Saturday 2 July 2022

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ६) आपल्याला दिसते कसे?

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ६)
आपल्याला दिसते कसे?
डॉ. शंतनू अभ्यंकर
झंप्या आणि भुपी शाळेतून आले तर आजी बाहेर गेली होती. कडीला चिठ्ठी होती. त्यात, ‘किल्ली शेजारी आहे. आज मला जीममधून यायला उशीर होणार आहे. तुमचा तुम्ही चहा करून घ्या’, असा निरोप होता. भुपी एकदम मोहरली. आता आपण मोठ्या झालो, आपल्याला घर सांभाळायला दिलंय हे तिला एकदम भारी वाटलं. तिनी चहा टाकायला घेतला पण त्याच वेळी ताई म्हणून झंप्याला शिस्त लावणं आपलं काम आहे, असंही तिच्या मनात आलं.
मग तिनी झंप्याला व्यवस्थित घोळात घेतला. ‘चहाची तयारी करायचे मोठ्या जबाबदारीचं आणि अत्यंत अवघड काम तू केलंस, तर मी चहा करीन.’ तिनी प्रस्ताव ठेवला.
झंप्या जरा गोंधळला. चहाची तयारी इतकी महत्वाची असते हे त्याला माहीत नव्हते. तो काही बोलायच्या आतच भुपी म्हणते कशी, ‘पण काहीही झालं तरी भांडी आणि कपबशा विसळण्याचे नाजुक काम मी तुला नक्कीच देणार नाही!’
आता तर झंप्याला काही सुचेच ना.
‘बरं चल तू घे तयारी; मी शेजारी दुकानातून क्रीम रोल आणते आणि इतका नाराज नको होऊ भावा! देईन मी तुला कपबशा विसळायला!!’ भुपी त्याला विचार करायला वेळ न देता म्हणाली आणि भुर्रदीशी गेली सुद्धा. 
थोड्याच वेळात भुपी परतली. उंच खुर्चीवर तंगड्या हलवत, झंप्यानी क्रीमरोलचा तोबरा भरला. झंप्या काही खाणार म्हटलं की शेजारचा बोका येऊन लगेच पायाशी घोटाळायला लागायचा. खाऊन होईपर्यंत झंप्या इतकं काही खाली सांडायचा की बोक्याचंच पोट जास्त भरायचं! सांडण्याबद्दल आजी रागावली की झंप्या मांजरापेक्षा करुण आवाजात म्हणतो, ‘अगं माझ्या स्वभावातच भूतदया आहे. त्या मुक्या बोक्याचे पोट भरावे म्हणून मी मुद्दाम सांडतो!’ आताही चहा आला आणि टेबलावर झंप्याचा आणि टेबलाखाली बोक्याचा फराळ सुरू झाला.   
थोड्याच वेळात आजी परतली पण आता दृश्य पूर्णपणे बदललेलं होतं. एका कपाचा कान फुटला होता, झंप्याचा कान भुपीने पिरगळला होता. भुपीच्या झिंज्या झंप्याच्या हातात होत्या. झंप्या घळघळा रडत होता. भुपी जोराजोरात ओरडत होती. बोका टेबलावर सांडलेला चहा चाटत होता आणि मधूनच क्रीमरोल खात होता. आणि मांजरांना अंधारात दिसतं का दिसत नाही; या मुद्दयावर झंप्या आणि भुपी एकमेकांशी भांडत होते. 
आजीने येताच परिस्थिती काबूत आणली. दोघांना स्वयपाकघर आवरायला लावून आजी त्यांना खेळायला पिटाळायला लागली. पण मुख्य प्रश्न सोडवल्याशिवाय दोघेही बाहेर जायला तयार नव्हते. तो प्रश्न होता, मांजरांना अंधारात दिसतं का दिसत नाही?
भूपीचे म्हणणे होते, मिट्ट काळोख असेल ना, तर नाहीच दिसत. झंप्याचे म्हणणे होते, ‘मांजरे उंदीर खातात. उंदीर युझ्यूअली रात्री रनिंग करतात. उंदीर दिसल्याशिवाय मांजर उंदीर कसं पकडणार? म्हणजे अंधारात मांजराला दिसतं!’
शेवटी आजीला समजावून सांगावंच लागलं. आजी म्हणाली, ‘मांजरांना अंधारात दिसतं असं आपण म्हणतो पण प्रत्यक्षात पूर्ण अंधारात आपल्याला जितकं दिसतं, तितकंच मांजरालाही दिसतं.’
‘म्हणजे?’ भुपी.
‘म्हणजे दोघांनाही काहीच दिसत नाही!!’
‘अगं असं कसं म्हणतेस?’ झंप्या उतावीळपणे बोलू लागला.
‘अरे अंधार म्हणजे काय? अगदी प्रकाशाचा एकही किरण नाही म्हणजे मिट्ट अंधार. रात्री मांजर उंदीर पकडतं ना तेव्हा कुठून तरी थोडा ना थोडा तरी उजेड येतच असतो. अगदी लाईट गेले असं जरी समजलं तरी चंद्राचा उजेड असतो. अमावस्या असेल तर ताऱ्यांचा उजेड असतो. ढग आले असतील आणि सगळे तारे झाकोळले असतील तरीदेखील किंचितसा उजेड असतोच. अशा वेळेला मांजरांना आपल्यापेक्षा जास्त दिसतं हे बरोबर आहे हं झंप्या. पण कुठूनही प्रकाशाची तिरीपसुद्धा येणार नाही अशा रीतीने एखादी खोली बंद केली, तर आपल्यालाच काय पण मांजरालासुद्धा तिथे काही म्हणजे काही दिसणार नाही.’
‘का पण?’ झंप्या. 
‘जर का?’ हा जसा गूगल आजीचा आणि तिच्या नातवंडांचा आवडता खेळ होता, तसंच ‘का पण?’ हा सुद्धा. आजीला सतत ‘का पण?’ असं विचारलं, की अद्भुताच्या प्रदेशात प्रवेश नक्की, हे आता झंप्या आणि भुपीला माहीत झाले होते. आताही झंप्याच्या ‘का पण?’ला, आजीने उत्तर द्यायला सुरुवात केली.    
‘याचं कारण असं की कुठलीही वस्तू दिसण्यासाठी त्या वस्तूपासून निघालेला प्रकाशकिरण आपल्या डोळ्याच्या पडद्यावर पडावा लागतो. तेव्हाच आपल्या मेंदुला ती वस्तू दिसते. अजिबातच प्रकाश नसेल तर काही दिसण्याचा प्रश्नच नाही.’
‘पण आपल्याला दिसतंच कसं?’ झंप्याने खेळ पुढे सुरू केला.
‘उजेड ही एक प्रकारची ऊर्जा म्हणजे शक्ती आहे. तुझा मित्र जेव्हा पाठीत धपाटा घालतो तेव्हा स्नायूंची शक्ती तुला जाणवते किंवा गरम गरम चहा पिताना आपल्याला उष्णतेची शक्ती जाणवत असते. आपले कान आवाजाच्या शक्तीचे भान ठेवून आहेत आणि आपले डोळे उजेड नावाच्या ऊर्जेचे. कोणतीही गोष्ट तापवली की त्यातून उष्णता आणि उजेड बाहेर पडायला लागतो.’
‘हो ना, फुलबाजीतली तार किती लालभडक झालेली असते आणि भाजते सुद्धा.’ भुपी म्हणाली.
‘सूर्यप्रकाशसुद्धा, सूर्य सतत धगधगतोय म्हणून निर्माण होतो. हळूहळू माणसाला कृत्रिम प्रकाश निर्माण करता यायला लागला. शेकोटी, कोळसे, तेल, गॅस आणि आज इलेक्ट्रिसिटी. यातून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो आणि आपल्याला या वस्तू दिसतात.’
‘पण आजी, आपल्याला माणसांचे चेहरे दिसतात, पुस्तकं दिसतात, क्रिकेट बॅट दिसते, आईस्क्रीम दिसते; हे थोडेच पेटलेले असतात?’ झंप्या.
‘अरे, हे आपल्याला दिसतं कारण त्यांच्यावर पडणारा उजेड परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात शिरतो. या टेबलवर दिव्याचा उजेड पडलाय आणि टेबलवरून परावर्तित होऊन तो आपल्या डोळ्याच्या पडद्यावर पडतो आहे.’
‘पण डोळ्यात उजेड गेल्यावर पुढे काय होतं? आपल्याला दिसतं कसं?’ भुपी.
झंप्याच्या डोळ्यात मोबाईलचा टॉर्च टाकत आजी भुपीला डोळा दाखवू लागली. त्याच वेळी झंप्यानेही आपल्या मोबाईलचा सेल्फी मोड सुरू करून स्वतःचा डोळा बघायला सुरवात केली. ‘काय काय दिसतंय, सांग.’ म्हटल्यावर भुपी वर्णन करू लागली.
‘डोळ्याचं बुबुळ दिसतंय. या बुबुळावर एक फुगीर असा, पारदर्शक, काचेचा असावा असा, गोल दिसतोय.’ भुपी.
‘उलट्या ठेवलेल्या बशीसारखा आहे तो.’ झंप्या.
‘याला म्हणतात कॉर्निया.’ शास्त्रज्ञ आजी पुढे सांगू लागली, ‘हा आत्ता अगदी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असला, तरी कॉर्निया हवेने सतत वाळत असतो. त्याच्यावर धूळ बसत असते. त्यामुळे तो सतत स्वच्छ ठेवावा लागतो. आपले डोळे आपल्या नकळत सतत उघडझाप करत असतात. पापण्यांच्या वायपरमुळे कॉर्निया सतत पाण्याने पुसला जातो.’
‘पाण्याने? डोळ्यात सतत पाणी येतं?’ झंप्या.
‘हो येतं, काही मुलांच्या डोळ्यात सतत पाणी येतं.’ भुपी.
‘चेष्टा बास हं भुपे.’ आजीने दटावले. ‘आपल्या नकळत ही स्वच्छता घडत असते. डोळ्यात पाणी येतं ते फक्त रडताना नाही. एरवीही सतत डोळ्यात पाणी तयार होत असतं. कॉर्निया पुसून झाला की हे पाणी डोळ्यातून बारीक नळीद्वारे नाकात उतरते. पण रडताना हे जरा जास्तच तयार होतं.’ आजी.
‘ओsssह के! म्हणूनच रडताना नाकातूनही पाणी येतं तर!!’ भुपी.
‘पण गूगल आजी, उजेड डोळ्यात गेल्यावर पुढे काय होतं?’ झंप्या.
‘सांगते. नीट बघा दोघेही. डोळ्यात मधोमध एक काळा, टिकली एवढा, गोल, ठिपका दिसतोय? ही आहे डोळ्याची बाहुली. हिच्या बाजूने अशी किरणा-किरणांची नक्षी काढलेली दिसते आहे. बाहुली म्हणजे डोळ्यात उजेड सोडणारी खिडकी आहे आणि ही नक्षी, म्हणजे खिडकी लहानमोठी करणाऱ्या दोऱ्या आहेत. खूप उजेड आत जाऊन चालत नाही. मग आपले डोळे दिपतात. त्यामुळे प्रखर उजेड असेल तर ही बाहुली लहान होते आणि अंधारलेल्या जागेमध्ये ही मोठी होते. बाहुली मोठी झाली की कमी उजेड असला तरी आपल्याला जरा चांगलं दिसायला मदत होते.’
‘आज्जी!’ झंप्या ओरडलाच. ‘अगं लाइट टाकला की माझी बाहुली लहान होत्येय बघ!!’
‘खरंच की! आणि झंप्या, लाइट बाजूला केला की पुन्हा मोठी होते आहे ती.’ भुपीही या शोधाने मोहरून गेली मग तिनी डोळ्याची बाहुली लहान मोठी होतानाचा एक व्हिडिओ काढला. तो सगळ्या व्हॉटसॅप ग्रुप्सवर टाकला. रील म्हणून तो शेयर केला आणि पुढच्या दहा पंधरा मिनिटात वीस पंचवीस लाईक्स मिळताच, झंप्या आणि भुपी, दोघेही अगदी खुश झाले.  
एवढ्या वेळात आजीनी मोबाईलवर डोळ्याबद्दल आणखी काही व्हिडिओ आणि चित्रे शोधून ठेवली होती. आता ती ते दाखवू लागली.
‘हे बघा; या चित्रामध्ये डोळ्याच्या गोळ्याच्या चहूबाजूने छोटे स्नायू दिसत आहेत. हे स्नायू आखडले की डोळा हवा त्या बाजूला ओढला जातो. जशी कळसूत्री बाहुली, दोऱ्या हलवल्या की हात-पाय हलवते, तसंच या स्नायूंचे काम आहे. वर, खाली, बाजूला, नाकाच्या शेंड्याकडे, आपल्याच कपाळाकडे अशा अनेक पद्धतीने आपण डोळे फिरवू शकतो. नट आणि नर्तक मंडळींना तर याहीपेक्षा वेगवेगळ्या तऱ्हेने डोळे फिरवायला शिकवलेले असते.’
‘हो, खरंच की, आमच्या भरतनाट्यमच्या वर्गात असे डोळे करायला शिकवतात आम्हाला.’ भुपी उत्साहाने म्हणाली.
‘आता हे बघा’, आजी पुढे दाखवू लागली, ‘डोळ्याच्या आतली रचना कशी असते, ते या चित्रात दाखवले आहे. समजा आपण प्रकाशाचा किरण आहोत आणि डोळ्यात घुसत आहोत; तर पहिल्यांदा आपण कॉर्नियातून आरपार जाऊ. त्यानंतर एक पाण्याचा डोह लागेल (Aquous humor). त्यातून आपण जाऊ. मग डोळ्याच्या बाहुलीतून (Pupil) आपण आणखी आत जाऊ. आता आपण भिंगापाशी (Lens) आलो आहोत. तुम्हाला काचेचे भिंग माहित आहे.’
‘हो, आहे की माझ्या सायन्स सेट मध्ये. त्यानी चटका देता येतो आणि कागद पेटवता येतो.’ झंप्या.
आजीनी त्याच्याकडे जरा विचित्र नजरेनी बघितलं. तो ओशाळून म्हणाला ‘हां, आणि मोठंही दिसतं त्यातून!’
‘जा, आण बरं तुझं भिंग.’ आजीने फर्मावले. झंप्या तात्काळ भिंग घेऊन आला.
‘भिंगामुळे गोष्टी मोठ्या दिसतातच पण भिंगामुळे लांबच्या वस्तूची छोटीशी प्रतिमा, एखाद्या पडद्यावर दिसू शकते.’ आजी समजावून सांगू लागली. हा खेळ भुपीला माहीत होता. भुपी भिंगाच्या मदतीने वहीच्या पानावर खिडकीतले दृष्य कसे दिसते ते दाखवू लागली.
‘आजी, इथे झाडाची प्रतिमा दिसत्येय. पण उलटी. म्हणजे खाली डोकं वर पाय अशी!’ भुपी म्हणाली.
‘बरोबर, आपल्या डोळ्यातील भिंगामुळे डोळ्याच्या पडद्यावर सुद्धा अशीच प्रतीमा दिसते. उलटी. खाली डोकं वर पाय अशी. पुढे मेंदू ज्यावेळी या प्रतिमेचा अर्थ लावतो, तेव्हा ती आपोआपच सरळ करुन पाहिली जाते. आपल्याकडे येणाऱ्या मित्राची, प्रतिमा जरी खाली डोकं वर पाय अशी असली, तरी आपल्याला तो पाय जमिनीवर ठेवून चाललेलाच दिसतो आणि त्यालाही आपण डोक्यावर उभे आहोत असे दिसत नाही!’
‘म्हणजे आपल्या डोळ्यातील भिंग असंच असतं?’ झंप्या.
‘नाही, डोळ्यातल्या भिंगाचा आकार असाच असतो पण ते प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरल्यासारखं असतं!’ आजी.
‘आं!! पाण्याचे भिंग?’ झंप्या आश्चर्यचकित झाला.
‘का नाही?
‘भिंग काचेचंच असायला हवं असं नाही. पारदर्शक आणि फुगीर असलेली कोणतीही वस्तू भिंग म्हणून काम करते.’ असं म्हणून आजीनी तिथल्यातिथे पाण्याची भिंगे बनवून दाखवली. तिनी तिच्या मनगटातील घड्याळाच्या काचेवर पाण्याचा थेंब टाकला, तर त्यातून घड्याळातील काटे मोठे दिसत होते. तिनी ग्लासमध्ये पाणी भरले. ग्लासलगत धरलेल्या वर्तमानपत्रातील अक्षरे आता मोठी दिसायला लागली.’
ओहो! झंप्या आणि भुपी दोघेही खुश झाले.
‘पण आपल्या डोळ्यातले भिंग पाण्याचे का असते? त्याचा काय फायदा होतो?’
‘सांगते. त्या बाहेरच्या झाडाची प्रतिमा वहीवर पाडा बरं.’ दोघांनी तात्काळ तसे केले.
 ‘छान बरोबर. आता ह्या भिंगाजवळ बोट घरून त्याची स्पष्ट प्रतिमा पडते का पहा.
‘नाही!’
‘म्हणजे जवळच्या वस्तुंची प्रतिमा पडायची, तर हे भिंग उपयोगी नाही. हे भिंग खूपच पातळ आहे. जवळच्या वस्तुंसाठी आणखी फुगीर भिंग हवे. असं म्हणत आजीनी तिच्या कपाटातून टम्म फुगलेल्या पुरीसारखं एक फुगीर भिंग काढलं. त्या भिंगाजवळ बोट धरलं तरी त्याची प्रतिमा स्पष्ट पडत होती. मात्र त्या भिंगातून बाहेरच्या झाडाची काही स्पष्ट प्रतिमा येत नव्हती.
‘म्हणजे भिंगाची गोलाई बदलली की वेगवेगळ्या अंतरावरची प्रतिमा वहीवर उमटते. लांबचे दिसायला भिंग पातळ असावे लागते तर जवळचे दिसायला भिंग फुगीर असावे लागते.’ असं सांगून आजीनी एक नवीनच खेळ आरंभला. ती म्हणाली, ‘दोघेही आपापले बोट डोळ्यासमोर एक फुटभर अंतरावर धरा बरं. आणि बोटाकडे बघा. तुम्हाला आता बोट स्पष्ट दिसतंय?
‘हो.’
‘आणि खिडकी?’
‘दिसत्येय, पण अस्पष्ट.’
‘आता खिडकीकडे पहा. नजर खिडकीवर स्थिर करा. आता बोट स्पष्ट दिसतंय?’
‘नाही.’
‘आणि खिडकी?’
‘अगदी स्पष्ट दिसते आहे.’
‘म्हणून भिंग पाण्याचे असते!!!’
दोघांना काहीही कळले नाही. ते नुसतेच एकमेकांकडे पहात राहिले. त्यांच्या डोक्यात हा कोड्याचा किडा सोडून आजी लॅपटॉप उघडून तिचे काम करू लागली आणि त्यांना म्हणाली, ‘जा आता खेळायला. तुम्हीच विचार करा आणि उत्तर शोधा. नाही सापडलं उत्तर तर उदया मी सांगीनच.
आजीच्या सवयीप्रमाणे कोड्याचा हा कीडा तिनी मुलांच्या डोक्यात सोडला होता. आता उत्तर सुचेपर्यंत त्यांना तो सतावणार होता. या नवीन कोड्याचा विचार करत झंप्या आणि भुपी मोठ्या खुशीत खेळायला पळाले.

प्रसिद्धी
किशोर मासिक
जुलै 2022

No comments:

Post a Comment