प्रकरण १२
चमत्कार कशाला म्हणावे?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील
‘व्हॉट इज अ मिरॅकल?’ या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा.
मो.क्र. ९८२२० १०३४९
सुरवातीला जादू बद्दल
बोलताना त्यात परिकथेतील जादू (उदा: परिराणीची जादूची कांडी, अल्लाउद्दिनचा दिवा) आणि
जादूगाराची जादू (दृष्टीभ्रम, टोपीतून ससा काढणे, माणसाचे दोन तुकडे करून परत
जोडणे) असे दोन प्रकार आपण पाहिले. परीकथेतल्या चमत्कारांवर आणि जादूगाराच्या जादूवर
कोणी विश्वास ठेवत नाही. भोपळ्याची राजेशाही बग्गी ही फक्त सिंड्रेलाच्या गोष्टीतच
धावते आणि टोपीतून ससे जादूने नाही, तर हातचलाखीने येतात. पण अशाही काही चमत्कार कथा
आहेत की अगदी चमत्कारिक असूनही त्यांच्यावर माणसं आजही डोळे मिटून विश्वास ठेवतात,
त्यातले चमत्कार खरोखरच घडले होते असं मानतात. हे प्रकरण अशा चमत्कारांबद्दल आहे.
दिव्य, अतिनैसर्गिक, अतिमानवी आणि तरीही लोक खरे मानतात असे चमत्कार. परिकथा ह्या
शेवटी कथाच आणि जादुगार करतो ती अखेर हातचलाखीच पण चमत्कार ही चीजच वेगळी आहे.
यात काही गूढकथा आहेत. भूतकथा आहेत. ‘अनेक वर्ष विस्मृतीत
गेलेली कोणी प्रसिद्ध हस्ती स्वप्नात आली आणि दुसऱ्याच दिवशी ती गेल्याची बातमी
आली!’, अशा अतर्क्य योगायोगाच्या गोष्टी आहेत. जगभरच्या
शेकडो धर्मांनी तर अशा चमत्कारीक दैवी चमत्कारकथांचं बरंच रतीब घातलं आहे. उदाहरणच
द्यायचं झालं तर, अशीही एक धर्मकथा आहे की सुमारे २००० वर्षांपूर्वी, जिझसनामेकरून
एक फिरस्ता यहुदी प्रवचनकार एका लग्नसमारंभाला गेला. पाहतो तो तिथलं मद्य संपलेलं!
त्यानं तिथल्या तिथे पाण्याचं वाईनमध्ये रुपांतर करून टाकलं! अत्युत्तम वाईन.
भोपळ्याची बग्गी होण्यावर किंवा टोपीतून ससे निघण्यावर दैवी चमत्काराचा शिक्का न
मारणारी माणसं, रा.रा. जिझस यांच्या गोष्टीवर, पैगंबराने उडत्या घोड्यावरून थेट
स्वर्गारोहण केल्याच्या कथेवर मात्र सर्वस्वी विश्वास ठेवतात.
अफवा, योगायोग आणि षटकर्णी
कथा
प्रत्यक्ष चमत्कार पहिल्याचं सांगणारे विरळाच.
बहुतेकदा कुणाच्या आत्याच्या, नणंदेच्या, जावयाच्या, मावशीचा हा अनुभव असतो... आणि
आपल्यापर्यंत तिखट मीठ लावूनच येतो. या कथांचं मूळ एखाद्या प्राचीन दंतकथेत/घटनेत असतं आणि पिढ्यानपिढया त्यात इतके बदल होतात की
मुद्दलात घटना काय घडली याचा काहीही मागमूस लागणं शक्य नसतं.
कोणाही सु/कुप्रसिद्ध
व्यक्तीचं देहावसान होण्याचा अवकाश, ती व्यक्ती कोणालातरी प्रत्यक्ष दिसल्याच्या
कथांना ऊत येतो, अगदी जगभर. उदाः हिटलर, मेरलीन मन्रो आणि असे अनेक. अशा सांगोवांगीच्या
गोष्टी सांगत रहाण्यात लोकांना, का कुणास ठाऊक, पण मजा येते. अगदी उत्साहानं हे
काम चालतं. अफवा झपाटयान पसरण्याचं हे एक प्रमुख कारण.
मायकल जॅक्सन गेल्यावर, एका
प्रसिद्ध चॅनेलच्या टी.व्ही. चमूला, जॅक्सनच्या नेव्हरलँड नावाच्या अजबघराची सफर
घडवण्यात आली. या चित्रिकरणात एका दृश्यात एका व्हरांड्याच्या टोकाला एक जॅक्सनसारखी
आकृती दिसत होती. अगदी पुसट, धूसर अशी ती प्रतिमा होती. पण जॅक्सनच्या भुताची अफवा
पिकायला पुरेशी होती. ‘आम्हीही अमक्या अमक्या ठिकाणी पाहिलं’ म्हणणारे लगेच निपजले.
एकानी आपल्या चकचकीत गाडीच्या फोटोत भूत दिसत असल्याचं पिल्लू सोडलं. गाडीच्या
बॉनेटमध्ये आकाशातल्या ढगांचं प्रतिबिंब पडलंय हे खरं तर अगदी स्पष्ट आहे. पण जॅक्सनभक्तांच्या
उन्मादी कल्पनाशक्तीला त्यात फक्त भूत आणि भूतच दिसतंय! यु ट्युबवर या चित्राला
पंधरा कोटी हिट्स मिळाले आहेत!
ह्याचं कारण अगदी उघड आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि आपल्या मेंदूला आसपास मानवी चेहरा नसतानाही,
मानवी चेहरा शोधायची उपजत खोड आहे. ढग असो, भाजलेला ब्रेड असो वा भिंतीवरचे डाग
असोत, आपण नाक डोळे शोधत रहातो!
भयकथा ह्या कथा म्हणून
उत्तम असतात, विशेषतः भुताखेतांच्या आणि ‘खऱ्या’सारख्या वाटणाऱ्या. मी आठ वर्षाचा
असताना आम्ही एका, काळेकुट्ट वासे असलेल्या, चारशेवर्ष जुन्या, ‘ककूज’ नावाच्या, हवेलीत
रहायचो. या ठिकाणी एका धर्मगुरूचा आत्मा, एका गुप्त भुयारात रहातो अशी वदंता होती.
पायऱ्यांवर पावलं वाजायची त्या भुताची, पण नेहमी एक पायरी जास्त वाजायची; कारण
त्या धर्मगुरूच्या काळी, जिन्याला एक पायरी जास्त होती म्हणे! शाळेत मित्रांना हे
सांगताना कित्ती मज्जा यायची. त्यावेळी खऱ्याखोट्याचा विचार तर माझ्या मनाला शिवलाही
नाही. माझी हवेली जुनीपुराणी होती आणि मित्र अचंबित होत होते, एवढं सूख रग्गड होतं.
भूताखेतांच्या,
चमत्काराच्या गोष्टी सांगण्यात एक थरार असतो.
चमत्काराचंही तसंच आहे. हे चमत्कार जेव्हा ग्रंथित होतात, छापले जातात, तेव्हा
त्यांना आव्हानंच उरत नाही. त्यातून असं
पुस्तक जर प्राचीन असेल तर विचारायलाच नको. अशा वदंतांना आता परंपरेचा साज चढतो;
मग विश्वास आणखी दुणावतो. हे थोडं विचित्र आहे. ताज्या घडामोडींच्या कथा या
यथातथ्य असण्याची शक्यता अधिक. जुन्या कथांवर पिढीगणिक बदलांची पुटं जास्त. पण जुन्याचीच
विश्वासार्हता जास्त! मायकल जॅक्सन नुकताच गेला, त्यामुळे तो मंगळावर दिसला यावर
आत्ता कुणीही विश्वास ठेवणार नाही, पण न जाणो आज पासून २००० वर्षांनी...?
विचित्र योगायोगही असेच... वर्षानुवर्ष
विस्मरणात गेलेला माणूस स्वप्नात येतो काय आणि सकाळी त्याचंच पत्र येतं काय! ह्याची
संगती कशी लावायची? किंवा त्या व्यक्तीचं चक्क रात्रीतून निधन झाल्याचं कळतं? या
योगायोगाला काय म्हणावं?
ह्याला दुसरं काहीच म्हणू
नये; निव्वळ योगायोगच म्हणावं! नेहमीच्याच अपेक्षित घटनांच्या कथा होत नाहीत.
अनपेक्षित, अतर्क्य योगायोगाच्याच तर कथा होतात. ‘रात्री स्वप्नात माझा लांबचा
काका आला आणि सकाळी पहातो तो काय, तो आपला शाबूत!’; असं कोणी सांगत फिरत नाही,
नाही का?
कथा जितकी भयप्रद आणि
विचित्र तितका प्रसार जास्त. कोणाच्या स्वप्नात जुन्याकाळातली सुप्रसिद्ध सिनेतारका
पहिल्यांदाच हजेरी लावते आणि दुसऱ्याच दिवशी ती स्वप्नसुंदरी गेल्याचं कळतं. झालं,
साहेब मजकूर लगेच ‘वाचकांच्या पत्रात’ या निरोपाच्या भेटीचं रसभरीत वर्णन करतात.
पण क्षणभर विचार तर कराल; हा त्या वर्तमानपत्राच्या कोटीभर वाचकांपैकी फक्त एकाचाच
अनुभव आहे. ब्रिटनमध्ये दर दिवशी दोन हजार मृत्यू घडतात आणि दर रात्री शंभर
कोटींना तरी स्वप्नं पडत असतील. शंभर कोटी विरुद्ध दोन हजार ही आकडेवारी बघता,
स्वप्नी दिसलेला कोणी ना कोणी, कधी ना कधी, गेल्याची वार्ता येणं हा काही अशक्य योग
नाही. अतर्क्य तर नाहीच नाही. पण नेमके हेच योगीराज वाचकांच्या पत्रात हजेरी
लावतात.
शिवाय कथाकथन हे तिखटमीठ
लावूनच होत असतं. ऐकली, त्यापेक्षा सांगताना कथा सुरस आणि चमत्कारीक व्हावी असाच
प्रयत्न असतो. मूळ कथा आपल्याला रंजक करून
ऐकवली जाते आणि सांगताना, आपण ती रोमांचकारी करून सांगतो. स्वप्नातली व्यक्ती
सकाळी गेल्याचं ऐकताच कोणी ती किती वाजता निवर्तली, याची चौकशी करतो. गेलेली
व्यक्ती पहाटे तीनच्या सुमारास वारली अशी माहिती कळते. मग स्वप्नही तीनच्या
सुमारास पडल्याचं आपोआपच लक्षात येतं. आता हळूहळू ‘सुमारास’ बाजुला पडतो
आणि ‘नेमकं’ त्याची जागा घेतो. कथनागणिक प्राणही नेमके तीन वाजता कुडी
सोडतात आणि कुणाच्या आत्याच्या, नणंदेच्या, जावयाला स्वप्नही नेमकं दोन वाजून साठ
मिनिटांनीच पडायला लागतं.
योगायोगाची संगतीही कधीकधी
लागते. जगप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन यांची पत्नी टी.बी.नं वारली.
तिच्या खोलीतल्या घड्याळाचे काटेही नेमके त्याच वेळी थांबले! आहे की नाही अघटीत? पण
डॉ. फेनमन हा महान शास्त्रज्ञ समजला जातो ते काही उगीच नाही. त्यानी याही गूढाचा
छडा लावला. घोळ घड्याळात होता. ते तिरकं केलं की बंद पडायचं. त्या अंधाऱ्या खोलीत,
ड्युटीवरच्या नर्सनी, मृत्यूची वेळ पहाण्यासाठी हे घड्याळ थोडं खिडकीकडे कलतं केलं,
ते पडलं बंद. अर्थातच, नेमकं मृत्युच्याच वेळेला! यात चमत्कार तो कसला? सारा
खेळ तांत्रिक बिघाडाचा होता.
तांत्रिक बिघाड नसता, आणि अगदी
मृत्यूघटीकेलाच घडयाळाची किल्ली संपली असती, तरीही ही काही फार चमत्कारिक गोष्ट
नाही. अहोरात्र, मिनिटा-सेकंदागणिक अमेरिकेत अनेक घड्याळं बंद पडत असतील आणि
अहोरात्र, मिनिटा-सेकंदागणिक माणसंही मरत असतील. पण, ‘घड्याळ बरोब्बर ४.५०ला
थांबलं पण कोणीही मेलं नाही बुवा’, ही बातमी होत नाही.
एक जादूगार चक्क
टी.व्ही.वरून मनःशक्तीनी बंद घड्याळ चालू करून दाखवायचा. घरातलं बंद घड्याळ हातात
गच्च धरा असं आवाहन करून तो मनःशक्ती केंद्रित केल्याचा आव आणायचा. काही वेळातच
शेजारचा फोन वाजायचा आणि पलीकडून अमेरिकेतल्या कुठल्यातरी कोपऱ्यातून बोलणारी
व्यक्ती तीचं घड्याळ सुरु झाल्याचं सांगायची!
एक कारण हे थोडसं
फेनमनबाईंच्या गोष्टीतल्यासारखं असू शकेल. आताच्या घड्याळांची बात सोडा, पण
तेंव्हा किल्लीची घड्याळं होती. किल्ली संपलेलं घड्याळ किल्ली द्यायला उचललं, की
त्या धक्यानी त्याची स्प्रिंग हलायची आणि ते थोडावेळ पुन्हा टिकटिकू लागायचं.
घड्याळ हातात घट्ट धरलं की त्याला थोडी उब मिळते आणि यानीही स्प्रिंग हलू लागते.
असं क्वचितच होतं पण ते पुरतं. जेंव्हा देशभर टीव्हीचे हजारो प्रेक्षक एकाच वेळी
आपापली बंद घड्याळं उबदार हातात घट्ट धरणार आहेत, तेंव्हा दहाहजारात एखादं घड्याळ
सुरु झालं तरी बास झालं. तो एक फोन मनःशक्तीची प्रचिती द्यायला पुरेसा आहे.
घड्याळं चालू न झालेले ९९९९ लोक फोन करण्याचा प्रश्नच नाही. ते गुलदस्त्यात
रहातात. त्यांचा गजर आपल्यापर्यंत पोहोचतच नाही.
चमत्कारांकडे पहाण्याचा
योग्य दृष्टीकोन
अठराव्या शतकातील, प्रसिद्ध
स्कॉटिश तत्वज्ञ डेव्हिड ह्यूमनी चमत्कारांबद्दल रास्त मत मांडलं आहे. चमत्कार
म्हणजे निसर्ग-विज्ञानाच्या नियमाविरुद्ध काहीतरी घडणं अशी व्याख्या तो करतो.
पाण्यावर चालणे, पाण्याची वाईन होणं, मनःशक्तीने घड्याळ सुरु होणं किंवा बेडकाचा
राजकुमार होणे वगैरे...असे चमत्कार म्हणजे जादूबद्दलच्या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे
विज्ञानाची गोचीच की. पण केंव्हा? असं काही घडलं तर! मग ह्या चमत्कारिक कथांना
सामोरं तरी कसं जावं? ह्याच प्रश्नाचं ह्यूम सायबाचं उत्तर असं की, ‘चमत्काराच्या
समर्थनार्थ सादर केलेला पुरावा खोटा ठरणे हाच जर चमत्कार ठरणार असेल तरच तो पुरावा
ग्राह्य धरावा; आणि तोच चमत्कार, चमत्कार मानावा!’
ह्या क्लिष्ट भाषेपेक्षा
आपण थोड्या वेगळ्या शब्दात हा मुद्दा मांडून पाहूया. उदाः जॉन खोटं बोलतोय हा जर
मोठा चमत्कार ठरणार असेल तर त्यानी सांगितलेली चमत्कार कथा तुम्ही सत्यच मानली
पाहिजे. तुम्ही म्हणाल, ‘सत्यवचनी जॉन, हा कधीच खोटं बोलत नाही. तो खोटं बोलला तर
तोच एक चमत्कार ठरेल. त्यामुळे जॉननी अनुभवलेला चमत्कार हा सत्यच असला पाहिजे.’
ह्यूम साहेब म्हणतो, ‘हे ठीकच. जॉन थापा मारण्याची शक्यता कमीच आहे पण त्यानी
वर्णिलेला चमत्कार खरा असण्याची शक्यता किती? थापेच्या शक्यतेपेक्षा मोठी की
लहान?’ समजा जॉन सांगायला लागला की त्यानी एका गायीला चंद्रापेक्षाही ऊंच उडताना
बघितलं!! अर्थात उडत्या गायींच्या अशक्यशा चमत्कारापेक्षा; एरवी सत्यवचनी,
प्रामाणिक, भरवशाचा जॉन आता थापा मारतोय हा ‘चमत्कार’ जास्त शक्य आहे. म्हणुनच जॉन
थापा मारतोय (किंवा त्याचा प्रामाणिक गैरसमज झालाय किंवा त्याला भास झाला) हे
ग्राह्य धरायचं.
हे एक टोकांचं आणि काल्पनिक
उदाहरण झालं. आपण रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घेऊ आणि ह्यूम सायबाच्या
म्हणण्याप्रमाणे तपासू. १९१७ साली फ्रान्सिस ग्रिफिथ आणि एल्सी राईट या दोन चुलत बहिणींनी
पऱ्यांचे फोटो काढले, म्हणे. आज हे फोटो बकवास आहेत हे आपण सहज सांगू शकतो. पण
त्या काळी फोटोग्राफी नुकतीच उदयाला येत होती. इतर अनेकांबरोबर, गुप्तहेरशिरोमणी शरलॉक
होम्सचा जनक, सर आर्थर कोनान डॉयल हाही ह्या
परि(फोटो)कथेवर भुलला होता! पुढे अगदी उतरत्या वयात ह्या दोन वाह्यात
भगिनींनी आपल्या पऱ्या या निव्वळ पुठ्ठ्याच्या आकृत्या असल्याचं गुपित उघड केलं. आपण
ह्यूमसायबासारखा विचार करू या आणि आर्थर कोनान डॉयल प्रभृतींना स्वतःची फसगत का
आणि कशी टाळता आली असती ते बघूया. खालीलपैकी कोणती शक्यता ‘चमत्कार’ समजली जाईल?
1. पऱ्या खऱ्याच असतात, पाठीला
पंख असलेल्या, फुलांच्या ताटव्यात बागडणाऱ्या.
2. त्या दोघी बहिणींचा हा बनाव
आहे. त्या ‘फोटोचलाखी’ करत आहेत.
उत्तर अगदी सरळ आहे, नाही
का? लहान मुलं नेहमीच नाटक-नाटक खेळत असतात. ‘फोटोचलाखी’करणं किती सोप्पं आहे. पण
समजा ते किचकट आहे, त्या मुली प्रामाणिक आहेत, कध्धी कध्धी खोड्या काढत नाहीत,
त्यांनी ‘सदा सत्यंवदंती’ औषध घेतलं आहे, लाय डिटेक्टर टेस्ट उत्तीर्ण झाल्या
आहेत... त्यामुळे त्यांनी वाह्यातपणा करणं हा चमत्कारच म्हणायचा! आता ह्याला
ह्यूमसायबाचं उत्तर काय? ह्यूम साहेब म्हणतो, ‘फोटोचलाखी’पेक्षा ‘पऱ्या’ हा ‘अधिक
मोठा चमत्कार’ आहे; सबब आपण फोटो चलाखीचीच शक्यता रास्त समजायला हवी.
सर कोनन डॉयल यांच्या
प्रतिष्ठेला लागलेला बट्टा सोडता, ह्या
भगिनींच्या व्रात्यपणामुळे फारसं नुकसान झालं नाही. पण मस्करीची कुस्करी होऊ शकते.
सतराव्या शतकात सालेम(न्यू इंग्लंड)मध्ये अचानक काही मुलींना चेटुकबाधा झाली, म्हणे. त्यांच्या लंब्याचवड्या
थापांवर गावातल्या अंधश्रद्धाळू थोरांनीही विश्वास ठेवला. गावातल्याच काही
म्हाताऱ्या (आणि काही म्हातारेसुद्धा) सैतानाच्या साथीनं, गावात चेटूक करताहेत
असाही शोध या मुलींनी लावला. ह्या डाकिणी हवेत उडताना, झाडावर लोंबकळताना, एकूणच
चेटकिणीसारख्या वागताना दिसायच्या म्हणे त्यांना. परिणाम अत्यंत भीषण झाले. जवळपास
वीस लोकांना फासावर लटकवण्यात आलं. केवळ त्या पोरींच्या सांगण्यावरून एका
संशयिताला अत्यंत क्रूरपणे दगडांनी ठेचून
मारण्यात आलं. त्या मुलींनी त्याचं नावं घेतलं, नाही नाही ते आरोप केले, एवढाच
त्याचा गुन्हा. काय हेतू असेल त्या मुलींचा? त्यांना बाता मारण्यात एकमेकींवर
कुरघोडी करायची होती काय? आज समाजमध्यमांमध्ये एखाद्याचा असाच बकरा केला जातो,
तसंच काहीसं होतं का हे? का त्याही प्रामाणिकपणे हे सगळं मानतच होत्या?
असो, आपण इतर लीलाकथांकडे
आणि त्यांच्या उगमाकडे वळूया. मुली सांगताहेत आणि अन्य विश्वास ठेवताहेत याचं आणखी
एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे फातिमाचा चमत्कार. पोर्तुगल मधील फातिमा गावातल्या
ल्युसिया नावाच्या चिमुरडीला आणि तिच्या बरोबरीच्या फ्रान्सिस्को आणि जासिन्ता या
भावंडांना, शेजारच्या टेकडीवर साक्षात्कार झाला. तिथे चक्क माता मेरीनी ह्यांना
दर्शन दिलं. तिला आणि तिच्या भावंडांना तिनी येत्या ऑक्टोबरपर्यंत दरमहा १३
तारखेला यायचं वचनही दिलं. १३ ऑक्टोबरला, आपण खरोखरच मेरी असल्याचं सिद्ध
करण्यासाठी, काही चमत्कार करून दाखवणार असल्याचही तिनी सांगितलं म्हणे. झालं, हा
हा म्हणता ही बातमी पोर्तुगलभर पसरली आणि १३ ऑक्टोबरला ७०,००० लोक हा चमत्कार
अनुभवायला जमले. झाला की चमत्कार! काहींना सूर्य नाचताना दिसला, काहींना गरागरा
फिरताना. सर्वात नाट्यमय वर्णन येणेप्रमाणे...
‘साक्षात सूर्यच निखळला जणू
आणि कोसळलाच आम्हा पहाणाऱ्यांवर... अगदी शेवटच्या क्षणी थांबला तो.. पोळलोच असतो
आम्ही... पण तो पुन्हा गेला नभोमंडपी आणि तळपू लागला... जणू काही झालंच नव्हतं...’
काय बरं झालं असेल? चमत्कार
म्हणावा का हा? मेरी खरंच आली? त्या मुलांशिवाय मेरीचं साक्षात दर्शन तर काही
कुणाला झालं नाही, त्यामुळे हा भाग राहू दे. पण सूर्य कोसळल्याचं तर हजारोंनी
पाहिलं होतं, त्याचं काय? का पृथ्वी सूर्याकडे सरकली आणि सूर्य हलल्यासारखा आभास
झाला?ह्यूमसायबाचं स्मरण करताच तीन शक्यता दिसतात...
1.
सूर्य झेपावला पृथ्वीकडे, (किंवा पृथ्वी सूर्याकडे) पण
भेदरलेल्या जमावावर न कोसळता तो पुन्हा स्थिरस्थावर झाला.
2.
काहीच झालं नाही. सूर्य पृथ्वी, कुणीच जागा सोडली नाही.
फक्त सगळ्या उपस्थितांना एकसाथ भास झाला.
3.
काहीच झालं नाही, संपूर्ण घटना म्हणजे अफवा आहे, पराचा
कावळा आहे किंवा चक्क लोणकढी थाप आहे.
यातली कोणती गोष्ट शक्य
मानायची? वरवर पहाता, सगळ्याच शक्यता अशक्य. तिसरी शक्यता अर्थातच ‘चमत्कार’ नाही
पण शक्यतेच्या कोटीतली आहे. सत्तरहजारांनी सूर्य हलताना पहिल्याची थाप कोणीतरी ठोकून
दिली आणि ती, नेटवर एखादी गोष्ट व्हायरल व्हावी तशी, वाढता वाढता वाढे पसरत गेली, एवढंच
समजावं लागेल. दुसरी शक्यता तिसऱ्यापेक्षाही असंभव वाटते. सत्तर हजारांना एकाच
वेळी एकच भास होणं...? अशक्यच! हाही चमत्कारच! पण पहिल्या शक्यतेपेक्षा हा अगदी
किरकोळ चमत्कार.
सूर्य हलला ही पहिली शक्यता
आहे. निम्म्या पृथ्वीवर सतत प्रकाश ढाळणारा सूर्य स्थानभ्रष्ट झाला तर तो काय
निव्वळ फातिमा नगरातून दिसेल? अन्य पृथ्वीवासियांना काहीच जाणवणार नाही? ह्याहीपेक्षा
महत्वाचं म्हणजे सूर्य, किंवा पृथ्वी, किंवा दोन्ही, जर वर्णन केल्याप्रमाणे
कोसळले तर हे जग संपलच म्हणायचं. सूर्य किंवा पृथ्वी स्थानभ्रष्ट झाले, तर
दुसऱ्याच क्षणी पृथ्वी कक्षा सोडून थंडगार अंधाऱ्या अंतराळात दूरदूर भिरकावली तरी जाईल;
किंवा सूर्याच्याच अंगावर पडून तत्क्षणी
होरपळली जाईल. पाचव्या प्रकरणात आपण पाहिलं की, ताशी काही हजार कि.मी.च्या
वेगानी पृथ्वी गिरक्या घेते आहे. पण सूर्य इतका दूर आहे, इतका दूर, की तो अतिशय
संथपणे उगवतो आणि संथपणे मावळतो असंच भासतं आपल्याला. तेव्हा सूर्य अंगावर पडतोय
असं वाटायला प्रत्यक्षातली गती ही नेहमीपेक्षा कित्येकपट हवी. एवढी की पृथ्वीची गच्छंती
ठरलेलीच.
ल्युसियानी सगळ्यांना
सूर्याकडे टक लावून बघायला सांगितलं होतं. हे महाधोक्याचं आहे, यामुळे कायमचं अंधत्व
येऊ शकतं. पण असं केल्यानी सूर्य हललाय असा भासही होऊ शकतो. एखाद्याला जरी भास
झाला, किंवा एखाद्यानं जरी थाप ठोकून दिली, तर राईचा पर्वत व्हायला असा कितीसा वेळ
लागणार?... आणि अशी कथा कर्णोपकर्णी होत षटकर्णी व्हायला आणखी असा कितीसा वेळ
लागणार? मग कुणी ना कुणीतरी हा चमत्कार
लिहून ठेवणार...! पण ह्यूम सायबाला वरीलपैकी नेमकं काय झालं ह्याच्याशी देणंघेणं
नाही. सत्तर हजारांना एकाच वेळी भास होणं अशक्यकोटीतलं आहे पण सूर्य स्थानभ्रष्ट
होणं त्याहीपेक्षा अशक्यकोटीतलं आहे आणि फक्त एवढंच महत्वाचं आहे.
चमत्कार म्हणजे थोतांड
असतात असं म्हणत नाही तो. तो म्हणतो एक अशक्यकोटीतली घटना म्हणून याकडे पहा. शक्याशक्यतेचा
विचार करा. नेमकं गणित नाही मांडता आलं तरी चालेल. चमत्काराच्या शक्यतेचा
(स्थानभ्रष्ट ग्रहतारे) विचार अन्य शक्यतांच्या (भास, थापा) तुलनेत करता आला की
झालं.
पहिल्या प्रकरणात आपण पत्याचा
डाव बघितला त्याकडे वळूया. अआप्न पाहिलं की एकदा पत्त्यातल्या चार भिडूंना, एकाला
सगळीच्या सगळी चौकटची पानं, एकाला फक्त बदामची, एकाला निव्वळ इस्पिकची आणि एकाला
किल्वरची, असं झालं. कशी बरं संगती लावायची याची? तीन शक्यता आहेत...
1.
काही दैवीशक्ती/जादू/चेटूक यामुळे विज्ञानाचे नियम मोडून
पडले. पत्यांवरची इस्पिक, किल्वर, बदाम आणि चौकटची चिन्ह नकळत बदलली गेली आणि हा
चमत्कार घडला.
2.
शुद्ध योगायोग. पत्ते पिसले गेले, काही तरी डाव वाटला जायचा
तो असा वाटला गेला.
3.
शुद्ध हातचलाखी. पिसलेला कॅट बदलून आधीच लावलेला कॅट वाटला
गेला.
ह्यूम सायबाचा सल्ला लक्षात
घेता आता काय मत आहे तुमचं? तिन्ही शक्यता अचाटच आहेत पण तिसरी सहज शक्य आहे.
दुसरीही अशक्य नसली तरी ५३,६४४,७३७,७६५,४८८,७९२,८३९,२३७,४४०,००० डावात एकदा एवढीच
शक्यता आहे. पहिली? याची शक्यता आकड्यात मांडणं शक्य नसलं तरी विचार तर कराल...
कोणालाही कसलाही थांग नसलेली एक शक्ती बावन्न पानं एका झटक्यात बदलू शकते? ‘अशक्य’
म्हणवणार नाही कदाचित तुम्हाला, पण म्हणायची गरजही नाही. ह्युमसाहेब म्हणतो फक्त
पर्यायांची तुलना करा. इथे शुद्ध योगायोग आणि शुद्ध हातचलाखी असे पर्याय आहेत. पत्त्याच्या
हातचलाखीच्या जादू तर आपण कितीतरी वेळा बघतो, करतो सुद्धा. त्यामुळे हातचलाखीच असणार
ही, योगायोग अगदीच दुर्मिळ आणि दैवी चमत्कार अशक्यकोटीतलाच.
आणखी एक जगप्रसिद्ध उदाहरण
घेऊ. जिझस नामेकरून ज्यू प्रवचनकारानी पाण्याची वाईन बनवली असं सांगतात. पुन्हा
एकदा तीन शक्यता दिसतात...
1.
हा चमत्कारच आहे.
2.
ही हातचलाखी आहे.
3.
असं काही घडलेची ना. ही एक दंतकथा आहे. वदंता आहे. किंवा
कुठल्याशा किरकोळ घटनेचा गैरअर्थ लावला गेलाय.
अशक्यतेचा कोटीक्रम इथे
अगदी उघड आहे. पहिली शक्यता मानायची तर विश्वाचे नियमन करणारे जगन्मान्य असे अनेक
नियम मोडीत निघतील. भोपळ्याची बग्गी आणि बेडकाचा राजपुत्र का होऊ शकत नाही हे
पाहिलंय आपण सुरवातीलाच. मंतरलेल्या पाण्यातून वाईन तयार होण्यासाठी पाण्यापासून अचानक
अल्कोहोल, टॅनीन, शर्करा वगैरेचं नामी मिश्रण तयार व्हायला हवं. पहिली शक्यता
मानायची तर, इतर दोन शक्यता याहीपेक्षा पराकोटीच्या असंभाव्य हव्यात.
हातचलाखी? अर्थातच शक्य
आहे. याही पेक्षा भन्नाट प्रयोग तर स्टेजवर केले जातातच की. पण दंतकथा, ही तिसरी
शक्यताच सर्वात संभाव्य आहे. जी गोष्ट घडल्याचा कोणताही पुरावा नाही त्यासाठी एवढी
माथेफोड करायची, हातचलाखीची सबब सांगायचीही गरज नाही. लोक कथा रचतच असतात. त्यालाच
ललित साहित्य म्हणतात. दंतकथा ही थेट शक्यता असताना, हातचलाखी किंवा विश्वनियामक
नियम उलथेपालथे करणाऱ्या तर्कदुष्ट चमत्काराचा विचारही करण्याची गरज नाही.
जिझसबद्दल तर बऱ्याच कथा
प्रसृत आहेत. एक ‘चेरी ट्री’ म्हणून मेरीमातेचे ‘डोहाळे गीत’ही आहे. एकदा मेरीला
चेरीची फळं खाण्याचे डोहाळे लागले पण जोसेफ काही ते पुरवेना तेव्हा...
विनवी गर्भवासी येशू I मेरीच्या उदरातून II
वेली येई हातालागी I आईचे डोहाळे पूरवी II
आणि फांदी झुके खाली I फळे येती हातालागी II
मेरी दावे जोसेफाला I लाड पुरविती लता II
डोहाळे पुरवण्याची ही कथा,
एक लोककथा आहे. कोणत्याच धर्मग्रंथात ती नाही. ही सत्यकथा आहे, असं कुणी शिकलेसवरलेले मानत नाहीत. ‘पाण्यापासून वाईन’ कथा मात्र खरी मानणारे
बरेच आहेत पण चेरीची कथा ही निव्वळ
काल्पनिक आहे हे अर्व्मान्य आहे. चेरीची कथा आहे ५०० वर्षापूर्वीची, वाईनची
त्याहून पुराणी. वाईन कथा एका शुभवर्तमानात (गोस्पेलमध्ये) येते (‘जॉनच्या
शुभवर्तमाना’त ही कथा आहे अन्य तीन शुभवर्तमानात नाही). पण ही दंतकथाच असणार;
निव्वळ काही शतकं आधी रचलेली. सर्व गोस्पेल, घटना घडून गेल्यावर बऱ्याच काळानी लिहिली
गेली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कुठेच नाही. तेव्हा चेरी
कथेप्रमाणेच वाईनकथाही कपोलकल्पितच म्हणायला हवी.
हाच युक्तीवाद सर्व तथाकथित
दैवी, अतिनैसर्गिक चमत्कारांना लागू पडतो. आपल्या बुद्धीपल्याडचे काही घडत असेल;
हातचलाखीही नाहीये, योगायोगही नाही, तर मग चमत्कार म्हणावा का आपुला? नाही!
पहिल्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे असं समजणं म्हणजे पुढच्या सर्व शोधाला,
तपासणीला पूर्णविराम. एकदा चमत्काराचं लेबल लावलं की शोध संपतो, शोधायची
जबाबदारीही संपते. हे आळसाचं, अप्रामाणिकपणाचं आहे. आज याचा कार्यकारणभाव ज्ञात
नाही आणि उद्याही ज्ञात होणं शक्य नाही, असं मान्य केल्यासारखं आहे हे. ‘अतिनैसर्गिक’
असा शिक्का ही शरणागती आहे, आज ह्याचा बोध होत नाहीये आणि पुढे कध्धीच होणार नाही
असं मान्य केल्यासारखं आहे.
आजचा चमत्कार; जणू उद्याचे
तंत्रज्ञान.
विज्ञानाला समजलेलं नाही
असं बरंच बरंच आहे या जगात. पण म्हणून त्या सगळ्याला अतिनैसर्गिक चमत्कार म्हणून, काहीतरी
थातूरमातुर कारणं जोडून, शोध सोडायचा म्हणता? मध्ययुगातला कुणी विद्वान आज अवतरला
तर जेट विमान, लॅपटॉप, मोबाईल, जीपीएस यावर त्याची पहिली प्रतिक्रिया काय असेल
बरं? सगळ्याला तो अतिनैसगिक चमत्कारच समजेल. पण ही सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाची
कमाल आहे हे तुम्ही आम्ही जाणतो. विज्ञानाच् सहाय्यानं आपणच ही यंत्र बनवली आहेत.
त्यांचं कार्य आणि कार्यकारण आपल्याला माहित आहे. यासाठी जादू, चेटूक, चमत्कार
वगैरेची भाषा आपल्याला गरजेची नाही. त्या विद्वानाला तसं वाटलं तरी तो गैरसमज आहे
हे अगदी उघड आहे.
मध्ययुगात जाण्याचीही गरज
नाही. मोबाईलवर बोलत बोलत, एकमेकांशी संपर्कात रहात आज कुणी दरोडा घातला, तर शरलॉक
होम्सला हा कर्णपिशाच्याचा प्रयोग वाटेल. होम्सच्या काळी, एखाद्यानी लंडनमध्ये
ज्या दिवशी खून झाला, त्या दिवशी तो न्यूयॉर्क मध्ये असल्याचं सिद्ध केलं, की तो
निर्दोष सुटलाच म्हणायचं. पण आज विमानाच्या एका झेपेत एकाच दिवशी दोन्हीकडे असणं,
आणि खून करणं, सहजशक्य आहे. हे अशक्य आहे असं म्हणणारा आज ‘चमत्कारीक’ ठरेल. ‘प्रगत
असं कोणतंही तंत्रज्ञान हे जादूच भासतं!’ ह्यालाच क्लार्कचा तिसरा नियम म्हणतात. सुप्रसिद्ध
वैज्ञानिक आणि विज्ञानकथाकार, आर्थर सी. क्लार्क हे याचे प्रणेते.
काळप्रवास करून शतकभर पुढे
गेलो आपण तर, आज चमत्कार वाटणाऱ्या कित्येक गोष्टी शतकभरानी व्यवहारात असतील. अर्थात
आजची प्रत्येक कविकल्पना म्हणजे उद्याचं
विज्ञान नव्हे. काळयंत्र, प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास, गुरुत्वाकर्षणरोधक यंत्र,
असं काय काय विज्ञानकथांत असतं, पण हे सारं प्रत्यक्षात येईल असं नाही. कल्पनेच्या
काही भराऱ्या वास्तवात उतरतील, बऱ्याचश्या नाहीच उतरणार.
विचार केला तर लक्षात येतं
की चमत्कार वगैरे सारं काही थोतांड आहे. विज्ञानाला बुचकळ्यात टाकणारं काही घडलंच
तर दोनच शक्यता आहेत, अगा हे घडलेची नाही (फसवणूक, भास, थापा वगैरे) किंवा
विज्ञानातली त्रुटी लक्षात आली आहे, विज्ञानाला तडाखेबंद आव्हान उभं राहीलं आहे. हे
आव्हान स्वीकारून, जोपर्यंत या घटिताचा अर्थ लागत नाही, तो पर्यंत चिकाटीनं
विज्ञानात सुधारणा करणं, हाच मार्ग खरा. यासाठी कदाचित अत्यंत नवं, पूर्णतः
अपरिचित असं विज्ञान रचावं लागेल. लागलं तरी बेहत्तर. असं झालंय पूर्वी. पण आळशी, ‘ठेविले
अनंते’ अशी वृत्ती असणारी, अज्ञाताचं भय बाळगणारी माणसं या घटीताला बेलाशक ‘अतिनैसर्गिक’,
‘दैवी’, ‘चमत्कार’ असं काय काय म्हणतात. असं कशाला म्हणायचं? कोडं म्हणा, गूढ म्हणा,
पण हे आव्हान म्हणून स्विकारा. चमत्कार तरी फोल ठरेल किंवा विज्ञान तरी नव्या
दिशेने बहरेल. तेंव्हा चमत्काराला नमस्कार करण्यापेक्षा, थेट भिडणं हाच मार्ग खरा.
जोपर्यंत योग्य उत्तर सापडत नाही तोपर्यंत, ‘हे आम्हाला माहीत नाही, यावर संशोधन
चालू आहे’, असं मान्य करण्यात मुळीच कमीपणा नाही. उलट प्रामाणिकपणा आहे.
चमत्कार, जादू, दंतकथा...
मजा असते या साऱ्यात. पुस्तकभर ही मजा अनुभवली आहे आपण. उत्तमोत्तम गोष्टी
सगळ्यांनाच प्रिय असतात. प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीच्या कथा तुम्हाला भावल्याच
असतील पण मला आशा आहे की त्यानंतरच्या विज्ञानात, विज्ञानानंदात तुम्ही रंगून गेला
असाल. वैज्ञानिक सत्यातही जादू असते,
काव्य असतं, नाट्य असतं. विज्ञान तर कितीतरी सरस आहे, रंजक आहे, नेमकं आहे.
माणसाला या विश्वाच्या पसाऱ्यात कस्पटाएवढंही स्थान नाही हे लक्षात आणून देणारं
आहे. मनुष्यमात्रांचा अहंभाव निखळून पाडणारं आहे. विश्वाच्या पसाऱ्याप्रती विस्मय
वाढवणारं आहे. हाच आहे निखळ वैज्ञानिक सत्याचा चमत्कार. हेच आहे जादुई सत्य.
या आणि अशा अन्य लेखांसाठी
माझ्या ब्लॉगला जरूर भेट दया:
shantanuabhyankar.blogspot.in
No comments:
Post a Comment