Wednesday 19 October 2022

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ८वी) डार्विनने काय सांगितले?

 

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ८वी)

डार्विनने काय सांगितले?

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

 

 

 

उत्क्रांती हा शास्त्रज्ञ आजीचा लाडका विषय आणि डार्विन लाडका शास्त्रज्ञ. म्हणून तर आजीच्या खोलीत डार्विनचा फोटो होता आणि ‘मी डार्विनची नात नसले तरी वैचारिक नात आहे’, असं आजी नेहमी म्हणत असे. पण ‘वैचारिक नात’, म्हणजे नेमकं काय हे काही भूपीला विशेष कळलं नव्हतं. आज आजी भूपीला अगदी एकटी सापडली. झंप्या गेला होता शिबिराला. त्यामुळे घरात आजी आणि भूपी अशा दोघीच होत्या. त्यामुळे आज अगदी ठरवून भूपीनी विचारलंच,

‘आजी, तू नेहमी म्हणतेस, ‘मी डार्विनची नात नसले तरी वैचारिक नात आहे’. वैचारिक नात म्हणजे काय गं?’

आजी हसली, ‘अगं, वैचारिक नात म्हणजे डार्विन आजोबांच्या विचारांनी पुढे संशोधन करणारी मी! आपल्या आई-बाबांकडून आपल्याला निम्मी निम्मी गुणसूत्रे मिळतात.’

‘हो, आहे आम्हाला जीवशास्त्रात!’ भूपी.

‘आणि आजी-आजोबांकडून पाव पाव; हा झाला आपला जनुकीय वारसा.’ आजी म्हणाली. ‘तुझ्यात असलेली पाव गुणसूत्रे माझी. म्हणून तू माझी नात. माझी जनुकीय वारस. तसंच डार्विननी सांगितलेले विचार, कल्पना, सिद्धांत हा झाला आपला विचारांचा, म्हणजे वैचारिक वारसा. हा वारसा पुढे वागवणारी, या सिद्धांतावर संशोधन करणारी मी, म्हणून मी डार्विनची वैचारिक नात!’

‘म्हणजे आजी तू उत्क्रांतीवर संशोधन केलंयस?’ भूपीचे आश्चर्य गगनात मावेना.

‘हो.’

‘म्हणजे तू उत्क्रांती होताना पाहिलंयस?’

‘हो!’

‘पण उत्क्रांतीला तर कोट्यवधी वर्षे लागतात.’

‘कोणी सांगितलं? अगं खूप पिढ्या गेल्याशिवाय उत्क्रांतीतून झालेले बदल लक्षात येत नाहीत. माणसाचे आयुर्मान खूप जास्त असतं त्यामुळे कोट्यवधी वर्ष गेल्याशिवाय माणसात उत्क्रांत झालेले बदल समजत नाहीत. पण सूक्ष्मजीव असतात; त्यांचा पिल्लावण्याचा वेग जबरदस्त असतो. दर पंधरा वीस मिनिटांनी बॅक्टेरीया  एकाचे दोन होतात. त्यांच्यात होणारे बदल, म्हणजे उत्क्रांती, मी अभ्यासली आहे.’

आजीनी उत्क्रांती घडताना पहिली हे मोठ्ठच कौतुक होतं. भूपीला आजीचा अभिमान वाटायला लागला. 

‘काय बदल दिसले तुला?’

‘अगं खूप इंटरेस्टिंग संशोधन होतं ते. पेनिसिलीन तुला ठाऊक आहे?’

‘हो, ते अलेक्झाडर फ्लेमिंगने बुरशीपासून बनवलेले अॅन्टीबायोटिक!’

‘बरोबर, झालं असं की आमच्या हॉस्पिटलमध्ये हे पेनिसिलीन काम करेना. एरवी पेनिसिलीनने सहज मरणारे जंतू अजीबात मरेनात. ह्याचं कारण सापडलं त्या जंतूंच्या उत्क्रांतीत. झालं असं की आधी बरेचसे जंतू पेनिसिलीनने मरत होते. पण मग काही जंतू असे निपजले की त्यांच्या  अंगाला पेनिसिलीन अजिबात चीकटेना. जंतूंच्या अंगाला चिकटल्याशिवाय पेनिसिलीन काम करू शकत नाही. त्यामुळे आता पेनिसिलीन अंगाला न चिकटणारे जंतू तेवढे शिल्लक राहिले. बाकीचे नामशेष झाले. ह्यालाच तर उत्क्रांती म्हणतात.’

‘पण आपण अशी युक्ती करायला हवी हे जंतूंना कसं कळलं?’ भूपी.

‘नाहीच कळलं!’

‘नाहीच कळलं?’

‘नाहीच कळलं, जंतूंनी ठरवून, जाणूनबुजून, असं केलेलं नाही. काही जंतुंमध्ये आपोआप, अपघाताने, निसर्गतः असा गुण होताच. ते जंतू तेवढे वाचले. बाकीचे पेनिसिलीनला बळी पडले. लयाला गेले. कोणते गुण निर्माण होणार हे कोणी ठरवत नाही. पण जे निर्माण होतात ते गुणवंत टिकणार का नाही, हे निसर्गतः ठरत असतं.  जगण्याच्या स्पर्धेत काही गुणवंत टिकतात आणि बाकीचे लयास जातात. ह्याला म्हणतात नैसर्गिक निवड. ही क्रीया सतत चालू असते. प्रत्येकच पिढीत काही न काही वेगळेपण घेऊन जन्मणारी संतती असते.’

‘संतती म्हणजे?’

‘मुलंबाळं गं, पिल्लं.’

‘ओके, म्हणजे प्रत्येकच पिढीत थोडी थोडी उत्क्रांती होत असते.’

‘हो, म्हणजे होऊ शकते.’ 

‘म्हणजे आज्जी, मी तुझ्याहून दोन पिढ्या पुढे आहे म्हणजे मी तुझ्याहून अधिक उत्क्रांत आहे!!’ भूपी खट्याळपणे म्हणाली. दोघी मनमुराद हसत सुटल्या. आपण आजीपेक्षा भारी, ही कल्पना भूपीला खूपच आवडली आणि भूपी सुटलीच.

‘म्हणजे आजी, आपल्या दोघीत सर्वात उत्क्रांत मी आणि पृथ्वीवर सगळ्यात उत्क्रांत माणूस!!!’

‘चूक!’ आजी करड्या आवाजात म्हणाली. ‘पृथ्वीवर माणूस  सगळ्यात उत्क्रांत आहे हे कोणी सांगितलं तुला?’

भूपीला या प्रश्नाचं मोठं आश्चर्य वाटलं.

‘आजी, उत्कांतीच्या एका चित्रात तर असं मोठं झाड दाखवलेलं होतं आणि त्या झाडाच्या प्रत्येक फांदीच्या टोकाटोकाला वेगवेगळे सजीव  दाखवलेले होते आणि सगळ्यात वरती, शेंड्याला, माणूस दाखवला होता.’’

चुकीचं आहे ते चित्र.’ आजी ठामपणे म्हणाली. माणूस हा सगळ्यात उत्क्रांत प्राणी आहे ही चुकीची समजूत आहे. उत्क्रांतीशास्त्र आपल्याला असं सांगत नाही. आपल्या आसपास जे जे सजीव दिसतात, मग ते सूक्ष्मजीव असोत, वनस्पती असोत वा प्राणी असोत; हे सारेच त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सर्वात उत्क्रांत सजीव आहेत. म्हणूनच तर ते टिकून आहेत. समजा टिकून रहाण्याची क्षमता त्यांच्यात नसती तर या पृथ्वीतलावरून ते केव्हाच नष्ट झाले असते. असे कित्येक सजीव टिकू शकले नाहीत. ते उत्क्रांतीच्या ओघात नष्ट झाले. जे टिकले तेच आपल्या आसपास दिसतात. भिंतीवरची पाल,  ड्रेनेजमधले झुरळ, बागेतले शेवाळे, बुरशी, वडाचे झाड हे सारेच आपापल्या ठिकाणी सर्वात उत्क्रांत जीव आहेत. तूच पहा चिखलामध्ये राहण्यासाठी गांडूळ हा सगळ्यात उत्क्रांत जीव आहे. म्हणून तर ते तिथे राहते. तू चिखलात राहू शकशील का? आणि गांडूळ तुझ्यासारखं शाळेत जाऊ शकेल का? नाही!

आपण स्वतः जरी नाही तरी झंप्या चिखलात नक्की राहू शकेल, अशी एक भारी कल्पना भूपीला सुचली. हजार वेळा समजावून सुद्धा झंप्या रोज काहीतरी नवीन घाणेरडेपणा करत असे. पण आजी जे सांगत होती ते इतकं इंटरेस्टिंग होतं की आजीच्या बोलण्याचा ओघ तिला तोडायचा नव्हता.  आजी सांगत होती ते खरंच होतं.

आजी सांगत होती, ‘माणूस कोणी मोठा टिकोजीराव लागून गेलेला नाही. आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. उत्क्रांतीशास्त्राने दिलेला हा सर्वात मोठा धडा आहे. पूर्वीच्या काळी माणसांना वाटायचं की आपण देवाचे सर्वात लाडके आहोत, ही सृष्टी देवाने आपल्यासाठीच निर्माण केली आहे, आपण सर्वश्रेष्ठ आहोत. ही कल्पना डार्विनने उध्वस्त करून टाकली. हा भ्रम विज्ञानाने दूर केला आहे. आपण निसर्गाचा एक भाग असून निसर्गाचे सारे नियम आपल्याला तंतोतंत लागू पडतात हे त्यानी दाखवून दिलं. कुठाय ते चित्र, मला दाखव ते पुस्तक.’

‘आत्ता नाहीये, एका मैत्रिणीकडे पाहिलं होतं मी.’

‘त्या चित्रात आणखी एक मोठी चूक असणार आहे. मी न बघताच सांगू शकते.’ आजी.

आजीचा आत्मविश्वास पाहून भूपीला गंमत वाटली.

आजी म्हणाली, ‘त्या झाडाला तुटक्या, वाढ खुंटलेल्या फांद्याच दिसत नसणार.’

‘खरंच की, नव्हत्याच तशा फांद्या. प्रत्येक फांदीच्या टोकाला कोणीतरी सजीव होताच होता.’

वास्तविक अशा पद्धतीने सजीव सृष्टीचे झाड दाखवायचे झालं तर जितक्या फांद्यांवर जीव दिसतात त्याच्या कित्येकपट फांद्या वाढ खुंटलेल्या, तुटक्या, भुंड्या, दिसायला हव्यात. या फांद्या म्हणजे नष्ट झालेल्या प्रजाती. जितके सजीव आसपास आहेत त्याच्या कित्येक पटीने सजीव नष्ट झालेले आहेत!’

‘खरंच की गं आजी. तू सांगितल्यावरच ही गोष्ट लक्षात आली माझ्या. उगीच नाही आम्ही तुला शास्त्रज्ञ आजी किंवा गूगल आजी म्हणत.’ भूपी कौतुकाने म्हणाली.

आजी जरा सुखावली. ‘अगं उत्क्रांतीबद्दल  कित्ती कित्ती चुकीच्या कल्पना असतात लोकांच्या मनात. लोकांना वाटतं ‘सबळ  तेवढेच टिकतात’ असं उत्क्रांतीशास्त्र सांगते.’

भूपी आता पूरती चक्रावली. ‘म्हणजे असं नाहीय्ये?’

आजी शांतपणे समजावू लागली, ‘सबळ  तेवढेच टिकतात हा एक मोठा गैरसमज आहे. सबळ  म्हणजे बलवान, खूप शक्ती असलेले असं लोकांना वाटतं. तू मला सांग माणूस हत्तीपेक्षा बलवान आहे का?’

‘नाही.’

‘वाघापेक्षा? बैलापेक्षा?’

‘नाही.’

आज मनुष्यप्राण्याने पृथ्वीचा कोपरा न् कोपरा व्यापला आहे. पण माणसापेक्षा बलवान कितीतरी प्राणी आहेत. तरी देखील माणूस सर्वदूर पोहोचला, याचं कारण त्याच्या ठाई शक्ती कमी असली तरी युक्ती अधिक आहे. त्यामुळे सबळ याचा अर्थ निव्वळ शारीरिक बळ असा होत नाही. समजा एखाद्या बेटावर अचानक नवीन कुठल्यातरी गवताचं बी आलं आणि एरवी वाढणाऱ्या गवताऐवजी सगळीकडे नवीन गवत उगवलं, तर हे गवत पचवायची ताकद असलेली हरणे तेवढी टिकतील. बाकीची नष्ट होतील. समजा दुष्काळ पडला तर दुष्काळात तगून राहू शकतील अशा वनस्पती फक्त टिकतील, बाकीच्या नष्ट होतील. बळ असं अनेक प्रकारचं असतं.’

‘खरंच की. उत्क्रांती म्हटलं की लोकांना फक्त, ‘माकडापासून माणूस निर्माण झाला’, एवढंच आठवतं.’ भूपी.

‘पण तुला माहित आहे का, माकडापासून माणूस निर्माण झाला असं डार्विनने कुठेही म्हटलेलं नाही. त्याचं म्हणणं असं होतं, की माणूस आणि माकडे  कोणीतरी समान पूर्वज आहे. म्हणजे तू तुझ्या चुलत भावापासून निर्माण झालीस असं म्हणता येईल का? नाही.  पण त्याच्या आणि तुझ्या बाबांचे बाबा, म्हणजे तुमच्या दोघांचे आजोबा, एकच होते. तसंच हे. माणूस आणि माकडे वगैरेंचे आजोबा एकच होते. इथे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील असा अर्थ नाही हं घ्यायचा. इथे आजोबा म्हणजे फार फार पूर्वी कोणीतरी समान पूर्वज असले पाहिजे असं डार्विनने सांगितलं.’

ओ! हो!! म्हणजे त्या समान पुर्वजांपासून बदल होत होत आपण निर्माण झालो तर.’ भूपी.

‘हो. अगदी बरोबर. या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी सर्व प्राणी, पक्षी, वनस्पती वगैरे निर्माण झाले आणि त्यांचेच वंशज आपल्याला आसपास दिसतात, अशी डार्विनपूर्व शास्त्रज्ञांची कल्पना होती. पण डार्विनने या कल्पनेला जबरदस्त धक्का दिला. पूर्वीचे प्राणी आणि वनस्पती सृष्टी ही आजच्यापेक्षा खूप खूप वेगळी होती आणि आजपासून पुढील सजीव सृष्टी ही आजच्यापेक्षा अगदीच निराळी असेल, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं. माणूस आणि माकडाचे पूर्वज तर एक आहेतच पण झाडाच्या कोणत्याही फांदीच्या टोकापासून सुरवात केली तर खाली, खाली, खाली आपण बुंध्यापाशी पोहोचतो. म्हणजे डार्विननी असं दाखवून दिले की सर्व प्राण्यांचा, वनस्पतींचाही पूर्वज कोणीतरी एकच सजीव होता. त्यापासूनच साऱ्या सजीव सृष्टीची उत्पत्ती झाली आहे.’

‘काय भन्नाट आहे हे! म्हणजे तो कोणीतरी सूक्ष्मजीव माझाही पूर्वज आणि...’ भूपी जरा अडखळली.

‘त्या पालीचाही, झुरळाचाही, शेवाळे, बुरशी, वडाचाही आणि गांडूळाचाही!!’ आजीनी हंसत, हंसत वाक्य पूर्ण केलं.

गावाकडच्या घरात, छतालगत,  फेटे घातलेले, पगडी घातलेले असे पूर्वजांचे फोटो होते. त्या लायनीत तिला आता फेटे घातलेली पाल आणि पगडी घातलेले झुरळ दिसू लागले आणि त्यातच तिला डोळा लागला. सकाळी भूपी उठली तर हे सारे पूर्वज तिच्या स्वप्नात येऊन गेल्याचे तिला अर्धवट आठवू लागले. तिला हसू फुटले. भिंतीवरच्या तसबिरीतून डार्विन आजोबाही हलकेच हंसताहेत असा तिला भास झाला.

आज रात्री शास्त्रज्ञ आजीकडून गोष्ट ऐकायची, ती स्वप्ने का पडतात याची, असं तिनी मनोमन ठरवले आणि ती उठून आवरू लागली.

  

किशोर दिवाळी अंक २०२२ 

No comments:

Post a Comment