Tuesday 13 September 2022

कबीर: मंगेश पाडगावकर

कबीर
मंगेश पाडगावकर

परिचय डॉ. शंतनू अभ्यंकर 

‘कबीर’, हे मंगेश पाडगावकरांनी कबीराच्या निवडक रचनांचे केलेले मराठीमधील भाषांतर.
‘जल मे कुंभ, कुंभ मे जल है
बाहेर भीतर पानी
फुटा कुंभ, जल जल ही समाना
यही तथ कहो गीयानी’

असं अद्वैतत्वज्ञान दोन ओळीत सांगणारा प्रतिभावंत कबीर. याची ओळख आपल्याला काही म्हणी, वाक्प्रचारातून आणि भजनातून होत असते तो नेमके कशाला भजतो याचा शोध घ्यायचा असेल तर हे पुस्तक उत्तम आहे. 
या १४२ पानी पुस्तकाला, तब्बल ४२ पानी चिंतनाची जोड लाभली आहे. हे चिंतन कबीराची खरी ओळख व्हायला मदत करते. मुळात हे चिंतन वाचल्याशिवाय कबीराकडे वळण्यात अर्थ नाही. त्या अफाट कवितांइतकेच हे चिंतनही मनोहरी आहे. 
कबीराचा जन्म, त्याचे आयुष्य आणि मृत्यू हे सारे इतिहासात लुप्त झाले आहे. त्याबाबतच्या दंतकथा तेवढ्या शिल्लक आहेत. पण या दंतकथांतून आणि त्याच्या काव्यातून कबीराबद्दल काही अंदाज आपण बांधू शकतो. 
कबीर हा भल्याभल्यांना चकवणारा संत. राम, रहीम, हरी, अल्ला असे सगळे शब्द त्याच्या कवितेत येतात आणि मग तो हिंदू का मुसलमान, असा प्रश्न पडतो. खरंतर तो धर्मापलीकडे पोहोचलेला, धर्म-जात वगैरे भेद विसरून गेलेला असा माणूस होता; हे सरळ सरळ उत्तर आहे. पण हे उत्तर सुचूच नये आणि दुसऱ्यांनी कधी सुचवलं तर पटूच नये इतक्या टोकाचा धर्माभिमान आणि जात्याभिमान, देवभोळी, धर्मसोवळी आणि जातओवळी माणसंच उराशी बाळगून असतात. शिवाय हे उत्तर अत्यंत गैरसोयीचे आहे. देव-धर्म-जातीच्या सुखाची कांबळ-वाकळ सोडून कोण कशाला बाहेर पडेल? पण असल्या, धर्माच्या सत्य स्वरूपापेक्षा त्याच्या अवडंबरावर प्रेम करणाऱ्या माणसांवर, कबीराने टीकेचे आसूड ओढले आहेत; पण लक्षात कोण घेतो? राम, हरी, मुकुंद हे शब्द वैष्णवांना सोयीचे झाले; अगम, अकथ, अगोचर वाचून पाहून निर्गुणवाद्यांची चंगळ झाली. पण मी कुठल्याही एका पंथाचा अनुयायी नाही, जे मनाला पटलं तेच मी शब्दात सांगितलं असं कबीर म्हणतो. 
‘करत विचार मनही मन उपजी
ना काही गया आया.’
जे माझ्या मनाला पटले ते सांगितले, मी ज्ञानासाठी आणखी काही धुंडाळलेले नाही अशी ग्वाही तो देतो. 
संसाराच्या जोखडातून मुक्तीआड येणाऱ्या मायेलाही कबीराने बऱ्याच शिव्या दिल्या आहेत. माया म्हणजे आग, वेश्या, महाठगीन असा सूर कबीर काढतो. पण लवकरच कबीर यातून बाहेर पडतो आणि मग सारी मायावी सृष्टी हीच ईश्वर स्वरूप आहे अशी दृष्टी येते. आपणही सृष्टीचे अंश आहोत, तेंव्हा स्वतःत आणि सर्व जीवमात्रांत ईश्वरी अंश आहे ही समज दाटून येते. त्याला जणू मुक्तीचा मार्ग सापडतो. तो म्हणतो, 
 
‘घट घट में वो साई रमता’ 
किंवा 
‘कस्तुरी कुंडलि बसै, मृग धुंढै बन मांहि 
ऐसे घटी घटी राम है, दुनिया देखै नाहि’

आपण तीव्रतेने प्रार्थना केली तर ईश्वर आपल्याला त्रासातून मुक्ती देतो, आपली प्रार्थना कमी पडते आहे, आपणच करंटे आहोत; अशा कल्पना पार करत करत, ईश्वरकल्पना निसरडी आहे, ईश्वर आभाळात वगैरे नसून आपल्या आसपास, चराचरात आणि स्वतःत भरला आहे या जाणीवेपर्यंत, इतर काही संतांप्रमाणे, कबीरही पोहोचला आहे. 
मला नेहमी अशी शंका येते की काही अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न संतांनी, ‘देव दानवा नरे निर्मिले’ हे मनोमन ओळखले होते. पण तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा आणखी काही कारणाने म्हणा आपल्या मनातले नास्तिक विचार स्पष्टपणे मांडण्याचे त्यांनी टाळले आहे.
‘आहे ऐसा देव वदवावी वाणी
नाही ऐसा मनी अनुभवावा’

हे तुकारामाचे वचन प्रसिद्धच आहे. 
कबीर हा सर्वधर्मसमभावाचा शिरोमणी म्हणून मिरवला जातो. पण पाडगावकर म्हणतात, ही गोष्ट कबीराच्या अनुभूतीशी जुळणारी नाही. धर्म ही संकल्पनाच कबीराला मान्य नाही, मग कसला आला आहे सर्वधर्मसमभाव? तो कोणत्याही धर्माचा पुराण-प्रेषित, पवित्र-पोथी किंवा पंथ-प्रपंच मानत नाही. हे सारे म्हणजे भक्त आणि ईश्वर यात भिंत निर्माण करणे होय, असं तो सांगतो. थोडक्यात धर्म ही संस्था मान्य करणाऱ्या कोणालाही कबीर परवडणारा नाही. ‘देव न मानणारा देवमाणूस’ असं आगरकरांचे वर्णन केले गेले आहे. तसेच धर्म न मानणारा अध्यात्मिक माणूस असं कबीराचं वर्णन करावं लागेल. कबीर ईश्वर मानतो, माणुसकी मानतो, माणूस आणि ईश्वर अशी एकात्मता मानतो पण अनुभूतीशून्य पुस्तकी पांडित्य, जात आणि धर्म या तीन गोष्टी ठामपणे नाकारतो. 
‘माळा, टोपी घालून बसले, टिळा लाविला यांनी 
आत्मबोध नसताना भुलविती स्वतःस हे भजनांनी’

जाती-धर्माबद्दल तो म्हणतो,
‘स्मरून त्याला सत्य सांगतो, मी नच अंतर राखतसे
कबीर म्हणे त्या निर्मल ज्ञाना, विरळा कोणी जाणतसे.’

टिळा-माळांचे कौतुक कबीराला नाही. 

‘भक्ती वाचून माळ घातली 
रहाटास गाडगी बांधली’ 

असं त्याचं रोकडं सांगणे आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील जप, तप, योग या गोष्टीनांही तो झटकून टाकतो. या साधनामार्गातून स्वतः कबीर गेला आहे पण नंतर त्यालाच हे सारे हास्यास्पद वाटू लागले आहे.

‘क्रियाकर्म आचार सोडिले, सोडियले तीर्थस्थाना,
सगळी दुनिया होय शहाणी, मला फक्त पागल माना’

असं खुलं आवाहन करतो. काही वेळा नाट्यपूर्ण प्रश्न विचारणे ही देखील कबीराची एक खासियत आहे. 

‘जे तू बाँभन, बँभनी जाया,
तौ आँन बाट व्हैं काहे न आया?
जे तू तुरक, तुरकनी जाया 
तौ भितरी खतनाँ क्यूँ न कराया?’

तू जर ब्राह्मण आहेस तर तू काय वेगळ्या वाटेने जन्माला आला आहेस का? आणि तू जर मुसलमान आहेस तर मग गर्भातच सुंता करून तुला कसं नाही धाडलं? असे बोचरे आणि दाहक प्रश्न कबीर विचारतो.

एकूणच कबीराची कविता विचार-चिंतनाच्या अंगाने जाणारी आहे. मुखड्यामध्ये एखादा तत्त्वज्ञानपर, उपदेशपर संदेश तो सांगतो आणि पुढे त्यासाठीची उदाहरणे देत जातो. बहुतेक संत कविता ज्या वेळेला अत्यंतिक प्रेम, निष्ठा, मधुराभक्ती अशा आशयाची वाटावळणे घेत होती, त्यावेळी कबीराची कविता मात्र, मुख्यतः विचारबहुल असल्यामुळे, ऐंद्रिय संवेदनांच्या वर्णनापेक्षा रूपकांच्या आणि प्रतीकांच्या मार्गाने जात होती. ही ‘कबीरबानी’ अतिशय रांगडी, सिधीसाधी आणि परखड आहे. विविध लोकसमूहातून वावरला असल्यामुळे अनेक बोली शब्द त्याच्या भाषेत येतात. हे कबीराचे वैशिष्ठ्य. आपल्या श्रोत्यांशी आपण थेट संवाद साधला पाहिजे या भावनेतून कबीराचे शब्द आले आहेत.
पाडगावकरांसारख्या बहुआयामी, बहुस्पर्शी प्रतिभा लाभलेल्या कवीने हे समृद्ध भाषांतर केले आहे. डाव्या पानावर मूळ ओळी तर उजव्या पानावर त्यांचा अनुवाद असं हे छापलं आहे. त्यामुळे या काव्याची लज्जत आणखी वाढली आहे. जुने हिंदी वाचून आपल्याला अर्थाचा अंदाज येतो मात्र पाडगावकरांचे भाषांतर वाचतात तो अर्थ रसाळपणे उलगडला जातो.

मासला म्हणून कुमार गंधर्वांनी लोकप्रिय केलेल्या कबीराच्या, ‘झिनी झिनी बीनी चदरिया’ या गीताचा मूळ पाठ आणि नंतर पाडगावकरांनी केलेला हा अनुवाद.

झिनी झिनी बीनी चदरिया, 
काहे कै ताना, काहे कै भरनी, 
कौन तार से बीनी चदरीया 
इंगला पिंगला ताना भरनी, 
सुसमन तार से बीनी चदरिया 
आठ कँवल दस चरखा डोलै, 
पाच तत्तगुन तीनी चदरिया
साईं को सियत दस मास लागै, 
ठोक ठोक के बीनी चदरिया 
सो चादर सूर-नर-मुनि ओढिन, 
ओढिके मैली कीनी चदरिया 
दास कबिर जतन से ओढिन, 
ज्यों की त्यों धर दीनी चदरिया 

तलम मुलायम विणली चादर,
कुठला ताणा, कुठली भरणी 
कुठला दोरा, विणली चादर
इडा पिंगला ताणाभरणी, 
सुषुम्न-दोरा, विणली चादर     
पाचही तत्वे, त्रिगुण, चक्रदश,
अष्टकमल ही विणली चादर 
स्वामी घे दस मांस विणाया 
ठोक ठोकुनी विणली चादर 
पांघरुनी सूरनरमुनि यांनी
मलीन ही केलेली चादर 
अतिशय जपुनी ती वापरूनी
परत दिली कबीराने चादर

No comments:

Post a Comment