आठवणीतल्या कविता भाग १ ते ४
संपादक: पद्माकर महाजन, दिनकर बर्वे, रमेश तेंडुलकर आणि राम पटवर्धन
परिचयकर्ता डॉ. शंतनू अभ्यंकर
आठवणीतल्या कविता हे संकलन १९९७ साली विकत घेतले, ते बाबांना वाढदिवसाची भेट म्हणून. त्या पाठोपाठ त्याचे तीन खंड आले मग तेही घेतले. दूर सातासमुद्रापलीकडे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या कुणा आजोबाला आपल्या नातवासाठी ‘पडूं आजारी’ ही कविता हवीहवीशी झाली. भारतातले अनेक मित्र या शोधांत सामील झाले. ती जाम सापडेना. मग अनेक सुहृद या शोधांत सामील झाले. शोधता शोधता शालेय पुस्तकातल्या इतरही कवितांची सय आली साऱ्यांना. या आठवणींनी सारेच रसिक मन व्याकूळ झालं. जुन्या जुन्या शालेय कविता शोधायचं पिसं या शोधकांना लागलं. मग या साऱ्याचा संग्रह करायची टूम निघाली. त्याचा परिपाक म्हणजे हे संकलनाचे चार खंड.
या कवितांचा शोध आणि शोधांचे किस्से मोठे मजेदार आहेत ते सारे मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. ‘सायंकाळची शोभा’अशी भा.रा.तांब्यांची कुठलीही कविता नाही. भा.रा.तांब्यांची मूळ कविता ‘रासमंडळ गोपीचंदन’ या नावाने आहे; त्यात सायंकाळचे वेगळे काढता येण्यासारखं वर्णनही नाही; पण त्या कवितेच्या निरनिराळ्या कडव्यातल्या काही ओळींची उलट सुलट जुळणी करून, वर काही ओळी भरीला घालून संपादकांनी ‘सायंकाळची शोभा’ ही शालेय कविता जुळवली आहे!! पण ही कविता भा.रा.तांब्यांची म्हणून जनमानसात प्रतिष्ठा पावली आहे.
‘आहे मनोहर तरी गमते उदास!’ ही कविता म्हणजे समस्यापूर्तीसाठी दिलेला चौथा चरण होय. या समस्यापूर्तीच्या स्पर्धेत ‘सरस्वतीकंठाभरण’ (गणपत राव उर्फ दादासाहेब बापूजी शिंदे) यांची श्लोकमाला उत्कृष्ट ठरली आणि तीच ही प्रसिद्ध कविता. अशा अनेक गमतीच्या गोष्टी या संग्रहाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचतात.
हा संग्रह, भेट म्हणून बाबांना जरी दिला असला तरी तो माझ्याच टेबलावर विराजमान आहे! कधीही काढावा, कुठलेही पान उघडावे आणि कवितानंदात रममाण व्हावे, असे हे हृदयस्पर्शी पुस्तक आहे. पद्माकर महाजन, दिनकर बर्वे, रमेश तेंडुलकर आणि राम पटवर्धन यांनी हा उद्योग आरंभला तेंव्हा त्याला वाचकांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल अशी त्यांनाही कल्पना नव्हती. आपला हा व्यापार देहूच्या वाण्यालाही लाजवेल असा आहे असं त्यांचं मत होतं पण वाचकांचा आश्चर्यकारक आणि भरघोस प्रतिसाद या संकलनाला मिळालेला आहे.
शाळेत असताना कविता आवडत असोत वा नसोत, त्या आपल्या मनात रुतून बसतात हे खरं. मग पुढे कधीतरी त्या रुजून येतात आणि अशी संकलने हाती येताच त्या तरारून उठतात. मी शाळेत असतानाच्या अगदी मोजक्याच कविता या संग्रहात आहेत. पण म्हणी, वाक्प्रचार किंवा सुभाषिते म्हणून कित्येक काव्य-चरणांचा आसपास संचार असतोच. अशा कवितांच्या ओळी आणि मूळ कवितांच्या मखरात इथे अवचित भेटतात. मागच्या दोन-तीन पिढ्यांच्या तोंडी असलेले श्लोक, कविता, इथे पूर्ण रूपात दिसतात. बरेचदा कवितेतील एखादी ओळ किंवा ध्रुवपद तेवढा आपल्याला आठवत असतं आणि संपूर्ण कविता गवसताच आपला आनंद गगनात मावत नाही. साकी, दिंडी, अभंग, कामदा, स्त्रग्धरा, शार्दुलविक्रडित, मंदाक्रांता, शिखरिणी, इंद्रवज्रा अशा विविध वृत्तांतल्या कविता मोठ्याने म्हणायला खूप मजा येते. साहित्यात कुठे कुठे वाचलेले चमकदार शब्दसमूहांचे मूळ कित्येकदा कवितांतून आढळते. या सगळ्यात आपण हलकेच हरवून जातो.
पण सगळ्यात हरखून जावं अशी गोष्ट म्हणजे कवितांबरोबर मूळ पाठ्यपुस्तकात असलेली काही चित्रही इथे दर्शन देतात आणि आपल्याला शालेय जीवनात घेऊन जातात. मग चित्रातील बायकांना आपण काढलेल्या दाढीमिशाही दिसायला लागतात! ते असो, पण त्या कवितांबरोबर या चित्रांनीही आपल्या मनात नकळत घर केलेले असते. कोण होते हे चित्रकार? हे बरेचसे अनाम आणि उपेक्षित. या चित्रकारांबद्दलचे टिपण आहे चौथ्या भागात. ते मुळातून वाचण्यासारखे आहे.
संकलनाच्या चारही भागाची मुखपृष्ठे पद्मा सहस्त्रबुद्धे यांची आहेत. या आठवणीतल्या कविता आहेत, त्याबद्दलच्या तरल, गूढ, धूसर प्रेमभावना आणि गोड हुरहुर त्या मुखपृष्ठांतून व्यक्त झाली आहे. आपली नजर या चित्रांवरच खिळून राहते. एका अतिशय मन:स्पर्शी प्रकल्पाला अंतर्मन:स्पर्शी मुखपृष्ठे लाभली आहेत. माझ्या कडची पुस्तके आता जुनी झाली आहेत. चित्रांचे सौंदर्य लक्षत यावे म्हणून इथे नेटवरून घेतलेली चित्रे टाकली आहेत.
संपादनाची दिशा स्पष्ट करणारे टिपण, इतर टिपा, पहिल्या ओळीची सूची वगैरे असल्यामुळे या संकलनाचा वापर हौशी तसेच अभ्यासू वाचकांना अतिशय सुलभ झाला आहे. वाचनीय, चिंतनीय, मननीय, संग्राह्य, प्रगल्भतादायक असे हे संकलन आहे. तुमच्या संग्रही असलेच पाहिजे.
No comments:
Post a Comment