शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ७)
डोळ्यातील भिंग पाण्याचे का
असते?
डॉ. शंतनू
अभ्यंकर
बोटाकडे नजर रोखली तर खिडकी
धूसर दिसते आणि खिडकीकडे नजर रोखली तर बोट धूसर दिसतं. शिवाय खिडकीबाहेरचे, लांबचे,
दृश्य वहीवर स्पष्ट दिसण्यासाठी पातळ भिंग वापरावे लागतं आणि जवळचे बोट वहीवर
स्पष्ट दिसण्यासाठी, जाड भिंग लागतं. असं दाखवून आजी म्हणाली होती, की यामुळेच
आपल्या डोळ्यातील भिंग पाण्याचे बनलेलं असते! पण तरीही नेमके उत्तर काय ते काही
आजीनी सांगितलं नव्हतं.
शास्त्रज्ञ आजीची ही जुनीच
खोड होती. ती सतत कोडी घालायची, प्रश्न विचारायची, ‘कौन बनेगा चॉकलेटपती?’ असा एक
खेळही शोधून काढला होता तिनी. पण त्याबद्दल मी नंतर कधीतरी सांगीन.
डोळ्यातील भिंगाबद्दल विचार करकरून झंप्या आणि भूपीला एक उत्तर सुचलं
होतं. दुसऱ्या दिवशी आजीने, ‘आलं का
कोड्याचे उत्तर?’, असं विचारताच झंप्या म्हणाला, ‘आम्हाला आलंय, पण आधी तू एका
प्रश्नाचं उत्तर दे. आपल्या डोळ्याचा पडदा पुढेमागे सरकू शकतो का?’
हा प्रश्न आजीला अनपेक्षित
होता. पण दोघांनी अगदी सखोल विचार केला आहे हे दाखवणारा होता. भिंगातून वहीच्या
पानावर प्रतिमा स्पष्ट दिसण्यासाठी वही पुढेमागे करून भिंगापासून सुयोग्य अंतरावर धरावी लागते हे त्या दोघांनी हेरले
होतं. तेंव्हा जवळचे आणि लांबचे स्पष्ट दिसायला हवे असेल तर डोळ्यातील पडदा तरी
पुढेमागे सरकणारा हवा किंवा भिंग तरी लवचिक, म्हणजे पाण्याचे, हवे!
आजी म्हणाली, ‘नाही, पडदा
नाही पुढेमागे सरकत.’ आणि दोघं एकदम खुश झाले. त्यांना सुचलेलं उत्तर बरोबर होतं तर.
भूपी उत्साहानी समजावून सांगू
लागली, ‘वेगवेगळ्या अंतरावरील दृश्य डोळ्यातील पडद्यावर स्पष्ट पडायचं असेल, तर पडदा
तरी पुढेमागे सरकणारा असायला हवा किंवा भिंग तरी जाड अथवा पातळ होणारे हवे. पण
पडदा तर स्थिर आहे. म्हणजे भिंग फुगीर अथवा पातळ होत असणार. आपल्या डोळ्यातील भिंग
म्हणूनच काचेचे असू शकत नाही. आपल्या डोळ्यातील भिंग प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरावे तसे असते.’
‘अगदी बरोबर.’ आजी उत्तरली.
‘आपल्या डोळ्यातील भिंग लवचिक असते म्हणूनच आपण ज्या अंतरावर नजर रोखतो त्या
अंतरावरचे स्पष्टपणे दिसू शकते. जवळचे पाहण्यासाठी आपले भिंग फुगीर असावे लागते आणि
लांबचे बघण्यासाठी आपल्या डोळ्यातील भिंग पातळ असावे लागते.’
‘पण ते फुगीर आणि सपाट कसे
होते?
‘त्याच्या सर्व बाजूनी, ती
प्लास्टिक पिशवी ताणता येईल किंवा सैल सोडता येईल, अशा बारीक दोऱ्या असतात. ह्या
दोऱ्यांनी भिंगाची जाडी कमीजास्त केली जाते.’
‘पण मग चष्म्यामुळे काय
होतं?’ झंप्याने विचारले.
‘समजा एखाद्याला लांबचं नीट
दिसत नाहीये; मग लांबून येणारे किरण नेमके पडद्यावरच पडतील अशा भिंगांचा चष्मा
दिला जातो. समजा जवळचे दिसत नसेल तर जवळून येणारे किरण नेमके पडद्यावर पडतील अशी
भिंग असलेला चष्मा दिला जातो.’
‘आत्ता
आमच्या डोळ्यातले भिंग दिसेल का गं आजी?’ भूपी
उत्साहाने म्हणाली.
‘अगं, असं कसं दिसेल? ते तर
अगदी आणि पारदर्शक असतं. अगदी स्वच्छ काच असेल तर दिसते का आपल्याला?’
‘हो, ना! अगं परवा त्या
मॉलमध्ये मी त्या दाराच्या काचेला धडकणारच होतो!!’ झंप्याला त्याची मॉलमधील फेरी
आठवली आणि जाम हसू आलं.
‘हो अगं,’ भूपी आता
जोरजोरात हसू लागली, ‘हे आमचं ध्यान चाललं होतं सरळ, काचेला धडकायला; तेवढ्यात बाहेरून काच पुसण्यासाठी एकानी साबण
पाणी मारलं!!!’ एवढं बोलून भूपी खो खो हसायला लागली.
‘मी इतका दचकलो, मला वाटलं
आपण आता भिजणार, मी त्या माणसाला ओरडणार होतो, ‘काय रे दिसत नाही का?’’ झंप्या
म्हणाला आणि हसू लागला.
मग भूपीने वाक्य पूर्ण केले
‘पण आजी, तो माणूसच जोरात ओरडला, ‘काय रे दिसत नाही का? धडकशील काचेवर!!!’ मग हा
थांबला.’ आणि सारे हास्यकल्लोळात बुडाले.
‘पारदर्शक आणि स्वच्छ काच
दिसत नाही एवढं खरं.’ आजीने पुन्हा सूत्र आपल्या ताब्यात घेतली.
‘हो ना पण आधीच स्वच्छ
असलेली काच तो माणूस आणखी पुसणार होता!!!’, झंप्याला आपली फजीती आठवत होती.
‘अरे पण बरं झालं ना,
त्यामुळे तू आणि ती काच दोघेही वाचलात!’ आजी म्हणाली. ‘पारदर्शक आणि स्वच्छ काच
दिसत नाही तसंच आपल्या डोळ्यातलं भिंग असतं म्हणून तेही दिसणार नाही. पण माझ्या
डोळ्यातले भिंग दिसेल तुम्हाला!’
‘ते कसं काय?’ भूपी.
‘अगं आता मला मोतीबिंदू
व्हायला लागला आहे.’ आजी
‘मोतीबिंदू म्हणजे?’
झंप्या.
‘म्हणजे भिंग अपारदर्शक व्हायला
लागतं. माझ्या डोळ्यात बघा बुबुळाच्यामध्ये पांढरा ठिपका आहे ना, ते आहे भिंग.’
‘मग आता तू काय करणार?
‘ऑपरेशन. त्यासाठीच तर
माझ्या एका वर्गमित्राला डोळा दाखवायला गेले होते मी. पण ते जाऊ दे. प्रतिमा पडद्यावर पडल्यावर पुढे काय होतं?
आपल्याला दिसतं म्हणजे नेमकं काय होतं? ते पाहू आपण.’
‘हो, हो सांग!!’
‘सांगते. पडद्यावर काय
चित्र आहे ते पडद्याला समजत नाही. पडद्यावर पडलेल्या प्रतिमेचा अर्थ आपला मेंदू
लावत असतो. त्यासाठी डोळ्याकडून मेंदूकडे जाणाऱ्या नसा असतात. म्हणजे विद्युत
संदेश नेणाऱ्या जणू वायर असतात.’ आजीने
मेंदूच्या तळाच्या वायरिंगचे चित्र दाखवत सुरवात केली. (सोबतचे चित्र पहा)
‘डोक्याच्या अगदी मागच्या भागात दृष्टीचे केंद्र
असते. या भागामध्ये ही प्रतिमा सुलटी केली जाते. तिचा अर्थही लावला जातो.’
‘फक्त डोळाच नाही तर इतरही
सर्व संवेदनांचा अर्थ मेंदूत लावला जातो. आपण कानाने ऐकतो पण या कानावर पडलेल्या
ध्वनीचा अर्थ मेंदूतील विशिष्ट केंद्रात लावला जातो. स्पर्श, वास, चव साऱ्याचे अर्थ
मेंदूतच लावले जातात.’
‘पण अमुक चित्र आपल्यावर पडलेले
आहे हे पडद्याला तरी कसं समजतं?’ भूपी.
‘त्यातील पेशींचे कामच आहे
हे.’ आजी.
‘पेशींचे? पडद्यात पेशी
असतात?’ भूपी.
‘हो, पडदासुद्धा आपल्या
शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रमाणे पेशींचा बनलेला असतो. आपल्या हातापायात लांब आणि आखूड होणाऱ्या स्नायूपेशी
असतात. या पेशी लांब अथवा आखूड झाल्या की आपल्या हालचाली घडतात. तसंच डोळ्यामध्ये
उजेड कळणाऱ्या पेशी असतात. हे चित्र पहा यामध्ये डोळ्याचा पडदा मोठा करून दाखवला
आहे. यात दोन प्रकारच्या पेशी दिसत आहेत. काही दंडुक्यासारख्या आहेत तर काही शंखासारख्या.’
‘शंखासारख्या? म्हणजे या तर
आईस्क्रीमच्या कोनसारख्या आहेत की!’ झंप्या.
‘हो ना, इंग्लिशमध्ये यांना
‘कोन’ (Cone) पेशी असंच नाव आहे, रॉड्स अँण्ड कोन्स! रॉड्स म्हणजे दंडपेशी आणि
कोन्स म्हणजे शंकूपेशी. बरोबर ओळखलस झंप्या.’
आजीचे हे बोल ऐकताच
झंप्याला एकदम स्फुरण चढलं. आपण इंग्लिश नाव ओळखलं म्हणजे आपल्याला सगळं इंग्लिश
यायला लागलं असं त्याला वाटून गेलं.
‘शंकुपेशींमुळे आपल्याला
रंग जाणवतात.’ आजी.
‘ओह्ह्के म्हणजे
इंद्रधनुष्य दिसते ते शंकू-पेशींमुळे!’ भूपी.
‘...आणि पांढऱ्या आईसक्रीमवर
लालचुटुक स्ट्रॉबेरी दिसते तीही शंकू-पेशींमुळे.’ झंप्या.
‘पण रंग दिसायचे तर भरपूर
उजेड असावा लागतो. शंकू पेशी भरपूर उजेडातच काम करतात. अंधुक उजेडात दंड पेशी काम करतात. पण त्यांना
रंग जाणवत नाहीत. म्हणूनच तिन्हीसांजेला सगळ्याच गोष्टी काळपट, राखाडी, खाकी
दिसायला लागतात. संध्याकाळी आमराईत गेलात तर तुम्हाला कैऱ्या दिसतील पण कुठल्या
कैरीला पाड लागला आहे, हे दिसणार नाही. अंधुक उजेडात झाडांचे फक्त आकार दिसतात पण
रंग दिसत नाहीत.’
‘हो ना, झाडांचे आकार खूप
चित्रविचित्र दिसतात. म्हणूनच मला अंधारात गच्चीत जायची भीती वाटते. ऐकलस ना भुपे?
शास्त्रीय कारण आहे त्याला! आणि ही भूपी मला भित्रा म्हणून चिडवते!!’ झंप्या.
पण झंप्याच्या बोलण्याकडे आजीने मुळीच लक्ष दिले
नाही. ‘शंकूपेशी आणि दंडपेशी सगळीकडे सारख्या प्रमाणात नसतात. पडद्याच्या बरोबर मध्यभागी शंकुपेशींची दाट
गर्दी असते. पडद्याच्या परीघावर दंड-पेशींची रेलचेल असते. शंकूपेशींची गर्दी
असलेला हा पडद्याचा मध्यबिंदू (Fovea).’ चित्र दाखवत आजी म्हणली. (सोबतचे चित्र
पहा)
‘या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे ना, तेवढा
असतो हा बिंदू. जिथे आपण नजर रोखलेली असते ती प्रतिमा इथे पडते. पण एवढ्याशा जागेत
जवळजवळ ३५००० शंकूपेशी ठासून भरलेल्या
असतात. शंकूपेशी असतातही अत्यंत किडकिडीत.
शंकुपेशीच्या गर्दीमुळे इथली प्रतिमा आपल्याला अगदी स्पष्ट, अगदी स्वच्छ, सगळ्या
बारकाव्यांसह दिसते. पण या मध्य बिंदुपासून आपण जसजसे लांब जातो तसतसे शंकू पेशी
कमीकमी होतात आणि दंडपेशी जास्त दिसायला लागतात. मध्यापेक्षा कडेकडेला या पेशी अगदीच
विरळ असतात.’
‘त्यामुळे दिसण्यात फरक
पडतो?’ भूपी.
‘अर्थात. हे पहा, या
पुस्तकातल्या कोणत्याही एका शब्दाकडे रोखून पहा आणि नजर न हटवता आसपासचे किती शब्द
वाचता येतात ते पहा.’
‘आजूबाजूचे जेमतेम तीन चार
शब्द वाचता येतात. दोघांनी तत्काळ प्रयोग करून सांगितलं.
‘हो ना? मलाही तेवढेच
येतात. म्हणूनच आपण वाचतो तेंव्हा आपली नजर सतत ओळीवरून फिरत असते. जो शब्द
वाचायचा आहे त्याची प्रतिमा सतत फोव्हियावर पडत रहाते आणि आपल्याला अक्षरे स्पष्ट
दिसतात. लांबच्या शब्दांची प्रतिमा फोव्हियाबाहेरच्या पडद्यावर पडते. तिथे दंड
पेशी असतात. तिथली प्रतिमा वाचता येण्याइतकी चांगली नसते.’
‘तरीच!’ झंप्या.
‘तरीच काय?’ आजी.
‘परवाच्या वर्षी नाही का...’
‘परवाच्या वर्षी?’ आजी.
‘अगं म्हणजे मागच्याच्या
मागच्या वर्षी, म्हणजे दोन वर्षापूर्वी, नाही का मला नाटकात खलिता वाचून
दाखवणाऱ्या मावळ्याच काम होतं? नाटकातल्या खलित्याची गुंडाळी तर कोरीच होती. पत्र
मला पाठ होतं. पण सर म्हणाले खलित्यात पाहून नजर फिरवत वाच. नुसतेच कागदाकडे पाहू
नको. मग मी तसं केलं आणि मला बक्षीस मिळालं!’
‘उत्तेजनार्थ!’ भूपी.
‘पण घेतलं की त्यानी उत्तेजन. नंतर शिवाजीचं काम मिळालं
होतं, पण कोव्हिडमुळे नाटकच नाही झालं.’ आजीनी झंप्याची बाजू सावरून घेतली.
‘पण आजी त्या फोव्हियामुळे
इतकं छान दिसत असताना, आजूबाजूला दंड पेशी का असतात? त्या नसत्या तरी चाललं असतं.’
झंप्या.
‘अरे आजूबाजूचे स्पष्ट नाही
दिसले तरी आजूबाजूच्या हालचालींची जाणीव होणं आवश्यकच असतं. समजा कोणी गाडी चालवतो
आहे, तर त्याची नजर, समोर, रस्त्यावर रोखलेली असते. पण बाजूच्या रस्त्यावरून दुसरे
वहान येत असेल तर त्याची प्रतिमा पडद्याच्या कडेला पडते. काहीतरी हलणारी वास्तू
आपल्याकडे येते आहे हे कळते. मग तो ड्रायव्हर गाडी स्लो करतो, बाजूला पहातो, मग
त्याला ते वहान स्पष्ट दिसते.’
‘हो, हो, परवा मी त्या
उतारावरून सायकल मारत होतो तर अचानक गोरेकाकांची स्कूटर मधे! मला जस्ट डोळ्याच्या
कडेतून दिसलं मग मी कच्चकन ब्रेक मारला.’
‘झंप्या, गोरेकाका नाही मधे
आले, तू त्यांच्या मधे आलास! तू फार जोरात सायकल चालवत होतास. गोरेकाकांनी मला
सांगितलं; खूप जोरात सायकल चालवतोस तू!’ आजी.
‘नाही हां आजी. अगं,
गोरेकाका स्कूटरच इतकी हळू चालवतात, इतकी हळू, की त्यांना माझी सायकल फास्ट
वाटते!!!’ झंप्याचे हे लॉजिक ऐकून आजीला हसावे का रडावे तेच कळेना.
‘गोरेकाका स्कूटर बरोबर चालवतात
आणि सायकल, ही त्यापेक्षा कमी वेगानेच चालवली पाहिजे!’ आजीने दटावले.
‘झंप्या, किती मधे मधे
बोलतोस रे, पडद्यावरचे चित्र मेंदूत कसे जाते ते सांगत होतीस तू आजी.’ भूपी
वैतागून म्हणाली.
आजी पुढे सांगू लागली. ‘पुढे
खूपच मजा मजा आहे. ह्या पडद्याच्या पेशीत ऱ्होडोप्सीन म्हणून एक द्रव्य असतं. उजेड
पडला की ते वीटतं!’
‘वीटतं?’
‘म्हणजे फिकट होतं. रंग
जातो त्याचा. उन्हामुळे कपडा कसा वीटतो
तसं!! पण कपडा विटला की पुन्हा मूळ रंगाचा होत नाही. इथे मात्र हे ऱ्होडोप्सीन
क्षणार्धात पुन्हा तयार होतं आणि पुन्हा
प्रकाश पडला की पुन्हा वीटतं. रंग जाण्याच्या म्हणजे वीटण्याच्या क्रियेतून
विद्युतसंदेश निर्माण होतात आणि नसांतून ते मेंदूत पोहोचतात.’
‘पण कसे?’
‘ह्या पडद्याच्या पेशी बघ. यांना
सगळ्यांना जणू नसांच्या शेपट्या फुटल्या आहेत. त्या सगळ्या नसा एका ठिकाणी एकत्र
येतात आणि डोळ्याबाहेर पडतात. मग डोळ्याच्या खोबणीच्या मागील बाजूने मेंदूत जातात.
पार मेंदूच्या मागच्या बाजूला दृष्टीचे केंद्र असते तिथवर जातात.’
‘पण आजी, ह्या पेशी तर विरुद्ध बाजूला
तोंड करून आहेत. प्रकाश येतोय या बाजूने आणि यांची तोंडे आहेत त्याबाजूला? मग
नसांच्या शेपट्या मधून प्रकाश कसा जातो?’
‘अग, त्या नसा अगदी पातळ आणि पारदर्शक
असतात.’
‘पण असं कसं? उजेडाकडे तोंड असेल तर
अधिक चांगले दिसेल ना? पेशीचे तोंड पुढे आणि वायरिंग सगळं मागे नको का?’ भूपी.
‘पाहिजे ना.’
‘मग असं का? असा का बनवलाय डोळा?’ भूपी
तावातावाने म्हणली.
‘कारण डोळा कोणी बनवला नाहीये, तो
हळूहळू उत्क्रांत झालेला आहे. चुकतमाकत तयार झालेला आहे. आणि त्या भानगडीत काही
चुका तशाच राहून गेल्या आहेत. आपल्या शरीराची रचना अगदी बिनचूक नाहीये!’ आजी.
‘आजी, उत्क्रांती म्हणजे
चार्ल्स डार्विननी सांगितलेली आयडिया ना?’
‘हो!’
‘म्हणजे तुझ्या टेबलाशी तो
मोठा फोटो आहे...?’ भूपी.
‘हो, तोच चार्ल्स डार्विन.’
आता झंप्याला जोरात हसू
फुटलं, तो सांगू लागला, ‘अगं भुपे, काल काय मजा झाली, त्या शेजारच्या काकू आल्या
होत्या. त्यांना डार्विन माहीतच नाही. त्या
आजीला विचारत होत्या, ‘एवढा मोठा फोटो कोणाचा लावलाय? चांगली लांब दाढी
आहे. कोणी स्वामी-महाराज आहेत का?’ असं म्हणून काकुंनी अगदी डोळे मिटून नमस्कार
वगैरे केला! आजी म्हणाली, ‘नाही हो, कोणी स्वामी-महाराज नाहीत.’ मग काकू
म्हणाल्या, ‘मग वडील किंवा आजोबा आहेत का तुमचे?’’
यावर तिघेही हसू लागले.
आजी म्हणाली, ‘डार्विन कोणी
स्वामी-महाराज नाही आणि माझा आजाही नाही. पण मी मात्र डार्विनची वैचारिक नात आहे
खास! पण आता, ‘म्हणजे काय?’ असं विचारू नका. ते मी नंतर कधीतरी सांगीन. आजी काय
म्हणाली ते दोघांनाही खरचच कळलं नव्हतं. पण आजी कधीतरी हे सांगणार म्हणजे सांगणार
अशी खात्री तर होतीच.
पूर्वप्रसिद्धी
किशोर मासिक
सप्टेंबर २०२२
No comments:
Post a Comment