Friday 2 September 2022

मच्छर, मलेरिया आणि चिन्युर्वेद

 

मच्छर, मलेरिया आणि चिन्युर्वेद 

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

एक साला मच्छर आदमी को हिजडा बना देता है!! तसंच झालंय. डास आणि त्याच्या उदरातील ते मलेरियाचे जंतू यांनी आदमी, औरत, बच्चा आणि एकूणच हिवताप निर्मूलन कार्यक्रमाला हिजडा बनवून टाकलं आहे!!

मलेरियाचे चार प्रकार आहेत. पैकी फाल्सीपारम हा सगळ्यात दाहक. सर्वार्थाने. सगळ्या मलेरीयातले मिळून निम्मे पाप याचे.  सर्वात जास्त मृत्यू यामुळे होतात. सर्वाधिक मातामृत्यू, गर्भपात आणि उपजत मृत्यू याच्याच कारणे घडतात. आणि नुकसान फक्त मेल्यामुळेच  होतं असं थोडच आहे? आजारपण, बुडालेले उत्पन्न, जडलेला अॅनिमिया, त्यातून  उणावलेली उत्पादन क्षमता; हे हिशोबात धरलं तर मलेरिया, न मरतासुद्धा, बराच महागात पडतो. शिवाय हा गरीबाघरचा आजार. उघडी गटारे, नाले, डबकी यांच्याकाठच्या नागड्या जनतेला जडणारा. मलेरियाचा पिचका फटकासुद्धा गरिबाघरी वर्मी लागतो.

मलेरियाच्या जंतूंचा प्रवास हा माणसातून अॅनाफलीस डासाच्या मादीत आणि डासीणीतून माणसात असा होत राहतो. नर डास माणसाला चावत नाहीत. हे अतिशय गुंतागुंतीचे जीवनचक्र आहे. यातली डासीणीतली कडी उलगडून दाखवली ती सर रोनाल्ड रॉस यांनी. हा शोध २० ऑगस्ट १८९७चा. म्हणूनच २० ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक मच्छर दिन’ म्हणून साजरा केला जातो. माणसांनी डासांविरुद्ध उभा दावा मांडला असला तरी,  डासांनी ‘जागतिक माणूस दिन’ मुक्रर केल्याचं माझ्या माहितीत नाही. माणूस त्यांच्या खिजगणतीतही नसावा. पण एक साला मच्छर माणसाला किती अगतिक करून सोडतो बघा!

तर, सर डॉ. रोनाल्ड रॉस यांचा जन्म १८५७सालचा. अलमोऱ्याचा. आईबाप ब्रिटिश. शिक्षण इंग्लंडात. डॉ. रॉस भारतीय सैन्यात डॉक्टर होते. अंदमान, बर्मा, चेन्नई, उटी असं अनेक ठिकाणी त्यांनी काम आणि संशोधन केलं. अचानक त्यांची बदली राजपुतान्याला झाली. तिथे मलेरिया कमी. मग बऱ्याच प्रयत्नांनी त्यांनी मलेरियाग्रस्त पोस्टिंग मिळवलं आणि अभ्यास सुरु ठेवला. आपल्या अभ्यासातून त्यांनी मलेरियाचे जंतू हे रक्तपिपासू डासीणीच्या पोटात आणि तिथून अंतिमतः तिच्या लाळेच्या ग्रंथीत पोहचतात हे सिद्ध केलं. अशी डासीण डसली की लाळेद्वारे जंतू आपल्या शरीरात टोचले जातात आणि आपल्याला मलेरिया होतो.  हे संशोधन ‘अर्थपूर्ण’ ठरले.

कारण मलेरिया आणि अशा अनेक आजारांचे संशोधन निव्वळ मानवी पीडामुक्तीच्या प्रेरणेतून झालेले नाही. वसाहतीतील गरीब बिच्चाऱ्या प्रजेच्या नक्त कळवळ्यापोटी झालेले नाही.  हे आजार विषुवृत्तीय साम्राज्य विस्ताराला अडथळा ठरत होते, म्हणून  त्यावरील संशोधनास युरोपीय प्रोत्साहन मिळालं.  सुएझ आणि पनामा कालवे खणले जात होते तेंव्हा अनेक मजूर अनेकानेक साथींना बळी पडत होते.  अनेक भूशास्त्रीय आव्हानांसहित हे जीवशास्त्रीय आव्हानही होते. सुएझला जाऊन, परिस्थिती अभ्यासून मलेरियारोधक उपाय सुचवण्याचे काम डॉ.रॉस यांनी केले. त्यांच्या एकूण कामगिरीसाठी १९०२ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.

अर्थात हेतू काहीही असो, या संशोधनाचा उपयोग भारताला झालाच झाला. कोणे एके काळी भारतात मलेरिया अगदी आटोक्यात आला होता. भारत सरकारने, १९५३ साली, डीडीटीच्या सहाय्याने मलेरियाविरुद्ध लढा पुकारला. पाच वर्षात अगदी नाट्यमय फरक पडला. इतका की राष्ट्रीय मलेरिया ‘नियंत्रण’ कार्यक्रम हे नाव बदलून, राष्ट्रीय मलेरिया ‘निर्मुलन’ कार्यक्रम असं महत्वाकांक्षी बारसं करण्यात आलं (१९५८). मलेरियाने मृत्यू मुळी शून्यावर आले. यश अगदी नजरेच्या टप्प्यात आलं.

ही मुख्यत्वे क्लोरोक्वीनची कमाल. ‘ताप? कदाचित हिवताप असेल, क्लोरोक्वीन खा!’ आणि या ओळीखाली गोळ्यांचा चित्ररूप डोस. आंतरदेशीय पत्रावर छापलेली ही माहिती अनेकांना आठवत असेल. एखादा आजार किती सर्वहारक असू शकतो आणि त्याचे उपचार, निदान प्रथमोपचार, किती सर्वतारक असू शकतात याचे हे उत्तम उदाहरण. आफ्रिकेतील काही देशात तर क्लोरोक्वीन टपऱ्यांवरती आणि हातगाड्यांवरसुद्धा उपलब्ध होतं. आफ्रिकी शाहिरांनी क्लोरोक्वीनवर लावण्यासुद्धा रचल्या आहेत! क्लोरोक्वीन नावाचं साधंसुधं औषध; असं वाटलं, याने  कोट्यवधी जीव वाचले आहेत, वाचत आहेत आणि वाचत रहातील.

 पण या यशामुळे यंत्रणा हुरळून गेली, थोडा गाफिलपणा आला, डास डीडीटीला पुरून उरले आणि मलेरियाचे जंतू क्लोरोक्वीनला पुरून उरले. सुरवातीला क्लोरोक्वीनला सहजी बळी  पडणारा फाल्सीपारम आता क्लोरोक्विन पचवू लागला! इतिहासात सात वर्ष, तीस वर्ष, चाललेली युद्ध आहेत. पण माणूस विरुद्ध हिवताप  हे तर शतकानुशतके चाललेले युद्ध. क्लोरोक्वीनचा शोध लागला आणि माणसाची सरशी झाली. यावर मात करणारे फाल्सीपारम  उत्क्रांत झाले आणि मलेरियाची सरशी झाली. डीडीटीचा शोध लागला आणि माणसाची  सरशी झाली. डीडीटीचे घातक परिणाम लक्षात आले, वापर थांबला आणि पुन्हा मलेरीयाने डोकं वर काढलं. गाडी पुन्हा निर्मुलनावरून नियंत्रणाकडे आली (राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम). कीटकनाशक-भारित मच्छरदाण्या, कीटकनाशक फवारे, डासांची अंडी खाणारे गप्पी मासे, झटपट निकाल देणाऱ्या नैदानिक तपासण्या आणि नवी, आर्टेमिसिनीन गटातील, मलेरिया संहारक औषधे, अशी आता नवी सूत्रे आहेत. आर्टेमिसिनीन गटातील ही नवी औषधे, वरदान म्हणावीत इतकी प्रभावी आहेत. त्यामुळे सध्या माणसाचे पारडे जड आहे. पण अजूनही जय पराजय निश्चित ठरलेलाच नाही. तेंव्हा ‘सुखदु:खे समेकृत्वा, लाभालाभौ जयाजयौ’ असं म्हणत,  ‘ततो युद्धाय युज्यस्व’ला पर्याय नाही.

या क्लोरोक्वीनचा आणि आर्टेमिसिनीनचा इतिहासही रंजक आहे.

क्लोरोक्वीन हे क्विनीनचे परिष्कृत रूप. क्विनीन हे सिंकोनाच्या खोडापासून बनवलेले. सिंकोना ही दक्षिण अमेरिकेतली  एक वनस्पती. पेरू आणि बोलिव्हियात तापावर उतारा म्हणून सिंकोनाची ख्याती. सतराव्या शतकात युरोपीयनांनी दक्षिण अमेरिकेचा ताबा घेतला. तोवर तिथे मलेरिया नव्हता म्हणे. युरोपीयनांनी मलेरिया नेला. तो तिथे पसरला. तापावरील स्थानिक उतारा होता सिंकोना वनस्पतीचा रस. हा हिवतापावर गुणकारी असल्याचे लक्षात आले आणि  आणि युरोपला सिंकोना माहित झाले. मग त्यातील गुणकारी घटक अलग करण्यात यश आलं. तो घटक क्विनीन. मग त्याचे कृत्रीम रूप शक्य झाले, ते क्लोरोक्वीन. क्लोरोक्वीनचा दणक्यात वापर सुरु झाला. मलेरियाला चांगलाच दणका बसला. पण अती वापरामुळे, लवकरच ह्याला दाद न देणारे फाल्सीपारम उगम पावले आणि क्लोरोक्वीन निष्प्रभ ठरलं.

साठच्या दशकातील गोष्ट. व्हिएतनाम युद्ध ऐन भरात होतं. उत्तर व्हिएतनामी फौजांइतकच डासांनी आणि मलेरीयानी अमेरिकन सैन्याला  घायाळ केलं होतं. क्लोरोक्वीन निष्प्रभ ठरत होतं. युद्धात शहीद होणाऱ्यांपेक्षा चौपट सैनिक  हिवतापाने गारद होत होते.   अमेरिकेतील वॉल्टर  रीड  प्रयोगशाळेनी दोन लाखावर रसायने तपासली. त्यातून मेफ्लोक्विन बनवलं, हालोफँट्रीन बनवलं; पण जेमतेमच यश पदरी आलं.  हो ची मिन्हच्या उत्तर व्हिएतनामी फौजांचीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. एजंट ऑरेंज इतकाच (एखाद्या प्रदेशातील झाडी नष्ट करणारे, अमेरिकेने बेमुर्वतखोरपणे वापरलेले रसायन) हिवताप या सैन्याला हुडहुडी भरवत होता.

उत्तर व्हिएतनामने चीनपुढे हात पसरले. या संकटातून सोडवा अशी करुणा भाकली. आणि चेअरमन माओ यांच्या आदेशाने सुरु झाला मलेरियारोधक औषधाचा शोध. मे २३, १९६७ रोजी सुरवात झाली. म्हणून हा प्रोजेक्ट ५२३. शास्त्रज्ञांची फौज कामाला लागली. ह्याद्वारे, पारंपारिक चिनी जडीबुटीतील, चिनी आयुर्वेदातील, चिन्युर्वेदातील म्हणूया आपण, हजारो पारंपारिक वनस्पती अभ्यासल्या गेल्या. या जडीबुटी-मंथनातून अखेरीस ६४० कल्क, काढे, आसव  वगैरेची यादी करण्यात आली. त्यातील गुणकारी घटक वेगळे केले गेले. त्यांचे जैव-रासायनिक गुणधर्म तपासण्यात आले, पण व्यर्थ. या शोधादरम्यान गे होंग विरचित ‘तातडीच्या उपचारांचा निघंटू’ (इ.स. २८१-३४०) या प्राचीन चिनी ग्रंथात क्विन्घौ या वनस्पतीच्या ज्वरहारक गुणांचा   उल्लेख सापडला होता. पण क्विन्घौच्या अनेक उपजाती होत्या. त्या बाबत स्पष्टता नव्हती. झाडाचा नेमका कोणता भाग वापरायचा हेही सांगितलेले नव्हते. बहुतेक वनस्पती उकळून काढा करून दिल्या जात. गे होंग यांच्या मते क्विन्घौ मात्र निव्वळ गार पाण्यात भिजवून त्यात उतरलेला अर्क तेवढा वापरायचा आहे. हे वाक्य कळीचे ठरले. आजवर प्रयोगात ह्याचेही काढे बनवले जात होते. ती पद्धत बदलताच क्विन्घौने (Artemisia annua) आपले गुण प्रकट केले.  अनेक प्रयोगांती  या चिनौषधीतील गुणकारी घटक लक्षात आला, तो होता आर्टेमिसिनीन (१९७२).

तो जमाना सांस्कृतिक क्रांतीचा होता. हा तर सामरिक महत्वाचा गुप्त कार्यक्रम होता. संशय हा वातावरणाचा  स्थायीभाव होता. या शास्त्रज्ञांना रेड गार्डसची भीती होती. लहरी वरिष्ठांची दहशत होती. जरा जपून आणि गुप्तपणे काम करावं लागत होतं. कोणाची वक्रदृष्टी पडली तर हेरगिरीचा आरोप ठेवतील, सारी सॅपल्स जप्त होतील, कागदपत्र नष्ट करतील अशी चिंता होती. अर्थातच या अडथळ्याच्या शर्यतीमुळे खूप वेळ गेला. आर्टेमिसिनीनचे त्रिमितीरूप ठरवणे बरेच जिकीरीचे गेले. पण अखेरीस जमले. हे जमल्यामुळे कारखान्यात उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला नाहीतर निव्वळ झाडावर अवलंबून रहावे लागले असते. आज नऊ तऱ्हांनी हे बनवता येतं. 

तत्कालीन चीनमध्ये संशोधनाच्या नावाने आनंदच होता. प्राण्यांवर (१९७१) आणि पुढे मनुष्यप्राण्यांवर (१९७२) जे अभ्यास झाले ते यथातथाच होते.  पण मुळात औषधच इतकं उपयुक्त आणि प्रभावी होतं की यथातथा चाचण्यातही ते सोन्यासारखं झळाळून दिसलं. आता माओचा अस्त झाला होता. सांस्कृतिक क्रांती शमली होती. डेंग झायोपिंग नवे सर्वेसर्वा होते आणि साम्यवादी-बाजार-अर्थव्यवस्थेचा (communist market economy) बोलबाला होता. नव्या औषधाचे बाजारमूल्य डोळ्यात भरताच, डेंग यांच्या दोन मुलांच्या देखरेखीखालील, एका स्वतंत्र कंपनीकडे हे संशोधन सुपूर्द करण्यात आले. तरीही जगापुढे ही माहिती यायला १९८० साल उजाडले.

या संशोधनासाठी २०१५ सालचा नोबेल पुरस्कार प्रा. युयु टू, या (अस्सल चिनी नावाच्या,) संशोधक  बाईंना मिळाला. राष्ट्रीय चिन्युर्वेद संशोधन संस्थेच्या माध्यमातून हे सारे संशोधन पर पडले. क्विन्घौ ही वनस्पती प्रथम नजरेस आणली ती त्यांनीच, त्यातील आर्टेमिसिनीन वेगळा केला तो त्यांनीच, त्यात आवश्यक रासायनिक बदल केले तेही त्यांनीच,  पहिले मानवी प्रयोग केले ते त्यांनीच; इतकेच नाही तर त्या औषधाच्या सुरक्षिततेची खात्री पटवण्यासाठी त्यांनी स्वतःही ते सेवन केले होते!  

हे औषध मलेरियाच्या जंतूंचा नायनाट करते हे माहित असलं तरी नेमके कसे, हे अजूनही समजलेले नाही. फ्री रॅडीकल, डीएनए, अमिनो अॅसिड अथवा पेप्टाइडवर हल्ला; अशा अनेक शक्यता आहेत. पण कार्यकारणभाव माहित असणे ही औषधाच्या वापरासाठी अत्यावश्यक पूर्वअट नाही! हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण आधुनिक वैद्यकीत वापरल्या जाणाऱ्या कित्येक औषधांची नेमकी कार्यपद्धती आपल्याला आजही अज्ञात आहे. औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध होणे महत्वाचे. नेमका कार्य-मार्ग समजला तर उत्तमच आहे, पण आवश्यक नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने २००१साली आर्टेमिसिनीनला मान्यता दिली. आज आर्टेमिसिनीनला,  जगभर, हिवताप विरोधात प्रथमपूजेचा आणि प्रथमास्त्राचा मान आहे. ही आधुनिक वैद्यकीची खासियत. एकदा औषध उपयुक्त आणि सुरक्षित सिद्ध झालं की ते झाडपाल्याचं आहे, का चिन्युर्वेदीक आहे,  का इंका आहे का अॅझ्टेक याचा जराही मुलाहिजा न बाळगता सरळ ते आपलंसं केलं जातं! मात्र जोवर उपयुक्तता आणि सुरक्षितता सिद्ध होत नाही तोवर, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हा हेका कायम ठेवला जातो.  बुरशी, जीवाणू, एचआयव्ही, कॅन्सर वगैरेविरुद्धही  आर्टेमिसिनीनने काही प्रताप दाखवला आहे. त्याचाही अभ्यास सुरु आहे.

क्लोरोक्वीन निष्प्रभ ठरले आणि हे चिनी औषध हाताशी आले. मलेरिया निदान आटोक्यात तरी राहिला. उद्या हे औषध निष्प्रभ ठरणार नाही कशावरून? ठरेलच. आणि पर्यायी औषध अजून तरी दृष्टीपथात नाही मग मलेरिया पुन्हा डोकं वर काढणारच. पण औषधाला प्रतिकार निर्माण होण्याआधीच मलेरियाला चीत करणे शक्य आहे. नवी नवी औषधे  हा उपाय नाहीये तर प्रभावी औषधे स्वस्तात उपलब्ध करून, त्यांचा  झटपट, सर्वदूर वापर  ही गुरुकिल्ली आहे. आर्टेमिसिनिनने शंभर दोनशे रुपयात  काम होऊन जातं. पण इतकेही पैसे परवडणारी जनता या धरणीवर आहे. त्यामुळे योग्य औषधोपचाराविना माणसं आजही मलेरियाला बळी पडत आहेत. औषध नुसतं असून भागत नाही. ते गरिबांपर्यंत, म्हटलं तर फुकटात, पोहोचावे लागते, तरच त्याचा प्रभावी वापर करता येतो. नफ्याच्या हव्यासापोटी औषधे महाग होत जातात. हतबल जनता आणि सरकारे ती वापरण्याचे अर्धेकच्चे प्रयत्न करत राहतात. माणसं मरत राहतात. खिसे भरत राहतात.

 

प्रा. युयु टू या राष्ट्रीय चिन्युर्वेद संस्थेच्या संशोधक. त्यांच्या मते पूर्वजांनी जे सांगून ठेवलं आहे त्यातील हेम ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकातील हे निरीक्षण आज कामी आलं. धन्य ते द्रष्टे चिनी ऋषी, धन्य ते चिनी मुनी, धन्य ती चिनौषधी, धन्य तो चिन्युर्वेद! हा अभिमान वृथाभिमान अथवा दुराभिमान ठरायचा नसेल तर त्याला वैज्ञानिकतेची चौकट हवी हे ही त्यांनी नमूद केले आहे. 

गूढगंभीर प्राचीन ग्रंथात अशी अनेक रत्ने दडलेली असतीलही. अज्ञाताच्या पोटात अनंत शक्यता वास करून असतात. पण शक्यता म्हणजे शोध नव्हे. त्या शक्यता प्रत्यक्षात आल्या नाहीत तर त्यांना परीकथांहून अधिक किमत नाही. प्रश्न असा आहे की आर्टेमिसिनीनचे श्रेय कुणाचे? प्राचीन चिनी मुनींचे का वैज्ञानिक पद्धतीचे? ही आणि इतर शेकडो झाडपाल्याची औषधे तापावर गुणकारी असल्याचे निरीक्षण निर्विवादपणे प्राचीन  आहे. पण ह्या शेकडोंतील हीच सर्वात प्रभावी आणि सुरक्षित आहे; ह्यातील अमका घटक हिंवतापावर गुणकारी आहे; त्याची निर्मिती अशा तऱ्हेने शक्य आहे; माणसांत ते अमुक इतके प्रभावी आणि तमुक इतके सुरक्षित आहे; अन्य औषधांशी असेअसे सख्य अथवा वैर आहे; वगैरे ज्ञान केवळ त्या वंदनीय चिनी मुनिवर्यांच्या कल्पना, शास्त्र, पद्धती, ग्रंथ आणि तंत्र वापरून शक्य तरी होते का? ही सारी माहिती शोधण्याची तंत्रे, आधुनिक विज्ञानाची देन आहेत. जुन्यातील सामर्थ्य ओळखण्याची दिव्यदृष्टी आधुनिक विज्ञानाच्या सहाय्यानेच शक्य आहे. चिन्युर्वेदातील एक औषध आधुनिक विज्ञानाच्या कसास उतरल्यामुळे अख्खा चिन्युर्वेद आपोआप तर्कसिद्ध ठरत नाही.     क्विन्घौबद्दल  एक निरीक्षण उपयुक्त सिद्ध झाले पण त्याच बरोबर चिन्युर्वेदातील इतर शेकडो चिनौषधींबाबत हजारो निरीक्षणे गैरलागू सिद्ध झाली!

निरीक्षण ही तर पहिली पायरी. स्वागतशील आणि दिशादर्शक. नामदेवाच्या ह्या पायरीला नमस्कार केल्याशिवाय मंदिरात कसे शिरणार? पण म्हणून त्या पायरीवरच अडून राहिलो, पुढची पायरी चढायचेच नाकारले, या पायरीलाच विठ्ठल म्हणून पुजत बसलो, तर खऱ्या विठ्ठलाचे दर्शन कधीतरी  होईल का?  

प्रथम प्रसिद्धी

अनुभव

सप्टेंबर २०२२

 

 

 

 

No comments:

Post a Comment