प्रकरण ११
खरंच वाईट घडतं?
डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रीअॅलीटी’तील
‘व्हाय डू बॅड थिंग्स हॅपन’ या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक, वाई. जि. सातारा.
पिन ४१२८०३
मो.क्र. ९८२२० १०३४९
वाईट का बरं घडतं? भूकंप, वादळ असं काही झालं की लोक म्हणतात,
‘कोण हा अन्याय, बिचाऱ्या गरीबांच्या नशीबाला काय हे, त्यांनी काय कुणाचं घोडं
मारलंय?’
कोणा सज्जनाला यातनामय मरण आलं आणि कोणी दुर्जन मात्र ठणठणीत दिसला की लोक
म्हणतात,
‘सरासर अन्याय आहे हा, जगात न्याय मुळी उरलाच नाही.’
जगात निसर्गतः, आपोआप होणारा न्याय असतो, असं वाटणं स्वाभाविक आहे. चांगल्याला
पुण्याचं फळ मिळायला हवं आणि वाईटाला त्याच्या पापाचं. ऑस्कर वाईल्डच्या
‘इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ या नाटकात, मिस. प्रिझम, आपल्या कादंबरीबद्दल सांगत
असते. ‘शेवट सुखांत आहे ना गं?’ असं विचारल्यावर ती म्हणते, ‘असंच तर असतं
कथा-कादंबऱ्यात? शेवटी सज्जन सगळे सुखात रहातात आणि दुर्जन दुखाःत.’ कथा-कादंबऱ्यात
असत असेल; पण वास्तव वेगळं असतं. सज्जनांच्याही वाट्याला वाईटसाईट येतं. का? मिस. प्रिझमच्या
कादंबरीसारखं सगळं गुलाबी गुलाबी का नसतं? वाईट मुळी घडतंच का?
अनेकांना असं वाटतं की देवानी मोठ्या उमेदीनी हे न्यायी जग निर्माण करायला
घेतलं. पण काहीतरी घोटाळा झाला आणि अन्यायाचा, दुःखाचा शिरकाव झालाच. या
घोटाळ्याबद्दल विविध कल्पना आहेत. पश्चिम अफ्रीकेतल्या, डोगॉन टोळीवाल्यांच्या मते,
विश्वनिर्मितीच्यावेळी ब्रम्हांडाच्या अंड्यातून जुळी बाहेर पडली. दोन्ही एकदम
जन्मली असती तर प्रश्न नव्हता. पैकी एक जरा लवकर बाहेर पडलं आणि सगळंच ओम् फस्
झालं. इथूनच दुःखाला सुरवात झाली.
मृत्यूबद्दलही अशा अनेक लोककथा आहेत. अफ्रिकेतल्या काही टोळ्यांच्या मते अमरत्वाच्या
वराची बातमी देवांनी सरड्यामार्फत पाठवली होती पण हा सरडा इतक्या संथ गतीने निघाला (लहानपणी आफ्रिकेत असताना
मीही एक सरडा पाळला होता, हुकैरा, तो ही भलताच हळूबाई होता) की मृत्यूचा शाप घेऊन येणारी
चपळ पाल (वेगवेगळ्या कथातून हा प्राणी बदलत रहातो) आधीच पृथ्वीतलावर पोचला. आणखी
एका पश्चिम आफ्रिकी लोककथेनुसार, अमरपट्टा आणला एका बेडकानी तर मृत्यूचा फास एका
कुत्र्यानी. अर्थातच कुत्रं आधी पोचलं. हा क्रम खरं तर मला कोड्यात टाकणारा आहे.
मृत्यूनंतर अमरत्वाची बातमी आली तर मृत्यूवर मात नाही का झाली?
आजार, रोगराई हे ही दुर्दैवीच. या भोवती मिथक कथाही भरपूर. आजारांचा थांग
आत्ता आत्ता लागायला लागलाय. दुष्काळ, जंगली पशूंचे, शत्रूचे हल्ले, हे सगळं समोर
दिसायचं. हला करणारा सिंह, मगर हे समोर दिसायचे, उपासमार होणार, शत्रूचा हल्ला हे
होणार हे लक्षात यायचं. पण आजारांचा मारा? देवी, प्लेग, मलेरिया ह्या साऱ्या अदृष्य शक्तीच. अचानक घाला घालणाऱ्या. बचाव
शक्यच नाही अशा. आजार उद्भवतात कसे हे केवढं भयावह गूढ होतं. तळमळत मृत्यू,
दाढेचा असह्य ठणका, देवीचे विद्रूप करणारे व्रण, हे कोणत्या पापचं फळ
म्हणून नशिबी येतं एखाद्याच्या? अनारोग्याची कारणं शोधताना आणि आरोग्याची
गुरुकिल्ली शोधताना अंधश्रद्धा फोफावल्या यात नवल ते काय?
अगदी परवा परवा पर्यंत, कित्येक अफ्रिकी जमातीत, कोणी आजारी पडलं, की कोणी
करणी केली आहे का, याचा शोध तात्काळ सुरु होई. बाळ तापलं, कारण कुणीतरी मांत्रिकाकरवी
करणी केली असणार... किंवा जन्माच्या वेळी बोललेला बोकड अजून कापायचा राहिलाय...
किंवा पायात आलेल्या हिरव्या सुरवंटवर थुंकायचं राहीलं सकाळी, त्यामुळे त्यातल्या
आत्म्याची ही करामत असणार...!
प्राचीन ग्रीसमध्ये आजाऱ्याला रात्रभर आरोग्यदेवतेच्या, अस्क्लेपिअसच्या, पायाशी
ठेवत. त्यांची अशी श्रद्धा होती की देव स्वतःच आजाऱ्याला रोगमुक्त करेल किंवा
त्याच्या स्वप्नात येऊन उपचाराचा दृष्टांत देईल. अनेक रोगी आजही ‘लोर्डु’सारख्या
तीर्थस्थळी जातात आणि तिथल्या पवित्र कुंडात रोगमुक्तीच्या आशेनी अंघोळ करतात. (फ्रान्स
मधील हे रोगमुक्तीसाठीचे प्रसिद्ध तीर्थस्थळ. खरं तर इतक्या लोकांच्या सामुदायिक
स्नानानी संसर्ग होण्याचीच शक्यता जास्त.) गेल्या दीडशे वर्षात दीडशेकोटींनी तरी,
मोठया आशेनी, लोर्डूच्या कुंडात स्नान केलं असेल. बहुतेकांच्या व्याधी किरकोळ
असतात, त्या आपोआप बऱ्याही होतात, स्नान निमित्तमात्रच ठरतं.
ज्या हिप्पोक्रॉटेसच्या नावे आजही डॉक्टरांना नितीमत्तेची शपथ दिली जाते, त्या
वैद्यकीच्या ग्रीक पितामहाला असं वाटायचं, की बरेचसे आजार हे भुकंपामुळे होतात! मध्ययुगीन
माणसांनी आजार आणि ग्रहगतीचाही संबंध जोडला होता. ह्या ज्योतिषनामे तथाकथित
शास्त्राचे आजही विपुल भक्त आहेत.
आरोग्याबद्दल ख्रि.पू. पाचव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत, असा सगळ्यात
दीर्घकाळ टिकलेला गैरसमज, म्हणजे चार ह्युमर्स आणि त्यांची करामत. ब्लॅक बाईल,
येलो बाईल, रक्त आणि कफ हे ते चार ह्युमर होय. (हे थोडसं आपल्याकडच्या वात, पित्त,
कफ सारखंच आहे) या साऱ्यांच्या संतुलनात उत्तम आरोग्य साधलं जातं अशी कल्पना होती.
आजही अनेक भोंदू ‘हीलर्स’ ह्युमर, चक्र, एनर्जी वगैरे विज्ञान विसंगत परीभाषा
वापरतात. तुमच्याभोवती हातवारे करून संतुलन साधल्याचा आव आणतात.
ह्या चार ह्युमरच्या कल्पनेनी कोणी व्याधिमुक्त झालं नाही, तसंच रक्तमोक्षन
सारखे उपचार सोडता, फारसा तोटाही झाला नाही. रक्तमोक्षनात रुग्णाची शीर कापून एका
भांड्यात त्याचं रक्त जमा करत असत. ह्यानी अर्थातच रुग्णाची प्रकृती बिघडायचीच.
(जॉर्ज वॉशिंगटन ह्याचाच बळी.) पण परंपरागत ज्ञानावर इतका ठाम विश्वास होता की ही
पद्धत सश्रध्दपणे, मनोभावे, वारंवार वापरली जायची. काही वेळा तर आजारी पडू नये
म्हणून आधीच रक्तमोक्षण केल्याची उत्साही उदाहरणं आहेत.
माझ्या शाळेत एकदा वर्गात विचारलं, ‘आजार का होतात?’ एका मुलांनी उठून
सांगितलं, ‘पापाचं फळ’! आजही आजाराला किंवा कोणत्याही वाईटाला पापाचा परिणाम
मानणारे बरेच आहेत. पूर्वजांचं पाप, पूर्वजन्मीचं पाप, पूर्वायुष्यातलं पाप अशा
अनेक समजुती. ज्यू धर्मसमजूतीप्रमाणे आदम आणि ईव्हनं केलं ते तर आदिपाप. सर्परूपी
सैतानाला भुलून त्यांनी ते ज्ञानवृक्षाच फळ (सफरचंद) खाल्लं. ह्या आदिपापाचा ताप,
आपण आजही भोगतो आहोत, म्हणे. आजही जगात जे जे वाईट घडतं, ते ते ह्या प्रथम पापाचंच
फळ आहे, म्हणे.
काही सुष्ट आणि दुष्ट शक्तींच्या झुंजीच्या
कथा आहेत. सैतान जगात वाईट वाईट घडवतो किंवा देव आणि दानव यांच्यात सतत
झगडा चालू असतो आणि परिणामी जगात दुःख येतं. जगात सुष्ट शक्तीच असत्या तर अर्थातच
कुणाचं, कधीच, काहीच वाईट झालं नसतं.
खरंच, वाईट घडतंच का?
मुळात जगात जे काही घडतं ते घडतंच का?
हा जरा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. हा जरा
बाजूला ठेवू. पण वाईट का घडतं, याचा उहापोह करता येईल. अपेक्षेबाहेर वाईट घडत
असल्याशिवाय किंवा आपोआपच, निसर्गतःच निव्वळ दुर्जनांना दुःख वाट्याला यावं अशी भाबडी समजूत
असल्याशिवाय, खरंतर आपण वाईटावर लक्ष
केंद्रित करायची गरज नाही. जगात चांगलं घडणार तसं वाईटही घडणार, साधारण सारख्याच
प्रमाणात घडणार. अपेक्षेपेक्षा फारच वाईट (किंवा
चांगलं) घडायला लागलं तर प्रश्न येतो.
‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाःचे’ हे खरं आहे का? तसं असेल तर त्यात लक्ष
घातलंच पाहिजे. ‘जर घोटाळा किंवा काही गोची व्हायचीच असेल तर ती होतेच’, हा
मर्फीचा जगप्रसिध्द नियम तुम्हाला ठाऊक असेल. ‘लोणी लावून टाकलेला ब्रेडचा स्लाईस
नेमका लोण्याच्या बाजूलाच जमिनीवर पडतो’, हाही मर्फीचा आणखी एक नियम. गंमत म्हणून आखलेले
हे नियम काही माणसं अगदी मनाला लावून घेतात. आपल्या बाबतीत सतत वाईटच होणार आहे हे
ती गृहीतच धरतात.
मी डॉक्युमेंटरीज बऱ्याच करतो. शुटींगच्या वेळी लोकेशनवर शांतता हवी असते. नेमकी लांब विमानाची
घरघर ऐकू येते आणि अनपेक्षितरित्या थांबावं लागतं. जाम वैताग येतो.
ऐतिहासिक किंवा पौराणिक दृश्य असेल तर पूर्ण वाट लागते. वैमानिक मंडळी नेमकी
शांतताभंग करायला टपकतात आणि एरवी लेकाचे लांबून लांबून जातात असा बऱ्याच
चित्रकर्मींचा पक्का समज आहे. मर्फीनी तसं सांगूनच ठेवलंय, असाही दाखला ते देतात.
नुकतंच ऑक्सफर्डजवळ एका मोठ्ठ्या कुरणात शूटिंग होतं. इथे सारं कसं शांत शांत
असेल असा भरवसा होता. मुद्दाम अगदी सक्काळी पोचलो आम्ही; तर तिथे दूर एक स्कॉट
बॅगपाईप वाजवायची प्रॅक्टिस करत होता! (बायकोनी घरातून पिटाळल्यामुळे असेल.)
मर्फीचा नियम, दुसरं काय! खरं तर ‘आवाज’ आपल्या आजूबाजूला सतत असतातच. पण आपल्याला
शांतता हवी असते तेव्हाच आपलं लक्ष आवाजाकडे जातं. एरवी कानाआड केले जाणारे आवाज,
आपलं अडलं की आपल्या लेखी गोंगाट होतात; आणि तो कोणीतरी जाणूनबुजून केलाय असं
आपल्याला वाटायला लागतं.
टोस्टचीही तीच गत. टेबलावरून खाली पडताना लोणी लावलेली बाजू वर असते. टेबलाची
सर्वसाधारण उंची लक्षात घेता नेमकी अर्धी कोलांटीउडी शक्य असते आणि टोस्ट नेमका
लोण्याच्या बाजूला खाली पडतो! मर्फीच्या नियमाचा सबल आणि झकास पुरावा ठरतो.
हा ही प्रयोग करून बघण्यासारखा आहे. ‘नाणेफेकीमध्ये आपल्याला जेंव्हा काटा हवा
असेल तेव्हा नेमका छापा पडतो.’ ह्याला तुम्ही निराशावादी दृष्टीकोनही म्हणू शकता.
आशावादी म्हणतील, जबरदस्त इच्छा असेल तर नाणं तुमच्या मर्जीप्रमाणे पडेलच पडेल.
ह्याला ‘फाजील आशावादाचा नियम’ म्हणता येईल किंवा ह्याला डॉ. पंग्लोस्सचा नियम
म्हणता येईल. व्होल्टेअरच एक पात्र आहे, डॉ. पंग्लोस म्हणून. हया चांगल्या जगात
सदैव चांगलं तेच घडत असतं, अशी ह्याची खात्री आहे.
मर्फीचा काय किंवा पंग्लोसचा काय, दोन्ही नियम फिजूल आहेत. नाण्यांना आणि
पावाच्या तुकड्यांना स्वतःची इच्छा नाही, तुमची इच्छा जाणण्याचीही इच्छा नाही
आणि तुम्हाला कौल देण्याचीही नाही. शिवाय एकासाठीचं भलं हे
दुसऱ्यासाठी बुरं असू शकतं. दोघांनीही जिंकण्याची कळवळून प्रार्थना केली असली तरी
अंतिमतः टेनिसच्या सामन्यात कोणीतरी एकच विजेता ठरतो, नाही का?. तेव्हा चांगलं
वाईट का घडतं असं विचारण्यापेक्षा; दोन्हीही मुळात घडतंच का असं विचारून उत्तर
मिळतंय का पाहू या.
भाग्य, शक्यता आणि कार्यकारण.
घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे, असं म्हटलं जातं. खरंच आहे
हे. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतंच. कारण हे आधी त्याचे परिणाम हे नंतर.
दहाव्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे, पृथ्वीच्या कवचाचे थर सरकले की भूकंप होतात आणि
समुद्रातल्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा येतात. त्यामुळे घडणाऱ्या प्रत्येक घटीतामागे
कार्यकारणभाव असतोच असतो. कारणांचा परिणाम म्हणुनच घटना घडते. पण ‘कारण’ ह्याचा
गैरअर्थ लावला जातो. कारण म्हणजे ‘हेतू’, असा अर्थ लावला की घोटाळे सुरु होतात. मग
त्सुनामी ही पापाची शिक्षा वाटू लागते; किनाऱ्यावरचे छीनाल डान्सबार, कॅसीनो,
डिस्को अशा पापाच्या अड्ड्यांचा विनाश करण्याच्या हेतूने कुणीतरी योजलेली लाट वाटू
लागते! हा भोंगळ वैचारिक गोंधळ भलताच सार्वत्रिक आहे.
हा बालपणीच्या संस्कारांचा पगडा आहे. बालमानस तज्ञांमते, ‘काही खडक खडबडीत का
असतात?’ याचं मुलांना भावलेलं उत्तर, ‘प्राण्यांना पाठ खाजवायची सोय म्हणून ते तसे
केलेले असतात!’ अन्य शास्त्रीय पर्याय धुडकावून मुलं हे सुलभ आणि सुटसुटीत कारण
निवडतात. बरीचशी ‘मुलं’ लवकरच मोठी होतात. प्रश्नाचं असं सुलभिकरण मागे पडतं. पण
जीवघेण्या संकटसमयी किंवा अशा संकटातून सहीसलामत सुटका होता क्षणी बरीचशी मोठी
माणसं मात्र, बालबुद्धीनीच विचार करतात. अशावेळी पुन्हाएकदा प्रश्नाचं सुलभ आणि
सुटसुटीत कारण निवडलं जातं.
मग दुर्भाग्याचं काय? भाग्य-दुर्भाग्य आपल्या कपाळी असतं का नसतं? काही माणसं
महत्भाग्याची धनी तर काहींच्या मागे कायम साडेसाती. आता ‘साडेसाती संपली’, आता ‘भाग्योदय
होणारच’, असं मानणारी माणसं असतात. त्या अमकीचं नशीबच फुटकं, सारखं तिच्या मागे
काहीतरी शुक्लकाष्ठ आहेच, असं मानणारी माणसं असतात.
संपली साडेसातीची खेळी, आता भाग्योदयाची पाळी, ही मानसिकता सरासरीचा नियम न
समजल्याचं लक्षण आहे. आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊ. इथे पहिल्यांदा फलंदाजी करायला
मिळणं फायद्याचं असतं. यासाठी नाणेफेक जिंकणं महत्वाचं. आपल्याच टीमच्या कप्तानानी
नाणेफेक जिंकावी अशी दोन्हीकडच्या पाठीराख्यांची कामना. नुकत्याच झालेल्या
श्रीलंकेविरुद्धच्या मालीकेत प्रत्येक वेळी धोनी ओळीनं टॉस जिंकत गेला. याचा चांगला
फायदा भारतीय संघाला झाला. शेवटीही धोनीनं जिंकून पहिली बॅटींग घेणं भारताच्या
हिताचं होतं. लाखो चाहते भारतानी टॉस जिंकावा म्हणून प्रार्थना करत होते. बक्षीस
लावून ‘याहू’नी प्रश्न केला होता, ‘नशिबाची संगत रहाणार का? धोनी पुन्हा एकदा टॉस जिंकणार
का?’ बक्षीसविजेतं उत्तर होतं,
‘...अर्थात संगकाराच टॉस जिंकेल, कारण आजवर धोनी जिंकत आलाय आणि सरासरीच्या
नियमाप्रमाणे आता संगकारा जिंकण्याची शक्यता जास्त आहे!’
ह्यातला अट्टल ‘चर्खमू’पणा लक्षात आला का तुमच्या? नाणी निष्पक्ष असतात, म्हणुनच तर नाणेफेकीची पद्धत
आहे. सरासरीच्या नियमाप्रमाणे निम्म्या वेळाच धोनीनी जिंकायला हवं. ‘पुन्हा धोनीच
जिंकला तर हे अन्याय्य होईल. त्यामुळे आता तो हरण्याची शक्यता वधारली आहे. यामुळे
संगाकारावरचा ‘अन्याय’ दूर होईल.’ किंवा ‘पूर्वी प्रत्येक टॉस धोनीनी जिंकला होता,
त्याकारणे आता संगाकाराची ‘पाळी’ आहे.’ हा युक्तीवाद असमंजसपणाचा आहे. वस्तुस्थिती
अशी आहे की पूर्वी कितीही वेळा धोनी जिंकला असला तरी, आत्ता, (आणि प्रत्येक वेळी) धोनी
जिंकण्याची शक्यता ५०%च आहे. आता संगकाराची ‘पाळी’, ‘न्याय-अन्याय’ वगैरेची बात
आपल्या मनात अस्से, पण नाणेफेकीत नस्से! आपल्या मनात अस्से, पण नाण्यात नस्से!!
नाण्यात नस्से आणि एकुणात, जगातही नस्से!!!
सरासरीच्या या नियमाचं नीट आकलन न झाल्यामुळे अनेक जुगारी धुळीस मिळाले आहेत. हजार
वेळा नाणं फेकलं तर ५०० वेळा छापा आणि ५०० वेळा काटा पडेल हे अंदाजे बरोबरच आहे.
पण ९९९ वेळा लागोपाठ छापा पडला म्हणून हजाराव्या वेळी काटा पडायची शक्यता वाढतबिढत
नाही. ती ५०%च रहाते. ‘आता काट्याची पाळी, नाही तर काट्यावर अन्यायच की’, असं काही
नसतं. अर्थात खरंच कधी ९९९ वेळा छापा पडला
आणि हजाराव्या फेकीला पैसे लावायची वेळ आली तर मी तरी छाप्यावरच लावीन. शहाणे असाल
तर तुम्हीही तेच करा. कारण ९९९ वेळा छापा याचा सरळ अर्थ असा की नाण्यात किंवा ते
फेकण्यात कोणीतरी काहीतरी मखलाशी करतं आहे, कोणीतरी शकुनी मामा आहे!
संगाकारा टॉस हरला आणि त्यामुळे भारताला भरपूर फायदा झाला, असं तुम्ही बेलाशक
म्हणा. यात तुम्ही एवढंच सुचवताय की टॉस जिंकणाऱ्याला नव्या पिचवर धुवाँधार बॅटींग
करायला मिळाली आणि बिच्चाऱ्या संगकाराला नाही. हे ठीक आहे. नाणेफेक जिंकणं हे
धोनीच्या पथ्यावर पडलं, संगाकारा जिंकला असता तर तो फायदा त्याला मिळाला असता, असं
तुम्ही म्हणू शकता. पण ‘एवढ्यावेळा धोनी जिंकला तेव्हा आता संगाकाराची पाळी’, हे
बकवास आहे किंवा ‘धोनी चांगला क्रिकेटपटू आहे, पण त्याला कप्तान करावं कारण तो
नाणेफेक जिंकतो म्हणून’; हे शुद्ध मूर्खपणाचं आहे. कोणी चांगला बॅट्समन असेल, कोणी चांगला बॉलर असेल,
पण कोणी टॉस जिंकण्यात तरबेज कसा असू शकतो?
म्हणूनच गंडे, दोरे, ताईत बांधून, कुणाचं भाग्य फळफळत नाही. भाग्याची अंगठी
फक्त विक्रेत्याचं भलं करते. या साऱ्याचा प्राप्त परिस्थितीवर शून्य परिणाम होतो.
झालाच तर तुमच्या मनःस्थितीवर होतो. बॉलिंग करायच्या आधी मन थोडं एकाग्र होईल, जरा
हुरूप येईल, जरा निश्चिंत वाटेल. हे मानसिक परिणाम होतील. हे मानसशास्त्र आहे
याचा भाग्य-दुर्भाग्य याच्याशी संबंध नाही.
काही लोकं वेंधळी असतात, गोंधळी असतात, काही सतत धडपडतात. तो स्वभावाचा,
निर्णयक्षमतेचा भाग आहे, त्यात नशीब घुसडायचं कारण नाही.
अखंडपणे सावधपण
थोडक्यात ‘सूख पहाता जवापाडे, दुखः पर्वताएवढे’ असं काही नसतं. निसर्गात भलंबुरं जे जे घडतं ते ते साधारण समप्रमाणात
घडत असतं. या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव, ना व्यक्तीमत्व. त्यामुळे तुम्हाला
व्यक्तीशः खूष किंवा नाखूष करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघानी घडत असतात,
त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुखःकारक असतात एवढंच. आपल्याला त्या
चांगल्या/वाईट कशाही वाटोत, आपल्या वाटण्यामुळे घटिताची वारंवारता बदलत नाही. हे पचणं
खूप कठीण आहे. पाप्यांच्या पदरी वेदना आणि पुण्यवानांना सुखाचं वरदान ही कल्पना
गोंजारायला खूप खूप सोयीची आहे. पण दुर्दैवानी या विश्वाला तुमच्या सोयीशी काही सोयरसुतक
नाही.
हे सगळं ठीकच आहे. पण गंमत म्हणजे, उत्क्रांतीचा विचार केला तर मर्फीच्या
नियमासारखं काहीतरी घडत असतं हेही खरं आहे. भूकंप किंवा दुष्काळ हा तुमच्यापुढे
काळ म्हणून आला तरी त्यात त्याचा काही ‘हेतू’ नसतो. भूकंप, दुष्काळ वगैरे घडत
असतं. तुमच्यावर होणाऱ्या परिणामांची त्यांना क्षिती नसते. उत्क्रांतीशास्त्रात
इथे वाट थोडी निसरडी आहे. लांडगा शेळीचा फराळ करतो, मोठा मासा छोट्याला गट्टम करतो
आणि एखादा व्हायरस तुम्हाला मृत्युमुखी लोटू शकतो. स्वतःचं पोट भरण्याच्या
‘हेतू’नी ते विचार करणारंच. लांडगा किंवा मासा विचारपूर्वक भक्ष्याचा घास करतो. पण
व्हायरस तसा विचारपूर्वक हल्ला करू शकत नाही. आपापल्या भक्ष्याचा घास करणं हा
अंगभूत गुणच आहे या भक्षकांचा. पण भूकंप, दुष्काळ, वादळं काही तुमचा घास करायला
टपलेली नसतात. तुमचा घात करायचा घाट घातलेला नसतो त्यांनी. तसं तुम्हाला वाटत असलं,
तरी ती तशी नसतात. ती आपली त्यांच्या नियमानुसार घडत असतात, परिणामांची पर्वा
त्यांना नसते.
नैसर्गिक निवड, जगण्यासाठीचा झगडा, म्हणजे प्रत्येक जीवाला त्याला पाण्यात
पहाणारा, (का त्याच्यात अन्न पहाणारा?) कोणी ना कोणी शत्रू आहेच. या शत्रूंची
शस्त्रास्त्र तर अगदी बुद्धिमत्तेची कमाल वाटावी अशी असतात. बेसावध किड्यांची पारध
करायला कोळ्याचं जाळं मोठया कल्पकतेनी विणलेलं असतं. सिंहकिडे आपलं भक्ष्य
पकडण्यासाठी शंकाकृती खड्डे खणतात आणि बुडाशी लपून बसतात. हे सिंहकिड्यांनी
लावलेले सापळे. त्यात घसरून पडणाऱ्या मुंग्या हे त्याचं खाद्य. कोळ्यांनी किंवा
सिंहकिड्यांनी जे पाश रचले ते विचारपूर्वक, नियोजनपूर्वक, योजनापूर्वक घडवले
म्हणता? मुळीच नाही! नैसर्गिक निवडीमध्ये, ही त्यांची कौशल्य, जगण्याला पूरक ठरली
एवढंच. ह्यामुळे अशी कौशल्य किंवा वागणूक असणारे मेंदू निसर्गतः निवडले गेले. ते
कोणी बनवले नाहीत. कल्पक सापळ्याची कल्पना करणारे मेंदू ही उत्क्रांतीची देन आहे. हरणाच्या
शिकारीसाठी सिंहाचं शरीर कुणी कल्पकतेनं, विचारपूर्वक घडवलंय असं आपल्याला वाटतं.
आपण हरीण असतो तर माग काढत, पाठलाग करून, हल्ला करणारा सिंह हा कुणीतरी आपल्यावर ‘सोडलाय’
असंच वाटलं असतं आपल्याला.
भक्ष्य भक्षकांच्या भक्ष्यस्थानी पडतात, तसेच भक्षकही भक्ष्यांना बळी पडू
शकतात! हरणानी स्वतःचा जीव वाचवणं म्हणजे सिंहाला उपाशी मारणंच आहे. असंच काहीसं
परोपजीवी आणि त्यांच्या यजमानांबद्दलही म्हणता येईल. शिवाय प्रत्येक जीव, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, आपल्याच जातीच्या इतर जीवांशी अशीच
स्पर्धा करत असतो. एक पारडं जड झालं की परिणामी दुसऱ्यात, नैसर्गिक निवडीचं, जास्तीचं दान पडतं. जीवन कलह थोडा सैलावला की शत्रू प्रबळ
होतो. भक्ष्य-भक्षक, परोपजीवी-यजमान, कोणीही स्पर्धक यांच्या शत्रूपक्षात सुधारणा
होते आणि कलह जारी रहातो. मर्फीच्या नियमाप्रमाणे भक्षक तुमचा घास करायला टपलेले
असतात. भूकंप, दुष्काळ हे शत्रू खरेच पण हे निर्हेतुक शत्रू. हे तुमचा घास करायला
टपलेले असतात असं नाही म्हणता येणार.
प्राण्यांच्या वागणुकीवरसुद्धा उत्क्रांतीशास्त्र प्रकाश टाकतं. रानातल्या
हरणाच्या मनातली भयभावना ही उत्क्रांत होत आलेली आहे. ऊंच गवताची खसखस ही वाऱ्यानं
असेल तर अगदी निर्धोक असेल. वारा काही आपल्याला खात नाही. आता हरणं शांतपणे,
निर्धोकपणे चरू शकतात. पण जर बिबट्या असला तर? तर जीवाशीच गाठ की. आजवर हरणाची लीलया
पारध करणारे बिबटेच, जगण्याच्या स्पर्धेत पिढ्यानपिढ्या तगून आहेत. त्यामुळे हरीण सदा सावध असतं. हीच
गोष्ट ‘भित्र्या’ सशाची, इवल्या इवल्या माशांची. पारध्यांनी भरलेल्या या जगात
अखंडपणे सावधपण, हेच धोरण योग्य. घोटाळा होऊ शकत असेल तर तो होणारच, असं गृहीत
धरणं शहाणपणाचं आहे. मर्फीचा नियम जणू काही हेच सांगतो. डार्विनही हेच सुचवतो.
गोची होणारच असेल तर ती होतेच असं गृहीत धरून सावधपणे वागणारे जगतात, तगतात आणि
सावधपणे वागणारी प्रजा प्रसवतात. बेसावधपणे वागणारे लवकरच भक्ष्यस्थानी पडतात,
त्यामुळे प्रजोत्पादनात ह्यांचा नंबर खाली.
आपल्या पूर्वजांचे आयुष्य म्हणजे, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’. मगरी,
सुसरी, सिंह, साप पदोपदी शत्रूच शत्रू. गवतातली खसखस, काटकी मोडल्याचा आवाज, असं
काही झालं की कुशंका घेणं उत्तम. तेव्हा सदैव कुणीतरी आपल्या वाईटावर आहे असं धरून
वागणंच शहाणपणाचं होतं. ‘वाईटावर आहे’ म्हणजे कुणी हेतुतः तुमच्यावर डूख धरलाय असं
मात्र समजू नका. पण उत्क्रांतीच्या भाषेत सांगायचं तर, ‘जगात धोके फार, जीवघेणे
धोकेही फार. नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार त्यांनी माझ्यावर डूख धरल्यासारखं
त्याचं वागणं असणार आहे. माझ्या भल्यासाठी कोणी टपलेलं नाही. वाईटावर मात्र बरेच
आहेत. मर्फीचा नियम खरा असो नसो, पण तो खरा आहे असं धरुन वागणं, हे शहाणपणाचं.
कारण कधी, केंव्हा, कुठुन, कसा घात होईल हे सांगता येत नाही.’
मनुष्यमात्रांची वागणूक देखील उत्क्रांतीच्या नियमांनी घडल्येय. सदैव भक्ष्य
होण्याची, लक्ष्य होण्याची, अंधश्रद्धा म्हणावी अशी भीती, आपल्या मनात खोल दडून
आहे. तेव्हा मर्फीचा नियम खरा आहे असं गृहीत धरून, अखंडपणे सावधपण असंच जगणं
व्यवहार्य आहे. पण हे अति झालं की आपण म्हणतो भीत्या पाठी ब्रम्हराक्षस.
आजार आणि उत्क्रांती: हातात हात, प्रगतीला साथ
आपल्याला निव्वळ भक्षकच खातात असं नाही. परोपजीवी; म्हणजे जंत, जंतू आणि असे
अनेक जीवजंतूही आपला घास करत असतात, ऱ्हास करत असतात. सिंह आपल्याला खातो, पण मारून
खातो. पण हे, हे जीवंतपणीच आपले लचके तोडत रहातात (कधी कधी या हल्ल्यात मरतोही
आपण). म्हणून सिंह हा भक्षक पण हे परोपजीवी. भक्षक हे भक्ष्यापेक्षा मोठे असतात
(मांजर-उंदीर) किंवा साधारण तेवढेच असतात (सिंह-झेब्रा). परोपजीवी मात्र आपल्या
किंवा सिंहाच्या मानानी कितीतरी लहान. पण जीवघेणा हल्ला करतात हे. तोही सावकाश,
हळूहळू. प्राण जाईपर्यंत त्यांनी आपल्याला आतून पूर्ण पोखरलेलं असतं. (उदाः मलेरिया/क्षयरोग(टीबी)).
हपरोपजीवी झुंडीनं हल्ला करतात. सर्दी, खोकला होतो तेव्हा लाखोंच्या संख्येनी
हे जंतू आपल्या शरीरात वास्तव्यास असतात. सगळेच सूक्ष्मजीव जंतु या सदरात मोडतात.
पण सगळेच जंतू सारखे नसतात. विषाणू (व्हायरस) अति अति छोटे असतात, जीवाणू (बॅक्टेरीया)
थोडे मोठे, मलेरीयाचे जंतू म्हणजे एकपेशीय जीव, हे बॅक्टेरीयांपेक्षा बरेच मोठे पण
सूक्ष्मच. गजकर्णासारखे काही आजार तर बुरशी मुळे होतात. (कुत्र्याची छत्री किंवा
भूछत्र म्हणजेही बुरशीच. पण बहुतेक बुरश्या या सूक्ष्म असतात.)
टी.बी., न्युमोनिया, डांग्या खोकला, कॉलरा, घटसर्प, महारोग, केसतोडा, गळू हे
जीवाणुजन्य आजार. गोवर, गालगुंड, देवी, नागीण, कांजिण्या, रेबीज, पोलिओ, जर्मन
गोवर आणि सर्दी-फ्लू हे विषाणूजन्य. तर डिसेन्ट्री, मलेरिया हे प्रोटोझोआ पासून
उद्भवणारे. शिवाय जंत तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे. शाळेपासूनच जीवशास्त्र
माझ्या आवडीचा विषय. त्यामुळे शेतात कुठे मेलेला प्राणी सापडला, की मी उत्साहानी
त्याचं डिसेक्शन करायचो. या साऱ्या प्राण्यांच्या आतड्यात आश्चर्यकारकरित्या शेकडो
कृमी वळवळत असायचे. प्रयोगशाळेत वाढवलेल्या सशात किंवा उंदरात मात्र हे नसायचे.
आपली प्रतिकारशक्ती या परोपजीवींशी सतत झुंजत असते. परोपजीवीविरुद्ध हे
नैसर्गिक संरक्षण. या प्रतिकारशक्तीचं काम इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यावर एक
स्वतंत्र पुस्तक होईल. एखादा जंतू शरीरात शिरला, की पांढऱ्या पेशींची फौज त्यावर
तुटून पडते. सहसा आपण जिंकतो, जंतू हरतात आणि
आपण आजारी पडत नाही. त्या जंतूची ‘ओळख’ लक्षात ठेवली जाते. पुन्हा जर तशाच
प्रकारचा हल्ला झाला तर पांढऱ्या पेशींची सेना आता अधिक जोमानी आणि पूर्ण पूर्वतयारीनीशी
युद्धात उतरते. गोवर, गालगुंड, कांजिण्या वगैरे आजार पुन्हा पुन्हा होत नाहीत ते
यामुळे. गालगुंड वगैरे लहानपणीच होऊन गेलेले बरे असं म्हटलं जायचं. कारण त्या
‘आठवणी’मुळे मोठेपणी गालगुंड होत नाही. हे
महा तापदायक, विशेषतः पुरुषांना कारण थेट वृषणांना विलक्षण वेदनादायी सूज येते. लस
दिली जाते म्हणजे हाच प्रकार कृत्रिमरित्या घडवून आणला जातो. मृत अथवा मृतःप्राय जंतू, किंवा त्यांचं सौम्य विष, शरीरात टोचलं जातं. हीच लस. तुम्हाला
त्रास काही जाणवत नाही पण प्रतिकारशक्ती या सौम्य हल्ल्याचा यशस्वी प्रतिकार करते.
ह्यांची ‘ओळख’ लक्षात ठेवते. परिणामी या जंतुंविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते,
आपल्याला आजार न होताच तयार होते. झालाच पुन्हा हल्ला तर प्रतिकारासाठी आपण सज्ज
रहातो सतत.
आपला (शरीराचा भाग) कोण आणि परका (जंतू) कोण हे ‘ठरवणं’ खूप जिकीरीचं काम
शिकावं लागतं. आपल्या प्रतिकारशक्तीचा आपपरभाव चांगला जागृत असतो. ‘आप’ल्या पेशी
सहीसलामत, पण परक्या पेशी (बॅक्टेरीया वगैरे) तात्काळ नेस्तनाबूत, अशी किमया साधली
जाते. ही तारेवरची कसरतच असते. उदाः गरोदरपणात गर्भवासी बाळ खरंतर ‘परकं’ असतं
(त्याची निम्मी गुणसूत्र बाबांकडून आलेली असतात, रक्तगटही वेगळा असू शकतो), पण ते ‘शाबूत’
ठेवलं जातं; बहुतेकदा! बाळाला ‘आप’ले मानायची शिकवण हा उत्क्रांतीच्या शाळेतला,
सस्तन प्राण्यांच्या वर्गातला एक अवघड धडा. हा धडा आपल्या प्रतिकारशक्तीने चांगलाच
आत्मसात केला आहे; म्हणून तर बरेच गर्भ प्रसूतीपर्यंत टिकतात. तरीही अनेकदा
गर्भपात होतात, ते ह्या आपपरभावाच्या घोटाळ्यामुळे. काही तान्ह्यांचं रक्त, जन्मतः
संपूर्ण बदलावं लागतं, ते ही ह्या आपपरभावाच्या घोटाळ्यामुळे. हा धडा अजूनही नीट
गिरवला पाहिजे तर.
प्रतिपक्षाचा अति-जोरदार मुकाबला ही ही एक बला ठरू शकते. अॅलर्जी होते म्हणजे
असंच काहीतरी होतं. प्रतिकारशक्ती नको त्या गोष्टीचा प्रतिकार करता करता, घोटाळेच
जास्त निर्माण करून ठेवते. उदाहरणार्थ परागकण हे तसे निरुपद्रवी. पण काहींची
प्रतिकारशक्ती यांच्याशी अगदी अतितटीची लढाई लढते. इतक्या अतितटीनी, परागकणांशी
लढता लढता, ताप, नाक गळणे, शिंका, दमा असं चालू होतं. कुणाकुणाला कुत्र्यामांजराची
अॅलर्जी असते. त्यांच्या केसातल्या रेणूंच
यांना वावडं. शेंगदाण्याची अॅलर्जी तर काही वेळा अगदी प्राणावर बेतते.
आपपरभाव नीट सांभाळला नाही तर कधी कधी आपल्याच पेशीविरुद्ध बंड पुकारलं जातं.
यादवी युद्धच हे. ह्यांना ऑटोइम्युन आजार म्हणतात. चाई (केसांच्या मुळांशी वैर)
किंवा सोरीअॅसीस (कातडीशी वैर) सारखे आजार यामुळे होतात.
आपपरभाव सांभाळणं ही दोरीवरची कसरत आहे. कुठल्याही बाजूला तोल गेला तरी नुकसान
हे ठरलेलं आहे. ‘गवतातली खसखस म्हणजे वारा आहे का बिबट्या?’; या हरणापुढील
प्रश्नासारखाच प्रतिकारशक्तीपुढे सवाल
आहे. आलेला पाहुणा हा निरागस परागकण आहे का लुच्च्या परोपजीवी? अतिसतर्क
प्रतिकारशक्तीमुळे या अॅलर्जी किंवा ऑटोईम्यून आजारवाल्यांना नेहमीच्या जंतुंपासून
जरा सुटका मिळते की काय अशी मला शंका आहे.
असे संतुलन सवाल नेहमीचेच. प्रत्येक खसखस म्हणजे चित्ताच असं समजून सावधचित्त
रहाणं, निष्पाप शेंगदाण्याविरुद्ध किंवा स्वतःच्याच पेशींविरुद्ध प्रतिकारशक्ती
खर्ची घालवणं ही अतिसावधगिरी झाली. त्याचवेळी खऱ्या संकटाकडे दुर्लक्ष करणं,
उपद्रवी जंतूंविरुद्धही तलवार म्यान करणं हा झाला फाजील निष्काळजीपणा. हे संतुलन
राखणं खरंच अवघड आहे. तोल ढळला की शिक्षा ठरलेली.
कॅन्सर हे वाईटाचं, वाईटात वाईट उदाहरण आहे. विचित्र पण महत्वाचं. कॅन्सरमध्ये
आपल्याच काही पेशी बेबंदपणे वाढू लागतात. चक्क परोपजीवींसारखं त्यांचं वागणं असतं.
ह्या पेशींची मग गाठ बनते, मोठी मोठी होते, शरीरभर पसरते. अखेरीस मृत्यूशीच ही
अनिर्बंध वाढ थांबते.
कॅन्सरवर उपचार अवघड आहेत, कारण इथे लढाई स्वतःशीच आहे. आपल्याच पेशी आणि आपलंच शरीर. सांगणार
कुणाला? प्रतिकारशक्तीला या ‘परक्या’ म्हणून वेगळ्या ओळखताच येत नाहीत. या आपल्याच
पेशी असल्यामुळे जे औषध/विष या पेशींना मारून टाकणार, ते आपल्या पेशीही मारून
टाकणार! जंतू मारणं सोप्प आहे. जंतू आपल्यापेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळे असतात.
निव्वळ जंतूंना विषारी पण आपल्याला बिनविषारी अशी औषधं (Antibiotics) सहज बनवता
येतात. कॅन्सर म्हणजे यादवी युद्ध. इथे, आपल्या चांगल्या पेशी तेवढ्या वाचतील, पण
बेबंद वाढणाऱ्या आपल्याच वाईट पेशी मरतील, अशी औषधं बनवणं महाकर्मकठीण. डोस जास्त
दिला तर कॅन्सर संपेल पण पेशंटही अत्यवस्थ होईल, दगावेल.
पुन्हा एकदा तोच सवाल आहे. आपल्यातले शत्रू (कॅन्सर पेशी) आणि आपल्यातले मित्र
(नॉर्मल पेशी) वेगळे जाणायचे कसे? पुन्हा
एकदा वारा का बिबट्या?, हाच सवाल आहे.
थोड्याश्या मुक्तचिंतनाशी मी हे प्रकरण संपवतोय. कॅन्सर सदृश पेशी आपल्या
शरीरात सातत्यानं तयार होतच असतात. आपल्या प्रतिकारशक्तीद्वारे त्या वेळोवेळी
नष्टही केल्या जातात. बहुतेकदा हे जमून जातं. आपण कॅन्सरमुक्त रहातो. याचं श्रेय
प्रतिकारशक्तीला आहे. ही लढाई पिढयांपिढया चालूच आहे. कधीकधी हे जमत नाही.
आपल्याला कर्करोग होतो. कधीकधी हे अति होतं. अतिउत्साही प्रतिकारशक्तीमुळे ऑटोइम्यून
आजार होतात. म्हणजे ऑटोइम्यून आजार हा कॅन्सरविरुद्ध उत्क्रांत प्रतिकारशक्तीचा एक
(वाईट) परीणामच आहे म्हणाना. प्रतिकारशक्तीच्या ह्या शस्त्राला एकाच बाजूला धार
हवी होती, पण ते उत्क्रांत होता होता बनलंय दुधारी! काम अजून चालू आहे, ते अजून
परिपूर्ण नाही.
काय वाटतं तुम्हाला?
या आणि अशा अन्य लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा.
shantanuabhyankar.blogspot.in
No comments:
Post a Comment