Friday 24 June 2022

खा आता पुरणपोळी!

खा आता पुरणपोळी!!! 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. 

आज डॉक्टर्स डे. आज आमचा पोळा.  आज, शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली; चढविल्या झुली, ऐनेदार! मात्र झुलीखालील वळ  मात्र दुखत राहतील आणि उद्यापासून पुन्हा वर्षभर कडाडणारा आसूड आहेच!

 डॉक्टरांचे हे वर्णन डॉक्टरांना सगळ्यात जास्त आवडेल. पण  रोकडा व्यवहार म्हणून विचार केला तर डॉक्टर काय, सैनिक काय, न्यायाधीश काय; पैशाचा मोबदला घेऊन सेवा देणारी मंडळीच आहेत.  जसे सफाई कामगार, ड्रायव्हर, वडापाववाले तसे हे.  पण या व्यवसायांना समाजानं वलयांकित केले आहे.  त्यामुळे इतक्या कोरडेपणाने आपण त्याकडे पाहू शकत नाही. 

हे वलय, हा शेंदूर, आता बराचसा खरवडून निघाला आहे.  आतला ओबडधोबड दगड उघडा पडला आहे. बिनशेंदराच्या दगडाला नमस्कार कोण करणार? याला बरेच घटक जबाबदार आहेत.  डॉक्टर, बदलते कायदे आणि बदलती जीवनशैली सुद्धा. 

फॅमिली डॉक्टर ही संस्था जवळपास लयाला गेली आहे. पण हे मध्यम आणि त्यावरच्या वर्गासाठी. इथे फॅमिली डॉक्टर नाहीत अशी ओरड आहे पण खेड्यापाड्यात स्पेशलिस्ट नाहीत अशी रड आहे. आजही गल्लीबोळात, झोपडपट्ट्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात; जनरल प्रॅक्टिशनर सेवा देतच आहेत; आणि ज्यांना फक्त तीच परवडते, ते  ती घेतच आहेत.  
समाजाच्या अपेक्षाही भलत्याच वाढल्या आहेत. आता फ्युज बदलायलाही  इलेक्ट्रिकल इंजिनिअरच असा हट्ट केल्यासारखे  आहे हे. झटक्यात निदान, फटक्यात उपचार, तात्काळ परिणाम आणि यात थोड्याशा चुकीलाही  माफी नाही. अर्थातच हे सर्ववेळी शक्यच नाही. मग जनरल प्रॅक्टिशनर उत्साहानं काही करायला कचरतात.  तान्ह्या बाळाला जुलाबासाठी औषध देऊन आफत ओढवून घेण्याऐवजी सरळ स्पेशालीस्टकडे जायची चिठ्ठी देतात. आता लोक चिठ्ठीसाठीसुद्धा डॉक्टरकडे जात नाहीत. बाळ,  डोळा, बाई, हाड, त्वचा  यांचे आजार असतील तर त्या त्या स्पेशालिस्टकडे आपोआपच पाय वळतात. यांच्याकडे काम अधिक नेमकेपणाने आणि नेटकेपणाने होतं पण सगळ्यांनाच हे परवडतं असं नाही.  शिवाय मणक्यातील चकती  सरकल्यामुळे, नसेवर दाब येऊन, पाय दुखत असेल, तर  मणकेवाल्याकडे जायचं, का नसवाल्याकडे जायचं का   पायवाल्याकडे असे बुचकळ्यात टाकणारे प्रसंग येतातच. 

समाजाच्या करड्या नजरेने आणि कोरड्या व्यवहाराने एकूणच डॉक्टर ‘निर्धोक प्रॅक्टिस’कडे ढकलले गेले आहेत. आजचा पेशंट हा उद्याचा संभाव्य दावेदार आहे हे लक्षात घेऊन जपून जपून प्रॅक्टिस करण्याकडे कल आहे. याचा जाच पेशंटनाच  होतो.  आपापले एकखांबी दवाखाने चालवणारे एकएकटे डॉक्टर आता निम्मेच ज्ञान, कौशल्य आणि धाडस वापरतात. जरा काही जगावेगळं आढळलं की पेशंट बड्या ठिकाणी पाठवतात. इथेही पावलोपावली संमती, विविध तज्ञ, सेकंड ओपिनिअन, भारंभार तपासण्यांचे पेव फुटण्यामागील प्रेरणा हीसुध्दा आहे.  

मी  प्रॅक्टिस सुरू केली ती एका लहान गावात. अशा ठिकाणी प्रॅक्टीस करणाऱ्यांच्या मनातला ठसठसता सल म्हणजे शहरातला कोणीही येरूगबाळू हा त्यांच्यापेक्षा आपोआपच श्रेष्ठ डॉक्टर समजला जातो. ‘तुम्ही आत्ता द्या काय द्यायचे ते, परत गेलो की आम्ही ‘म्हमई’ला मोठ्या डागदरास्नि दावूच!’ स्थानमहात्म्यातून जिथे देवादिक मंडळी सुटली नाहीत तिथे आम्हां  पामरांची काय कथा. कधी कधी ह्या ‘म्हमई’च्या डॉक्टरची चिट्ठी पहाता, तो तद्दन रद्दड आहे, भोंदू आहे, हे अगदी स्पष्ट असे. पण पेशंटलेखी तो ग्रेट म्हटल्यावर आता आपण काय बोलणार? वैताग मनातल्या मनात गिळून मी आपला प्रिस्क्रिप्शन खरडतो झाले. 

ही माझी रडकथा पाचवडच्या एका ज्येष्ठ डॉक्टरना सांगितली. पाचवड हे वाईजवळचे, एक खेडे. हे डॉक्टर माझ्यापेक्षा अनुभवाने, ज्ञानाने कितीतरी थोर. ते म्हणाले, ‘अरे जाऊ दे, मलाही वाईला  जाऊन तुला दाखवून मग औषध घेतो, असे म्हणणारे भेटतात!’ च्यामारी! म्हणजे या व्यथेचे एक टोक माझ्या जेष्ठ कलीगनाही टोचत होते तर.  पुढे एका पनवेलच्या डॉक्टरनी पेशंट त्यांना डावलून चेंबूरला जातात असे सांगितले. चेंबूरच्या मित्रानी त्याच्यापेक्षा कुलाब्याचा डॉक्टर पेशंटच्या मनात आपोआप श्रेष्ठ ठरतो असे म्हणून गळा काढला आणि मी माझे दुखः आवरले. कुलाब्याच्या डॉक्टरने कदाचित कॅलीफोर्नियाच्या डॉक्टरची कागाळी केली असती.

 आणि भेटलाच मला एक कॅलीफोर्नियाचा डॉक्टर! त्याची तक्रार डॉ.गूगल विरुद्ध होती!!
सगळी माहिती गुगलून गुगलून येणाऱ्या, गूगलज्ञानमंडित पंडितांनी, खरंतर गुंडीतांनी, त्याला वैताग आणला होता. गुगल-रेटिंगनुसार त्याची प्रतिष्ठा आणि प्रॅक्टिस  हेलकावत होती.  लवकरच पेशंटला लवून कुर्निसात करून ‘कोणते निदान आवडेल आपल्याला?’, अशी आश्रीतासारखी सुरवात करावी लागेल. ‘येथे फर्माईशी उपचार करून मिळतील’, अशी पाटी लावावी लागेल, असं तो सांगत होता. यापेक्षा गुरांचे डॉक्टर सुखी म्हणाला!

 पण हा प्रश्न कॅलीफोर्नियाचा नाही. हा तर ग्लोबल फिनोमिना. गुगलवरून माहिती घेऊन येणारी मंडळी वात आणतात हे खरंच आहे.  हे वातकुक्कुट डॉक्टरची अगदी पिसं काढतात.  त्यातून ज्ञान आणि शंका यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. किती उपप्रश्न विचारतात यावरून माणूस व्हाईस चान्सलर म्हणून रिटायर झालेला आहे का प्राथमिक शिक्षक म्हणून हे लगेच ओळखता येते! हे गुगलानुग्रहित पेशंट स्वतःला वलयांकित समजतात. त्यांचा तोरा काही औरच असतो. आम्ही तुमच्याकडे आलोय म्हणजे मोठे उपकार करतोय असा सगळा आव असतो. कोणतेही नवे औषध, तपासणी वगैरे काहीही सुचवा हे त्याकडे संशयानेच पहाणार. डॉक्टरचे ज्ञान पारखून घेणे हे आपले गुगलदायित्व समजणार. मग अनावश्यक माहितीच्या  गूगल-गुटख्याचा तोबरा भरून   पिंक टाकायला हे दवाखान्यात येणार! 

अशी गुगलगंगेत पावन झालेली  मंडळी बरेचदा उगीचच इंग्लिशच्या नादी लागलेली असतात.  डॉक्टरांशी इंग्लिशमध्येच बोलायला हवं असं त्यांच्या मनाने घेतलेलं असतं. गोकुळदास राघवदास तुपे असं शुद्ध देशी नाव असलेला गावातलाच माणूस जेव्हा, ‘बट डॉक्टर, देअर इज एनी रिक्स? एनी ट्रेस’ (Risk आणि stressचा हा खास पेशांटीय उच्चार) असं विचारतो, तेंव्हा तद्दन भिकार इंग्लिश ऐकावे लागले आणि  विनाकारण इंग्लिश बोलायला लागले, म्हणून माझा एक कट्टर भाषाभिमानी मित्र त्याचे जास्त पैसे घेतो!! 

एकेकाळी छापून आलेले अक्षर अन अक्षर खरे असते अशी मानसिकता होती. तारेचा शोध लागल्यावर तारेने (टपाल व तार मधली तार, telegram) त्वरेने उपचार सुचवता येतील अशीही शक्यता तपासली गेली. १२ मार्च १८९२ च्या लॅन्सेटमध्ये हे धोक्याचे, अनैतिक, आणि आक्षेपार्ह असल्याचे लेखकाने ठासून मांडले आहे. तसंच आता लोकांना इंटरनेटबद्दल वाटतं.  जे समोर येते त्यातून नीरक्षीरविवेक करण्याची क्षमता सामन्यांत नसते. कशी असेल? त्यालाच तर वैद्यकीय शिक्षण म्हणतात. जागतिक आरोग्य संघटना तसेच काही इतर संस्थांच्या उत्तमोत्तम, रुग्णस्नेही  साईट आहेत पण भंगार माल भरपूर आहे.

बरेचदा डॉक्टर किंवा नातेवाईक आपल्यापासून काही लपवत तर नाहीत ना, या शंकेने शोध चालू होतो. मग काय? मनी वसे ते नेटी दिसे! नेट तर गणिकेसारखे  चतुर आणि मनकवडे असते. आपण काय टाईप केले आहे, कोणते संदर्भ किती वेळ पाहतो आहे यावरून आपल्या पुढ्यात काय ठेवायचे हे ठरत असते. आपली डोकेदुखी ब्रेन ट्युमरमुळे आहे अशी शंका घेणाऱ्या माणसाला अपोआपच त्या गल्लीत ढकललं जातं. आपली कावीळ कॅन्सरमुळे आहे असं समजणारा त्या बोळात जातो. चिंतातूर जंतूंना इथे भरपूर खाद्य आहे. जे जे दिसे ते ते सगळे आपल्यालाच लागू आहे असाही समज गुगुलने घट्ट होतो. आजाराची लक्षणे वाचली की तस्सच व्हायला लागतं. औषधाचे साईड इफेक्ट वाचले की लगेच तसं व्हायला लागतं. ह्याला सायबरकॉन्ड्रीया असं नावही आहे.

सल्ला देण्यात डॉ. गुगल यांचे काहीही हितसंबंध गुंतलेले नाहीत, जित्याजागत्या डॉक्टरांचे आहेत;  सबब डॉ. गुगल अत्यंत नेमका, आपल्या हिताचा  आणि  अगदी योग्यच सल्ला देणार ही आधुनिक अंधश्रद्धा आहे. ‘मूंह मे माहीती आणि बगलमें जाहिराती’, अशा ‘माहिराती’ (Infomercial) भरल्या साईटच्या मार्केटिंग गेमला अशी मंडळी आयते सावज ठरतात. साधारणपणे तुम्हाला काहीतरी विकू पहाणाऱ्या साईट वाईट असतात. महाजाल म्हणजे मायाजाल. या जाळ्यात अडकलेले अनाथ जालिंदर बरेच आहेत. म्हणूनच काय, कुठे, कोणते आणि किती वाचू हेसुद्धा  खरंतर डॉक्टरी मदतीने, सल्ला-शिफारसीने ठरायला हवे. बरेच डॉक्टर आता स्वतःचे युट्यूब चॅनेल आणि वेबसाईट बाळगून आहेत. हे बेश आहे. 

पेशंटने माहिती गुगलून येण्याचे काही फायदेही असतात. काही पूर्वज्ञान गृहीत धरता येते. शब्दसंग्रह आणि अर्थ माहित असतात. कॅन्सर किंवा अन्य जीवघेण्या आजाराचे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक, आधीच सारी शोधाशोध करून आलेले असतील तर त्यांच्या कुशंका खऱ्या आहेत एवढे सांगणे आणि त्यांनाही त्याचा स्वीकार  करणे आता सोपे जाते. प्रत्येक पायरीवर डॉक्टरने पेशंटशी साधकबाधक चर्चा करून, पेशंटच्या कलाने उपचार ठरावेत असं अभिप्रेत आहे. साधक मुद्दे ऐकताना खुशीत असलेली पेशंटची स्वारी बाधक मुद्दे येताच उदास आणि खिन्नमनस्क वगैरे होते. शिवाय बाधक मुद्दे सांगायला डॉक्टरही बिचकतात. साध्या लसीकरणाबद्दल सगळ्या बाधक गोष्टी सांगितल्या तर लसीकरणही साधणार नाही! पेशंटच्या मनात प्रचंड गोंधळ फक्त उडेल. अशा वेळी निर्लेप, निष्पक्ष, अभिनिवेशरहित भाषेतील नेटवरील माहिती आणि व्हिडीओ मदतीला येतात. ऑपरेशन म्हणजे नेमके काय करणार? गुठळी काढणार, वाल्व्ह बसवणार, दुर्बिणीतून बघणार  म्हणजे नेमके काय? ह्यावर ‘यु-ट्यूबभरी बातें’ करता येतात. 

यूट्यूबवरच्या व्हिडीओंची डॉक्टरनासुद्धा अपार मदत होते. नवीन तंत्र, यंत्र, गुंतागुंत आणि त्यावरील उतारे आणि  मंत्र; हे टिचकीसरशी हजर असतं. कधी न केलेली, न देखलेली अशी ऑपरेशने, नित्य आणि नैमित्तिक क्रियाकर्मे, (वैद्यकीय) संसारोपयोगी युक्त्याप्रयुक्त्या घरबसल्या शिकता येतात. देशोदेशीच्या  विज्ञानेश्वरांनी अखंड प्रज्वलित ठेवलेले हे ज्ञानहोत्र. डॉक्टरांची पूर्वी फार गोची व्हायची.  रूग्णाच्या आजाराबद्दल किंवा उपचाराबद्दल काहीही थांग लागला नाही तर लपूनछपून पुस्तक काढून बघितले जायचे. मग फोन सार्वत्रिक झाले. तज्ञ मित्रांशी फोनवरून चर्चा सुरू झाल्या. पण त्याही चोरून आणि दबक्या आवाजात. आता डॉक्टरांच्या टेबलावर कंप्यूटर अन हातात मोबाईल आहे. पेशंटच्याही आहे.  दिमतीला अनेक साईटस् आणि अॅप्स  आहेत. त्यांचा खुलेआम वापर आता फारसा कुणाच्या डोळ्यात खुपत नाही. डॉक्टर माहिती काढून बघतो म्हणजे तो यडच्याप आहे, कमअस्सल आहे, असं आता कुणाला वाटत नाही उलट तो बिनचूक काम करू पाहतो आहे, असं वाटतं. डॉक्टर देव नाही, दानव तर नाहीच नाही, एक विशेषज्ञ मानवच आहे  असा निरभ्र दृष्टीकोन चांगलाच आहे. 

कारण वैद्यकीची एक प्रकारची सत्ताच असते. तनामनाने हतबल झालेला कोणी मानव, तनामनानी सबल सत्ताधाऱ्यांपुढ्यात असतो. पण आम्हां राज्यकर्त्यांना जरी वैतागवाणे असले तरी गुगलने ज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे.  हा जणू वैद्यकक्षेत्रातील माहितीचा अधिकार. कोक्रेन नावाची डॉक्टरांना मार्गदर्शक सूत्रे आणि संदर्भसेवा पुरवणारी एक संस्था आहे. डॉक्टरांसाठीच्या क्लिष्ट, तांत्रिक भाषेतील माहितीचा गोषवारा, नुकताच त्यांनी ‘जनांच्या भाषेमध्ये’ द्यायला सुरुवात केली आहे.  हे एक प्रकारचे मन्वंतरच आहे. ‘आमच्या शरीरावर आमचा अधिकार’ या तत्वाशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न आहे.

तेंव्हा या प्रयत्नांशी इमान राखणारे, 
पुरावाधिष्ठित उपचार करणारे, 
विवेकी आणि सहृदयी डॉक्टर लाभोत अशा पेशंटना शुभेच्छा..
आणि 
डॉक्टरी ज्ञानाचा आदर राखणारे; 
फुकटच्या गुगली सल्ल्यापेक्षा विकतचा सल्ला श्रेष्ठ मानणारे; 
आरोग्यासाठी विमा इत्यादी भविष्यवेधी तरतूद करणारे;
आजार आणि उपचारांच्या मर्यादा समजावून घेत आपली परिस्थिती स्वीकारणारे;
समरुग्णाईतांच्या स्वमदत गटात हिरीरीने भाग घेणारे;
‘फैशन की इस दुनिया में ग्यारंटी की अपेक्षा ना करें’ ही क्लिपा-टिकल्यांच्या दुकानातील पाटी आठवून कसलीही गॅरेंटी न मागणारे...
 रुग्ण तुम्हाला लाभोत, अशा डॉक्टरांना शुभेच्छा.

खा आता पुरणपोळी!!!

चतुरंग पुरवणी
लोकसत्ता
25.6.22

2 comments:

  1. आज हे - असे डॉक्टर असे रुग्ण! -
    निदान शहरात तरी ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना दूर होत गेली आणि ‘स्पेशालिस्ट’ प्रमाण मानण्याची वृत्ती बळकट झाली. https://www.loksatta.com/chaturang/doctor-patient-family-doctor-concept-specialists-just-believe-ysh-95-2987268/ स्वरूपात आलंय! बाकी मजा येते. म्हणून आज पुन्हा इथं पाहिलं. - आपला चाहता.

    ReplyDelete
  2. Really excellent article ,
    You have written an article, which is very near to my heart !!
    ABHINANDAN !!

    ReplyDelete