Monday, 12 September 2022

विवाहबाह्य संबंध आणि नंतर, पुस्तक परिचय

विवाहबाह्य संबंध आणि नंतर
मूळ लेखक डॉ. विजय नागास्वामी 
अनुवाद डॉ. मोहना कुलकर्णी 
पुस्तकाचा प्रकार मार्गदर्शन  
भाषा – मराठी
पृष्ठे.. २४०
मूल्य.....रू.२००
प्रकाशक – मिडिया वॉच 
प्रकाशन काल...प्रथम आवृत्ती ऑगस्ट २०२१
परिचयकर्ता: डॉ. शंतनू अभ्यंकर 

‘अफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर’, या एका अत्यंत स्फोटक विषयावरच्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचा परिचय मी आज करून देणार आहे. लेखक आहेत डॉ. विजय नागास्वामी हे चेन्नाईतील विख्यात मानसोपचार तज्ञ आणि भाषांतर केलंय डॉ. मोहना कुलकर्णी यांनी. एका अत्यंत उपयुक्त पुस्तकाचं हे उत्तम भाषांतर आहे.
डॉ. विजय नागास्वामी यांची विवाहपूर्व मार्गदर्शनाबद्दल ‘ट्वेंटी फोर बाय सेवन मॅरेज’ आणि वैवाहिक सहजीवनाबद्दलचे ‘फिफ्टी फिफ्टी मॅरेज’ याचेही मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. हे त्यांचे तिसरे पुस्तक. याचं मूळ  नाव ‘थ्री इज अ क्राउड’. याचा सार्थ मराठी अनुवाद ‘तीन तीगाडा काम बिघाडा’ असं असावं असं मला आपलं वाटतं.  अनुवादक  डॉ. मोहना कुलकर्णी यांनी ‘अफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर’, या नावाने हे सादर केले आहे.  डॉ. कुलकर्णी स्वतः एमडी (मेडिसिन) असून २५ वर्ष अमरावती येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर त्यांनी समुपदेशनाचे शिक्षण घेऊन पूर्ण वेळे समुपदेशनाचे काम सुरू केले. ही झाली त्यांची अभ्यासक म्हणून ओळख. पण वाचक मंडळींना डॉ. कुलकर्णींची खरी ओळख म्हणजे ‘किस्त्रीम’चे संपादक कै.शांताबाई आणि कै.मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या त्या कन्या.

‘कोंबडीशिवाय उरूस नाही आणि भानगडीशिवाय पुरुष नाही’; ‘एक गाव बारा भानगडी’ वगैरे म्हणी आणि शीर्षके काही उगीच उगवलेली नाहीत.   भानगड हा विषय गावगप्पांचा, गरमागरम, खमंग, मसालेदार चर्चांचा असल्यामुळे त्यात गुंतलेल्यांवर सहजच अनैतिकतेचा शिक्का मारून आपण मोकळे होतो. त्यांच्या वैयक्तिक सुखदुःखाकडे, फरफटीकडे फार गंभीरपणे पाहत नाही. वास्तविक अशा मंडळींना आणि त्या परिस्थितीला समजावून घेण्याची आवश्यकता आहे, असा  सूर लेखकाने लावला आहे.

आपल्या विषयाचा अतिशय सखोल आणि सर्वंकष अभ्यास असल्यामुळे शब्द काय वापरावेत याचा लेखकाने आणि भाषांतरकर्तीने  सखोल विचार केला आहे. म्हणजे अफेअरचे वर्णन करताना फसवणूक, विश्वासघात, दुटप्पीपणा, दगाबाजी असे अनेक नकारात्मक छटा असलेले शब्द टाळून जाणीवपूर्वक ‘प्रतारणा’ असा शब्द लेखक वापरतो. त्याचबरोबर हा शब्द वापरताना या प्रेमत्रिकोणातील कुठल्याही कोनाला तो गुन्हेगार ठरवू इच्छित नाही. भानगडीतल्या तिसऱ्या कोनाला ‘प्रियकर’ किंवा ‘प्रेयसी’ऐवजी ‘प्रेमपात्र’ असा शब्द इथे वापरला आहे.

अफेअर्स सध्या वाढली आहेत, निदान मोबाईल आणि  सीसीटीव्हीच्या जमान्यात ती लक्षात येण्याचे प्रमाण तरी नक्कीच वाढले आहे. पण अफेअर झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. या चक्रवातातून सुखरूप बाहेर पडता येते आणि त्यानंतर पती-पत्नीचे नातं अधिक सजगपणे  हाताळून, सहजीवन अर्थपूर्ण, आनंदी व समाधानी बनवणे शक्य आहे, नव्हे आवश्यक आहे अशी लेखकाची भूमिका आहे.

भानगड केली तर काय बिघडलं काय? या प्रश्नाने पहिलं प्रकरण सुरू होतं. लग्न ही कृत्रिम आणि मानवनिर्मित संस्था आहे आणि अनेक जोडीदार असणे हे नैसर्गिक. मग असं असताना आयुष्यभर एकच जोडीदार हे शक्य तरी आहे का? एकावेळी एकापेक्षा अधिक व्यक्तींवर प्रेम करणे शक्य आहे का? एकापेक्षा अधिक जोडीदार राखण्याची प्रथा असलेल्या समाजाचे काय? जर मला विवाहबाह्य संबंधातून प्रेम, परिपूर्ती, कामतृप्ती मिळत असेल तर माझ्या जीवाचा जिवलग मी का सोडू? पुराणातल्या देवादिकांनीही भानगडी केल्या, सगळेजण करतात, तर मी का नाही? अशा अनेक रंजक पण स्फोटक प्रश्नांची चर्चा या प्रकरणात येते.

शेवटी या सगळ्या प्रकरणात/भानगडीत गुंतलेल्या व्यक्तींना काय वाटतं हेच महत्त्वाचे ठरतं. एखाद्या जोडप्याला ही प्रतारणा वाटत असेल तर ती प्रतारणा आहे, कोणाला तसं वाटत नसेल तर ती नाही. पण अशी प्रकरणे म्हणजे काही भयंकर अध:पात, दुष्टावा, कावेबाजपणा, बेफिकीरी किंवा अनादर वगैरे नसते.

पुढे लेखकाने प्रेमप्रकरणाची पाच वैशिष्ट्ये सांगितली  आहेत. 
१.भावनिक जवळीक
२.लैंगिक संबंध
३.गोपनीयता 
४.अपराधभाव 
५.अवलंबनाची गरज 
या पाचपैकी दोन वा अधिक लागू पडत असतील, तर ते ‘प्रेम प्रकरण’ आहे हे निश्चित; अशी शास्त्रीय व्याख्याही केली आहे.

भानगडी म्हणजे बिघडलेल्या संसाराचे लक्षण, एकदा भानगड झाली की लग्न मोडलंच म्हणून समजा, काही माणसं  भानगडबाज असतातच, पुन्हा विश्वास ठेवणे कसं शक्य आहे?, मीच वाईट म्हणून हे माझ्या वाट्याला आलं, प्रेम प्रकरणे काय फक्त पुरुषांचीच असतात?...अशा अनेक मुद्द्यांची चर्चा पुढे आलेली आहे.

प्रेमप्रकरणे होतातच का याचेही सखोल विश्लेषण केलेले आहे. घरी समाधान होत नाही, काहीतरी चेंज हवा, सायबर सेक्स, घडलं बुवा!, फक्त भावनिक नातं असणारी प्रकरणे, मित्रांचे दडपण आणि काही मानसिक समस्यांमुळे अशी प्रकरणे घडतात हे स्पष्ट केले आहे. 

या सगळ्या समस्येचा इतका उहापोह केल्यानंतर आपण पुस्तकाच्या उत्तरार्धाकडे येतो. इथे अफेअर घडल्यानंतर त्यातून तरुन  जाण्यासाठी, संसार टिकवून ठेवण्यासाठी आणि नुकसान भरून काढण्यासाठी काय करायला हवं, याचा सविस्तर चर्चा केली आहे. प्रतारणा वाट्याला आलेली असताना देखील त्रयस्थपणे या प्रश्नाकडे कसं बघायचं, विचार कसा करायचा, याचे मार्गदर्शन या भागात मिळते. नैराश्य, चिंता, तिरस्कार अशा अनेक भावनांची वावटळ मनामध्ये उठत  असतात.  त्यांचं व्यवस्थापन आणि विरेचन कसं करावं याची उपयुक्त माहिती इथे दिलेली आहे.
अफेअर लक्षात येताच तात्काळ कराव्याशा वाटतात पण करू नयेत अशा गोष्टींची यादीच दिलेली आहे. तत्क्षणी घटस्फोटासाठी वकिलाकडे जाणे, सतत माझ्याशी असं का वागलास? असे विचारत राहणे, भानगडीचे सगळे बारीक-सारीक तपशील गोळा करत बसणे, खुन्नस म्हणून आपण एक उलट भानगड करणे, जोडीदाराला सोडून निघून जाणे या गोष्टी टाळाव्यात असं लेखकाच्या म्हणणं आहे.

काय करावे हेही इथे दिले आहे. दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे लवकरात लवकर सुरू करावेत, स्वतःला वेळ द्यावा, झाल्यागेल्याची चर्चा उगाळत बसू नये, सकारात्मक भावनांचे स्वागत करावे आणि मनाला शांत करणाऱ्या गोष्टी कराव्यात मात्र याचाही अतिरेक टाळावा अशा अनेक गोष्टी लेखक सुचवतो.

प्रतारणा झालेल्या व्यक्तीबरोबरच प्रतारणा करणाऱ्या व्यक्तीचे सारे काही गुलाबी असते असे नाही. तिथेही वाट्याला दुःख असते, शरम, पश्चात्ताप, मानहानी, अपराधभाव, निराशा, चिंता, स्वतःचा तिरस्कार, नाराजी, खिन्नता अशा भावनांची वावटळ त्याच्या/तिच्याही वाट्याला येते. 

शेवटी शहाणपण देगा देवा असं म्हणून क्षमाशीलता आणि विश्वास यावर सहजीवनाची पुनःश्च्य उभारणी शक्य असल्याचे दाखवून देत लेखक पुस्तकाचा समारोप करतो. 
डॉ. कुलकर्णींनी  अतिशय सफाईदारपणे अनुवाद केला आहे. एका शास्त्रीय विषयावरचे हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे अशी शंकासुद्धा आपल्याला येत नाही. गजानन घोंगडे यांचे मुखपृष्ठ गंमतीशीर आणि अर्थपूर्ण आहे. 
बिनभानगडीचे, म्हणजे अफेअर-प्रूफ लग्न, असं काही नसतंच. त्यामुळे अफेअर झालेल्यांनी आणि न झालेल्यांनी वाचावं असं हे पुस्तक आहे, असं लेखकाचं म्हणणं आहे आणि मी लेखकाशी सहमत आहे.

No comments:

Post a Comment