प्रकरण ४
हे विश्व बनलंय कशाचं?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील
‘व्हॉट आर थिंग्स मेड ऑफ?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात
कणादमुनींनी वैशेषिक सूत्रात हे सारं जग अतीसूक्ष्म कणांपासून बनलं आहे आणि त्या
कणांची पुढे विभागणी शक्य नाही अशी कल्पना मांडली. अन्नाचा घास घेता घेता, आता
ह्याच्यापेक्षा बारीक बारीक असे कुठवर तुकडे करता येतील, असा विचार त्यांना सुचला
आणि त्यातून त्यांनी अविभाज्य अशा अणुची कल्पना मांडली. कणादमुनींसारखीच बारीक
बारीक कणांची कल्पना, डेमोक्रेटस या ग्रीक विचारवंतानीही मांडली आहे. आज ह्या
विश्वाचा सर्वात लहान घटक हा अणु (अॅटम) आहे असं आपण मानतो. कोणत्याही वस्तूच्या
अविभाज्य अशा कणाला त्यानीच अॅटम हे नाव दिलं. ग्रीक भाषेत टॉमोस म्हणजे तोडणे. जो
तोडता येत नाही तो अ-टॉमोस म्हणजे अॅटम! याशिवाय ही चराचर सृष्टी पंचमहाभूतांनी
(पृथ्वी, आप(जल), तेज(अग्नी), वायू, आकाश.) बनली आहे अशीही कल्पना आहे. आपल्या
प्रमाणेच चीनी आणि ग्रीक संस्कृतीतही याबद्दल काही कल्पना होत्या. त्यांच्याकडे
चार ‘एलिमेंट्स’ मानली जातात. (पृथ्वी, पाणी, अग्नी आणि हवा.)
खरंच, असं जर आपण एखादी
गोष्ट बारीक बारीक करत गेलो, तर कुठवर जाता येईल? विश्वाचा सर्वात लहान घटक कोणता?
हे विश्व बनलय तरी कशाचं?
प्राथमिक उत्तर आहे, हे
विश्व बनलय अणूंच. सोन्याचा अणु हा सोन्याचा सर्वात छोटा तुकडा. हा पुढे विभागला
तर आता त्यात सोन्याचे गुणधर्म रहाणार नाहीत. जी गोष्ट सोन्याची तीच लोहाची, आणि
इतरही मूलद्रव्यांची.
एकाच प्रकारच्या अणुंनी
बनलेल्या पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. लोह, तांबं, सोन. चांदी यासारखे धातू; ऑक्सिजन,
हायड्रोजन, नायट्रोजन यासारखे वायू ही मूलद्रव्य आहेत. मॉलीब्डीनम् हे अगदी दुर्मिळ
मूलद्रव्य आहे. इतकं की कदाचित तुम्ही हे नावही ऐकलं नसेल. पण ते दुर्मीळ आहे
इहलोकी, पृथ्वीवर. विश्वात इतरत्र ते विपुल प्रमाणात आढळतं. (असं कसं ते आठव्या
प्रकरणात येईल.) अशी सुमारे १०० मूलद्रव्ये आहेत. पैकी निसर्गतः ९० आढळतात. बाकीची
अगदी अल्प प्रमाणात, निव्वळ कृत्रिमरित्या निर्माण केलेली आहेत.
एकापेक्षा अधिक अणु एकत्र
येऊन रेणू बनतात. रेणूतील हे अणु एकाच मूलद्रव्याचे असतील वा अनेक विविध
मूलद्रव्यांचेही असू शकतील.
दोन (किंवा अधिक) वेगवेगळ्या
मूलद्रव्यांच्या अणुपासून जो रेणू बनतो, याला संयुग म्हणतात. उदाः पाणी. पाण्याचा
प्रत्येक रेणू हा ऑक्सीजनचा एक अणु आणि
हायड्रोजनचे दोन अणु यांच्या ‘संयुक्त विद्यमाने’ बनलेला आहे. ऑक्सिजन आणि
हायड्रोजन या मूलद्रव्यांपासून बनलेले पाणी हे संयुग आहे. पाण्याला म्हणतात H2O.
हे आहे पाण्याचं रासायनिक सूत्र. हायड्रोजनचे दोन अणु आणि ऑक्सिजनचा एक अणु, असे
मिळून पाण्याचा एक रेणू बनतो, असा याचा अर्थ. आणखीही तऱ्हेतऱ्हेचे अणु-रेणू एकत्र
येऊन संयुगे बनतात. आपल्या आसपास एकाच मूलद्रव्यांपेक्षा, अनेक मूलद्रव्यांपासून
बनलेले, ‘संयुगांनी’ बनलेले, पदार्थ जास्त आढळतात. फळांतली साखर(Fructose),
प्राण्यांची नखं (Keratin), अंड्याचा बलक (Albumin) म्हणजे विविध संयुगेच असतात. काही
रेणू अगदी साधेसेच असतात. पाण्याचंच पहाना. निव्वळ तीन अणूंपासून हा रेणू बनला
आहे. आपल्या शरिरात असलेले काही रेणू मात्र हजारो अणुंनी बनलेले असतात. या अणूंची,
एक विशिष्ठ अशी गुंतागुंतीची, त्रिमिती रचना साधलेली असते. ही रचना आणि त्यातील
घटक अणु मिळून, एक विशिष्ठ संयुग बनतं. त्याला त्याचे असे खास गुणधर्म प्राप्त
होतात.
रेणू हा दोन सारख्या
अणुंपासूनही बनू शकतो. उदाः हायड्रोजनचा रेणू. हा हायड्रोजनच्याच दोन अणूंनी
बनलेला आहे. रेणूतील जरी एकाच मूलद्रव्याचे असले तरी त्या रेणूत ते अणू जोडी
जोडीनी आहेत, का अणूंच त्रिकुट आहे, का चौकडी यावरही त्या रेणूचे गुणधर्म ठरतात.
ऑक्सिजचंच घ्या ना. एरवी हा वायू म्हणजे अणूच्या जोड्या-जोड्या. अणु-जोडगळीच्या
ऐवजी अणु-त्रिकुट असेल तर हा वायू ऑक्सिजन न रहाता ओझोन म्हणवला जातो. हाच तो
बहुचर्चित, पर्यावरणफेम ओझोन. अणु जरी ऑक्सीजनचे असले तरी ते एकटे असताना वेगळे
वागतात, दुक्कलीनी वेगळे आणि त्रिकुट बनवलं की आणखी वेगळे.
ओझोन हा एरवी प्राणघातक
आहे. पण वातावरणाच्या अगदी वरच्या थरात असेल, तर हा पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे
थोपवून धरतो. अतिनील किरणांच्या उन्हापासून आपल्याला सावली देणारी ओझोनची छत्रीच
धरलेली असते म्हणाना. अंटार्क्टिका खंडावर ह्या ओझोनच्या छत्रीचा थर फाटला आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियात सूर्यस्नान करणं हे धोक्याचं आहे. तिथे अतिनील किरणांचा
मारा खूप खूप जास्त आहे. जिथे आभाळ फाटलं तिथे ठिगळ कुठवर लावणार?
स्फटिक : अणु रेणूंची कवायत
हिरा हा कार्बनचा एक प्रचंड
मोठा स्फटिक असतो. यात कार्बनचे कोट्यवधी अणु विशिष्ठ पद्धतीनी रचलेले असतात.
सैनिकी संचलन असावं तशी ही खांद्याला खांदा लावून, प्रमाणबद्ध, शिस्तबद्ध रचना.
शिवाय इथे हे संचलन त्रिमितीत आहे हे
लक्षात असो द्यावे. माशांचा थवा जसा तसे हे. पण इथे अगदी छोट्यात छोटया हिऱ्यातही
जगातले सारे मासे, अधिक सारी माणसं जमेस धरूनही अधिक अणु असतात.
स्फटिकांत सगळेच अणु कवायत
करत असतात. त्यामुळे स्फटीकांना आकार प्राप्त होतो. स्फटिकचा अर्थच मुळी हा. काही
अणु वेगवेगळ्या प्रकारे कवायत करू शकतात.
स्फटिक म्हणजे अणूंची अतिशय
शिस्तबद्ध अशी रचना असते. स्फटिक म्हणताच आपल्या डोळ्यापुढे येतात, स्वच्छ, सुंदर,
पारदर्शक खडे. निवळशंख पाण्याचं वर्णनही
आपण स्फटिकासारखं स्वच्छ असं करतो. वास्तविक पहाता बहुतेक घनपदार्थ हे स्फटिकरूपीच
असतात. लोखंडही स्फटिकरुपीच असत. हिऱ्या सारखीच ह्याच्याही अणूंची विशिष्ठ रचना
असते. शिसं, अॅल्युमिनियम, सोनं, तांबं, हेही सारे स्फटिकच. ह्यांचे अणु एका
विशिष्ठ पद्धतीनी रचलेले आहेत. ह्याच रचनेची आवर्तनं या पदार्थात दिसतात. ग्रॅनाईट
किंवा वालुकाश्म (Sandstone) हे खडकही स्फटिकच आहेत. पण ह्यात एकाच एका प्रकारचे
नाही तर अनेक प्रकारचे स्फटिक आढळतात.
स्फटिकांची गिचमिड असते अगदी.
वाळूतही स्फटिक असतात. वाऱ्यानी,
उन्हापावसानी खडक झिजतात. वाळू म्हणजे खडकांचा भुगा. तेंव्हा तीही स्फटिकरूपच
असते. माती म्हणजे वाळूचा भुगा. माती, चिखल, दलदल, गाळ ह्यातही स्फटिक असतात.
समुद्राच्या, नदीच्या, तळ्याच्या तळाशी, वाळूचे, मातीचे, गाळाचे थरच्या थर साठतात.
वरच्या दाबानी जाम घट्ट होतात. इतके की पुन्हा खडक होतात त्यांचे. हेच ते स्तरीय
खडक. या वालूकाश्मात मुखत्वे क्वार्ट्झ आणि फेल्डस्पार हे स्फटिक असतात. पुळणीवर
जी पांढरी वाळू असते ती ही अशीच तयार झालेली असते. प्रवाळ, शंख, शिंपले म्हणजे
मुख्यत्वे कॅल्शीयम कार्बोनेट. यांचा लाटांनी पाडलेला कीस म्हणजे समुद्रकिनारीची
पांढरी वाळू. चुनखडीचा खडक म्हणजे म्हणजेही कॅल्शीयम कार्बोनेट.
शुद्ध सोन्यात फक्त सोन्याचे
किंवा हिऱ्यात फक्त कार्बनचे अणु शिस्तीत उभे असतात. पण एकाहून अधिक प्रकारचे अणु
आणि त्यांचे स्फटिक असू शकतात. मिठाचा स्फटिक हा सोडियम आणि क्लोरीन या दोन
अणूंच्या रचनेनी सिद्ध झाला आहे. इथे ‘अणु’ म्हणण्यापेक्षा त्यांना ‘आयन’ म्हणणं
योग्य आहे पण ह्या बारकाव्यात आत्ता नको शिरायला. मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड
(NaCl). प्रत्येक सोडियमला क्लोरीनच्या सहा अणुंचा काटकोनात शेजार लाभला आहे. पुढे,
मागे, दोन्ही बाजूला, वर आणि खाली. आणि प्रत्येक क्लोरीनच्या अणुलाही असाच सोडियमच्या
अणुंचा शेजार आहे. एकसमान चौकोनी चौकोनी ठोकळ्यांनी बनलेली ही मोठी इमारतच जणू. भिंगातून मिठाच्या दाण्याकडे पाहिलंत तर
तुम्हाला हे दाणे बरोब्बर चौकोनी ठोकळ्यांसारखेच दिसतील. खडकात, वाळूत, मातीत असे
अनेक प्रकार-प्रकारचे स्फटिक आहेत. विविध अणु, विविध रेणू, त्यांचे विविध आकार,
आणि यायोगे त्यांचे विविध गुणधर्म.
कार्बनचे अणु वेगवेगळ्या
तऱ्हांनी कवायत करू शकतात. त्यामुळे त्यांना अगदी भिन्न भिन्न गुणधर्म प्राप्त
होतात. कठीण असा हिरा म्हणजेही शुद्ध
कार्बनच आणि वंगण म्हणून वापरलं जातं अशा मऊ, मुलायम ग्राफाईटही शुद्ध कार्बनच. ही
सारी त्यांच्या स्फटिक रचनेची कमाल.
हिरा हा कार्बनचा एक
मोठ्ठाच्या मोठ्ठा रेणू आहे. यात कोट्यानुकोटी अणु अगदी शिस्तशीरपणे, खांद्याला
खांदा लावून खडे आहेत. हेही वर्णन तितकसं बरोबर नाही. हिऱ्यातले किंवा कुठल्याही
पदार्थातले अणु हे एकमेकाला अगदी खेटून खेटून असल्याचं ह्यातून ध्वनित होतं. हे
सोजीर खांद्याला खांदा लावून उभे नाहीत. त्यांच्या भोवतीच्या चार्जेसच्या
तेजोवलयामुळे ते एकमेकाला फार चिकटूच शकत नाहीत. काही ठरावीक अंतरावरच त्यांना उभं
रहावं लागतं. मधे बरीच जागा मोकळी असते. हिरा हा अर्थात घन पदार्थ आहे पण तरीही
त्यात मोकळी जागाच अधिक आहे! प्रत्यक्षात घन पदार्थ म्हणजे बरीचशी मोकळी जागाच
असते! आश्चर्य वाटलं ना? नंतर आपण हे समजावून घेऊया.
घन, वायु आणि द्रवरूप
पदार्थ आणि त्यातील रेणू.
घन पदार्थ असतात, तसेच वायुरूप आणि द्रवरूप पदार्थही असतात. वायूतील अणु/रेणू हे इकडे तिकडे
सैरावैरा पळत असतात. म्हणून तर कारखान्याच्या मळीचा वास मैलोंमैल पसरतो आणि
कोपऱ्यातल्या उदबत्तीचा सुवास खोलीभर दरवळतो. वायूतील अणु/रेणू अगदी सरळ रेषेत
इकडे तिकडे धावत असतात. समोरून कुणी आला
तरी साईड देणे वगैरे भानगड नाही. सरळ रेषेतच जायचं म्हटलं की लवकरच त्यांची
दुसऱ्या अणूशी टक्कर होते, किंवा ज्या काचपात्रात हा वायू आहे, त्याच्या बाजूवर हे
आदळतात. कॅरमच्या सोंगट्यांसारखे हे जिथे तिथे धडकून परत फिरतात. पुन्हा आपला सरळ
रेषेत प्रवास सुरु.
वायूवर दाब देऊन ते चेपता
येतात. घन पदार्थ असे चेपले जात नाहीत. एखाद्या इंजेक्शनच्या सिरींजचं तोंड बोटानी
दाबून मागून दट्टया दाबला की आतली हवा दाबली गेल्याचं स्पष्ट जाणवतं. ठराविक
प्रमाणापेक्षा जास्त पुढे दाबलाही जात नाही. दाबलेला दट्टया पुन्हा मागे उसळतो. ह्यालाच
दाब किंवा प्रेशर म्हणतात. दाब म्हणजे हवेचे सिरिंजमधले रेणू (नायट्रोजन, ऑक्सिजन
आणि काही वायू) हे त्या दट्टयावर आणि सिरींजवर आपटताहेत त्यांची एकत्रित शक्ती. दट्टया
अजिबात न हलवता समजा सिरींज मधली हवा तापवली तरी आतल्या अणु-रेणूंची हालचाल वाढेल,
प्रेशर वाढेल. आतलं प्रेशर वाढलं की दट्टया बाहेर ढकलला जाईल.
द्रव पदार्थ जवळजवळ हवेसारखेच
असतात. वारा वाहतो तसं पाणीही वहातं. पण द्रव पदार्थातील रेणू हे वायूपेक्षा एकमेकांच्या
खूप खूप जवळ असतात, धरून असतात एकमेकाला. वायूचं तसं नाही. वायू एखाद्या टाकीत
भरला, तर तो ती सर्व टाकी समान प्रमाणात व्यापून टाकेल. अगदी थोडा वायू जरी टाकीत
सोडला, तरी तो टाकी पूर्ण व्यापेल. जे टाकीचं घनफळ, तेच वायुचं घनफळ. द्रवांचं असं
नाही. पाणी समजा टाकीत सोडलं तर ते तळाशी बसेल. त्याच्या घनफळाइतकीच जागा ते
व्यापेल. पाण्याचं घनफळ ठरलेलं, टाकीचा आकार कसाही असो. वायुचं असं नाही. वायू तुझं
घनफळ केवढं? जेवढी टाकी असेल तेवढं!
द्रवात अणु-रेणू अगदी जवळ
जवळ आले तरी घन पदार्थात ते ह्यापेक्षाही खूप-खूप जवळ असतात. द्रवात हे
एकमेकांवरून सहज घसरून वहात जातात. पाणी वहातं. पेट्रोल वहातं. तसं घन पदार्थांचं
नाही. विटा, दागिने वहात नाहीत! ह्यांचा आकार ठरलेला, तो बदलत नाही. पण घन पदार्थ
दिसायला स्थिर दिसले तरी सूक्ष्म पातळीवर त्यांच्या रेणुंमध्ये सतत हालचाल चालू
असते. पण ही निव्वळ थरथर असते. ते स्वतःची जागा सोडून लांब जात नाहीत. तापमान वाढलं
की ही थरथर वाढते. आणखी वाढलं की हालचाल सुरु होते. वाढत जाते. हे तर आपण नेहमी
बघतो तेच आहे. तापमान वाढलं की बर्फाचं होतं
पाणी. आणखी वाढलं की पाण्याची होते वाफ.
काही द्रव पदार्थ अगदी घट्ट
असतात. मधासारखे किंवा घट्ट ऑईलसारखे. हे वहातात पण महा संथपणे. काही तर ‘घन’
म्हणावेत इतक्या हळू हलतात. स्फटिकरचना नसलेले हे दुर्मिळ ‘घन’पदार्थ.
घन, द्रव आणि वायू ही
पदार्थांची रूपे आहेत. आपल्या आसपास विविध पदार्थ विविध रूपात दिसतात. काही तर तीन्ही
रुपात दिसतात. पदार्थांच रूप मुख्यत्वे तापमानावर आणि दाबावर अवलंबून असतं. पृथ्वीवर
मिथेन (गोबरगॅस) हा वायुरूप आहे. पण शनीच्या, टायटन नामे उपग्रहावर, इतकी थंडी आहे
की हा गॅस तिथे द्रवरूपात आहे. गोबरगॅसचे समुद्र आहेत तिथे. आणखी थंड ग्रहावर
गोबरगॅसचे खडक असणंही शक्य आहे. पारा हा आपल्याला द्रव म्हणून माहित आहे. पण
टुंड्रा प्रदेशाच्या थंडीत पाऱ्याचा दगड व्हायला वेळ लागणार नाही. घनरूप लोखंडं
तापवलं तर त्याचा रस होतो. पुरेशी उष्णता दिली तर त्याही वाफही होईल. पृथ्वीच्या
पोटात खोल खोल इतकं उच्च तापमान आहे की तिथे लोहाचा (आणि निकेलचा) रसच आहे. कुणी
सांगावं, एखादा अतितप्त ग्रह असेलसुद्धा, त्याच्यावर लोखंडाच्या रसाचे सागर उसळत असतील
आणि यात सुखेनैव पोहणारे काही जीवही असतील.
अणूच्या अंतरंगात
कोणताही पदार्थ कापत कापत गेलं तर त्याचा सर्वात छोटा तुकडा
म्हणजे त्याचा अणु किंवा रेणू. कोणत्याही मूलद्रव्याचा सर्वात छोटा कण म्हणजे अणु.
कोणत्याही संयुगाचा सर्वात छोटा कण म्हणजे रेणू. इथून पुढे तुकडा पाडला की मूळ
पदार्थ शिल्लक रहात नाही, काहीतरी वेगळच रूप तयार होतं. पण अणु खरंच अविभाज्य आहे
का? आणि सोन्याचा अणू खरचं सोन्यासारखा दिसतो का? नाही. तो खरंतर कशा सारखाच दिसत
नाही. मुळात तो दिसतच नाही. अगदी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीही नाही. आणि अणु
अविभाज्य नाही. तो तोडता येतो. न्यूझीलँडच्या अर्नेस्ट रदरफर्डनी १९१९ सालीच हे
करून दाखवलंय. पण मग तो मूळ मूलद्रव्याचा अणु रहात नाही. शिवाय हे फार अवघड आहे.
यातून प्रचंड उर्जा बाहेर पडते. अणुबॉम्बनी माजवलेला हाहाकार आपल्याला माहितच आहे.
दिसत जरी नसला अणुचं अंतरंग
कसं आहे हे आपल्याला आता माहित झालं आहे. पहिल्या प्रकरणात आपण पाहिलं की एखादी
गोष्ट थेट दिसत जरी नसली तरी शास्त्रज्ञ अशा गोष्टींच्या रचनेबद्दल काही अंदाज
बांधतात. काही मॉडेल बनवतात. अणूचं मॉडेलही असंच, आत काय बरं असेल, कसं बरं असेल
याचा अंदाज आहे. पण म्हणजे अंदाजपंचे काहीपण ठोकून दिलेलं आहे असं नाही हं. ह्याची परीक्षा केली जाते. ह्या मॉडेलच्या
आधारे निरीक्षणं आणि आडाखे तपासले जातात. आजवर तरी सारं काही या मॉडेल मध्ये फिट्ट
बसणारं आहे. अनेक प्रयोग झाले, अनेक तपासण्या झाल्या, उलटतपासण्या झाल्या. या
मॉडेलनी या साऱ्याला समर्थपणे तोंड दिलं आहे. साऱ्या परीक्षणाला ते उतरलंय. म्हणून
हा अंदाज ग्राह्य मानला जातोय. निदान सध्यापुरता.
उद्या या मॉडेलद्वारे समजावून घेता येणार नाही असं काही तरी
आढळू शकेल. पूर्वीही जेव्हा जेव्हा असं आढळलेलं आहे, त्या त्या वेळी मॉडेलमध्ये सुधारणा
करण्यात आल्या आहेत. पुढेही होत रहातील... किंवा हे मॉडेल सर्वस्वी बाद ठरवून
नवीनच काहीतरी रचना कल्पावी लागेल. पुन्हा तपासावी लागेल. हे पुनरपि मॉडेलम्,
पुनरपि मॉडेलम्, पुनरपि सुधारणा पुनरपि मॉडेलम्; हेच विज्ञानाचं तत्व आहे, हीच ती
वैज्ञानिक पद्धत. विज्ञान सर्वज्ञतेचा दावा करत नाही. आजचं मॉडेल हे काही अंतिम
सत्य नाही. सध्याच्या ज्ञानावर आधारित, सत्याच्या अधिकाधिक निकट पोहोचण्याचा तो एक
प्रयत्न आहे. विज्ञानाची भूमिका, अशी अत्यंत विनम्र आहे. कोणत्याही भन्नाट
कवीकल्पनेपेक्षा, कोणत्याही सुरस आणि चमत्कारीक लोककथेपेक्षा, कोणत्याही
धर्मग्रंथातल्या कोणत्याही तथाकथित अपौरुषेय ज्ञानापेक्षा, आपल्या सृष्टीचं
यथातथ्य ज्ञान आणि सृष्टीचा कार्यकारणभाव समजावून घ्यायला, हीच पद्धत सर्वात
उपयुक्त ठरली आहे.
एकोणिसाव्या शतकाअखेरीस जे. जे. थॉमसन् या ब्रिटीश शास्त्रज्ञानी
सुचवलेलं अणूचं मॉडेल हे योग्य समजलं जात होतं. थॉमसन् यांचाच विद्यार्थी,
अर्नेस्ट रदरफर्ड यांनी नवंच मॉडेल मांडलं. (अणूच्या विभाजनाचीही किमया यांचीच आणि
जे. जे. थॉमसननंतर केंम्ब्रीज मध्ये फिजिक्सचं प्राध्यापकपदही याच रदरफर्डनी
भूषवलं.) थॉमसन् यांच्या मॉडेलमधील बऱ्याच त्रुटी त्यांच्या या शिष्योत्तमानी दूर
केल्या. रदरफर्डनी अणुची रचना ही मधोमध केंद्र आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन,
अशी कल्पिली. आपल्या सूर्य मालेसारखंच हे. प्रचंड मोठ्ठा सूर्य आणि त्याच्या भोवती
आपाआपल्या कक्षेत फिरणारे, सूर्याच्या मानानी कस्पटासमान असे ग्रह. पण ‘कक्षा’
म्हणजे चित्रात दाखवतात तशी काहीतरी गोल रेघ आहे आणि त्यानुसार हे इलेक्ट्रॉन फिरत
असतात असा तुमचा समज असेल, तर तो मात्र गैर आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे पृथ्वी, मंगळ
वगैरे ग्रहांसारखी एखादी वजनदार वस्तू नाही. हे लक्षात घेऊन, रदरफर्ड यांचा शिष्य,
नील्स भोर यांनी गुरुजींच्या मॉडेल मध्ये आणखी सुधारणा केल्या. सध्याची आपली अणुकल्पना
ही अशी रदरफर्ड-भोर यांनी मांडलेली कल्पना आहे.
या मॉडेलनुसार दोन शेजारी
अणुंमध्ये प्रचंड मोकळी पोकळी असते. घनपदार्थ म्हणजे बरीच मोकळी जागा असं मी
म्हटलं होतं. हिरा म्हणजे शिस्तीत संचलन करणारे सैनिक हे आपण पाहिलं. अगदी
हिऱ्यासारख्या सर्वात कठीण, सर्वात घट्ट, पदार्थातही
दोन अणुकेंद्रांमध्ये प्रचंड अंतर असतं. प्रचंड म्हणजे किती प्रचंड? ह्याचा अंदाज
येण्यासाठी आपण आपण त्या हिऱ्याच्या अणुंना आपल्या परिचित वस्तूच्या मापात बसवून
पाहू. कल्पना करा, की हिऱ्यातल्या कार्बनच्या एका अणूचं केंद्र हे एखाद्या फुटबॉल
एवढे आहे; तर शेजारचा फुटबॉल, हा साधारण १५ कि.मी.वर असेल! ...आणि ह्या केंद्राभोवती
घिरट्या घालणारे इलेक्ट्रॉन हे चिलटाएवढे असतील. बाकी अधेमधे काहीच नाही. नुसती
मोकळी जागा.
हिरा म्हणजे बरीचशी मोकळी
जागा, खडक म्हणजे बरीचशी मोकळी जागा. लाकूड म्हणजे बरीचशी मोकळी जागा, तुम्ही, मी,
आपण म्हणजेही बरीचशी मोकळी जागा. घन वस्तूंत अणु-रेणू हे एकमेकांजवळ असतात, पण ‘जवळ’चा
फिजिक्स मधला अर्थ हा आहे. अणु म्हणजे बरीचशी मोकळी जागा. त्यामुळे हे चित्र मोठ
केलं की दिसतात, १५ किलोमीटरवर फुटबॉल आणि मधे काही चीलटं!
असं कसं? चांगला घट्टमुट्ट, कडक खडक हा आतून असा पोकळ कसा?
बसल्यावर त्याचा भुगा नाही का होणार? पत्याच्या बंगल्यासारखा कोसळेल की तो. इतका
पोकळ असेल खडक तर त्याच्या आरपार दिसलंही पाहिजे. इतकंच काय, आरपार जाताही आलं
पाहिजे, नाही का? याच न्यायानी भिंतीच्याही आरपार जाता आलं पाहिजे. मग खडक इतके कडक
का लागतात? आणि आपण आणि ते सरळ एकमेकात मिसळून एकजीव का नाही होत?
आपल्या दृष्टीनं घन म्हणजे केवळ केंद्र आणि इलेक्ट्रॉन (फुटबॉल आणि
चिलटं), एवढंच असतं. ह्यांना बांधून ठेवणारी अनेक बलं, बंध, शक्तीक्षेत्र (Forces,
Bonds, Fields,) काम करत असतात. यामुळे दोन केंद्रात अंतर राखलं जातं आणि त्या
केंद्राचे घटक, प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्स, एकत्र ठेवले जातात. वस्तू ‘घन’ बनते ती
या, बलं, बंध आणि शक्तीक्षेत्रांमुळे.
त्यामुळे अणूच्या सूक्ष्म
पातळीवर विचार करता, वस्तुमान (Matter) आणि रिकामी जागा, ह्या शब्दांना विशेष अर्थ
उरत नाही. केंद्र फुटबॉलसारखं आणि पुन्हा, १५ कि.मी. पुढच्या फुटबॉलपर्यंत मधे
रिकामी जागा, हे वर्णन तसं गैरलागू आहे. या फुटबॉलांच्या मधेमधे निरनिराळ्या
बलांची, बंधांची आणि शक्तीक्षेत्रांची बलवान भिंत आहे.
घन म्हणजे ज्याच्यातून
चालता येत नाही असा पदार्थ, अशी व्याख्या करायला हवी. भिंतीतून आरपार जाता येत
नाही कारण तिच्यातल्या अणु-रेणूतील सगळ्या अणुघटकांना जागच्या जागी ठेवणारे निरनिराळे बंध, निरनिराळी बलं, निरनिराळी
शक्तीक्षेत्र. ह्याला म्हणायचं ‘घन’.
द्रव म्हणजेही असंच काहीतरी. पण आता हे बंध अगदी सैल असतील. हे अणु-रेणू
एकमेकांवरुन सहज सरकणार. तुम्हाला त्याच्यातून चालता येणार. अर्थात हवेत तुम्ही
पळूही शकता, पाण्यात मात्र हालचाल धीम्या गतीनेच होते. खूप शक्तीही लागते. समुद्राच्या
काठावर फिरणं सोपं, समुद्रात अवघड. हवेचे रेणू हे अगदी सहज इकडे तिकडे होतात.
अर्थात सगळ्याच हवेच्या कणांनी एकच दिशा धरली, म्हणजे जोरात वारा आला आणि तोही
विरुद्ध दिशेनी, तर मात्र चालणंही मुश्कील. वादळ आलं की आणखी अवघड.
घन पदार्थातून आपण आरपार नाही जाऊ शकत. पण फोटॉनसारखे काही अतिसूक्ष्म
कण, जाऊ शकतात. प्रकाश म्हणजे फोटॉनची लांबच लांब वहाती मालिका. हे फोटॉन काही
प्रकारच्या घन वस्तूतून आरपार जातात. उदाहरणार्थ काच. या वस्तूंना आपण पारदर्शक
म्हणतो. या पारदर्शक काचेतील, द्रवातील किंवा हिऱ्यातील फुटबॉलांची रचना अशी असते
की फोटॉन त्यामधून सहज आरपार जातात. थोडा वेग मंदावतो त्यांचा, आपला पाण्यातून
चालताना मंदावतो तसा.
क्वार्ट्झ सारखे काही स्फटिक वगळता, खडक अपारदर्शक असतात. त्यातू
फोटोन आरपार जाऊ शकत नाहीत. खडकांमध्ये फोटॉन शोषले तरी जातात किंवा त्यावरून
परावर्तित तरी होतात, आरपार नाही जात. काही अपारदर्शक, घनपदार्थ अगदी सरळ रेषेत
फोटॉन परावर्तित करतात. अशांना आपण आरसा म्हणतो. काही अपारदर्शक, घनपदार्थ थोडे
फोटॉन परावर्तित करतात पण तेही इकडे तिकडे चोहीकडे, कसेही, वेडेवाकडे. घन
पदार्थांचे हे गुणधर्म त्यांच्या रंगावर अवलंबून असतात. किंवा खरंतर त्यांचे रंग,
हे त्यांच्या ह्या गुणांवर अवलंबून असतात. पदार्थांचा रंग हे ते कोणत्या रंगाचे
फोटॉन परावर्तित करतात आणि कोणते शोषून घेतात, यावर अवलंबून असतो. पुढे सातव्या
प्रकरणात आपण इंद्रधनुष्याबद्दल बोलणार आहोत, तेव्हा ह्याबद्दल मी आणखी काही
सांगीन. तोवर पुन्हा एकदा अणुच्या अंतरंगात डोकावू या. थेट अणुकेंद्रात पाहू या.
सर्वात छोटा कोण?
अणुकेंद्र फुटबॉल सारखं नाहीयेच मुळी! तुम्हाला समजावण्यापुरतीच
ती उपमा वापरली. केंद्र हे गोल गरगरीत नाही, कुठल्याही विशिष्ठ आकाराचं नाही. घन
या शब्दासारखाच ‘आकार’ ह्या शब्दाला इतक्या सूक्ष्म जगात काही अर्थ रहात नाही.
किती सूक्ष्म आहे हे अणूंचं जग? ह्या वाक्याच्या शेवटी जो पूर्णविराम आहे ना त्यात
शाईचे एक ‘शंड़्क’ (एक शंड़्क म्हणजेच १०१२. म्हणजेच दहावर बारा शून्य)
इतके रेणू आहेत.
केंद्रामध्ये प्रोटॉन्स
आणि न्युट्रॉन्स हे आणखी सूक्ष्म कण आहेत.
हे ही छोटे छोटे गोळे आहेत अशी कल्पना तुम्ही लढवू शकता, (पण प्रत्यक्षात मामला
थोडा निराळा आहे). हे साधारण सारख्याच आकाराचे, सारख्याच वस्तुमानाचे. वस्तुमान
म्हणजे वजन नव्हे पण जवळ जवळ वजनच. वस्तुमानही ग्रॅममध्ये मोजता येतं. नेमका फरक
पुढच्या प्रकरणात पाहूया. सध्यातरी वस्तुमान म्हणजे वजन असंच धरून चालूया आपण. अतिसूक्ष्म
असे कण आहेत. पण केंद्राभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे तर यांच्यापेक्षा हजारपटीनी
सूक्ष्म आहेत. प्रोटॉन्स हे घनभारित असतात, इलेक्ट्रॉनस् हे ऋण भारित असतात, तर
न्युट्रॉन्सवर मात्र कोणताच विद्युतभार नसतो. घनभार, ऋणभार याचा अर्थ, वगैरेचं ओझं
सध्या इथेच ठेऊ आणि पुढे जाऊ.
अणुकेंद्र हे प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्समुळे चांगलंच जड असतं त्या
मानानी इलेक्ट्रॉनस् म्हणजे अगदी नगण्य. इतके नगण्य की अणुचं वस्तुमान लक्षात
घेताना इलेक्ट्रॉन गणलेच जात नाहीत. तेंव्हा सगळ्या प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सचं
मिळून जे वस्तुमान होईल, तेच त्या अणूचं वस्तुमान. कोणत्याही वस्तूतल्या अशा
प्रत्येक अणूच्या वस्तुमानाची बेरीज म्हणजेच त्या वस्तूचं वस्तुमान.
प्रत्येक मुलद्रव्यातील
अणूंमधील प्रोटॉन्सची संख्या ठरलेली असते. जितके प्रोटॉन्स तितकेच अणु भोवती
घुमणारे इलेक्ट्रॉनस्. प्रत्येक प्रोटॉनमागे जेवढ्यास तेवढे इलेक्ट्रॉन. हे ही
अगदी ठरलेलं असतं. हायड्रोजनच्या अणू मध्ये एकच प्रोटॉन आहे आणि म्हणुनच एकच इलेक्ट्रॉन.
युरेनियम मध्ये आहेत तब्बल ९२ प्रोटॉन्स. शिशात आहेत ८२, कार्बनमध्ये ६. वेगवेगळी
प्रोटॉनसंख्या असलेले असे शंभरावर अणू आपल्याला आजमितीला ज्ञात आहेत.
जी प्रोटॉन्सची (किंवा इलेक्ट्रॉन्सची)
संख्या तीच त्या मूलद्रव्याची अणूसंख्या (Atomic Number). प्रत्येक मूलद्रव्याला
जसं वेगवेगळं नाव आहे, तसं वेगवेगळी अणुसंख्याही आहे. एकाच अणुसंख्येची म्हणजेच
केंद्रातील प्रोटॉन्सची संख्या समान असलेली दोन मूलद्रव्ये असू शकत नाहीत.
अणुसंख्या ६ म्हणजे कार्बन आणि फक्त कार्बनच, ८२ म्हणजे शिसे आणि फक्त शिसेच. ही
सर्व मूलद्रव्ये ‘मूलद्रव्यांच्या आवर्त सारीणीत’ (Periodic Table) दर्शवलेली
असतात. ह्या तक्त्याला आवर्त का म्हणायचं हे खूप सुरस आहे पण ते आत्ता नको.
एखाद्या मूलद्रव्याचा अणु
विभागला तर वेगळीच मूलद्रव्य/व्ये तयार होणार असं मी का म्हणालो ते मात्र आता स्पष्ट
होईल. अगदी ८२ प्रोटॉन्सच रहातील, इथपर्यंत तुम्ही शिसाचे तुकडे कापत गेलात, तर
यानंतर होणाऱ्या तुकड्यात ८२ पेक्षा कमी प्रोटॉन्स असतील. थोडक्यात जे हाती येईल
ते ‘शिसे’ असणार नाही. दुसरीच दोन मूलद्रव्ये असतील. म्हणूनच तर ‘मूलद्रव्यांचा
अविभाज्य कण’ अशी अणुची व्याख्या केली आहे.
प्रत्येक मूलद्रव्यात प्रोटॉन्स
आणि इलेक्ट्रॉनची संख्या ठरलेली असते हे आपण पाहिलं. पण अणुकेंद्रात असलेल्या
न्युट्रॉन्सची संख्या मात्र वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ कार्बनमधे सहा आणि फक्त
सहाच प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन असतात. पण न्युट्रॉन्स मात्र सहा, किंवा सात, किंवा आठही असू शकतात. अशा मूलद्रव्यांना
समस्थानिके म्हणतात. कारण मूलद्रव्यांच्या आवर्तसारीणीत ती एकाच स्थानी असतात. अशा
कार्बन भावंडांना कार्बन १२, कार्बन १३ आणि कार्बन १४ अशी नावं आहेत. हे आकडे
कार्बनअणूच्या वस्तुमानाचे आहेत. प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सच्या वस्तुमानाची बेरीज
म्हणजे त्या अणुचे वस्तुमान असं सोप गणित आहे.
समस्थानिकाचे नाव प्रोटॉन्स न्युट्रॉन्स वस्तुमान
कार्बन १२ ६ ६ १२
कार्बन १३ ६ ७ १३
कार्बन १४ ६ ८ १४
कार्बन १४ सारखी काही
समस्थानिकं ही किरणोत्सर्गी असतात. ठराविक वेगानी पण अनित्य वेळानी त्यातील अणु
आपोआपच अन्य मूलद्रव्यात रुपांतरीत होतात. ह्या गुणधर्माचा वापर जीवाश्मांचं वय
ठरवण्यासाठी होतो. कार्बन १४ चा हा गुणधर्म वापरून जुन्यापुराण्या जहाजाचं वय
ठरवता येईल.
ठीकय तर मग... आता तरी आपण छोट्यात छोट्या कणाशी पोहोचलो का?
नाsssही! प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सही आणखी
बारीsssक कणांनी बनले आहेत. त्यांना म्हणतात क्वार्क. पण त्याबद्दल आत्ता नको.
तुम्हाला समजणार नाही म्हणून नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर ते मलाही नीट कळलेलं
नाही, म्हणून नको. माझ्यापेक्षा इतर अनेक शास्त्रज्ञांना ह्या सूक्ष्म जगाचं अधिक
ज्ञान आहे. पण मला नाही. तो मी नव्हेच. तेव्हा इथेच थांबतो. एकूणच इथून पुढे अज्ञाताचा,
अदृष्टाचा प्रदेश सुरु होतो. आपल्या आकलनाची धाव सध्या ह्या कुंपणापर्यंतच आहे.
ह्याही पुढचं गूढ उलगडेल. त्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. पण जे माहीत
नाही, ते ‘माहीत नाही’ असं मान्य करण्यातच शहाणपणा आहे. यात कमीपणा नाही, उलट
प्रामाणिकपणा आहे. अज्ञान मान्य केलं तरच शोध सुरु होतो. आता सर्वज्ञान प्राप्त
झालंय, अंतिम सत्य समजलंय, असं म्हटलं की सत्याचा शोध थांबतो.
कार्बनस्तोत्र
सारीच मूलद्रव्यं खास आहेत, पण कार्बन अधिक खास आहे. म्हणून हे
कार्बनस्तोत्र. सजीवांच्या जीवनामध्ये कार्बनला भलतच महत्वाचं स्थान आहे. आपल्या शरिरातही
कार्बनची असंख्य रूपे आहेत. आपल्या रक्तात हिमोग्लोबीन आहे, हे कार्बनचंच रूप आणि
स्नायूत मायोग्लोबीन आहे हेही कार्बनचंच रूपडं. इथे निव्वळ कार्बन नाहीये,
त्याच्याबरोबर इतरही अनेक अणू-रेणू आहेत पण अंतरीचा सांगाडा हा कार्बनचाच आहे.
ह्या कार्बनच्या सांगाड्यावर इतर अणु-रेणूंची कलाकुसर आहे. असे तऱ्हेतऱ्हेचे रेणू
आपल्या शरिरात आहेत. एकदा कार्बनचे आणि इतर सुटे भाग हाती आले की त्यापासून
हरतऱ्हेची रचना साधता येते. अगदी आपल्या शरिरासारखी अत्यंत गुंतागुंतीची रचना
सुद्धा आता सहजसाध्य होते. उगीच नाही रसायनशात्राच्या अख्ख्या शाखेला सेंद्रिय
(जैविक) रसायनशास्त्र (Organic Chemistry) असं खास नाव आहे.
कार्बन मध्ये खास असं आहे
तरी काय?
कार्बनचे अणु एकमेकांचे हात
हातात घेऊन लांबच लांब साखळ्या गुंफू शकतात. पेट्रोलमध्ये ऑक्टेन मिसळतात, त्या
ऑक्टेनचा रेणू म्हणजे आठ कार्बनची साखळी असते. मग ह्या साखळ्यांना पीळ पाडून गोफ
होतात, जाळी होते, अगदी दोरखंडसुद्धा होतात. हे सारं अर्थात सूक्ष्म पातळीवर. या धाग्यांचे
मग स्वेटर सारखे निरनिराळ्या डिझाईनचे पापुद्रे बनतात, शिंकाळी बनतात, टोपल्या
बनतात, कल्पनातीत प्रकारचे रेणू जुळवले जाऊ शकतात. काही साखळ्यांचे फास बनू शकतात.
म्हणजे बांगडीसारखा वेटोळा रेणू. कपाटात कसर लागू नये म्हणून वापरतात त्या ‘डांबर
गोळ्यां’चा (नॅफ्थालीन) रेणू हा असा असतो. शिवाय हे सारं त्रिमितीमध्ये घडतंय हे
लक्षात घेतलं तर अशक्य शक्यता लक्षात येतात. अचंबा वाटतो.
कार्बनची केमिस्ट्री म्हणजे, लहान मुलांची सुटे-सुटे भाग जुळवता
येतील अशी खेळणी असतात नं, तसं आहे. मोजकेच सुटे भाग पण जोडण्यात अगणित प्रकारच्या
शक्यता. साखळ्या झाल्या, स्वेटर झाले, फास झाले... प्रयोगशाळेत तर आता फुटबॉलसारखा
गोल गरगरीत कार्बन रेणू बनवला आहे. बकीबॉल ह्याचं नाव. बकमींस्टर फ्युलर, ह्या
वास्तुविशारदाचं नाव ह्या रेणूला दिलंय. फ्युलरनं फुटबॉलच्या आकाराचा घुमट बनवला. शास्त्रज्ञांनी
कार्बनच्या रेणूचा फुटबॉल बनवला. असा रेणू निसर्गतः अस्तित्वात नाही. ही मानवी
करामत. बकीबॉलसारख्या बकी’ट्युब्स’ही आहेत. या ट्यूब वापरून आपण सूक्ष्म स्तरावर
पायाडं बांधू शकतो, मांडव घालू शकतो, काय आणि काय!
आपल्या स्नायूंमध्ये मायोग्लोबीन नावाचा महारेणू असतो. कार्बनचा
सांगाडा आणि त्यावर इतर अनेक अणु रेणूंची सजावट असा याचा थाट. एकदा कार्बनचा हा
घाट लक्षात घेतला की सजीव सृष्टीचं कोडं उलगडायला लागतं. मायोग्लोबीन हे निव्वळ एक उदाहरण झालं. आपल्या
शरीरात ह्या तत्वावर बेतलेले हजारो रेणू आहेत. कार्बन म्हणजे निसर्गाला सापडलेला
खेळण्याचा सेट आहे. अत्यंत गुंतागुंतीची रचना यातून सहज उभी राहू शकते. थोडक्यात
कार्बनची केमिस्ट्री अथांग आहे, अपरंपार आहे! असीम आहे!! अनंत आहे!!! ह्या
अनंतावतारी कार्बनची केमिस्ट्री म्हणजे निव्वळ जादू आहे जादू!!!!
मिथक कथा का नाहीत बरं?
प्रत्येक प्रकरणाप्रमाणे, ह्या प्रकरणाची सुरवात मिथककथांनी नाही,
हे लक्षात आलं का तुमच्या? प्रयत्न करूनही सुयोग्य मिथककथाच सापडल्या नाहीत मला.
सूर्य-चंद्र काय, इंद्रधनुष्य काय किंवा विंचू-साप काय, हे सारे आपल्या
पूर्वजांच्या आसपास होते. दिसत होते, थोडे थोडे समजत होते. ह्याबद्दल कितीतरी कथा,
लोककथा, मिथककथा, पुराणं. अगदी व्रतवैकल्यात, नित्यपूजेत स्थान मिळालं ह्या साऱ्याला.
पण ह्या उलट हे अणू-रेणूंचं जग. ह्याबद्दल आपले पूर्वज अगदीच अनभिज्ञ होते. मग
कसली पुराणं आणि कसल्या कथा.
सोळाव्या शतकात
मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि हवा, पाणी, धूळ, आपलं शरीर, हे सारंच सूक्ष्मातिसूक्ष्म
जीवांनी माखलेलं आहे हे लक्षात येऊ लागलं. ह्या सूक्ष्म जीवांचं जिवंतपण पचवणंही
अवघड गेलं त्यावेळच्या धुरिणांना. सूक्ष्मजीवशास्त्राच्या ह्या किलकिल्या झालेल्या
दरवाजातून आत डोकावताना सगळे चकित झाले आणि काही भयचकित झाले.
धूळपिसू (Dust Mite) नावाची एक पिसू असते. ही आहे कीटक
(कोळ्यांच्या) कुळातली. घरीदारी सगळीकडे असते. पडदयात, गालीच्यात, गादीत हीचे
हजारो कुलदीपक आणि कुलदीपिका नंगानाच करत असतात. आपल्या आसपास यांची बजबजपुरी
माजलेली असते नुसती. सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर ह्या कीटकांचा शोध लागला.
तत्पूर्वी असले काही कीटक असतील, असं आपल्या बापजाद्यांच्या स्वप्नातसुद्धा आलं
नाही. सबब यांच्या बाबतीत काही मिथककथा नाहीत. कल्पना करा, की असा काही प्राणी आहे
हे त्यांना माहीत असतं, तर त्यांनी ह्या धूळपिसू बद्दल, तिच्या असण्याबद्दल,
तिच्या महतीबद्दल काय काय कल्पना लढवल्या असत्या! काय काय कहाण्या रचल्या असत्या!!
आठवड्याच्या वारानुसार आणि वर्षाच्या महिन्यानुसार, काय काय व्रतवैकल्य आणि
त्यांची काय काय फळं सांगितली असती!!!
धूळपिसवा लहानखुऱ्या खरंच, पण त्या ज्या पेशींच्या बनलेल्या आहेत
त्या तर आणखी लहान. आणि ह्या पेशी ज्या अणू-रेणूंपासून बनलेल्या आहेत ते? ते तर
आणखी लहान. एका धूळ पिसवेमध्ये शंभर शंड़्क (एक शंड़्क म्हणजे १०१२).
सारं विश्व मुळी ह्या अतिसूक्ष्म अशा अणुंचं बनलेलं आहे. पण गंमत
अशी, की विश्वाच्या पसाऱ्याबद्दल, उत्पत्तीबद्दल, त्याच्या चलनवलनाबद्दल, छातीठोकपणे,
सर्वज्ञपणे सांगणाऱ्या एकाही धर्मग्रंथात ह्याचा उल्लेखही नसावा ना! ह्या असल्या
पुस्तकांमध्ये विज्ञानानी कष्टपूर्वक शोधून सिद्ध केलेलं काहीही सापडत नाही.
विश्वाच्या आकाराबद्दल, पृथ्वीच्या वयाबद्दल फक्त कल्पनेच्या कोलांट्याउड्या दिसतात.
कॅन्सरवर औषध कोणतं? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? पेट्रोलवर गाडी कशी चालवावी? हे
असलं काही नसतं त्यात. जंतू, अणुविभाजन, विजेचा वापर, वेदनाशामक भुलीची दिव्य गुपितं,
हेही नसतं त्याच्यात. जेव्हा केव्हा हे ग्रंथ रचले गेले, तेव्हाच्या उपलब्ध
माहितीवर कल्पनाशक्तीचं रोपण असं ह्यांचं स्वरूप आहे. ह्यात आश्चर्य काहीच नाही.
जर हे धर्मग्रंथ खरोखरच अपौरुषेय असते, सर्वज्ञ ईश्वरानं सांगितलेले असते, तर काही
ना काही तरी उपयुक्त माहिती त्यात त्या सर्वज्ञ देवानी दिली असती, नाही का?
तुम्हाला काय वाटतं?
No comments:
Post a Comment