Saturday, 17 September 2022

नवभारत: अमृत महोत्सवी वैचारीक मासिक

नवभारत: अमृत महोत्सवी वैचारिक मासिक.  
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई  

‘नवभारत’चा अंक नुकताच हाती पडला आणि ह्या परिचयमालेत ‘नवभारत’बद्दल लिहावे असे प्रकर्षाने वाटले. हे पुस्तक नाही, तरीही असे वाटले. आपल्यासारख्या ग्रंथप्रेमींनी दखल घ्यावी असे, वाईच्या प्राज्ञपाठशाळेतर्फे प्रसिद्ध होणारे हे नावाजलेले मासिक. यावर्षी या मासिकाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपलाही सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा योग या वैचारिक मराठी मासिकाला लाभला आहे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मराठीतील रंजक, तसेच विशिष्ट विषयाला वाहिलेली अनेक मासिके बंद पडत आहेत. मात्र याच काळात ‘नवभारत’ इतका काळ तग धरून आहे हे विशेष.
मात्र त्याच बरोबर जाने-फेब्रु-मार्च असा हा अंक आत्ता (सप्टेंबर) हाती पडत आहे ही बाबही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कोव्हिडमुळे रुळावरून घसरलेली गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. पाऊणशे वर्षानंतरही आर्थिक ओढाताण सुरूच आहे. स्थायी निधी उभारणे, वर्गणीदार वाढवणे, जाहिरातदारांना वारंवार आवाहन करणे, अंक अधिकाधिक दर्जेदार करणे असे सगळे प्रयत्न संपादक, संचालक आणि विश्वस्तांनी वारंवार केले आहेत आणि ते वारंवार अर्धसफल झाले आहेत. मराठी भाषेला आणि महाराष्ट्र देशाला हे भूषणावह नाही.  

 सुरुवातीपासूनच एक भारदस्त आणि विद्वजड मासिक म्हणून ‘नवभारत’चा बोलबाला आहे. नवभारत म्हणजे निद्रानाशावर अक्सीर इलाज, असेही पुलं गमतीने म्हणत. मासिकाच्या माजी संपादक/संचालक/विश्वस्तांची नावे पाहूनच आपली छाती दडपून जाते. आचार्य शं. द. जावडेकर, आचार्य स. ज. भागवत, हरी कृष्ण मोहनी, प्रो. वि. म. बेडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, वसंत जोशी, रा. ग. जाधव, वसंत पळशीकर, यशवंत सुमंत, देवदत्त दाभोळकर, सरोजा भाटे, श्री. मा. भावे अशी उज्वल परंपरा ‘नवभारत’ला लाभली आहे. सध्या मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक, श्री. राजा दीक्षित हे ‘नवभारत’चेही संपादक आहेत.  
वाद-विवाद-संवाद, खंडन-मंडन या परंपरेचा जिवंत झरा नवभारताच्या पानोपानी वाहत असतो. परंपरेशी सांधा न तोडता, भारतीय समाजाचे आधुनिकीकरण कसं करता येईल, याचं चिंतन येथील लेखनातून प्रकर्षाने दिसून येते. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे आकलन आणि मूल्यमापन भारतीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात करायला हवे, हा आग्रहही येथे दिसतो

अनेक दिग्गजांनी नवभारतात लिखाण केले आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, तत्त्वज्ञान, इतिहास असा कोणताही विषय नवभारतला वर्ज्य नाही. अगदी भारतीय परंपरेतील मदिरेचा परामर्ष चक्क तर्कतीर्थांनी एका लेखामध्ये घेतला होता! बुद्धिवाद, विवेकवाद, धर्म हे विषय वारंवार चर्चेला आले आहेत. नीतीला धर्माचा आधार लागतोच का? केवळ
विवेकावर नीती अवलंबून राहू शकते का? या प्रश्नांची चर्चा वारंवार घडत आहे. धर्म आणि विज्ञान यावर दोन दिवसीय कार्यशाळा घेऊन त्यावर नवभारतने त्यावर दोन विशेषांकही काढले होते. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीची दाखल नवभारतने घेतली आहे. दलित साहित्य, अस्पृश्यता निर्मूलन, मंदिर प्रवेश, दलितांवरील अत्याचार याबाबत नवभारतने प्रगतिशील भूमिका घेतली आहे. मंडल कमिशनबाबतही ‘नवभारत’मधील लिखाण आजही वाचकांच्या आठवणीत आहे. मे. पुं. रेगे यांनी दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या अतिरेकाचीही विवेकी दखल घेतली आहे. हे सारे जुने लिखाण, जुने अंक ते अभ्यासून काहींनी पीएचडी मिळवली आहे. प्राज्ञपाठशाळेची गाजलेली प्रकाशनेही सवलतीत उपलब्ध आहेत. (संपर्क नीता गायकवाड 02167220006
9423866556)

एखाद्या विषयाचा अतिशय विस्तृत, समतोल आणि सर्वांगीण परामर्श घ्यायचा झाला तर त्याला मासिकच हवे. वृत्तपत्रांच्या पुरवण्या किंवा टीव्हीवरच्या चहाटळ चर्चांमधून हे काम होऊ शकत नाही. ही निकड लक्षात घेऊन आणि दीर्घ लेख छापणे सोयीचे व्हावे म्हणून अमृत महोत्सवी वर्षांमध्ये ‘नवभारत’ने त्रैमासिक रूप धारण केले आहे. ताज्या अंकातील संपादकीय आणि अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यास ‘नवभारत’ ही काय चीज आहे, हे लक्षात येईल.  

एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्यावरील दोन लेख प्रस्तुत अंकात समाविष्ट आहेत. या अंकापासून, किशोर बेडकीहाळ
यांच्या निगरणीखाली, पन्नास वर्षांपूर्वी इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय करून देणारी लेखमाला सुरू झाली आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा मागोवा घेणारी ही पुस्तके. या अंकात अशोक चौसाळकर यांनी ‘द ओरिजीन्स ऑफ टोटॅलीटेरीयनीजम’ या अॅना अॅरंट यांच्या पुस्तकाचा आणि मनोज पाथरकर यांनी ‘द सोसायटी ऑफ स्पेक्टेकल’ या गाय दिबोर्ड लिखित पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. विख्यात कवी प्रमोद कोपर्डे हे एकविसाव्या शतकातील नवी मराठी कविता या समीक्षात्मक सदराचे समन्वयक आहेत. कविता हा आत्मनिष्ठ साहित्यप्रकार आहे या भूमिकेतून इथे कवितासंग्रहांची निवड केली आहे आणि ही समीक्षा काही प्रसिद्ध कवींनीच केलेली आहे. सदर अंकात अंजली कुलकर्णी यांनी, योजना यादव यांच्या, ‘मरी मरी जाय शरीर’ या कवितासंग्रहाचे रसग्रहण केले आहे. प्रातिनिधिक असे १२ संग्रह येथे चर्चिले जातील.  

नवभारत जगवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सुशिक्षित आणि पुढारलेल्या महाराष्ट्रात आज ‘नवभारत’ला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल इतके वर्गणीदार नाहीत. लोक वेळोवेळी देणग्या देतात, साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळते, विश्वस्त आणि संपादक कोणताही मोबदला न घेता काम करतात आणि कोंडयाचा मांडा करत हा संसार चालवला जातो.  

आपण वाचकांनी एक सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक जबाबदारी म्हणून नवभारतचे वर्गणीदार होऊन सहकार्य करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे.  

आपल्या पुढाकाराने या अमृत महोत्सवी वर्षात ‘नवभारत’ला नवसंजीवनी मिळेल अशी खात्री वाटते.

No comments:

Post a Comment