लेखक डॉ. मिलिंद वाटवे
पुस्तक परिचय डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
‘नर-मादी ते स्त्री-पुरुष’, हे डॉ. मिलिंद वाटवे यांचे अतिशय वाचनीय आणि मननीय पुस्तक आहे.
डॉ. वाटवे हे जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आईसर पुणे मध्ये कार्यरत होते. पण या वैज्ञानिकाला साहित्याची गोडी आणि लिहिण्याची हातोटी असल्यामुळे त्यांचे हे विज्ञान विषयक लिखाण ललितरम्य झाले आहे.
नर आणि मादी या शब्दांमध्ये केवळ जीवशास्त्रीय आशय भरला आहे. मात्र स्त्री-पुरुष हे जरी नर-मादीच असले तरी त्यांच्याकडून आशा आणि अपेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. स्त्री-पुरुष ही निव्वळ जीवशास्त्रीय नाही तर सांस्कृतिक, सामाजिक संकल्पना आहे.
मात्र नर-मादी ते स्त्री-पुरुष हा प्रवास समजावून घ्यायचा तर डार्विनचं बोट धरून चालावं लागतं.
डार्विन म्हटलं की ‘माकडापासून माणूस निर्माण झाला’, असं सांगणारा एक म्हातारा आपल्या डोळ्यापुढे येतो; पण जीवशास्त्रामध्येच नाही तर आता मानवी प्रज्ञेच्या प्रत्येक क्षेत्रात डार्विनची कल्पना आपला प्रभाव गाजवू लागली आहे!
शेपट्या का झडल्या?, अपेंडिक्स का आक्रसले?, अंगठा का वळला?, त्याचे काय फायदे झाले?, यासारख्या प्रश्नांची उत्तरे डार्विन देतोच पण माणूस कपडे का घालतो?, संभोग समयी एकांत का शोधतो? आणि तो बाहेरख्याली का असतो?, अशा प्रश्नांची उत्तरे देखील उत्क्रांतीशास्त्रातून मिळतात. उत्क्रांती मानसशास्त्र अशी एक नवीनच अभ्यासशाखा आता उदयाला आली आहे. माणसाच्या वागणुकीचे अनेक पैलू या शाखेने तपासायला घेतले आहेत. या साऱ्याचा धावता आढावा डॉ.वाटवेंनी या पुस्तकात घेतला आहे.
ह्यातील अनेक विधाने वाचून वाचक मुळापासून हादरतो. समाज म्हणून जगताना काही जोडीनेच राहण्याचे गुणधर्म आणि काही टोळीने राहण्याचे गुणधर्म, असे आपण जगत असतो. त्यामुळे काही वेळेला धड ना जोडीचे आणि धड ना टोळीचे अशी आपली पंचाईत होते तर काही वेळेला या दोन्हीचे मिश्रण भलतेच स्फोटक रूप धारण करते!
परस्परांबद्दल प्रेम असणे ही देखील उत्क्रांतीतून उपजलेली भावना आहे!!
स्त्री-तत्व म्हणजे निर्माण, सृजन, जतन आणि पुरुष-तत्व म्हणजे शोषण, वापर, विनाश ही कल्पना कवीकल्पना आहे आणि विज्ञानाच्या कसाला उतरत नाही!!!
पण निव्वळ विज्ञानच नाही तर इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र या साऱ्याचा सांगोपांग विचार करून डॉ. वाटवेंनी आपली मते साधार मांडली आहेत.
आपल्यासारख्या उष्ण कटिबंधातील देशात कपडे अंगभर कपडे घालणे म्हणजे प्रतिष्ठा ही कल्पना मुघल आणि युरोपियन आक्रमणाची देन आहे. कपडे घालण्यातली प्रतिष्ठा, नग्नतेची शरम, असुरक्षितता आणि पापभावना या साऱ्याचा परिपाक म्हणून आपण कपडे घालतो. पूर्वीच्या चित्रशिल्पादी कलाकृतीमध्ये, राजा असो वा प्रजा, केवळ कमरेचे वस्त्र लेवून असल्याचे आपल्याला दिसतात.... थोडा विचार केला तर हा युक्तिवाद पटावा असा आहे.
ह्या वाचनातून आपली भाषाही समृद्ध होते. हायपोथेसिसला ‘अभ्युपगम’ ह्या जडजंबाळ शब्दाऐवजी वादमत; सेक्सुअल रीप्रोडक्शनसाठी मिथुनवीण; म्युटेशनला ‘उत्परिवर्तन’ ऐवजी गुणघात असे काही अर्थवाही आणि सोपे शब्द डॉक्टर वापरतात. रॅशनलायझेशनला त्यांनी विवेकाभास म्हटले आहे. पण विवेकीकरण किंवा बाष्पीभवनच्या चालीवर विवेकीभवन असे शब्द सुचवावेसे वाटतात. हा विषय प्रथमच समजावून घेणाऱ्याच्या मानाने पुस्तक अधिक सविस्तर असायला हवं होतं असंही वाटतं. सकाळ प्रकाशनने आपल्या लौकिकाला साजेल अशी सुबक छपाई केली आहे संदीप देशपांडे यांचे मुखपृष्ठ हे अल्परेषी पण बहुगुणी आहे.
एका अनवट शास्त्रीय विषयावर एक वाचनीय पुस्तक सादर केल्याबद्दल अभिनंदन.
No comments:
Post a Comment