प्रकरण ३
इतक्या प्रकारचे
प्राणी निर्माण कसे झाले?
रिचर्ड डॉकिन्स
यांच्या ‘द मॅजिक ऑफ रिअॅलीटी’ या
पुस्तकातील
‘व्हाय आर देअर सो मेनी डिफरंट काईंड्स ऑफ अॅनिमल्स?’
या प्रकरणाचा
भावानुवाद.
डॉ शंतनू अभ्यंकर,
वाई. मो. क्र. ९८२२० १०३४९
ही जीवसृष्टी कशी निर्माण
झाली ते सांगणाऱ्या कितीतरी लोककथा, मिथककथा
आहेत. जीवसृष्टीची वैशिष्ठ्ये कशी निर्माण झाली हे सांगणाऱ्या तर कितीतरी
कथा. खारीच्या पाठीवर रेघा का, मोराला पिसारा कुठून आला, पोपटाचा रंग हिरवा कसा
झाला ह्या साऱ्याचा खुलासा करणाऱ्या कथाच कथा आहेत. पण इतक्या प्रकार-प्रकाराचे
आणि आकार-उकाराचे प्राणी कसे अस्तित्वात आले ते सांगणाऱ्या कथा फारशा नाहीत.
ज्यूंची टॉवर ऑफ बॅबल
म्हणून एक कथा आहे. इतक्या विविध भाषा कशा निर्माण झाल्या ते ह्यात सांगितलं आहे.
कोणे एके काळी जगातली सर्व माणसं एकच एक भाषा बोलत होती. आपापसातल्या उत्तम
संवादामुळे सर्वांनी मिळून एक उंचच ऊंच मनोरा बांधायचं ठरवलं. अगदी स्वर्गापर्यंत
पोचणारा मनोरा! हे लक्षात येताच देवाची पाचावर धारण बसली. एकमेकांची भाषा समजत
असेल तर आज मनोरा बांधताहेत, उद्या काय करतील याचा नेम नाही. मग देवानी चक्क
प्रत्येकाला वेगळी वेगळी भाषा दिली. संवाद थांबला, अर्थात मनोरा होऊच शकला नाही.
पण तेव्हा पासून देशप्रदेशागणिक वेगळीच भाषा बोलली जाऊ लागली आणि परमुलखातल्या लोकांचं
बोलणं, आपल्याला मुलखाचं परकं, अर्थशून्य वाटू लागलं.
सजीवांच्या उत्क्रांतीची
आणि भाषांच्या उत्क्रांतीची जातकुळी एकच आहे. त्यामुळे भाषांसारखीच सजीवांबद्दल
अशी काही उत्क्रांती कथा आहे की काय अशी मला उत्सुकता होती. पण एवढे तऱ्हेतऱ्हेचे
प्राणी का? किंवा एवढं जैववैविध्य का? या प्रश्नाचं उत्तर देणारी कथा मला तरी
आढळली नाही. आपल्या आसपासचे वेगवेगळे प्राणी, पक्षी आपल्याला अगदी सहज ओळखता
येतात. अगदी बारकाव्यासहित. अर्न्स्ट मायर ह्या जर्मन शास्त्रज्ञानी, न्यू गिनी
मधील पक्ष्यांची सूची तयार केली. त्यानी नोंदवल्या १३७ जाती, पण तिथल्या स्थानिक
भाषेत त्यातल्या १३६ पक्ष्यांना वेगळी
वेगळी नावं होती!
पुन्हा एकदा
कथाकथनाकडे वळू या. उत्तर अमेरिकेतील होपी लोक असं मानतात की त्यांच्या कोळीण देवतेनी
(जाळं विणणारा कीटक कोळी, जाळ्यात मासे पकडणारा नाही) आणि ‘तवा’नी (म्हणजे सूर्यदेवानी)
मिळून द्वंद्वगीत गायला सुरुवात केली, परिणामी पृथ्वी आणि त्यावरील जीवसृष्टी निर्माण
झाली. कोळीणदेवीनी मग सूर्याकडून ‘कल्पने’चे धागे घेतले आणि त्यातून मासे, पक्षी
असे सगळे प्राणी विणून काढले.
उत्तर अमेरिकेतल्याच
पुएब्लो आणि नवाजो टोळ्यांमध्ये थोडीशी उत्क्रांतीसारखी कल्पना मांडणारी कथा आहे.
सजीव सृष्टी ही टप्प्याटप्प्यांनी वाढत गेली असं हे लोक मानतात. पहिल्या, म्हणजे
लाल जगातून, कीटक वर चढले, ते दुसऱ्या, म्हणजे निळ्या जगात पोहोचले. तिथे आधीच
पक्षी रहात होते. पण आता तिथे जागा पुरेना तेव्हा हे दोन्ही गट आणखी वरच्या,
म्हणजे पिवळ्या जगात आले. इथे माणसं आणि अन्य प्राणी होते. पण इथेही गर्दी झाली
आणि शेवटी सगळेच चौथ्या, म्हणजे काळ्या-पांढऱ्या, दिवस-रात्रीच्या जगात आले.
देवदयेनं इथल्या चलाख लोकांना शेती करता येत होती. त्यांनी या पाहुण्यांनाही ते
तंत्र शिकवलं आणि ते सारे सुखाने नांदू लागले.
यहूद्यांच्याही
दोन निर्मितीकथा आहेत. जैववैविध्याचं कारण त्यातही सांगितलेलं नाही. एका कथेनुसार
सारी सृष्टी देवानी सहा दिवसात निर्माण केली. पैकी पाचव्या दिवशी मासे, देवमासे,
समुद्रातले आणि हवेत विहरणारे सारे जीव
त्यानी जन्माला घातले. सहाव्या दिवशी माणूस आणि अन्य भूचर निर्माण केले. यातली
भाषा मोठी ओघवती आणि रसाळ आहे; “पुढे देवाने शब्द उच्चारले `जलांमधे
जीवजंतुंचे थवेच्या थवे उत्त्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीच्या वर आकाशात विहार
करोत.' त्यानुसार सागरातील प्राणी, जलचर,
पक्षी निर्माण झाले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा. वृद्धी पावा.' हे पाचव्या दिवशी घडले. मग देवाने शब्द उच्चारले, `गुरेढोरे, सरपटणारे प्राणी, जमिनीवरील
प्राणी, वन्यपशू जे अस्तित्वात येवोत' आणि
तसेव घडले. मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला
आणि जलचर, पक्षी, पशू व सरपटणार्या प्राण्यांचे
अधिपत्य त्याला दिले. मानवाच्या नाकपुड्यातुन त्याच्यात आत्मा किंवा ‘प्राण’ फुंकला आणि आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा,
बहुगुणीत व्हा आणि पृथ्वी व्यापुन टाका. जलचर, पक्षी, पशू यांच्यावर अधिकार गाजवा. प्रत्येक
वनस्पती, प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल. प्रत्येक पशु,
प्रत्येक पक्षी तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणुन मी
हिरवी वनस्पती देत आहे.' हे सर्व सहाव्या दिवशी घडले.”
अनेक
प्रकारचे प्राणी आहेत एवढ्यावरच हे कथन थांबतं, ते का आहेत ह्याचा पत्ता लागत
नाही.
दुसऱ्या एका मिथकाप्रमाणे
माणसाच्या करमणूकीसाठी देवानी हे जीव जन्माला घातले. ‘नंदनवनात एकटा रहाणारा अॅडम
खूप कंटाळला होता, तेव्हा एकटेपणा वाईट, असा विचार करून देवानी सर्व भूचर आणि विहंग
बनवले आणि आणले त्याच्या समोर त्यांना तो काय नावे देतो हे पहाण्यासाठी.’
खरंच, इतक्या प्रकारचे
जीव का बरं आहेत?
सर्व प्राणीमात्रांचं
बारसं करायचं अॅडमचं काम, त्या कथेकरी यहुद्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी किचकट
होतं. आजवर दोन कोटी जीवजंतूंचं बारसं झालं आहे आणि अजून ह्याच्या काही पट बाकी
आहेत!
दोन प्राणी हे एकाच
प्रजातीचे आहेत हे कसं ठरवलं जातं? नर-मादी त्यांच्या बीजपेशींचे मिलन, आणि पुढे
जनन, असा मामला असेल तर काम सोप्पं आहे. ज्या प्राण्यांच्या नर-मादी मिलनातून
संतती प्राप्त होते ते एकाच प्रजातीचे समजले जातात. यातही काही काठावरची, धड ना
इकडे धड ना तिकडे, अशी मंडळी आहेत. घोडा आणि गाढव यांच्या संकरातून खेचर जन्माला
येतं, पण ते वांझ असतं. म्हणूनच संकर शक्य असूनही घोडा आणि गाढव वेगवेगळ्या
प्रजातीतील समजले जातात. घोडे आणि कुत्री मात्र सरळ सरळ दोन प्रजातींची आहेत. ते
मीलनाचा प्रयत्नही करत नाहीत आणि केलाच तर फलनिष्पत्ती शून्य असेल. अगदी वांझोटी
संततीही त्यांना होणार नाही. पण ‘अल्सेशियन’ आणि ‘लॅब्रेडॉर’ हे मात्र ‘कुत्रे’च
आहेत. दोन्हींचा संकर आणि संतती संभव आहे. होणारी संततीही पुढे प्रजोत्पादन करू
शकेल.
जीवशास्त्राने प्रत्येक
जीवाला एक शास्त्रीय नाव दिलेलं आहे. हे दोन लॅटिन शब्दांचं मिळून बनलेलं असतं आणि
छापताना तिरक्या टायपात छापलेलं असतं. तसा दंडक आहे. पहिला शब्द हा त्या
त्या जीवाची ‘जाती’ (Genus) दर्शवतो, आणि दुसरा ‘प्रजाती’ (Species). प्रजाती हा
जातीतला उपप्रकार आहे. म्हणजेच जाती हा अनेक प्रजातींचा समूह आहे. ह्यांची ही नावं
अगम्य वाटली तरी अर्थवाही असतात. माणसाचं
शास्त्रीय नाव आहे Homo sapiens (हुशार माणूस), हत्तीला म्हणायचं
Elephas maximus (मोठ्ठा हत्ती). ह्यात Homo,
Elphas ह्या जाती आहेत आणि sapiens,
maximus ह्या प्रजाती आहेत. वाघोबाला
म्हणायचं Panthera tigris. सिंह आहे Panthera leo, बिबट्या आहे Panthera pardus तर जग्वार आहे Panthera onca. आपल्या Homo या जातीतली
माणूस (Homo sapiens) ही एकमेव प्रजाती आज शिल्लक आहे.
होमो ईरेक्टस (Homo erectus) आणि होमो हॅबिलीस (Homo
habilis) हे आपल्या जातीचे, पण अन्य
प्रजातीचे जीव. एके काळी हे होते. आज नष्ट झाले आहेत. त्यांच्या अस्तित्वाचे
पुरावे आपल्याला जीवाष्मांच्या रूपात आढळतात. माणसासदृश अन्य जीवांचेही जीवाश्म
सापडतात. हे तर ‘होमो’ ह्या जातीतही धरता येत नाहीत. त्यांची ‘ऑस्ट्रेलोपीथेकस’
ही भिन्न जात आहे. Australopithecus africanus,
Australopithecus aferensis हे या दोन प्रजाती या जातीच्या. नावातल्या
‘ऑस्ट्रेलिया’चा सध्याच्या ऑस्ट्रेलिया देशाशी सुतराम संबंध नाहीये. ऑस्ट्रेलिया
म्हणजे ‘दाक्षिणात्य’. ऑस्ट्रेलिया देशाच्या नावाचं मूळ हे आहे.
अनेक मिळत्याजुळत्या
जातींची एक ‘फॅमिली’ (कुटुंब) बनते. ‘Felidae’ ही मार्जार फॅमिली.
ह्यात आहेत सिंह, बिबटे, चित्ते, वाघ आणि (वाघाची मावशी) मांजरे, वगैरे. अनेक फॅमिल्या
मिळून बनते एक ‘ऑर्डर’ (गण). कुत्रं, मांजर, अस्वल, मुंगूस, तरस हे सारे
कार्निव्होरा ह्या ‘ऑर्डर’चे प्राणी. ‘प्रायमेट’ ही सुद्धा एक ऑर्डरच आहे. यात ‘एप्स’
आहेत (आपण एप्सचा उपप्रकार म्ह्णून आहोत), माकडे आहेत, लेमूर माकडे आहेत. अनेक
ऑर्डरचा मिळून ‘क्लास’ (प्रगण) होतो. सर्व सस्तन प्राणी हे ‘मॅमेलीया’ ह्या
क्लासचे आहेत.
मूळ खोडाला काही
फांद्या, त्या फांद्यांना आणखी काही फांद्या, त्यांना आणखी काही... अशी ही एखाद्या
झाडासारखी रचना आहे. हा वंशवृक्षच आहे, सर्व जीवांचा. प्रत्येक फांदीच्या टोकाला
एक एक प्रजाती आहे. टोकापासून जाती, फॅमिली, ऑर्डर, क्लास अशा फांद्यांवरून खाली
खाली आपण ह्या वृक्षाच्या खोडापाशी पोहोचतो. हे खोड म्हणजे पृथ्वीवरचे सर्व सजीव.
फांद्याफांद्यांची
रचना ही झपाट्यानी वाढत जाते. थोड्याश्याच फाटाफुटीनंतर प्रचंड फांद्या तयार होतात.
उत्क्रांती हा असाच फांद्याफुटीचा खेळ आहे. डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ ह्या
जगप्रसिद्ध पुस्तकात एकच चित्रं होतं, फांद्या फुटलेलं झाड. त्याच्या नोंदवहीतही
त्यानी असंच चित्रं काढलं होतं आणि वर लिहीलं होतं, ‘मला असं वाटतं...’. काय
म्हणायचं होतं त्याला? घरातल्या पोरांच्या गोंगाटामुळे त्याला अचानक मधेच थांबावं
लागलं का? का चित्रात जे दाखवलं, ते शब्दात कशाला लिहायचं, असं त्याला वाटलं?...
आपल्याला आता कधीच कळणार नाही. एका महान शास्त्रज्ञाची अप्रकाशित वही बघायला मिळते
एवढंच फक्त समाधान.
हा वंशवृक्ष निर्माण
झाला तो अगदी गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून. पण सोप करून सांगा म्हणाल तर.... कल्पना
करा युगायुगांपूर्वी एका प्रजातीपासून दोन भिन्न प्रजाती निर्माण झाल्या. दोनाच्या
चार, चाराच्या आठ, मग १६, ३२, ६४, १२८, २५६, ५१२...! पाहिलंत अगदी फटाफट तुम्ही
कोटी प्रजाती पर्यंत पोहोचाल. हे सगळं फटाफट वगैरे ठीक आहे, पण मुळात एकाच्या दोन
प्रजाती निर्माण व्हाव्यातच का? एका भाषेपासून जशा अनेक भाषा निर्माण होतात, तसंच
काहीसं हे आहे. म्हणजे कसं ते पाहूया.
दूर दूर जाताना:
नव्या नव्या भाषा आणि प्रजाती जन्मतात कशा?
बॅबेलच्या मनोऱ्याची गोष्ट जरी खरी नसली तरी इतक्या विविध भाषा का आणि कशा, ह्याचा शोध उद्बोधक आहे. साधारण सारख्या भाषांची मिळून एक भाषिक फॅमिली निर्माण होते. हिंदी, मराठी, बंगाली गुजराथी ह्या जशा भाषा भगिनी आहेत, तशाच स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज, फ्रेंच ह्याही आहेत. ह्या युरोपीय भाषांना रोमान्स भाषा म्हटलं जातं. ‘तो’ रोमान्स नाही, रोमन लोकांच्या भाषेतून उगम पावलेल्या म्हणून ह्या रोमान्स भाषा. प्रेमाला ह्या भाषांमध्ये, ‘ती आमो’, ‘अमोते’, ‘ता आमी’, ‘जे तिमी’ असे शब्द आहेत. स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये, ‘ते आमो’ असा एकच शब्द आहे.
केनिया, युगांडा
अथवा टांझानियात प्रेमात पडाल तर स्वाहीली भाषेत म्हणाल, ‘नाकुपेंडा’. मोझांबिक,
झांबिया किंवा मालावीत (बालपणी मी मलावीतच होतो) ‘न्डीमकूकोंडा’, म्हणजे निस्सीम प्रेम.
दक्षिण आफ्रिकेत बांटू टोळ्यांच्या भाषेत ‘न्डीनोकुडा’, ‘न्डीयाकुथंडा’ किंवा झुलू
भाषेत ‘न्गीयाकुथंडा’ म्हणजे निरतिशय प्रेम. बांटूंची भाषा ही रोमान्स भाषांपेक्षा
खूपच भिन्न आहे आणि ही दोन्ही भाषाकुले भारतीय भाषा कुळापेक्षा भिन्न आहेत. भाषेसाठी
जसा आपण घराणं, कुटुंब, कुल ह्या अर्थी शब्द वापरतो तसाच तो आपण सजीवांच्या
वर्गीकरणासाठीही वापरतो. ह्या लेखकाचे जसे डॉकिन्स कुल किंवा भाषांतरकाराचे जसे अभ्यंकर
कूळ तसेच मार्जारकूळ, श्वानकूळ वगैरे.
शतकानुशतके भाषांचा
प्रवाह कसा कसा वहात आणि बदलत गेला ह्याची सहज कल्पना करता येते आपल्याला.
कोकणातला माणूस हा विदर्भातल्या माणसापेक्षा वेगळीच मराठी बोलतो. एवढंच कशाला,
आजोबांची भाषा नातवाला काहीशी परकी वाटते. दोन पिढ्यांचंच हे अंतर पण ‘भाषां-तर’
केवढं तरी.
वर्षत सकळ मंगळीI ईश्वरनिष्ठांची
मांदियाळीI
अनवरत भूमंडळीI भेटतु
भूताII
हे पंचवीस-तीस पिढयांपूर्वी
लिहीलं गेलेलं ‘पसायदान’ समजावून घ्यायला, आपल्याला
कोणाची तरी मदत घ्यावी लागते. एका मुलानी तर मला छातीठोकपणे सांगितलं होतं की हे
मराठी नाहीच हे संस्कृत आहे! इतकं ते आपल्याला अ-मराठी वाटतं.
थोडक्यात भाषा ही
प्रवाही असते. ती बदलत रहाते. असं म्हणतात की दर बारा मैलावर भाषा बदलते. त्यात
अगदी स्थानिक असे काही शब्द, संदर्भ येतात. वेगवेगळ्या ठिकाणी तीच भाषा कमी अधिक
बदलत रहाते. शब्द बदलतात तसे हेल बदलतात, उच्चार बदलतात. ‘पुलं’च्या ‘ती फुलराणी’
या नाटकाच्या पहिल्याच प्रसंगात, एक भाषातज्ञ निव्वळ लोकांच्या बोलण्यावरून
त्यांची गावं ओळखतो आणि सगळ्यांना चकित करून सोडतो. मराठीत कोल्हापुरी, कोकणी, अहिराणी,
वैदर्भी, पुणेरी अशा बोली आहेतच. त्यातही एखादा पक्का कोकण्या, समोरचा माणूस हा
मालवणचा का महाडचा हेही निव्वळ हेलावरून ओळखू शकेल.
सुरवातीला एकच भाषा
बोलणाऱ्या समूहांचा शतकानुशतके जर संपर्कच झाला नाही तर? रेडीओ आणि फोन नव्हते
तेंव्हा असं अगदी सहज व्हायचं. आपापल्या ठिकाणी ह्या भाषा इतक्या बदलतील, इतक्या
बदलतील, की पुन्हा भेटल्यावर त्यांना एकमेकांच्या भाषा अगम्य असतील. दोन स्वतंत्र
भाषा निर्माण झाल्या असतील. सजीवांच्या वंशवृक्षाप्रमाणे भाषांचाही वंशवृक्ष काढता
येतो.
भौगोलिक अंतराने आणि
कालांतराने भाषा जशा बदलतात तसेच सजीवही बदलतात. आधी सारखे असणारे कालांतराने
एकमेकाला पारखे होतात. अगदी भिन्न भिन्न होतात. का? ‘का?’चं उत्तर पुढे येईलच, आधी
‘कसं?’ ते पाहू या. भाषांमध्ये शब्द असतात तर सजीवांमध्ये डीएनए, आणि डीएनए पासून
बनलेले जनुके (जीन्स). (अनेक जनुकांचा समुच्चय म्हणजे गुणसूत्रे.) दोन बीजपेशींच्या
मिलनातून जेव्हा पुनरुत्पादन घडतं तेव्हा ह्या डीएनएची सरमिसळ होते. एखादी झुंड, टोळी,
थवा, कळप, समूह स्थलांतर करतो, दुसऱ्या प्रदेशातील स्थानिक जीवांशी संकर साधतो (उदाः
मद्राशीने केला मराठी भ्रतार) तेव्हाही हा दोन भिन्न जनुक (जीन्स) संग्रहांचा
संयोग असतो. भाषांसारखीच या टोळीतली जनुके त्या टोळीत मिसळतात. भाषा जशी प्रवाही
असते तशीच जनुकेही प्रवाही असतात. त्यात छोटे-छोटे, थोडे-थोडे बदल होत असतात.
एकाच प्रजातीतील दोन
समूहांचा एकमेकांशी संपर्कच आला नाही, तर दोन्ही समूह, त्यांच्यात पिढ्यांपिढ्या होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे
हळूहळू परस्परांपेक्षा भिन्न दिसायला लागतील (दोन बोली भाषा निर्माण होतील). काही
काळानी हे बदल इतके टोकाचे असतील की ह्या समूहाचे डीएनए आता एकत्र येऊ शकणार नाहीत.
ह्या दोन समूहात आता संकर शक्य होणार नाही. पुनरुत्पादन शक्य होणार नाही. (परस्परांची
भाषा त्यांना समजणार नाही. संवाद बंद होईल.) मुळात एकच असलेला समूह दोन वेगवेगळ्या
प्रजातीमध्ये विभागला जाईल. (दोन भिन्न भाषा निर्माण होतील.) ही झाली टोकाची परिस्थिती.
काही वेळा हे बदल थोडेसेच असतील. अशा प्रजातींमध्ये संकर जरी शक्य झाला तरी संतती
वांझ असेल. यापूर्वी आपण खेचराचं उदाहरण पाहीलंच आहे.
भाषाशास्त्रात आणि
जीवशास्त्रात एक महत्वाचा फरक मात्र आहे. भाषा या सर्व वेळ अन्य भाषातून शब्द आयात
करत असतात. इंग्रजीचा आणि इंग्रजांचा जगभर संपर्क आला. त्यांच्या भाषेत असे
कितीतरी शब्द सांगावेत; शाम्पू (हिंदी), आईसबर्ग
(नॉर्वेजिअन), बंगलो (बंगाली). मराठीत, संस्कृत (इतिःश्री), फारसी (नक्कल,
दस्त), कानडी (सरसं), इंग्लिश (उदाहरणांची गरज नाही) असे किती तरी परके शब्द सांगता
येतील. सजीव मात्र एकदा काडीमोड घेतला की पुन्हा मूळ प्रजातीच्या डीएनए कडून
काहीही उचलेगिरी करू शकत नाहीत. बॅक्टेरीयाची बात थोडी निराळी आहे, पण त्यांच्या
भानगडीत सध्या नको पडायला, आपण सध्या फक्त प्राण्यांचा विचार करू.
वियोग म्हणजेच प्रजाती
निर्मितीचा योग
एका
समूहाची ताटातूट झाल्यावर निर्माण होणाऱ्या दोन्ही समुहातील भाषा आपापल्या ठिकाणी,
स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे, बदलत रहातात. तसंच दोन प्रजातींची
ताटातूट झाली तरी दोन्ही ठिकाणी डीएनएतले बदल होतंच रहातात. आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू,
वेगवेगळ्या प्रकारे, बदल घडत रहातात. ही ताटातूट अनेक कारणानी होऊ शकते. समुद्र हे
अगदी सहज समजण्यासारखं उदाहरण आहे. दोन शेजारी बेटांवर एकाच प्रजातीचे पक्षी असतील
तरी ते आता क्वचितच भेटतील. त्यांच्यात मिलन आणखी क्वचित होईल. मग त्यांच्यातील
जनुकीय बदल, आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे, घडत
रहातील. पुरेसा फरक पडला की मूळ प्रजातीशी संकर अशक्य होईल. एक नवीच प्रजाती निर्माण
झाली असेल. नव्या प्रजाती निर्माण होण्यात ही बेटं मोठी महत्वाची ठरतात. पण इथे ‘बेट’
म्हणजे पाण्यानी वेढलेली जमीन असा संकुचित अर्थ घेण्याची गरज नाही. एखाद्या ओअॅसीस
मध्ये तगलेल्या बेडकांसाठी ओअॅसीस हे वाळूच्या समुद्रातलं ‘बेट’च आहे. ओअॅसीस मधे
बेडूक जमात फोफाऊ शकते पण वाळवंट ओलांडून जाणं अशक्य. एखाद्या माशांच्या पोटजातीसाठी
‘तळं’ हे एक बेटच आहे. नवभाषांच्या निर्मितीसाठी आणि नवप्रजातींच्या निर्मितीसाठी
‘बेटं’ मोठी महत्वाची ठरतात, आवश्यक ठरतात, नव्हे अत्यावश्यक ठरतात. भाषा असो की
प्राणी ताटातूट महत्वाची. ताटातूट झाली की दोन्ही भाषा/प्राणी आपापल्या ठिकाणी,
स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे, बदलत रहातात. अशा बेटाबेटांवर शब्दसंकर
थांबतो. स्थानिक बोली भाषा तयार होतात. ही भाषानिर्मितीची प्रथमावस्था. अशा
बेटाबेटांवर जनुकांची सरमिसळ थांबते, जनुक प्रवाह थांबतो. स्थानिक वाण निर्माण
होतात. स्थानिक वाण म्हणजे प्रजातीनिर्मितीची प्रथमावस्था. त्या अमक्या गावचा
तांदूळ अगदी चविष्ट, अमक्या भागातले रायवळ सुद्धा हापूस इतके गोड, असे संवाद झडतात
ते यामुळेच.
दुसरा महत्वाचा
मुद्दा म्हणजे ह्या प्रजाती दरवेळी कायमच्या दूर झाल्या पाहिजेत असं नाही.
एखाद्यावेळी मूळ प्रजातीशी संपर्कही येईल, संकरही होईल. पण क्वचित होणाऱ्या ह्या
सरमिसळीनी फार फरक पडत नाही.
कॅरीबीयन
द्वीपसमूहामधील अन्गुइल्ला बेटांवर ४ ऑक्टोबर १९९५ रोजी काही ओंडके, झावळ्या, लाटांबरोबर
किनाऱ्याला लागले. या तराफ्यावर स्वार झालेले १५-२० हिरवे इगुआना जातीचे सरडेही
आले. अन्गुइल्लावर हिरवे इगुआना कधीही नव्हते. सुमारे २५० किमी अंतरावरील ग्वादेलूप
बेटांवरून हे पाहुणे आले असावेत. आधीच्या महिन्यात दोन जबरदस्त वादळांनी कॅरीबीयन
बेटांना झोडपून काढलं होतं. किनाऱ्यावरचे अनेक ताड आणि माड वादळामुळे पाण्यात पडले
होते. त्यातल्याच कुठल्याशा झाडावरचे हे रहिवासी, मोठ्या खडतर प्रवासानंतर अखेर
किनाऱ्याला लागले होते. अन्गुइल्ला हेच मग त्याचं नवं घर बनलं. इथेच ते जुगले,
फळले, प्रसवले आणि फोफावले.
तिथल्या मच्छीमारांच्या
डोळ्यादेखत हे घडलं म्हणून हे आपल्याला कळलं. पण मुळात ग्वादेलूप बेटांवरही हे
सरडे, शेकडो वर्षापूर्वी, असेच कुठल्या ओंडक्याबरोबर आले असतील. ग्वादेलूपचीच कथा
गॅलापेगॉस बेटांनाही लागू आहे. तिथेही इगुआना आहेत. ते ही असेच वादळवाऱ्या बरोबर
कुठल्याशा झावळीवर, ओंडक्यावर असे स्वार होऊन आले असतील. या साऱ्या उहापोहात गॅलापेगॉसचं स्मरण हवंच हवं. का?
कारण डार्विनच्या पदस्पर्शानी
पुनित झालेली हीच ती जगप्रसिद्ध बेटं. ‘बीगल’ जहाजावरून एका मोहिमेबरोबर, १८३५
साली डार्विन इथे आला होता. इथलं जैववैविध्य पाहून त्याला उत्क्रांतीची कल्पना
सुचली. दक्षिण अमेरिकेपासून १००० कि.मी.वर असलेला ज्वालामुखीजन्य बेटांचा, हा विषुववृत्तीय
द्वीपकल्प. ही बेटं तयार झाली काही कोटी वर्षापूर्वी. पृथ्वीचं वय विचारात घेता, अगदी
तरूण आहेत ही बेटं. समुद्र तळाशी असलेल्या ज्वालामुखीच्या लाव्हाचे पाण्यावर डोकावणारे
डोंगर म्हणजे ही बेटं. थेट समुद्रात उगवल्यामुळे आणि ज्वालामुखीजन्य असल्यामुळे
मूलतः इथे काही सजीवसृष्टी नव्हतीच. म्हणजेच इथे असलेले सर्व सजीव हे दक्षिण
अमेरिकेतून पोहत तरी आले, किंवा उडत तरी, किंवा तरंगत तरी. समुद्रातल्या प्रवाहांबरोबर,
वादळ वाऱ्यासंगे, लाटांच्या पाठीवर तरंगत्या ओंडक्यांबरोबर, कर्मधर्मसंयोगानी जे
एकदा इथे पोहोचले ते इथलेच झाले. ही बेटं
तशी जवळ जवळ आहेत. त्यामुळे या बेटावरून त्या बेटावर येणं जाणं, अधूनमधून घडत
असणार. पण क्वचित. दरम्यान या प्रजाती एकमेकांसापेक्ष बदलत बदलत एकमेकाला परक्या
परक्या ठरत जाणार.
गॅलापागॉस बेटांवर
इगुआना नेमके कधी आले ते माहित नाही. अन्गुइल्लावर आले तसेच ते एखाद्या ओंडक्याच्या
पाठीवर स्वार होऊन आले असतील. सेंट क्रीस्टोबाल हे आज मुख्यभूमीच्या सगळ्यात जवळच
बेट. फार फार पूर्वी मुख्य भूमीजवळ आणखीही बेटं होती. ती आता समुद्रार्पण झाली
आहेत. त्या बेटांवर हे इगुआना आधी आले असतील, मग पायरी पायरीने पुढे.
कसे का असेनात, जे आले
ते जगले, तगले, जुगले, फळले, प्रसवले, वाढले; कारण नव्या वातावरणाशी त्यांनी
जुळवून घेतलं. १९९५ साली अन्गुइल्ला बेटांवर जशी यांच्या भाईबंधाना संधी मिळाली,
तसंच इथे अनेक शतकांपूर्वी घडलं होतं. मुख्य भूमीवरील विषुववृत्तीय जंगलातून आलेले
हे सरडे, आता ओसाड अशा ज्वालामुखीजन्य बेटांवर स्थिरावले. पिढ्यांपिढ्या ज्या
सरड्यातील (जनुकीय) बदल नव्या परिस्थितीला अनुकूल होते तेच सरडे टिकले, बाकीचे मेले.
जे टिकले त्यांनाच मुलंबाळं झाली, त्यांचेच गुण घेऊन पुढे पिढया निपजल्या. यामुळे
मुख्य भूमीवरील सरड्यांपेक्षा हे वेगळे झाले.
या द्वीपसमूहातील
सारी बेटं मुख्य भूमीपासून तुटलेली पण एकमेकांजवळ
आहेत. हे इगुआना जसे मुख्य भूमीपासून इथे पोहोचले, तसे आसपासच्या बेटांवर पोहोचतच
असतील. पण अधून मधून. शतकभरात एखाद्या वेळी. दरम्यान स्थानिक इगुआना हे बदलत
रहातात. शतकाशतकातून एखाद्या वेळी येणाऱ्या पाहुण्या इगुआनापेक्षा स्थानिक इगुआना
थोडे वेगळे असणार. कधी संकर आणि संतती शक्य होणार कधी होणार नाही. बेटाबेटांवर अशा
पद्धतीनी जनुकीय आयात-निर्यात होत राहिली. पण तरीही आज अखेर अशी स्थिती आहे की तिथे भूचर इगुआनाच्या
तीन प्रजाती आहेत. या खास इथे आणि फक्त इथेच आढळणाऱ्या. त्यांच्यात अर्थात संकर होत
नाही. कोनोलोफस पॅलीदस ही प्रजाती फक्त ‘सांता फे’या बेटावर आहे. कोनोलोफस
सबक्रिस्टा ही तीन बेटांवर आहे. आता या
तीन बेटांवरील कोनोलोफस सबक्रिस्टातही दृश्य फरक दिसायला लागलेले आहेत.
लवकरच आंतर-संकर शक्य होणार नाही आणि ह्या तीन स्वतंत्र प्रजाती ठरतील अशी चिन्हे
आहेत. इसाबेला बेटावरील निव्वळ उत्तर भागात कोनोलोफस मार्थी ही प्रजात
आढळते. इसाबेला ही पोर्तुगलची राजकन्या.
तिचंच नाव ह्या बेटाला दिलेलं आहे. हीच्याच लग्नात पोर्तुगीजांनी मुंबई बेट, भेट
म्हणून ब्रिटिशांना दिलं होतं.
बेटं याचा
उत्क्रांतीशास्त्रातला अर्थ जरा निराळा आहे हे आपण आधी बघितलं. ऑअॅसीस हेही एक बेट
आहे आणि तळं हेही एक बेट आहे. ह्या इझाबेला बेटावर पाच ज्वालामुखी आहेत. या
ज्वालामुखीच्या उंचच ऊंच टेंगळांभोवती घनदाट झाडी आहे आणि त्या पलीकडे
समुद्रापर्यंत ओसाड वाळवंट. ज्वालामुखी भोवतीचा प्रदेश हा एका अर्थी एक बेटच आहे.
कारण या झाडीत रहाणाऱ्या पशुपक्ष्यांना वाळवंट ओलांडून दुसऱ्या झाडोऱ्यात पोहोचणंच
दुष्कर. इझाबेला ह्या एकाच बेटावर ही पाच बेटं वसलेली आहेत जणू. त्यामुळे इथले
इगुआना खास ‘इथले’ आहेत. इथली महाकाय कासवंही खास ‘इथली’च आहेत. एका बेटावरून
(ज्वालामुखीच्या उतारावरून) दुसऱ्या बेटावर (ज्वालामुखीच्या उतारावर) जाणं ह्यांना
शक्य नाही कारण वाटेत जीवघेणं वाळवंट पसरलेलं आहे.
भौगोलिक (किंवा
अन्यही) कारणानी एकांतवास पदरी आला की उत्क्रांतीच्या दृष्टीनी त्या त्या
प्रजातीला नवीन फांदी फुटू लागते. एकदा का मूळ प्रजाती बरोबर संकर अशक्य झाला की
नवी प्रजाती उद्भवली असं मानलं जातं. यानंतर जरी दोन्ही गट पुन्हा एकत्र आले तरी
काही फरक पडत नाही. त्यांचे डीएनए आता मिसळू शकत नाहीत. प्राणीमात्रांचे समूह असे विभागले
गेल्यामुळेच नव्या नव्या प्रजाती निपजल्या आहेत. गोगलगाईचे आणि गाईचे किंवा एकूणच
पृष्ठवंशीय प्राण्यांचे, (त्यात आपणही आलो) पूर्वज एकच होते असं मी म्हणतो ते
यामुळे.
कोणे एकेकाळी गॅलापागॉसवरच्या
इगुआना जमातीला एक वैशिष्ठ्यपूर्ण फांदी फुटली. अभ्यासातून असं दिसतं की इथल्या
भूचर इगुआनाच्या काही पूर्वजांनी भूवनस्पतीऐवजी किनाऱ्यावर राहून पाणवनस्पती खायला
सुरुवात केली. हे हळूहळू पोहायला शिकले आणि आज समुद्रकिनारी अधिवास असणारी समुद्र
इगुआना ही स्वतंत्र प्रजाती आपल्याला तिथे दिसते. पुन्हा एकदा ही खास इथलीच
प्रजाती. गॅलापागॉस वगळता अन्यत्र कुठेही ही आढळत नाही.
इथल्या किंवा
जगातल्या कुठल्याही भू इगुआनापेक्षा हे सर्वस्वी भिन्न आहेत. समुद्रात निभावून
न्यायला यांच्यात अनेकानेक सोयी निर्माण झाल्या आहेत. इगुआना वंशाच्या आज
भू-इगुआना आणि समुद्र-इगुआना अशा दोन फांद्या आपल्याला दिसतात. या फांद्या जिथून
फुटल्या, ती इगुआनाची मूळ जाती मात्र आज नामशेष झाली आहे किंवा या नव्या
प्रजातींच्या (कोनोलोफस) रूपानीच शेष आहे. समुद्र इगुआनातही बेटागणिक बारिक
बारिक फरक दिसतात. वेगवेगळी स्थानिक वाणं
दिसतात. पण अजून तरी स्वतंत्र प्रजाती म्हणावेत असे ते नाहीत. पण त्या
दिशेने प्रवास चालू आहे. काही काळानी ही वाणं इतकी बदलतील की परस्परांशी संकर
असंभव ठरेल. मग ती नवीन प्रजाती म्हणून मिरवू लागतील.
जी कथा इगुआनाची तीच
तिथल्या महाकाय कासवांची, पालींची, उड्डाण विसरलेल्या कोर्मोरांटची, मॉकिंगबर्डची,
फींच पक्ष्यांची आणि कित्येक वनस्पतींची देखील. हीच कथा जगभराची. गॅलापेगॉस ही
बेटं आणि त्यावरील जीवशास्त्रीय बेटं; ज्वालामुखी, जंगलं, वाळवंटं हे निव्वळ
समजायला सोपं, उमजायला उचित, असं एक उदाहरण मात्र. ‘जीवशास्त्रीय बेटं’; यात उंचच
ऊंच गिरिशिखरे आहेत, तळी आहेत, ओअॅसीस आहेत, ही नव्या नव्या प्रजातींना जन्म
देतात. नदी म्हणजेही एखाद्या प्रदेशावरची ओढलेली लक्ष्मणरेखाच. ज्यांना ही ओलांडणं
अशक्य असे प्राणीमात्र दोन्ही तटांवर, वेगवेगळ्या दिशेनी, बदलत रहातील. उत्क्रांत
होत रहातील. कालांतराने नव्या बोलीतून नव्या भाषेचा जन्म व्हावा, तसा नव्या
प्रजातीचा जन्म झाला असेल. कधी एखादा गिरीराज लक्ष्मण रेषेच्या रूपांनी उभा ठाकेल
तर कधी प्रचंड अंतर, अ-पार अंतर, हीच लक्ष्मणरेखा ठरेल. स्पेनपासून चीनपर्यंत
एकमेकांशी संग करणारे, संकर साधणारे उंदीर आहेत. पण तरीही स्पेनच्या उंदराचा, चीनी
उंदरीशी संबंध शक्य नाही. स्पेनमधील उंदीर आणि चीनी उंदीर मग वेगवेगळ्या दिशांनी
उत्क्रांत होणे शक्य आहे.
गॅलापेगॉसवरच्या
भूचर इगुआनाच्या तीन प्रजाती निव्वळ काही हजार वर्षांपुर्वी विलग प्रजाती म्हणून
अस्तित्वात आल्या. शे-पाचशे कोटी वर्षांच्या कालखंडात, एकाच मूळ जीवाचे वंशज, अविश्वसनीयरित्या
भिन्न भिन्न निपजतात. इतके की झुरळ आणि मगर हे प्राणी मूलतः एकाच पूर्वजाचे वंशज
आहेत, ह्यावर आपला विश्वास बसत नाही. कोणे एके काळी, आजच्या झुरळांच्या आज्जाच्या,
आज्जच्या, आज्याचा...आजा (आणि आजी); आणि आजच्या मगरींच्या आजीच्या, आजीच्या, आजीची,
आजी... (आणि आजा); हे एकाच प्रजातीचे होते! हा कोणता काळ होता? काही अब्ज वर्षांपूर्वीचा
हा काळ. त्या काळी अशी कोणती लक्ष्मणरेखा होती हे आज सांगणं अशक्य आहे. बहुदा
समुद्राचंच काम हे. त्या कळीकाळी कोणी रहातच
नव्हतं जमिनीवर मुळी. सर्व जीव निव्वळ पाण्यात. कदाचित हे आदी-पूर्वज एखाद्या
प्रवाळाच्या बेटात लहानाचे मोठे झाले असतील. समुद्राच्या प्रवाहाबरोबर अन्य
एखाद्या प्रवाळ बेटावर पोहोचले असतील आणि मग तिथलेच होऊन जगले असतील, जुगले असतील,
फळले असतील, प्रसवले असतील, वाढले असतील आणि फोफावले असतील. मधला प्रचंड मोकळा
समुद्र त्यांना अ-पार ठरला असेल.
आधीच्या प्रकरणात
म्ह्टल्याप्रमाणे माणूस आणि चींम्पान्झीचे आजोबा सहा कोटी वर्षापूर्वीचे. या
आजोबांची टोळी फुटली ती बहुधा आफ्रिकेच्या ‘रिफ्ट व्हॅली’मुळे. या प्रचंड दरीच्या
पूर्वेकडील टोळ्यांत मानव उत्क्रांत झाला आणि पश्चिमेकडे चिंम्पान्झी. हे चींम्पान्झीही
पुढे दोन पातीत विभागले गेले, एका पातीतून उत्क्रांत झाले आजचे चिंम्पान्झी आणि
दुसऱ्या पातीचे झाले ‘पिग्मी चिम्पान्झी’ (‘बोनोबो’ म्हणतात यांना). ह्या विभाजनात
कोंगो नदीनी लक्ष्मणरेषेचं काम केलं.
सगळ्याच्या सगळ्या सस्तन
प्राण्यांचा आदीपूर्वज १८५ कोटी वर्षांपुर्वी या भूतली वावरत होता. या आदीपूर्वजाचे
आजचे वंशज म्हणजे २३१ प्रकारचे मांसभक्षक (Carnivores. कुत्री, मांजर, मुंगुस,
अस्वल.), २००० प्रकारचे उंदीर (Rodents. कृदंत), ८८ तऱ्हेचे देवमासे, डॉल्फिन
वगैरे, १९६ विविध तृणभक्षक (गायी, हरण, डुक्कर, शेळ्या), अश्वकुलातील १६ प्राणी
(घोडे, झेब्रे, गेंडे), ८७ विविध ससे, ९७७ वटवाघळे, ६८ प्रकारचे कांगारू, १८
प्रकारचे एप (यात अर्थात माणूसही आला) आणि हे सारे घडता घडता वाटेत नष्ट झालेल्या
अक्षरशः असंख्य प्रजाती!
निवड आणि जगणे
ह्या
प्रकरणाच्या सांगतेला हीच कथा जरा वेगळ्या
तऱ्हेनी सांगतो. जनुक प्रवाहाचा मी उल्लेख केलाच आहे. ‘जनुकीय काला’ अशीही एक
संकल्पना आहे. गोकुळाष्टमीला चार घरून गोळा करून, दही, लाह्या, लोणचं, शेंगदाणे,
असं काय काय घालून गोपाळकाला केला जातो. सगळे पदार्थ ढवळून पदार्थांचं चांगलं
मिश्रण केलं जातं. ‘जनुकीय (गोपाळ)काला’ हा असाच काहीसा असतो.
पुनरुत्पादनाच्या
वेळी आई आणि बाबांच्या जनुकांचीची सरमिसळ होते आणि दोघांची निम्मी निम्मी जनुके
पुढच्या पिढीत जातात. तुमच्या आईबाबांच्यात, तुमच्या आजी आजोबांची निम्मी निम्मी
जनुके एकत्र आली होती. म्हणजे तुमच्या आईवडीलांच्यात ह्या चार व्यक्तींच्या
जनुकांची सरमिसळ झाली होती. हाच न्याय आपल्याला कोटी कोटी वर्ष जुन्या पूर्वजांनाही
लावता येईल. ह्या लंब्या वाटचालीत, इतक्या वेळा ह्या जनुकांची सरमिसळ होते, की जणू
एखाद्या सदैव ढवळल्या जाणाऱ्या काल्यातून काही जनुके घेतली जात आहेत. हाच तो जनुक
काला.
‘प्रजाती’
म्हणजे आपापसात संकर आणि संतती शक्य असलेले प्राणी. एखाद्या प्रजातीतील एखादी
नरमादीची जोडी ही त्या प्रजातीच्या जनुकीय काल्यातील काही अंशमात्र बाळगून आहे.
अन्य अंश इतरांत आहे. हाच ठेवा ती पुढच्या पिढीला देते. त्या त्या प्रजातीच्या अशा
सर्व प्राण्यांच्यात मिळून जो जनुकीय ठेवा आहे त्यालाच म्हणायचं जनुकीय काला. त्या
प्रजातीतील प्रत्येक प्राण्यात ह्यातलाच काही अंश आढळणार. अर्थात अन्य कोणत्याही
प्रजातीच्या जनुकीय काल्यातील अंश यांना मिळणार नाही.
प्रत्येक प्रजातीचा
असा एक खास जनुकीय काला आहे. इतरांना या काल्यात वाटा नाही. एकाच प्रजातीचे दोन
जीव ह्या काल्यातील काही अंश बाळगून आहेत. एकाच प्रदेशातील दोन जीव दोन वेगळ्या
प्रजातीचे असतील, तर त्यांची रोज जरी भेट होत असली तरी त्यांच्या जनुकीय काल्याची
सरमिसळ अशक्य आहे. थोडक्यात जनुकीय काल्यात भागीदारी शक्य आहे अशाच जीवांना एका
प्रजातीचं समजलं जातं. जर एखादी प्रजाती दोन गटात विभागली गेली, तर आता हे दोन
काले बदलत बदलत एकमेकांपेक्षा वेगळे वेगळे बनत जातील. काही काळानी इतके वेगळे
होतील, की भेटले जरी, तरी संतती शक्य होणार नाही. त्यांच्या जनुकीय काल्यांची आता
सरमिसळ होणे नाही. कालांतराने हे दोन काले आणि त्यातून फाटाफूट होऊन निर्माण
झालेले इतर सर्व वंशज काले, इतके वेगळे
वेगळे होतील, त्यातून इतक्या भिन्न भिन्न प्रकारचे जीव निपजतील, की ह्या साऱ्यांचं
गोत्र एकच होतं, ह्यावर आपला विश्वास बसणार नाही. पण जीवशास्त्र सांगतं की अगदी
माणूस आणि झुरळही अंतिमतः सगोत्र आहेत.
उत्क्रांती
म्हणजे जनुकीय काल्यातील बदल. ह्या काल्यातील काही जनुकांची संख्या वाढेल, काहींची
कमी होईल. नेहमी आढळणारी जनुकं कमी कमी होत, कदाचित दिसेनाशी होतील. दुर्मिळ जनुके,
सार्वत्रिक होतील. परिणामी या प्रजातींचं रंग, रूप, आकार, उकार, बोलणं, चालणं,
वागणं बदलत राहील. जनुकीय काल्यातील ह्या बदलांमुळे उत्क्रांती होते.
पण
हा जनुकीय काला बदलतो तरी का? खरंतरं बदलला नाही तर ते आश्चर्य ठरेल. अनादी
काळाच्या अनंत ओघात हा कालाही बदलत रहातो. भाषेत जसे बदल होतात, तसंच हे. ‘संपुष्ट’,
‘कळकणे’ हे शब्द आता कालबाह्य झाले आहेत आणि ‘शूटर’, ‘गुळ काढणे’, ‘भावना पोचल्या’
हे नवे वाक्प्रचार आता प्रचलित आहेत.
जनुकीय
काले प्रवाही असतात. कालप्रवाहात ताटातूट झाली तर जनुकीय काले एकदुसऱ्याला परके
होतात, भाषेसारखेच अगम्य होतात, हे आपण पाहिलं.
भाषेसारखेच जनुकीय कालेही प्रवाही असतात. पण कोणते बदल टिकणार आणि कोणते
नाही, हे ठरतं ‘नैसगिक निवडीच्या’ तत्वानुसार. हीच चार्ल्स डार्विनची सर्वात
महत्वाची संकल्पना. नैसर्गिक निवडीशिवायही काल्यात बदल होत रहातील. पण या नैसर्गिक
निवडीमुळे जे जगू शकतात, तगू शकतात, असेच जीव वाचतात. अशाच सर्व जीवांचा जनुकीय
काला पुढच्या पिढीत संक्रमित होण्यासाठी उपलब्ध असतो. जनुकीय काला हा असा, जगण्यास
सहाय्यभूत ठरणाऱ्या जनुकांचा काला असतो. असे जनुक, की जे त्या जीवाला जगवतील,
निदान पुनरुत्पादनाची संधी प्राप्त होईपर्यंत जगवतील, असेच जनुक या काल्यात असतात.
ह्या जनुकात असे संदेश असतात की त्याचं पालन केल्यानी शरीर नावाची एक गुंतागुंतीची
रचना उभी रहाते. ह्या शरीरयंत्रणेद्वारेच ही जनुक पुढच्या पिढीत जाणार असतात.
जनुकीय काल्यात टिकून रहाणार असतात.
. जगायला
आणि जुगायला, फळायला आणि प्रसवायला हे जनुक कशी बरं साथ देतात? जनुकांच्या
संदेशानुसार पक्ष्यांत किंवा वटवाघळांत पंख निर्माण होतात. त्याशिवाय यांचं आणि
त्यांच्यातल्या जगणं अशक्यच. सिंहाचं चापल्य, अणकुचीदार दात आणि नखं, हरणाची
विद्युतगती, तिखट कान, तीक्ष्ण नजर ही सारी या जनुकांची कमाल. या गुणधर्मांमुळे
सिंहाच्या शरीरात सिंहाची जनुकं टिकून आहेत आणि हरणाच्या शरीरात हरणाची. नाकतोडा
गवतात लपून जातो ह्या गुणधर्मामुळे त्याच्यातील जनुकांना पिढ्यांपिढ्या पुढे पुढे
जाण्याची संधी मिळते.
बारकावे प्रजातीगणिक
बदलतील पण तत्व तेच आहे. येन केन प्रकारेण; जगणे, जुगणे, फळणे आणि प्रसवणे. आपली
जनुके पुढच्या पिढीत जावीत, पिढ्यांपिढया वहात रहावीत, जनुकीय काल्यात टिकून
रहावीत हे लक्ष्य. हा देह जरी पंचतत्वात विलीन झाला तरी, मरावे परी जनुकरूपी उरावे, याचसाठी आहे सारा अट्टाहास.
शरीर मर्त्य आहे जनुके अमर आहेत!
प्रत्येक
सजीव म्हणजे एक जनुकांचा ठेवा पुढे संक्रमित करणारं एक यंत्र आहे. अगदी तुम्हीसुद्धा.
-----------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment