Monday, 26 September 2022

‘मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे’ ह्या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी, पत्रकार भवन, पुणे इथे पार पडला. त्या समारंभातील माझे भाषण.

 

‘मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे’ ह्या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी, पत्रकार भवन, पुणे इथे पार पडला.

त्या समारंभातील माझे भाषण.

 

‘मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे’ हे माझे नवे पुस्तक लोकवाङमयगृहातर्फे प्रकाशित होत आहे. विशेष आनंदाची गोष्ट अशी की, प्रकाशनपूर्व नोंदणी जाहीर होताच या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली!! मी पुण्यात बोलतोय याच मला जाणीव आहे! त्यामुळे, ‘संपली, म्हणजे आवृत्ती मुळात होती तरी किती प्रतींची?’, ह्या तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकतो. पाचशे.

हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे. त्यामुळे प्रस्तावना, लेखकाचे दोन शब्द, वगैरे कटाप. पण तरीही लेखकाला आपण हा उद्योग का केला हे सांगायची आच असतेच. म्हणून हे भाषण.   

लहानाचा मोठा होताना माझं एक बोट ‘किशोर’ मासिकाने धरलं होतं.  चौथीत असताना मी किशोरचा वाचक झालो आणि आजही वाचक आहेच.  किशोरमधील सुरेश मथुरे यांच्या ‘विज्ञानाचे वाटाडे’, ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ आणि   वसंत शिरवाडकर यांच्या  ‘असे हे विलक्षण जग’ अशा लेखमालांनी  माझं चिमुकलं विश्व मोठं  केलं. कॉलेजमध्ये गेलो आणि लोकविज्ञान संघटनेच्या बुद्धिवंत, प्रतिभावंत आणि  लोकविलक्षण चळवळ्या मंडळीत मी आपोआप सामील झालो. विज्ञानवादी विचारांचं बीज इथे रूजलं आणि अंनिसच्या संगतीत फोफावलं.

‘किशोर’मधल्या   शास्त्रज्ञांच्या कथा वाचून मीही शास्त्रज्ञ व्हायचं ठरवलं होतं. पण जगातले बहुतेक महत्वाचे शोध आधीच कुणीतरी लावले आहेत, असा शोध मला लवकरच लागला आणि मी तो नाद   सोडून दिला!

विज्ञानात भर घालण्याचे कार्य माझ्याकडून झालेलं नाही पण, ‘विज्ञानाचा अर्थ आम्हासीच  ठावा, येरांनी वहावा  भार माथी’, असं म्हणण्याचा धीर लोकविज्ञान आणि अंनिसच्या जोरावर मी गोळा केला आहे.    

त्यामुळेच ‘किशोर’चे साक्षेपी संपादक श्री.  किरण केंद्रे यांनी जेंव्हा लहान मुलांसाठी ‘किशोर’मध्ये लिहीण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा माझ्या मनाची मशागत करणाऱ्या या छापील स्नेह्याविषयीच्या  अपार कृतज्ञतेपोटी, कर्तव्यभावनेतून मी होकार भरला. विज्ञान विषयक लिहायचे हेही ठरलेलेच होते. प्रश्न काय लिहायचे हा होता.  

आपल्या भोवतालचे जग आणि त्याचे ज्ञान देणारे विज्ञान, किती विचित्र, विलक्षण आणि विस्मयकारी आहे हे लक्षात आणून देणारे साहित्य विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आतडे बावीस फुट लांब असते किंवा  कातडे  सात थरांचे बनलेले असते;  आपल्याला आठ मिनिटांपूर्वीचा सूर्य दिसत असतो किंवा माठ सछिद्र असल्याने पाणी गार होते; असली माहिती त्यात ठासून भरलेली असते. ‘डिस्कवरी’सारख्या चॅनलवरती तर अशा मालिका अहोरात्र पहायला मिळतात.  पण विज्ञानाचा हा सगळा विस्मय, हा सगळा शोध, याचा प्रवास कसा असतो?, हे सगळं कळलं कसं?, आणि ज्यांना कळलं त्यांचा का कळलं?, जेंव्हा कळलं तेंव्हाच का कळलं?, आधी का नाही? साऱ्या संशोधनामागची वैचारिक बैठक काय असते?, चिकित्सक विचार किंवा वैज्ञानिक पद्धती म्हणजे नेमकं काय?, हे भल्याभल्यांना पटकन सांगता येत नाही.  मुलांसाठी आणि मराठीत याविषयी विशेष काही आढळत नाही.  त्यामुळे शास्त्रज्ञ व्हायचं झालं तर विचार कसा करायचा?, विज्ञान नावाची युक्ती आपल्याला नेमकं काय शिकवते?, वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय? हे सांगणारी लेखमाला लिहायची असं मी ठरवलं.

अर्थात जे मी लिहिले आहे ते म्हणजे या प्रश्नांचे संपूर्ण उत्तर नाही. पण बालबुद्धीला झेपेल, उत्सुकता चाळवेल, एवढं उत्तर निश्चित आहे. सोपं लिहिणं सगळ्यात अवघड असतं असं म्हणतात. त्याचा प्रत्यय हे लिखाण करताना मला वारंवार आला. गीता गुत्तीकर, नागेश मोने, नागेश वाईकर वगैरे शिक्षक मित्रांनी मला  मुलांची शब्दसंपदा, विचाराची पद्धत वगैरे समजावून घ्यायला मदत केली. यांनी आणि प्रा. प्रदीपकुमार माने, प्रा. श्रीनिवास हेमाडे वगैरेंनी  काही लेख तपासूनही दिले. या साऱ्यांचा  मी ऋणी आहे.

शिवाय फ्रांसिस बेकन, बर्ट्रांड रसेल, कार्ल सागान, रिचर्ड फेनमन, रिचर्ड डॉकिंस अशा अनेकांकडून मी मुक्तपणे उचलेगिरी केली आहे. कुणाची शैली तर कुणाची उदाहरणे. अर्थातच ह्या साऱ्याला मराठी साज चढवला आहे, मुलांसाठी योग्य असे बदल केले आहेत. उगाच काढला इंग्लंडच्या राणीचा झगा आणि घातला झाशीच्या राणीला असा हा प्रकार नाही.

चिकित्सक बुद्धिमत्तेचे अनेक फायदे होतात.  माणूस हा मूलतः विचारी प्राणी आहे हा एक मोठाच गैरसमज आहे! उत्क्रांती मानसशास्त्र असे शिकवते की माणूस हा मूलतः अविचारी, भावनाशील, झटपट निर्णय घेण्याला चटावलेला, अंधश्रद्ध प्राणी आहे.  त्यामुळे चिकित्सक विचार कसा करावा, हे शिकावं लागतं. ते आपोआप येत नाही. आपली उपजत समज जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक बाजूला ठेऊन प्रश्नाला भिडण्याची ही नवी सवय अंगी बाणवावी लागते.

चिकित्सक बुद्धीचे अनेक फायदे होतात मुलांची जिज्ञासा वाढते.  जिज्ञासा ही गोष्ट फक्त विज्ञानापुरतीच  मर्यादित नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही जिज्ञासू वृत्तीचा फायदाच होतो. जिज्ञासूंना अनेक विषयात गती प्राप्त होते; कारण  प्रश्न विचारण्यात त्यांना  शरम वाटत नाही, अज्ञान मान्य करण्यात शरम वाटत नाही. त्यांचा दृष्टिकोन विशाल बनतो. त्यामुळेच इतरांच्या संस्कृतीबद्दल, कल्पनांबद्दल, मतांबद्दल ते अधिक स्वागतशील असतात.

जे दिसतंय,  जे घडतंय, त्याबद्दल विचार करून काही चाळण्या आणि चाचण्या लावूनच ते निष्कर्षाला येतात.  त्यामुळे ते सहजासहजी फसत नाहीत आणि फसले तरी तिथेच बसत नाहीत. फसगत  मान्य करून, चुका शोधून, पुढे जातात.

चिकित्सक बुद्धिमत्तेमुळे स्वतंत्रपणे काम करण्याची आणि विचार करण्याची सवय लागते.  ती खूप महत्त्वाची आहे. जगावेगळा विचार करणारा माणूसच पुढे जाऊन नेतृत्व म्हणून उभा रहातो.

चिकित्सक बुद्धीने सृजनशीलता देखील वाढते.  शालेय  शिक्षण किंवा एकूणच शिक्षण  ही तर फक्त पहिली पायरी आहे.  जिज्ञासा आणि सृजनशिलता  हातात हात धरून जातात.  या नावीन्याची सुरुवात जुन्याच्या चिकित्सेने होते. म्हणूनच चिकित्सक वृत्तीमुळे कोडी सोडवायला, गणित, विज्ञान यातील कूट सोडवायला तर मदत होतेच पण पुढे व्यवसायातले आणि आयुष्यातले अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायलाही मदत होते. नोकरी असो, मार्केटिंग असो अथवा व्यावसायिक वाटाघाटी असोत; नाविन्याला, नवकल्पनांना, सृजनाला  पर्याय नाही. 

पुस्तकाचे नाव, ‘मला वैज्ञानिक व्हायचे आहे’ असे असले तरी त्यातील विचारपद्धती सर्व क्षेत्रात लागू पडते.  डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांनी हे लिखाण वाचून खूप नेमका मुद्दा मांडला. त्यांच्या मते, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा; तुम्ही निम्मे कवी  आणि निम्मे  वैज्ञानिक असाल तर खूप पुढे जाता. कवीसारख्याच स्वैर, उच्छृंखल, बेलगाम कल्पना विज्ञानालाही  आवश्यक आहेत.

जीवजंतूंचे आजचे रूप हे मूळ रूपाबरहुकूम नाही; ते अंतिमही  नाही. माणसासकट  सारे सजीव उत्क्रांत होतात.  उत्क्रांतीची ही स्वैर, उच्छृंखल, बेलगाम पण क्रांतिकारी कल्पना!  याच कल्पनेची वीज, वैज्ञानिक पद्धतीच्या मुशीत ढाळली की त्या दामिनीची सळसळ उत्क्रांतीचा वैज्ञानिक सिद्धांत होऊन समूर्त उभी रहाते.

तेंव्हा स्पेस-रेस  असो  वा घोड्यांची रेस असो, अभ्यास युद्धाचा असो वा  बुद्धाचा, इतिहास खोदायचा असो वा खोडायचा असो; चिकित्सक विचार करण्याची सवय असेल, तुम्ही निम्मे कवि आणि निम्मे शास्त्रज्ञ असाल तर इतरांच्या कित्येक योजने पुढे असता.

या पुस्तकाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  ही माझ्यासाठी आनंदाचीच नाही तर मोठी अभिमानाची गोष्ट आहे.  डॉ. जयंत नारळीकरांच्या लिखाणाने आणि व्याख्यानाने प्रभावित होऊनच मी वैज्ञानिक लिखाण करायला प्रवृत्त झालो. अस्सल मराठीतील त्यांचे ओघवते लिखाण वाचून  आणि शुद्ध मराठीतील  फर्डे  वक्तृत्व ऐकून मराठीबद्दल वाटणारी न्यूनत्वाची भावना गळून पडली. मी लिहायला तर लागलोच पण गेली २५ वर्ष दरवर्षी न चुकता आमच्या राज्य स्त्रीआरोग्यतज्ञ परिषदेत शुद्ध मराठीत शास्त्रीय विषयावर भाषणेही ठोकतो आहे. मी उभा राहिलो की आता श्रोत्यांतून ‘जय महाराष्ट्र!’ असा आवाज टाकतात लोकं!  

तेंव्हा प्रेरणादायी नारळीकर दांपत्याचे शब्द उद्धृत करण्याचा मोह मला आवरत  नाही. ते लिहितात, ‘या पुस्तकात विज्ञानाबद्दल आणि त्याच्या प्रभावाबद्दल खूप काही सांगितले आहे. किशोरांना सहज समजेल आवडेल असे हे लेखन आहे. विविध प्रश्नांची उत्तरे विज्ञान कसे शोधते हे सोप्या भाषेत सांगितले आहे. सतत प्रयोग करणे, विधाने तपासून पाहणे, निरीक्षणे नोंदवणे, तर्कशुद्ध विचार करत शक्य तेथे निष्कर्ष काढणे, गृहीतके चुकीची ठरल्यास ती बदलणे सुधारणे या रीतीने विज्ञानाची प्रगती होते.  हे सारे इथे रंजक उदहरणातून येते. पुरातन धर्मसंस्थापकांनी विविध गोष्टींच्या बद्दल केलेले तर्क सत्य म्हणून स्वीकारायचे, की विज्ञानाने पुरावा देत सिद्ध केलेली विधाने स्वीकारायची हे वाचकांनी ठरवायचे आहे. असे विवेकी विचार शिकवणारे लिखाण फार जरुरी आहे. लहानांप्रमाणे मोठ्यानाही वाचायला आवडेल, विचार करायला उद्युक्त करेल असे हे लेखन आहे.’

मुखपृष्ठ आणि आतील चित्रे काढणारे श्री. सतीश भावसार यांचे विशेष आभार. मुद्दाम जरा विद्वजड शब्दात सांगायचे झाले, तर  पुस्तक विज्ञानाच्या तत्वज्ञानावरचे आहे. तरीही हलकेफुलके आणि मुलांना आवडेल असे आहे. हा खेळकर मूड चित्रांत सहज उतरला आहे. मुलांच्या डोळ्यातील कुतूहल त्यांनी नेमके पकडले आहे.

हे पुस्तक लोकवाङमयगृहातर्फे  प्रकाशित होत आहे याचा विशेष आनंद आहे. सातत्याने चिकित्सक पुस्तके प्रसिद्ध करण्याच्या त्यांच्या परंपरेचा पाईक होण्याची संधी, यानिमित्ताने मला मिळाली असे मी समजतो. लोकवाङमयगृहाचे श्री. राजन बावडेकर, श्री. संजय कोकरे आणि श्री. संजय क्षीरसागर यांची विशेष मदत झाली. त्यांना मनःपूर्वक लाल सलाम.  

लहान मुलांच्या पुस्तकाची इतकी किंमत पाहून मलाही जरा आश्चर्य वाटलं. मग माझ्याच भाव वधारला आहे  असं समजून जरा हुरूप वाटला. मग साम्यवादी  संस्थेचे हे  नफेखोर पुस्तक कोण विकत घेणार असाही प्रश्न पडला. पण राजन बावडेकर  म्हणाले, ‘काही काळजी करू नका डॉक्टर, आम्हाला मार्केट चांगलं समजतं!’ आता प्रकाशनाच्या आधीच आवृत्ती संपल्यामुळे, त्यांची अटकळ किती बरोबर होती ते सिद्धच झालं आहे.

बऱ्याच दशकांनी त्यांनी बालवाङमयाला हात घातला आहे. यापूर्वी त्यांनी रशियन पुस्तकांची मराठी भाषांतरे उपलब्ध केली होती. तो प्रयोग बंद पडला ह्याचा मला विशेष आनंद आहे. कारण लहान असताना त्यांच्याच एका पुस्तकातील, ‘रात्रभर कडाक्याचा बर्फ पडल्याने बैल कडक झाला होता. चिमुकल्या व्हालदीमीरच्या आईला बैल सोलायला बराच वेळ लागला’, वगैरे वाचून ते पुस्तक माझ्या हातून गळून पडलं होतं आणि मी ते पुन्हा उचललंच नाही. हे पुस्तक मात्र आबालवृद्ध वाचक हृदयाशी कवटाळून ठेवतील अशी मला आशा आहे.

विज्ञान नावाच्या विचार पद्धतीचा शोध लागल्यापासून मानव समाजाची प्रत्येक निकषावर प्रगतीच होते आहे. कोव्हिड, युक्रेन युद्ध वगैरे पहाता हे विधान धाडसी वाटेल.  पण हे मी म्हणत नाहीये. स्टीफन पिंकर, युवहाल हरारी सारख्या अभ्यासकांचे हे पुरावाधिष्ठित   विधान आहे. विज्ञानाचा शोध पाच सातशे वर्षच जुना आहे. आणि गेल्या हजार वर्षाची आकडेवारी पहिली तर असं लक्षात येईल की आज उपासमारीने जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे अतिपोषणाने मरतात. युद्धात जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे आत्महत्या करतात आणि  साथीत जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे वृद्धापकाळाने मरतात.   कोव्हिड, युक्रेन युद्ध वगैरे ह्या प्रगतीच्या आलेखातील उतार आहेत. ते तात्पुरते ठरायचे असतील, हा आलेख सतत चढता रहायला हवा असेल, तर विज्ञान, विवेक, मानवता, आणि उदारमतवादाला पर्याय नाही. हे पुस्तक  म्हणजे प्रगतीच्या ह्या चाकांना वंगण घालण्याचा एक प्रयत्न आहे. बालक-पालक वाचकांनी तो गोड मानून घ्यावा ही विनंती.

 

No comments:

Post a Comment