Wednesday 12 October 2016

प्रकरण ६ सूर्य आहे तरी कसा?

प्रकरण ६
सूर्य आहे तरी कसा?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील ‘व्हॉट इज द सन?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९



सूर्य आहे तरी कसा? सूर्य आहे झळाळता, नेत्रदीपक. थंड प्रदेशात उब देणारा, हवाहवासा, आणि वाळवंटात अंगांग भाजून काढणारा, आग ओकणारा, आग्यावेताळ नुसता. त्याला सार्वत्रिक  देवत्व बहाल केलं गेलं यात नवल ते काय? सूर्य आणि चंद्र, दोन्हीही देवतास्वरूप. कित्येक संस्कृतींनी सूर्याला पुरुषरुपी मानलं तर चंद्राला स्त्रीरूपात रंगवलं.
नायजेरीयातले टिव्ह लोक समजतात की सूर्य आणि चंद्र ही त्यांचा देवाधिदेव ‘अवोन्डो’ची मुलं. सूर्य पुत्र तर चंद्र म्हणजे कन्यारत्न. जपानच्या शिंटो मतानुसार सूर्य स्त्रीलिंगी असून चंद्र पुल्लिंगी आहे. ‘सूर्यीण’ (अमातेरासू) ही चंद्ररावांची (ओगेत्सुनोची) सख्खी बहीण आहे! तशी पक्की खात्री आहे त्यांना. बरोत्से जमातीच्या मते सूर्य-चंद्र हे भाऊ-बहीण नाहीत, ते तर पती-पत्नी आहेत.
दक्षिण अमेरिकेचे इंका लोक स्वतःला चंद्र-सूर्याचे वंशज समजतात. मेक्सिकोतल्या अॅझ्टेक संस्कृतीत, माया संस्कृतीत, देव हे सूर्यकुलातील आहेत. शिवाय सूर्य हाही एक देव आहेच. अॅझ्टेकांची एक पाचा सूर्यांची कहाणी आहे. या आधी चार विश्व होऊन गेली, त्यात चार सूर्य होऊन गेले. ही चारही विश्व, देवाच्या कोपामुळे, वेळोवेळी नष्ट झाली. पहिला सूर्य होता ‘काळा तेझ्कातलीपोका’. त्याच्या भावाशी, क्वेत्झालकोटलशी, लढाई जुंपली त्याची. क्वेत्झालकोटलनी सोट्याच्या एका फटक्यासरशी काळ्या तेझ्कातलीपोकाला आभाळातून उडवून लावला. छोट्याशा अंधारयुगानंतर क्वेत्झालकोटल स्वतः सूर्य झाला. याचा राग येऊन तेझ्कातलीपोकानी सर्व माणसांची माकडं केली. क्वेत्झालकोटलनी सर्व माकडं फुंकून उडवून लावली आणि सूर्यपदाचा राजीनामा दिला.
त्लालोक नावाचा देव आता सूर्य झाला. पण तेझ्कातलीपोकानी, त्लालोकची बायको, क्झोचीक्वेत्झ्ल, हिलाच पळवली. यावर त्लालोक इतका वैतागला की त्यानी साऱ्या सृष्टीभर वृष्टीच बंद केली. मग पडला दुष्काळ. सारेजण त्लालोकची पावसासाठी याचना करू लागले. यावर तर तो आणखी चिडला. त्यानी वर्षाव केला पण चक्क आगीचा. ह्यात सारं जग जळून खाक झालं आणि पुन्हा नव्यानं सगळी सुरवात करावी लागली.
चालच्युह्त्लीकय्यू ही त्लालोकची नवी पत्नी आता (चौथ्या) सूर्यरुपात तळपू लागली. सुरवातीला दिवस बरे गेले पण मग तेझ्कातलीपोकाचं आणि हीचं पटेनासं झालं. तब्बल बावन्न वर्ष ही अश्रू गाळत होती, रक्ताचे अश्रू. बावन्नच का? एक्कावन किंवा त्रेपन्न का नाही? या प्रश्नाला उत्तर नाही. ते असो, पण ह्या भानगडीत आता जगबुडी व्हायला आली, नाही नाही, झालीच. पुन्हा पहिल्यापासून सुरवात करावी लागली.
मग टोनातिहु सूर्यासनी विराजमान झाला. टोनातिहुच्या जन्माची चित्तरकथा मोठी विचित्र आहे. टोनातिहुच्या वेळी, पिसांच्या पंख्यापासून त्याच्या आईला, कोतलीक्यूला दिवस गेले म्हणे. हे सगळं तुम्हाला वाचायला सुद्धा विचित्र वाटत असेल पण असल्या भाकडकथांच्या खुराकावर लहानाचे मोठे झालेल्या अॅझ्टेकांना यात काही वावगं दिसत नव्हतं. माय  कोतलीक्यूला पुन्हा दिवस गेलेत हे समजताच तिचे आधीचे ४०० पुत्र जाम खवळले. तिचा शिरच्छेद करायचा मनसुबा रचला त्यांनी. पण ही तयारी होई पर्यंत कोतलीक्यू इकडे बाळंत होऊन, तिला जन्मजात शस्त्रसज्ज असा पुत्र देखील झाला. या वीरानी तत्काळ त्या ४०० भावंडांना थेट यमसदनाला (किंवा अॅझ्टेकात जे काय नाव असेल त्या मृत्यूदेवाच्या सदनाला) धाडलं. ह्या बंधू-संहारा नंतर तो सूर्यासनावर बसला. हाच, आज आपल्या नभात चमचमणारा सूर्य, पाचवा सूर्य.
नरबळी दिला नाही तर सूर्य रुसून बसेल, कोपेल, उद्या तो उगवणारच नाही, असं अॅझ्टेकांना वाटत असे. त्यामुळे रोज नरमेध चालूच. एखाद दिवस नरबळी न देता काय होतंय ते बघावं, असं काही त्यांना वाटलं नाही. किंवा तसं वाटूनही करून पहायची त्यांची हिम्मत झाली नाही. स्पॅनिश येऊन, स्वतःच्या काही नव्या क्रूर रीतीभाती आणेपर्यंत, अत्यंत क्रूरपणे छळ छळ करून नरबळी दिले जात असत. १४८७ साली, तेनोशितीलानच्या महामंदीराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी, सुमारे ५०,००० नरबळी देण्यात आल्याची नोंद आहे. सूर्याला खूष करण्यासाठी विविध बळी, भोग, प्रसाद, हवी, नैवेद्य दाखवले जायचे. पण सूर्यदेवाचा लाडका नैवेद्य म्हणजे ताजताजं, अजूनही फडफडणारं, मानवी हृदय. लढाया व्हायच्या त्या मुख्यत्वे युद्धबंदी मिळवण्यासाठी. म्हणजे मग एकेक करून त्यांचा बळी देणं सोप्प. पिरॅमिडच्या टोकाशी, एका उंचच ऊंच वेदीवर, हा हृदयार्पण सोहळा चालायचा. सूर्याच्या तेवढंच जवळ. अॅझ्टेक, माया आणि इंका संस्कृतीत हे पिरॅमिड बांधायचं तंत्र चांगलंच विकसित झालं होतं. बळीचे हातपाय चार पुजारी चार दिशांना  ताणून धरायचे आणि पाचवा बळीची छाती चिरून ताजं धडधडतं हृदय खसकन् उपटून काढायचा. हा नैवेद्य दाखवेपर्यंत ते कलेवर गडगडत खाली सोडलं जायचं. तिथे त्याचे राईराई एवढे तुकडे करून त्यावर ताव मारला जायचा.
पिरॅमिड इजिप्त मधेही होते. तेही सूर्योपासक. ‘रा’ हा त्यांचा सूर्यदेव. आकाशाची गोलाई, म्हणजे ‘नट’ या देवतेनी पृथ्वीला घातलेला विळखा. रोज संध्याकाळी ही सूर्याला गिळंकृत करते आणि पहाटे पुन्हा सूर्य प्रसवते.
नॉर्स, आणि ग्रीकांच्या मते सूर्य रथारूढ आहे. ग्रीक भाषेत सूर्याला हेलीओस म्हणतात. आजच्या सूर्याबद्दलच्या कित्येक शास्त्रीय संज्ञा हेलिओस पासून सुरु होतात, ते या मुळेच.
अन्य अशा आख्यानांमधे आधी प्रकाश निर्माण झाला आणि मग सूर्य. हिब्रू लोकांच्या याव्हा देवानी निर्मितीच्या पहिल्याच दिवशी प्रकाश निर्माण केला पण सूर्य निर्माण केला चार दिवसांनी. ‘देवानी दोन दिवे दिले, प्रखर असा दिवा दिवसासाठी, तर छोटा दिवा रात्रीसाठी, शिवाय चांदण्या दिल्या त्यानी....’. सूर्य नसताना प्रकाश कसा काय आला बुवा हे नं विचारलेलंच बरं. जाउदे, एकुणात आता भाकड कथा बस झाल्या. आता खरोखरंच सूर्य कसा आहे त्याकडे वळूया.

सूर्य आहे तरी कसा?
सूर्य हा तारा आहे. इतर अनेक ताऱ्यांप्रमाणे हा एक. फक्त हा आपल्या खूपच जवळ आहे. त्यामुळे तो आपल्याला इतर सूर्यांच्यामानानी खूप मोठ्ठा आणि तेजस्वी दिसतो. तो जवळ असल्यामुळे त्यांची तीव्र उष्णता आपल्याला भाजून काढते, थेट त्याकडे पाहिलं तर डोळे जातात आपले. इतरांपेक्षा जवळ म्हणजे किती जवळ, ह्याचं आकलन होण अवघड आहे. विश्वाच्या पसाऱ्याचं आकलन, अवघड नाही अशक्य आहे म्हटलं तरी चालेल. जॉन कॅसिडीनी आपल्या ‘अर्थसर्च’ पुस्तकात एक नामी प्रयोग सांगितला आहे.
·                 मोठ्या ग्राउंडवर सूर्य म्हणून एक फुटबॉल ठेवा.
·                 त्यापासून २५ मीटरवर एक मिरीचा दाणा ठेवा, ही पृथ्वी. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर आणि त्यांचा आकार यांचा तुम्हाला आता अंदाज आला असेल.
·                 या हिशोबानी चंद्र मिरीपासून ५ सें.मी.वर फिरत असेल आणि असेल टाचणीच्या डोक्याएवढा.
·                 याच मापात सूर्यानंतरचा सर्वात जवळचा तारा, प्रॉक्सिमा सेन्टॉरी, म्हणजे एक छोटासा फुटबॉल असेल. तो ठेवावा लागेल पहिल्या फुटबॉलपासून तब्बल ६५०० कि.मी.वर. ह्या प्रॉक्सिमा सेन्टॉरी भोवती ग्रहमाला आहे का, ते माहित नाही, पण अन्य बहुतेक ताऱ्यांभोवती आहे. दोन ताऱ्यातल्या प्रचंड अंतराच्या मानानी ह्या ह्यांच्याभोवती फिरणारे ग्रह हे खूप जवळ असतात.

ताऱ्यांचं न्यारं जग
तारे स्वयंप्रकाशी असतात. ग्रह मात्र थंड गोळे. त्यांच्या जवळच्या ताऱ्याच्या उजेडातच ते आपल्याला दिसतात. तारे स्वयंप्रकाशी, धगधगत्या भट्ट्या जणू, ग्रह मात्र थंड गोळे, हा सगळा आकारमानाचा मामला आहे. कसं ते पाहुया.
प्रचंड वस्तूंची गुरुत्वाकर्षण शक्तीही प्रचंड असते. या विश्वात सर्वच वस्तू परस्परांना गुरुत्वाकर्षणाने खेचत असतात. पण आपल्यासारख्या, विश्वाच्यामानानी  नगण्य वस्तुंचं गुरुत्वाकर्षणही नगण्य. पृथ्वी आपल्या मानानी केवढी तरी. त्यामुळे तिची गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला जाणवते. आपण ‘खाली’ पडतो, झाडावरची सफरचंदही ‘खाली’ पडतात, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे खेचली जातात.
तारे तर पृथ्वी पेक्षाही खूप खूप खूप प्रचंड. त्यांची गुरुत्वाकर्षणशक्तीही खूप खूप खूप प्रचंड. सारं काही ह्या केंद्राकडे खेचलं जात असल्यामुळे ह्या केंद्रात प्रचंड दाब निर्माण होतो. ह्या दाबामुळे आतलं तापमान प्रचंड वाढतं. ह्या प्रचंड उष्णतेमुळे ताऱ्याच्या उदरात आता हायड्रोजनपासून हेलियम निर्माण होऊ लागतो. हायड्रोजन बॉम्बमधे पण हेच घडतं. या प्रक्रीयेत प्रचंड उष्णता आणि उजेड बाहेर पडू लागतो. तारा आग ओकू लागतो. लखलख सोनेरी तेजाची न्यारी दुनिया, आकाशात चमकू  लागते. अतिउष्णतेमुळे हा तारा आता चक्क एखाद्या फुग्यासारखा फुगत जातो. पण गुरुत्वाकर्षणामुळे सारं काही केंद्राकडे खेचलं जातच असतं. तारा तापला की प्रसरण पावतो. प्रसरण पावला की काहीसा थंड होतो. थंड झाला की आकुंचन पावतो आणि आकुंचन पावला की पुन्हा तापतो. परिणामी तारे आपल्या हृदयासारखे स्पंदन करत असतात असं वाटेल तुम्हाला पण प्रत्यक्षात या दोन्हीचा सुवर्णमध्य आपोआपच साधला जातो आणि एका ठराविक तापमानाला आणि आकाराला तारा तेजाळत रहातो.
ताऱ्यांतही आकार आहेत, प्रकार आहेत. इतरांचा आकार पहाता सूर्य हा इटुकला पिटुकला तारा म्हणायचा. प्रॉक्सिमा सेन्टॉरीपेक्षा थोडा मोठा आहे तो, पण अन्य कित्येक ताऱ्यांपेक्षा खूप खूप छोटा.
सगळ्यात मोठा तारा कोणता? मोजण्यावर आहे ते. आकारानी सगळ्यात मोठा आहे, व्हीवाय कॅनिस मेजोरीस. सूर्याच्या २०००पट व्यास आहे त्याचा. पण हा कापूस पिंजून ठेवल्यासारखा आहे, इतका हलका फुलका आहे. आकारानी सूर्याच्या २०००पट मोठा असूनही ह्याचं वस्तुमान सूर्याच्या फक्त ३०पट आहे. जर आपल्या सूर्याइतकीच याही सूर्याची घनता असती तर त्याचं वस्तुमान अब्जावधीपट भरलं असतं. पिस्तुल स्टार, आर 136 ए एल,  किंवा इटा कॅरीनी हे तारे आपल्या सूर्याच्या १००पट आहेत. सूर्याचं वस्तुमान पृथ्वीच्या तीन लाखपट आहे. म्हणजे हा इटा कॅरीनी पृथ्वीच्या ३०कोटी पट अधिक वस्तुमान बाळगून आहे.
ह्या महासूर्यांचे ग्रहही त्यांच्या पासून चार नाही, चांगले आठ दहा हात अंतर राखून असणार. कारण जरा जरी जवळ गेलं तरी जळून खाक होतील ते. शिवाय ह्या ताऱ्यांचं वस्तुमान प्रचंड, त्यामुळे गुरुत्वाकर्षण इतकं तीव्र की लांब अंतरावर असूनही गुरुत्वाकर्षणाच्या तावडीतून सुटका नाही. ह्या ग्रहांवर कोणी सजीव असतील तर त्यांना त्यांचा अजस्त्र सूर्य, दिसायला अगदीच लहान, म्हणजे आपल्याला आपला सूर्य दिसतो, तितपतच दिसत असेल. त्यांचा सूर्य आकारानी प्रचंड असला तरी तो प्रचंड अंतरावरही आहे. अर्थात जीवसृष्टीसाठी सूर्यापासून फार जवळही असून भागणार नाही आणि फार लांबही नाही. बरोब्बर मध्यम अंतर हवं.
ताऱ्यांचे चरित्र
आर 136 ए एल किंवा तत्सम ताऱ्यांभोवती ग्रह असण्याची शक्यता तशी कमीच आहे आणि त्यावर जीवसृष्टी असण्याची शक्यता तर त्याहून कमी. कारण? कारण महासूर्य अल्पजीवी असतात. आर 136 ए एल हा जेमतेम एक कोटी (एक कोटी=१०) वर्षाचा आहे. जीवसृष्टी उत्क्रांत होण्यासाठी हा कालावधी खूप कमी आहे. आपल्या सूर्यानी ह्याच्यापेक्षा निदान हजारपट जास्त पावसाळे पाहिले आहेत. 
आपल्या सूर्याचं अस्तीत्व अजून अब्जावधी (एक अब्ज=१०) वर्ष टिकेल. सूर्यांनाही जन्म, बाल्य, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यू आहे. सूर्य हा बराचसा हायड्रोजनचा बनलेला आहे. त्याच्या पोटात सतत ह्या हायड्रोजनचं रुपांतर हेलियम मध्ये होत असतं. संथपणे फुटणारा हायड्रोजन बॉम्बच हा. ह्यातून प्रचंड उर्जा बाहेर पडते. उजेड, उष्णता आणि अन्य किरणांच्या रुपानी ती आपल्याला जाणवते. ताऱ्यांचा आकार हा तापमान आणि गुरुत्वाकर्षण यांच्या संतुलनाने सिद्ध होतो असं आपण पाहीलं आहे. सुमारे काही अब्ज वर्ष हे संतुलन टिकतं. मग हायड्रोजन संपायला लागला की गुरुत्वाकर्षणाचा विजय होतो. तारा आक्रसत, आक्रसत जातो आणि अस्तंगत होतो.
एकाच ताऱ्याच्या या साऱ्या अवस्था बघण्याइतकं आपल आयुष्यमान नाही. पण अवकाशात दुर्बीण रोखली की विविध अवस्थांमधले विविध तारे तारांगणात दिसतात. काही नवजात तारे, अजूनही धुळीच्या आणि वायुच्या दुपट्यात गुंडाळलेले. बरेचसे पोक्त, मध्यमवयीन, आपल्या सूर्यासारखे. काही वयस्क, मृत्यूशैय्येवर, नाकाला सूत लावलेले. काही अब्ज वर्षानंतर आपल्या गगनराजाची कशी अवस्था होईल, याची अस्वस्थ जाणीव करून देणारे. हे तारांगण म्हणजे जणू तारे संग्रहालयच. इथे विविध अवस्थातील विविध तारे इतरांना भूत किंवा भविष्याचा आरसा दाखवत रहातात.
आपल्या सूर्यासारखा सामान्य तारा, हायड्रोजनचं इंधन संपलं की हिलीयम जाळू लागतो. ह्यामुळे तो आता लाल आणि राक्षसी दिसू लागतो (Red Giant, ह्याला रक्तासूर असं जरा स्टायलिश नाव देता येईल). सुमारे पाच अब्ज वर्षांनी आपला सूर्यही असा होईल. पण तत्पूर्वीच हा आपला छोटासा ग्रह, पृथ्वी, अशक्य तापलेला असेल. दोन अब्ज वर्षांनी सूर्य आत्तापेक्षा १५% प्रखर होईल. म्हणजेच आपल्याकडे सध्या शुक्रावर आहे तशी परिस्थिती असेल. तापमान ४००से.च्या आसपास असेल. पण दोन अब्ज वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे. त्यावेळी कदाचित मनुष्यजात अस्तित्वातच नसेल किंवा अत्यंत प्रगत अशा तंत्राने आपण पृथ्वीची कक्षा बदलून ती थोडी सुरक्षित अंतरावर नेऊन तिथे फिरत ठेवली असेल! पुढे हिलीयमही संपेल. सूर्य म्हणजे आता धूळ आणि उरलासुरला समस्त माल तो सगळा, असा श्वेत बटू म्हणवला जाईल. तो थंड होईल आणि निमेल.
    
सुपरनोव्हा आणि स्टारडस्ट
महासूर्यांची गोष्ट आणखी निराळी आहे. कायाही प्रचंड आणि तापमानही प्रचंड. ह्यांचा हायड्रोजन झपाट्यानी संपून जातो. कारण इथे इतकी उष्णता असते की दोन हायड्रोजन मिळून एक हिलीयम इथे तयार होतोच पण दोन हिलीयम आणि इतर असेच अणु मिळून, आणखीही विविध मूलद्रव्ये इथे तयार होतात. कार्बन होतो, ऑक्सिजन होतो आणि नायट्रोजन होतो. लोह तयार होतं. लोहाहून अधिक मोठे अणु मात्र तयार होत नाहीत. ही सगळी पृथ्वीवर विपुल प्रमाणात आढळणारी, जीवनावश्यक मूलद्रव्ये. लवकरच अशा प्रचंड ताऱ्यांचा स्फोट होतो. त्या ताऱ्याचं रुपांतर आता ‘सुपरनोव्हा’त होतं. या स्फोटावेळी लोहापेक्षाही जड अणूकेंद्र असलेली मूलद्रव्ये तयार होतात.
समजा त्या इटा करिनी नावाच्या महाताऱ्याचा उद्याच स्फोट झाला तर? बापरे, हा तर भलताच बाप स्फोट असेल. पण अजून आठ हजार वर्ष आपल्याला त्याचा पत्ता लागणार नाही. कारण तिथला उजेड इथे पोहोचायला, म्हणजेच तिथे काय चाललंय ते दिसायला तेवढी वर्ष लागतात. मग समजा आठ हजार वर्षापूर्वीच इटा करिनीचा स्फोट झाला असेल तर? मग मात्र आता कुठल्याही क्षणी आपल्याला तो स्फोट दिसेल. मग आपण म्हणू, ‘अरे इटा करिनीला जाऊन आज आठ हजार वर्ष झाली बरं का.’ अशा सुमारे वीसेक ताऱ्यांचे स्फोट झाल्याचं मानवी इतिहासात नमूद आहे. ९ ऑक्टोबर १६०४ साली केप्लरला असा स्फोट दिसल्याचं त्यांने नोंदवून ठेवलं आहे. तो स्फोट प्रत्यक्षात त्याही पूर्वी वीस हजार वर्ष झाला होता.
ह्या सुपरनोव्हाच्या विस्फोटक्षणी जड जड मूलद्रव्ये तयार होतात, उदाः शीसे, युरेनियम वगैरे. हे स्फोट इतके जबरदस्त असतात की ही मूलद्रव्ये आणि एकूणच सारा माल अंतराळात लांब लांब विखुरला जातो. जड अणूंचे हे मेघ पुन्हा एकदा एकत्र गोळा होतात. नव्या ताऱ्याच्या, नव्या ग्रहमालेच्या जन्माची तयारी पुन्हा एकदा सुरु होते.
अशाच स्फोटातून पृथ्वीचा जन्म झाला आहे. म्हणुनच इथे कार्बन, ऑक्सिजन नायट्रोजन विपुल आहे. म्हणूनच आपण इथे आहोत. या विश्वाच्या अथांग पसाऱ्यात, मधूनच  कुठे कुठे अजूनही सुपरनोव्हाचे स्फोट होतच असतात. त्यातून अशी जीवनावश्यक मुलद्र्व्येही तयार होत असतात. हे स्फोट नसते तर कुठली जीवनावश्यक मूलद्रव्ये, कुठली उत्क्रांती आणि कुठले आपण. या अर्थानी आपण सारेच ताऱ्यांच्या धुळीतल्या मूलद्र्व्यांनी बनलेले, ताऱ्यांचे वंशज आपण, आपण सारेच सूर्यवंशी!

गती आणि ग्रहगती
सूर्याभोवती फिरणारे सर्व ग्रह हे एकाच प्रतलात फिरतात. का? ग्रहांच्या कक्षा उभ्या, आडव्यातिडव्या का नाहित? आपली ग्रहमाला म्हणजे एखाद्या तबकडीवर वेवेगळ्या अंतरावर ग्रह फिरावेत आणि मध्यभागी सूर्य, अशीच का? शिवाय सगळे ग्रह एकाच दिशेनी फिरतात. का?
आपण फिरण्याच्या दिशेनी सुरुवात करू या. सगळे एकाच दिशेनी फिरतात कारण कदाचित सुरवातीला मिळालेली गती अशी होती. सुपरनोव्हातून उडालेल्या धुळीचा गरगरतता ढग म्हणजे आपल्या सूर्याची आणि सूर्यमालेची सुरुवात. ह्या आदि-ढगाची फिरण्याची दिशा, तीच आपली आजची फिरण्याची दिशा. सारेच ग्रह ह्या मूळ ढगाची लेकरं त्यामुळे फिरण्याची दिशाही तीच.
पण सारेच ग्रह एकाच प्रतलात का? ही लेव्हल कशी काय साधली गेली? उत्तर आहे गुरुत्वाकर्षणामुळे. अत्यंत गुंतागुंतीच्या कारणांनी, अवकाशात गरगरणारा वायुगोळा हा अंतिमतः मध्यावर एक महागोळा असणाऱ्या अशा तबकडीचा आकार घेतो.  याची  कारणं आपल्याला ज्ञात असली तरी इथे समजावून सांगण्यापलीकडची आहेत. आपल्या सूर्यमालेची निर्मितीही अशीच झाली आहे. ह्या वायूचे आणि धुळीचे गोळे बनतात, ते गुरुत्वाकर्षणानी इतर लहान लहान गोळ्यांना आकृष्ट करून आपल्यात सामावून घेतात. जेवढा गोळा मोठा तेवढी त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त. स्वाभाविकच मोठे गोळे आता अधिक मोठे मोठे होतात आणि छोट्यांचं अस्तित्वच पुसलं जातं.
सर्वात मोठ्या गोळ्यापासून मध्यावर सूर्य तयार होतो. तर अन्य गोळे ग्रहरूपानी त्याच्या भोवती पिंगा घालू लागतात. सूर्यात खेचले जाणार नाहीत अशा अंतरावर हे ग्रह फिरत रहातात. सूर्यापासून पाहू गेल्यास  बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून ही त्यांची नावं. यात पूर्वी प्लुटोही धरला जायचा पण आता तो ग्रह म्हणवण्याइतका मोठा नाही हे स्पष्ट झालं आहे.


लघुग्रह आणि उल्कापात
मंगळ आणि गुरुच्यामधे अनेक लघुग्रह (अस्टेरॉइड), म्हणजे लहान-मोठे खडक कक्षेत फिरत आहेत. एकत्र झाले तर एखाद्या ग्रहाएवढा हा ऐवज सहज आहे. इथे  आणखी एखादा ग्रह जन्मास आलाही असता. पण या साऱ्यांना एकत्र करेल अशी गुरुत्वीयशक्ती असलेला मोठा गोळा काही तिथे जमलाच नाही. भरीस शेजारच्या गुरुची प्रचंड गुरुत्वीय शक्तीही हा डाव जमू देईना.  म्हणून हे अनेकानेक अश्मखंड/लघुग्रह. हा पट्टा म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या उत्पतीची निजखूण.
शनीची ती प्रसिद्ध कडी ही अशीच, उरला सुरला समस्त माल सगळा घेऊन बनलेली. हे सारे अश्मखंड एकत्र आले तर शनीला आणखी एक चंद्र प्राप्त झाला असता. आधीच ६२ चंद्र भाळी धरलेले आहेतच. आहेत त्यात आणखी एक.
लघुग्रहांचा पट्टा म्हणजे शनीसारखी  सूर्याची कडी आहेत जणू. लघुग्रहांच्या पट्ट्यातले काही तर चांगलेच मोठे आहेत. सेरेस नावाचा एक अश्म चांगला १००० कि.मी. व्यासाचा गोळा आहे. बाकी याहून लहान लहान तुकडे आणि बरीचशी धूळ. फिरता फिरता हे एकमेकाला धडकतात. कधी कधी ह्या पट्ट्यातून बाहेर फेकले जातात. कधी कधी पृथ्वीच्या वातावरणातही शिरतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात. पण हवेच्या घर्षणामुळे वाटेतच पेटतात, राख होतात. आपण म्हणतो, ‘पाहिलं का? तारा निखळला!’ ह्यालाच म्हणतात उल्कापात.
क्वचित हे इतके भलेथोरले असतात की वातावरण भेदून ते पृथ्वीवर आदळतात. १९०८ साली सायबेरीयात अशी एक उल्का आदळली आणि त्या उष्णतेने मोठा वणवा पेटला. बुलढाणा जिल्ह्यातलं, लोणारचं प्रसिद्ध सरोवर, म्हणजे अशाच उल्केच्या धडकेनं पडलेल्या, प्रचंड खड्ड्यात साठलेलं पाणी आहे.
आता असं पुराव्यासहित शाबित आहे की, ६५ कोटी वर्षापूर्वी, मध्य अमेरिकेतील युकाटान प्रांतात एक प्रचंड उल्का पडली. डायनोसोरचा वंशविच्छेद घडवणारी ही घटना. जगातल्या सर्व अण्वस्त्रांच्या शेकडोपट असा महाप्रचंड स्फोट व्हावा एवढ्या उर्जेचा लोळ युकाटानवर निमिषार्धात कोसळला. ह्यामुळे सर्वत्र हाहाःकार माजला. अवघे डळमळले भूमंडळ. ह्या भूकंपामुळे, न भूतो न भविष्यती अशा त्सुनामीच्या प्रचंड लाटा उठल्या, जिकडे तिकडे वणवे धडधडून पेटले.  उठलेल्या धुरामुळे आणि धुळीमुळे सूर्य अक्षरशः झाकोळला गेला. कित्येक वर्षांसाठी हे तमोयुग टिकलं.
सूर्यप्रकाशाविना झाडं मेली. झाडांवाचून प्राणी मेले. डायनोसॉर तर पार होत्याचे नव्हते झाले. जे गेले, ते गेले कसे हे आश्चर्य नसून, जे वाचले ते वाचले कसे, हे मोठं कोडं आहे. वाचलेल्यात होते आपले काही सस्तन पूर्वज. खोल जमिनीखाली एखाद्या बिळात त्यानी घर केलं होतं बहुतेक, त्यामुळे कसेबसे बचावले.

दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
सूर्य आणि सजीवसृष्टी याचं अन्योन्य नातं स्मरून हे प्रकरण संपवतो मी. पृथ्वी वगळता अन्यत्र सजीवसृष्टी आहे का? माहित नाही. (पुढच्या एका प्रकणात याबद्दल अधिक काही.) पण जर असेल अशी काही सजीवसृष्टी तर निश्चितच, की ती एखद्या ताऱ्याच्या आश्रयानीच वाढत असेल. अगदी आपल्यासारखी नसेलच, पण साधारण आपल्या एवढ्याच सादृश अंतरावरच्या ग्रहावर असेल. सादृश अंतर म्हणजे साधारण पृथ्वीसारखं वातावरण राहील अशा अंतरावर हा ग्रह असेल. प्रत्यक्षात हे अंतर प्रचंड असू शकेल. पण या ग्रहापर्यंत पोहचणारा प्रकाश आणि उष्णता साधारण आपल्यासारखी असेल. या ग्रहावरून दिसायला तो तारा आपल्याला सूर्य दिसतो इतपत आकाराचा आणि तितकाच तेजस्वी दिसेल.
जीवसृष्टी ताऱ्याच्या आश्रयानी वाढत असेल असं का? कारण सजीवांना लागते उर्जा. ही सूर्य प्रकाशाशिवाय कशी मिळणार? इहलोकी झाडं सूर्यप्रकाशापासून ‘अन्न’ तयार करतात. म्हणजे पाणी आणि कार्बनडायऑक्साइडपासून झाडं  ‘शर्करा’ निर्माण करतात. शर्करेतील उर्जा आणि क्षार वगैरे अन्य घटक वापरून इतर अनेक क्रिया झाडांत घडत असतात; वाढ, फुलं येणे, फळं येणे असं सर्व. या प्रत्येक प्रक्रियेला जी उर्जा लागते ती सूर्याकडून प्राप्त होते. झाडं ऊन शब्दशः खातात.
 प्राणी झाडं खातात, म्हणजे सूर्याची उर्जाच मिळवतात. आपण झाडं आणि/किंवा प्राणी खातो म्हणजेही तेच. ‘हे दिनमणी व्योमराज, तेजातच जनन मरण तेजातच नवीन साज’हे शब्दशः खरं आहे.
थोडक्यात सूर्यशक्ती शिवाय शर्करा नाही आणि शर्करा म्हणजे पॅकींग करून प्राण्यांना वापरण्यायोग्य अशी तैयार सूर्यशक्ती. ही शर्करा ‘जाळून’, ह्यातून मिळणाऱ्या उर्जेवर इतर सर्व सृष्टीचं चलनवलन चालतं. ‘जाळून’ म्हटल्यावर लगेच आग, धूर असली चित्र डोळ्यापुढे आणू नका. इंधनाचा थेट भडका उडवणे हा शक्ती मिळवण्याचा फारच हिंसक मार्ग झाला. जीवशास्त्रात ‘ज्वलनाचे’ अन्यही संथ आणि संयत मार्ग आहेत.
झाडांची पानं म्हणजे पृष्ठभागावर सोलर पॅनेल बसवलेल्या शर्करेच्या फॅक्टऱ्या आहेत. आत शर्करा बनवणारी मशिनरी आहे. म्हणून तर पानं चांगली सपाट आणि सूर्यमुखी असतात. जास्तीजास्त पृष्ठभाग सूर्याकडे राहावा, जास्तीजास्त सूर्य प्रकाश मिळावा म्हणून ही धडपड. मग ही शर्करा पानांच्या शिरातून खोडाकडे आणि इतरत्र पाठवली जाते. तिथे यापासून अनेकानेक पदार्थ बनतात. प्रथिनं, स्टार्च, तेलं, डिंक, रंग, वास; पुढे पाकळ्या, पारंब्या, फांद्या, मूळं, फळं, बिया...!
हरीण, ससा, मासा, टोळ, अळ्या जेव्हा पाला खातात, तेंव्हा त्यांना ही शर्करा प्राप्त होते. मिळालेली सगळी कामी येत नाही. हा व्यवहार, हे देणं, शंभर टक्के नसतं. सूर्यापासून पानात आणि पानातून प्राण्यांत येताना काही उर्जा खर्च होते, काही वाया जाते. पण या खाण्यातून तृणभक्षी शक्ती मिळवतात. त्याचं जीवनचक्र चालू रहाण्यासाठी, आणखी झाडं खाण्यासाठी, खेळण्यासाठी, हगण्या-मुतण्यासाठी, जुगण्या–विण्यासाठी; शक्ती मिळते ती शेवटी सूर्याचीच.
आता मांसाहारी तृणभक्षींना भक्ष्य करतात. एका अर्थानी सूर्यच खातात ते. पुन्हा एकदा अन्नातून शक्ती मिळते त्यांना. ह्या देवाणघेवाणीत काही शक्ती खर्च होते काही वाया जाते. ह्यांचाही  जीवनक्रम चालू रहातो. हेही आणखी शिकार करतात, खातात, पितात, वितात, पाजतात, लढतात. हेही सारं शेवटी सूर्याच्या जीवावर. भले सूर्यशक्ती इथे फक्त अप्रत्यक्ष्यरित्या प्रतीत होत असेल, भले वाटेत बरीचशी शक्ती वाया गेली असेल, खर्ची पडली असेल; पण या जैवयज्ञाचा कर्ताधर्ता तो रविराजच आहे.
इतर काही जीव, परोपजीवी जीव, हे ह्या प्राण्यांच्या, वनस्पतींच्या अंगाखांद्यावर वाढतात. जंत, बांडगुळं, उवा, पिसवा ह्यांनाही यजमानांकडून सूर्याचा घास भरवला जातो जणू. पुन्हा एकदा इथेही काही शक्ती वाया जाते काही खर्च होते.
अंतिमतः कुठलाही सजीव, वनस्पती असो, प्राणी असो वा परोपजीवी असो, निर्जीव झाला की, त्या कलेवरावरही उदरनिर्वाह करणारे आहेतच उदाः किडे, मुंग्या, बॅक्टेरीया, बुरशी, गिधाडं, तरस. हेही सूर्याचाच लचका तोडत असतात, हे विसरून कसं चालेल? यातही काही शक्ती उष्णतेच्या रूपांनी बाहेर पडते, वाया जाते. कंम्पोस्ट खताचा ढिगारा गरमागरम असतो तो यामुळेच. पानांनी साठवलेली सूर्याची शक्ती, उष्णता, त्या कंपोस्टमधून बाहेर पडत असते. मेगापॉड पक्षी हा चक्क अशा कुजणाऱ्या कचऱ्याचा ढीग करून त्यात अंडी घालतो आणि त्या उष्णतेवर ती अंडी उबतात. तापमान कमीजास्त ठेवण्यासाठी तो वरचा कचरा कमी जास्त करत रहातो. अर्थात कोंबडीसारखं अंड्यावर बसून ती उबवली काय किंवा कंम्पोस्टात ठेवली काय शेवटी उब येणार सुर्याचीच, नाही का?
कधीकधी कुजणाऱ्या पानांचे, वनस्पतींचे थरावर थर साठतात. वरच्या दाबानी चांगले घट्टमुट्ट होतात. पीट म्हणतात त्याला. आयर्लंड-स्कॉटलंड प्रदेशात हे ‘पीट’ उकरून ते कोळश्यासारखं शेगडीत इंधन म्ह्णून वापरतात. हजारो वर्षापूर्वी झाडांनी वेचून जपून ठेवलेली सूर्यउर्जा आता जेवण शिजवायला, घरं उबवायला, बाहेर पडते.
काही खास परिस्थितीत, कोट्यवधी वर्षांच्या अवधीनंतर ह्या पीटचच रुपांतर कोळश्यात होतं. दगडी कोळसा तो हाच. पीटपेक्षा ह्याच ज्वलनाचं तापमान बरच जास्त आहे. पीट पेक्षा कोळसा कितीतरी कार्यक्षम आहे, कामसू आहे. ह्याच कोळशानं मानवी जीवनात क्रांती घडवली. औद्योगिक क्रांती. अठराव्या-एकोणीसाव्या शतकातील क्रांतीची कुंड पेटली ती या कोळशाच्या काळजातल्या आगीतून.
पोलादाच्या भट्टीमधून, वाफेच्या इंजिनाच्या धगधगणाऱ्या बॉयलरमधून, सातही समुद्र ओलांडून, सातही खंड जिंकणाऱ्या जहाजाच्या प्रोपेलर मधून, तीनशे कोटी वर्षापूर्वीपासून झाडांपानांनी साठवलेली सूर्याची उर्जाच आपल्या कामी येत असते.
एवढंच नाही तर इंधनाचा आणि इंजिनाचा शोध लागण्याआधी, पाणचक्क्या होत्या. यावर चालणारे कापडमाग होते. वहातं पाणी हे कालव्यातून पाणचक्की वर सोडलं जायचं. यामुळे चाक फिरायचं, चाकाला जोडलेला अॅक्सेल फिरायचा, धोटा फिरायचा, माग चालायचा, जिनिंग मशीन, कार्डींग मशीन, अशी मशीन चालायची. ही देखील त्या आदित्यनारायणाचीच कृपा. पाणी गुरुत्वाकर्षणामुळे वहात होत हे खरं, पण ते खाली खाली वहाण्यासाठी मुळात वर कोण नेत होतं? अर्थात सूर्य.
वर काही पाण्याचा अक्षय झरा नसायचा. पावसाचं पाणी पडायचं, तेच डोंगरावरून वहात यायचं. पाऊस पडायचा तो बाष्पीभवनानी पाणी ऊंच जायचं, तिथे त्याचे ढग बनायचे म्हणून. बाष्पीभवन व्हाय्यचं ते उन्हामुळे. सूर्य, ऊन, बाष्पीभवन, ढग, पाउस, झरा, पाणचक्की, उर्जा असा प्रवास सगळा. याची सुरवात अर्थात सूर्यनारायण.
पाणचक्की असो की कोळश्यावर, तेलावर चालणारी यंत्र, उर्जा येते सूर्याकडूनच. एक काळ असा होता की कारखान्याच्या छपरावर पाणी पंम्पानी चढवलं जाई आणि ते खाली सोडून त्यावर माग चालवले जात. इथेही पाणी वर चढवायला उर्जा कोळशाची, म्हणजे सुर्याचीच. कोळश्यात कोट्यवधी वर्षांपुर्वीच्या झाडांनी साठवलेली. पाणचक्कीत, गेल्या पावसात पाणी उंचावर नेल्यामुळे साठवलेली. कशाही रुपात साठवली तरी सूर्यापासून मिळालेली ही ‘स्थितीज उर्जा’च आहे. ऊन आणि बाष्पीभवनातून  साधलेल्या पाण्याच्या ‘उंच’ स्थितीमुळे किंवा उन्हातून पानांनी सिद्ध केलेल्या कोळश्यातल्या रसायनिक ‘उंच’ स्थितीमुळे. स्थितीज उर्जा म्हणजे साठलेली उर्जा. संभाव्य शक्ती. संभाव्य अशासाठी की पाणी खाली वहात येताना, कोळसा जळताना, शक्ती वापरून काही ‘वर्क’ होण्याचा संभव आहे!
जीवनाला अंतिमतः उर्जा मिळते ती सूर्यामुळेच हे लक्षात आलंच असेल तुमच्या... पानात शर्करा तयार होते म्हणजे पाणी उंचावर चढवण्यासारखंच आहे. शर्करेच्या रूपातली ही स्थितीज उर्जा मग तृणभक्षी, मग मांसाहारी, मग परोपजीवी, मग ‘मृतोपजीवी’ वापरत रहातात. त्यांची यंत्र या उर्जेवर चालतात. साखर जाळून त्यातली उर्जा वापरली जाते. त्यावर सजीवांचं चलनवलन चालतं.  
इथे जाळून म्हणजे शब्दशः ‘पेटवणे’ असा अर्थ अभिप्रेत नाही. उर्जा वापरण्याचा  हा फारच विध्वंसक आणि उधळा मार्ग झाला. आपल्या पेशींमध्ये  साखरचे रेणू धीम्या गतीनी क्रमाक्रमानी सोडवले जातात. मुळात साखरेचा रेणू घडताना टप्प्याटप्प्यावर जणूकाही रबरबँड ताणून ठेवले जातात. पुढे हे रबरबँड सोडवून त्यातली उर्जा वापरली जाते. हे रबरबँड ताणून बसवायला उर्जा लागते. झाडं ही उर्जा सूर्याकडून घेतात. प्रत्येक टप्प्यावर थोडी थोडी उर्जा मुक्त होते. रासायनिक क्रियेचा  पुढचा टप्पा गाठला जातो. पुढचा रबरबँड सोडवला जातो. आणखी थोडी उर्जा मुक्त होते. किंवा साखर तयार करणं म्हणजे पाणी वर चढवण्यासारखं आहे. साखर वापरणं म्हणजे कोसळणाऱ्या धबधब्यावर तीन चार टप्यावर पाणचक्की उभारून थोडी थोडी उर्जा वापरात आणावी आणि धबधबा पुढच्या टप्प्याकडे झेपावत रहावा तसं आहे.
बारकावे अनेक आहेत पण अंतिमतः ह्या जीवनचक्राची सगळी गती, सगळी उर्जा त्या व्योमराजाच्या उर्जेचीच रूपं आहेत. आपल्या सूर्यपूजक पूर्वजांना हे सगळं माहित असतं, तर सूर्याला नमस्कार ठोकताना त्यांचा उर भक्तिनी आणखी भरून आला असता.
ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात असे कित्येक सूर्य आणि कित्येक सूर्यमाला. पण ज्यांच्या ग्रहमालेत सृष्टीशोभा विलसत असेल, असे किती सूर्यनायक असतील बरं? त्या ग्रहांवर आपल्यासारखी संस्कृती नांदत असेल काय? तेही त्यांच्या सूर्याला नमस्कार ठोकत असतील काय? पुढच्या एका प्रकणात पाहू या आपण.


No comments:

Post a Comment