प्रकरण १
सत्य कोणतं आणि जादू कुठली?
रिचर्ड डॉकिन्स यांच्या
‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील
‘व्हॉट इज रिअॅलिटी? व्हॉट इज मॅजिक?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३
जे जे आसपास आहे तेवढंच सत्य,
ते सगळं वास्तव. सरळ आहे, नाही का? खरंतर नाही. अनेक प्रश्न आहेत. डायनॉसॉरचं काय?
ते आत्ता आसपास दिसत नाहीत, एके काळी होते. तारे? इतक्या दूरवरचे तारे की आपल्यापर्यंत
त्यांचा प्रकाश पोहोचेपर्यंत ते विझूनही गेले असतील. म्हणजे आपल्याला जेव्हा ते
दिसत असतात, तेव्हा ते तिथे नसतातच.
तारे आणि डायनॉसॉरचं जाऊदे.
पण आज, आत्ता, इथे, वास्तवाची जाणीव कशी होते आपल्याला? अर्थात डोळे, नाक, त्वचा,
कान, जीभ या पंचेन्द्रीयांमुळे... मृग आणि मृगजळ, मृद्गंध आणि कस्तुरी, काटे आणि
मखमल, धबाबा कोसळणारा धबधबा आणि दारावरची मंजूळ बेल, साखर आणि मीठ... हे सगळं, सगळं
आपल्याला समजतं; ही तो पंचेंद्रियांची
किमया. पण जेवढं पंचेंद्रियांना जाणवतं तेवढंच आहे का हे जग?
दूरदूरच्या प्रचंड आकाशगंगा
आपल्याला दिसत नाहीत आणि सूक्ष्मजीवही आपल्याला दिसत नाहीत. नुसत्या नजरेला दिसत
नाहीत म्हणून ते नसतात असं थोडंच म्हणतो आपण? दुर्बिणीनी आकाशगंगा आणि
सूक्ष्मदर्शकानी बॅक्टेरीया दिसतात की. या उपकरणांच्या मदतीनी आपली नजर अधिक तेज
अधिक दूरवर रोखतो आपण. या उपकरणांचं कार्य, सामर्थ्य आणि मर्यादा जाणतो आपण.
त्यातून दिसलेली दृष्टीआडची लुभावणी सृष्टी, तारका, सूक्ष्मजीव प्रत्यक्षात आहेत अशी
खात्री बाळगतो आपण.
रेडियो लहरी असतात का? दिसत
नाहीत, ऐकूही येत नाहीत, पण काही खास यंत्रात, उदाहरणार्थ टेलीव्हिजनमध्ये, ह्यांचं
रुपांतर दिसेल अशा चित्रात आणि ऐकू येईल अशा आवाजात केलं जातं. त्यामुळे एरवी जाणवत
नसल्या तरी या लहरी असतात हे उमजू शकतो आपण. दुर्बिणी आणि सूक्ष्मदर्शकांसारखंच,
रेडीओ आणि टी.व्ही.चं तंत्र आणि विज्ञान आपल्याला माहीत आहे. एरवी न जाणवणाऱ्या
लहरी, ही यंत्र आपल्याला जाणवतील अशा रुपात आणतात. तसेच ते रेडीओ टेलीस्कोप आणि
एक्सरे टेलीस्कोप. अदृष्य तारे आणि आकाशगंगा आपल्या नजरेत आणतात. दृष्टीआडची
सृष्टी दृष्टीपथात आणतात. आपला दृष्टीकोन विस्तारतो.
पुन्हा डायनॉसॉरकडे वळूया.
या ग्रहावर त्याचं राज्य होतं म्हणे एके काळी, पण कशावरून? आपण त्यांना न पाहिलं, न
ऐकलं, ना त्यांनी कधी आपल्यावर हल्ला केला. त्यांच्या जगात नेणारं कालयंत्र वगैरे
काही नाही आपल्याकडे. पण आपल्याकडे जीवाश्म आहेत. ते आपल्याला दिसतात. जीवाश्म
म्हणजे गाडलेली मढीच. ती काही हलत नाहीत की बोलत नाहीत. पण हे जीवाश्म तयार कसे
होतात ते आपल्याला माहीत आहे. कोट्यवधी वर्षापूर्वी काय घडलं याचा अंदाज आपण करू
शकतो. पाणी आणि क्षार मढ्यामध्ये झिरपतात. क्षारांचे स्फटिक होतात आणि संपूर्ण प्राणी
त्यातल्या बारकाव्यांसह, आता दगडात चिरस्थायी होतो. जीवाश्म तयार होतो. त्यामुळे
आत्ता दिसत नसले तरी डायनॉसॉर होते हे अशा अप्रत्यक्ष पुराव्यांनी समजू शकतं. पण
हे पुरावे आपल्याला दिसतात, त्यांना स्पर्श करता येतो; म्हणजे पुन्हा पंचेन्द्रीय
आलीच.
एका अर्थी, दुर्बीण हे खरंतर
एक कालप्रवासयंत्रच आहे. आपल्याला कोणतीही वस्तू दिसते म्हणजे त्या पासून येणारा
प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो. पण प्रकाशाला यायला वेळ लागतो! समोरच्या मित्राकडे
बघताना त्याच्या चेहऱ्याकडून येणारा प्रकाश तुमच्यापर्यंत पोचायला सूक्ष्मसा वेळ
लागतो. हा जो काही सूक्ष्मसा वेळ लागतो, तितक्या वेळापूर्वीचा चेहरा तुम्हाला दिसत
असतो. आवाजाचा वेग, प्रकाशाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे. म्हणूनच आपल्याला आकाशात
आधी फटाक्याचा उजेड दिसतो आणि मग आवाज येतो. नदीवर लांब कुणी धुणं धुवत असेल तर
आधी कपडा आपटलेला दिसतो आणि मग आपटल्याचा आवाज येतो.
प्रकाशाचा वेग इतका प्रचंड
आहे की सहसा घटना घडल्याक्षणीच आपल्याला दिसलेली असते, असच समजतो आपण. पण
लांबलांबच्या ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशाचं काय? सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत
पोहोचायला आठ मिनिटं लागतात. म्हणजे उद्या सूर्याचा स्फोट झाला तर आपल्याला त्याची
बातमी आठ मिनीटं उशीरा कळेल. पण तोपर्यंत आपण संपून जाऊ. सूर्यानंतर आपल्याला
जवळचा तारा म्हणजे प्रॉक्सिमा सेंटॉरी. ह्याच्याकडून येणारा उजेड आपल्या पर्यंत
पोहोचायला चार वर्ष लागतात (म्हणजेच हा आपल्यापासून चार प्रकाश वर्ष दूर आहे). आज
(२०१६) दुर्बिणीतून दिसणारं त्याचं रूप हे २०१२ सालीचं असणार आहे. आपण ‘मिल्की वे’
नावाच्या आकाशगंगेच्या किनारी रहातो. आकाशगंगा म्हणजे तारकांचे पुंजके. आपल्या
सगळ्यात नजीकची आकाशगंगा आहे अॅण्ड्रोमेडा, अडीच कोटी प्रकाश वर्ष दूर!
म्हणजे आज इथून दिसणारी अॅण्ड्रोमेडाची छबी ही तिची अडीच कोटी वर्षापूर्वीची अवस्था आहे तर. म्हणजे
काळयंत्रात बसून उलटा प्रवास केल्यासारखंच आहे हे. हबल दुर्बिणीतून आपल्याला ‘स्टीफनची
पंचकडी’ नावाची, एकमेकांशी टकरा घेणाऱ्या, पाच आकाशगंगांची मालिका दिसते. पावणेतीन
कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे ही. आज जे आपल्याला दिसतंय ते तिथे पावणेतीन कोटी
वर्षापूर्वी घडलं होतं. तिथे जर कुणी परग्रहवासी असतील आणि जर त्यांच्याकडे
शक्तीशाली दुर्बीण असेल आणि आज त्यांनी पृथ्वीकडे पाहिलं तर त्यांनाही आपण नाहीच
दिसणार. त्यांना दिसतील पावणेतीन कोटी वर्षापूर्वीचे आपले डायनॉसॉर भाईबंध.
या विश्वात अन्यत्र
सजीवसृष्टी असेल का? कुणी कधी न पाहिलेली सृष्टी? परग्रहवासी हे सत्य मानायचं का
मग? ठाउक नाही. पण अशा परग्रहावरील सृष्टीच्या काही खाणाखुणा जाणून आहोत आपण.
त्यांच्याशी कधी संपर्क आलाच तर आपली पंचेन्द्रीयच सांगतील ते आपल्याला. कदाचित
कुणीतरी इथून परग्रहावरच्या जीवांचा वेध घेणारी दुर्बीण बनवेल किंवा रेडीओ
टेलिस्कोपमधले संदेश हे निश्चितपणे परग्रहवासियांचेच आहेत हे सिद्ध होईल. आज जेवढं
ज्ञात आहे तेवढंच सत्य आणि बाकी सारं मिथ्या असं काही नाही. अद्याप आपल्याला अज्ञात
असंही बरंच काही आहे. उद्या त्याचा शोध लागेल. दुर्बीण आणि रेडीओ टेलिस्कोपमुळे
आपल्याला इंद्रीयांपल्याडचं जग ज्ञात झालं. नव्या नव्या शोधांमुळे आणखी पलीकडचं
ज्ञात होईल.
अणु होतेच, आपल्याला
त्यांचा शोध अगदी अलीकडे लागला आणि आपल्या भावी पिढयांना आपल्यापेक्षा अणुबद्दल बरंच
काही समजेल. हाच तो विज्ञानानंद. सतत नव्याचा सोस, नव्याचा शोध, नव्याने बोध. याचा
अर्थ असा नाही की कोणाच्याही, कुठल्याही, लोणकढया थापेवर आपण विश्वास ठेवावा. कल्पनेला
मर्यादा नाहीत. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. प्रत्यक्षात अशक्यकोटीतील अशा
कितीतरी गोष्टी कल्पनेत असतात. पऱ्या आणि राक्षस; अप्सरा आणि खवीस...! नव्या कल्पनांबद्दल
स्वागतशील असतानाच भोळसटपणे सगळ्यावरच विश्वासून चालणार नाही. काटेकोर पुराव्याबद्दल
आग्रही असलं पाहिजे आपण.
मॉडेल (प्रतिमान): कमाल
कल्पनाशक्तीची
आपल्या इंद्रियांपल्याडची
सृष्टी जाणण्याची शास्त्रज्ञांची एक वेगळीच तऱ्हा आहे. काय असेल याचा अंदाज बांधून
एक मॉडेल गृहीत धरलं जातं. अमुक अमुक तऱ्हेची काहीतरी रचना असेल असं समजलं
जातं. यावरून अपेक्षित परिणामांचे आडाखे बांधले जातात. थोडं गणित मांडून सदरहू
रचनेनुसार काय असण्याची, दिसण्याची, ऐकू येण्याची शक्यता आहे हे ठरवलं जातं. (हे
दिसणं, ऐकणं हे थेट इंद्रियांद्वारे असेल वा यंत्राद्वारे असेल.) अखेर जे अपेक्षित
आहे तेच घडतंय ना, जसंच्या तसंच घडतंय ना,
हे तपासलं जातं. ‘मॉडेल’ म्हणजे काही दरवेळी पुठ्याचं किंवा लाकडाचंच काही
असेल असं नाही. कागदावर केलेली गणिती आकडेमोड ही ही एक मांडलेला अंदाज, म्हणजेच ‘मॉडेल’,
असू शकते. आजकाल कॉम्प्यूटरच्या साह्यानी त्रिमिती मॉडेल आपण पडद्यावर पाहू शकतो.
या मूळ मॉडेलवरून काही भाकीतं वर्तवली जातात. मग ती तपासली जातात. गरजेप्रमाणे
मॉडेलमध्ये बदल केले जातात, सुधारणा केल्या जातात. भाकीतं चुकली तर ते मॉडेल बाद
ठरवून नव्या मॉडेलचा शोध सुरु होतो. जर ती बरोबर आली तर आपलं मॉडेल योग्य आहे असं
आपण म्हणतो. अधिक काटेकोरपणे बोलायचं, तर आपल मॉडेल योग्य आहे, सत्य परिस्थितीचं
यथार्थ दर्शन आहे, असं आपण ‘समजू’ लागतो. सत्याच्या अधिकाधिक निकट पोहोचण्याचा हा
प्रयत्न असतो.
एका उदाहरणानी हे अधिक
स्पष्ट होईल. अनुवंशिक गुण, जीन्सद्वारे आणि त्यातही हे जीन्स बनलेले असतात त्या डी.एन.ए.च्या
रेणूद्वारे वाहून नेले जातात हे आपल्याला माहीत आहे. ह्या डी.एन.ए. बद्दल आपल्याला
प्रचंड माहिती आहे. पण हा दिसतो का आपल्याला? नाही. मुळीच नाही. अगदी शक्तीशाली
सूक्ष्मदर्शकातूनही नाही. डी.एन.ए. विषयीची सगळी माहिती, ही निव्वळ त्याच्या
वेगवेगळ्या रूपांची, वेगवेगळ्या मॉडेलची कल्पना करून, ती मॉडेल तपासून, सुधारून
मिळवलेली आहे.
डी.एन.ए. नामक काही भानगड
आहे याचा थांगपत्ता नसतानाच आपल्याला जीन्सबद्दल बरंच माहीत झालं होतं. ग्रेगोर
मेंडेल ह्या ऑस्ट्रीयातल्या पाद्र्यानी, त्याच्या चर्चच्या आवारातच, वाटाण्याच्या
वाणावर बरेच प्रयोग केले. प्रत्येक वाणाची उंची, रंग, अशा नोंदी तो ठेवत गेला.
त्यानी कधी जीन्स पाहीले नाहीत. पण त्यांचे परिणाम, रोपाची उंची, वाटाण्याचा रंग
हे त्याला दिसत होते. पिढ्यानपिढ्या हे गुणधर्म जीन्समुळे संक्रमित होतात असं
त्यानी गृहीत धरलं. (त्यानी जीन्स हा शब्द वापरला नव्हता.) त्यांच्या
संक्रमणांच्या नियमांचा अंदाज बांधला आणि त्यानुसार,
पुढील पिढीत बुटक्या झाडांपेक्षा तिप्पट प्रमाणात ऊंच झाडे असतील, असं भाकीत
वर्तवलं. तंतोतंत खरं ठरलं की हे भाकीत! मुद्दा हा की मेंडेलसाठी जीन्स हे निव्वळ
अंदाज, निव्वळ ठोकताळे होते. जीन्स हा त्याच्या कल्पनेचा खेळ होता, कल्पनेचा शोध
होता. डोळ्याला ते दिसत नव्हते, सूक्ष्मदर्शकानीही ते दिसत नव्हते. पण जीन्सचे
त्यानी कल्पिलेले गुणधर्म गृहीत धरले तर अनुवंशिक गुणांचं कोडं सुटत होतं. कल्पनेतले
जीन्स प्रत्यक्षातल्या गुणधर्माशी ताडून बघता येत होते. मग पुढे बरंच काही घडलं. फळमाशा आणि अन्य जीवजंतुंवर
अभ्यास करून, माणसात ४६ आणि फळमाशीत ८ गुणसूत्र आहेत हे समजलं. गुणसूत्रांचं कार्य
समजलं. जीन्सचा क्रम समजला. आणि हा सगळा कार्यक्रम डी.एन.ए.च्या शोधाआधीच पार पडला!!
मुख्यत्वे जेम्स वॅटसन आणि
फ्रान्सिस क्रीक आणि त्यांच्या नंतरच्या अनेक शास्त्रज्ञांमुळे डी.एन.ए.चं कार्य
नेमकं कसं चालतं हे आपल्याला ज्ञात आहे. पण डी.एन.ए.ची नेमकं रचना म्हणजे वॅटसन
आणि क्रीकच्याही दृष्टीआडची सृष्टीच. डी.एन.ए.च्या रचनेबद्दल विविध कल्पना लढवून
त्या पुनःपुन्हा पडताळून पाहूनच ते अंतिम निष्कर्षाला पोहोचले. त्यांनी पुठ्ठ्याची
मॉडेलही बनवली होती. विविध रचनांनुसार डी.एन.ए.च्या स्फटिकांची मोजमापं बदलणार होती.
रोसालीन फ्रँक्लीन् आणि मॉरीस विल्किन्स यांनी एक्सरेच्या मदतीनी ही मोजमापं घेतली
होती. वॅटसन आणि क्रीक यांनी कल्पिलेली दुहेरी गोफाची रचना ही आणि हीच या मोजमापांशी
तंतोतंत जुळत होती. सबब हीच रचना असावी हे स्वीकारलं गेलं. एवढच नाही तर या रचनेनुसार
मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या नियमांचाही उलगडा होत होता.
सत्याचं ज्ञान आपल्याला तीन
प्रकारे होत असतं तर. आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत, आपल्या ज्ञानेंद्रियांची
क्षमता वाढवून, (उदाः सूक्षदर्शक अथवा दुर्बीण वापरून) आणि मॉडेलच्या आधारे भाकीत,
भाकिताची तपासणी, मॉडेल मध्ये बदल, पुन्हा भाकिताची तपासणी... या मार्गांनी.
अर्थात कुठलंही मॉडेल तपासण्यासाठी अंतिमतः आपण आपल्या ज्ञानेंद्रियांवरच अवलंबून
असतो.
म्हणजे प्रत्यक्ष वा
अप्रत्यक्षरित्या इंद्रियगोचर आहे, विज्ञानाच्या मदतीनी समजतं, तेवढंच सत्य असतं
काय? असूया, आनंद, हर्ष, प्रेम हे सगळं
झूठ आहे काय?
छे छे भावभावना ह्या देखील अगदी
खऱ्याखुऱ्याच असतात, मात्र त्याचं अस्तित्व हे माणसाच्या मेंदूत असतं. माणसाच्या
मेंदूत, कुत्र्यांच्या, चिम्पांन्झीच्या, व्हेलच्या अशा अन्य काही
प्राणीमात्रांच्या मेंदूत. दगडाला कसल्या आल्या आहेत भावभावना? डोंगराला कसली आली
आहे प्रेमभावना? ज्याच्या त्याच्या भावभावना अगदी सच्च्या असतात. पण मेंदू अस्तित्वात
येण्यापूर्वी त्या अस्तित्वात नव्हत्या. दूर कुठल्या अज्ञात ग्रहावर कदाचित याहीपेक्षा
संपूर्णतः वेगळ्या भावना जागृत असलेली सृष्टी असेल. त्यांचे मेंदूही त्या त्या
भावनांशी तादात्म्य पावणारे असतील, कदाचित मेंदू असा काही अवयवच नसेल... वेगळाच
काही मामला असेल तिथे...कुणी सांगावं?
विज्ञान आणि अतिनैसर्गिक
शक्ती: तर्क विरुद्ध तर्कदुष्टता.
सत्य आणि सत्याचा शोध हा
असा असतो. या पुस्तकातील प्रत्येक विभाग हा एकेका सत्याबद्दल सांगेल, उदाः सूर्य,
भूकंप, इंद्रधनुष्य, जैवविविधता. आता नावातल्या दुसऱ्या शब्दाबद्दल, जादू! जादू हा
जरा निसरडा शब्द आहे. अतिनैसर्गिक शक्ती म्हणजेही जादू. स्टेजवर जादूगार दाखवतो
तीही जादू आणि काव्यात्म अर्थानही जादू/जादूई वापरला जातोच की. पुस्तकाच्या नावात हाच अर्थ
अभिप्रेत आहे.
अतिनैसर्गिक शक्ती आपल्याला
मिथककथांमधे, परिकथांमधे भेटतात. पौराणिक आणि धार्मिक कथांमध्येही चमत्कार असतात, पण त्याबद्दल शेवटच्या
प्रकरणात बघूया. अल्लाउद्दिनच्या दिवा काय, जादूची कांडी काय, हॅरी पॉटरची जादूची शाळा काय; चुंबन घेताच
राजपुत्र होणाऱ्या बेडकापासून ते जादूची कांडी फिरवताच लखलखती बग्गी होणाऱ्या
भोपळ्यापर्यंत. बालपणापासून या कथा आपली सोबत करताहेत. कल्पनेतल्या या राज्यात
फेरफटका मारायला आजही मजा येते. हे सगळं खोटं खोटं आहे, निव्वळ कल्पनाविलास आहे हे
माहित असूनही.
स्टेजवरती तर डोळ्यादेखत
जादू घडते हो. किंवा असं काही तरी घडवलं जातं की पहाणाऱ्याला वाटावं जादूच झाली!
जादूगार (जादुगारीणी का नसतात कोण जाणे) आपल्याला हातोहात बनवतात. चक्क अशक्य
काहीतरी करून दाखवतात. प्रत्यक्षात काही तरी भलतंच घडत असतं पण देखावा असा मांडला
जातो, की वाटावं कोणा दिव्य शक्तीचंच काम हे. बोल बोल म्हणता टोपीतून ससा काय येतो, रुमालातून
कबूतर काय निघतं! बेडकाचा राजपुत्र होण्याइतकंच हेही अशक्य. एक चलाखी असते यात.
आपलेच डोळे आपल्याला फसवतात. अनेक युक्त्या आणि क्लुप्त्या वापरून जादुगार हा
नजरबंदीचा खेळ घडवून आणतो.
काही जादुगार ही सगळी
हातचलाखी आहे असं चक्क सांगूनच टाकतात.
जादुगार रघुवीर, पी.सी.सरकार, रँडी किंवा पेन अँड टेलर ही अशी काही नावं. अगदी
खुलेपणानी सांगतात. मखलाशी कशी केली ते नाही सांगत. ते तर त्याचं व्यावसायिक गुपित
झालं. पण आपल्या अंगी कोणतेही अतिनैसर्गिक, वा दैवी गुण नाहीत हे मात्र आवर्जून
सांगतात. इतर काही प्रेक्षकांच्या मनातला अद्भुतानंद, अचंबा, आश्चर्य, तसंच मुरु
देतात. जादूचा खेळ म्हणजे निव्वळ चलाखी असंही सांगत नाहीत आणि दैवी शक्तीचा दावाही
करत नाहीत. काही काही मात्र चक्क खोटारडे
असतात. जाणूनबुजून आपल्याला काही खास शक्ती प्राप्त आहे असा दावा करतात. नजरेनी
चमचे वाकवणे, निव्वळ इच्छेनी घड्याळ थांबवणे वगैरे जादू करतात. मनःशक्तीने जमिनीखालचे
तेलाचे साठे आपल्याला ‘दिसतात’ असं सांगून तेल कंपन्यांना ठकवणारेही महाठक आहेत. शोकाकुल
नातेवाईकांच्या भावनांशी खेळून मृतात्म्यांशी
संवाद साधणारेही आहेत. असली जादू ही निव्वळ गंमत किंवा करमणूक रहात नाही. यात शोषण
येतं. अडल्यानडल्या कडून पैसे उकळणं येतं. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचाच
प्रकार हा! यात बरेचसे भोंदू असले तरी काहींना मनापासून असं वाटतं की ते मृतात्म्यांशी
बोलत आहेत.
जादूचा तिसरा अर्थ, काव्यात्म
अर्थानी जादू, हा ह्या पुस्तकाच्या नावात अभिप्रेत असलेला अर्थ आहे. स्वर्गीय
संगीत आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणतं. आपण म्हणतो काय जादुई स्वर आहेत हे.
काळोख्या रात्री आभाळातली चांदण्यांची पखरण दृष्टीस पडताच आपला श्वास रोखला जातो,
आपल्याला भूल पडते जणू. सप्तरंगांची उधळण करणारा सूर्यास्त, उत्तुंग हिमालयाची
लखलखणारी शिखरं, वळणावर अवचित स्वागताला समोर ठाकलेले इंद्रधनुष्य, हे सारं काही आपल्याला अशीच जादुई
अनुभूती देतं. इथे जादुई म्हणजे अननुभूत, अंगावर शहारा आणणारं, जगण्याचा तो क्षण
मोहरून टाकणारं. विज्ञानाच्या आधारे गवसलेलं सत्य हे असंच विलक्षण जादुई असतं,
अंगावर शहारा आणणारं असतं, तरल, काव्यात्म असतं; हे दाखवून देण्याचा, या
विज्ञानानंदात तुम्हाला शरीक करून घेण्याचा, सामील करून घेण्याचा खेळ मी इथे पानोपानी
मांडला आहे.
अतिनैसर्गिक शक्ती आणि
अतिनैसर्गिक कल्पना आपल्याला विश्वाचं यथातथ्य ज्ञान कधीच घडवत नाहीत. या बाबतीत
ह्या कल्पना अगदीच कुचकामी असतात. कोणत्याही घटनेला कुणी अतिनैसर्गिक कारण जोडलं
म्हणजे त्या मागचं कारण समजलेलंच नाही असं खुशाल समजावं. शिवाय एकदा ‘कारण’ चिकटवलं
की पुढे योग्य कारणाचा शोधही थांबतो. हा तर मोठाच तोटा आहे. शोध का थांबतो? कारण
एकदा एखाद्या गोष्टीमागे ‘अतिनैसर्गिक कारण’ आहे असा शिक्का मारला की साहजिकच ती निसर्ग
विज्ञानाच्या कक्षेबाहेर ढकलली जाते. कित्येक अग्निदिव्यातून तावून सुलाखून
निघालेली, आजच्या कित्येक सुखांची मूलाधार ठरलेली, चारशे वर्षाची छोटीशी पण देदीप्यमान
परंपरा असलेली वैज्ञानिक पद्धती कुचकामी ठरवली जाते. ‘सध्या तर कारण आम्हाला माहीत
नाहीच, पण यापुढे कधीच त्याचा उलगडा होऊ शकणार नाही. सबब प्रयत्न व्यर्थ आहेत, करू
सुद्धा नकां’, असंच बजावण्यासारखं आहे हे.
विज्ञान ह्याच्या बरोब्बर
उलटा मार्ग निवडतं. सर्व काही समजलं नाहीये, हे मुळी मान्यच असतं विज्ञानाला. मग
ही जाणीवच जीवाला शोधाची आस लावते. प्रश्न विचारले जातात, नवी नवी मॉडेल्स कल्पिली
जातात, तपासली जातात. पावलापावलानी सत्याच्या अधिकाधिक निकट जाण्याचा हा विज्ञानाचा
मार्ग. ज्ञात विज्ञानाला अज्ञात, त्या विरोधी काही सापडलं, तर ती एक संधी आहे, एक
आव्हान आहे, असं वैज्ञानिक मत मानतं. मग आहे ते मॉडेल नाकारलं तरी जातं किंवा त्यात योग्य ते
बदल केले जातात. अशा किंचित किंचित सुधारणांमुळेच आपण पायरी पायरीने पण निश्चितपणे
सत्याच्या नजिक पोहोचतो.
खुनाचा उलगडा करायला एखाद्या
गुप्तहेराला पाचारण केलं आणि ह्या आळशी पठ्ठ्यानं
काहीही शोधाशोध न करता, सरळ खून हा अतिनैसर्गिक शक्तीचा प्रताप असल्याचं सांगीतलं,
तर? पूर्वी करणी, चेटूक, भूत, प्रेत, आत्मा, शाप, उशाःप, दैवी कोप किंवा कृपा अशी
अतीनैसर्गिक कारणं चिकटवलेल्या कितीतरी गोष्टी आज विज्ञानाच्या कह्यात आहेत.
विज्ञानाला याची कारणं तपासता येतात,
समजावून देता येतात. विज्ञानाचा सगळा इतिहास, हा मुळी अत्यंत विश्वासार्ह, उलट तपासणीला
सदा उपलब्ध, अश्या उलगडयाचाच इतिहास आहे. मग आज जे अज्ञात आहे, ते उद्या ज्ञात
होणारच नाही, असं समजण्याचं कारणच काय? ज्वालामुखी, भूकंप, साथीचे रोग या दैवी
कोपांची आणि प्रकोपांची कारणं समजलीच ना? तसा अन्यही काजळ कोपऱ्यात विज्ञानाचा
उजेड पडेल.
बेडकाची पप्पी घेऊन त्याचा
राजपुत्र होत नाही आणि भोपळ्यातून अचानक राजेशाही बग्गी निघत नाही; हे मान्य असतं
सगळ्यांना. पण असं का? का नाही होऊ शकत असं? असा कधी विचार केलाय आपण? अनेक
पद्धतीनी हे समजावून सांगता येईल पण माझी आवडती पद्धत ही.
बेडूक काय किंवा बग्गी काय,
अतिशय गुंतागुंतीची रचना असते त्यांची, कितीतरी छोटे छोटे भाग आणि त्यांची अत्यंत
गुंतागुंतीची जोडणी. असं केवळ अपघातानी किंवा जादूची कांडी फिरवून घडू शकतं नाही.
बेडूक किंवा बग्गीसारख्या क्लिष्ट रचना घडवणं हे कौशल्याचंच काम. बग्गी बनवायला
अनेक सुटे सुटे भाग हवेत. ते नीट एकत्र करायला हवेत. येथे पाहिजे जातीचे, येऱ्या
गबाळ्याचे काम नोहे. इथे कसबी सुतार हवा, अन्यही कारागीर हवेत. आलामंतर कोलामंतर
छू म्हणून बग्गी घडत नाही. चाकं आहेत, बाकं आहेत, दारं आहेत, खिडक्या आहेत,
स्प्रिंगा आहेत, गुबगुबीत गादया आहेत आणि या साऱ्याची विशिष्ट रचना आहे.
गुंतागुंतीच्या रचनेची फट् म्हणता साधी रचना करता येईल. परिराणीच्या जादूच्या कांडीऐवजी
मशाल फिरवताच, बग्गीची पहाता पहाता राख होईल. कशाचीही राख करणं सोप्पं. पण राखेतून
किंवा भोपळ्यातून बग्गी, अशक्य. कारण बग्गीची कितीतरी गुंतागुंतीची आणि प्रवासाला
साजेशी रचना.
आपण परिराणीचं काम थोडं
सोप्पं करूया. तिला भोपळ्या-बिपळ्या ऐवजी बग्गीचे सगळे सुट्टे भाग वापरायची मुभा
देऊया. समजा सगळे भाग एका खोक्यात ठेवले आहेत; फळ्या, सळ्या, काचा, फोम, रेक्सीन,
मखमल, खिळे, स्क्रू वगैरे. आता ते नीट जुळवण्याऐवजी परीनी ते सगळे एका प्रचंड पोतडीत
घालून नुसते गदागदा हलवले तर त्यातून बग्गी बाहेर निघेल का हो? चाकाच्या जागी चाक
आणि बाकाच्या जागी बाक येईल? अर्थातच नाही. का? कारण हे वेगवेगळे भाग अनंत प्रकारे
जुळवता येतील, हे वापरून अनंत प्रकारचे ढिगारे रचता येतील पण त्यातून बग्गी सोडाच,
कोणतीही उपयोगी रचना आपोआप होणे नाही.
ह्या ढिगात क्वचित एखाद्या
वेळी काही तरी काहीतरी ओळखीचं डिझाईन दिसेल; पण क्वचित, अगदी अगदी क्वचित. बहुतेकदा भंगारचा ढीग शोभेल असंच
काहीतरी बाहेर निघेल. हे सुटे भाग कोट्यावधी तऱ्हांनी जुळवता येतील आणि कोट्यवधी तऱ्हांनी पुन्हा
त्यांचा ढीग बनवता येईल. दरवेळी वेगळाच, एकमेव असा पॅटर्न तयार होईल पण उपयुक्त
असा काही पॅटर्न निपजलाच तर तो क्वचित अगदी क्वचितच. हरणाची जोडी, गुलाबाचं रान
तुडवत, राजवाड्यावर पार्टीला नेऊ शकेल अशी बग्गी बनणं तर अशक्यच.
असे वेगवेगळे भाग किती तऱ्हांनी
एकत्र करता येतील याचं गणित मांडता येत. उदाः बावन्न पत्ते म्हणजे बावन्न वेगवेगळे
भाग आहेत असं समजू.
समजा चौघांत पानं वाटली आणि
पहातो तो काय माझ्या कसे सगळीच्या सगळी, तेराच्या तेरा, पानं इस्पिकची! आश्चर्यानी
थक्क होऊन मी माझी पानं सगळ्यांना मोठ्या कौतुकानी दाखवू लागलो तर, प्रत्येकच जण
आपली पानं दाखवायला लागला. एकाला सगळी किलवरची, एकाला सगळी बदामची आणि चौथ्याला चौकटची;
अशी वाटणी झाली होती!
ही जादूच नाहीतर काय? जादू
असंच वाटेल तुम्हाला. पण गणीतज्ञांनी असं होण्याची शक्यता मोजली आहे. ती दर
५३,६४४,७३७,७६५,४८८,७९२,८३९,२३७,४४०,००० डावात एकदा एवढी नगण्य आहे. कारण तेरा पानं
चार जणात, नेमक्या ५३,६४४,७३७,७६५,४८८,७९२,८३९,२३७,४४०,०००च प्रकारे वाटता येतात.
म्हणजे एरवीही पत्ते नीट पिसून वाटलेला प्रत्येक डाव हा तसा अनन्यच असतो. कोणताही
डाव पुन्हा ‘जस्साच्या तस्सा’ येण्याची शक्यता ही दर
५३,६४४,७३७,७६५,४८८,७९२,८३९,२३७,४४०,०००
डावात एकदा एवढीच असते. पण पानं ‘कशीही’ वाटली गेली असल्यामुळे आपल्याला
त्याचं काही अप्रूप नसतं. प्रत्येकाला एकाच प्रकारची पानं वाटली जाणं यात आपल्याला
एक संगती दिसते आणि आपल्याला अचंबा वाटतो.
अगदी निर्दयपणे, बेडकाच्या
चिंधड्या उडवून राई राई एवढ्या, कोट्यवधी प्रकारे जोडता येतील. पण यात बहुतेकवेळा
मासाचा चिखल तयार होईल. नुसता अर्थहीन, आकारहीन मासाचा गोळा. पिसून वाटलेले, कसेही
वाटलेले, पत्तेच जणू. ह्यात अगदी मोजक्याच वेळा हा गोळा कशासारखातरी दिसेल, त्यात
काही तरी आकार उकार भासेल, पण त्यातून राजपुत्र होणं? असंभव.
बेडकाची पप्पी घेऊन त्याचा
राजपुत्र होत नाही आणि भोपळ्यातून अचानक राजेशाही बग्गी निघत नाही. कारण ह्यांचे
सुटे भाग अतिशय योजनाबद्ध पद्धतीनी गुंफलेले असतात. अनंत शक्यतांपैकी ही एक, अनन्य
अशी शक्यता असते. आपल्या आजूबाजूचा प्रत्येक सजीव, प्रत्येक पशू, प्रत्येक पक्षी, प्रत्येक
झाड आणि आपणही आधी अत्यंत साधी रचना असणाऱ्या सजीवांपासून उत्क्रांत झालो आहोत. म्हणजे
मग उत्क्रांती म्हणजे जादूचा खेळ किंवा जुगारच आहे एक प्रकारचा? नाही! अजिबात
नाही!! हा शुद्ध गैरसमज आहे. सभोवतालची जीवसृष्टी म्हणजे चान्स किंवा लक् किंवा
जादू नाही. जादुई मात्र खास आहे. विस्मयकारक तर आहेच आहे.
उत्क्रांतीची संथ जादू.
जादूची कांडी फिरवून, जटील
रचना असणाऱ्या एका जीवचं रुपांतर, जटील रचना असणाऱ्या दुसऱ्या जीवामधे होत नाही.
मग ही सगळी जटील रचनेची सजीवसृष्टी उद्भवली कशी? बेडूक आणि बटाटा, विंचू आणि वड,
राजकन्या आणि भोपळे, तुम्ही-आम्ही, आलो कसे अस्तित्वात?
शतकानुशतके ह्या प्रश्नाचं
नेमकं उत्तर कुणालाच ठाउक नव्हतं. मग त्याबद्दल लोकांनी अनेक सुंदर सुंदर कल्पना
लढवल्या, कथा रचल्या. शेवटी एकोणीसाव्या शतकात हे कोडं सोडवलं ते विज्ञानमहर्षी चार्ल्स
डार्विननी. अगदी भन्नाट उत्तर दिलं त्यानी कोड्याचं. या प्रकरणाच्या उरलेल्या
भागात हे उत्तर काय होतं ते आपण थोडक्यात बघूया.
क्लिष्ट रचना असलेले जीव,
आपण म्हणा किंवा बॅक्टेरीया म्हणा, आत्ता आहेत तसे, एका झटक्यात, आहे त्या रुपात,
अवतरलेच नाहीत. अत्यंत संथपणे टप्याटप्यानी, मूळ रचनेपासून इवली इवली फारकत घेत
घेत आजची रचना घडलेली आहे. कल्पना करा की तुम्हाला लंबूटांग्या बेडूक हवा आहे.
तुमच्याकडे असलेल्या विविध बेडकांपैकी तुम्ही एक छानशी पण त्यातल्यात्यात लांब पायवाली
जोडी निवडाची. ह्यांना पिल्लं झाली की पिल्लांचे पाय किती लांब आहेत ते बघायचं.
पुन्हा एकदा ह्या पिढीतली त्यातल्यात्यात लंबूटांग जोडी घ्यायची आणि त्यांना
पिल्लं होऊ द्यायची. लांड्या पायवाल्यांचा यांच्याशी अजिबात संकर होऊ द्यायचा
नाही.
पुन्हा एकदा
लंबूटांगवाल्यांची अंडी लंबूटांगवालेच फळवतील. त्यातून बेडूकमासे (Tadpoles)
निर्माण होतील. त्यांचेही बेडूक होतील. त्यांना पाय फुटतील. पुन्हा एकदा
लंबूटांगवाल्यांचा संकर लंबूटांगवाल्यांशी करा.
साधारण दहा पिढ्यांनंतर असं
लक्षात येईल की बेडकांच्या पायांची लांबी आता सुरवातीपेक्षा जरा जास्त आहे.
पहिल्या पिढीतल्या बेडकांपेक्षा दहाव्या पिढीतले सगळेच बेडूक हे लांब पायाचे आहेत.
हे निव्वळ उदाःहरण आहे. कदाचित असं घडायला वीस किंवा जास्त सुद्धा पिढया लागतील, पण
शेवटी तुम्ही बेडकाच्या तंगड्या लांबवल्या असतील. आता मोठ्या अभिमानानी तुम्ही
जगाला सांगू शकाल की, ‘बघा मी जगावेगळा बेडूक बनवला!’
ना जादुविद्या हवी ना
जादूची कांडी. वर सांगितलंय, त्याला म्हणतात ‘सिलेक्टीव्ह ब्रीडिंग’ (निवड करत करत
निपज). सगळे बेडूक एकसारखे नसतात आणि पायांची लांबी ही अनुवांशिक असते, आई वडिलांकडून
जीन्सद्वारे अपत्याला मिळते. तेव्हा आई बाबा कोण हे दरवेळी निवडून आपण नवाच बेडूक
निर्माण केला, नाही का?
सोप्पं आहे ना?
हे तर काहीच नाही, इथे आपण
फक्त बेडकांचे लंबुटांग बेडूक केले. पण समजा मुळात बेडूक न वापरता, अन्य कुठल्या प्राण्यापासून
बेडूक तयार केला तर? समजा पाणसरडा (Newt) घेतला.
नाव ‘सरडा’ असलं तरी हे अन्य सरड्यांसारखे ‘Reptiles’ (सरीसृप, सरपटणारे प्राणी) नाहीत.
हे बेडकांचेच उभयचर (Ambhibians) भाईबंध आहेत. ह्यांचे पाय बेडकापेक्षा लांडे असतात,
त्यामुळे हे उड्या मारत नाहीत, चालतात. लांब शेपूट असतं त्यांना आणि शरीर
बेडकापेक्षा खूपच निमुळतं आणि लांबोडं असतं. आता पाणसरड्यांपैकी त्यातल्यात्यात
बेडकासारखे पाणसरडे घ्यायचे, त्यांच्या पिल्लांमधले पुन्हा त्यातल्यात्यात
बेडकासारखे पाणसरडे घ्यायचे. इतरांना प्रजननाला मज्जाव करायचा. असं कोटयानुकोटी
वेळा करायचं. दरवेळी निव्वळ लांबपायाचे, आखूड शेपटाचे, जरा जरा बेडकासारखे आई बाबा
निवडायचे. दरवेळी निव्वळ त्यांचाच संकर होईल असं बघायचं. होत होत अंतिमतः तुम्ही
‘बेडूक’ निर्माण करू शकता. कुठल्याच पिढीत तुम्हाला नाट्यमय बदल दिसणार नाही.
बहुतेक प्रजा आपल्या आई बाबांसारखीच निपजेल. पण काही पिढयांनंतर शेपूट थोडं आखूड
असेल आणि पाय थोडे लांब. पाय पुरेसे लांब झाले की एखाद्या पिढीतला पाणसरडा त्या
लांबलचक पायांचा उपयोग करून सरपटण्याऐवजी, टुण्णकन् उडी की हो मारेल....!
वरच्या सगळ्या वर्णनात आई
कोण, बाबा कोण, हे ठरवणारे आपण होतो. एका विशिष्ट पूर्वनिश्चित दिशेनी हे पिढयांपिढ्यातील
बदल व्हावेत म्हणून ती दिशा आपण ठरवली होती. अधिक दाणे देणारी वाणं, अधिक दुभत्या
गाई, रोगप्रतिकारकशक्ती असलेली पिकं असं सगळं याच तंत्रानी आपले शेतकरी करतच आलेले
आहेत. पिढयांपिढ्या करत आलेले आहेत. डार्विननी मात्र आपल्यासारखा कोणी
कर्ता-करविता नसतानाही, निसर्गात हे आपोआप होतं, ही जाण दिली. निसर्गातल्या अनेक
घटकांमुळे काही प्रजा ही पुढील पिढी जन्माला घालण्याआधीच मरून जाईल. काही मात्र प्रजनन
होईपर्यंत तगून राहील. जे तगतात त्यांचीच गुणवैशिष्ट्ये पुढच्या पिढीत संक्रमित होतात.
तगण्यासाठी लागणारे गुणधर्म असतात तेच तेवढे तगतात. पाणसरडे असोत वा बेडूक, साप
असोत वा विंचू; जगायला अधिक उपयुक्त अशा गुणांनी युक्त, अशी काही प्रजा असणार.
उदाहरणार्थ, काही जीवांना जगण्याच्या स्पर्धेत
लांब पाय उपयुक्त असतात. बेडकांना किड्ंयावर झेपावायला, किड्यांना
बेडकापासून निसटायला, चित्त्यांना चितळ पकडायला किंवा चितळांना चित्ता चुकवायला...
सबब असे लांबूटांगे जीव हकनाक मरणार नाहीत. जगतील, तगतील, त्यांना संतती होईल. ही
अर्थातच लंबूटांग असेल. पिढ्यानपिढया लांब
पायाचे जीन्स संक्रमित होतील. अधिकाधिक प्रजा लंबूटांग असेल. थोडक्यात जे आपण
जाणूनबुजून पाणसरड्याच्या बाबतीत केलं, आणि लंबूटांग प्रजा निर्माण झाली, तेच इथे
कोणी मुद्दाम न करताही घडून आलेलं आहे. कोणी कसबी कारागीर नसताना, कोणी कर्ताकरविता नसताना; आपोआप, निसर्गतः, निव्वळ
जगण्याच्या स्पर्धेतून, हे घडलं. पुढच्या पिढीत जीन्स संक्रमित करेपर्यंत,
जगण्याच्या स्पर्धेत टिकून रहाणं महत्वाचं. ‘जगण्याची स्पर्धा’ हाच तो निवड
करणारा, कर्ताकरविता, अदृष्य हात. ह्यालाच म्हणतात ‘नैसर्गिक निवड’.
पुरेश्या पिढयांनंतर पाणसरडयासारख्या
पूर्वजांपासून बेडकासारखे वंशज निपजतात. प्रचंड पिढ्यांनंतर माशासारख्या
पूर्वजांपासून माकडासारखे वंशज निपजतात. आणखी युगं लोटली की बॅक्टेरीया कुळातल्या पूर्वजांना, वंशज म्हणून माणूस लाभतो! हे नेमकं
अस्सच घडलं असणार. सध्या अस्तित्वात असलेल्या आणि सध्या अस्तित्वात नसलेल्याही
प्रत्येक जीवाचा अवतार असाच झाला आहे. पिढ्यांपिढया म्हणजे नेमक्या किती पिढया, हे
जरा तुमच्याआमच्या कल्पनेबाहेरचं आहे. हे विश्व हजारो कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात
आलं. जीवसृष्टी ही सुमारे साडेतीनहजारकोटी वर्षापासूनची आहे. उत्क्रांती घडून
येण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे.
डार्विनच्या ह्या कल्पनेला ‘नैसर्गिक
निवडीतून उत्क्रांती’ असं म्हटलं जातं. आजवर मानवी मनात तरळलेल्या सगळ्यात चमकदार
कल्पनांपैकी ही एक. ह्याच्या फलस्वरूप
सजीवसृष्टीचा सारा रूपबंध उलगडला जातो. ह्या महत्वाच्या संकल्पनेकडे आपण पुढे
पुन्हापुन्हा येणारच आहोत. सध्या एवढंच लक्षात घेऊ या की उत्क्रांती ही अति संथ
आणि प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे. अत्यंत सावकाशपणे ही प्रक्रिया घडत असल्यामुळेच
यातून, बेडूक किंवा राजपुत्रासारखे, महा-गुंतागुंतीचे सजीव निर्माण झाले आहेत.
बेडकाचा राजपुत्र हा अकस्मात घडणारा बदल आहे आणि म्हणुनच प्रत्यक्षात अशक्य आहे.
उत्क्रांती हे रास्त उत्तर आहे, त्याचा पुरावा आहे. मुंगीच्या पावलांनी होणाऱ्या
उत्क्रांतीऐवजी कोणा कसबी कारागिरानं एका फटक्यात आजची सजीवसृष्टी निर्माण केली किंवा
बेडकापासून जादूनी राजपुत्र तयार होतात, अशा कथा म्हणूनच भाकडकथा ठरतात.
याच कारणास्वव छूमंतर
म्हणून भोपळ्याची बग्गी होऊ शकत नाही. बग्ग्या काही बेडकांसारख्या किंवा राजपुत्रांसारख्या, निसर्गतः उत्क्रांत होत नाहीत. पण विमानं आणि
वहानं, कॉम्प्युटर आणि कुऱ्हाड, हे सारं मानवनिर्मित आहे. असा मानव, जो स्वतः
उत्क्रांतीचं फलित आहे. माणसाचा तल्लख
मेंदू, त्याचे कसबी हात, हे देखील पाणसरड्याच्या शेपटासारखे किंवा
बेडकांच्या पायासारखे, ‘नैसर्गिक निवडीतून
उत्क्रांती’चं फलित आहेत. उत्क्रांत
झालेल्या ह्या अफाट मेंदूतून माणसानी बग्ग्या बनवल्या, गाड्या बनवल्या. रागदारी,
घड्याळ आणि वॉशिंगमशीन बनवलं. सूर, सुरा आणि सुरी असं काय काय बनवलं. हयात ना कसली
जादू आहे ना हातचलाखी. सारं काही सुसंगतपणे, सुंदरपणे समजत जातं आपल्याला.
पुस्तकात पुढे मी ठायी ठायी
दाखवून देणार आहे की विज्ञानाच्या दृष्टीतून
भवतालचं सारं जग जादुई, मायावी,
विस्मयी वाटायला लागतं. पण ही वेगळीच जादू आहे, वेगळीच माया आहे ही. सत्य
गवसल्याचा, कार्यकारणभाव समजल्याचा हा विस्मय आहे. ह्या अस्सल जादूपुढे त्या अतिनैसर्गिक
भाकडकथा, फुसक्या, फुटकळ आणि बेगडी ठरतात.
विश्वरूपाचं हे सत्यदर्शन, ह्यात अतिनैसर्गिक काही नाही, ह्यात कसली हातचलाखी नाही.
हे निव्वळ अद्भुत आहे अद्भुत! हे सत्य अद्भुत आहे!! हे सत्य आहे म्हणूनच अद्भुत
आहे!!!
No comments:
Post a Comment