निरीश्वरवादाचा अधुनिक
उद्गाता रिचर्ड डॉकिंन्स
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
(सातारा) पिन ४१२ ८०३
मो. क्र. ९८२२० १०३४९
रिचर्ड डॉकिंन्स म्हणजे
निरीश्वरवादाचा अधुनिक उद्गाता. आपल्या लिखाणातून, व्याख्यानातून, ब्लॉग, ट्वीटर,
वेबसाईट अशा सर्व माध्यमातून धर्मावर मर्मभेदी हल्ला हे त्याचं वैशिष्ठ्य. अत्यंत
आक्रमकपणे, अत्यंत नेमका ह्ल्ला ह्यासाठी डॉकिंन्स प्रसिद्ध.
ब्रिटीशांची वसाहत असलेल्या
केनियातील त्याचा जन्म (२६/३/१९४१). आपल्या ‘अॅन अॅपेटाईट फॉर वंडर’ (नवलाईची आस)
या आत्मचरित्रात त्यानी इथल्या वास्तव्याचं मोठं रम्य चित्र रेखाटलं आहे. इतर चार ब्रिटीश
मुलांसारखंच याचं बालपण गेलं पण आई वडलांकडून त्याला निसर्गविज्ञानाच्या आवडीचा
वारसा मिळाला. जीवसृष्टीतील प्रचंड गुंतागुंतीची रचना पहाता, कोण्या कसबी,
बुद्धीमान कर्त्याचं हे कृत्य आहे याची त्याला खात्री होती, निदान सुरवातीला. पुढे
बर्ट्रांड रसेल यांच्या ‘व्हाय आय अॅम नॉट अ ख्रिश्चन?’ (मी ख्रिश्चन का नाही?)
आणि इतर तत्सम लेखन वाचून काही शंका त्याला भेडसावू लागल्या. ऑक्सफर्डच्या बॅलीओल
कॉलेज मधे जीवशास्त्र शिकता शिकता तर तो आरपार बदलला. डार्विननी सुचवलेली
उत्क्रांतीची क्रांतीकारी कल्पना त्याला इतकी भावली की उत्क्रांतीशास्त्र हे
त्याचं भागधेय बनलं. कोणत्याही कसबी कर्त्याशिवाय जीवसृष्टी आपोआप, निसर्गतः तयार
होऊ शकते हे डार्विननी सिद्ध केलं होतं. हे अभ्यासून तो थक्क झाला. यातूनच त्याचे
निरीश्वरवादी विचार पक्के झाले.
लेखक डॉकिंन्स
त्याचं पहिलंच पुस्तक, ‘द
सेल्फिश जीन’, म्हणजे शुद्ध मराठीत
‘आप्पलपोटी जनुके’ (१९७६), हे प्रचंड गाजलं. सजीव मर्त्य आहेत. अमर रहातात ती
त्यांची जनुकं. पिढ्यानपिढया संक्रमित होतात. तुमच्या आजोबांच्या, आजोबांच्या,
आजोबांच्या,... आजोबांची गुणसूत्र तुमच्यात आहेत. एका दृष्टीनी विचार करता सर्व
सजीव, आपण सुद्धा निव्वळ गुणसूत्रे (जीन्स) संक्रमित करणारी यंत्रे आहोत. जनुकांना
‘अप्पलपोटी’ म्हणून जनुकांनी काही विचार केलाय किंवा त्यांना तशी शक्ती आहे असं
डॉकिंन्स सुचवत नाही. असं काहीही नाही हे तो निसंदिग्धपणे स्पष्ट करतो. मात्र
नैसर्गिक निवडीचे दृश्य परिमाण मात्र जनुके ‘आप्पलपोटी आहेत असं वाटावं’ असे आहेत,
एवढंच त्याचं म्हणणं. इथे अप्पलपोटे हे विशेषण लक्ष्यार्थाने घ्यायचे आहे,
शब्दार्थाने नाही.
प्राण्यांची वागणूक ही खूप गुंतागुंतीची चीज
आहे. (प्र)जातीसाठी (Species)माती खाणारे ही जीव आहेत आणि पोटच्या गोळ्याचा
नियमितपणे घास करणारेही आहेत. आपल्याच भाईबंधांप्रती प्रेम, जिव्हाळा, त्यांचं
लालन, पालन, पोषण म्हणजे स्वतःला वैरी निर्माण करणे नाही का? जगण्याची जर
‘स्पर्धा’ असेल तर प्रत्येक स्पर्धकाचं अहित हेच आपलं हित नाही का? यावर बराच
उहापोह झाला आहे. या अशा वागणुकीमुळे तो समूहच्या समूह/कुटुंब/ प्रजाती तगायला मदत
होते, सबब स्पर्धेसारखाच सहकार हाही उत्क्रन्तीला उपकारच असतो. इतकंच काय कुणाला
किती सहाय्य करायचं याचंही गणित मनातल्यामनात मांडलेलं असत. आधी सगे मग सोयरे मग
जातभाई मग अन्य काही, अशा क्रमानी उपकार केले जातात. पुढे कधीतरी परत फेडीच्या
अपेक्षेनेही उपकार केले जातात. डॉकिंन्सनी ‘सेल्फिश जीन’ आणि अन्य पुस्तकांमधून या
कल्पना सामान्यजनांच्या कल्पनाविश्वात पेरल्या. खुद्द डार्विननंतर कदाचित
पहिल्यांदाच चव्हाट्यावरच्या चर्चाविश्वात पुन्हा एकदा उत्क्रांतीची चर्चा झाली.
‘द एक्टेंडेड
फिनोटाईप’मध्ये (१९८२) त्यांनी आणखी एक
वेगळा विचार समजावून सांगितला. कोणत्याही सजीवांची गुणसूत्राची ठेवण (जीनोटाईप)
त्या त्या सजीवाची शारीरिक ठेवण (फिनोटाईप) ठरवत असते. पण गुणसूत्रांचा प्रभाव हा
निव्वळ शारीरिक ठेवणी पुरताच सीमित नसतो. वातावरण, वागणूक, शेजारपाजारचे अन्य प्राणीमात्र यावरही गुणसूत्र प्रभाव पाडू
शकतात, हे त्यानी यात सप्रमाण आणि सामान्यांना कळेल अशा भाषेत मांडलं.
उत्क्रांतीचा बाज समजायला ह्या संकल्पनेची खूपच मदत होते.
‘द ब्लाइन्ड वॉचमेकर’
(१९८६), ‘रिव्हर आउट ऑफ एडेन’ (१९९५), ‘क्लाईम्बिंग माउंट इम्प्रोबेबल’
(१९९६), ‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ (२००९)
ही सारी उत्क्रांतीबद्दल रंजक आणि इथ्यंभूत माहिती देणारी पुस्तकं. उत्क्रांतीकल्पनेचा हिरीरीनं पुरस्कार
करणारी पुस्तकं, प्रचार आणि प्रसार करणारी पुस्तकं. उत्क्रांतीशास्त्रासाठी
प्रचारक आणि प्रसारक असावे लागतात हे वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, पण हे खरं
आहे. युरोप अमेरिकेमध्ये उत्क्रांतीवादाला कडवा विरोध करणारे आणि बायबलमधील
विश्वनिर्मिती हेच अंतिम सत्य मानणारे अनेक धर्मांध लोक आहेत. तिथल्या राजकारणात,
समाजकारणात याचं मोठं प्रस्थ आहे आणि आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य ही मंडळी
वेळोवेळी (त्यांच्यामते शास्त्रीय असे) पुरावे सादर करत असतात. या साऱ्या छद्म्म
विज्ञानाच खरमरीत समाचार या पुस्तकातून घेतला आहे.
अमेरिकेत शाळांमध्ये
उत्क्रांतिवाद शिकवावा की नाही असा एक वाद तिथे कायम खदखदत असतो. एकदा शाळांमध्ये
हे असलं पाखंडी उत्क्रांतीशास्त्रं शिकवलं जाऊ नये असा फतवा तिथल्या शाळा बोर्डाने
काढला. झालं, एकच खळबळ माजली. शास्त्रज्ञ मंडळी आणि चर्चची शास्त्री मंडळी यांची
चांगलीच जुंपली. शेवटी प्रकरण कोर्टात गेलं. प्रसारमाध्यमांना चांगलंच खाद्य
मिळालं. संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे
उत्क्रांत होत आली आहे. या उत्क्रांतीसाठी
अनेक घटक कारणीभूत आहेत. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि
माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे असा उत्क्रांतीवाद्यांचा
दावा. तर अगदी प्रथमावस्थेतील प्राण्यात देखील अत्यंत गुंतागुंतीची जैवरासायनिक
रचना असते. केवळ चार रसायनं अपघतानं एकत्र आली म्हणून ते रेणू ‘जीव’ धरू शकत
नाहीत. तेव्हा सजीवांची उपज ही कोण्या बुद्धिवान निर्मिकानं केलेली करामत आहे असं
विरोधी पक्षाचं म्हणणं. ही मंडळी यासाठी मोठा मासलेवाईक दाखला देतात. समजा चालता
चालता तुम्हाला एक दगड दिसला तर तो तिथे निसर्गतः आहे हे मान्य करता येईल पण एखादं
घड्याळ आढळलं तर ते काही आपोआप घडलेलं नाही हे उघड आहे. घड्याळ्याच्या
निर्मितीमागे कोणीतरी कसबी कारागीर आहे हे निश्चित. तद्वतच सजीवांची गुंतागुंतीची
रचना निव्वळ निसर्ग-अपघातांनी, आपोआप घडून येणे अशक्य आहे. हा तर कुणा कुशल
निर्मिकाचा खेळ, असा एक युक्तीवाद केला जातो. ‘द ब्लाइन्ड वॉचमेकर’या पुस्तकांतून डॉकिंन्स
असं स्वच्छपणे दाखवून देतो की अशा कोण्या घड्याळजीची गरजच नाही. स्वतःच्या नकला
काढू शकणारे रेणू (म्हणजे आपली गुणसूत्रे हो), ह्या नकला काढताना होणारे किंचित
किंचित बदल आणि नैसर्गिक निवडीची न-नैतिक, दिशारहित, शक्ती हीच जैवोत्पतीचे कारण
आहे. हा शक्तीरूपी कर्ता-करविता घड्याळजी असा आंधळा आहे. त्याला काया, वाचा, मन,
काही काही नाही.
आणखीही काही युक्तीवाद
आहेत. समजा एखाद्या जंबोजेटचे सारे भाग सुटे करून एखाद्या आवारात ठेवले आणि
चक्रीवादळासरशी ते एकत्र येऊन जम्बोजेट बनलं असं कुणी सांगितलं तर ते विश्वसनीय
वाटेल का? जम्बोजेट सारखी गुंतागुंतीची रचना केवळ वाऱ्यानं घडू शकेल का? निर्मितीवाद्यांचं
म्हणणं असं, की वादळानं जम्बोजेट बनणं जसं असंभवनीय आहे, तद्वतच उत्क्रांतीनं
सजीवांची निर्मितीही असंभवनीय आहे.
मात्र
उत्क्रांतीवाद्यांच्या मते हा सारा त्यांच्या म्हणण्याचा शुद्ध विपर्यास आहे. आलं
वारं आणि झालं जम्बोजेट तयार, असा मुळी युक्तीवादच नाहीये. पृथ्वीचं काही कोटी
वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, प्रयोगशाळेत
निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार
होणाऱ्या आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रजाती हा सारा उत्क्रांतीच्या
बाजुनेचा सज्जड पुरावा आहे. बरीच भवतीनभवती झाल्यावर कोर्टाने अखेर उत्क्रांतीवाद्यांच्या
बाजूने निकाल दिला. अशा साऱ्या भांडणांची सविस्तर चर्चा या पुस्तकांतून आहे. मोठी
रंजक आहे ही चर्चा. धर्मवाद्यांनी केलेली अचाट आणि अफाट विधानं वाचून खूप बरं वाटतं.
बरं अशासाठी की झापडबंद विचार करण्याचा मक्ता काही निव्वळ भारतीयांकडे नाही, त्यात
थोडे पाश्च्यात्तही आहेत, ही ती सुखद जाणीव.
असंच ‘द गॉड डील्युजन’ (देव
नव्हे, हा तर भ्रम. २००६). यानी तर कहर केला. हेही
प्रचंड गाजलं. आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर ठरलं. आजवर ह्याच्या ३ कोटी प्रती खपल्या
आहेत आणि ३० भाषांत भाषांतरंही झाली आहेत. यानी सुरु केलेलं विचार मंथन अजूनही
चालू आहे.
ह्या विश्वाचं अथांग, असीम, अनंत, अनादी रूप
पाहून मनुष्याने स्तिमित होणे स्वाभाविक आहे. ह्या इतक्या नेमक्या रचनेला कोणीतरी
निर्मिक, कर्ता करविता असणारच, असं वाटणं त्याहून स्वाभाविक आहे. पण मग तत्काळ,
‘ह्या निर्मात्याचा निर्माता कोण?’ असा प्रश्न उभा रहातो. थोडक्यात एका प्रश्नाचं
उत्तर म्हणून एक देवकल्पना स्वीकारली तर त्याहून असंभाव्य अशा प्रश्नाशी आपण येऊन
थांबतो. डॉकिंन्स देव नसल्याचं सिद्ध केल्याचा दावा करत नाही. तो फक्त म्हणतो की
देवासहित विश्व आणि देवविरहीत विश्व
यातील दुसरी कल्पना अधिक संभाव्य आहे.
अधिक स्वीकारार्ह आहे.
धर्माचा आणि नीतीमत्तेचा
अजिबात संबंध नाही हे तो ठासून सांगतो. ‘देव नाही अशी खात्री दिली तर तुम्ही खून,
बलात्कार, चोरी कराल का हो?’, या प्रश्नाला हो असं उत्तर देणारे विरळा. नीती
कल्पना ह्या शतकानुशतके बदलत आलेल्या आहेत. कालचं सोज्वळ धार्मिक वर्तन हे आज
बरेचदा अनीतीचं मानलं जातं. धर्मग्रंथ हे अतिशय भोंगळ भाषा वापरत असतात. त्यामुळे
त्यातला कुठला भाग ग्राह्य समजायचा हे सोयीनुसार आणि त्या त्या काळातल्या
नीतीकल्पनेनुसार ठरत जातं. धर्म भवतापग्रस्तांना आधार देणारा आहे, दुखाःत सांत्वन
आहे, हाही युक्तीवाद तो खोडून काढतो. वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून येणारा
जगाबद्दलचा, जगाच्या व्यवहाराबद्दलचा आत्मीयभाव हा धर्मदृष्टीपेक्षा कितीतरी सरस असल्याचं
तो दाखवून देतो. कला, साहित्य यातल्या कित्येक उत्कृष्ट कृती ह्या धर्मकल्पनेचे
उन्मेष आहेत. पण डॉकिंन्स म्हणतो उतमोत्तम कलाकृती ह्या धर्मकल्पनेशिवायही आहेतच.
तेंव्हा कलाकारांना नवनवोन्मेषी अभिव्यक्तीसाठी धर्माची अजिबातच गरज नाही.
रसिकाग्रणी डॉकिंन्स
लेखक डॉकिंन्स हा मर्मज्ञ
रसिक आहे. यामुळे भाषा विलक्षण शैलीदार आहे. यमक, अनुप्रास, वक्रोक्ती,
अतिशयोक्ती, चपखल शब्द आणि शब्दांच्या पलीकडल असं बरच काही डॉकिंन्स वाचनात गवसतं.
त्याच्या लिखाणात जागोजागी इंग्लिश साहित्यातील अभिजात कृतींचा संदर्भ असतो.
काव्याची त्याला उत्तम जाण आहे. ‘अनवीव्हिंग द रेनबो’ हे त्याच्या एका पुस्तकाचं नावच
मुळी कीट्सच्या एका कवितेतली ओळ आहे.
वाघ आणि हरणामध्ये एकमेकाला
मारण्याची स्पर्धा चालू असते. (वाघापासून सहीसलामत सुटका हा हरणाचा वाघाला उपाशी मारण्याचाच
प्रयत्न, नाही का?) तिखट कान, तल्लख नजर, चपळ धाव, सावध पावित्रा हे सगळं हरणात
निर्माण होतं. तर अधिकाधिक अणकुचीदार दात, शक्तीशाली जबडे, धारदार नखे, बळकट
स्नायू हे सगळं वाघात. ही निसर्गाची, नैसर्गिक निवडीची किमया. वाघाच्या ह्या जरबी
आणि जबरी वर्णनानंतर डॉकिंन्सला आठवते विलियम ब्लेकची
The Tyger ही कविता. ह्याच कवितेतल्या ओळी उधृत करत तो विचारतो, ‘Did he who made
the lamb make thee?’ (ज्या घडविले कोमल करडू, त्यानेच का तुज घडीले असे?) साहित्या बरोबर जागोजागी
धर्मशास्त्राचे (विशेषतः ख्रिश्चन आणि ज्यू) संदर्भही येतात. ज्यावर टीका करायची
त्या विषयाची आधी परिपूर्ण जाण हवी हा नियम डॉकिंन्स पाळताना दिसतो.
विज्ञान म्हणजे सारा रोकडा,
शुष्क, रुक्ष आणि रोखठोक कारभार असा
अनेकांचा गैरसमज आहे. तुम्ही विज्ञानप्रेमी, म्हणजे काव्य, नाट्य याच्याशी घटस्फोट
घेतलेले लोक. ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात...’, यातली गंमत तुम्हाला काय
कळणार? डॉकिंन्स सारख्या ढाल्या आवाजात
विज्ञानाचे पवाडे गाणाऱ्याला तर हा सवाल विचारला जातोच जातो. खरं तर हा सवाल
गैरलागू आहे. अगदी शास्त्रीय उत्तर द्यायचं तर म्हणता येईल की भाषा हे सुद्धा एक
शास्त्र आहे. त्या त्या शब्दाचा अर्थ त्या संदर्भात लावणे महत्वाचे. इतपत
भाषाशास्त्र इतर चार लोकांप्रमाणेच, विज्ञानवादी मंडळींनाही येत असतं.
रसिकतेने एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना विज्ञानाचा
ताप वाटतो का मदतीचा हात जाणवतो? या प्रश्नावर तो म्हणतो, मी दिवसरात्र
विज्ञानानंदात डुंबत असतो. हे जग, ही सृष्टी, तिची निर्मिती, या साऱ्याची नवलाई
आणि ही नवलाई मला जाणवते आहे ह्या जाणीवेची नवलाई मला असीम आनंद देते. अर्थात
माझ्या सामाजिक, भावनिक, मानसिक, आयुष्याला
डार्विनवादाशी काही थेट घेणंदेणं नाही. माणूस म्हणून मला स्वतंत्र बुद्धी
आहे आणि निव्वळ जगण्याच्या नैसर्गिक प्रेरणेशिवाय अन्यही गोष्टी माझ्या
भावविश्वावर, मनोविश्वावर गारुड करून असतात.
याचबरोबर एक पक्का इंग्लिश
खवचटपणा डॉकिंन्सच्या लिखाणात ओतप्रोत भरला आहे. भाषणात, लिखाणात, ट्वीटरवरच्या
ट्वीपण्णीत, असा खोडसाळपणा डॉकिंन्ससाठी नित्याचाच.
‘जगातल्या सगळ्या
मुसलमानांपेक्षा केम्ब्रिजच्या ट्रिनीटी कॉलेजला जास्त नोबेल पारितोषिकं मिळाली
आहेत.’ हे त्याचं एक खळबळजनक ट्वीट.
न्यू स्टेटसमनच्या एमाद
अहमदनी मुलाखती दरम्यान आपण स्वतः पैगंबर हे उडत्या घोड्यावरून स्वर्गाला गेल्याचं
मानत असल्याचं डॉकिंन्सला सांगितलं. डॉकिंन्सनी तडक मुलखतच सोडून दिली. वर ट्वीट केलं,
‘वास्तवाची जराही जाणीव
नसलेल्या पत्रकाराबरोबर मी वेळ वाया का घालवू?’
‘तुम्ही स्वतःला नेपोलियन
किंवा ऑम्लेट समजत असालं तर थेट वेड्याच्या इस्पितळात जाल, पण तुमचा उडत्या
घोड्यावर विश्वास असेल तर तुम्हाला थेट न्यू स्टेटमनमधे पत्रकार म्हणून संधी
मिळेल’
यावर बराच गदारोळ झाला. एका ‘मुसलमान’ पत्रकाराला मुलाखत नाकारणे
हे अचानक चर्चेत आलं. हा इस्लामद्रोह, इस्लामद्वेष किंवा छुपा वर्णद्वेष आहे अशी
हाकाटी पिटली गेली. डॉकिंन्सनी पुन्हा एकदा स्पष्ट पवित्रा घेतला, आणि ट्वीट केलं,
‘उडत्या घोडयांवरच्या
श्रद्धेची चेष्टा म्हणजे इस्लामद्रोह, इस्लामद्वेष किंवा वर्णद्वेषही नाही. ही तर
शांत, सभ्य, हळूवारपणे करून दिलेली वास्तवाची जाणीव आहे.’
इस्लामला डॉकिंन्सनी बरेचदा
लक्ष्य केलं आहे.
तो म्हणतो, ‘इस्लामी
‘पंडित’ लिहिताना नेहमी पंडीत हा शब्द अवतरण चिन्हात टाकावा, यामुळे अन्य
पंडितांचा अवमान टळेल. सहसा एकापेक्षा जास्त पुस्तके वाचूनच पंडित होता येतं.’
‘मुलींनो, ब्रिटनमधील
आयुष्याचा वीट आलाय का? खलिफाच्या राज्यात गुलाम म्हणून जा! मात्र परतीचा विचार
केलात तर शिरच्छेद फुकट आहे.’
‘कुराण न वाचताही
इस्लामबद्दल मतप्रदर्शन करणं ठीकच आहे. नाझीवादावर भाष्य करण्यापूर्वी मैन काम्फ
वाचणं गरजेचं नाही.’
मीमकार डॉकिंन्स
‘मीम’ कल्पना ही देखील
डॉकिंन्सची एक मनाला भुरळ घालणारी कल्पना. मीम हा मायमीम या ग्रीक शब्दाचा
बटुअवतार. मायमीम म्हणजे नकला करणे. हे बटूरूप काही खास कारणासाठी निर्माण केलं
आहे. जीन या शब्दाशी उच्चारसाधर्म्य साधण्यासाठी हा खास बदल. मीम हेही जीनसारखेच
वागतात हा सुप्त संदेश. ‘सेल्फिश जीन’ या गाजलेल्या पुस्तकात याचा उहापोह केला
आहे.
जीन्स आपल्या शरीराची ठेवण
ठरवतात. पिढयानपिढया संक्रमित होतात. या भानगडीत त्यांच्यात बारीक बारीक बदल होत
जातात. जे बदल हितकारक असतात ते टिकतात. यातून नवनवीन सजीव निर्माण होतात. अशीच
क्रिया यच्ययावत कल्पना, विनोद, कथा, अफवा, यांच्या बाबतीतही घडत असते. यच्ययावत
कल्पना, विनोद, कथा, अफवा ह्यांना मीम असा शब्द डॉकिंन्स योजतो. डार्विनची तत्व
यांनाही लागू पडतात. जीन्स हे जसे स्वतःच्या कॉप्या काढून अमर रहातात, तसंच हे
मीम्स. याच कल्पनेचा पुढे बराच विकास झाला आहे. आता तर जेनेटिक्सच्या धर्तीवर
मेमेटिक्स असं एक शास्त्रही उदयाला आलं आहे.
धर्मकल्पनांना आणि
संस्कृतीलाही हे मीम्सचे गुणधर्म लागू होतात. संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत जाते ती
अशा अनेकानेक घटकांच्या कॉप्या पुढच्या पिढी पर्यंत पोचत्या केल्या जातात म्हणून.
कुलधर्म, कुळाचार, कर्मकांड हे पुढच्या पिढीकडून घोटून घेतलं जातं. त्यामुळे या
सर्व कल्पनांना जीन्स प्रमाणेच ‘नकलाकार कल्पना’ म्हणता येईल. हेही मीम्स. जीन्स
प्रमाणेच ह्या नकला अगदी मुळाबरहुकूम असत नाहीत. शिवाय त्यात अन्य कल्पनांचा संकर
सहज होऊ शकतो. यातून नवे नवे मीम्स उत्पन्न होतात. आपल्याकडेही वाढदिवस साजरा करण्याच्या, लग्नातल्या
सोहळ्याच्या कल्पना दशकभरापूर्वीही किती वेगळ्या होत्या हे काय वेगळं सांगायला
पाहिजे? अशा बदलातूनच संस्कृती बदलत असते, उत्क्रांत होत असते. हे सारं जैविक उत्क्रांतीशी
नातं सांगणारं आहे असं डॉकिंन्सच म्हणणं.
निरीश्वरवाद
पण डॉकिंन्सची खरी
प्रसिद्धी आहे ती निरीश्वरवादाचा कट्टर
पुरस्कर्ता म्हणून. अगदी तुम्ही अतिरेकी
निरीश्वरवादी आहात, असा आरोप होऊनही आपल्या विरोधाची धार डॉकिंन्सनी जराही कमी
केलेली नाही. २००२ साली डॉकिंन्सच्या टेड टॉक्स मधील भाषणाचं नावंच मुळी Militant
atheism (अतिरेकी निरीश्वरवाद) असं होतं. (ह्याची लिंक शेवटी दिली आहे.)
‘जगभरातल्या निरीश्वरवाद्यांनो, सुखाची गुळमुळीत भूमिका सोडा, सडेतोडपणे आपली मतं
मांडा, धर्माला वेळोवेळी खुलेआमपणे आव्हान द्या, अटकाव करा, बदनाम करा, राजकारणात
आणि विज्ञानात होणारी धर्माची ढवळाढवळ थांबवा.’ असं आवाहन त्यात केलं होतं.
पुढे निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिंन्स,
ख्रिस्तोफर हिचीन्स, डॅनिअल डेनेट आणि सॅम हॅरीस ही चौकडी ‘द फोर होर्समेन’ म्हणून
नावारूपाला आली. सर्व माध्यमातून यांनी प्रचाराची धूम उडवून दिली. हे ‘चार
घोडेस्वार’, बायबल मधल्या कथेतले आहेत. जगाचा विनाश होण्यापूर्वी युद्ध, भूक,
रोगराई अशा सैतानांनी थैमान घातलं ते हे. अर्थात हे दूषण या चौघांनी भूषण म्हणुनच
मिरवलं.
इतकी हुशार, समंजस, चलाख आणि जाणती माणसं, देवकल्पनेशी तर्क का हरवून
बसतात हा प्रश्न डॉकिंन्सला सतावत असतो. काही शास्त्रज्ञही विश्वाच्या अफाट आणि
विस्मयकारी पसाऱ्याला; ‘विश्वाचा अफाट आणि विस्मयकारी पसारा’ असं म्हणण्या ऐवजी;
‘देव’ हा शब्द वापरतात आणि आणखी घोटाळे आणि गैरसमज करून ठेवतात, असा त्याचा आरोप.
आपली पापं पोटात घेणारा, पाण्याची वाईन बनवण्यासारखे चमत्कार (हा बायबल मधील
प्रसिद्ध चमत्कार) करणारा आणि मृत्युनंतरही जीवन बहाल करणारा तोच हा शास्त्रज्ञ
म्हणतात तो ‘देव’ असा गैरसमज यामुळे पसरत जातो. शास्त्रज्ञपदी पोहोचलेले भले भले
या भोंगळ आणि गलथान शब्दरचनेचे कर्ते आहेत.
स्टीफन जे गोल्डनी असं
ठासून मांडलं की धर्मशास्त्राला त्याची त्याची अशी एक जागा आहे. ती त्याला राखू
द्यावी. विज्ञानानी विज्ञानापुरतं बघावं. विज्ञान जगाचं यथार्थ ज्ञान सादर करू
शकेल पण नीतिशास्त्र हे तर धर्माचं क्षेत्र. डॉकिंन्स हे म्हणणं हिरीरीनं खोडून
काढतो. धर्म हा काही फक्त आपल्या क्षेत्रापुरता मर्यादित रहात नाही, समाजाची नीती,
देवाची भीती, निसर्गाची रीती, अशा प्रत्येक क्षेत्रात धर्माची चलती असते. धर्म
सर्वज्ञपणाचा आव आणून ज्यात त्यात नाक खुपसत असतो. चमत्काराचे, देवाच्या अस्तित्वाचे
दावे हे अन्य कोणत्याही शास्त्रीय दाव्या इतकेच तपासाला, चाचणीला, चिकित्सेला
उपलब्ध असायला हवेत, असं डॉकिंन्सचं म्हणणं. देव आहे हे एक गृहितक (हायपोथेसिस)
आहे आणि पुरेसा पुरावा नसेल तर ते ना-शाबित झालं असंच समजायला हवं.
देवावरच्या विश्वासाचाही
डॉकिंन्स शास्त्रीय पद्धतीनी अभ्यास करतो. या विश्वासाच्याही परी आहेत. इथे
संपूर्ण स्विकार ते संपूर्ण नकार अशा सात पायऱ्या आहेत.
1.
देव आहेच. नुसता विश्वास नाही तशी खात्रीच आहे.
2.
असेल हीच शक्यता जास्त. पण आहेच असं मानून मी चालतो.
3.
फिफ्टी फिफ्टी शक्यता. पण असेलकडे कल.
4.
बरोब्बर फिफ्टी फिफ्टी. ना घर का न घाट का.
5.
थोडेसे देववादी पण बरेचसे निरीश्वरवादी.
6.
देव नसावाच असं वाटतं, आणि तो नाहीच अशा भावनेनी वागतो.
7.
देव नाहीच ही खात्री.
डॉकिंन्स म्हणतो बरीचशी
लोकं ‘१ नंबर’ निवडतात ते नाईलाजानी. कारण देवाबद्दलची थोडीही शंका ही धर्मानी कुशंका
ठरवली आहे. तुम्हाला थेट धर्मबहिष्कृत केलं जाण्याचीच शक्यता जास्त. मतांचं हे
वैविध्य धर्माला मान्य नाही. असलं काही मान्य केलं तर ते धर्माच्या मुळावरच उठेल.
लढाईआधीच संपूर्ण शरणागती ही धर्माची पूर्वअट आहे.
‘ह्या सात पायऱ्यांपैकी
तुम्ही कितव्या पायरीवर आहात?’ असं विचारल्यावर डॉकिंन्स सांगतो,
‘६.९ वर’.
‘कारण?’
‘कारण, असण्याचा पुरावा
नसणं म्हणजे नसण्याचा पुरावा असणं असं होत नाही! (Absence of proof is not proof of
absence).’ इति डॉकिंन्स.
तेंव्हा शंकेला तेवढा
शास्त्रीय वाव त्यानी ठेवला आहे.
डॉकिंन्सचा धर्माला विरोध
हा मुख्यत्वे दोन कारणानी आहे. धर्म हे हिंसेचं मुख्य कारण आहे आणि धर्म हा मानवी
मनाला कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवायला शिकवतो. हे जगातलं
सगळ्यात मोठं वैचारिक न्यून आहे. यातून
फोफावणारी अंधश्रद्धा ही जगातली सर्वात निकृष्ट अशी दुष्ट शक्ती आहे, असं तो
सांगतो.
लोकशिक्षक डॉकिंन्स
चार्ल्स सिमोन्यी ह्या
उद्योगपतीच्या देणगीतून ऑक्सफर्डमधे ‘सिमोन्यी वैज्ञानिक जाणीव जागृती अध्यासन’, उभारण्यात
आलं. डॉकिंन्स इथे पद स्वीकारणार या बोलीवरच ही देणगी दिलेली होती. या विभागात
प्रोफेसरकी पत्करून डॉकिंन्सनी वैज्ञानिक जाणीव जागृतीचं व्रत अंगिकारलं. योग्य
शिक्षण आणि प्रगल्भ विचारांना प्रोत्साहन हे डॉकिंन्सच्या मते धर्मामताला आणि अगदी
बालवयातच केल्या जाणाऱ्या धार्मिक ब्रेनवॉशिंगला नेस्तनाबूत करण्याचे दोन नामी
उपाय आहेत.
अनेक चमकदार कल्पना लढवून
डॉकिंन्सनी आपला लढा सतत चर्चेत ठेवला. ‘येशूला शरण जा!! तोच तुमचा त्राता!!!’ अशा
जाहिराती सार्वजनिक ठिकाणी सर्रास दिसतात. यातून निरीश्वरवादाची जाहिरात करायची
टूम निघाली. डॉकिंन्स यात तन मन धनानी सामील झाला. लंडनच्या बसेसवर मोठाल्या जाहिराती
झळकल्या ‘बहुतेक देव नाहीये; चिंता सोडा आणि मनमुराद जगा!’ नुसता गहजब उडाला.
जडवादी, निसर्गवादी
विचारांच्या लोकांचा ‘द ब्राईट्स’ हा गट त्यानी नावारूपाला आणला. जगाकडून,
समाजाकडून प्रसंगी कुटुंबाकडूनही हेटाळणी आणि कुत्सितपणा वाट्याला आलेल्या विचारी
लोकांनी ताठ मानेनं जगावं हा याचा उद्देश. समाजव्यवहारात आम्हालाही स्थान हवं, मानाचं
स्थान हवं असा यांचा आग्रह. स्त्रीवादीगटांच्या दबावामुळे भाषा आता बरीच
लिंगभेदनिरपेक्ष झाली आहे. चेअरमनचं आता चेअरपर्सन झालं आहे. निरीश्वरवाद्यांनीही
असाच दबाव निर्माण केला पाहिजे. कोणा लहान मुलाला/मुलीला हिंदू वा मुसलमान वगैरे
नाही म्हणता कामा. त्याच्या आईबापाचा धर्म त्याला का जोडायचा? एखादं मूल
मार्क्सवादी आहे किंवा अहिंसावादी आहे, असं म्हणता का तुम्ही? मुसलमान आईबापाचं
मूल असं फार तर तुम्ही म्हणू शकता. असं केलं, म्हणजे पुढे वारसाहक्कानी चिकटलेला
धर्म नाकारण्याच स्वातंत्र्य त्या मुलाला राहील.
आपणही असे साधे साधे प्रश्न
विचारून हा भेदभाव अधोरेखित करू शकतो. ‘हिंदू, मुस्लीम, सिख, इसाई सबको मेरा सलाम’
म्हणताना निरीश्वरवादी विसरले गेले आहेत त्याचं काय? या देशात ईश्वरवाद्यांची
मेजोरीटी आहे हे खरंच पण म्हणून निरीश्वरवाद्यांना अनुल्लेखानी मारायचं हे काही
खरं नव्हे. कॅलेंडरवरच्या चित्रात भारतमातेभोवती ओम, क्रॉस, चांदतारा अशी धार्मिक
चिन्ह आपापल्या तेजोवलयासकट तेजाळत असतात. निरीश्वरवाद दर्शवणारं असं निःशब्द
चिन्ह एकही नाही हेही तितकंच खरं. असं चिन्ह निर्माण करण्यात आपण निरीश्वरवादी कमी
पडलो.
डॉकिंन्स म्हणतो, निरीश्वरवादी
विचार बाळगणं हे सुदृढ, स्वतंत्र आणि विचारी मनाचं दिव्य लक्षण आहे. त्यात शरम
कसली? देव नाही हे बेधडकपणे सांगायला हवं असं याचं मत. जितक्या उघडपणे
निरीश्वरवादी लोक आपली मतं मांडतील तितकी ती समाजाच्या परिचयाची होतील, जास्त पचनी
पडतील. आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी लोक असे विचार बाळगून असतात. इतके सगळे
लोक अशा मताचे आहेत हे पाहून सारेच चकित होतात. आपली मत जाहीरपणे मान्य करणं मात्र
कित्येकांना गैरसोईचं वाटतं. उघडपणे निरीश्वरवादी भूमिका घेण्याआधी बरीच वैचारिक,
सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, भावनिक लढाई लढावी लागते. आपापल्या बळावर यात काही
थोडेच पार पडतात. बरेचसे मधेच थकतात, गप्प बसतात, गुळमुळीत भूमिका घेतात. अशा
काठावरच्या लोकांना मदतीची, आधाराची गरज असते. आपल्या वेबसाईट, ब्लॉग वगैरेद्वारे
डॉकिंन्स असा आधार देऊ करतो. निरीश्वरवाद्यांच्या या ‘उघड होण्याला’ त्यानी ‘कमिंग
आउट’ असा शब्दप्रयोग वापरला आहे. (हा शब्दप्रयोग सहसा समलिंगी लोकांच्या ‘उघड
होण्याला’ वापरला जातो!)
२००६ साली डॉकिंन्सनी
‘रिचर्ड डॉकिंन्स फौंडेशन फॉर रीझन अँड सायन्स’ ही ना नफा ना तोटा या तत्वावर
कारभार चालवणारी संस्था काढली. धार्मिक समजुतींबद्दल संशोधन, विज्ञानशिक्षण आणि
निधर्मी विचारांना मदत करणारी ही संस्था. नुकतंच या संस्थेचं, ‘सेंटर फॉर
इन्क्वायरी’ या संस्थेत विलीनीकरण झालं आहे. उत्क्रांतीबद्दल गैरसमजूती फार. अशाच
एका उत्साही निर्मिकवाद्याने जगात ‘क्रोकोडक’ कसे नाहीत असा (त्याच्यामते) बिनतोड
सवाल केला. क्रोकोडक म्हणजे मगरीच शीर आणि बदकाचं धड असलेला काल्पनिक प्राणी. ‘जर
सर्व प्राणीमात्रांचे पूर्वज समान आहेत तर असे मधलेअधले प्राणी दिसायला नकोत?’
ज्या अर्थी क्रोकोडक नाहीत त्याअर्थी उत्क्रांती ही थाप आहे, असा आरोप. हा सवाल
बिनतोड वगैरे काही नाहीये. कोणाही जीवशास्त्राच्या शिक्षकाकडून तुम्ही शंकासमाधान
करून घ्या. इथे मुद्दा वेगळाच आहे. ह्या प्रश्नाची आपल्या पद्धतीनी डॉकिंन्सनी
यथेच्छ चिरफाड केली. हा मुद्दा इतका गाजला की डॉकिंन्सला खास क्रोकोडकचं चित्र
असलेला टाय एकानी भेट दिला. हा टाय घालूनच डॉकिंन्स मुलाखती देत सुटला. मुलाखतीही
गाजल्या आणि टायही.
पूरक व पर्यायी उपचार या
नावानी ओळखल्या जाणाऱ्या अनेकानेक पॅथी जगभर नांदत आहेत. याही साऱ्या
तऱ्हेवाईकपणाचा डॉकिंन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे. तो विचारतो, ‘... जर पर्यायी
पचनसंस्था, पर्यायी श्वसनसंस्था किंवा ब्रिटनचा पर्यायी नकाशा असं काही असू नसतं तर
पर्यायी उपचार पद्धती कशी काय असू शकते? उपयोगी आणि उपयोग सिद्ध न झालेले असे दोनच
प्रकारचे औषध संभवते...’
विरोधक
इतक्या क्रांतीकारी कल्पना
मांडणाऱ्या डॉकिंन्सला शत्रू काही कमी नाहीत. ‘धर्माचा सोयीस्कर अर्थ लावून तो कसा
अर्थहीन आहे हे डॉकिंन्सनी दाखवून दिलं आहे. यात काय शौर्य? धर्माच्या गाभ्याला
त्यानी हातच घातलेला नाही’, असं अॅलिस्टर मॅकग्रॅथचं मत. भौतिकशास्त्रज्ञ पीटर
हिग्स हा तर डॉकिंन्सला धार्मिक
मूलतत्ववाद्यांच्या पंगतीलाच बसवतो. त्यांच्या इतकीच ह्याचीही मतं टोकाची आहेत असं
म्हणतो. कुणी त्याला धर्मविरोधी ‘मिशनरी’ म्हटलंय, तर कुणी अतिरेकी विज्ञानवादी.
पण असली टीका डॉकिंन्स मनाला लावून घेत नाही. तो म्हणतो, ‘विश्वाचं यथातथ्य ज्ञान
मिळवण्यात धर्माची कामगिरी यथातथा म्हणावी अशीही नाही आणि ‘अतिरेकी विज्ञानवादी’
हा वदतोव्याघात आहे. कोणताही अतिरेकी आपली घट्ट मतं बदलायला तयार नसतो. पुरेसा
पुरावा असेल तर मी माझी मतं बदलायला केव्हाही तयार आहे.’
विज्ञान आणि
विज्ञानवाद्यांनी आजवर अनेकदा आपली मत बदलली आहेत. इतकी, की सतत बदल, हा तर
विज्ञानाचा एक मोठा दोष म्हणून दाखवला जातो. नव्या ज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या
प्रकाशात आपआपल्या मतांमध्ये आवश्यक सुधारणा होतच रहातात. याउलट अंतिम सत्याची
वल्गना करत साचलेला रहातो तो धर्म. धर्मकल्पनेतले बदल हे काळाबरोबर फरफटत जात जात
होतात. विज्ञान काळाचं बोट धरून चालतं.
विज्ञानाचा इतिहास हा
खाचखळग्यांनी, काट्याकुट्यांनी भरलेला आहे. शालेय पुस्तकं वाचून आपली अशी समजूत
होते की हा जय नावाचा इतिहास आहे. इथे एकामागोमाग शोध लागत गेले आणि एकेका
किल्यावर अलगद विज्ञानाचा झेंडा रोवला गेला. असं काही नसतं. भरपूर युध्द वगैरे
होऊन, शंकाकुशंका दूर करत करत, चुकतमाकत, विज्ञानाची प्रगती होत असते.
उत्क्रांतीच्या क्रांतीकारी सिद्धांतावरही अशी जागतिक महायुद्ध झडली आहेत.
डॉकिंन्सलाही भरपूर शत्रू आहेत. तेही ह्याच्या इतकेच मातबर आहेत. आपापल्या
क्षेत्रातले दादा आहेत. या वाक् युद्धाला ‘डार्विन वॉर्स’ असं नाव आहे. यात एक
पक्ष डॉकिंन्सचा आणि दुसरा अनेकांचा. यात मुख्य स्टीफन जे गोल्ड, हा अमेरिकी
जीवाश्मतज्ञ. पण ह्या लढाया वैचारिकच रहातील अशी खबरदारी उभयपक्षी घेतली जाते.
गोल्डच्या अकाली मृत्युनंतर आलेल्या ‘द डेव्हिल्स चॅप्लीन’ हे आपलं पुस्तक
डॉकिंन्सनी गोल्डला अर्पण केलं आहे.
असा हा डॉकिंन्स. इथे आहे
थोडक्यात परिचय. तोही माझ्या दृष्टीतून. त्याचं लिखाण वगैरे अभ्यासणं हे महत्वाचं
आहे. शिकण्यासारखं खूप आहे त्यात.
चौकटीत टाकण्यायोग्य काही
डॉकिंन्स उवाच
“सगळेजण जगातल्या एकसोडून इतर
देवतांबद्दल पूर्णपणे अश्रद्ध असतात, काही एक पाउल पुढे जातात.”
“जगरहाटीच्या जेमतेम ज्ञानावर धर्म आपल्याला तृप्त व्हायला शिकवतो म्हणून
धर्माला माझा विरोध आहे ”
“आयुष्याला अर्थ
देण्याची जबाबदारी अन्य कुणीतरी उचलायची हे किती बालिश आहे. आयुष्य तुमचं आहे.
त्याला अर्थ देण्याची, समरसून जगण्याची जबाबदारीही तुमचीच आहे.”
‘वादात हरलात तरी हरकत
नाही, ‘विरोधक वयस्कर, गोरे आणि प्रतिष्ठित आहेत सबब...’ अशी मखलाशी करा.’
काही महत्वाच्या लिंक्स
http://www.ted.com/talks/richard_dawkins_on_militant_atheism?language=en
पुस्तके/चित्रफिती
·
The
Greatest Show on Earth: The Evidence for Evolution. Free Press (United States), Transworld (United
Kingdom and Commonwealth).
2009. ISBN 0-593-06173-X.
·
The
Magic of Reality: How We Know What's Really True. Free
Press (United States), Bantam
Press (United
Kingdom). 2011. ISBN 978-1-4391-9281-8.OCLC 709673132.
·
An
Appetite for Wonder: The Making of a Scientist. Ecco
Press (United
Kingdom and United States). 2013. ISBN 978-0-06-228715-1.
·
Brief Candle in the
Dark: My Life in Science. Ecco
Press (United
States and United
Kingdom). 2015. ISBN 978-0062288431.
Documentary
films
·
Nice Guys Finish First (1986)
·
The Purpose of Purpose (2009) – Lecture tour among American
universities
No comments:
Post a Comment