आमार जानला दिये या
अन्जोन दत्ता यांच्या प्रसिद्ध बंगाली गीताचा मराठी भावानुवाद
माझ्या खिडकीतुनी,
दिसते छबी, इवली नभाची
इवला ग्रीष्म, इवली
वर्षा, थंडी शिशिराची.
छबी चौकोनी ती, घट्ट
धरिली मी उराशी
माझी खिडकी मला जोडे
जगाशी
त्या जगात खिरती सायंरंग
हेमंती हळदी
त्या जगात कानी
शेजाऱ्याचे हुंदकेही येती
किती छोटे जग, दावी मला
छोटी खिडकी!
माझी खिडकी मला जोडे
जगाशी
त्या जगात चाले
तगायाची रोजची लढाई
त्या जगात जगायसाठी
रोज हजार तडजोडी
त्या जगाचे नाव कोलकाता
का भारतभूमी?
तुमच्या जगाचे नाव
तुम्हाला माहिते का तरी?
सांगाल तुम्ही...
सांगाल तुम्ही बेनियापुकुर,
बेहाला सांगाल
आणि सीमा आखून काढून
दाखवाल पश्चिम बंगाल
आणि केरळात असेल नभ
आणखी निळेशार
हे जगही सारे नसे का
माझे?
माझ्या खिडकीतुनी नाही
दिसत इस्लामाबाद
माझ्या शेजाऱ्याचे
छप्पर असे माझ्या नशिबात
तिथे आज वाळती मोजे
निळे, साडी पिवळी
जग अवचित आज रंगीबिरंगी!
अलाबामात खिडकीतूनी,
सूर बंगाली
बसून कोणी कुराण पढे
खिडकीत जपानी
तुम्ही हिशोब करून
सांगू शकाल, पॅरिस मधील वेळ
पण कोण्या खिडकीत
काय आहे, लागेल का ताळमेळ?
आहे खिडकी मनाची...
ह्या खिडकीतूनी शक्य
आहे झेप आरपार
मेक्सिकोच्या
खिडकीतून झंकारेल गिटार
कोण आता कशी आखेल सीमा
देशांची?
माझी खिडकी मला जोडे
जगाशी
माझी खिडकी नाही घेत
आत धर्मांचे वाद
माझी खिडकी नाही देत
जातीभेदाला दाद
खिडकी न पाही कोण
दिशा? पश्चिम, प्राची?
खिडकीलाही ठाव नसे
दिशा कोणची
खिडकीतून प्रभाते
ऐकू येई भैरवी
कातरवेळी ऐकू येतो
जॉनी कोल्ड्रीन
सुरेल खिडकी नाही कोण्या
सीमा बंधात
माझा सूर नित्य नाते
माझे सांगे त्रिखंडात
माझी खिडकी मला जोडे
(सर्व) जगाशी
माझा सूर मला जोडे
जगाशी
No comments:
Post a Comment