Sunday 9 October 2016

प्रकरण २ पहिला माणूस आला कुठून?

प्रकरण २
पहिला माणूस आला कुठून?
डॉ. रिचर्ड डॉकीन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रीअॅलीटी या पुस्तकातील, ‘हू वॉज द फर्स्ट पर्सन”
या प्रकरणाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई (सातारा) पिन ४१२ ८०३.
मो. क्र. ९८२२० १०३४९

या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात एका प्रश्नाने होते. प्रश्नाचं उत्तर त्या त्या प्रकरणात दिलं आहे,  निदान त्यातल्या त्यात सुयोग्य, विज्ञाननिष्ठ  उत्तर दिलंय. पण सुरवातीला मी मिथक कथांनी, पुराणांनी, दिलेली उत्तरं काय आहेत हे सांगणार आहे. हे अशासाठी की, ही उत्तरं ढंगदार , सुरस (आणि चमत्कारिक) असतात. अनेकांना ती मनोमन पटलेली होती आणि काहींना आजही मान्य असतात.
प्रत्येक मानवी समूहाची आपण आलो कुठून, कसे, हे सांगणारी एक एक कथा आहे. पण गंमत म्हणजे, टोळ्याटोळ्यांच्या कित्येक कथांमधून निव्वळ त्यांच्याच उद्भवाच्या कथा आहेत. ‘बाकीच्या टोळ्या’ त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही जणू.  जेवढं जग त्यांनी पाहिलं तेवढयाचंच अप्रूप त्यांना. बऱ्याच जमातीत ‘माणसं’ मारू नयेत, असा नियम असतो. पण इथे ‘माणसं’ याचा अर्थ ‘आपल्या टोळीतले लोक’. अन्य टोळीवाले ही ‘माणसं’ गणलीच जात नाहीत. तेंव्हा त्यांची हत्या म्हणजे मनुष्यहत्या नव्हेच.
तास्मानियातील आदिवासींची एक  कथा आहे. मोईनी आणि ड्रोमरडीनर या दोन देवांच्या आकाशीय युद्धात मोईनी हरला आणि खाली पडला तो थेट तास्मानियात. आपण जिथे चिरनिद्रा घेणार त्या भूमीला काही वरदान द्यावं ह्या इच्छेनी, त्यानी शेवटच्या घटका मोजता मोजता, घाईघाईत  ‘माणूस’ बनवला. पण ह्या भानगडीत तो गुडघे करायचे विसरला आणि कांगारूसारखी भक्कम शेपूट मात्र देऊन बसला. या बिनगुडघ्याच्या, सपुच्छ माणसाला खाली बसता येईना. त्यानी पुन्हा देवाजीची करुणा भाकली.
सर्वशक्तीमान ड्रोमरडीनर खरंतर विजययात्रेत मश्गुल होता. पण माणसांची हाक ऐकताच तो त्वरित तास्मानियाला आला. त्यानी अवघडलेल्या माणसांच्या शेपट्या कापल्या, गुडघे देऊन त्यांचा खाली बसण्याचा प्रश्न सोडवला....आणि तास्मानियाची प्रजा सुखाने नांदू लागली.
तास्मानियात इतरत्र याच कथेची अन्य काही रूपंही ऐकायला मिळतात. यात आश्चर्य ते कुठलं? शेकोटीभोवती गोष्ट सांगता सांगता ती थोडी थोडी बदलतेच आणि विविध प्रकार निर्माण होतात. अशाच एका कथेनुसार मोईनीनी, पर्लेवार नावाचा माणूस प्रथम आकाशात तयार केला. त्यालाही गुडघे नव्हते आणि शेपूट होतं. त्यालाही बसायचा प्रॉब्लेमच होता. इथेही अखेर कनवाळू ड्रोमरडीनरनी गुडघे दिले, शेपूट कापलं आणि जखम बरी होईपर्यंत तेलंही लावलं. आकाशगंगेच्या काठाकाठानी मग पर्लेवार तास्मानियात आला.
मध्यपूर्वेतील हिब्रू टोळ्यांचा जो देव होता तो (अर्थातच) अन्य टोळ्यांच्या देवांपेक्षा ‘लईच पॉवरबाज’ होता. अनेक नावं होती त्याला. पण यकश्चित माणसांनी त्याचं नाव घेणं म्हणजे अब्रम्हण्यम्. त्यानी वाळूपासून पहिला मानव घडवला, त्याच नाव अॅडम, (म्हणजे हिब्रूत, माणूस). हा दिसायला देवासारखाच होता. मिथककथातील बहुतेक देवदेवता ह्या बहुधा पुरुष, दिसायला माणसासारख्याच पण अतिशक्तीमान आणि  आकाराने अतिप्रचंड असतात. माणसाच्याच सुधारून वाढवलेल्या आवृत्या असतात ह्या.
अॅडम रहायचा सुजलाम् सुफलाम् अशा  नंदनवनात. तिथल्या सगळ्या झाडांची फळं चाखायची मुभा होती त्याला, फक्त ‘ज्ञानवृक्षाचं’ फळ वर्ज्य. वर्ज्य म्हणजे अगदी संपूर्ण वर्ज्य.
काही दिवसातच अॅडम खूप एकटा असल्याचं देवाच्या लक्षात आलं. काही तरी करावं असं त्याच्या मनाने घेतलं. पुढे मोईनी आणि ड्रोमरडीनरच्या कथेसारखी, या कथेची दोन रूपं आढळतात. एकानुसार अॅडमच्या सोबतीला देवानी सर्व प्रकारचे प्राणी बनवले, पण तरीही त्याचा एकलेपणा संपेना. मग देवाच्या लक्षात आलं, ‘अर्रर्र! बाई राहीली!’ मग अॅडमला भूल देऊन, त्यानी त्याला खोलला, त्याची एक बरगडी काढून घेतली आणि पुन्हा शिवून टाकला. त्या बरगडीपासून स्त्री तयार झाली. ऊसाचा डोळा पेरून ऊस उगवावा तसंच की हे. हिचं ‘ईव्ह’ असं बारसं करून, त्यानी ती अॅडमला पत्नी म्हणून नजर केली.
पुढे उद्यानातील एका कपटी, सैतानी सापानी इव्हला त्या ज्ञानाच्या झाडाचं फळ अॅडमला खाऊ घालायला भरीस घातलं. फळ खाताच दोघांनाही ते संपूर्ण नग्न असल्याचं ज्ञान झालं. संकोचून अॅडम आणि इव्हनी उंबराच्या पानांनी योग्य तो भाग झाकला. हे सगळं लक्षात येताच देव भडकला. ज्ञानवृक्षाचं फळ चाखून त्यांना ‘ज्ञान’ प्राप्त झालं, म्हणजेच, मला वाटतं, त्यांनी निरागसता गमावली. देवानी दोघांना नंदनवनातून पृथ्वीवर हाकलून दिलं. इथे त्यांना आणि त्यांच्या पुत्र, पौत्र, प्रपौत्रादी संततीला पिढयांपिढयाचं दुःखीकष्टी आयुष्य वाट्याला येईल असा शाप दिला. आजही देवाज्ञाभंगाची, ‘मूळ पापाची’ ही कथा, अगदी खरी मानणारे अनेक आहेत. भले अॅडम असा कोणी नव्हता हे मान्य असूनही, अॅडमच्या मूळ पापाचे आपण सारे वारस आहोत, याची मनोमन शरम बाळगणारे, अपराधगंड बाळगणारेही अनेक आहेत.
स्कॅण्डीनेव्हीयाच्या दर्यावर्दी नॉर्स व्हायकिंग लोकांचेही ग्रीक आणि रोमन लोकांप्रमाणे अनेक देव होते. ‘ओडीन’ हा देवांचा देव. ह्यालाच ‘वॉटान’ किंवा ‘वॉडेन’ अशी नावं आहेत. ह्यावरून वेडनेस डे (Wednesday, बुधवार) आला. (थर्स डे, Thursday / गुरुवार, हा ‘थॉर’ ह्या वरुण देवावरुन आला. हा आपल्या प्रचंड हातोडयानी गडगडाट घडवतो, म्हणे.)
एके दिवशी पुळणीवर आपल्या देवबंधुंबरोबर फिरता फिरता ओडिनला झाडाची दोन खोडं दिसली.
एका खोडाचा त्यानी केला बाप्या, नाव दिलं ‘आस्क’ आणि दुसऱ्याची बनवली बाई, नाव ठेवलं ‘एम्बला’. मग या देहांमध्ये बरोबरच्या देवबंधूंनी प्राण फुंकले, त्यांना जाणीव दिली, चेहरा दिला आणि वाचा दिली.
खोडापासूनच का? बर्फाचे सुळके किंवा रेतीच्या ढिगापासून का नाही? या प्रश्नाला उत्तर नाही. ह्या कथा कधी रचल्या, कोणी रचल्या, हे सारंच गूढ आहे. कदाचित मूळ कर्त्याला ह्या कथा काल्पनिक आहेत हे ठाऊक   असेल, कदाचित देशो-देशीच्या, प्रदेशो-प्रदेशीच्या अनेक सुपीक डोक्यातून निघालेल्या अनेक कथांचं, मोडून, तोडून, जोडून, केलेलं मिश्रण म्हणजे ह्या कथा असतील. कदाचित मूळ कर्त्यांनी त्या निव्वळ रंजन म्हणून रचल्या असतील आणि मग कालपरत्वे त्यावर सत्याची झिलई चढली असेल.
कथा पौराणिक असो की फेसबुकीय, ऐतिहासिक असो की व्हॉटसॅपिक, गोष्टी रंगतदार असतात. रंगवून, तिखट-मीठ लावून सांगायला मज्जा येतेच येते. पण कधीतरी आपण विचार केला पाहिजे, साक्षात निर्मीतीचं रहस्य भेदण्याचा दावा करणाऱ्या या साऱ्या कथा खऱ्या असतील?
चला तर मग, पहिला ‘माणूस आला कुठून?’, इथूनच सुरुवात करूया, याचं खरंखुरं वैज्ञानिक उत्तर पाहू या.
खरंच, पहिला माणूस आला कुठून?
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ‘पहिला’ असा कुणी माणूस नव्हताच. कारण ज्याला ‘पहिला’ म्हणावं, त्याला आई-बाप असणारच आणि तेही ‘मानव’ असणार! माणसाचंच कशाला, सशांचंही असंच आहे. पहिला ससा, असा कधी नव्हताच. ना होती पहिली मगर, ना होता पहिला चतुर. जन्मलेला प्रत्येक जीव आपापल्या आई-बाबांच्याच प्रजातीचा होता (काही अतिदुर्मिळ अपवाद इथे जमेस धरलेले नाहीत.). आई-बाबांसारखा होता म्हणजे आजी-आजोबांसारखा असणारच, म्हणजे पणजी-पणजोबांसारखाही असणार तो...असं मागे मागे अखंडपणे चालूच!
अखंडपणे? नाही, अखंडपणे नाही. मग? इथे परिस्थिती जरा नीट समजावून घ्यायला हवी. एक प्रयोग करु या. निव्वळ कल्पनेचा खेळ. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्षात हे शक्य नाही कारण मनातल्या मनात, आपण मागेमागे खूप काळ मागे जाणार आहोत. या कल्पनेच्या खेळातून खूप काही शकणार आहोत आपण.
चला तर मग. खालील सूचनांबरहुकूम कल्पनेला सुरुवात.
तुमचा एक फोटो घ्या. त्याच्यावर तुमच्या वडलांचा एक फोटो ठेवा, त्यावर तुमच्या आजोबांचा, त्यावर पणजोबा, मग खापर पणजोबा. तुम्ही काही खापर पणजोबाना भेटला नसाल. मीही नाही भेटलो. पण ह्यातले कुणी शेतीत असतील, कुणी मास्तर, कुणी काही, कुणी काही. प्रत्यक्ष पहिले जरी नसतील तरी जुन्या वेशातले, पिवळे पडलेले त्यांचे फोटो तुम्ही मनात आणू शकता. एकावर एक एकावर एक, रचत चला ते फोटो. फोटोग्राफीच्या शोधाआधीच्या मंडळींचेही फोटो आता रचायला लागा. सोप्पं आहे ते. सगळा कल्पनेचाच तर खेळ.
असे किती खापर-खापर-पणजोबा पकडायचे? साधारण १८५ कोटी!
साधारण?
१८५ कोटी हा काय साधारण आकडा आहे?
१८५ कोटी फोटोंची चळत, कल्पना करणंही अवघड आहे. किती ऊंच होईल हा मनोरा? जर पोस्टकार्डच्या जाडीचा एक फोटो धरला, तर १८५ कोटी फोटो म्हणजे ६७ किलोमीटर ऊंच, न्यूयॉर्कच्या १८० गगनचुंबी इमारती एकावर एक ठेवल्यात जणू. हे फारच ऊंच झालं, चढणार कसं? जाऊ दे, उगाच तो मनोरा पडायचा बिडायचा, तेव्हा त्याला आपण आडवा ठेऊ या. एका टोकाला, तुमच्या जवळ तुमचा फोटो आहे आणि ६७ कि.मी.दूर, तुमच्या १८५ कोटी पिढयांपूर्वीच्या आजोबांचा. ते तुमच्याकडे तिथून किती कौतुकानी पहाताहेत! ते कसे दिसताहेत? म्हातारे? मिचमिच्या डोळ्यांचे, पापण्यांचेही केस पांढरे झालेले? का व्याघ्रांबर नेसून एखाद्या गुहेबाहेर हवा खात उभे? विसरा राव. ते नेमके कसे दिसायचे, हे नाही सांगता येणार. पण जीवाश्म असं सांगतात की  तुमचे १८५ कोटीवे आजोबा हे मासा होते मासा... आणि आजी होती मासीण, म्हणजे मासोळी हो. ती तशी असणारच की. त्या शिवाय का त्यांना पिल्लं झाली? आणि त्या शिवाय का आज तुम्ही इथे आहात?
चला तर मग ह्या ६७ कि.मी. पसरलेल्या लांबलचक अल्बम मधून आपण फोटो चाळून बघुया. प्रत्येक फोटोतली छबी ही पुढच्या मागच्या फोटोंसारखीच आहे. आसपासचे वंशज आणि पूर्वज एकाच प्रजातीचे आहेत. पण तरीही एका टोकाशी तुमचा अवतार आहे आणि दुसऱ्या टोकाशी मत्स्यावतार. माणसापासून माशापर्यंत मधे आहेत, बरेच रोचक पूर्वज. यात काही कपी (Apes) आहेत, काही वानर (Monkeys) आहेत, काही चीचुंद्र्या  आहेत वगैरे वगैरे...! जवळजवळचे सगळे फोटो एकमेकांसारखे पण अंतर वाढलं की फरक वाढलाच. उलटं उलटं चालत गेलं की आपण सावकाशपणे पण निश्चितपणे मत्स्य मुक्कामी पोहोचतो. असं कसं काय हो?
सोपं तर आहे. थेंबे थेंबे तळे साचे. बारीक बारीक बदल बराच काळ होत राहिले की मुळातलं रूप पार बदलतं. लहानपणचं तुमचं रूप, आत्ताचं तुमचं रूप आणि उतारवयातलं रूप बरंच भिन्न असणार. पण काल रात्रीचे तुम्ही आणि आज सकाळचे तुम्ही हे दिसायला सारखेच की दिसणार. बाळ, बालक, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध ह्यातल्या कुठल्याच टप्प्यावर आदल्या दिवशीची अवस्था एकाएकी संपून आपण मोठे होत नाही.
असंच आपल्या काल्पनिक प्रयोगातल्या अल्बमचंही आहे. १८५ कोटी पिढयामधे, छोटे छोटे नकळतसे बदल होत होत आपण माशापाशी पोहोचतो; आणि तिथून सुरवात केली की हळूहळू, अगदी हळूहळू, मत्स्यरूप बदलत बदलत मानवरूप प्राप्त होतं. माशाला मासा होतो, त्याला मासा होतो... पण १८५कोटी पिढयानंतर वंशज म्हणून माशाला तुम्ही लाभता.
सावकाश म्हणजे किती सावकाश होतात हे बदल? हजार वर्ष म्हणजे काहीच नाही. दहा हजार वर्ष हाही काळ कमीच आहे. एवढ्यात फार फार तर ४०० पिढया मागे जाऊ आपण. यातही वरवरचे, किरकोळ फरक वगळता, काही दिव्य फरक दिसणार नाही. कोणीच शंभर टक्के आईच्या किंवा बापाच्या वळणावर जात नाही. इतक्यात बदलाची चाहूल लागणार नाही. दहा हजार वर्षात बदलाची दिशाही लक्षात येणार नाही. केसांच्या जटा आणि फेंदारलेल्या मिशा वगळता, दहा हजार वर्षापूर्वीचे आजोबा दिसायला तुमच्यासारखेच असतील. आजही जगात चार लोकात जितपत फरक दिसतात तितपतच हा फरक असेल.
१ लाख वर्षापूर्वीचे आजोबा? आपले चा ह्जाराव्वे आजोबा, हे कसे असतील? आता मात्र थोडा फरक असेल. ह्यांच्या भुवयाखाली कवटीला बऱ्यापैकी उभार असेल. पहाणारी नजर मात्र हवी. आणखी मागे मागे जाऊ. एक कोटी वर्ष मागे. म्हणजे ५०,००० पिढया. तिथे फोटो असेल आपल्या ‘विजातीय’ आजोबांचा. हे असतील ‘होमो इरेक्टस’ प्रजातीचे (Species). आपण आहोत ‘होमो सेपिअन’. जीवशास्त्र असं शिकवतं की होमो सेपिअन आणि होमो इरेक्टस यांचा संकर होऊ शकत नाही. त्यामुळेच ह्या दोन वेगवेगळ्या प्रजाती समजल्या जातात. झालाच असा विजातीय संकर तर होणारी संतती वांझ असते. गाढव आणि घोडीपासून झालेलं खेचर ही असंच वांझ असतं. (का ? ते पुढे बघू.)
पुन्हा एकदा स्पष्ट करतो, तुम्ही होमो सेपिअन आहात, तुमचे ५०,०००वे आजोबा होमो इरेक्टस होते, पण या वंशसाखळीत कुठेही होमो इरेक्टसचा, एकदम, अचानक होमो सेपिअन झालेला नाही. (‘अय्या, अहो आपल बाळ पाहिलंत का? लक्षात आलं का तुमच्या. ते होमो सेपिअन आहे. आला बाई एकदाचा होमो सेपिअन जन्माला!’, असं कुठलीही होमो इरेक्टस नारी कोणत्याही होमो इरेक्टस नराला म्हणालेली नाही.)
थोडक्यात ‘पहिला मानव कोण?’ या प्रश्नाचं नेमकं उत्तर मुळी असूच शकत नाही. प्रौढ नेमका वृद्ध कधी होतो? याची जशी नेमकी वेळ सांगता येत नाही, तसंच हे. एक कोटी वर्षाच्या आत, पण लाखभर वर्षापूर्वी केव्हातरी आपले पूर्वज आपल्यापेक्षा फार फार वेगळे होते. ते भेटले तरीही, त्यांचा आणि आपल्या पिढीचा संकर शक्य नाही. म्हणजेच ते वेगळ्या प्रजातीचे (Species) होते.
आता होमो इरेक्टसला ‘मानवी’ व्यक्ती म्हणायचं का हा वेगळा प्रश्न आहे. कोणाला काय म्हणायचं हे आपणच ठरवायचं आहे. झेब्र्याला पट्टेरी घोडा म्हणता येईल किंवा मनीमाऊला वाघाची मावशी. मानव, व्यक्ती, बाई, बुवा हे शब्द तुम्ही निव्वळ होमो सेपिअनना लागू करू शकता. पण अर्थात एकाच (वंश)माळेचे मणी असूनही, १८५ कोटीव्या मासा-आजोबांना मात्र कोणी माणूस म्हणणार नाही खास. तुमच्यापासून त्यांच्यापर्यंत पोहोचणारी सलग वंशसाखळी आहे; या साखळीतील प्रत्येक कडी ही तिच्या नजीकच्या प्रजातीचीच आहे, तरीही.

जीवाश्म झाले त्यांचे
हे आपले पुरातन पूर्वज होते कोण आणि कसे हे कळलं कसं आपल्याला? जीवाश्मावरून.
जीवाश्म हे ‘अश्म’ म्हणजे दगडच असतात. मृत प्राण्यांच्या, वनस्पतींच्या आकारात आपोआप ढाळले गेलेले हे दगड. बहुतेक जीव, जीवाश्म न बनताच नष्ट पावतात. जर तुम्हाला जीवाश्म बनायचं असेल तर सुयोग्य अशा मातीत, गाळात तुम्ही मरायला हवं. ह्या गाळाचे खडक (स्तरित खडक) होतील तेव्हा तुम्ही जीवाश्म व्हाल.
म्हणजे? म्हणजे तीन प्रकारचे खडक असतात. अग्निजन्य, स्तरित आणि रूपबदलू. रूप-बदलू म्हणजे आधी ते अग्निजन्य किंवा स्तरीय असतात. मग भूरचनेतल्या दाबामुळे, उष्णतेमुळे  त्यांचं रूप बदलतं. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा तप्त लाव्हारस जेव्हा थंड होतो तेव्हा त्यातून टणक अग्निजन्य खडक साकारतात. ह्या अतिकठीण अशा अग्निजन्य खडकांचीही ऊन, पाउस, वारा वगैरे मुळे, झीज होते. ह्या पासून निर्माण झालेली वाळू, गाळ हा नदीतळी, तळयातळी, समुद्रतळी बसतो. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती’, या न्यायानी थरावर थर साठत जातात आणि वरच्या दाबानी खालचे थर चांगले घट्टमुट्ट होतात. हेच ते एकावर एक स्तर असलेले स्तरिय खडक. पुढे भू-कवचातील हालचालीनुसार हे थर तीरपागडे होतात, उलटे होतात, पालथे होतात. कोटी कोटी वर्षात पिळलेसुध्दा जातात. (पुढे भुकंपाबद्दलच्या दहाव्या प्रकरणात आपण हे पहाणारच आहोत.)
समजा एखादं प्रेत वहात वहात एखाद्या खाडीत गाळात रुतलं, तर प्रेत जाईल सडून, त्या भोवतीचा गाळ नंतर चांगला घट्ट खडक होईल. इतका की त्या प्राण्याचा गाळात उमटलेला छाप, त्या खडकावर वर्षानुवर्ष शाबूत रहातो. हा एक प्रकारचा जीवाश्म. एखाद्या मूर्तीचा साचा असावा तसा. ह्या साच्यात कधी वाळू, माती जाऊन बसतात. मग साच्यातून मूर्ती निघावी तशा प्रकारचे जीवाश्म तयार होतात. हा दुसरा प्रकार. ह्या दोन्ही प्रकारात त्या जीवाचं बाह्य रूप तेवढं दिसतं. कधी कधी त्या प्राण्याच्या शरीरात पाण्यातले क्षार, स्फटिक अगदी चपखल जाऊन बसतात. अशा वेळी त्या प्राण्याची त्रिमिती प्रतिमा, त्याच्या आतल्या अवयवांसह अश्मीभूत होते. असे त्रिमिती जीवाश्म सगळ्यात उत्तम. पृथ्वीनी पोटात घेतलेल्या त्या जीवांचं हे यथार्थ दर्शन घडवतात.
जीवाश्मातल्या किरणोत्सर्गी समस्थानिकांवरून जीवाश्माचं वय शोधता येतं. (समस्थानिकांबद्दल आपण चौथ्या प्रकरणात पहाणारच आहोत.) जीवाश्मातले काही किरणोत्सर्गी अणु हळूहळू रूप बदलत असतात. युरेनियम २३८चा अणु, हळूहळू शिसे २०६ (Lead) ह्या अणूत रुपांतरित होतो. ह्याला असं बदलायला वेळ किती लागतो हे माहीत असेल, तर प्रत्येक जीवाश्म म्हणजे एक घड्याळच की. लंबकाच्या घड्याळाचा शोध लागण्याआधी पाण्याची किंवा वाळूची घड्याळं होती. पाण्यानी भरलेल्या घंगाळात बुडाला भोक असलेलं एक भांडं (घटिकापात्र) ठेवलं जायचं. हळूहळू हे भांडं  भरलं की ते बुडायचं. हे भरून बुडायला जेवढा वेळ लागेल तो म्हणजे एक घटिका. (एखादयाची घटका भरली असं आपण म्हणतो त्यालाही हाच संदर्भ आहे.) मेणबत्ती जळण्याचा वेग माहित असेल, तर किती मेणबत्ती उरली आहे, या वरून ती पेटवून किती वेळ झाला हेही सहज काढता येतं. किरणोत्सर्गी घडयाळं ही अशीच काहीशी असतात. निम्म्या ‘युरेनियम २३८’चं ‘शिशात (Lead)२०६’त रुपांतर व्हायला ४.५ अब्ज (४.५*१०) वर्ष लागतात. ह्याला युरेनियचं ‘अर्धायू’ (Half Life) म्हणतात. तेव्हा शिसं आणि युरेनियमचं प्रमाण माहित झालं की  खडकाचं/ जीवाश्माचं वय सहज काढता येतं. अर्थात हे रुपांतर सुरु कधी झालं, ही मेणबत्ती पेटली कधी, ह्या घड्याळाचा लंबक हलायला सुरुवात कधी झाली, ह्या खडकात फक्त युरेनियमच होतं, शिसं नव्हतंच हेही माहित हवं.
अग्निजन्य खडकांमध्ये लाव्हारस बाहेर पडतो, थंड व्हायला लागतो, तोच तो क्षण. त्यावेळी शिसे नसतंच, असतं ते युरेनियम. स्तरिय खडकांमध्ये मात्र असा काही क्षण नसतो. पण बहुतेक जीवाश्म तर स्तरिय खडकात असतात. तेव्हा जीवाश्माच्या आसपासचे अग्निजन्य खडक तपासून त्यावर हे सगळं गणित मांडावं लागतं. उदाहरणार्थ एखाद्या जीवाश्माच्या वरच्या थरात १२० कोटी वर्ष जुने आणि खाली १३० कोटी वर्ष पुराणे अग्निजन्य खडक आहेत, तर हा जीव १२० ते १३० कोटी वर्षादरम्यान या भूतलावर अस्तित्वात होता असं म्हणता येईल. या प्रकरणात दिलेला कालक्रम हा अशा अभ्यासानी काढलेला आहे. युगायुगांपूर्वी घडलेल्या घटनांचा काळ अंदाजपंचेच ठरवता येतो. पण इतपत नेमकेपणा या विषयात पुरतो.
युरेनियम २३८ एवढं एकमेव घड्याळ नाहीये. इतर अनेक आहेत आणि वेगवेगळ्या वेगानी चालणारी आहेत. म्हणजे प्रत्येकी फक्त सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा असलेली तीन घडयाळं वापरून, आपण नेमकी वेळ बघावी तसं आहे हे. इथे ४.५ अब्ज वर्षाचा काटा ते ५००० वर्षाचा काटा असलेली घड्याळं आहेत. उदाहरणार्थ, कार्बन १४ चं एक घडयाळ आहे. हाफ लाईफ (अर्धे आयुर्मान, अर्धायू) आहे ५७३० वर्ष. म्हणजे निम्म्या रूपांतराला ५७३० वर्ष लागतात. याचा उपयोग मानवी संस्कृतीच्या पाउलखुणा शोधणाऱ्यांना होतो. वेगवेगळ्या वेगानी चालणाऱ्या घडयाळांमुळे, प्रत्येकानुसार निघालेली वयं एकमेकाला जुळताहेत का हेही बघता येतं. हा एक मोठाच फायदा आहे. आजवर काढलेली सर्वच्या सर्व वयं तंतोतंत जुळली आहेत.
कार्बन १४ च्या घड्याळामागील तत्व युरेनियम पेक्षा जरा वेगळं आहे. इथे खडक नाही तर जीवांचे अवशेष, उदाः लाकडाचा ओंडका, वापरले जातात. युरेनियम पेक्षा हे फार फास्ट चालणारं घड्याळ आहे. पण फास्ट फास्ट म्हटलं तरी, ५७३० वर्ष म्हणजे मानवी आयुष्यापेक्षा कितीतरी मोठा काळ. प्रश्न असा येतो की ४.५ अब्ज किंवा ५७३० वर्ष कोणी जगत नाही. मग ह्या घड्याळांचा वेग मोजला कसा? यासाठी निम्म्या युरेनियमचं रुपांतर व्हायला थांबावं लागत नाही. रूपांतराचा वेग काय आहे हे अल्प काळातही समजतं. एक लक्षांश रुपांतर किंवा एक कोट्यांश रुपांतर, त्यावरून निम्म्या रूपांतराचा वेग काढता येतो.
कालप्रवास
आणखी एक प्रयोग करूया, अर्थात ‘म’तल्या‘म’. (म्हणजे ‘म’नातल्या ‘म’नात हो.) चार टाळकी गोळा करून, कालप्रवास यानात बसून, द्या अॅक्सिलेटरवर पाय आणि दहा हजार वर्ष मागे जा. उतरा आता खाली. तुम्ही आत्ताच्या इराक देशी पोहोचला असाल, तर आसपास  तुम्हाला नुकताच शेतीचा शोध लागलेला दिसेल. इराक वगळता अन्यत्र शिकारी, कंदमुळे खाणारी, नागडीउघडी किंवा वल्कलं, कातडी पांघरलेली, अगम्य भाषा बोलणारी,  भटकी माणसं भेटतील. पण जर त्यांना न्हाऊ माखू घालाल, जरा पोशाख बिशाख कराल, तर ती तुमच्यातली सहज गणली जातील. प्रेमात पडाल तर एखाद्या अनौरस अपत्याचे पालकही व्हाल!
आता ह्या टोळीतल्या एकाला, तुमच्या चारशे पिढयापूर्व आज्याला, घ्या बरोबर आणि आणखी दहा हजार वर्ष मागे जा. आठशे पिढयांपूर्वीची मंडळी भेटतील आता. इथे सगळेच भटके असतील, पण दिसायला आपल्यासारखेच असतील. अपत्य संभवही आहेच आहे. इथेही एकाला बरोबर घ्या आणि आणखी दहा हजार वर्ष मागे जा. दरवेळी एक नवा प्रवासी घेत घेत दरवेळी दहा दहा हजार वर्ष मागे मागे जा.
एखादा कोटी वर्ष प्रवास झाला की भेटणारी माणसं अगदी निराळीच दिसायला लागतील. तुमचा त्यांच्याशी विवाहयोग, संततीयोग शक्य  नाही. पण यानातल्या सर्वात ताज्या प्रवाशाशी मात्र त्यांचा विवाहयोग आणि संततीयोग शक्य आहे. कारण सगळ्यात ताजा प्रवासी हा सुमारे कोटीभर वर्ष जुनाच आहे.
मुद्दा मघाचाच आहे. संथपणामुळे लक्षात न येणारे बदल. घड्याळाचा तास काटा फिरतोय हे लवकर लक्षात येत नाही, तसंच हे. दोन उदाहरणं मुद्दामच दिली आहेत. एकतर हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे आणि अनेकांना तो सहजा सहजी पचनी पडत नाही.
चला तर मग. पुन्हा एकदा यानात बसून प्रवास सुरु करुया. मासा आजोबांपर्यंत जायचंय आपल्याला. आता आला सहा कोटी वर्षापूर्वीचा प्रदेश. आफ्रिकेत असाल तर तिथे अडीच लाखावे आजोबा भेटतील. कपी(Apes) कुलातील असतील ते. दिसायला चिंम्पान्झी सारखे पण चिंम्पान्झी नाहीत. आपले आणि चिंम्पान्झींचे जे समान पूर्वज होते, ते हे. आपल्याशीही संकर अशक्य आणि चिंम्पान्झींशी देखील अशक्यच. अर्थात आपल्या यानात, मागच्या ठेसनात, जो पाच कोटी नऊ लाख नव्वद हजार वर्षापूर्वीचा पाहूणा आपण बरोबर घेतलाय, त्याच्यासाठी मात्र हे स्थळ सुयोग्य असेल. कदाचित पाच कोटी नऊ लाख वर्षवाल्यांशी पण ह्यांचं जुळेल पण चार कोटी वर्षवाल्यांशी नाही.
असंच जाऊ पंचवीस कोटी वर्ष मागे. तिथे तुमचे (आणि माझेही) अंदाजे दीडकोटीवे आजी-आजोबा असतील. हे कपी नसतील. त्यांना शेपट्या असतील. दिसायला आजच्या माकडासारखे, पण नात्यानी त्यांना आणि आपल्यालाही तितकेच लांबचे. आपल्यापेक्षा खूप खूप वेगळे. आपल्याशी संकर अशक्यच आणि आजच्या वानरांशीही अशक्य. पण नुकत्याच यानात घेतलेल्या, चोवीस कोटी नऊ लाख नव्वद हजार वर्षवाल्या पाशिंजराशी मात्र यांचं सूत जुळेल. लक्षात घ्या इथे अगदी संथ बदल होतोय. लगतच्या ठेसनांमधल्या पाशींजरात काहीच फरक नाही, पण दूरच्या ठेसनात बराच फरक.
अशीच चालू दे यात्रा. प्रत्येक टप्प्यावर दहा दहा हजार वर्ष मागे मागे, प्रत्येक टप्प्यावर नगण्य बदल. आता आलोय त्रेसष्ठ कोटीच्या घरात. स्वागताला आहेत आपले सातकोटीवे आजी-आजोबा. पाहिलंत, हात हलवून या या म्हणताहेत. हात म्हणावं का पंजा हा प्रश्नच आहे. हे दिसतात लेमूर माकडासारखे, असतात झाडावर. हे आजच्या सर्व मर्कट प्रजातींचे, आजच्या कपींचे आणि आपलेही, मूळ पूर्वज बरं!
आपले जसे ते आजोबा आहेत तसेच, ते आजच्या लेमूर माकडांचेही आजोबा आहेत. आजच्या मर्कट आणि कपिंचेही ते आजोबा आहेत. अर्थात ते वेगळ्या प्रजातीचे असल्याने, आजच्या त्यांच्या कुठल्याच वंशजापासून त्यांना संतती संभव नाही. पण बासष्ठ कोटी नऊ लाख नव्वद हजार वर्षामागच्या आजीशी मात्र संग आणि संतती शक्य आहे. चला यांनाही यानात घेऊन आपण आणखी उलटे जाऊ.
एकशे पाच कोटी वषापूर्वीच्या थांब्यावर, आपले पंचेचाळीस कोटीवे आजोबा असतील. हे तर सर्व आधुनिक प्राणीजगताचे, सगळ्या सस्तन प्राण्यांचे पितामह. फक्त कांगारू आणि तत्सम प्रजाती; बदकतोंड्या प्लॅटीपस आणि तत्सम प्रजाती हे जीव वगळून. रूप मात्र आजच्या, आपल्याला परिचित असलेल्या, सस्तन प्राण्यांशी जेमतेमच जुळेल.
३१० कोटी वर्षापूर्वीच्या आजीला भेटायला थांबूया आता आपण. आजच्या सर्व प्राण्यांची, सरपटणाऱ्या प्राण्यांची; सर्व साप, पाली, कासवं, मगरी, सर्व डायनॉसॉरची, सर्व पक्ष्यांची (पक्षी ही जीवशास्त्रीयदृष्ट्या डायनोसॉरचीच पिल्लावळ) आदीमाता ही. दिसायला आजच्या पालीसारखी. याचा अर्थ, दिसण्याच्या बाबतीत, त्या काळापासून सस्तन प्राणी बरेच बदलले आहेत, पण पाली फारशा बदललेल्या नाहीत. त्या (आजही) आदिमातेवर गेलेल्या दिसतात.
आता माशाचं घर अगदी जवळ आलंय हं. आणखी एकच स्टेशन थांबू. ३४० कोटी वर्षापूर्वीच्या जगात आपल्या १७५ कोटीव्या आजोबांना भेटूया. दिसायला हे त्या पाणसरड्या सारखे आहेत आणि असायला सर्व उभयचर (Amphibians) आणि सर्व भूचर पृष्ठवंशीय (Terestrial vertebrates) प्राण्यांचे बाप के, बाप के, बाप के,...!
आणि आता आलोय ४७० कोटी वर्ष मागे. आपला १८५ कोटीवा मासा आज्जा, त्याच्या जिवलग मासोळीसोबत मजेत पाण्यात सळसळतोय. आणखीही मागे मागे जाता येईल, आणखी आणखी जुने पुराणे पूर्वज भेटतील. जबडेवाले मासे, आणखी मागे बिनजबड्याचे मासे... इथून मागे फार नेमकं सांगणं अवघड आहे. ह्या पूर्वीचे जीवाश्म फारसे नाहीत.

डी.एन.ए.च सांगून राहिलेत, आपण सारे बहीण भाऊ
आपले पूर्वज दिसायला कसे होते हे सांगायला जीवाश्म नसले तरी, आपल्यासकट सर्व सजीव हे अंती एकमेकाचे भाईबंधच आहेत हे अगदी स्पष्ट आहे आता. या वंशवृक्षात जवळजवळचे कोण (उदाः आपण आणि चिंम्पान्झी किंवा उंदीर आणि घूस), दूरचे नातेवाईक कोण (उदाः आपण आणि कोकीळा किंवा उंदीर आणि मगर), हे सारं स्पष्ट आहे. कसं? याआधी शरीररचनेच्या पद्धतशीर तुलनात्मक अभ्यासानी आणि आताशा डी.एन.ए.च्या पद्धतशीर तुलनात्मक अभ्यासानी.
सजीवांच्या प्रत्येक पेशीत अनुवंशिकता जपणारी गुणसूत्रे (Chromosomes) असतात. गुणसूत्रे म्हणजे घट्ट गुंडाळलेले  डी.एन.ए.चे लांबच लांब रेणू. या रेणूंद्वारे आपल्या शरीराच्या रचनेचं, चलन वलनाचं नियंत्रण केलं जातं. गुणसुत्रांवर चार वेगवेगळी रसायनं (चार वेगवेगळी अक्षरं) एका पुढे एक अशी असतात. ही अक्षरं असतात किंवा नसतात. अर्ध अक्षर अशी भानगड नाही. जोडाक्षर विरहीत अशी ही अक्षरमाला आहे. (म्हणूनच ही भाषा ‘डिजिटल’ आहे.) ही अक्षरं आता आपल्याला वाचता येतात, मोजता येतात. या अक्षरांच्या क्रमात शरीरकार्याचं रहस्य लिहिलेलं असतं.
इंग्रजीत २६ अक्षरं आहेत, तर या भाषेत चार आहेत. A, T, C, G, ही ती चार अक्षरं. Adnene, Thyamin, Cytosin, Guanin ह्या चार न्युक्लिओटाईड गटातील रसायनांची ही इंग्रजी आद्याक्षरं. ह्या चार अक्षरांच्या, म्हणजेच रसायनांच्या माळा गुंफून सारे संदेश दिले जातात. आपण एकापुढे एक काही अक्षरं लिहितो. अक्षरांचे शब्द होतात, शब्दांची वाक्यं आणि अर्थपूर्ण संदेश तयार होतो. तसंच हे. पण याहून महत्वाचं म्हणजे, ही भाषा सर्व सजीव जगतात सारखीच आहे. आजवरच्या प्रत्येक प्राण्यात, वनस्पतीत, बॅक्टेरीयात, प्रत्येक सजीवात ह्याच चार अक्षरांच्या सांकेतिक भाषेत स्वतःच्याच निर्मितीचा नकाशा लपलेला आहे. अगदी प्राथमिक अवस्थेतल्या बॅक्टेरीयातही अक्षरं तीच, शब्द तेच आणि शब्दार्थही तेच. सर्व जीवजंतूत, वनस्पतीत, प्राण्यात, माणसातही अक्षरं तीच, शब्द तेच आणि शब्दार्थही तेच. अर्थात वाक्य वेगळी, संदेश वेगळे, त्यामुळे शरीर आणि त्याचं कार्यही वेगळं वेगळं. अक्षरमालेतून जेव्हां एक विशिष्ठ संदेश दिला जातो तेव्हा गुणसूत्राच्या त्या भागाला जीन असं म्हणतात. उदाहरणार्थ फॉक्स पी २ हा जीन सर्व सस्तन प्राण्यात असतो. म्हणजेच सगळ्या सस्तन प्राण्यांचा मूळपुरुष आणि आदिमाता एकच आहे. २००० अक्षरांचा हा संदेश आहे.
सर्व सस्तन प्राण्यात ही २००० अक्षरे जवळपास जैसे थे आहेत. पण दोन प्रजातीत (उदाः वाघ आणि मांजर) ही २००० अक्षरे किती ‘जैसे थे’ आहेत, ह्यावरून त्या दोन प्रजाती उत्क्रांतीच्या टप्प्यावर एकमेकांच्या किती जवळपास  आहेत, ते ठरवता येतं. उदाः चिम्पान्झी आणि आपल्यात फारच थोडा फरक आहे. फक्त नऊ अक्षरांचा फरक. त्यामुळे आपण जवळचे नातलग. आपण आणि उंदीर यात फरक जास्त आहे. १३९ अक्षरांचा फरक आहे. म्हणून आपण चुलत नात्यातले. दिसायला आपण उंदरासारखे कमी आणि चिंम्पान्झीसारखे जास्त का दिसतो ते हे कळलं ना आता?
चिंम्पान्झी सख्खे, उंदीर चुलत चुलत, म्हणजे चींम्पान्झींचे आणि आपले समान पूर्वज तसे अलीकडचे, उंदरांचे आणि आपले समान पूर्वज मात्र त्याही फार फार पूर्वीचे. आत्ताचे आपण आणि आत्ताचे उंदीरही, त्या आपल्या पूर्वजांसारखे दिसत नाही. इतक्या पिढ्यांमध्ये खूप खूप बदललोय आपण. आत्ताच्या वानरांपेक्षा (Monkeys) आपल्याला चिंम्पान्झी (Apes) जवळचे. पण आपल्याला आणि चिंम्पान्झींना हे ‘वानर’ समान अंतरावरचे बरं. आपले फॉक्स पी २ वानरांच्या (उदाः बबून वानर) फॉक्स पी २ बरोबर जुळवून बघितले तर २३ ते २४ अक्षरांचा फरक दिसतो आणि चिंम्पान्झीचे फॉक्स पी २ वानरांच्या (उदाः बबून वानर) फॉक्स पी २ शी जुळवून बघितले तरीही तेवढाच फरक दिसतो. सगळ कसं फिट्ट बसतंय. आपण आणि चिम्पान्झी, वानरांशी समान नात्यांनी बांधलेलो आहोत याचा हा सज्जड पुरावा.
जाता जाता एक सांगतो, बेडूकराव तर सर्व सस्तन प्राण्यांचे (त्यात आपणही आलो) खूप, खूप, खूप, खूप, लांबचे नातेवाईक. त्यांच्या आणि (आपल्यासकट) सगळ्याच सस्तन प्राण्यांच्या फॉक्स पी २ मध्ये १४० अक्षरांचा फरक आहे. कारण सगळ्यांना ते सारखेच दूरचे. सर्व सस्तनप्राण्यांचा पूर्वज १८० कोटी वर्षापूर्वी होऊन गेला. त्याच्यापासून आपण निपजलो. सर्व सस्तन आणि उभयचर प्राण्यांचा पूर्वज ३४० कोटी वर्षापूर्वीचा. इथून उभयचरांचं बिऱ्हाड वेगळं झालं आणि सस्तन प्राण्यांचं वेगळं झालं. त्यांच्यातला बेटी व्यवहार बंद झाला. तिथून पुढे (प्रथा, परंपरा, कुलधर्म कुलाचार आणि) फॉक्स पी २  बदलत बदलत गेले. फरक वाढत गेला. नातं दुरावत गेलं. आज कुणी बेडकानी सांगितलं की, ‘अहो, तुमचे आणि आमचे आजोबा फार फार पूर्वी एकाच डबक्यातले’, तर आपल्याला किती घाण वाटेल.
फॉक्स पी २ जीन निव्वळ एक उदाहरण मात्र. कोणताही जीन घेतला तरी हेच आढळेल. याच तत्वानुसार माणसा माणसातील नातीही ठरवता येतील. सर्व माणसं एकासारखी एक नसतात. सर्व बबून किंवा सर्व उंदीरही तसे नसतात. व्यक्तीगणिक त्या त्या व्यक्तीच्या जीन्स मध्येही बारीक बारीक फरक असतात.  दोघातील जीन्स किती सारखे यावरून नातं किती जवळचं याचा हिशोब करता येतो आपल्याला. अगदी अक्षरनअक्षर ताडून पहाता येतं. आपण दोघेही ‘माणूस’, तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीन्स मध्ये बरंच साम्य आढळेल. आपल्या दोघांची अक्षरमाला चींम्पान्झीशी जुळवून बघीतली तर हा फरक वाढेल. तुमच्यात आणि तुमच्या आईवडीलांच्या जीनमध्ये साम्य खूप. तुमच्यात आणि तुमच्या सख्ख्या भावंडातही साम्य अधिक. तुमच्या आणि तुमच्या चुलत भावंडात साम्य कमी. नात्यांची ही वीण आता गुणसूत्र तपासून उलगडता येते. ह्या तंत्राचे अनेक उपयोग आहेत. प्रत्येकाचा बोटाचा ठसा जसा वेगळा तसा हा डी.एन.ए.चा ठसा. गुन्हेगाराची ओळख पटवायला अत्यंत उपयुक्त.
निवळ सस्तन प्राण्यात आढळणाऱ्या अशा एखाद्या जीनची तुलना करून त्यांच्या विविध प्रजातीतील (उदा: माणूस, हत्ती, घोडा) नातं शोधता येतं. अक्षर अक्षर जुळवून बघण्याच तंत्र खूपच महत्वाचं ठरतं इथे. इतर काही जीन वापरून आणखी लांब लांबची नाती तपासता येतात. (उदाः जंत आणि पृष्ठवंशीय प्राणी) असच तंत्र वापरून एकाच प्रजातीतील प्रजेची नातीही जोडता येतात. उदाः तुम्ही इंग्लिश असाल तर तुमचे आणि माझे समान पूर्वज काही शतकांपूर्वीचे असतील. तुम्ही तास्मानिया किंवा अमेरिकेचे मूळ निवासी असाल तर लाखो वर्ष मागे जावं लागेल आणि तुम्ही कलहारी वाळवंटातले असाल तर आणखी बरंच बरंच मागे जावं लागेल. पण मूळ सापडेल खचित. कारण मानवाचे अंती गोत्र एक.
पण मानवाचेच का? या पृथ्वीतलावरचे सर्व सजीव; वृक्ष, वल्ली, वनचरे... ही आम्हा सोयरी आहेत हे निश्चित. कारण, अगदी बॅक्टेरियात दिसणारे काही जीन्स आपल्यातही दिसतात. कारण आपली आणि सर्व सजीवांची जेनेटिक अंकलिपीही तीच आहे; तीच अक्षरं, तेच शब्द, त्या शब्दांचे तेच अर्थ. आपल्या वंशवृक्षाच्या शेजारच्या डहाळ्यांवर चिंम्पान्झी आहेत, माकडं आहेत, पक्षी, जंत, सरडे, मासे, गोगलगाई, गुलाब, शेवाळं, भूछत्र, बॅक्टेरिया... आहेत. सारे एकाच माळेचे मणी, एकाच मुळाक्षरांचे धनी. गोत्रच जर काढायचं असेल तर मानवांचेच का? जीवशास्त्र शिकवतं, सजीवांचे अंती गोत्र एक.
कुठल्याही भाकडकथेपेक्षा, पुराणकथेपेक्षा हे कितीतरी उत्तम आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, महन्मधुर आहे... अंगावर शहारा आणणारं आहे... आणि महत्वाचं म्हणजे शंभरटक्के सत्य आहे.
--------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment