मावशीचे घर
डॉ.
शंतनू अभ्यंकर, वाई.
सौ.
प्रभा बळवंत आमडेकर, व्होरा हाऊस, भीमाणी स्ट्रीट, मुंबई 19. हा पत्ता अगदी गिरवून पाठ झालेला. दर आठवड्याला एक पत्र लिहायचंच असा शाळेच्या होस्टेलमध्ये नियम होता. मग बरेचदा हे पत्र मावशीच्या वाट्याला यायचं.
पत्र पोस्टात टाकताच मला डोळ्यासमोर दिसायचं,
मावशीचं घर. ते घर अगदी नवलाईचं होतं. मुख्य म्हणजे ते मुंबईला होतं. अगदी
गुळगुळीत रस्ते असणाऱ्या गावात होतं. पहिल्यांदा मुंबईत उतरलो तर रस्ते किती
गुळगुळीत आहेत ते मी रस्त्यावरून हात फिरवून पहिलं होतं.
माटुंगा भागातली एक तीन मजली बिल्डिंग, समोर मोठ्ठ मैदान, त्यावर पोरांचा गलका, चार-पाच पायऱ्या चढून गेलं की समोर मोठा जिना पण त्याआधी डावी-उजवीकडे मोठे दरवाजे. तळमजल्यावर डावीकडे मावशीचे घर आणि उजवीकडे कुठल्यातरी दाक्षिणात्य महाराजांचा मठ. तिकडे सतत लुंगीधारी, उघड्याअंगाच्या, भस्म लावलेल्या, शेंडी
राखलेल्या, गेंगाण्या
आवाजात
बोलणाऱ्या
माणसांचं
येणं
जाणं.
बायका
दाक्षिणात्य, जरतारी साडी नेसलेल्या, गच्च फुलं माळलेल्या, कपाळी आणि
गळ्याशी भस्म लावलेल्या, अंगभर दागिने
ल्यायलेल्या. वेळीअवेळी
तिथून
जपाचे,
मंत्राचे, स्तोत्रांचे, प्रार्थनेचे, भजनांचे, प्रवचनांचे आवाज यायचे. पण तिकडे कधी जाण्याची वेळच आली नाही. बालसुलभ कुतूहलभरल्या
माझ्या डोळ्यांना तिथून सतत वटारलेल्या डोळ्यांनी प्रतिसाद मिळायचा. त्या प्रचंड,
रुंद जिन्याच्या भक्कम शिसवी कठड्याला धरून कधी पहिल्या मजल्यावर सुद्धा मी गेलो नाही. ‘वर मालक रहातात!’, अशी तंबी होती.
माझं आपलं जाणंयेणं मावशीच्या
घरी.
दारावर टपाल-फट आणि डिंगडॉंग बेल! किर्रर्र असं
कर्कश वाजणाऱ्या
आमच्या
घरच्या बेलपेक्षा
ही
कितीतरी
मंजूळ. दार
उघडलं
की
एक
छोटासा
व्हरांडा. दोन खुर्च्या, एक छोटं टेबल, पुस्तकांची कपाटे आणि एक मोठाच्या मोठा बुटाचा रॅक आणि बूट सगळे जागेवर! घरात इतकी लहान मुलं होती, पण येताजाता चपलाबूट जागेवर म्हणजे
जागेवर. मला तर वाटायचं तिथले चपला बूट ऑटोमॅटिक आहेत. आपोआप आपआपल्या जागी जाऊन बसतात. पण तसं नव्हतं. त्या घराला एक आगळी वेगळी शिस्त होती.
व्हरांड्यातून
एकीकडे हॉल, एकीकडे लिव्हिंग रूम, आणखी आत किचन कम डायनिंग आणि मोठीच्या मोठी कॉमन टॉयलेट, बाथरूम. या सर्व खोल्यातून सामान अगदी ठासून भरलेलं होतं. ठासणीच्या
बंदुकीत दारू भरावी तसं. अगदी श्रावणात जशी हिरवळ दाटे चोहिकडे, तसे सामान दाटे चोहीकडे. पण मावशीच्या घरात सगळं काही जिथल्या तिथे. अगदी मापात आणि काटकोनात. जरा जरी कोन बिघडला किंवा माप बदललं तर सामान मावायचंच नाही. हे माझ्या दृष्टीने अप्रूप होतं.
आमच्या गावाकडच्या घराला १७
खोल्या
होत्या. तीन
दिशांना दरवाजे, चार चार फुटी जाड भिंती, भिंतीत जिने, भिंतीत कपाटे, कोनाडे, दोन माळे, एक तळघर, एक बळद (धान्य
साठवण्याची जणू भिंतीतली विहीर/पेव),
जिन्याखाली अंबारी (छतावर पायऱ्या येतात अशी जिन्याखालची मोकळी जागा), अंगण, विहीर
अशा अप्रूपाच्या अनेक जागा त्या घरात होत्या. मुळात ते लपंडाव, चोर-पोलीस वगैरे खेळण्यासाठीच बांधलं होतं आणि दुसरीकडे जागा मिळाली नाही म्हणून माझे कुटुंबीय तिथे राहत होते, अशी माझी समजूत होती. तिथे अघळपघळपणाला, अस्ताव्यस्तपणाला फुल्ल वाव होता.
पण
मावशीच्या घरात सुद्धा अनेक गंमती होत्या. तिथल्या एका खोलीला एक पोटमाळा होता. तिथेही खच्चून सामान भरलं होतं. पण त्याचा जिना जो होता, तो फोल्डिंग होता. म्हणजे वर जाताना तो उघडायचा, एरवी घडी करून, तो आपला अंग चोरून भिंतीलगत चिकटून राहायचा. कायम जागा व्यापून टाकणारा जीनासुद्धा मुंबईकरांना
पसंत नाही. या पोटमाळ्याखाली एका पणजींचा मुक्काम असायचा. या संपूर्ण दृष्टिहीन. पण कोण आलंगेलं ते आवाजावरून, अगदी पावलांच्या आवाजावरूनही ओळखायच्या. गेलं की जवळ बोलावणार, आपले सुरकुतलेले हात गालावरून फिरवणार आणि जिन्याखालच्या गुप्त जागेतून काहीतरी खाऊ;
एखादा
जर्दाळू, चार
मनुका,
असं
हातावर देणार. त्यांच्या गुप्त जागेत आणखी एक खजिना दडलेला होता. तिथे भरपूर बॉल
ठेवलेले होते.
मावशीचं
घर म्हणजे मोठं
एकत्र
कुटुंब
होतं.
त्यात
मावशीच्या आजे-सासूबाई, सासरे, सासूबाई, चुलत सासरे, चुलत सासूबाई; या सगळ्यांची मुलं, सुना, नातवंड असे धरून १२-१५ माणसं सहज असतील. मावशीच्या घरी आणखी एक गंमत होती. तिचा एक चुलत दीर तिच्याहून खूप लहान होता. अगदी माझ्याहूनही
लहान. पण
दीर तो दीर, वयाचा
काय
संबंध?
त्यामुळे
ती
आपली त्या चिमुरड्याला, ‘अहो राजा’ म्हणून हाक मारायची आणि आम्ही खोखो हसत सुटायचं. इतकी सगळी माणसं, त्या साऱ्यांचा येणंजाणं आणि त्या साऱ्यांकडे येणारी जाणारी; अशी सगळी जत्रा दिवसभर चालायची. पण कधीही कुठेही गडबड गोंधळ नसायचा. या घरातली कामं अगदी हळू आवाजात आणि बिनबोभाट चालू असत. आमच्या गावच्या
घरी दुसऱ्या खोलीतल्या
कोणाला हाक मारायची तर चांगली हळी घालावी लागत असे. मावशीच्या घरी भिंतीनाही कान
असतात हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत होतं. आमचे कमावलेले आवाज इथे गमवावे
लागत. नाहीतर लोकं दचकत.
अशा
भाऊगर्दीतही या घराने अगत्य जपले. घरानी म्हणजे अख्ख्या घरानी. मावशीचं भाचरांवर प्रेम तर जगजाहीर होतं. ते तर असणारच. माय मरो आणि मावशी जगो. पण एकदा मावशीकडे असताना माझ्या भावाचा वाढदिवस होता. आवर्जून लक्षात ठेवून तो दिवस साजरा केला, तो तिच्या सासूबाईंनी!
इतकी
सगळी जनता रात्री एकत्र मावणे शक्यच नव्हते. मग नव्या पिढीसाठी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये एक ब्लॉक घेतला होता मग झोपायला ब्लॉकवर जायचं आणि दिवसभर व्होरा हाऊस, असा दिनक्रम असायचा. ब्लॉकवर जाण्यापूर्वी किल्ल्या, फोन,
निरोप, दूध याची रीतसर देवघेव व्हायची. दर
गुरुवारी मात्र ब्लॉकवर जायला उशीर. कारण सगळे परतल्यावर, दत्ताची आरती झाली की मग
निजानीज. दत्ताची आरती मी मावशीकडे प्रथम ऐकली. त्यातील, ‘दत्त येउनिया उभा
ठाकला’, ही ओळ येताच हटकून माझी नजर समोरच्या दत्तमूर्तीकडे जात असे. आढ्याजवळ,
पूर्वजांच्या फोटोच्या लायनीत, एका काचेच्या कपाटात, ही देखणी दत्तमूर्ती विराजमान
होती. ती सात्विक मूर्ती, आत्ता सजीव होऊन, दत्त म्हणून पुढ्यात ठाकेल, असं उगीचच
वाटत असे.
मावशीचे
घर हे एकूणच सात्विक लोकांचे घर. सारेच गुणवंत. मावशीचा मुलगा, केदारसुद्धा अगदी गुडबॉय.
रोज रात्री झोपण्यापूर्वी केदार मावशीला विचारायचा, ‘आई, मी तुला आज आवडलो का?’ पहिल्यांदा मी हा प्रश्न ऐकला आणि मला हसूच आलं. न आवडण्यासारखं काय केलं होतं त्यानी?
काहीसुद्धा नाही.
पण
ती त्या घराची पद्धत होती. मग मावशीने तो तिला आवडल्याचे सांगितले आणि तो सुखाने झोपी गेला. पण ह्या गुडबॉय-गिरीचा त्रासच व्हायचा मला. सतत, ‘तो बघ, नाहीतर तू!’, याचा मारा आमच्यावर चालू असायचा. मावशीकडे जाऊन राहिलो म्हणजे मी सुधारीन
अशी आईला भाबडी आशा
असायची.
मी
मावशीकडे
जाऊन
बरेचदा
राहिलो.
पण
सुधारणा
विशेष
झाली
नसावी. माझ्या संगतीने केदारच किंचित बिघडला असावा.
या नवलनगरीत आणखीही बरेच काही नवल होतं. इथे गॅस पाईपने यायचा. कामवाल्या बायका वेळेवरच यायच्या. गपचूप काम करायच्या. त्यांचाच दरारा होता. त्या
यायच्या आत घरच्यांना सगळं उरकून ठेवावं लागायचं. मायक्रोवेव्ह नावाची गोष्ट मी इथे पहिल्यांदा पाहिली. इथला फ्रिज खचाखच भरलेला. पिस्ते, बदाम, मनुके असा
सुकामेवा, क्रीम बिस्कीटे, तऱ्हेतऱ्हेची परदेशी चॉकलेट्स, गोल्डस्पॉट,
कोकाकोला, आईस्क्रीम, केक अशा एकसे एक दुर्मिळ, स्वादिष्ट आणि चटकदार चीजा.
एकदा तर खूपच मजा आली. मी आणि माझा आतेभाऊ वरळीहून खास मावशीला भेटायला म्हणून माटुंग्याला
निघालो. सकाळी
लवकर
आम्ही
निघालो
होतो. दोन बस बदलून मावशीकडे जायचं होतं. त्या वयात हे एक साहसच होत. मावशीकडचे खाणेपिणे खुणावत
होतेच. आत्याकडे नाष्ट्याला आम्ही नकार दिलेला. मुद्दाम
उपाशीच निघालो होतो. बस बदलत मावशीकडे पोचेपर्यंत चांगली टळटळीत दुपार झाली. पोटात कावळे ओरडायला लागले. मावशीने, ‘काय देऊ रे खायला?’ असा प्रश्न केला. आता एकदम कसं खायला मागायचं, म्हणून आम्ही दोघं संकोचाने नको नको म्हणालो.
यावर मावशीने विचारले, ‘पराठे करू का गरम गरम?’
‘नको’
‘पुलाव तयार आहे.’
‘नको. नको’
‘केक?’
‘नको. आमचं खाणं झालंय.’
‘चना भटुरे?’
‘नको.’
मावशी तिच्या भात्यातले एकेक बाण सोडत होती. आमच्या तोंडाला पाणी सुटत होतं. पोटातली
कावकाव वाढली होती. करता
करता
सात-आठ
चमचमीत
पदार्थांचे मेनूकार्ड मावशीने वाचून दाखवले. पण
आता परिस्थिती आणखी बिकट झाली होती. एकदा ठाम नकार दिल्यावर आता हो म्हणणे अवघड
झाले. आता एकदम कसं हो म्हणायचं, आता ते वाईट दिसेल, म्हणून आम्ही संकोचाने नाही म्हणत राहिलो.
शेवटी
गोल्डस्पॉटवर आमची बोळवण झाली. पुन्हा एकदा वरळीला आलो आणि घरी येतात खाण्यावर तुटून पडलो. आमच्या संकोचाची सारी कथा ऐकून आत्या हसायला लागली.
मावशीला सारे कळताच तिने झापलेच. पण मावशीचे
बोल अगदी गोड आणि मिठ्ठास. तिने कोडकौतुक केलेलं तर आवडतंच पण तिने झापलं, तरी ते इतकं गोड असतं, की तिने झापतच राहावं असं वाटतं. तिच्या सांगण्यामागे, आपलं भलं व्हावं अशी आच असते. ती सतत जाणवत राहते. आईलासुद्धा हे माहिती झालं आहे. त्यामुळे मला झापायचं झालं तर ते मावशी मार्गे माझ्यापर्यंत पोहोचते.
उगीच
नाही आईचं आणि मावशीचं अगदी
गुळपीठ! भेटल्या की त्या दोघींचं काहीतरी कुचुकुचु बोलणे सुरू. दर दोन मिनिटांनी जोरजोरात हसणं. हास्यस्फोट होण्याइतके
या एकमेकीला काय विनोद सांगतात, याची मला उत्सुकता असायची. मग मला कळू नये म्हणून त्या गुप्त भाषेत बोलायच्या. च ची भाषा, उलटे शब्द, असं काय काय करायच्या. अर्थात काळजीपूर्वक ऐकल्यावर काय चाललंय ते कळायचंच. पण आई आणि मावशीचे मेतकुट आजही अगदी छान जमलेलं आहे. दर दिवसाआड फोन, व्हाट्सअप व्हिडिओ कॉल, कोणाच्याही अडीनडीला तात्काळ एकमेकींकडे जाणे, असं सगळं चालू असतं. विणकाम, शिवणकाम, पाककृती याची तर चर्चा असतेच. मुंबई म्हणजे जगाचा तुकडा. त्यामुळे तामिळी, केरळी, गुजराती, थाई अशा पाककृती मावशीकडे रुजू.
अशाच
एक पाकनिपुण बाई, मावशीच्या घरी अगदी प्रसिद्ध पावल्या. दर काही दिवसांनी त्या एक एक
भारी पदार्थ पाठवायच्या. त्यांचा प्रत्येक पदार्थ अतिशय चविष्ट. एवढ्या माणसांच्या घरात तो जाम टिकायचा नाही. लगेच फक्त व्हायचा. इतका बेफाट पदार्थ आपल्या भाच्याला मिळाला नाही म्हणून मावशीची
घालमेल. मग
तो
पदार्थ
कसा
केला,
अशी
आवर्जून
विचारणा व्हायची. मग त्या बाई त्याची कृती मोठ्या आत्मविश्वासाने सांगायच्या. पण पदार्थाचा आणि कृतीचा मेळ मावशीला काही कधी घालता आला नाही. शेवटी बऱ्याच मिनत्या केल्यानंतर एकदा त्या बाई घरी येऊन डेमो द्यायला तयार झाल्या. पण त्यांचा तो प्रयत्न सपशेल फसलाच! आणि ‘मी केलेले’ म्हणून आणून दिलेले पदार्थ हे शेजारच्या ‘गंगा
मल्टीकुझीन रेस्टॉरंट’ मधल्यासारखे का लागतात हे स्पष्ट झाले!!
एखाद्या गुंतागुंतीच्या मशीनचे सगळे भाग, एकमेकात गुंतलेले असूनही, विना कुरकुर चालतात, उगाच एकमेकांच्या मधेमधे येत नाहीत, तसं हे व्होरा हाऊस, एक यंत्रच वाटायचं मला. किल्लीचं घड्याळ पाठीमागून उघडल्यावर आतली चाकं जशी अगदी नियमित, शिस्तबद्ध आणि आश्चर्यकारकरीत्या फिरत असतात, एकमेकाची साथ सोबत करत असतात, तसं हे घर होतं. नव्या जमान्यात एकत्र कुटुंब आणि तेही मुंबईत, हे दुर्मिळच. मला आठवतंय, ‘लोकप्रभे’नी
मुंबईतल्या एकत्र कुटुंबांवर कव्हर स्टोरी केली होती आणि त्यात मावशीचे घर फोटोसकट झळकलं होतं.
मावशीच्या घराला असा अनेक अर्थाने सेलिब्रिटी स्टेटस होता. ते मुंबईत होतं एवढेच माझ्यासाठी सेलिब्रिटी स्टेटस द्यायला पुरेसा होतं. पण मावशीचे घर म्हणजे प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. वाय. के. आमडेकर यांचे घर. ते
मावशीचे दीर. मी लहान होतो तेव्हा त्यांचं महात्म्य लक्षात यायचं काही कारण नव्हतं. उलट मला ते लक्षात राहिले, ते त्या शांत-गंभीर घरात आमच्याशी खेळणारा एक गमत्या माणूस
म्हणून. आम्ही टीव्ही पाहत असलो की ते येऊन पुढ्यात उभे राहायचे. विचारायचे, ‘दिसतंय
ना रे? मी मध्ये नाही ना रे आलो?’,
‘हो
दिसतंय.’
मग ते म्हणायचे, ‘अरे बापरे! दिसतंय होय?’ आणखी जरा सरकायचे आणि म्हणायचे, ‘आता? आता मी बरोबर मध्ये आलोय ना?’
अशा खोड्या सतत चालू असायच्या. पुढे मी मेडिकल कॉलेजला गेलो, डॉक्टर झालो आणि डॉ. वाय. के. आमडेकर सरांचे महात्म्य हळूहळू लक्षात यायला लागले. ते एक नाणावलेले बालआरोग्य तज्ञ. सगळ्या
मुंबईत, सगळ्या
देशात त्यांना
ओळख.
विदेशातही
त्यांची ख्याती.
एक
विद्यार्थी
प्रिय
शिक्षक
आणि नावाजलेले
वक्ते असाही त्यांचा लौकिक. सरांचे
भाषण आहे म्हटल्यावर कुठल्याही कॉन्फरन्समध्ये हॉल तुडुंब भरलेला. माझा एक
बालआरोग्यतज्ञ मित्र एकदा माझ्याबरोबर मावशीकडे आला. समोरचा बंडी आणि पायजम्यातला माणूस म्हणजे डॉ. वाय.के.
आमडेकर, यावर त्याचा विश्वासच बसेना. ओळख करून देताच त्यांनी त्यांना सांष्टांग
दंडवत घातलान.
कालांतराने व्होरा हाऊस, भिमाणी स्ट्रीटवरचा
मुक्काम उठला. चेंबूरला
एका
प्रशस्त
जागेत,
प्रशस्त
बंगल्यात
मावशीचे
घर
हललं.
व्होरा हाऊस, भिमाणी स्ट्रीटवरचे आढ्याजवळचे
पूर्वजांचे फोटो आता माळ्यावर गेले आणि व्होरा हाऊस, भिमाणी स्ट्रीटमधील ज्येष्ठ मंडळी चंदनाचे हार घालून फोटोत जाऊन बसली. पण घर बदललं म्हणून मावशी थोडीच बदलते. माझी मावशी काही कोणी विदुषी नाही. कुठल्या क्षेत्रात तिनी फार मोठी कामगिरी गाजवली आहे असेही नाही.
पण ती माझी मावशी आहे. साधीच आहे. पण माझी आहे. गोधडीचं कसं असतं; तिला काही जरतारीचा
काठ नसतो. पण ती आपली असते. तशीच माझी मावशी आणि तसंच तिचं घर. ती
साधी आहे पण माझी आहे; ते घरही साधं आहे पण
माझं आहे.
No comments:
Post a Comment