Wednesday, 12 October 2016

प्रकरण ५ ऋतू वसंतादिक का येति, जाती, तैसेचि का होती दिन आणि राती?

प्रकरण ५
ऋतू वसंतादिक का येति, जाती, तैसेचि का होती दिन आणि राती?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील
‘व्हाय डू वी हॅव नाईट अँड डे, विन्टर अँड समर?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९






ऋतू वसंतादिक येति, जाती, तैसेचि होती दिन आणि राती;
अचूक चाले क्रम जो असा रे, हे सृष्टिचे कौतुक, जाण सारें.

अशी एक प्रसिद्ध कविता आहे. यातच थोडा बदल करून ती मी या प्रकरणाचं शीर्षक म्हणून वापरली आहे. या चराचर सृष्टीला लय आहे. त्यावर लुब्ध होणं, त्याचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. पण आपण इथवर थांबणार नाही. का? असं विचारून, त्याची कारणमीमांसा समजून घेणार आहोत. एक थोडी संथ लय आहे, ऋतुचक्राची लय; तर दुसरी, दिवस-रात्रीची द्रुतलय. दिवस-रात्र हे २४ तासांचं चक्र, तर ऋतुचक्र हे संथ, ३६५ दिवसाचं वार्षिक चक्र आहे. दोन्ही तालचक्रांबद्दल सांगाव्या तेवढ्या मिथक कथा थोड्याच. उषेचे आणि संध्येचे मनोहारी रंग आणि सूर्याचं देदीप्यमान आकाशभ्रमण; मग काय विचारता? भूतलावरील कित्येक संस्कृतींनी सूर्याला सोन्याचा झळाळता रथ बहाल केलाय, त्याला उमदे श्वेतवर्णी अश्व जोडलेत आणि आकाशभ्रमणाचं स्पष्टीकरण देऊन टाकलंय.
     ऑस्ट्रेलिया खंडाचा बाकी जगाशी सुमारे ४०० वर्ष संपर्कच नव्हता. तिथल्या कथा, या अगदी वेगळ्या आणि खास ‘तिथल्या’ आहेत. हीच कथा पहा ना. तिथल्या फ्लींडर्स डोंगररांगात रहाणाऱ्या लोकांच्या मते, स्वप्नयुगातून तेव्हा नुकतंच जग जन्माला आलं होतं. वस्ती होती प्राण्यांची आणि राक्षसांची. त्या स्वप्नयुगात दोन पाली एकमेकींच्या अगदी जिवलग मैत्रिणी होत्या. एक होती गोआन्ना आणि दुसरी घेक्को. एके दिवशी सुर्यीणीच्या (sun-woman. होय, सूर्यीणीच्याच. त्यांच्या मते सूर्य स्त्रीलिंगी आहे.) पिवळ्या कुत्र्यांनी, ह्या मैत्रिणींच्या अन्य भाईबंदांना मारून टाकलं. सूर्यीणीचा अस्सा राग आला त्या गोआन्नाला, की तिनं आपल्या हातातलं बूमरँग जोरात भिरकावलं आणि सूर्यीणीला आभाळातून स्थानभ्रष्ट केलं. सूर्यीण गेली भेलकांडत. पश्चिम क्षितिजाआड. सगळं जग अंधारात बुडालं. गोआन्ना आणि घेक्को पार घाबऱ्याघुबऱ्या की हो झाल्या. आता बूमरँगच्या दुसऱ्या धक्क्यानिशी सुर्यीणीला वर काढायचा त्यांनी चंग बांधला. वारंवार बूमरँग फेकूनही सुर्यीण काही त्यात सापडेना. शेवटी, जाताना तर पश्चिमेला गेली, पण नंतर अंधारात दुसऱ्याच दिशेला ती लपून बसली असेल, या समजूतीनी त्यांनी सगळ्या दिशांना बूमरँग फेकायला सुरुवात केली. पण व्यर्थ. सूर्यीण काही वर येईना. सूर्यीणही गेली आणि बूमरँगही गेली. सरते शेवटी एकच बूमरँग राहीलं. मग त्या पालीनी ते पूर्वेला फेकलं. आता मात्र सूर्यीण बरोब्बर त्या बुमरँगच्या तडाख्यात सापडली आणि उगवली की पूर्वेला... आणि तेव्हापासून सूर्यीण पुर्वेला उगवते आणि पश्चिमेला मावळते.
     अशा जगभरातल्या किती म्ह्णून कथा सांगाव्यात? कधीतरी, कुठेतरी, काहीतरी घडतं आणि मग सूर्य तेव्हापासून रोज येरझाऱ्या घालू लागतो, असा साऱ्यांचा मथितार्थ.
     आग्नेय ऑस्ट्रेलियातली ही आणखी एक कथा. कोणीतरी इमूचे अंडं आकाशात फेकलं. त्यातून जन्माला आला सूर्य आणि त्या उष्णतेनं आभाळातल्या गवताची गंजी धडाडून पेटली. ती गंजी तिथे आली कुठून हे माहित नाही. पण एकूणच हा उजेड मानवजातीला उपयुक्त आहे हे लक्षात घेऊन आभाळ-देवानी रोज एक गवताची गंजी तिथे असेल अशी तरतूद केली. तेव्हापासून नित्यनेमानं ही गंजी सकाळी पेटते आणि रात्री विझते.
     ऋतूचक्राच्याही अशाच कथा आहेत. पश्चिम कॅनडातील ताह्ल्तान लोक समजतात की एकदा कोणता ऋतू किती काळ असावा, यावरून काटेसाळू आणि बीव्हर याचं झालं भांडण. काटेसाळूला असं वाटत होतं की हिवाळा पाच महिन्यांचा असावा. म्हणून त्यानी आपली पाच बोटं दाखवली. पण बीव्हरचं म्हणणं होतं की हिवाळा हवा त्याच्या शेपटीवरच्या पट्ट्यांइतक्या महिन्यांचा, म्हणजे आठ दहा महिन्यांचा. याचा इतका राग आला काटेसाळूला की आपल्या पंज्याचं एक बोट चावून त्यानी तोडून टाकलं आणि चार बोट वर केली. तेव्हा पासून काटेसाळूला बोटं राहिली चार आणि हिवाळ्याचे महिनेही राहिले चार.
     या कथेत हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू असणारच हे गृहीत आहे. फक्त त्यांच्या कालावधीचा प्रश्न सोडवला आहे. ग्रीक लोकांची परसेफोनची कथा ह्याहून रोचक आहे.
     देवाधिदेव झीअस आणि त्याची राणी, सृजनदेवी देमीतर, यांची परसेफोन ही कन्या. आईची लाडकी. ह्या परसेफोनवर नजर गेली पाताळराजा हेडसची. तिच्यावर जीव जडला त्याचा. एके दिवशी फुलाफळांनी लगडलेल्या उपवनात परसेफोन मजेत  खेळत होती. अचानक जमीन दुभंगली. पातळलोकातून आपल्या रथात बसून हेडस आला आणि घेऊन गेला तिला रथातून. पट्टराणी केलीन तिला. इकडे देमीतरला कन्यावियोग सहन झाला नाही. तिनं साऱ्या पिकांची वाढच थांबवून टाकली. उपासमार व्हायला लागली जनतेची. शेवटी झीअसनी परसेफोनला माहेरी आणण्यासाठी, आपला दूत म्हणून हेर्मेसला पाठवलं. पण पेरसेफोननी डाळींबाच्या सहा बिया खाल्ल्या होत्या. ह्यामुळे तिला आता सहा महिनेच पृथ्वीवर रहाता येणार होतं. ती धरेवर असते त्या सहा महिन्यात, वसंतात, सगळीकडे आबादिआबाद असते. सहा महिन्यांनी पेरसेफोन पुन्हा पाताळराज्यात जाते. त्यामुळे झाडं सुकतात. फळं, फुलं काही म्हणजे काही उगवत नाही. सारी सृष्टी बर्फाच्या थंड पांघरूणाखाली निश्चल, निश्चेष्ट होते.

दिनरात्र आणि ऋतुचक्र घडतं कसं?
     कुठेही, काहीही ठरावीक काळानी घडतंय असं दिसलं, की सहसा दोन शक्यता असतात. काही तरी झुलतंय किंवा काही तरी फिरतंय. दिनरात्र आणि ऋतुचक्र हे अर्थातच पृथ्वीच्या  फिरण्यामुळे घडतात. स्वतःभोवती भोवऱ्यासारखी फिरल्यामुळे दिवस-रात्र आणि सूर्याभोवती फिरल्यामुळे ऋतू. 
     सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हा निव्वळ दृष्टीभ्रम आहे. सापेक्ष हालचालीचा हा दृष्टीभ्रम. हा तर नेहमीचाच अनुभव. शेजारची रेल्वे सुटली आणि आपली स्थिर असली तरी आपण क्षणभर दचकतो. आपली गाडीच हलते आहे असा भास होतो आपल्याला. प्लॅटफॉर्मकडे बघितलं की लगेच लक्षात येतं, शेजारची गाडी निघाली आहे. लहानपणी पहिल्यांदा मी हा अनुभव घेतला तेव्हा अगदी चक्रावून गेलो होतो. (त्याच प्रवासात, आपली गाडी येणार, आपली गाडी आली, असं काहीबाही आई-बाबांच्या तोंडून ऐकून ती रेल्वेगाडी ही आपल्या पपांच्या मालकीचीच आहे असा गोड गैरसमज मी करून घेतला होता.)
     कधी कधी उलटंही घडतं. शेजारची गाडी हलली असं वाटतं पण सुटलेली असते आपली ट्रेन. गाडीला धक्काबिक्का बसला तर गाडी हे हललेली ओळखणं सोपं, एरवी अवघड. आपली गाडी जेंव्हा एखाद्या दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करते तेव्हाही, आपली गाडी स्थिर असून शेजारची गाडीच हळूहळू, मागेमागे जात आहे, असं आपण अनुभवू शकतो.
     सूर्य आणि पृथ्वीचंही असंच आहे. सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेला जात नसून पृथ्वीच स्वतःभोवती फिरते, त्यामुळे सूर्यभ्रमणाचा आभास फक्त निर्माण होतो. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते आहे. आस म्हणजे जणू उत्तरध्रुवापासून दक्षिणध्रुवापर्यंत आरपार जाणारा एक दांडा आहे असं समजायला हरकत नाही. या भोवती पृथ्वी फिरते आहे. फिरताना पृथ्वीला धक्के बसत नाहीत, त्यामुळे ती फिरते आहे हे लक्षात येत नाही. पृथ्वी फिरते, तिच्यावरचे  आपण फिरतो, आपल्या भोवतीचं वातावरणही त्याच गतीनी फिरत असतं. तसं नसतं तर पृथ्वीच्या वेगानी वहाणारे, म्हणजे ताशी काही हजार किलोमीटरनी वहाणारे वारे, आपल्याला सतत जाणवले असते. हे अर्थात विषुववृत्तापाशी. जसजसे आपण ध्रुवांकडे सरकतो तसतसा पृथ्वीचा वेग कमी होतो. आसाभोवती एक चक्कर मारायला तास चोवीसच पण कापायचं अंतर कमी. विषुववृत्ताशी केवढी तरी मोठी चक्कर. ध्रुवांजवळ अगदी छोटी चक्कर. यामुळे ध्रुवांजवळ पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी असतो. पृथ्वी एका लयीत फिरत असते (धक्के नाहीतच) आणि वातावरणही तिच्या बरोबर फिरत असतं, त्यामुळे आपण फिरतोय हे आपल्याला जाणवतंच नाही. एखाद्या स्थिर वस्तूकडे बघितलं (रेल्वेतून प्लॅटफॉर्मकडे)  तरच आपली हालचाल आपल्याला समजेल. अशा स्थिर वस्तू म्हणजे सूर्य आणि तारे. पण हीच मंडळी आभाळात घिरट्या घालताना दिसतात....!!!! दृष्टीभ्रम तो हाच.
वीट्गेनस्टाईन या तत्ववेत्त्यानी आपल्या विद्यार्थिनीला प्रश्न केला, ‘सूर्य फिरतो आहे असंच वाटतं सगळ्यांना. पृथ्वी फिरते आहे हे पचणं मात्र जड जातं. का बरं?’
ती म्हणाली, ‘कारण उघडंच आहे. तसं दिसतंच ना मुळी आपल्याला.’
यावर वीट्गेनस्टाईन म्हणतो कसा, ‘अगं, पृथ्वी फिरत असताना कसं दिसणं अपेक्षित आहे? जसं दिसतं, तसंच तर दिसणार. आणि जर उलटं असतं तर? तर काय वेगळं दिसलं असतं गं?’
खरंच की! तुम्हीही विचार करून बघा बरं.
जर हजारो किलोमीटरच्या वेगानं पृथ्वी धावते आहे तर ऊंच उडी मारल्यावर, पृथ्वी थोडी पुढे सरकायला पाहिजे, काही अंतरावर आपले पाय जमिनीला लागले पाहिजेत. असं तर होत नाही. कारण? कारण उघड आहे. आपण पृथ्वीवरंच असल्यामुळे,  पृथ्वीचा वेग आपल्यालाही प्राप्त झाला आहे. आपणही त्याच वेगानं फिरतो आहोत. आजुबाजूचं सगळंच त्या वेगानं फिरत असल्यामुळे वेग जाणवत मात्र नाही. चालत्या बुलेट ट्रेनमध्ये उडी मारली तरी आपण त्याच जागी उतरतो. गाडी आपल्या पायाखालून पुढे गेलेली नसते. कारण गाडीत असताना आपणही गाडीच्याच वेगानी पुढे जात असतो. चालत्या गाडीत तुम्ही बॉल उडवून झेलू शकता. अगदी टेबल-टेनिसही खेळू शकता. फक्त गाडीचा वेग एकसारखा हवा, डबा हवाबंद हवा आणि गाडी सरळसोट जात असली पाहिजे. हवाबंद डब्यातली हवा तुमची सहप्रवासी बनते. बाहेरच्या जगाच्या दृष्टीनी विद्युतगतीनी धावणाऱ्या गाडीच्या हवाबंद डब्यात  तुम्ही आणि टेबल-टेनिसच्या बॉलनी गाडीचाच वेग धरला आहे. त्यामुळे टेबल-टेनिसहॉलमधे खेळल्यासारखे तुम्ही खेळू शकता. पण जर गाडी वेग घ्यायला लागली किंवा थांबायला लागली किंवा तिनी वळण घेतलं तर ह्या बंद डब्यातील खेळाचीही लय बिघडेल. अवकाशस्थानकात वस्तू इकडे तिकडे कशा जातात हे बघताना आपण पुन्हा याचा विचार करू.

अहर्निश गती आणि ऋतुचक्र
     फिरता फिरता आपला गाव सूर्याच्या दिशेला आला की दिवस ‘उगवतो’ आणि आपला गाव सूर्याच्या विरुद्ध दिशेला गेला की ‘मावळतो’. भारत देश विषुववृत्ताच्या बराच जवळ आहे. पण जसजसे आपण ध्रुवप्रदेशाकडे जातो, तसतसा उन्हाळ्यातला दिवस चांगला १८ ते २० तास असतो आणि हिवाळ्यात रात्रही तेवढीच लांबलचक होते.
     दिवस-रात्रीतला हा फरक इतका टोकाचा आहे की बहुतेक प्राणी दिनचर तरी असतात किंवा निशाचर तरी. दोन्ही वेळी जागृत असणारे खूप कमी. आपण आणि बहुतेक पक्षी हे दिनचर आहोत. तरस, घुबड वगैरेचा दिवस रात्री उगवतो.
     दिन-रात्रीच्या चक्राशी जसं प्राण्यांनी जुळवून घेतलं आहे, तसंच ऋतूचक्राशीही जुळवून घेतलं आहे. पावसाळयाच्या सुरुवातीला शेळ्या, पाखरं वितात. पावसाळ्यात पिल्लांना उदंड अन्न मिळतं. हिवाळ्यात कित्येक प्राण्यांच्या अंगावर जाड लोकर उगवते, उन्हाळ्यात ही झडून जाते. कित्येक पक्षी हिवाळ्यात विषुववृत्ताजवळच्या उबदार प्रदेशात स्थलांतर करतात आणि वसंत ऋतूत पुन्हा मूळदेशी परततात. आर्क्टिक टर्न ह्या पक्षाची तर बातच न्यारी. उत्तर ध्रुवाजवळ आर्क्टिक प्रदेशात थंडी पडली की हा उडत उडत थेट दक्षिण ध्रुवाच्या उबदार वातावरणात स्थलांतर करतो. पुन्हा सहा महिन्यांनी जेव्हा दक्षिण ध्रुवावर थंडी पडायला लागते तेव्हा हा पठ्ठ्या उत्तर ध्रुवाकडे झेपावतो.
     थंडीपासून बचाव व्हावा म्हणून काही प्राणी स्थलांतर करण्याऐवजी चक्क गाढ झोपतात. अस्वलं, खारी आणि असे अनेक प्राणी हिवाळा संपेपर्यंत गाढ झोपी जातात. क्वचित थोडा वेळ यांची झोप चाळवते की पुन्हा डाराडुर्र. ही निद्रा इतकी गाढ असते की शरीरांतर्गत चलनवलन अगदी जेमतेम चालू असतं. अलास्कातील एका बेडकाची शीतसमाधी अशी की बर्फात याचाही घट्ट गोळा बनतो. पुढे ऋतुमानानुसार बर्फ वितळलं की हा आपला जागृतावस्थेत. टणाटण उड्या सुरु.
     माणूस शीतसमाधी घेत नाही की स्थलांतर करत नाही, पण शेतीचं आणि ऋतूचक्राचं अन्योन्य नातं काय वेगळं सांगायला हवं?
     इतकं सगळं असलं तरी ऋतूचक्राबद्दल बहुतेकांच्या मनात गोंधळ असतो. उन्हाळ्यात पृथ्वी, सूर्याच्या जवळ असते आणि म्हणून आपल्याला उकडतं, असं समजणारे महाभाग आहेत. असं जर असेल तर त्याच वेळी दक्षिण ध्रुवावर बर्फीली थंडी असते त्याचं काय? तेंव्हा ऋतुचक्र हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतरामुळे घडत नाही. मग कशामुळे घडतं?
     आकाशस्थ ग्रहगोल हे मुळात असे गोल गोल का फिरतात ते समजावून घेतल्याशिवाय याचं उत्तर शक्य नाही. त्यामुळे आता आपण त्याकडे वळू या.

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी...?
     सगळे ग्रह आपापल्या कक्षेत का फिरतात? ग्रह आणि त्यांचे उपग्रह हे असे कक्षेत रहातात कसे? सतराव्या शतकात, महामानव सर आयझॅक न्यूटननी याचं उत्तर शोधलं. उत्तर आहे गुरुत्वाकर्षणामुळे. याच बलामुळे सफरचंद जमिनीवर पडतात आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो! (ती न्यूटनची आणि सफरचंदाची गोष्ट मात्र खरी नाही हं)
     कल्पना करा की समुद्रकिनारी, एका उंचच ऊंच कड्यावर एक मुलुख मैदानी तोफ जमिनीला समांतर ठेवली आहे. ही तोफ डागली, की तो तोफगोळा काही अंतर जाऊन धाडकन् समुद्रात कोसळेल. तोफगोळा बाहेर पडल्या पडल्या काही अंतर सरळ, जमिनीला समांतर असा जाईल. मग तो पुढेपुढेही जात राहील आणि खालीखालीही पडत राहील आणि शेवटी पाण्यात कोसळेल. ह्या गोळ्याच्या मार्गाची रेषा काढली तर ती वक्र रेषा असेल. तो बाहेर पडताच त्या गोळ्याला असलेला तोफेचा आधार नाहीसा झाला आहे. गुरुत्वाकर्षणामुळे गोळा आता खाली ओढला जातोय.  पण त्याची पुढे जाण्याची गती इतकी प्रचंड आहे की काही काळ, तो निव्वळ सरळ सरळ जात रहातो. शेवटी, हवेच्या घर्षणामुळे त्याची सरळ जाण्याची गती मंदावते, आता गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव दिसायला लागतो. गोळा खाली आणि त्याचवेळी  पुढेपुढे असा तिरपा पडायला लागतो. शेवटी तर पुढे जाण्याचं बल पूर्ण समाप्त होतं आणि गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली हा पाण्यात कोसळतो.
     आता आणखी पॉवरफुल तोफ घेऊ, गोळा आता खूप खूप दूर वर पडेल. आधी बराच पुढे जाऊन मग तो खाली येईल. त्याचा मार्ग, अगदी अलगद वाकलेला असेल. बराच काळ तो पुढे पुढेही जात असेल आणि खालीही पडत असेल.
     आता आणखी मोठी तोफ घेऊ, आणखी पॉवरबाज, आताही पूर्वीचीच पुनरावृत्ती होईल. आता बऱ्याच वेळानी हा पाण्यात पडेल. पृथ्वी गोल आहे. आडवा प्रवास याचा आता अर्थ होईल पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर प्रवास. म्हणजे पृथ्वीच्या गोलाईमुळे  चक्क बाकदार प्रवास. गोळा खाली झेपावतो आहे, पण पृथ्वीच्या गोलाईमुळे खालचं पाणी दूरदूर जातं आहे. आता पृथ्वी गोल असल्यामुळे हा गोळा पृथ्वीला अर्धवट प्रदक्षिणा घालेल आणि मग पडेल पाण्यात.  तो खाली पडेल पण कसा? पृथ्वीला थोडासा वळसा घालून खाली पडेल.
आता कल्पना शक्तीला आणखी थोडा ताण द्या. आता निघालेला तोफगोळा इतक्या वेगात फेकला जाईल की पुन्हा जमिनीवर येणारच नाही. तो पृथ्वीभोवती गोल प्रदक्षिणा घालून पुन्हा मूळ ठिकाणी अवतरेल... आणि अशाच गोल गोल प्रदक्षिणा चालू ठेवेल. हाही गोळा तांत्रिक दृष्टया सतत खाली खाली पडतो आहे पण त्याच्या पडण्याचा वक्र मार्ग आणि पृथ्वीचा वक्राकार हे सारखेच आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात खाली पडण्याऐवजी त्याचं पडणं हे भासमान खाली पडणं आहे. तो आपला पृथ्वीभोवती गोल गोल फिरत राहील. पृथ्वीला एक कृत्रिम चंद्र मिरवायला मिळेल. अर्थात इथे त्याला हवेचा अजिबात अडथळा नाही असं गृहीत धरलं आहे. प्रत्यक्षात हे शक्य नाही. पण जर हा गोळा वातावरणाच्या पल्याड प्रक्षेपित केला तर? आता हवेचा अवरोध रहाणार नाही. कारण? कारण, आता हवाच नाही. आता  मात्र तो निश्चितच पृथ्वी भोवती भ्रमण करत राहील. गुरुत्वाकर्षण त्याला सतत खाली खेचत राहील, त्याला मिळालेली सरळ रेषेत जाण्याची गती त्याला सतत सरळ रेषेत जायला सांगेल. पण ह्या दोन्हीही  बलांच्या परिणामी तो गोळा सरळही जाणार नाही आणि खालीही पडणार नाही. तो गोलगोल फिरत राहील. चंद्रासारखा तोही एक पृथ्वीचा उपग्रह बनेल. आपण अवकाशात सोडलेले उपग्रह म्हणजे पृथ्वीचे कृत्रिम चंद्रच आहेत. सतत पृथ्वीकडे ‘पडणारे’, पण आपली कक्षा कधीच न सोडणारे. फोन, इंटरनेट वगैरे ज्या उपग्रहांच्या भरवश्यावर चालते तेही ह्याच युक्तीनी अवकाशात सोडलेले असतात. काही तर बरोब्बर पृथ्वीच्या गिरकीला मॅचिंग गिरकी घेतात. भूस्थिर उपग्रह म्हणतात यांना. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने स्थिर, प्रत्यक्षात पृथ्वीभोवती तिच्याच वेगानी फिरणारे. अहोरात्र हे आपले एखाद्या विशिष्ठ बिंदूच्या डोक्यावर टांगलेले. त्यांच्या दिशेला अँन्टेना फिरवली की आपला टीव्ही सुरु! दोन ट्रक ड्रायव्हरनी समान वेगात ट्रक चालवत एकमेकांशी गप्पा माराव्यात तसं हे.
     त्या तोफेच्या गोळ्यासारखेच हे उपग्रह, अवकाश स्थानकं, त्यावरची माणसं, वस्तू  कायम आपल्याकडे ओढले जात आहेत. पण त्यांच्या सरळ गतीमुळे ते पुढे पुढेही जात आहेत.  त्यांची सरळ जाण्याची गती आणि खाली पडण्याची गती यांचा असा काही तोल साधला गेला आहे की ते आपल्या डोक्यात पडत नाहीत आणि कक्षा सोडून अवकाशात भरकटतही नाहीत. कक्षेत धावत रहातात, धावत रहातात.
अवकाशात साऱ्याला वस्तुमान आहे पण वजन नाही. म्हणजे नेमकं काय ते आता पाहूया.
     कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे तिच्या अणुकेंद्रांच्या वस्तुमानाची बेरीज हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे अवकाशातील माणसातही अणु आहेत, त्यांना वस्तुमानही आहे. ते जेवढं इथे तेवढंच तिथे भरेल. वजनाचं तसं नाही. पृथ्वीवरील आपलं वजन म्हणजे दिलेल्या वस्तूमानाला पृथ्वी आपल्याला तिच्याकडे किती जोरात खेचते आहे ह्याचं मोजमाप आहे. त्यामुळे वजन, हे मूलतः पृथ्वीच्या वस्तुमानावर अवलंबून आहे. त्यामुळेच आपलं वस्तुमान जरी तेच असलं तरी, चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी, सबब तिथे आपलं वजन कमी आणि गुरुवर गुरुत्वाकर्षण खूप जास्त सबब तिथे आपलं वजन जास्त, काही टनात. अवकाशस्थानकावरील वजन काट्यावर तुम्ही उभे राहिलात तर तांत्रिक दृष्टया पृथ्वी तुम्हाला ज्या काही अल्प शक्तींनी खेचते आहे त्याच अल्प शक्तींनी ती वजन काट्यालाही खेचते आहे. तुम्ही जसे सतत पृथ्वीवर पडत आहात तसाच तो वजन काटाही पडतो आहे. तुम्ही दोघंही त्याच वेगानी खाली पडता आहात. (आठवा, पिसाच्या मनोऱ्यावरील गॅलिलिओचा प्रयोग)पण ह्या भानगडीत तुमचा दाब काही वजनकाट्यावर पडत नाहीये. म्हणून तुमचं वजन शून्य.
     तुम्ही वजनरहित जरी झालात तरी तुम्ही वस्तुमान बाळगून आहात हे विसरू नका. आपलं वजन शून्य बघून तुम्ही आश्चर्यानी उडी मारलीत तर धाड्कन जाऊन छताला आपटाल. तुमचं वस्तुमान छताला धडकल्यामुळे इजाही होईल, टेंगुळही येईल. अर्थात खाली खेचणारी शक्ती नसल्यामुळे ‘छत’ नेमकं कुठल्या बाजूच्या भिंतीला म्हणायचं हाही एक प्रश्न आहे. इतरही वस्तूंना वस्तुमान असेल पण वजन नसेल. तोफेचा गोळा उचलून  सोडून दिला तर तो काही तुमच्या पायावर आदळणार नाही. तो तुमच्या समोर (वजनरहित अवस्थेत) तरंगत राहील. पण म्हणून तो अतिशय हलकाफुलका (वस्तुमानरहित) आहे असा समज करून घेऊ नका. त्याला एक ठोसा लगावलात तर हात चांगला सडकून निघेल. शिवाय तो गोळा जावून आणखी कशाकशाला धडकेल, परत येईल, परत धडकेल, एकूणच प्रचंड गोंधळ माजेल. एखाद्या सहकारी अंतराळवीराचा कपाळमोक्षही होऊ शकतो, चांगली खोक पडेल. ह्या उलट एखादा टेबल-टेनिसचा चेंडू टाकलात तर तोही असाच इकडून तिकडे जाईल, कुठेकुठे धडकेल पण जशी इथे आपल्याला टेबल-टेनिसच्या चेंडूनी इजा होत नाही, तशी तिथेही होणार नाही.  अवकाशस्थानकात तोफगोळ्याचं आणि टेबल-टेनिसच्या बॉलचं वस्तुमान वेगवेगळंच राहील वजन मात्र सेम असेल, म्हणजे शून्य असेल!

अंडी, अंडाकृती कक्षा आणि गुरुत्वाकर्षणातून मुक्ती.
     त्या कड्यावरच्या तोफेची पॉवर आपण आता आणखी वाढवूया. काय होईल ते पहाण्यापूर्वी आपल्याला केप्लरच्या नियमांचा अभ्यास करायला हवा. जोहान्स केप्लर हा जर्मन वैज्ञानिक. न्यूटनच्या काही काळ आधी यानी ग्रहांच्या कक्षेचा आकार हा गोल नसून लंबगोल किंवा अंडाकृती (मात्र अंड्याची आकृती ही बरोब्बर लंबगोल नसते!) आहे असा निष्कर्ष मांडला.
     लंबगोल म्हणजेच ताणलेला गोल किंवा गोल म्हणजे आक्रसलेला लंबगोल! हा निव्वळ शब्दांचा खेळ नाही हं. मी सांगतो तसं करा किंवा निदान तशी कल्पना करा आणि तुम्हाला वरील वाक्य तंतोतंत पटेल. ग्राउंडवर खुंटी ठोकून, दोरी बांधून, काठीनी गोल तुम्ही काढला असेलच. कल्पना करा की एकाच्या ऐवजी दोन खुंट्या आहेत आणि दोरी ऐवजी दोरीचं वेटोळं. दोन्ही खुंट्यात आणि काठीत दोरीचं वेटोळं  अडकवून आता तुम्ही काठीनी ग्राउंडवर गोल रेघ मारा. गोल रेषा येणारच नाही. चेपलेल्या गोलासारखा, म्हणजेच लांबगोल आकार काढला जाईल. जर दोन्ही खुंट्या जरा जवळ जवळ आणत गेलात तर ह्या लंबगोलाची लंबाई कमीकमी होत जाईल आणि गोलाई वाढत वाढत जाईल. दोन्ही खुंट्या एकाच जागी ठोकल्या तर...? तर काय निव्वळ गोल काढला जाईल, आधी काढला होता तसाच. एक वर्तूळ काढलं जाईल. खुंट्या लांब लांब ठोकल्या की गोलाच्या जागी उमटतो लंबगोल आणि खुंट्या अगदी जवळ, एकाच बिंदूची ठोकल्या की लंबगोलाच्या जागी उमटतो गोल. म्हणून तर म्हटलं की लंबगोल म्हणजेच ताणलेला गोल किंवा गोल म्हणजे आक्रसलेला लंबगोल.
     लंबगोल  आणि त्या दोन खुंट्या लक्षात घेतल्यात तर एक गोष्ट सांगतो; सूर्याभोवती पृथ्वी आणि पृथ्वीभोवती चंद्र, हे गोलाकार कक्षेत फिरत नाहीत. हे लंबगोलाकार कक्षेत फिरतात. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा लंबगोलाकार असते. त्यात पृथ्वी ही एका खुंटीच्या जागी असते. लंबगोलाच्या मध्यबिंदुवर नसते. दुसरी खुंटी हा निव्वळ एक काल्पनिक बिंदू असतो. ही कल्पना झेपत असेल तर ठीक नसेल तर निव्वळ लंबगोल डोळ्यासमोर आणा आणि पृथ्वी या लंबगोलाच्या मध्यावर नाही हे लक्षात घ्या. यामुळे चंद्र हा कधी पृथ्वीच्या बराच जवळ येतो तर कधी लांब जातो. सूर्य, पृथ्वी आणि पृथ्वीची कक्षा यांचंही नातं असंच आहे. त्यामुळे पृथ्वीही सूर्याच्या कधी जवळ तर कधी लांब असते. चंद्र पृथ्वीभोवती आणि पृथ्वी सूर्याभोवती, एकाच ठराविक अंतरावरून फिरत नाहीत. गोलगोल फिरत नाहीत तर लंबगोल कक्षेत फिरतात.
     आपण पाहिलं की तोफ डागली की तोफगोळा खाली पडतो, जोरात सोडला तर पृथ्वीभोवती गोलगोल फेऱ्या घालतो, आणखी जोरात सोडला की तो गोलगोल कक्षेत फिरण्याऐवजी लंबगोल फेऱ्या मारतो. आणखी आणखी जोरात गोळा सोडताच लंबगोलची लांबी वाढत वाढत जाईल. पृथ्वीला वळसा घालून हा गोळा त्याच्या लंबगोलाकृती कक्षेत लांबवर जाईल, तिथून पुन्हा वेगानी पृथ्वीकडे झेपावेल, असं चालूच राहील. पृथ्वी ही एका खुंटीच्या जागी आहे.  आता कल्पना करा की हा गोळा आणखी  जोरात डागला आहे. आता तो इतक्या वेगात जाईल की लंबगोलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचताच, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचाही उपयोग होणार नाही. भेदुनी गुरुत्वाकर्षणा तो अंतराळात गडप होईल. त्याच गतीनी सरळ रेषेत जात राहील, अन्य कुठल्या आकाशस्थ ग्रहगोलाच्या गुरुत्वाकर्षणाच्या तावडीत सापडेपर्यंत.
पृथ्वी सूर्याभोवती अशाच लांबगोल कक्षेत फिरते. पण हा गोल फारसा लांबट नाहीये. इतरही ग्रह असेच जेमतेम लंबगोल कक्षेत फिरतात. अपवाद प्लुटोचा. पण सध्या प्लुटोला ‘ग्रह’ मानलं जात नाही. सूर्याभोवती फिरणारे धूमकेतू मात्र लांबच्यालांब लंबगोलाकृती कक्षेत फिरतात. इथे त्या खुंट्या खूप खूप लांब ठोकलेल्या आहेत.
सूर्य ही एक खुंटी आणि दुसरी खुंटी अर्थात अवकाशातील एक काल्पनिक बिंदू. धूमकेतू जितका सूर्यापासून दूर तितकी त्याची गती संथ. सूर्यापासून लांब लांब जाताना त्याची गती मंदावत जाते. सूर्यापासून सर्वात लांबच्या बिंदुवर (Aphelion) ती सर्वात कमी असते. तिथून वळून, जसजसा तो सूर्याकडे येऊ लागतो तशी त्याची गती वाढते. सूर्याला वळसा घालताना (Perihelion) ती सर्वाधिक असते. प्रचंड वेगाने तो पुन्हा कक्षेत भिरकावला जातो. तो धूमकेतू म्हणजे गोफणीतला दगड आहे जणू आणि सूर्य जोरात गोफणगुंडा फिरवून त्याला दूर भिरकावून देतोय. पुन्हा एकदा दूर जाताना गती मंदावत जाते. हे असं चक्र चालूच रहातं.
अंतराळतज्ञ या ‘गोफणगुंडा परिणामाचा’ वापर करून रॉकेटला लागणारं इंधन वाचवतात. शनीचा अभ्यास करण्यासाठी कॅसिनी यान गेलं, ते सगळ्यात जवळच्या मार्गानी नाही गेलं. अतिशय चाणाक्षपणे या गोफणगुंडा परिणामाचा जास्तीजास्त फायदा घेत ते सोडण्यात आलं. आधी शुक्राभोवती, मग पुन्हा पृथ्वीभोवती, मग पुन्हा शुक्राभोवती असे वेढे घालत ते गेलं. असे वेढे घालता घालता, दरवेळी ह्या गोफणगुंडा परिणामाचा उपयोग केला गेला. परिणामी ते फेकलं गेलं गुरुकडे. हा तर सर्वात मोठा ग्रह. ह्याचा परिणाम चांगलाच जबरदस्त. गुरुनी दे धक्का म्हणत हे यान शनीकडे भिरकावलं. पृथ्वी, शुक्र आणि गुरुनी दिलेल्या या चार धक्क्यांनी लांबून जावूनही हे यान कमी इंधनात शनीशी पोहोचलं. शनीची अफलातून कडी आणि त्याचे तब्बल ६२ चंद्र यांच्या दशेची अभूतपूर्व छायाचित्र आता आपल्याला इथे रोज पहायला मिळतात.
बहुतेक ग्रहांच्या कक्षा ह्या थोड्या लंबगोल आहेत, अपवाद प्लुटोचा. प्लुटो हा ग्रह म्हणवण्याइतका मोठा नाही असं आता सिद्ध झालं आहे. याची कक्षाही खूप ताणलेला लंबगोल असावा अशी आहे. सूर्याजवळच्या बिंदूशी प्लुटोची कक्षा ही नेपच्यूनच्या कक्षेला छेडून जाते. इतरवेळी नेपच्यूनच्याही बाहेरून फिरणारा हा ‘ग्रह’(?) सूर्याजवळून जाताना नेपच्यूनच्या आणि सूर्याच्या ‘मधून’ जातो. पण प्लुटोपेक्षाही लंबगोल कक्षेत धावणारे गोलक आहेत. हॅलेचा धूमकेतू हे एक प्रसिद्ध उदाहरण. सूर्याजवळून जाताना हा सूर्यप्रकाशात उजळून निघतो आणि तेवढयापुरता आपल्याला दिसतो. त्याची कक्षा इतकी ताणलेली आहे की एक फेरी पूर्ण करायला त्याला ७६ वर्ष लागतात. हॅलेचा हा धूमकेतू दर ७६ वर्षानी आपल्या जवळ येतो आणि पुन्हा ७६ वर्षासाठी नाहीसा होतो. १९८६ साली माझ्या तान्ह्या लेकीला, ज्युलिएटला, मी हा धूमकेतू दाखवला. तिला काहीच कळत नव्हतं. पण मी आपलं हट्टानं तिच्या कानात कुजबुजलो, ‘पुन्हा २०६१ मधे हा येईल तेव्हा तू हा बघशील कदाचित, पण तेंव्हा मी नक्कीच नसेन.’ 
     धूमकेतूची शेपूट म्हणजे धुळीचा लोळ. पण हा लोळ धूमकेतूच्या गतीमुळे उठत नाही. त्यामुळे आगगाडीच्या धुरासारखा हा मागे मागे जाणारा धूर नाही. हा तर सूर्यापासून सुसाट सुटणाऱ्या, ‘सूर्यकणां’च्या वाऱ्याच्या जोरदार फुंकरीमुळे उठलेला धुळीचा लोळ.  त्यामुळे धूमकेतूचं शेपूट हे सूर्याच्या विरुद्ध दिशेला पसरलेलं असतं. त्याच्या गतीची दिशा कोणतीही असो. सूर्यकणांचा हा वारा शिडात भरून त्या शक्तीवर अंतराळयान चालवण्याचे प्रयत्न आता चालू आहेत. एकेकाळी विज्ञान काल्पनिकात आढळणारी ही कल्पना आता जपानी शास्त्रज्ञ सत्यात उतरवण्याच्या बेतात आहेत. हा मार्ग बराच स्वस्त पडणार आहे. ‘चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या अंतराळा; अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला’; असं नव्या कोलंबसचं नवं गर्वगीत आता लिहावं लागेल..
    
ऋतुचक्राकडे तिरकस कटाक्ष!
     पृथ्वीची फिरण्याची कक्षा समजावून घेतली आपण, आता पुन्हा ऋतूचक्राकडे पाहूया. उन्हाळ्याचा आणि पृथ्वी सूर्याजवळ सरकण्याचा काही संबंध नाही हे मी वर सांगितलंच आहे. जानेवारीत पृथ्वी सूर्याच्या सर्वात नजिक असते आणि जानेवारीत तर आपल्याकडे कडाक्याची थंडी असते. पृथ्वीची कक्षा असा  परिणाम दिसण्याएवढी ताणलेली नाही. ती जवळजवळ गोलच आहे. प्लुटोची कक्षा मात्र तशी आहे. प्लुटोचा उन्हाळा आणि हिवाळा हा त्याच्या सूर्यापासूनच्या अंतरावर अवलंबून आहे. (आणि इथल्यापेक्षा प्लुटोवर उन्हाळ्यातही भलतंच गार असतं.)
     पृथ्वीवर ऋतुचक्र अनुभवायला येतं, ते पृथ्वीचा आस तिरका असल्यामुळे. कसं ते बघूया.
     पृथ्वीचा आस म्हणजे तिच्या दोन्ही ध्रुवातून आरपार जाणारी एक काल्पनिक रेषा. या भोवती पृथ्वी फिरते. पृथ्वीच्या अक्षाप्रमाणेच सूर्यातून आरपार या ध्रुवापासून त्या ध्रुवापार जाणारी रेषा कल्पिता येईल. हा सूर्याचा अक्ष. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे या अक्षाभोवती फिरते. स्वतः भोवती फिरताना स्वतःचा अक्ष आणि सूर्याभोवती फिरताना सूर्याचा अक्ष. हे दोन्ही आस जर एकमेकांना समांतर असते तर रोज दुपारी सूर्य विषुववृत्तावर बरोब्बर डोक्यावर असता. दिवस रात्रीचा कालावधी नेहमीच सारखा राहिला असता. विषुववृत्त सदा उष्ण आणि जसजसे आपण ध्रुवांकडे सरकू तसतशी थंडी. ऋतू नसतेच. उन्हाळा, हिवाळा प्रकार नाहीतच. थंडी हवी असेल तर धृवांकडे जायचं कारण अशा परिस्थितीत थंडी कधीच ‘पडणार’ नसते.
     प्रत्यक्षात सूर्याचा आणि पृथ्वीचा आस समांतर नाहीत. पृथ्वीचा आस हा २३.५ अंशांनी कलता आहे. युरेनसचा आस ही असाच कललेला आहे, तब्बल ९० अंशांनी! सूर्याभोवती फिरता फिरता युरेनसचा उत्तर ध्रुव काही काळ बरोब्बर सूर्याकडे तोंड करून असतो तर उरलेला काळ दक्षिण ध्रुव सूर्याकडे तोंड करून असतो. युरेनसच्या उन्हाळ्यात, सहा महिने, सूर्य उत्तर ध्रुवावर कधीच मावळत नाही, सतत माथ्यावर तळपत असतो. पृथ्वीचा आस असाच कलता असता तर आपल्याकडेही हेच चित्र दिसलं असतं. उत्तर ध्रुवावर उन्हाळ्यात सूर्य सतत माथ्यावर, उत्तर गोलार्धात सहा महिने दिवस, तर त्याचवेळी दक्षिण गोलार्धात सहा महिने रात्र. सारं काही थंड, गोठलेलं.
     पण ९० अंशांऐवजी पृथ्वीचा आस निव्वळ २३.५ अंश कलता आहे. हा कोन साधारण नव्वद अंशाच्या चतकोर आहे. त्यामुळे आपल्याकडे उन्हाळ्यात उत्तर ध्रुवावर सहा महिने दिवस असतो. पण युरेनससारखा इथे सूर्य माथ्यावर नसतो. सूर्य सतत क्षितिजावर निस्तेज असा तळपत रहातो, मिणमिणत रहातो. आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेला उन्हाळा हा असा असतो. ‘पहाटे’ पूर्व क्षितिजावर, ‘दुपारी’ दक्षिण क्षितिजावर, ‘संध्याकाळी’ पश्चिमेकडे, आणि ‘मध्यरात्री’ उत्तरेला, असा सूर्य दिसतो. तिथून सरकत सरकत पुन्हा दुसऱ्या ‘दिवशी’ पहाटे तो पूर्व क्षितिजावर दिसायला लागतो. आर्क्टिकवृत्ताच्यापल्याड गेलात की हेच चित्र अनुभवास येतं.
     स्कॉटलँड, हे आर्क्टिक वृत्ताच्या थोडसंच बाहेर (दक्षिणेला) आहे. इथे उन्हाळ्यात मध्यरात्री सूर्य थोडा वेळ मावळतो. थोडा वेळ रात्र पडते. पण या रात्रीही मिट्ट काळोख्या नसतात. संधीप्रकाश  असतो. कारण क्षितिजापलीकडे बुडालेला सोन्याचा गोळा फार खोल बुडालेलाच नसतो.
     उत्तरेला हिवाळा होतो तो उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर कलल्यामुळे. आणि उन्हाळा होतो कारण उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला कललेला असतो म्हणून. त्या त्या वेळी अर्थातच दक्षिण गोलार्धात विरुद्ध ऋतू असतात. उन्हाळ्यात दिवस लांब होतो तर हिवाळ्यात रात्र लांबते. पण आपण सूर्याच्या जवळ कलतो म्हणून तापमान वाढत नाही हं. आस कलल्यामुळे  सूर्यापासूनचं अंतर अगदी नगण्य प्रमाणात बदलतं. मग उन्हाळ्यात उकडतं ते का? आणि थंडीत थंडी का वाजते? दुपारचं ऊन हे रणरणत भाजकं, तर पहाटेच ऊन कोवळं का भासतं? तोच सूर्यमा नभात. मग किरणांचा कोन बदलला म्हणून इतका फरक? हो.
     पृथ्वीचा आस तिरपा असल्यामुळे आपल्यातील आणि सूर्यातील अंतर केवळ काही हजार किलोमीटरनी बदलतं. हा तसा नगण्य फरक. पृथ्वीची कक्षा लंबगोलाकार आहे. यामुळे सूर्याच्या सर्वात जवळ आणि सर्वात लांबच्या अंतरात मुळी ४८ कोटी किलोमीटरचा फरक पडतो. तेंव्हा महत्व अंतराला नाही. किरणांचा कोन महत्वाचा आणि किरणांचा कालावधी महत्वाचा. उन्हाळ्यात बराच काळ ऊन पडतं. दिवस मोठा झालेला असतो. हिवाळ्यात थोडाच वेळ सूर्य दर्शन होतं. उन्हाळ्यात सकाळपासून चटके देणारा सूर्य थंडीत, दुपारीसुद्धा ‘मार्तंड जे तापहीन’ होऊन जातो, कारण सूर्यकिरण आता अधिक तिरपे पडतात. दुपारचं ऊन भाजतं ते सूर्यकिरण सरळ येतात म्हणून. तेंव्हा सनस्क्रीन लोशन लावायचं तर दुपारी लावायला हवं. पहाटे आणि सायंकाळी ऊन कोवळं होतं कारण सूर्यकिरण तिरके पडतात. दिवस लांबल्यामुळे आणि प्रकाश अधिक प्रखर असल्यामुळे उन्हाळ्यात  झाडं जोमात वाढतात. थंडीत झाडांची वाढ खुंटते. तेंव्हा ऋतुचक्राचा संबंध शेतीशी आणि शेतीचा थेट आपल्या जीवनचक्राशी.
     सूर्याची ही तीरछी नजर महत्वाची खरीच. टॉर्च घेऊन हातावर सरळ प्रकाशझोत सोडा. एक प्रकाशगोल उमटेल हातावर. ठराविक क्षेत्रावर ठराविक प्रमाणात फोटॉनचा मारा होतो आहे. हे मोजणारी यंत्रही असतात.  आता टॉर्च (किंवा हात) तिरका करा. तोच गोल लांबोडका पसरेल. उजेड तितकाच, पण आता अधिक क्षेत्रफळावर पसरल्यामुळे तीव्रता विभागली जाते. फोटॉनची संख्या तीच, पण जास्त क्षेत्रफळावर पसरल्यामुळे प्रती चौरस से.मी. फोटॉन्सचा मारा, हा कमी होईल. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात, माध्यानी आणि उदयास्तकाळी हा फरक पडतो.  तुम्हाला आम्हाला पडतो तसा झाडांना तर विशेष पडतो. या सूर्यशक्तीवरच तर ती अन्न तयार करणार असतात. .
     ऋतुचक्र, दिवस-रात्रीचं चक्र, आपल्या आयुष्यावर गारुड करणारे हे दोन नैसर्गिक ताल. साऱ्या जीवसृष्टीवर ह्यांची सत्ता चालते. खोल-खोल अंधाऱ्या समुद्रतळीचे जीव तेवढे अपवाद. चंद्रभ्रमणामुळे होणाऱ्या भरती-ओहोटीचीही एक लय असते. खाड्यांमध्ये मुक्कामी असणाऱ्या जीवांनी त्या लयीशी जुळवून घेतलेलं असतं. आपल्याला विशेष फरक पडत नाही पण तरीही ह्या चंद्राच्या तर किती कथा! पोर्णिमा आणि अमावस्या, वेताळ आणि हडळ, शुभाशुभ आणि व्रतवैकल्य; बाप रे बाप. हा विषय इथेच थांबवून आपण सूर्याकडे वळूया. ह्या जीवसृष्टीच्या रायाची काया आहे तरी कशी ते जरा पाहूया.
    
    




No comments:

Post a Comment