Sunday 3 July 2022

टेस्ट ट्यूब बेबी तंत्राचा खराखुरा बाप: डॉ. सुभाष मुखर्जी

टेस्ट ट्यूब बेबी तंत्राचा खराखुरा बाप; डॉ. सुभाष मुखर्जी
डॉ. शंतनु अभ्यंकर
१९ जुलै २०२२ला डॉ. सुभाष मुखर्जींना जाऊन चाळीस वर्ष होतील. इतिहास घडवणाऱ्या डॉ. सुभाष मुखर्जींच्या वाट्याला उपहास तेवढा आला.
२५ जुलै १९७८ रोजी इंग्लंडमध्ये जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. प्रो. रॉबर्ट एडवर्ड्स आणि डॉ. पॅट्रीक स्टेप्टो यांची ही कामगिरी. तिचे नाव लुई ब्राऊन. बाळाच्या आगमनाचं कोण कौतुक असतं घराला. ही तर परीक्षानलिकेतून जन्मलेली बालिका. हीचा जन्मोत्सव जगभर मोठ्या जोशात, जोरात आणि जोमात साजरा होत होता.
तब्बल आठ वर्षांनी, ६ ऑगस्ट १९८६ रोजी, मुंबईत, जगातल्या दुसऱ्या आणि भारतातल्या, ‘शास्त्रीय नोंदी असलेल्या’ पहिल्या टेस्टट्यूब बेबीचा जन्म झाला. डॉ. टी. सी. आनंदकुमार आणि डॉ. इंदिरा हिंदुजा ह्यांची ही तंत्रमुग्ध करणारी कामगिरी. ह्या बालिकेचे नाव हर्षा. त्या दोन धन्वंतरींच्या आणि हर्षाच्याही वाट्याला खूप कौतुक आलं.
ह्यातील ‘शास्त्रीय नोंदी असलेल्या’, हा शब्द समुच्चय महत्वाचा आहे. कारण शास्त्रीय नोंदी नसलेल्या, अशा बाळाचा, कनुप्रियाचा, जन्म, ३ ऑक्टोबर १९७८ रोजीचा. कोलकाताचा. हीचं लाडाचं नाव दुर्गा. लुई आणि दुर्गीमध्ये अवघ्या ६७ दिवसांचे अंतर. म्हणजे लुई, दुर्गा आणि हर्षा, पाठोपाठच्या तीन्हीही टेस्ट ट्यूब बेब्या मुलीच! पण ते जाऊ दे. श्री. प्रभातकुमार आणि सौ. बेला अग्रवाल हे दुर्गाचे आई-बाबा. पण तिचे जनक होते डॉ. सुभाष मुखर्जी (१६ जानेवारी १९३१ ते १९ जुलै १९८१). 
नवे शोध, नवे तंत्र, हे पश्चिमेतच विकसित होऊ शकते या मताला जबरदस्त धक्का देत डॉ. सुभाष मुखर्जींनी हे काम केलं. मात्र हे कार्य अविश्वसनीय होते. आणि जगानी फारसा विश्वास नाहीच ठेवला. नेटक्या नोंदींअभावी, शोधनिबंधांच्या सातत्याअभावी, शंका घ्यावी अशीच परिस्थिती होती. हे शक्यच नाही, ही बोगसगिरी आहे, असं बहुतेकांचं मत पडलं. काही ठिकाणी बीज-भाषणे वगैरे सन्मान, कौतुक वाट्याला आले; नाही असं नाही. पण कोणत्याही संशोधकाला जे हवं असतं, ते म्हणजे मान्यता, पुढच्या दिशेने प्रवास, आणखी संशोधन; हे काही जुळून आले नाही. जिवंतपणी त्यांना योग्य तो मानसन्मान मिळालाच नाही.
तो माहोलच तसा होता. उद्या युगांडाने, ‘कालच आम्ही चंद्रावर माणूस उतरवला’, असा दावा केला, तर तुम्ही विश्वास ठेवाल? पश्चिमेचा बोलबाला होता ज्ञानप्रभेने तळपण्यासाठी; आणि भारताचा बोलबाला होता, पश्चिमेच्या परावर्तित प्रकाशात वाटचाल करण्यासाठी; फार फार तर जुगाड-चलाखीसाठी.
पण तब्बल एकोणीस वर्षांनी डॉ. मुखर्जींचे श्रेय त्यांच्या पदरी पडलं. हे घडवून आणलं डॉ. टी. सी. आनंदकुमार यांनी. हे तेच डॉ. टी. सी. आनंदकुमार, ज्यांनी हर्षाचा, भारतातल्या ‘शास्त्रीय नोंदी असलेल्या’ पहिल्या टेस्टट्यूब बेबीचा जन्म घडवून आणला होता!!

 डॉ. आनंदकुमार यांनी डॉ. मुखर्जींचे काम तपासले, नोंदी पडताळल्या, जुन्या वह्या वाचल्या आणि खरे श्रेय डॉ. मुखर्जींना जात असल्याचा आपला निष्कर्ष प्रामाणिकपणे जाहीर केला(१९९७). डॉ. मुखर्जींना हे श्रेय, मरणोत्तर का होईना, पण मिळायला हवं असं त्यांनी, या विषयीच्या राष्ट्रीय परिषदेत, आग्रहानी मांडलं. उपलब्ध सारी माहितीही त्यांनी मांडली. डॉ. आनंदकुमार यांचा विज्ञाननिष्ठ पाठपुरावा हा देखील आश्चर्यकारक. डॉ. मुखर्जींना श्रेय देणे म्हणजे स्वतःच्या गळ्यातली विजयमाला उतरवण्यासारखेच होते. पण तरीदेखील त्यांनी हे आनंदानी केलं.  
डॉ. आनंदकुमार यांचा हा गौप्यस्फोट कमालीचा स्फोटक ठरला. आता चित्र पालटलं. कोलकातातील वृत्तपत्रांची पानेच्या पाने डॉ. सुभाष मुखर्जी आणि त्यांच्या चमूच्या (प्रो. सुनीत मुखर्जी, डॉ. सरोज भट्टाचार्य) कौतुकाने भरून गेली. डॉ. मुखर्जींच्या सन्मानार्थ आज काही स्मृतिव्याख्याने, प्रयोगशाळा, पारितोषिके वगैरे आहेत. हजारीबागला (झारखंड), त्यांच्या जन्मस्थानी, पूर्णाकृती पुतळासुद्धा आहे. मात्र या मरणोत्तर सन्मानांमध्ये आता सौ. नमिता सुभाष मुखर्जींनाही काही रस नव्हता. ‘ज्या संस्थात्मक रचनेमुळे डॉ. मुखर्जींना सोसावं लागलं, ती बदलली तर पहा’ एवढीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
डॉ. टी. सी. आनंदकुमार यांनी खोदून काढलेली माहिती थक्क करणारी होती. अनेक नव्या वाटा डॉ. मुखर्जी यांनी निर्माण केल्या होत्या. आणि तरीही एक उपेक्षित आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं होतं. 
टेस्टट्यूब बेबी म्हणजे काय? प्रत्यक्षात काही टेस्टट्यूबमध्ये बेबी तयार होत नाही. खरंतर साऱ्या प्रक्रियेत टेस्टट्यूबची गरजच पडत नाही. टेस्टट्यूब हे प्रतीक मात्र; आधुनिक विज्ञानाचे, अत्याधुनिक प्रयोगशाळेचे. पण बेबी प्रत्यक्षात प्रयोगशाळेतही निर्माण होत नाही. प्रयोगशाळेत होतं ते स्त्री आणि पुरुष बीज यांचे फलन. गुणसूत्रांचा अर्धा वाटा बाळगून असलेल्या बीजांचे मिलन होताच, एकपेशीय जीव तयार होतो. हा रोमांचक क्षण प्रयोगशाळेत घडतो. मग या पेशी झपाट्याने वाढायला लागतात. एकाच्या दोन, दोनच्या चार, आठ, सोळा... आणि मग हा मोजक्या पेशींचा गर्भ-गोळा, योग्य वेळ साधून, आईच्या गर्भाशयात सोडला जातो. त्या बाळाचा आणि प्रयोगशाळेचा संबंध संपतो. इथून पुढे सगळी वाढ आईच्या गर्भाशयातच होते.  
पण प्रयोगशाळेत स्त्री आणि पुरुष बीजाचे मिलन व्हायचं तर ही बीजे हाती यायला हवीत. पुरुष बीजाच्या बाबतीत हे सोपं आहे. हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना गोळा केला की त्यात पुरुष बीज मिळते. पुंबीज निर्मितीचा हा कारखाना अहोरात्र चालू असतो. शनिवारी हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी, असा काही प्रकार नसतो. मात्र स्त्रीबीज, ओटीपोटात, ‘स्त्रीबीज ग्रंथीत’ निर्माण होते. तेही महिन्यातून फक्त एकदा. ती घटिका नेमकी कोणती हे आता सोनोग्राफीत दिसतं मला. पण १९७८ साली, हे तंत्र उपलब्ध नव्हतं. स्त्री बीज पिकत आले आहे हे ओळखायला, यौन स्रावातील काही बदल, लघवीची तपासणी असे ढोबळ मार्ग होते.
दर महिन्याला एकच स्त्रीबीज तयार होणार आणि ते पिकल्यावर नेमके त्याच वेळी ते पोटातून बाहेर काढण्यासाठी डॉ. पॅट्रीक स्टेप्टो यांना बरेच सव्यापसव्य करावे लागले. सौ. ब्राऊन यांच्या पोटात दुर्बीण घालून त्यांनी स्त्रीबीज अलगद उचलून बाहेर काढले होते. एकच स्त्रीबीज प्राप्त झाल्यामुळे दर महिन्याला पोटात शिरून, म्हणजे दुर्बिण घालून, स्त्रीबीज काढण्याला पर्याय नव्हता. दर महिन्याला ही छोटीशी शस्त्रक्रिया! 
इथे डॉ. मुखर्जींनी बाजी मारली होती. योनीमार्गातून आतल्याआत छेद घेऊन, ओटीपोटात प्रवेशत, बीज गोळा करण्याची पद्धत त्यांनी वापरली (Posterior colpotomy). पोटावर वारंवार शस्त्रक्रिया हा प्रकार कटकटीचा, धोक्याचा आणि बराच त्रासदायक होता. योनीमार्गे बीज-काढणी सोपी होती. टाके आतल्याआत असणार होते. त्यामुळे पोटावर विद्रूप व्रण रहाणार नव्हते. 
आज योनीमार्गेच स्त्रीबीज गोळा केले जाते. आता सोनोग्राफी दिमतीला आहे, त्यामुळे छेदही घ्यावा लागत नाही. सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाबरहुकूम जाड सुई बीजग्रंथीत टोचली जाते आणि तिथली बीजे अलगद वेचली जातात. एका वेळी दहा ते पंधरा बीजांचे पीकच घेतले जाते म्हणा ना! बीजे लगडलेल्या ग्रंथी, त्या बीज-भाराने अगदी वाकून गेलेल्या, हे अगदी अलिकडचे संशोधन. पण ह्याही संशोधनाचे बीजारोपण केले ते डॉ. मुखर्जींनी. 
एकाच स्त्रीबीजावर अवलंबून रहाणे अगदीच बेभरवशाचे होते. मुख्य म्हणजे (आजही) मिळालेली सगळीच स्त्रीबीजे उत्तम प्रतीची नसतात. जी उत्तम असतात, ती देखील सारीच्या सारी फलित होऊ शकत नाहीत. जी फलित होतात ते सारे गर्भ गपगुमान वाढत नाहीत. यातून जे गर्भ वाढतील ते सारे गर्भपिशवीमध्ये रुजतातच असे नाही. आणि जे रुजतात त्यातील काही पडतात, काही सदोष निपजतात, वगैरे वगैरे. निखळ यश असं काही नसतंच. तेव्हा दरमहा एका ऐवजी अनेक बीजांचे बंपर पीक काढता आले तर? तर यश मिळण्याची शक्यता जास्त. एकावेळी एका स्त्रीबीजाशी खेळत बसलो तर यश दुरापास्त. अनेक स्त्रीबीजे मिळाली आणि एकाच वेळी ती उचलली तर यशाची शक्यता कितीतरी प्रमाणात वाढेल. त्यामुळे एकावेळी अनेक स्त्रीबीजे निर्माण होण्यासाठी एचएमजी ह्या हॉर्मोनची काही खास इंजेक्शन, डॉ. मुखर्जी यांनी दिली. प्रो. एडवर्ड्स यांनीही या दिशेने प्रयत्न केले होते पण ते असफल ठरले होते. आज हे तंत्र अगदी रुटीन झाले आहे. सुगीच्या वेळी दहा पंधरा बिजांची बेगमी सहज होते.
योग्य मुहूर्तावर, योग्य डोसमध्ये ही इंजेक्शने देणे, त्यांचे दुष्परिणाम टाळणे, ही सगळी तारेवरची कसरत होती. पण पहिल्याच प्रयत्नात त्यांना एकावेळी पाच बीजे वेचता आली. ही स्त्री बीजे पुरुषबीजांसोबत सुमारे २४ तास उबवण्यात आली. फलित झालेली बीजे पुढील तीन दिवसात वाढायला लागली की!! एकच्या दोन पेशी झाल्या, मग चार, मग आठ...!! 
मग त्यांनी आणखी एक क्रांतिकारी गोष्ट केली. जगाच्या पाच वर्ष आधीच केली. जे गर्भ तयार झाले ते त्यांनी अतिशीत वातावरणामध्ये गोठवून टाकले. या गोठलेल्या अवस्थेत ते तब्बल 53 दिवस सांभाळले मग या गाढ निद्रेतून त्यांना जागे केले. पाच पैकी तीन गर्भ सुस्थितीत होते, ते गर्भाशयात सोडले. त्यातला एकच रूजला आणि दुर्गा जन्माला आली. अशा पद्धतीने निव्वळ आठ पेशींचा शीतनिद्रा घेतलेला हा गर्भ यशस्वीपणे मूल म्हणून जन्माला आणण्याचा चमत्कार त्यांनी 1978 साली केला.
शीतनिद्रेची ही युक्ती क्रांतिकारी खरेच. एकाच वेळी अनेक स्त्रीबीजे निर्माण व्हावीत अशी इंजेक्शने दिल्यावर, लगेचच जर गर्भपिशवीत गर्भ सोडला, तर तो रुजण्याची शक्यता खूप कमी असते. तेथील अस्तर, रक्तप्रवाह, स्त्रीबीजकोशांची अवस्था, ही या गर्भाला पोषक नसते. अती श्रमाने हे सारे अवयव थकलेले असतात म्हणाना. त्यामुळे मधे काही काळ गेल्यानंतर, सुमारे महिन्या-दोन महिन्यांनी, पुन्हा गर्भपिशवीचे अस्तर, तिथला रक्तपुरवठा, स्त्रीबीजग्रंथी स्थिरस्थावर झालेल्या असतात. त्यामुळे दीड महिन्याने गर्भ रुजायला सोडणे अधिक फलदायी आहे. (आता तर असे गर्भ महिनोंमहीने सांभाळून सावकाश वापरले जातात.)
पण प्रश्न दीड दोन महिने तो गर्भ प्रयोगशाळेत सांभाळण्याचा आहे. दीड दोन महिने काही तो प्रयोगशाळेत वाढू शकत नाही. या अडचणीवर गर्भ दीड दोन महिने शीतपेटीत ठेवणे हा मार्ग होता. यात थोडीही चूक झाली तर तो जीव गेलाच म्हणून समजा. त्याला सुखाने या शीत-निद्रेत घालणे आणि आणि मग दीड दोन महिन्याने पुन्हा सुरक्षितपणे जागृतावस्थेत आणणे, हे खरे कौशल्याचे काम. ही अंगाई आणि भूपाळी साधणे महामुश्किल. द्रवरूप नायट्रोजन आणि डायमिथीलसल्फोक्साईडच्या (डिएमएसओ) सहाय्याने डॉ. मुखर्जीनी हे लीलया साधले आणि पूर्ण वाढीचे नॉर्मल मूल जन्माला घालून दाखवले. अशा शीतसमाधीतून प्रकट झालेली जगातली पहिली व्यक्ती म्हणजे ही दुर्गा.
प्रो. रॉबर्ट एडवर्डस् यांना २०१० सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. आयव्हीएफच्या तंत्रात दिसामासाने बदल झाले आहेत. आता प्रो. एडवर्ड्स आणि डॉ. स्टेप्टो यांचे तंत्र मागे पडले आहे. इंग्लंडच्या कुशीत जन्मलेली, ब्राऊन नावाची गौरांगना ही भलेही जगातली पहिली टेस्ट ट्यूब कन्यका असेल; मात्र त्या तंत्रांनी जन्मलेली ती बहुधा शेवटचीच. आज जगभर टेस्ट ट्यूब बाळांचा जन्म होतो तो बराचसा डॉ. मुखर्जींची तंत्र-तत्वे वापरून. जगात प्रथमच त्यांनी स्त्रीबीजांचे पीक घेतले होते, ती बीजे यौन मार्गे गोळा केली होती आणि गर्भ शीतसमाधीत घालून दीड महिन्यांनी गर्भाशयात सोडले होते. त्यांनी निर्माण केलेला पायरस्ता आज हमरस्ता बनला आहे. मात्र त्यांचे अधिकृत श्रेय हुकले ते हुकलेच. जगत्मान्य, अधिकृत नोंदींनुसार, हॉवर्ड जोन्स (1996 Hum Reprod) यांनी एचएमजी वापराबाबतचे संशोधन प्रथम मांडले, ग्लाईशर (1983, Lancet) यांनी यौनमार्गे बीज वेचण्याचा मार्ग दाखवला आणि ट्राउनसन (1983, Nature) यांनी शीतनिद्रा व कालांतराने गर्भ-स्थापना, चिरस्थायी केली.  
डॉ. मुखर्जी एका सरकारी संस्थेत शास्त्रज्ञ होते. शिवाय खाजगी प्रॅक्टिसही करीत. त्यांचे अचाट दावे तपासायला सरकारने एक सत्यशोधक समिती नेमली. 18 नोव्हेंबर 1978 रोजी या समितीपुढे डॉ. मुखर्जींनी आपलं म्हणणं मांडलं. पण डॉ. मुखर्जी काळाच्या पुढे होते आणि समिती काळाच्या मागे. त्यामुळे संवादाऐवजी वाद आणि विसंवाद तेवढा घडला. डॉ. मुखर्जींची आणखी एक अडचण होती. आवश्यक ती सर्व माहिती उघड करायला ते बिचकत होते. त्यांना त्या सगळ्या विज्ञान-विधीचा पुन्हा एकदा पडताळा घ्यायचा होता आणि कोणत्यातरी मान्यताप्राप्त जर्नलमध्ये तो सविस्तर प्रकाशित करायचा होता. उदाहरणार्थ गर्भ गोठवला कसा, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं. ही माहिती उघड करणे धोक्याचे होते. अन्य कोणीतरी या माहितीचा वापर करून श्रेय लाटू शकतो अशी सार्थ भीती होती. पण हा असला अर्धवट प्रकार समितीच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. गर्भ गोठवणे वगैरे प्रकारासाठी आवश्यक ती ‘प्रयोगशाळा’ नव्हतीच. हे काम त्यांनी घरच्या घरीच केले होते म्हणे! शिवाय हा प्रयोग त्यांनी त्यांच्या खाजगी दवाखान्यात केला होता. वरिष्ठांना कल्पना न देता! अर्थात जगात प्रथमच स्त्रीबीजांचे पीक घेण्याचा प्रयत्न करणे, बीजे यौनमार्गे गोळा करणे आणि गर्भ शीतसमाधीत झोपवून दीड महिन्यांनी गर्भाशयात सोडणे वगैरे प्रकारांना अधिकृत परवानगी मिळणे अवघडच होतं.
इतरही अनेक अडचणी होत्या. 
‘दीड महिना गर्भ गोठवला म्हणताय, मग त्या दरम्यान आपोआप दिवस राहिले नाहीत कशावरून?’; हा समितीचा प्रश्न निरुत्तर करणारा होता. (आजही, निपजलेले मूल, ‘दरम्यानच्या काळात’ नैसर्गिकरित्या राहिलेले नाही, हे सिद्ध करणे अवघडच आहे.) सौ. अग्रवाल यांना नळ्या बंद असल्याने लग्नानंतर सोळा वर्ष झाली तरीही मूल नव्हतं. पण याचा सज्जड पुरावा आता त्यांच्याकडे नव्हता. आता पुनश्च तपासणीलाही पेशंटचा नकार होता. बाळ जन्माला आल्याचं डॉ. मुखर्जी मारे सांगत होते पण प्रत्यक्षात बाळ दाखवू शकत नव्हते!! कारण अग्रवाल कुटुंबीयांनी डॉ. मुखर्जींना गुप्ततेची शपथ घातली होती. त्या उभयतांनी समितीसमोर साक्ष द्यायला ठाम नकार दिला. दुपट्यात खिदळणारे सुख त्यांच्यासाठी खूप होते. आयुष्याचं सार्थक होतं. वांझोटेपणाच्या शापावरील हा उतारा लोकमान्य ठरणार नाही अशी त्यांना भीती होती. चार लोक काय म्हणतील ही काळजी होती. आपली आणि आपल्या अपत्याची नाचक्की होईल ही खात्री होती. बाळांत काही दोष असला तर?, कुणाची नजर लागली तर? जीवाला असे अनेक घोर होते. अमृत बझार पत्रिकेत एक फोटो छापून आला (६ ऑक्टोबर १९७८) होता, पण तेवढेच. मर्यादाशील माध्यमांनी आपली मर्यादा पाळली होती. पण नवजात बाळाचा फोटो म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा पुरावा नाही. पण फलित गर्भ पेशींचा फोटोही ते पेश करू शकले नाहीत. अर्थात त्या काळी फोटो वगैरे घेणेही किती जिकिरीचे होते. आज फलित पेशीचा दर काही मिनिटांनी फोटो निघतो, आपोआप, अगदी दिवसेंदिवस.  
डॉ. मुखर्जींनी परोपरीनी समजावले. चकचकीत प्रयोगशाळा महत्वाची नसून हा बुद्धीबळाचा डाव आहे. साधने महत्वाची नसून साधना महत्वाची आहे. हा दुर्गावतार म्हणजे दैव फळफळणे नसून वैज्ञानिक कल्पकतेची फलनिष्पत्ती आहे, वगैरे वगैरे. गायींच्या कृत्रिम रेतनासाठी वीर्य असलेले शीत-डबे, गोठ्यात सुद्धा ठेवलेले असतात. प्राण्यांत आणि मनुष्यप्राण्यांत फारसा फरक नाही. मग घरी ठेवले तर बिघडले कुठे? भारनियमनाने सतत अंधारात असलेल्या कोलकात्यात घरी हे कसे शक्य झाले? अशीही एक शंका होती. खरंतर गर्भ गोठवण्याला वीजच लागत नाही! 
पण डॉ. मुखर्जींचा दावा समितीने फेटाळला. आपल्याला अत्यंत घाईघाईने प्रस्तुती करावी लागली, पुन्हा एकदा आपल्याला म्हणणे मांडण्याची संधी द्यावी असा अर्ज त्यांनी केला. ही मागणी अमान्य झाली. इतकंच नाही तर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संमेलनात हजेरी लावण्यापूर्वी वारिष्ठांची परवानगी घ्यायला हवी, असाही फतवा निघाला. त्याच दरम्यान जपानमधील क्योटो येथील एका प्रतिष्ठित परिषदेचे निमंत्रण डॉ. मुखर्जींना होते. मात्र ही परवानगी नाकारण्यात आली. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. मानी आणि संवेदनशील डॉ. मुखर्जींना हार्ट अटॅक आला. त्यांची तब्येत ढासळली. त्यातच त्यांची बदली डोळ्याच्या विभागात करण्यात आली. कुठे टेस्टट्यूब बेबी आणि कुठे डोळा? अपमानाची आता परिसीमा झाली होती. आवडते संशोधन सुरू ठेवण्याची संधीच काढून घेतली गेली. ५ जून १९८१ रोजी बदलीचा आदेश निघाला आणि 19 जुलै 1981 रोजी त्यांनी आत्महत्या केली!
सत्तरच्या दशकात नापास ठरलेला पुरावा एकोणीस वर्षांनी ग्राह्य कसा ठरला? डॉ. आनंदकुमार यांना फार काही वेगळं गवसलं नव्हतं. ह्या प्रश्नाचं उत्तर, ‘वेळ आली नव्हती’ एवढंच आहे. ७० चे आर्थिक अरिष्ट, ७१चं युद्ध, ७५ची आणीबाणी आणि लोकसंख्या नियंत्रयाणावरचा सरकारी भर; कळत नकळत समितीची मानसिकता घडवणारे असे अनेक घटक होते. कुटुंब नियोजन ही सरकारची आवडती राणी होती अर्थातच वंध्यत्व चिकित्सा ही नावडती राणी, थेट सवत. खरंतर वंध्यत्व हा निव्वळ खाजगी प्रश्न नाहीये. तो एक गंभीर सामाजिक प्रश्न देखील आहे. व्यसनाधीनता, देवदेवस्की, कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट, बुवाबाजी, बाहेरच्या भानगडी, गुप्तरोग, असे अनेक आयाम याला आहेत. पण त्याकाळी लोकसंख्येच्या राक्षसाशी दोन हात करण्यात गुंतलेल्या भारतमातेला, आपल्या नि:संतान संततीचा विसर पडला होता जणू. ह्या प्रश्नाचा फारसा विचारच झाला नाही. मग ह्याला पैसा आणि प्राधान्य मिळणे तर दूरकी बात. नव्याने सत्तेत आलेल्या कम्युनिस्ट सरकारने अशा खाजगी, पैसेवाल्यांसाठीच्या, नैतिक पेच घालणाऱ्या संशोधनाला बगल देणेच समयोचित होते. कालाय तस्मै नमा:! 
पण कितीही झालं तरी हे काही ऐरेगैरे तंत्रज्ञान नाही. जनांच्या जननावर हुकूमत गाजवणारे कोणतेही तंत्रज्ञान, अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लाटांवर हेलकावे खात असते. एकोणीस वर्षात बरेच काही बदलले. डॉ. मुखर्जींच्या पाठीराख्यांनी आपले म्हणणे एकोणीस वर्ष लावून धरले. आता पिढी बदलली. इस्रोची सुरवात चर्चच्या आवारात आणि इन्फोसिस, अॅपल वगैरेंचा जन्म गॅरेजमध्ये झाल्याच्या कथा आता आधुनिक बोधकथा झाल्या होत्या. जे डॉ. मुखर्जी सांगत होते ते शक्य आहे हे हळूहळू लक्षात आले. कुटुंब नियोजनावरचा सरकारी भर जरा ओसरला. प्रयोगावस्थेतील चाचपडणारे आयव्हीएफ तंत्र, एक शास्त्र म्हणून विकसित झाले. जागोजागी आयव्हीएफ सेंटर्स झाली आणि त्यातली काही परदेशस्थांना सेवा देऊन परकीय चलन आणू लागली. पुढे अग्रवाल कुटुंबियांची भीड चेपली. डॉ. मुखर्जींनी जन्माला घातलेला दुर्गावतारही अखेर वयाच्या तेहतिसाव्या वर्षी जगासमोर प्रकटला (The Week; 3rd April 2011) आणि आपला जन्म डॉ. मुखर्जींच्या तंत्राने झाल्याचे तिने जगाला सांगितले.
आता ठिकठिकाणी आयव्हीएफ सेंटर्स आहेत. आता कित्येक टेस्ट ट्यूब बेब्यांना, बेब्या झाल्या आहेत. कित्येक नातवंडे खेळवत आहेत. निःसंतानांना संतान सुख देणारे हे शास्त्र आहे. प्रजनन ही तर आदीम प्रेरणा; शिवाय सामाजिक सुप्रतिष्ठा, पूर्वज ऋणातून मुक्ती, स्त्रीत्वाची आणि पुरुषत्वाची परिपूर्ती असे किती तरी पैलू आहेत याला. भरल्या घराला गोकुळ म्हणणाऱ्या, कुलसातत्याचं कौतुक असणाऱ्या, आपल्या लेकुरवाळ्या देशाने तरी डॉ. सुभाष मुखर्जीं नावाच्या भारतमातेच्या एका उपेक्षित लेकराची कृतज्ञ आठवण जपली पाहिजे, नाही का?

प्रसिद्धी
मा. महा अनुभव, 
जुलै 2022

No comments:

Post a Comment