणे
ही एक भानगडच आहे. एखादी अशी घटना आपल्याला ‘आठवते’, तेंव्हा आठवत असते एक आधीचीच
कुठली तरी ‘आठवण’... अशा आठवणींच्या, आठवणीच्या, आठवणी... असं करता करता मुळातली
घटना ही सत्य का आभासी असा प्रश्न येतो. आठवणींच्या आठवणी, ह्या पुढेपुढे
मुळापेक्षा अधिकाधिक बदलत जातात. आपल्याला चक्षुर्वैसत्यम् वाटणाऱ्या कित्येक
स्मृती या निव्वळ आभासी घटना असतात, हे आता सिद्ध झाले आहे. शिवाय अशा आभासी आठवणी
आपल्या स्मृतीत पेरणारे भोंदू, विधिनिषेधशून्य ‘मानसतज्ञ’ही असतात.
आपलं अपहरण झाल्याचं
सांगणाऱ्या व्यक्तींना, इतकं सगळं स्पष्ट कसं आठवतं? हे स्पष्ट व्हावं, म्हणून हा
छद्म्मस्मृतीचा उहापोह. बहुदा अशाच इतर अपहरणकथा आणि बातम्या वाचून त्यांची
मनोभूमी तयार झालेली असते आणि या कल्पिताच्या आठवणीचं कलम, ते वास्तवावर करत
असतात. अशी लोक स्टार ट्रेक सारख्या मालिकांचे, गूढकथा, अजबकथा छाप साहित्याचे
भक्त असतात. त्यामुळेच त्यांना भेटलेले प्ररग्रहवासी दिसायला ताज्या टीव्ही सीरिअल
मधल्यासारखे असतात आणि त्यांचे ‘प्रयोग’ही टीव्हीछापच असतात.
दुसरंही कारण असतं. त्याला
म्हणतात, स्लीप पॅरॅलीसीस. हा भीतीदायक अनुभव कधीतरी तुम्हीही घेतला असेल. स्लीप पॅरॅलीसीस
म्हणजे नेमकं काय हे समजावून घेतलं, तर पुढच्या वेळी तुमची भीती कमी होईल.
निद्रावस्थेत जेंव्हा स्वप्न पडत असतात तेंव्हा आपले स्नायू अगदी लुळे, निष्क्रिय
झालेले असतात. ह्यामुळे स्वप्नातल्यानुसार तुम्ही हालचाली करत नाही. स्वप्न संपलं
की स्नायुंच्या हालचाली परत पूर्ववत होतात. कधीकधी ही यंत्रणा नीट काम करत नाही
आणि मग लोक झोपेत चालतात, बोलतात, लिहितात वगैरे.
कधीतरी असं होतं की जाग तर
येते, पण स्नायू मात्र लुळे ते लुळेच रहातात. याला म्हणतात स्लीप पॅरॅलीसीस. भयप्रदच
अनुभव हा. आपण जागे असतो, सगळं दिसत असतं, ऐकू येत असतं, पण हालचाल अजिबातच करता
येत नाही. कधी या अवस्थेत भयानक भास होतात. काहीतरी जीवघेणा प्रकार आहे, काय ते
कळत नाहीये, असं वाटायला लागतं. स्वप्न आणि जाणीवेच्या सीमेवर झुलत रहातो आपण. हे
आभासी जग अगदी खरंखुर वाटायला लागतं.
ह्या स्लीप पॅरॅलीसीस
दरम्यानचे भास, हे ‘मनी वसे ते भासी दिसे’ अशा स्वरूपाचे असतात. एखाद्या विज्ञान
काल्पनिकांच्या फॅनला, राखाडी रंगाचे, बटाट्या डोळ्याचे, शिंगांच्या अँटेनावाले परग्रहवासी
दिसायला लागतात. अशा कल्पना नव्हत्या तेंव्हा लोकांना व्हॅमपायर बॅट, वेअरवूल्फ, मुंजा,
खवीस, वेताळ किंवा फारच नशीबवान असतील त्यांना अप्सरा वगैरे दिसायच्या.
स्लीप पॅरॅलीसीसमधे
दिसणाऱ्या प्रतिमा या प्रत्यक्षातल्या नसतात. त्या आपल्या मनानी दंतकथा, भयकथा,
मिथककथा, विज्ञानकथा वगैरेतून नकळत उचललेल्या असतात. भास जरी झाले नाहीत, तरी शरीर
लुळं पडल्याचा अनुभव अंगावर शहारे आणणारा असतो. आपल्याला कुणी तरी काहीतरी केलंय,
कुणीतरी झपाटलंय हे चटकन स्वीकारतं मन. मग भुताखेतांवर विश्वास असलेल्यांना, ही
त्यांची किमया वाटते तर परग्रहवासीप्रेमींना खात्रीच पटते की आपल्याला पळवून नेउन,
प्रयोग करून, स्मृती पुसून, परत आणून टाकलं आहे.
हा भयानक अनुभव आणि त्याचं
त्यांनी शोधलेलं स्पष्टिकरण हे सुप्त स्मृतीमध्ये साठवलं जातं. वारंवार आठवलं जातं.
ह्याची उजळणी होत होत पक्की स्मृती तयार होते. ह्यात आसपासचे जिज्ञासू लोक आणखी भर
घालतात. त्यांना सविस्तर वर्णनाची अपार उत्सुकता असते. मग प्रश्नही उत्तर सुचवतंच
येतात. ‘परग्रहवासी होते का ते? राखाडी रंगाचे असतील ना? असे, बटाट्या डोळ्यांचे?
पिक्चरमधल्या सारखे?’ असल्या प्रश्नांमुळे भास-स्मृती आणखी मूळ रोवतात. हे सगळं
पहाता एका सर्वेक्षणामधे, चारकोटी अमेरिकन नागरीकांनी परग्रहवासी पाहिल्याचं
सांगितलं, यात मुळीच आश्चर्य नाही.
मानसशास्त्रज्ञ स्यू
ब्लॅकमोर हिच्या मते स्वप्न-वास्तवाच्या सीमारेषेवरच्या भासांचं कारण, स्लीप पॅरॅलीसीस
हेच आहे. मध्ययुगातल्या कथात, मध्यरात्री येऊन शरीरसुख भोगणाऱ्या स्त्री (सक्कूबस)
वा पुरुष (इंक्यूबस) भुतांच्या कित्येक कथा आहेत. स्लीप पॅरॅलीसीसमधे शरीराची
कोणतीच हालचाल शक्य होत नाही. कोणीतरी छातीवर बसलंय, सगळं शरीर दडपून गेलंय, सगळं
अंग कुणीतरी जखडून ठेवलंय असं वाटतं. सहजच याचा संबंध लैंगिक संबंधाशी,
बलात्काराशी जोडला जातो. काही मिथकात या भुतांना खास नावं आहेत. न्यूफाऊंडलँडच्या ‘ओल्ड
हॅग’च्या कथा आहेत तर इंडोचायनात ‘राखाडी भुता’च्या.
हे भास कसे होतात, ते होणाऱ्याला
ते अगदी खरेखुरे कसे वाटतात, त्यांच्याच मनी वसणारे परग्रहवासी, इंक्युबस सुक्युबस
हे भासांशी कसे जोडले जातात, ते आपण पाहिलं. परग्रहवासी इथे येऊन गेल्याचा काहीसुद्धा
पुरावा नाही. (इंक्युबस, सक्यूबस, समंध, खवीस, राक्षस, कशाकशाचाच नाही.) पण ते ‘इथे’
आल्याचा पुरावा नसला तरी ते ‘तिथे’ आहेत का, हा सवाल उरतोच. इथे कोणी आले नाहीत म्हणजे
तिथे कुणी नाहीच, असं नाही म्हणता येणार. जीवसृष्टी जशी इथे उत्क्रांत झाली तशी ती
तिथेही झाली नसेल कशावरून?
परग्रहावर जीवसृष्टी आहे
का?
माहित नाही. ठाम मत सांगाच
म्हणाल, तर हो. कदाचित एक कोटी ग्रहांवर आहे. पण हे मत झालं फक्त. पुरावा शून्य.
सबब मताची किंमतही शून्य. आपल्याला काय माहित नाही हे विज्ञानाला चांगलं माहित असतं.
विज्ञानाचं सौदर्य या पारदर्शी प्रमाणिकपणात आहे. अमुक एक गोष्ट ‘माहित नाही’, असं
विज्ञान अगदी आनंदानी मान्य करतं. आनंदानी अशासाठी की विज्ञानाच्या दृष्टीनी अज्ञान
ही एक संधी असते, एक आव्हान असतं, सोडवायला एक नवीन कोडं मिळाल्यासारखं असतं.
कधी ना कधीतरी पुरावा
हाताशी येईल. उत्तर नक्की सापडेल. सध्या अनिश्चितता कमी होईल अशी माहिती गोळा करता
येईल. निव्वळ कुणाला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा नेमकी शक्याशक्यता मांडता येईल.
हेही मोठं मतीचं आणि हिकमतीचं काम आहे बरं.
पहिलाच सवाल असेल की एकूण
ग्रह तरी किती आहेत? अगदी परवा परवा पर्यंत आपल्या सूर्यमालेतील ग्रहच आपण पाहू
शकत होतो. त्याहून शक्तीशाली दुर्बिणीच नव्हत्या. आता मात्र बऱ्याच ताऱ्यांभोवती
ग्रह पिंगा घालत आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. आपल्या सूर्याशिवाय इतर सूर्यांभोवती
फिरणारे ग्रह जवळजवळ रोज शोधले जात आहेत.
तुम्हाला वाटेल ग्रह
शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दुर्बीण रोखून बघणं. पण अशानी दूरदूरचे ग्रह दिसणं
शक्यच नाही. ग्रह स्वयंप्रकाशी नसतात. ताऱ्याच्या उजेडात ते आपल्याला दिसतात.
(अंधाऱ्या माळ्यावर एखादा बॉल हा टॉर्च टाकला तरच दिसावा तसं.) दुर्बिणीतून
लांबलांबचे तारे दिसत नाहीत. कारण हा उजेड अगदीच अशक्त असतो. यावर उत्तम तोडगा
म्हणजे (आठव्या प्रकरणातला) स्पेक्ट्रोस्कोप वापरणे आणि अप्रत्यक्ष पुरावा गोळा करणे. कसा?
असा...
दोन समान आकाराचे आकाशस्थ
गोल हे एकमेकांभोवती फिरताना, एक स्थिर आणि दुसरा घिरट्या घालतोय असे नं फिरता,
फुगडी घातल्यासारखे फिरतात. दोघंही एकाच वेळी एकमेकांभोवती फिरत असतात. एकमेकांवर
समान गुरुत्वशक्तीचा प्रभाव पडल्यामुळे असं होतं. चमचमणारे बरेच तारे, म्हणजे अशा
फुगडी घालणाऱ्या जोड्या असतात. अदृष्य गुरुत्वशक्तींनी एकमेकांना जोडलेल्या
जोड्या. पण जेंव्हा एक खूप मोठा आणि दुसरा खूप छोटा असतो तेंव्हा, सूर्य आणि
पृथ्वीसारखी परिस्थिती असते. मोठा स्थिर, तर छोटा घालतोय घिरट्या. छोट्याच्या
गुरुत्वशक्तीमुळे मोठ्याचीही किंचित हालचाल होत असते, पण अगदी किंचित. पृथ्वीच्या
प्रेमगीताला भास्कराकडून किंचित प्रतिसाद मिळतो म्हणायचा. अगदीच काही हे प्रेम
एकतर्फी नाही. अगदीच काही वंचनाच वाट्याला येते असं नाही.
गुरुसारखा एखादा मोठ्ठा
ग्रह असेल तर हा प्रतिसाद मोजता येण्याइतपत लक्षणीय असतो. सूर्य त्या ग्रहाभोवती
फिरतोय असं अगदी नसलं तरी ग्रहाच्या उपस्थितीमुळे सूर्य थोडाथोडा हलतोय हे मात्र
लक्षात येऊ शकतं. बरेचदा ग्रह दिसत नाही, पण त्याच्या उपस्थितीचा हा परिणाम मात्र
दिसतो. यावरून तिथे ग्रह असल्याचं अनुमान ठामपणे मांडता येतं.
ताऱ्यांची ही हालचाल कशी
ओळखता येते हेही खूप रंजक आहे. इतक्या दूरवरून दुर्बिणीतून प्रत्यक्ष हालचाल दिसणं शक्यच नाही. पण हालचाल
दिसत नसली तरी हालचालीचा वेग मोजता येतो आपल्याला! विचित्र वाटेल हे, पण खरं आहे
हे. हा सारा स्पेक्ट्रोस्कोपचा प्रताप. आठव्या प्रकरणात वर्णिलेला डॉपलर परिणाम
आठवतोय? तारा लांब जात असेल तर लाल-चाल दिसते आणि जवळ येत असेल तर जांभूळ-चाल.
एखाद्या ताऱ्याभोवती मोठ्ठा ग्रह असेल तर तो तारा डोलायला लागतो. अर्धावेळ लांब
जातो, अर्धावेळ जवळ येतो. त्याचापासून येणारा उजेड मधूनच लाल-चालीत चालतो तर मधूनच
जांभूळ-चालीत. लाल-जांभळी, लाल-जांभळी अशी प्रकाशाची स्पंदनं मोजता येतात स्पेक्ट्रोस्कोपवर.
स्पंदनांच्या कालावधी वरून त्या त्या तारा-ग्रह जोडीचं ‘वर्ष’ (ग्रहाला ताऱ्याभोवती
एक चक्कर काटायला लागणारा वेळ) किती कालावधीचं आहे ते समजतं. एकापेक्षा अधिक ग्रह
असतील तर हे फारच गुंतागुंतीचं होईल. पण खगोलशास्त्रवाले गणितात भलतेच तरबेज
असतात. असली गणित ते चुटकीसरशी सोडवतात. आजपावेतो (२०१२) ह्या पद्धतीनी ५५९ ताऱ्यांभोवतीच्या
७०१ ग्रहांचा शोध लागलेला आहे. तुम्ही हे वाचाल तंवर हा आकडा आणखी फुगला असेल.
ग्रह शोधण्याच्या अन्यही
पद्धती आहेत. एखादा ग्रह ताऱ्याच्या समोरून भ्रमण करत असेल, तर त्याचा ठिपका
आपल्याला त्या ताऱ्यासमोरून सरकताना दिसतो. याला पिधान युती असे म्हणतात. सूर्यग्रहण
म्हणजे ही हेच होतं. पण चंद्र आपल्या खूप जवळ असल्यामुळे संपूर्ण सूर्यबिंबच झाकलं
जातं.
शिवाय ग्रह समोर आला की
ताराबिंब किंचित प्रमाणात झाकोळतं, त्याचं तेज कमी होतं. हेही मोजणारी यंत्र आता
आहेत. आजवर २३० ग्रहांचा शोध अशा पद्धतीनी लागला आहे. आणखीही काही पद्धती आहेत.
त्यांच्या मदतीनी आणखी ६२ ग्रहांचा शोध लागलाय. काही ग्रह अनेक पद्धतींनी लक्षात
आले आहेत. आपल्या आकाशगंगेतल्या अन्य सूर्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांची एकूण गोळाबेरीज
होते ७६३.
आपल्या आकाशगंगेतील बहुतेक ताऱ्यांना ग्रह आहेत. इतरही आकाशगंगा साधारण अशाच
आहेत असं मानलं, तर त्यांच्यातही बहुतेक ताऱ्यांना ग्रह असतीलच. आपल्या आकाशगंगेत
तारे आहेत शंभर कोटी, आणि या विश्वात आकाशगंगाही आहेत शंभर कोटी. म्हणजे एकूण तारे
झाले १०१६ (एकावर सोळा शून्य, १०००० बिलीअन बिलीअन). यातील सुमारे १०%
तारे हे सूर्यासम असतील असा कयास आहे. सूर्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारचे तारेही
आहेत पण त्यांच्या ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाही. उदाहरणार्थ खूप मोठे
तारे अति-अल्पायुषी असतात. त्यावर जीवसृष्टी उत्क्रांत होण्याइतकं त्यांचंच आयुष्य
नसतं. पण हे सगळे वगळूनही उरतात कोट्यानुकोटी तारे. हाही निव्वळ अंदाज,
प्रत्यक्षात जास्तच असतील.
ठीक तर मग. या ताऱ्यांचे, जीवसृष्टी असू शकतील असे ग्रह किती? बरेचसे ग्रह
म्हणजे गुरु एवढे किंवा मोठे, वायूचे महाप्रचंड गोळे आहेत. सहाजिकच आहे, गुरुपेक्षा
लहान ग्रह आपल्या ओळखण्याच्या टप्प्यात अजून नाहीतच. वायूगोळ्यावर आपल्यासारखी
सृष्टी तगू शकत नाही. अर्थात जीवसृष्टी म्हणजे आपल्यासारखीच, असा तरी आग्रह आपण का
धरावा? आपल्या गुरुवर आपल्यापेक्षा अगदी भिन्न अशी सृष्टी असू शकेल की. असू शकेल,
पण तशी शक्यता मला तरी वाटत नाही. या ग्रहांपैकी पृथ्वीसम किती, याचा काहीच अंदाज
नाही आपल्याला. मुळात ग्रहांचीच संख्या प्रचंड असल्यामुळे, ह्यातले थोडेसेच जरी पृथ्वीसम
असले, तरीही ही संख्या प्रचंड असेल.
नेमकं
जसं हवं तसं
आपल्या परिचयाची, म्हणजे आपली सजीवसृष्टी
पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याला जीवन म्हणतात ते उगीच नाही. अर्थातच ह्याचा अर्थ
असा नाही की सगळीकडे असंच असेल. पण सध्यातरी परग्रहवासीयांच्या शोधामध्ये पाण्याचा
शोध हा एक महत्वाचा भाग आहे. पर-जीवशास्त्रज्ञांकडून (Exobiologists) पाण्यासाठी दाही
दिशा तपासल्या जात आहेत. जीव शोधण्यापेक्षा जीवन (पाणी) शोधणं सोप आहे. पाणी आहे
म्हणजे सजीव असतीलंच असं नाही पण तशी शक्यता जरा वाढते, एवढंच.
आपल्यासारखी जीवसृष्टी ही
द्रवरूप पाण्याशिवाय शक्य नाही. बर्फही नको आणि वाफही नको. मंगळावर पूर्वी कधीतरी
पाणी होतं असं दिसतं. इतरही अनेक ग्रहांवर (बहुतेकदा) बर्फरूप पाणी, आढळलेले आहे.
गुरुचा एक उपग्रह युरोपा हा बर्फाच्छादित आहे. बर्फाखाली द्रवरूप पाणी आहे अशीही
शंका आहे. मंगळ तर या बाबतीत सगळ्यांचा लाडका. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ परसिवाल
लोवेलनी मंगळवासियांनी खोदलेल्या कालव्यांचा नकाशाही काढला होता. आता आपल्याकडे
मंगळाचे फोटो आहेत, तिथे यानं उतरलेली आहेत आणि हे कालवे ही निव्वळ लोवेल-कल्पना
ठरली आहे. मंगळ बाद झाल्यामुळे विज्ञानकथात सध्या ‘युरोपा’ची (गुरुचा एक उपग्रह)
चलती आहे. पण पुरावा इल्ले! एकूण इथे जवळपास काही सापडेल असं दिसत नाही. आणखी
दूरदूरच्या पाणीदार ग्रहांवर शोधायला हवं. दूरदूर पाणीदार ग्रह आहेतही.
तापमानाचं काय? जीवसृष्टीसाठी
किती तापमान म्हणजे योग्य तापमान? अतिगरमही नको आणि अतिथंडही नको. नेमकं जसं हवं
तसं असायला हवं. ह्याला म्हणतात ‘गोल्डीलॉक्स झोन’. गोल्डीलॉक्सच्या गोष्टीत पपा-अस्वलाचं
सूप खूप गरम असतं तर ममा-अस्वलाचं खूप गार. पण बेबी अस्वलाचं सूप असतं, ‘नेमकं जसं
हवं तसं’. ह्या गोष्टीवरून ‘नेमकं
जसं हवं तसं’ला खगोलविद्येत,
पर-जीवशास्त्रात वाक्प्रचार आहे ‘गोल्डीलॉक्स झोन’. पृथ्वीवर तापमान नेमकं जसं हवं
तसं आहे. आपण सूर्याच्या जरा जवळ असतो तर समुद्राला आधण आलं असतं. जरा लांब असतो
तर सगळा बर्फ झाला असता आणि वनस्पतींच्या वाढीसाठी पुरेसं उनही नसतं मिळालं.
कोट्यानुकोटी ग्रहांपैकी तापमान गोल्डीलॉक्स झोनमधे असलेले अगदीच थोडे असतील, नाही
का?
नुकताच एक गोल्डीलॉक्स ग्रह
सापडलाय. ग्लैस ५८१, ह्या २० प्रकाशवर्ष दूर असलेल्या ताऱ्याचा हा ग्रह. हा एक
रक्तवर्णी बटू आहे (रेड ड्वार्फ), सूर्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे ग्रहही त्याच्या
जरा जवळ आहेत. सहा ग्रह तरी आहेतच. बी, सी,
डी, ई, एफ आणि जी अशी त्यांची नावं. यातला डी हा गोल्डीलॉक्स झोनवाला. त्यावर पाणी
आहे की नाही हे अजून माहित नाही. पण असलंच तर ते द्रवरूप असेल. तिथे जीवसृष्टी आहे
असंही नाही. पण शोधाच्या सुरवातीलाच हा दिसला. अगदी सहज सापडला. यावरून असे गोल्डीलॉक्स
झोनवाले बरेच असतील असा तर्क लढवता येतो.
पाणी आणि तापमान पाहिलं
आपण, मग ग्रहांच्या आकारासाठी असा काही गोल्डीलॉक्स झोन आहे का? फार मोठाही नाही, फार
छोटाही नाही, नेमका जसा हवा तसा? ग्रहाचं वस्तुमान त्याच्या आकारावर अवलंबून असतं आणि
त्यावर अवलंबून असतं त्याचं गुरुत्वाकर्षण. याचा जीवसृष्टीशी थेट संबंध आहे.
कल्पना करा, की नेमका पृथ्वीएवढाच ग्रह, पण सगळा सोन्याचा आहे. अशा सुवर्णधरेचं
वस्तुमान आत्ताच्या तिप्पट असेल. गुरुत्वशक्तीही तिप्पट असेल. प्रत्येक जीवजंतूचं वजनही
तिप्पट असेल. अशा सुवर्णभूवर एक पाउल पुढे टाकणं म्हणजे शक्तीपरीक्षाच. इथे इटुकल्या
उंदराला चांगली मजबूत हाडं आणि बळकट स्नायू लागतील. तुरुतुरु धावण्याऐवजी हे उंदीर
गेंड्याच्या गतीनी डुलत डुलत फिरतील आणि इथले गेंडे तिथे स्वतःच्याच वजनानी चेंगरून
मरतील.
पृथ्वीचे मुख्य घटक आहेत
लोह आणि निकेल. हे सोन्यापेक्षा खूपच हलके आहेत. दगडी कोळसा तर आणखी हलका असतो. या
कोळशाचा जर पृथ्वीएवढा ग्रह असेल तर त्याची गुरुत्वश्क्ती आपल्या एक
पंचमांश असेल. इथे गेंड्याला कोळ्यासारखे पाय पुरतील. हे गेंडे सगळीकडे तुरुतुरु
फिरतील. महाकाय डायनोसॉरपेक्षाही महा-काया असलेले राक्षसी प्राणी उत्क्रांत होऊ
शकतील. चंद्रावर आपल्यापेक्षा एक षष्ठांश गुरुत्वाकर्षण आहे. तिथे चांद्रवीर मोठे
मोठे ढगळ सूट घालून, मजेशीर, विदुषकी चालींनी, उड्या मारत चालताना तुम्ही पाहिलं असेल.
अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असणाऱ्या, इये कोळश्याचिये ग्रहावरी, उत्क्रांत होणारे
प्राणीही काही वेगळ्याच आकारउकाराचे आणि चालीचे असतील. नैसर्गिक निवडीनुसार,
उत्क्रांतीच्या हरेक टप्प्यावर हेच तेवढे टिकलेले असतील.
न्युट्रॉन ताऱ्यावर असतं
तसं अति-गुरुत्वाकर्षण असेल तर सजीवांची बातच सोडा. न्युट्रॉन तारा हा एक विझलेला,
ढासळलेला तारा असतो. चौथ्या प्रकरणात आपण पाहिलं, की कोणतीही वस्तू म्हणजे बरीचशी
मोकळी जागा. दोन शेजारच्या अणुकेंद्रातलं अंतर प्रचंड असतं. पण ढासळलेल्या न्युट्रॉन
ताऱ्यात हे अंतर नसतंच. एखाद्या शहराएवढ्या न्युट्रॉन ताऱ्याचं वजन सूर्याएवढंही
असू शकतं. त्याचं गुरुत्वाकर्षणही राक्षसी असत. तिथे ढकललं तुम्हाला तर
इथल्यापेक्षा शेकडो कोटीपट वजन भरेल तुमचं. आपोआप पार चपटे, लाटले जाल तुम्ही.
हालचाल अशक्य होईल. थोडक्यात सृष्टीसाठी नेमकं गोल्डीलॉक झोनमधलं गुरुत्वाकर्षणही
हवं. त्याशिवाय आपल्याला परिचित अशी जीवसृष्टी तर सोडाच पण आपल्या कल्पनेतली
जीवसृष्टीही शक्य नाही.
रूप पाहता लोचनी
परग्रहावरील प्राणी दिसायला
कसे असतील बरं? विज्ञानकथात हे शिंगवाले, बटाट्या डोळ्यांचे, साधारण माणसासारखेच
असतात. माणसासारखे नसतील तर ते कोळ्यासारखे, ऑक्टोपससारखे, मश्रूमसारखे असे काही
तरी दाखवलेले असतात. बऱ्याच जणांचा असा समज आहे की हे विज्ञानकथावाले, या बाबतीत
तरी, कल्पनेच्या फार भराऱ्या मारू शकलेले नाहीत. माणसाच्याच साच्यात थोडेसे फेरबदल
केले की झाले परग्रहवासी तयार! पण हे कल्पनादारिद्रय
नाही हं. जर हे असतील तर ते साधारण आपल्यासारखेच दिसत असतील असं म्हणायला वाव आहे.
बहुतेक परग्रहवासी मोठाल्या डोळ्यांचे दाखवतात. त्यामुळे डोळ्यांचंच उदाहरण घेउया.
पाय, पंख, कान कोणतंही उदाहरण घेता येईल किंवा या प्राण्यांना चाकं का असू नयेत असंही विचारता
येईल. पण असो. डोळेच घेऊ. मी हे दाखवून देईन की त्या प्राण्यांना डोळे असतील असं
मानणं हे कल्पनादारिद्र्य नाही.
कुठल्याही परग्रहावर का
असेना, सृष्टीला दृष्टी हवीच. प्रकाश (सहसा) सरळ रेषेत जातो. जिथे प्रकाश उपलब्ध
आहे तिथे उजेडात मार्गक्रमणा करणं, भक्ष्य शोधणं, सोप्प आहे. सजीवसृष्टी असणारा कोणताही
ग्रह हा एखाद्या ताऱ्याच्या आश्रयानीच
असणार कारण सजीवांसाठी उर्जा ही ताऱ्याकडूनच मिळू शकते. त्यामुळे जिथे जीव
आहेत तिथे उजेड असणारच आणि जिथे उजेड आहे तिथे डोळे उत्क्रांत होण्याची शक्यता
अधिक. कारण ते जगण्याला आणि तगण्याला निश्चितच लाभदायी आहेत. इये पृथ्वीचीये नगरी,
डोळे उत्क्रांत झालेच आहेत की. निदान डझनभर निरनिराळ्या तऱ्हांनी, निरनिराळ्या
सजीवात, एकमेकांच्या अपरोक्ष, डोळे उत्क्रांत झाले आहेत.
डोळ्यांचे मोजकेच प्रकार
आहेत आणि ते सर्व पृथ्वीवर आहेतच. कॅमेऱ्यासारखा डोळा हा एक प्रकार. एक काळी बंद
डब्बी आणि तिला एका बाजूला एक छीद्र, त्यामागे भिंग, त्यामागे पडदा. यावर समोरच्या
दृश्याची, खाली डोकं वर पाय, अशी प्रतिमा पडते. भिंगाचीही नितांत गरज नसते. निव्वळ
बारीक छिद्र असलं तरी भागतं. पण बारीक छिद्रातून खूपच थोडा प्रकाश आत शिरू शकतो.
प्रतिमा धुरकट दिसते. पण आपल्यापेक्षा प्रखर ऊन असलेल्या ग्रहावर हे चालून जाईल.
अशा ग्रहवासीयांना असे बिनभिंगाचे ‘छिद्र
डोळे’ असू शकतील. मानवी डोळ्यात भिंग असतं. सगळा उजेड भिंगाद्वारे पडद्यावर फोकस
केला जातो. ह्या पडद्यामागे प्रकाश-पारखी पेशी असतात. येणाऱ्या प्रकाशानुसार त्या
मेंदूला संदेश पाठवतात. सर्व पृष्ठवंशीय (Vertebrates) प्राण्यांना असे डोळे
असतात. इतरही प्रकारच्या प्राण्यात असे असतात. ऑक्टोपसला असे डोळे आहेत. पण उत्क्रांतीशास्त्रानुसार
ह्यांचा उद्गम आणि विकास हा ऑक्टोपसच्या पातळीवर स्वतंत्रपणे झाला आहे. शिवाय
माणसांनी डोळ्याच्या वरताण अनेक कॅमेरे तयार केले आहेत ते वेगळेच.
कोळ्यांना वेगळाच डोळा
असतो. ‘फिरता डोळा’. इथे पडदा म्हणजे एक अरुंद पट्टी असते. स्नायुंच्या मदतीनी हा
पडदा वेगानी दृश्यावर फिरता ठेवला जातो. सर्व तुकडे जोडून प्रतिमा तयार होते. त्यातल्या
त्यात महत्वाच्या गोष्टीवर ते जास्त रेंगाळतात, उदाः एखादी माशी. टीव्हीकॅमेरा
असाच चालतो. उभ्या आडव्या रेषात हा इतक्या वेगानी घुमतो की दिसायला एक एकसंघ चित्र
दिसतं आपल्याला. कोळ्यांचे डोळे हे टीव्ही कॅमेऱ्याइतके जलद नसतात. पण तत्व तेच
आहे.
अनेक कीटकांमधे, झींग्यांना
वगैरे ‘संयुक्त (कंम्पाउंड) डोळा’ असतो. इथे मध्यबिंदुपासून सगळ्या दिशेला
जाणाऱ्या, अर्धगोलार्धात रचलेल्या अनेक नळ्या असतात. प्रत्येक नळी म्हणजे वेगळ्याच
दिशेला रोखलेला एक स्वतंत्र डोळा. नळीच्या टोकाशी एक भिंग असतं. या भिंगातून
प्रतिमाबितीमा काही निर्माण होत नाही. सगळीकडचा उजेड मात्र एकत्र होतो आणि मेंदूत
त्याची एकसंघ प्रतिमा घडवली जाते. जरा जेमतेमच असते ती, पण हवेतल्याहवेत चतुराला
भक्ष्याचा लक्ष्यवेध साधता येतो म्हणजे बघा.
भिंगाची दुर्बीण बनवता येते
तशी प्रचंड अंतर्गोल आरशाचीही बनवता येते. शिपल्यांचे (कालवांचे) डोळे असे
उत्क्रांत झाले आहेत. एका अंतर्गोल आरशावरून परावर्तीत होणारा उजेड इथे समोरच्या
पडद्यावर पडतो. अर्थात हा पडदा आरशाच्या समोर असल्यामुळे, दृश्याच्या आड येतो. (आरशाच्या
दूर्बिणीतही असं होतं.) पण त्यामुळे विशेष बिघडत नाही. बराचसा भाग दिसत असतो,
तेवढं पुरतं.
डोळा असा विविध तऱ्हांनी
घडवता येतो आणि हे सगळे प्रकार प्राणी सृष्टीत घडले आहेतच, काही तर अनेक
प्राण्यांच्या अनेक उपशाखांमधे स्वतंत्रपणे निपजले आहेत. त्यामुळे परग्रहसृष्टीतही
असे काही डोळे असतील असं समजणं रास्तच आहे.
मेंदूला, कल्पनाशक्तीला
आणखी थोडा ताण देउया. ह्या आपल्या ग्रहावर सुर्यऊर्जाही आपल्या प्रमाणेच असेल.
लांबच लांब तरंगलांबीवाल्या रेडीओ लहरींपासून ते बारीssक तरंगलांबीवाल्या एक्सरेलहरींपर्यंत.
आपल्याला दिसतो तो यातील एक छोटासा भाग. ह्यालाच आपण प्रकाश म्हणतो. पण आपल्यासारखेच
त्यांनाही फक्त सातच रंग दिसावेत असं काही नाही. त्यांना कदाचित ‘रेडीओ डोळे’ असतील
किंवा ‘एक्सरे नजर’ असेल.
स्पष्ट प्रतिमा ही
डोळ्याच्या ‘रेझोल्युशन’वर अवलंबून असते. रेझोल्युशन म्हणजे शेजारशेजारचे दोन
बिंदू, दोन वेगवेगळे बिंदू म्हणून ओळखता येण्याची क्षमता. (मोबाईलच्या कॅमेऱ्याचं
रेझोल्युशन अमुकअमुक अशी चर्चा नेहमीच चालते.) तरंगलांबी जितकी कमी तितकी प्रतिमा
स्पष्ट. अगदी कमी तरंगलांबीचा प्रकाश वापरणाऱ्या डोळ्यात, प्रतिमा अगदी स्पष्ट
उमटेल. रेझोल्युशन चांगलं असेल. लांब तरंगलांबीचा प्रकाश वापरणारा कॅमेरा, हा कमी
रेझोल्युशनचा असेल. काही मीटर लांब तरंगलांबी असलेल्या रेडीओलहरींच्या मदतीनी
प्रतिमा अगदी धूसर येईल. म्हणुनच कदाचित, असा डोळा अजूनतरी पृथ्वीवर उत्क्रांत
झालेला नाही. पण रेडीओ लहरी ह्या सहजासहजी आणि झटपट बदलता येतात. त्यामुळे संदेशवाहक
म्हणून त्या उत्तम आहेत. रेडीओसाठी याच वापरल्या जातात. म्हणून तर त्यांना रेडीओलहरी
म्हणतात. पण प्राणीमात्रात रेडीओसंदेशांची देवाणघेवाण करण्याची क्षमता पृथ्वीवर
उत्क्रांत झालेली नाही. तशी क्षमता हा मानवी शोध. पण कदाचित परग्रहावर असा
एकमेकांशी रेडीओ संवाद करणारे जीव असतीलही.
अगदी कमी तरंगलांबी असते
एक्सरेची. पण हे फोकस करणं अवघड असतं. त्यामुळे एक्सरे-फोटो हे जरा धूसर दिसतात.
पण एक्सरे नजर असेली प्रजा असू शकेल.
नजर ही प्रकाशावर अवलंबून
आहे आणि हा प्रकाश सरळ रेषेत जात असेल तर अतिउत्तम. धुक्यात हे किरण इकडेतिकडे
उधळले जातात आणि वाट हरवते. सतत धुक्यात लपेटलेल्या ग्रहावर प्राणीसृष्टीला आपल्या
सारख्या डोळ्यांचा उपयोग नाही. इथे कदाचित आवाजाच्या लहरींनी ‘बघणारी’ यंत्रणा
उत्क्रांत होईल. आपल्याकडेही वटवाघळे, डॉल्फिन्स असे प्राणी आवाजानी आणि
प्रतिध्वनीनी जगाकडे ‘पहातात’. गंगेच्या पाण्यात इतका गाळ असतो की आरपार काही दिसत
नाही. त्या पाण्यात सदैव धुकं पडलेलं असतं म्हणाना. इथले डॉल्फिन हे आवाजाचे डोळे
वापरतात. वटवाघळे आणि डॉल्फिन्सशिवाय अंधाऱ्या गुहेत रहाणारे दोन प्रकारचे पक्षी
आणि देवमासेही हा प्रकार वापरतात. कायम धुक्यात असलेल्या ग्रहावर हे असलेच डोळे असतील
असं दिसतं.
रेडीओ लहरींनी संवाद जर
शक्य असेल तर रेडीओ लहरींचाच रडारसारखा उपयोग करून इकडे तिकडे प्रवासही शक्य आहे.
धुक्यातल्या ग्रहावर असे रेडीओ डोळेही शक्य आहेत. इकडे तिकडे जाण्यासाठी आपण डोळे
वापरतो पण काही मासे दुसरीच एक युक्ती वापरतात. ते स्वतःभोवती एक विद्युतवलय
(Field) निर्माण करतात आणि त्यातल्या बदलानुसार आसपासचा धांडोळा घेतात. अफ्रिकेतल्या
आणि दक्षिण अमेरीकेतल्या काही मत्स्य जमाती हे करण्यात पटाईत आहेत. ह्या दोन्ही
जमाती एकमेकांशी थेट संबंधित नाहीत. दोन्हीमधे ही युक्ती स्वतंत्रपणे उत्क्रांत
झालेली दिसते. बदकचोच्या प्लॅटीपसच्या चोचीला विद्युतलहरी जाणवतात. भक्ष्याच्या हालचालींमुळे
भक्ष्याच्याच स्नायूत निर्माण होणारे विद्युतसंदेश हा चोचीनी ओळखतो आणि भक्ष्याचा
अलगद माग काढतो. मग असे, किंवा ह्यापेक्षाही प्रगत अवयव असलेले परग्रहवासी असतीलही,
कुणी सांगावं.
हे प्रकरण या पुस्तकातल्या
अन्य प्रकरणापेक्षा वेगळं आहे. इथे जे ठाऊक आहे त्यापेक्षा जे ठाऊक नाही त्याचीच
चर्चा अधिक केली आपण. परग्रहावर आपल्याला अजून तरी जीवसृष्टी सापडलेली नाही,
कदाचित सापडणारही नाही. पण तरीही विज्ञानाच्या नजरेतून हा अज्ञाताचा नजाराही कसा
रोमांचकारी, स्फूर्तीदायी बनतो पाहिलंत. परग्रहावरील सृष्टीचा शोध हा काही अंदाजपंचे
चाललेला, फुटकळ प्रयत्न नाही. जीव-भौतिक-रसायन-शास्त्र वापरून आपण संभाव्य तारे,
संभाव्य ग्रह, हेरले आहेत. पुढे सगळं अज्ञात आहे. या ब्रह्मांडातील सर्व गुह्य
आपल्याला कधीच उलगडणार नाही. पण विज्ञान आपल्याला नेमके प्रश्न विचारायला शिकवतं.
संभाव्य उत्तरातील सर्वोत्तम ओळखायला शिकवतं. नुसतीच कल्पनेची भरारी भरकटते. तिला
वैज्ञानिक दृष्टीचे आणि शोधाच्या आनंद ऊर्मीचे पंख लाभले की आपण भरून पावतो. मग
अचाट, अफाट आणि चमत्कारिक भाकडकथांची गरजच काय? प्रतीमेहुनही इथे प्रत्यक्षच उत्कट
आहे की.
उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेख. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून उपलब्धी मस्तच आहे.
ReplyDelete