Thursday 20 October 2022

लॉर्ड ऑफ द फ्लाईज (देवाघरची फुले?)

 

 

 

लॉर्ड ऑफ द फ्लाईज (देवाघरची फुले?)

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

 

ब्लर्ब

 

एका निर्मनुष्य बेटावर काही शाळकरी मुलं अडकतात... आणि सुरु होतो जगण्याचा संघर्ष.

सुरवातीला सगळं कसं छान छान असतं पण मग हळू हळू त्यांच्यातली जनावरं जागी होऊ लागतात...

आदीम प्रेरणा, सुसंस्कृत वागणुकीचा कब्जा घेतात...

गततट पडतात...

हाणामाऱ्या होतात...

विवेकाचा आवाज दाबला जातो...

नव्या नव्या मिथक कथा जन्म घेतात...

निरागस कोवळी मुलं,

ही देवाघरची फुलं,

शेवटी एकमेकांविरुद्ध जीवघेणे सापळे रचतात...!!!

 

 

लॉर्ड ऑफ फ्लाईज’, ही विल्यम गोल्डींग यांची गाजलेली कादंबरी. नुसतीच गाजलेली आणि नावाजलेली नाही तर या कादंबरीसाठी त्यांना १९८३ सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

या कादंबरीचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे आणि ते केले आहे जी.ए.कुलकर्णी यांनी. नाव लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ असंच ठेवलं आहे. पात्रांची नावे आणि वातावरण, यांचंही भारतीयीकरण केलेले नाही. अशा प्रकारच्या भाषांतरामध्ये जो खडबडीतपणा राहतो तो आहेच, पण तरीही मूळ कादंबरीचा आवाका आपल्याला उत्तमरीत्या समजतो. पण  जीएंनी भाषांतराऐवजी, मराठी भावानुवादाची वाट धरली असती तर त्यांच्या सशक्त भाषेने कादंबरीचा ऐवज आणखी सजीव झाला असता असं राहून राहून वाटतं. भाषांतराबद्दल अधिक बोलण्याऐवजी मूळ कादंबरीचे कथानक मी थोडक्यात सांगतो.

कादंबरीची सुरुवात होते ती एका बेटावर अडकलेल्या मुलांच्या समूहाच्या वर्णनाने. जागतिक युद्ध सुरू झाले आहे. आदीस अबाबावरून मुलांना घेऊन चाललेल्या एका विमानावर हल्ला झालेला आहे आणि एका निर्मनुष्य बेटावर हे विमान कोसळले आहे. त्यातल्या राल्फ आणि पिग्गी या जोडीला एक शंख सापडतो. फुंकताच जो स्वप्राणाने, त्याचा आवाज सगळीकडे घुमतो आणि विखुरलेली मुले एकत्र येतात. आपण निर्जन बेटावर अडकलेलो आहोत हे त्यांच्या लक्षात येतं. आता आपले आपणच आहोत, आपणच काय ते ठरवायला हवं, पुढे तगायसाठी काही हालचाल करायला हवी, हे त्यांच्या लक्षात येतं.

सुरुवातीला ही मुलं विलक्षण समंजसपणे वागतात. सगळ्यांनी मिळून झोपड्या बांधण्याची सुरवात करणे, लांबून जाणाऱ्या जहाजांना आपला पत्ता लागावा म्हणून शेकोटी करून धूर करणे, अशी त्यांची धडपड सुरु होते. होता होता या मुलांमध्ये काही सामाजिक संस्था उदयाला येतात. राल्फ नेता म्हणून निवडला जातो.  शंख वाजवताच सगळ्यांनी गोळा व्हायचं असं ठरतं. सभेमध्ये ज्याच्या हाती शंख त्यांनीच फक्त बोलायचं, असंही ठरतं. पण अगदी झपाट्यानं ही सामाजिक जाणीव ओहोटीला लागते. शेकोटी पेटवायचा प्रयत्न करतात, तर त्यातून वणवाच पेटतो! त्या वणव्याच्या झळीत एक लहान मूल गायब होऊन जाते, पण याबद्दल विशेष कुणालाच काही वाटत नाही.

हळूहळू या मुलांच्यात  दोन गट पडतात. जॅक हा अतिशय आक्रमक स्वभावाचा मुलगा. तो खरं तर शाळेच्या समूहगानवृंदाचा मुख्य असतो. म्हणजे कला, सौंदर्य, संगीत याचे किमान भान असते त्याला. पण निर्जन बेटावर, मोठ्यांच्या देखरेखीशिवाय, हळूहळू त्याच्यातला हैवान जागा होतो. शिकार करणे हीच त्याच्या जीवनाची इतीकर्तव्यता ठरते. त्यासाठी तो इतरांनाही उद्युक्त करतो. समूह निर्माण होताच वैयक्तिक विवेक संपतो आणि येशूची आळवणी करण्यात माहीर असलेले जॅक आणि त्याचे मित्र अधिकाधिक हिंस्त्र बनत जातात. पुढे जंगलात आपण सहज दिसू नये म्हणून ही मुलं चेहऱ्याला रंग लावतात, अधिकाधिक आक्रमक, अधिकाधिक क्रूर, अधिकाधिक रानटी, अधिकाधिक पाशवी आणि अधिकाधिक होयबा बनत जातात. या साऱ्या समूहाचं लष्करीकरण होत जाते. आपपरभाव टिपेला पोहोचतो. बेटावरच्या एका माचीवर बालेकिल्ला थाटला जातो. तिथे  परका कोणी आला तर थेट त्याच्यावर ढकलता येईल अशा शिळा रचल्या जातात.

या समुहाविरुद्ध उभे ठाकतात राल्फ आणि पिग्गी. पिग्गी हा समाजातल्या विचारशील पण ताकदहीन आणि म्हणून बेदखल वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.  त्याला भला मोठा चष्मा आहे. दमा आहे. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि याचं अगदी थेट वाकडं आहे. तो स्वतःला फार शिष्ट समजतो असे जॅकला वाटतं. त्याला तो मुळीच आवडत नाही. त्याची आणि पिग्गीची सतत बोलाचाली होत राहते. पण आपला मुद्दा लावून धरण्यात, पटवून देण्यात आणि प्रसंगी मुद्द्यासाठी भांडण्यात पिग्गी तरबेज आहे. इतका की आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मुत्सद्देगिरीचा वापर तो आपल्या पापाच्या समर्थनार्थही अगदी लीलया करतो.

एक प्रसंग तर अगदी अंगावर काटा आणणारा आहे.  या निर्मनुष्य जंगलामध्ये भुतेखेते, राक्षस आणि मोठी श्वापदे लपलेली आहेअशी भीती सगळ्याच मुलांच्या मनामध्ये असते. या भीतीला खतपाणी घालणाऱ्या घटनाही घडत राहतात. एकदा होतं असं, की कुठले तरी विमान पाडलं जातं आणि त्याच्या पायलटचे पॅराशुटला लटकलेलं प्रेत त्या बेटावर येऊन अडकते. ते अशा पद्धतीने अडकते की वाऱ्याबरोबर पॅरॅशूट फुलताच ते प्रेत खडकामागून उभे राहून डोकवायला लागते. वारा पडताच ते प्रेत दिसेनासे होते. मांस झडलेले, माशांनी वेढलेले ते प्रेत म्हणजे कोणी श्वापद आहे, अशी त्या मुलांची खात्रीच पटते. साऱ्यांची जाम टरकते. 

सायमन नावाचा एक मुलगा मात्र सर्वांहूनी निराळा असतो. त्याला फिट येण्याचा त्रास असतो. मधूनच तो एकटाच डोंगरावर जात असतो. अशाच एका एकलकोंड्या भटकंतीदरम्यान त्याला श्वापदाचे रहस्य गवसते. तो त्या पॅराशुटच्या दोऱ्या  सोडवतो आणि ते प्रेत  दूर कुठेतरी समुद्रात जाऊन पडते.

श्वापदाच्या रूपाने माणसाच्या मनातली आदीम भीतीच गोल्डिंगनी  आपल्यासमोर मांडली आहे. या भीतीचे व्यवस्थापनदेखील जगभरची माणसं, जगभरच्या संस्कृती काही विशिष्ट तऱ्हेने करतात. अज्ञात श्वापद, त्याच्यापाशी असलेल्या सत्-असत् शक्ती, मग त्याची करुणा भाकणे, वेळोवेळी जयजयकार करणे, त्याच्यासाठी रिंगण धरणे, ताल धरणे, समूहनृत्य, समूहगान, प्रार्थना, नैवेद्य असे सगळे विधी आणि कर्मकांडे हळूहळू त्या बेटावरच्या बालसमाजात उत्क्रांत होत जातात. ‘जंगलीला ठार करा, त्याचे नरडे चिरा, जंगलीचे रक्त सांडा!’ अशी मंत्रावर्तने घुमत रहातात. रानडुकराच्या शिकारीनंतर डुकराचे शीर, श्वापदाचा हिस्सा म्हणून काठीवर टोचून ठेवले जाते. समाजामध्ये देवकल्पनेची  आणि धर्माचरणाची उत्क्रांती कशी झाली हेच जणू गोल्डिंग आपल्याला सुचवत राहतो.

सायमनला जेव्हा श्वापदाबाबतचे सत्य समजतं तेव्हा तो मोठ्या उत्साहाने बाकी साऱ्यांना हे सांगण्यासाठी म्हणून धावत सुटतो. पण बाकी सगळे भलत्याच खेळात मग्न असतात. त्यांना शिकार साधलेली असते. त्यांनी शेकोटी केलेली असते. मांस भाजले जात असते आणि ते होईपर्यंत वेळ जावा म्हणून शेकोटीभोवती  शिकारीचा खेळ मांडलेला असतो. एक जण डुक्कर म्हणून केकाटत, रिंगणात, गोलगोल फिरत असतो, तर इतर सारे जण काठ्यांचे भाले नाचवत, त्याची लुटूपटीची शिकार करत असतात. सायमन काय ओरडतोय, तो काय सांगतोय यात कोणालाच रस नसतो. बेभानपणे आरडत-ओरडत येणारा सायमन म्हणजे जणू श्वापद आहे आणि आता त्याला रिंगणात घेतलं पाहिजे, असं ती मुलं आपापसात ठरवतात. सायमन येतो. श्वापदाचे रहस्य सांगू पाहतो. पण रिंगण रणाऱ्यांना रहस्यभेद नकोच असतो. त्यांच्या दृष्टीने आता शिकारीचा खेळ महत्त्वाचा असतो. ‘जंगलीला ठार करा, त्याचे नरडे चिरा, जंगलीचे रक्त सांडा!’ असा गजर होतो.  क्षणात सायमनला श्वापद म्हणून रिंगणात घेतलं जातं, त्याच्यावर काठ्या पडतात आणि कुठला तरी घाव वर्मी बसून सायमनचा मृत्यू होतो! प्रचंड वादळी पाऊस सुरू होतो. सगळे पांगतात. उधाणलेला समुद्र सायमनचे प्रेत पोटात घेतो. सायमनच्या असण्यानसण्याचा, त्याच्या सत्याप्रतीच्या असोशीचा, आता मागमूसही उरत नाही.

सायमनचा मृत्यू झालाय हे सगळ्यांना माहीत असतं. पण उघडपणे कोणीच तसं बोलत नाही. आपण कसे लांब उभे होतो, कसा अंधार होता, चष्म्याची एकच काच शिल्लक असल्यामुळे आपल्याला अंधुकच कसं दिसतं, आपण कसं काही पाहिलंच नाही; वगैरे पिग्गी हिरीरीने सांगत रहातो. समाजातले विचारवंत, बुद्धिवंत, तत्वचिंतक म्हटले जाणारे, ऐन वेळेला कशी कच खातात याचे हे ढळढळीत उदाहरण.

पुढे जॅक विरुद्ध राल्फ अशी दुफळी माजते. हळूहळू जॅकचा  वरचष्मा निर्माण होतो. त्याच्या बालेकिल्ल्यावर यायचं असेल तर एक निमुळती वाट तेवढी असते. या वाटेवरून कोणी यायचं, कोणी जायचं, यासाठी चौक्यापहारे बसवले जातात.  हळूहळू जॅकच्या समूहाचं लष्करीकरण आणि रानटीकरण पूर्ण होतं. पिग्गीचा चष्मा पळवला जातो. आता तो जवळपास आंधळा झाला आहे. जॅकशी चर्चा करायला, चार समजुतीच्या गोष्टी सांगायला, समेट साधायला, मोठ्या उमेदीने शंख उराशी धरून, पिग्गी बालेकिल्ल्यावर जाऊ पाहतो. अतिशय निर्दयपणे वरून प्रचंड शिळा ढकलून त्याचा खून करण्यात येतो! पिग्गीच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या होतात आणि शंखाच्याही.  आत्तापर्यंत शंख म्हणजे सत्तेचं, अधिकाराचं आणि जबाबदारीचं प्रतिक. सुरवातीला शंखध्वनीनेच तर सगळे गोळा झालेले असतात. पिग्गीबरोबर शंखाचा अंत म्हणजे साऱ्या शहाणीवेचा अंत.

आता गोष्टी वेगळ्याच थराला जातात. जॅक विरुद्ध राल्फ असा उभा संघर्ष सुरु होतो. याला काही विशिष्ठ, जबरदस्त कारण असतं, असंही नाही. निव्वळ टोकाचा  आपपरभाव.  सारी मुले जॅकच्या पक्षात ओढली जातात.  त्यातल्या त्यात सॅम आणि एरिक या जुळ्या भावांची जोडगळी राल्फला मदत करू पाहते. पण समूहाच्या धारदार नजरेपुढे त्यांचेही प्रयत्न तोकडे पडतात.  जॅक आणि त्याची टोळी आता राल्फच्या  पुरते विरुद्ध गेले आहेत. त्याचा संपूर्ण बिमोड केल्याशिवाय त्यांना चैन नाही. आपापल्या काठ्यांना चांगल्या अणकुचीदार बनवत ते दुसऱ्या दिवशीची तयारी करत असतात.  दुसऱ्या दिवशी शिकार ठरते. पण डुकराची नाही, राल्फची!

सॅम आणि एरिक राल्फला सावध करतात. तो लपून बसतो पण त्याला शोधून काढण्यात येतं. तो प्रतिकार करतो, पण तो ज्या जाळीत लपून बसलेला असतो तीच पेटवून देण्यात येते. खोकत खोकत तो बाहेर येतो. सैरावैरा पळायला लागतो. पाहता पाहता हा जाळ वणवा होऊन सारे बेट वेढून घेतो. प्रचंड मोठ्या ज्वाला उठतात. सगळं बेटच धडधडून पेटतं.  पुढे राल्फ आणि त्याच्या मागावर इतर सर्व मुलं असा पाठलाग सुरु होतो.  सत्तास्पर्धेतला जीवघेणा संघर्ष आता सुरू झालेला असतो. डोंगरावरून उड्या मारत, झपाट्याने राल्फ पुळणीवरती येतो आणि संपूर्ण शक्तीपात झाल्यामुळे धाडकन तिथेच कोसळतो.

तितक्यात, कोणीतरी समोर आहे असं वाटून तो मान वर करून बघतो, तर पांढऱ्या शुभ्र वर्दीतील एक नौसेनाधिकारी त्याच्यासमोर उभा. तो अधिकारी  त्याला मोठ्या प्रेमाने आधार देतो. इतक्यात पाठलाग तिथे पोहोचतो. सारी मुले स्तब्ध होतात. नौसेनाधिकारी चक्रावून जातो. ‘हा काय प्रकार आहे? तुम्हीच ना ती बेटावरती एकाकी पडलेली ब्रिटिश मुलं? तुमच्याकडून यापेक्षा चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती!  हे काय चालवले आहे तुम्ही? शिकार शिकार खेळताय का? मजा आली असेल ना तुम्हाला? निळंशार आकाश, निवळशंख  पाण्याचे झरे, धमाल केलेली दिसते तुम्ही!!’

‘पण काय रे, ह्या शिकारीच्या खेळात कोणी बळी बळी नाही ना पडले?’

‘पडले ना, दोघे!’

राल्फला आता रडू कोसळते. तो हमसून हमसून रडायला लागतो. आता इतरही मुलं रडायला लागतात. साऱ्यांची निरागसता, साऱ्यांचे बाल्य जणू होरपळून गेलेले असते आणि हा त्याचाच शोक असतो.

पुन्हा एकदा सवयीच्या जगाशी मुलांची गाठ पडते आणि कादंबरी संपते.

कोणत्याही चांगल्या कलाकृतीची असते तशीच अनेकार्थता हे या कादंबरीचे सगळ्यात मोठे  वैशिष्ठ्य. नियंत्रण ठेवणारा कोणी नसेल तर मुलं कशी बिघडू शकतात हे या कादंबरीतून दिसतं. आदिम समाजाची जडणघडण आणि उत्क्रांती या कादंबरीत दिसते.

डुकराचे शीर काठीवरती टोचून श्वापदासाठी नैवेद्य म्हणून ठेवलेलं असतं. त्याच्या भोवती माशाच माशा घोंघावत असतात. ते शीर म्हणजे ‘माशांचा स्वामी’, लॉर्ड ऑफ द फ्लाईज! लॉर्ड ऑफ द फ्लाईज ह्याचा एक अर्थ, सैतान असा सुद्धा होतो.  फिटच्या एका झटक्यात सायमनचा आणि त्या शिराचा संवाद होतो. ते शीर सायमनला सांगते, ‘माझ्यापासून तुझी सुटका नाही. कुठेही गेलास तरी मी आहेच!’ जणू आदीम  प्रेरणांपासून, सैतानी भावनांपासून, अदृष्ट शक्तींपासून  माणसाची सुटका नाही असंलेखकाला सुचवायचं आहे.  त्यामुळे कादंबरीचे शीर्षक ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ (माशांचा स्वामी), असं आहे.

गोल्डिंग हा तर कसलेला कथाकार आहे. संपूर्ण कादंबरी तृतीय पुरुषी निवेदनातून उलगडत जाते. प्रत्यक्ष पात्रांना काय वाटते याचे वर्णन त्यांच्या शब्दात येत नाही. पात्रांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून आपल्यापर्यंत निवेदक ते पोहोचवत राहतो. सगळीच पात्र पौगंडावस्थेतील. काही अगदी लहान. तेंव्हा त्यांच्या शब्दात सारं नेमकेपणानी मांडण्यावर मर्यादा आल्या असत्या.

छोट्या छोट्या प्रसंगातून गोल्डिंग अनेक बारकावे आपल्यापुढे उभे करतो. सुरवातीला खोड्या काढतानाही लहानग्यांना इजा होणार नाही अशा बेतानी मोठी मुले खोड्या काढतात. पण एकूण सगळीच पात्र, ही अगदी काही तासापर्यंत मोठ्यांच्या आज्ञेत राहणारी, त्यांच्याशी आदराने वागणारी, सांगेल ते ऐकणारी, अशी आदर्श शालेय मुलं असतात. पण ही बंधने अचानक गळून पडतात आणि मग त्या मुलांमध्ये सैतानच जागा होतो. डुक्कर अगदी टप्प्यात येउनही वर्मी घाव घालण्याची हिंमत जॅकला, सुरवातीला, होत नाही. त्याच्यावरचे संस्कार अजूनही त्याला पुरते हिंस्त्र बनू देत नाहीत.  पण पुढे काही दिवसातच तो या धुवटपणावर विजय मिळवतो आणि बेलाशक शिकार करू लागतो. अगदी खूनाचा कटही रचतो!

सुरुवातीला हाच जॅक नेता म्हणूनसुद्धा निवडून आलेला नसतो. पण हळूहळू शिकारीवर त्याचा हात बसतो आणि त्या जोरावर तो संपूर्ण टोळीवर आपलं नियंत्रण राखायला लागतो. त्याला आता शिकारीची चटकच लागते. वर्चस्व गाजवण्याचे साधन म्हणजे शिकार हे त्याला कळून चुकते. सुरवातीला, सर्वांसमक्ष मोठ्या मानभावीपणे, तो शेकोटी सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारतो पण शिकारीच्या नादात शेकोटी सांभाळणाऱ्या मुलांनाच आपल्या साथीला घेतो. शेकोटी विझते आणि नेमकी त्याचवेळी एक बोट त्या बेटाच्या अगदी जवळून जाते. सुटकेची शक्यता जॅकच्या बेजबाबदारपणामुळे मावळते. राल्फ आणि जॅक मध्ये संघर्षाची ठिणगी पडते. प्राधान्य कशाला याबद्दल दोघांच्या कल्पना अगदी भिन्न असतात. चिल्यापिल्यांची  काळजी, निवारा, शेकोटी, धूर, सुटका या राल्फच्या भावना असतात; तर शिकार, वर्चस्व, बेधडक जगणे, प्राप्त परिस्थितीत तगून रहाणे अशा जॅकच्या.

श्वापदापासून पासून आपण सावध राहायला पाहिजे असा पावित्रा राल्फ घेतो, तर, ‘दिसूदेच तर श्वापद,  मी त्याच्याशी दोन हात करायला तयार आहे, आपणच त्याची शिकार करू’; असा अतिशय आक्रमक आत्मविश्वास जॅक सगळ्यांच्या मनामध्ये जागवतो. पण हा काहीसा आंधळा विश्वास जॅकला अचानक समूहप्रियता मिळवून देतो आणि या बेभरवश्याच्या वचनावर जॅक नेता म्हणून उच्चपदी पोहचतो. जनतेला भुलवायला खोटी का असेना, पण आश्वासने लागतात असे गोल्डिंग दाखवून देतो.  

शेकोटी हे देखील एक अतिशय सशक्त असं रूपक आहे. मूळ समाजाकडे परतण्याची ओढ या आगीतून धगधगत रहाते.  सुटका व्हावी म्हणून या शेकोटीची कल्पना येते. पिग्गीच्या मोठ्या भिंगाच्या चष्म्यामुळे शेकोटी प्रज्वलित होते. पण पहिल्याच शेकोटीची मोठी होळीच पेटते. त्यात एक मूल जातं. अक्राळ शक्तीवर नियंत्रण सहजसाध्य नसतंच. हळूहळू या शेकोटीवर त्यांना नियंत्रण मिळवता येतं. पण तरी देखील सर्वात शेवटी जवळपास सगळ्या बेटालाच वणवा लागतो. शेकोटी आणि धूर हवा म्हणणाऱ्या, राल्फचा जीव जायची वेळ येते आणि या प्रचंड, अकल्पित,  राक्षसी आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे या मुलांची सुटका होते.

सुटका करतो तो एक नौदल अधिकारी!  म्हणजे पुन्हा एकदा हिंसेकडून हिंसेकडे असाच प्रवास सुरू राहतो. युद्धानी सुरु झालेली कादंबरी, त्यातली रानटी बनलेली मुलं, त्यांची सुटका होते ती देखील एका युद्धनौकेकडून! कादंबरीतील अनेक विरोधाभासांपैकी हा अगदी मनात खोल रुतून बसतो.

श्वापद आणि त्याचं प्रत्यक्षात नसणे हे प्रतीकही अतिशय विचार प्रवृत्त करणारे आहे. देव दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू दया, असं लेखक सांगू पहातो.

पिग्गीचा चष्मा हे देखील एक उत्कृष्ठ  रूपक आहे. चष्म्याशिवाय या विचारवंत पिढीला आसपासच्या जगाची मुळी कल्पनाच येत नाही. चष्मा हे जणू विज्ञानाचं, सदसद्विवेकाचं प्रतिक आहे.  मुलांच्या मारामारीत आधी एक काच फुटते आणि पिग्गी निम्मा आंधळा होतो. या चष्म्यातूनच अग्नी निर्माण करणे शक्य असते. अग्नीवर नियंत्रण मिळवायचं तर चष्म्यावर नियंत्रण हवं. हे लक्षात घेऊन शेवटी तर जॅक चष्माच पळवून  नेतो  आणि पिग्गी पूर्ण आंधळा होतो.

या कलाकृतीवर, आर.एम. बाल्लान्टाईन यांच्या, कोरल आयलँड’ या कादंबरीचा ठसा आहे. राल्फ आणि जॅक ही नावेही त्यातीलच. या कादंबरीत राल्फ, जॅक आणि पीटरकिन ही तीन मुलं अपघाताने एका बेटावर अडकतात मात्र शहाण्यासारखं वागून ती आपले नायकत्व वारंवार सिद्ध करतात. त्या बेटावर रानटी लोक असतात. त्यातील काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुधारलेले  आहेत.  पण अजूनही बरेच रानटी आहेत. अगदी आपल्या देवाला प्रसन्न होण्यासाठी नरबळी देणारेही आहेत. मग अर्थातच आपल्या गौरवर्णाला आणि ‘उच्च ब्रिटीश कुळाला’ जागून ही मुलं सगळ्यांना सुधारतात वगैरे.

ही कथा वाचून गोल्डिंग यांना प्रश्न पडला, की खरंच जर मुलं अशी बेटावर अडकली तर ती अशीशहाण्यासारखे वागतील का? का लवकरच त्यांच्यातल्या पशुवृत्ती जागृत होतील? या प्रश्नाचा शोध म्हणजे ही कादंबरी. अधिकाधिक रानटी व्हायचे का अधिकाधिक समाजाभिमुख व्हायचे, हे द्वंद्व, दोन प्रमुख पात्रांच्याद्वारे इथे वारंवार उभे राहते. आप्पलपोटेपणा, दंभ, इथे ठायी ठायी दिसतो. सैतान आपल्यात आहेच, आपण उपजत रानटीच आहोत,  मात्र हे बीज अंकुरु द्यायचं की नाही एवढंच आपण ठरवू शकतो. ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’चे सार सांगायचे तर एवढेच.

प्रथमप्रसिद्धी

संवादसेतू

दिवाळी २०२२

No comments:

Post a Comment