Thursday 15 September 2022

गौळण: वांड्मय आणि स्वरूप

गौळण वाड़्मय आणि स्वरूप 
लेखक डॉ. रामचंद्र देखणे
पुस्तक परिचय डॉ. शंतनू अभ्यंकर 
 
डॉ. रामचंद्र देखणे हे मराठी संस्कृती अभ्यासकांतील एक भारदस्त नाव. आजवर त्यांची ४९ पुस्तके प्रसिद्ध झाली असून, ‘गवळण वांग्मय आणि स्वरूप’’ हे त्यांचं तब्बल पन्नासावे पुस्तक. संस्कृतीच्या अभ्यास करता करता ५० पुस्तकांचे नवनीत त्यांनी वाचकांना सादर केले आहे. ते निव्वळ अभ्यासकच नाहीत तर भारुड, कीर्तन वगैरे परंपरांचे सादरकर्ते देखील आहेत. ते नुसते बोलके अभ्यासक नसून कर्ते अभ्यासक आहेत.
 
गवळण हा मराठी काव्य आणि गीताचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. मुख्यत्वे कीर्तनातून आणि तमाशातून ही गवळण लोकांच्या भेटीला आली. वरून कीर्तन आतून तमाशा असो वा उलट असो, त्यात गौळण ही असणारच. या गौळण परंपरेचा अभ्यास डॉ. देखणे यांनी इथे मांडला आहे. 

नेमकी ही गवळण आली कुठून? यातून नेमकं कोणत्या तत्त्वज्ञान सांगायचे आहे? संतांच्या आणि तमाशाच्या बोर्डावरच्या गवळणींमध्ये आज आपल्याला शृंगारिक, अश्लील आणि भडक उल्लेख का असतात? तमाशातली मावशी एक लोकप्रिय पात्र; ही मावशी आली कुठून? आणि ती इतकी लोकप्रिय कशी झाली? मथुरेच्या बाजाराचा प्रसंग, प्रसंगी बीभत्स का होतो? अशा प्रश्नांचा मागोवा डॉ. देखणे येथे घेतात. 

या साऱ्या लिखाणाचे स्वरूप अभ्यास असं असलं तरी डॉ. देखणे मोठ्या भक्तीभावाने या परंपरेकडे पाहतात. त्यातील तेज, मार्दव आणि सौंदर्य ते आवर्जून दाखवून देतात. त्यातील न्यून दुर्लक्षित करतात किंवा झाकण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचे उदात्तीकरणसुद्धा करतात. परमार्थाची गुटिका गोड लागावी म्हणून तिला शृंगाराच्या शर्करेत घोळलेले आहे असे डॉ. देखणे यांचे म्हणणे. प्रत्यक्षात यातील कवने वाचल्यावर ह्या निष्कर्षाबद्दल शंका वाटते. शृंगाराची पंचपक्वान्ने पचनी पडावीत म्हणून सोबत परमार्थाचे तोंडीलावणे पुरवले आहे असे वाटते. 

पुस्तकात अनेक संतांच्या आणि शाहिरांच्या गवळणी आहेत. डॉ. देखण्यांनी केलेल्या विवेचनाच्या चौकटीत त्या वाचल्यावर त्या अधिक अर्थवाही होतात. अगदी सिनेसंगीतातील गवळणींपर्यंतचा विचार इथे केला आहे. 

अर्थात गवळणीत गवळण राधा गवळण. 
राधा हे भारतीय संस्कृतीतील एक गूढ पात्र आहे. महाभारतात कृष्ण आहे पण रासक्रीडा नाही, गोपी नाहीत आणि राधाही नाही. पुढे हरिवंश, विष्णुपुराण यातही राधेचा उल्लेख नाही. भागवतात राधेचा ओझरता उल्लेख आहे. या राधा कृष्णाच्या प्रेमविलासावर बाराव्या शतकात जयदेवाने गीतगोविंद लिहिले आणि आणि ही राधाकृष्ण कथा भारतभर पसरली. पार मणिपुरी नृत्यापासून ते केरळच्या कथकलीपर्यंत भारताच्या प्रत्येक प्रांतात राधाकृष्ण आहेतच. 
बहुतेक सगळ्या गवळणींमध्ये राधा-कृष्ण म्हणजे प्रकृती-पुरुष हा संकेत आलेला आहे. राधा कृष्णाला रती आणि रस असेही समजले गेले आहे. चैतन्य संप्रदायात राधा ही परकीया आहे त्यामुळे तिचं प्रेम अधिक उत्कट समजले गेलेले आहे. मधुराभक्ती संप्रदायात ती कृष्णाच्या वामांगातून उत्पन्न झाल्याचे समजले गेले आहे. तिला कृष्णाची स्वामिनीही मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा शृंगार आणि त्याची शारीर वर्णने ही अंतिमतः अध्यात्मिक साज लेऊन येतात आणि लिहिणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांनाही सुसह्य होतात. तंजावरच्या, प्रतापसिंहराजे भोसले यांच्या पदरीच्या, मुद्दूपलनी या गणीकेने लिहिलेले राधिकासांत्वनम् हे तेलुगु काव्य मात्र अपवाद. (त्याचे मी केलेले मराठी भाषांतर आता पुस्तकरूपात येऊ घातले आहे.)   

काही गवळणी मात्र गंमतीशीर आणि आज धक्कादायक वाटतील अशा आहेत. राधा ही वयानी कृष्णापेक्षा बरीच मोठी आहे. त्याची मावशी आहे. ती एकदा बाळ कृष्णाला खेळवायला म्हणून आग्रहाने घरी घेऊन जाते आणि त्याचे मनोहर रूप पहाताच, हा बालक तरुणपणी किती देखणा दिसेल असा रतीभाव तिच्याठायी जागृत होतो. एकनाथ महाराज वर्णन करतात...

हृदयमंचकी बसविला, एकांत समय देखिला 
हळूच म्हणे कृष्णाला, 
लहान असशी.

कृष्ण म्हणे राधिकेसी, 
मंत्र आहे माझ्यापाशी,
थोर होतो निश्चयेसी, 
पाहें पा आता. 

तव बोले वनमाळी, 
थोर होतो हेची वेळी
डोळे झाकी तू वेल्हाळी, दावी विंदान.

एवढे बोलून कृष्ण तरुण रुपात सामोरा ठाकतो. राधा हरखते कृष्णाला आलिंगन देणार इतक्यात....

असता सुखे एकांतासी, भ्रतार आला त्या समयासी
उभा राहून द्वारासी, 
हाक मारी.

ऐकता भ्रताराचे वचन, घाबरले राधिकेचे मन,
धरी कृष्णाचे चरण, 
सान होई. 

कृष्ण बोले हास्य मुखे, 
मंत्र विसरलो या सुखे!!
भक्तवत्सला मनमोहना, शरण्ये का जनार्दना 

ऐकुनी राधेचे वचन, 
सान झाला!!

पण अखेर कृष्ण हसत हसत पुन्हा लहान होतो आणि राधे बरोबर आपलाही जीव भांड्यात पडतो. 


पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री. संदीप देशपांडे यांनी यथायोग्य सजवले आहे. 
काही ठिकाणी द्विरुक्ती आहे तर काही ठिकाणी त्रीरुक्ती सुध्दा आहे. त्यामुळे संपादकीय कामाला अजूनही वाव आहे. 

साऱ्या परंपरेची इथे कौतुकाने केलेली नोंद आहे. मात्र ह्या परंपरेचे समाजशास्त्रीय, राजकीय, स्त्रीवादी विश्लेषण होण्याची गरज आहे. ते इथे नाही. ही या पुस्तकातली उणीव आहे.

No comments:

Post a Comment