Wednesday, 14 September 2022

निवडक नरहर कुरुंदकर: पुस्तक परिचय

पुस्तक – निवडक नरहर कुरुंदकर
संपादक: खंड एक (संपादक विनोद शिरसाठ) 
खंड दोन (भाग १ संपादक विश्वास दांडेकर)
खंड दोन (भाग २ संपादक विनोद शिरसाठ) 
पुस्तकाचा प्रकार वैचारिक  
भाषा – मराठी
पृष्ठे.. अनुक्रमे २६०/३१८/२७२
मूल्य. अनुक्रमे .रू.३५०/३२५/३५०
प्रकाशक – देशमुख आणि कंपनी 
प्रकाशनकाल. अनुक्रमे प्रथमावृत्ती २०१३/२०१५/२०१७

परिचय कर्ता - डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

निवडक नरहर कुरुंदकर
खंड एक (संपादक विनोद शिरसाठ) 
खंड दोन (भाग १ संपादक विश्वास दांडेकर)
खंड दोन (भाग २ संपादक विनोद शिरसाठ) 

पुण्याला, पौड रोडवर पुस्तक पेठ म्हणून एक दुकान आहे. लेखक आणि पक्के विक्रेते संजय भास्कर जोशी यांचे हे दुकान. अगदी लहान वयात जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, ते उदासपणे वेच करायचं असं ठरवून, त्यांनी जाणूनबुजून एका बड्या कंपनीतून निवृत्ती पत्करली आणि ते पुस्तकाच्या व्यवसायाला लागले. पण माणूस अंतरबाह्य लेखक आणि वाचक. त्यामुळे उत्सुकता म्हणून आत शिरलेले गिऱ्हाईक खिसा हलका झाल्याशिवाय मुळीच बाहेर पडत नाही. पण या माणसाच्या बोलण्याचे कसब असं, की इतकं होऊनही माणसांची पावलं पुन्हा पुन्हा या दुकानाकडे वळतात. 
सांगायचा मुद्दा मी असाच एकदा सुखेनैव या जाळ्यात शिरलो आणि जड पुस्तकं आणि हलका खिसा घेऊन बाहेर पडलो. 

त्यात हाती लागले तीन मौलिक ग्रंथ. निवडक नरहर कुरुंदकर! एकूण तीन खंड, एक व्यक्तिवेध आणि बाकीचे दोन ग्रंथवेध. श्री. भास्कर जोशी सांगत होते, कुरुंदकर अजूनही टॉप सेलिंग लेखक आहेत! पण हे दुकानाचे स्थानमाहात्म्य असावे किंवा माझी आवड लक्षात घेऊन केलेली टिप्पणी असावी!! असो. 

व्यक्तिवेध या भागात कुरुंदकरांनी लिहिलेले २१ लेख आहेत शिवाय कुरुंदकरांविषयी इतरांनी लिहिलेले चार लेखही या खंडात आहेत.   

त्यांची खासियत अशी की अपरिचित विषयावरील त्यांचे लिखाण वाचताना आपण सहज त्या विषयात तज्ञच झालो आहोत असे वाटायला लागते. इतके प्रवाही, मुद्देसूद आणि एकमेकांत गुंफलेली त्यांची विचार माला असते. आपल्याला विषय परिचित असला तरीही कुरुंदकरांकडे असलेली दृष्टी, साक्षेप आणि व्यासंग आपल्याकडे नसतो त्यामुळे आपण कल्पनाही केली नसते अशा कोनातून ते आपल्याला आपल्याच विषयाचे दर्शन घडवतात. काही इतिहासकालीन व्यक्ती काही समकालीन व्यक्ती आणि काही स्वतः विषयीचे लेखन यात समाविष्ट आहे. 
लोकहितवादी आणि सावरकर यांच्यावरचे लेख विशेष वाचनीय आहेत. विशेषतः ऐतिहासिक व्यक्तींच्या जातीनुसार त्यांची अप्रतिष्ठा करण्याच्या सांप्रतच्या काळात तर नक्कीच हे वाचायला हवेत. ‘मी आस्तिक का नाही?’ असा एक लेख आहे. बहुतेक अस्तीकांपेक्षा मी धार्मिक वांड्.मय अधिक वाचलेले आहे, सबब मी आस्तिक नाही, असे उत्तर ते देतात!! 

निवडक नरहर कुरुंदकर: खंड दोन हा प्रस्तावनांना आणि ग्रंथ समीक्षेला वाहिलेला आहे. याचे दोन भाग आहेत. 
प्रस्तावना अनेक कारणे लिहील्या जातात. बरेचदा कोणा नामवंताकडून भलामण एवढाच हेतू असतो. पण लेखकाच्या प्रतिपादनाच्या अगदी विरुद्ध मत मांडणाऱ्याही प्रस्तावना असतात आणि त्या छापणारे मोठ्या मनाचे लेखकही असतात. कधी आकृतीबंधाच्या मर्यादेमुळे लेखकाला सारेच मुद्दे मांडता येत नाहीत, मग प्रस्तावनाकार सांधेजोड करून देतो. 

ग्रंथवेध (भाग एक), हे सुमारे पावणे तीनशे पानी जाडजूड पुस्तक. आठ विविध पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना यामध्ये समाविष्ट आहेत. ‘श्रीमानयोगी’ची प्रस्तावना तर मला तरी कादंबरीपेक्षा अधिक भावलेली आहे. अशाच विचारांची चमक आपल्याला या आठही प्रस्तावनांमध्ये ठाईठाई दिसते. वसंत कानेटकर यांच्या हिमालयाची सावली या नाटकाची प्रस्तावना देखील अतिशय वाचनीय आहे. या नाटकामध्ये ‘हिमालय’ हा नायक नसून त्याच्या सावलीचेच हे नाटक आहे, असे आग्रही प्रतिपादन कुरुंदकरांनी केले आहे. कुरुंदकरांचे अफाट वाचन, सखोल चिंतन, इतिहास, संस्कृती आणि साहित्याचे आकलन पाहून आपण स्तिमित होतो. कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाही आणि कोणतेही मत अकारण नाही. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ ते बिनतोड युक्तिवाद करतात. या प्रस्तावना वाचणे ही एक बौद्धिक मेजवानीच आहे.

ग्रंथवेधच्या दुसऱ्या भागात एकूण पंधरा लेख आहेत. आमटेच्या 'ज्वाला आणि फुले' पाठोपाठ लेख येतो तो सुमती देवस्थळी यांच्या श्वाईटझरबद्दलच्या पुस्तकानिमित्ताने. मुद्दाम निमित्ताने असे लिहिले आहे. कारण इथे पुस्तकाची चर्चा नसून आमटे आणि श्वाईटझर यांच्या कार्याची, दृष्टीकोनाची आणि मान-मान्यतेची तुलना केली आहे. केशवसुत, सुर्वे आणि मनोहर यांच्या कवितांचे रसग्रहण इथे आहे. ‘गांधीहत्या आणि मी’ची परखड निर्भत्सना आहे. मात्र सगळ्यात चकित करणारा लेख आहे तो ओशोंच्या ‘संभोगातून समाधीकडे’ बद्दल. एक वेळ तुम्ही मूळ पुस्तक नाही वाचले तरी चालेल, पण कुरुंदकरांचे केलेली चौफेर चिकित्सा वाचलीच पाहिजे. संभोग, समाधी आणि संस्कृती या साऱ्या बद्दल वाचकांच्या जाणीवा प्रगल्भ करणारे हे प्रसन्न आणि संयत लिखाण आहे. 

पुस्तके मित्रासारखी असतात. 
हे तीन भारदस्त ग्रंथ म्हणजे तीन भारदस्त मित्रच जणू. दुरून दर्शनाने दबकून जायला होते, पण जवळीक वाढली की मोठे रसाळ, मधाळ आणि गोष्टीवेल्हाळ आहेत ही पुस्तके.

No comments:

Post a Comment