घर थकलेले
संन्यासी
डॉ. शंतनू
अभ्यंकर, वाई.
ते घर वेगळंच होतं
अगदी. अगदी थकलेले होतं. मुख्य दरवाजावरची गणेशपट्टी सुद्धा तिरकी झाली होती.
त्यामुळे गजानन खाली घसरतो आहे आणि शारदेने
पाय चेपता चेपता त्याला धरून ठेवला आहे, असं एक मजेदार दृश्य आपोआपच तयार
झालं होतं. कोण्या ऐतिहासिक काळी यज्ञ केला
म्हणून कोण्या शेठजींनी माझ्या पूर्वजांना ते घर दान दिलं होतं म्हणे. मग ते तिथे पाठशाळा
चालवायचे. जुना वाडा होता तो. एका बोळात, उत्तरेला,
तोंड उघडायचं त्याचं. मग काही दिवसांनी घराच्या
मागील दारी प्रशस्त रस्ता झाला. मग घराचे तोंड फिरवून घेतलं गेलं. मुख्य दार आता बरोबर
उलट, म्हणजे दक्षिणेला झालं. मग काही दिवसांनी घराच्या पूर्वेला आणखी एक रस्ता
झाला. मग घराचे दार पुन्हा बदललं आणि ते पूर्वाभिमुख झालं. असं हे घर. घर फिरलं की
वासे फिरायचे!
दार ज्यावेळी उत्तरेला
होतं तेव्हा अंगण, ओसरी, ओसरीवर झोपाळा, मग माजघर, एका बाजूला देवघर, मागे सोपा,
बाळंतीणीची खोली, विहीर आणि परसदार असा सगळा पसारा होता. मग घर उलटलं. परसदार होतं त्याचं अंगण झालं. सोप्याची
ओसरी झाली. माजघर मात्र मध्यावरच राहिलं आणि पूर्वीच्या ओसरीवर स्वयंपाकघर झालं.
अंगणाचे परसदार झाले. परसाकडेला ‘पायखाना’ही (टॉईलेट ब्लॉक) आला. पुन्हा एकदा दिशा बदलली तेंव्हा पूर्वेकडे प्रवेशद्वार
झाले. पूर्वीच्या देवघराची बैठकीची खोली
झाली. मग ओसरीवरचा झोपाळा. मग तिथेच स्वयंपाकघर. डावीकडे माजघर. मध्ये जाड भिंतीतून
जिना. माडीवरही खोल्या, खोल्या, खोल्या होत्या. तळमजल्यावरच्या ज्या खोलीवर माडी
असायची, त्या खोलीच्या नावाने ती ओळखली जायची.
म्हणजे ओटीची माडी, माजघरची माडी वगैरे.
मग त्यात आणखी बदल
झाले. शेजारच्या मोकळ्या जागेत माझ्या आजोबांनी गाळे बांधले. त्या काळातला मॉलच
तो. ते गाळे भाड्याने दिले. उत्पन्न सुरू झाले.
आणखी काही नवीन बांधकाम केलं. या भानगडीत घराचा अगदी चक्रव्यूह झाला. मी लहान होतं तेव्हा घराला तीन दिशांना तीन दारं
होती. शिवाय बाहेरून थेट माडीवर जाता येईल असे दोन जिने होते. घरातून जीना होता तो
वेगळाच. एकूणच नव्या पाहुण्याला चकवण्याला आणि चुकवण्याला हे घर खूपच सोयीचं होतं.
चोर-पोलीस, लपाछपी वगैरे खेळायला बांधल्यासाखेच होते. दारे, खोल्या, जिने, असा चक्रव्यूह तर होताच पण याच्या भिंती चांगल्या अडीच
तीन फूट रुंद होत्या. त्यामुळे भिंतीतली कपाटे, कोनाडे, अंबारी(जिन्याखालची जागा) अशाही
लपण्यासाठी सोयीच्या जागा होत्या.
भिंती, छप्पर,
दारे, खिडक्या असं इथल्या प्रत्येक गोष्टीत वैविध्य होतं. जमीनही सगळीकडे सारखी नव्हती. माजघर, माजघरची
माडी हे सारवलेलं. मधूनच ताज्या सारवणाचा गंध सोडणारे. इथे केर काढायला केरसुणीच
हवी, हे कुंच्याचे काम नाय. स्वयंपाकघरात शहाबाद फरशी. बरीच वरखाली झालेली. गच्चीत
कोबा. इतरत्र बहुतेक मोझेक टाईल्स. विविध रंगांच्या, विविध ठिपक्यांच्या, जसे पैसे
जमतील तसे बसवलेल्या. आता विविध ठिकाणी उखडलेल्या. बसायला कुठे पाट, कुठे जाजम,
कुठे घोंगडी, कुठे सतरंजी शिवाय बैठकीच्या
खोलीत लीनोलियम अंथरलेला आणि एक सोफासेट सुद्धा. हे सगळ्यात उच्चभ्रू स्वागत.
जरा काळजीपूर्वक
बघितलं की नवं आणि जुनं यांचा समसमा संयोग दिसून यायचा. स्वयंपाकघरात एका ठिकाणी पायाचे दगड स्पष्ट दिसायचे. पण त्याचे अनेक
उपयोग होते. त्यावर नारळ फोडता यायचा. तो इतरत्र फोडला तर फरशी फुटायची भीती असायची.
शिवाय या पायाच्या दगडावरनं दोन-तीन खांब वरचे छत कसेबसे तोलून धरत होते. त्याच्यावर तुळया, वासे आणि त्याच्यावर
पाटणी नावाचे लाकूड काम केलेले. त्यानुसार घरात ‘खण’ पाडलेले. मागच्या खोलीत वाश्यांना,
लाकडी दांड्या, आडव्या आडव्या लावल्या होत्या.
या खास कपडे वाळत घालण्यासाठी. या दांड्यांवर काठीने कपडे वाळत
घालून ते पसरवणे हा मोठा कौशल्याचा भाग होता.
छपराला काही ठिकाणी
पत्रा होता. पत्रा हा खूपच इंटरेस्टिंग प्रकार होता. मुख्य म्हणजे तिथून दरवर्षी
होणारा बुवासाहेबाच्या जत्रेतला तमाशा अगदी थेट दिसायचा. उन्हाळ्यात पत्रा प्रचंड तापायचा
आणि खोलीत गेलं की भट्टीत गेल्यासारखे वाटायचं. थंडीत पत्रा प्रचंड थंड पडायचा आणि
फ्रीजमध्ये गेल्यासारखं वाटायचं. पावसाळ्यात पत्र्यावरील आवाजावरून पाउसमान ओळखता
यायचं. पण त्यातील सारी छिद्र आपले अस्तित्व दाखवून जायची. पण उन्हाळ्यात पत्र्यावरती
वाळवण मस्त वाळायची आणि रात्री गाद्या घालून थंडगार हवेत झोपता यायचं. मग काका गोष्ट
सांगायचा. अर्थात भुताची. समोरच्या पिंपळावर एक पिवळे घुबड रहाते आणि मध्यरात्री येऊन ते कानात फुंकर मारतं आणि
मग आपण बहिरे होतो; हे अशुभ वर्तमान काकानी पत्र्यावरच दिलं होतं. पुढे बरेच दिवस आमच्या
काळजाचा थरकाप करायला ही गोष्ट पुरेशी होती.
काही भागावर कौलं
होती. माकडं आली की त्या कौलांची फारच दैना व्हायची. माकडांच्या उड्यांनी शाकारणीनेही कुठे
कुठे आ वासला होता. पुढे कौले काढून सगळीकडेच पत्रे झाले. पत्र्याचा मुख्य फायदा
म्हणजे सुरवंट बंद झाले. कारण कौलात
सुरवंट फार. ते खोलीत सगळीकडे पडायचे. बाकी पाली, कोळी, सरडे, साप, झुरळे, डास,
पिसवा, ढेकूण, विंचू, उंदीर, घुशी, चीचुंद्र्या, मांजरे यांचा तर मुक्त संचार होता.
लाकूडकामाच्या अंगांगी वाळवी भिनली होती. रात्री माळ्यावर एक वटवाघूळ आणि दोन पाकोळ्या
मुक्कामी असायच्या. बाहेर वळचणीला पोपट, पारवे, चिमण्या सतत घरटी बांधायच्या. शिवाय
घराबाहेर बरेच आडोसे होते. त्यात कुत्री, डुकरं, कोंबड्या, शेळ्या, गाढवं रात्री वस्तीला असायचेच.
एकदा एक परदेशी पाहुणा
आमच्या घरी आला आणि नेमकं एक अबलख गाढव दारात उभं. तत्परतेने आणि मोठ्या प्रेमाने तो
त्या गाढवाच्या गळ्यात पडला. जवळपास पप्पीच घेतली त्यानी गाढवाची. गाढवाला हा मुका मार असह्य झाला आणि
दुगाण्या झाडत ते निघून गेलं. त्या गोऱ्या साहेबाची अशी समजूत की हे गाढव पाळलेले आहे
त्यामुळे तो त्याच्याशी सलगी करायला गेला. पुढे गाढवही गेलं.... आणि गोराही गेला.
दारांचे या घरात
बरेच प्रकार होते. अडसर घालता येईल अशी दारे, दिंडी दरवाजा असलेले दार, पत्र्याचे दार.
सिमेंटच्या पत्र्याचे दार, खिट्टी असलेली, खीळ असलेली, कडी कोयंडा, असलेली बोलट असलेली
आणि काहीच नसलेली अशी अनेक प्रकारची दारे. शिवाय प्रत्येक दाराचा विशिष्ट आवाज होता.
तो अगदी ओळखीचा.
असे कितीतरी आवाज
होते त्या घरात. झोपाळ्याच्या कड्या सतत कुरकुरायच्या. दारं, खिडक्या, कड्या, काचा
असं सगळंच वाजायचं तिथे. शिवाय पावलांचे आवाज
होते. प्रत्येक व्यक्तीची चाहूल वेगळी आणि प्रत्येक खोलीतली चाहूल वेगळी. माजघरात वेगळा स्वर, जिन्यावरून वेगळा स्वर, लीनोलियमवर
वेगळा, धाब्यावर वेगळा. वरच्या मजल्यावर कुणी जोरात पळत असेल तर माती पडायची,
त्याचा आवाज. शिवाय उंदीर घुशी फिरणार त्याचाही वेगळा विशिष्ठ आवाज होता.
आणि या घराच्या
आम्हां रहिवाश्यांचेही आवाज चांगले कमावलेले होते. घर इतकं मोठं असल्यामुळे., बाबांना बोलाव म्हटलं की चार आळ्या पलीकडेही ऐकू जाईल अशी
जोरदार हळी ठोकावी लागायची. माणसं आणि वस्तू या घरामध्ये हरवूनच जायची. वस्तू हरवणं
तर अत्यंत सोपं होतं आणि त्या सापडणं महाकर्मकठीण.
अडकित्ता, किल्या, चष्मा वगैरे वस्तू शोधून
आणणे हा आमच्यासाठी व्यायाम प्रकारच होता. शिवाय अडकित्ता शोधता शोधता पानाचा डबा
कोणत्या तरी खोलीत विसरायचा. तो शोधायला वेगळी मोहीम आखावी लागायची. शिवाय काही गोष्टी
अमक्या ठिकाणी का ठेवल्या आहेत याचा काहीही शोध लागणं शक्य नव्हतं. चिंच, ही वरच्या
मजल्यावर, माजघरच्या माडीतल्या कोनाड्यात,
एका माठात साठवलेली असायची. ती तिथून जाऊन आणावी लागायची. किंवा खायची असेल तरी
तेवढी सफर करावी लागायची. काथ्या अंबारीत ठेवलेला होता. चांदीची भांडी माळ्यावर
होती. पण नेहमीच्या नाही. ‘आरोग्य हीच संपत्ती’, असं खडूने लिहिलेल्या
तुळईशेजारच्या पाटणीला एक झडप होती.
त्याच्या आड माळा होता. तिथे चांदीच्या भांडी एका दुरडीत ठेवलेली होती.
अंधाऱ्या
माजघरात खुंटीला टांगलेले देवादिकांचे, पूर्वजांचे, फोटो होते. ते तिथे का होते
आणि कोणाला दिसणे अपेक्षित होते कोणास ठाऊक. एक चित्र अगदी डोळ्यापुढे आहे. चेहऱ्यावर
उग्र भाव धारण केलेला शंकर, शेजारी पार्वती, कार्तिकेय, गणपती, नंदी आणि मागे हिमालय. कुठल्यातरी जुन्या कॅलेंडरवरचे चित्र असावे. पण ते फ्रेम करताना, माझ्या एका
चुलत आजोबांचा फोटो, तळाशी सरकवून दिला होता. रंगीबेरंगी शंकराच्या कॅलेंडर चित्राच्या
पायाशी, काळ्यापांढऱ्या रंगातले, खप्पड चेहऱ्याचे, दाढीचे खुंट वाढलेले माझे चुलत आजोबा
अगदी केविलवाणे दिसत. पण माजघरात एक विलक्षण सोय होती. थंडीत
उबदार आणि उन्हाळ्यात थंडगार असायचं ते. शिवाय बाकी ठिकाणी भिंतींना ओल, पोपडे
वगैरे प्रकार होते, इथे नाही. इथे दोन दोऱ्या होत्या. यावर असंख्य कपडे टाकलेले असायचे.
नेमका आपल्याला पाहिजे तो कपडा कधी सापडायचा नाही. पण मागे कधीतरी हरवलेला मात्र सापडायचा.
अशी त्या दोरीमध्ये दिव्यशक्ती होती.
त्या भव्यदिव्य घरातलं फर्निचरही भव्यदिव्य होतं. एक ऐसपैस टेबल होतं. म्हटलं
तर डबल बेड म्हणून उपयोग करता आला असता इतकं ते मोठं होतं. त्याचे ड्रॉवर अगदी खोल
होते. साहेबांच्या बाजूने एक ड्रॉवर आणि पक्षकाराच्या बाजूने दुसरा. टेबलाच्या खुर्च्यासुद्धा
टेबलासारख्याच भक्कम होत्या. चांगल्या जड होत्या. त्यात कधी कधी ढेकूण व्हायचे.
ढेकूणदेखील खानदानी होते. जीन पँट भेदून करकचून चावायची शक्ती होती त्यांत.
टेबलावर टांगलेला, पांढरे शुभ्र लॅम्पशेड असलेला, एक दिवा होता. त्याची कड एखाद्या
पाकळीसारखी नागमोडी होती. खूप सुरेख होती. टिळक वगैरेंच्या चित्रात तसला दिवा
दिसायचा. मग स्फूर्ती वगैरे यायची.
एक देव्हारा
होता. काळा. तो शिसवी होता म्हणून काळा होता का काळा होता म्हणून शिसवी म्हणवला
जायचा हे एक कोडंच आहे. वाती, कापूर, उदबत्ती, गंध, फुले असा एक मिश्र वास तिथे
सतत दरवळत असायचा. त्याला सुरुदार देखणे खांब होते, सुंदर मेघडंबरी होती, बरेच
गुप्त कप्पे होते आणि हे सगळं फोल्डिंग होतं. वर्षातून एकदा, गणपतीपूर्वी देवघर
रंगवलं जायचं, तेंव्हा ही सगळी आगळीवेगळी माया बाहेर यायची. घरातल्या साऱ्यांच्या
जन्मकुंडल्या, शिवलीलामृताची पोथी, केस झडलेली चवरी, शंख आणि त्याची अडणी अशी जणू
चौदा रत्न निघायची आणि साफसूफ होऊन परत जागेवर जाऊन बसायची. तोवर जगन शेलारने
देवघर रंगवून, आपल्या कोरीव अक्षरांत ‘श्री गजानन लक्ष्मी प्रसन्न’, असं लिहिलेले
असायचं.
जगनवर मात्र
लवकरच गजानन आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न झाले. आधी लाईट आले आणि पाठोपाठ नळ. जगनने
वायरमन आणि प्लंबरचा कोर्स केलेला आणि जगन
गावातला मोस्ट वॉंन्टेड माणूस झाला.
लाईट आले; मात्र
कंदील, मेणबत्त्या, बॅटऱ्या; एम.एस.ई.बी. कृपेने आम्ही कालपरवापर्यंत बाळगून होतो.
लाईटबरोबर वासे, खांब, पाटणी याच्यावरती वायरच्या रेघा आल्या. लाकूडकाम असल्यामुळे
बॅटनपट्टीचा खर्च वाचल्याचा आनंद आला. जाड
काळी पितळी बटणं आली, त्यांचे ठोकळेबाज ठोकळे आले. ते मोठे मोठे झाले. मिक्सर आणि फ्रीज
आले आणि अनेक साधने पडद्यामागे घेऊन गेले. त्यांच्यासाठी वेगळे, पॉवरवाले ठोकळे
आले. पाणी गरम करायचं पीप आलं आणि डोक्यावर मेन स्वीच घेऊन बाथरूममध्ये जाऊन बसलं.
बंब थेट मोडीतच गेला. एक प्रचंड मोठा स्टॅन्ड असलेला पंखा आला. एक रेडिओग्रॅम आला.
हा म्हणजे निम्मा रेडीओ आणि निम्मा फोनो. अर्धनारीनटेश्वरच हा. मग किल्लीचा,
हिज मास्टर्स व्हॉईसवाला, फोनो अडगळीत गेला.
नळ आल्याबरोबर कावड,
डोण, विहीर मागे पडले. मग अंगणात असलेला नळ स्वयंपाकघरापर्यंत आला. मग काही दिवसांनी
छपरावरच्या टाकीत गेला आणि मग तिथून ठीकठिकाणी फिरला. पण नळाची ही सलगी भिंतींना काही फारशी पसंत पडली नाही.
बऱ्याच ठिकाणचा गिलावाच निघाला.
पण या घराला
नुसत्या दारे खिडक्या आणि भिंती नव्हत्या. आपले अष्टबाहू याने अष्टदिशांना पसरलेले
होते. घरासमोरचे मैदान, रस्ता, मंडई, शेजार असे सगळे आमचे घरच होते. घरापेक्षा घरा
शेजारीच तर आम्ही सतत रमायचो.
घराच्या तिन्ही बाजूने
रस्तेच होते. फक्त एका बाजूला शेजार. ते घर बागवानाचं होतं. पण बागवान कोंबड्या, शेळ्या,
गाई, कबुतरे, ससे असा शिकारखाना बाळगून होता. त्यामुळे वसुबारसेला बागवानाच्या घरी
जाऊन गाईची पूजा व्हायची. त्या घराचा माहोल काही औरच होता. तिथली पाटणी हिरव्या ऑईल
रंगांत रंगवलेली होती आणि त्याच्यावर भडक रंगात
रंगवलेली केळी, अननस, द्राक्षं, जांभळं अशी लाकडी फळं लटकवलेली होती. सीझनप्रमाणे इथे
काम चालायचं. चिंचा फोडणे, शेंगा सोलणे ही
दोन खूप इंटरेस्टिंग कामं.
घरासमोरच एक मोठं
मैदान होतं. त्यावर तर इतक्या तऱ्हा चालायच्या की अख्खं बालपण तिथे गेलं.
तिथे कोपऱ्यात
मासळी बाजार भरायचा. कातकऱ्यांच्या बायका टोपलीत मासे, खेकडे घेऊन बसायच्या.
खेकड्यांची संथ, फेंगडी, वळवळ सुरु असायची. सुकट बोम्बलाचा उग्र दर्प घमघमत असायचा
आणि विळ्यांवरती, माशांची अर्धवट चिरलेली कलेवरे, आ करून आभाळाकडे टपोरे डोळे
लावून पडलेली असायची.
शेजारचा मांडववाला
त्या मैदानात झिरमिळ्या बनवायचा. त्याच्याकडे
पंखा होता. तो त्या पंख्याच्या मध्यावर दुहेरी दोरा बांधायचा. मग त्या दोऱ्यामध्ये
कातरलेल्या कागदाच्या पट्ट्या सरकावयाच्या. पंखा चालू केला की त्या दोऱ्याला आणि कागदाला
पीळ बसायचा आणि झिरमिळ्या तयार व्हायच्या. त्याची मोठीमोठी कनातीची कापडं होती आणि ती घडी घालायची विशिष्ट पद्धत
होती.
आसपासची मंडळी बैलगाड्या
घेऊन मैदानात यायची आणि मग बैलांना नाल मारायचा एक रंजक कार्यक्रम पार पाडायचा.
आधी ते बैलाचे प्रचंड मोठे धूड, पायाभोवती कासऱ्याचा वेढा घालून, आडवे करायचे. मग चारी
पाय एकत्र बांधून खुंटावरती उंच धरायचे. मग सटासट पहिले नाल काढायचे. खूर स्वच्छ करायचे.
तासून घ्यायचे आणि दुसरे मारायचे. हे सगळं होईपर्यंत बैलाची शिंग धरायला एक भक्कम माणूस
बसलेला असायचा. तरी दोन-तीन वेळा तरी बैल बिथरून उठायला बघायचा. हॉ, हॉ म्हणत माणसं त्याला शांत करायची.
अंजारायची गोंजारायची. पण एकदा नाल मारून झाले आणि पाय मोकळे सोडले की ते जनावर झटक्यात
उभे राहायचं. माझ्या दुप्पट तिप्पट उंचीचा बैल तो. कधीकधी थेट माझ्या डोळ्यात डोळे
घालून बघायचा. सांगायचा, माझ्या मनाची मर्जी म्हणून इथे तुमच्या सेवेला आहे पण
मर्जी फिरली तर एकेकाला शिंगावर घेईन! मी आपला मनातल्या मनात त्याला नमस्कार
ठोकायचो. शेवटी नंदीच तो. त्याच्या मालकासारखा तोही कोपिष्ट असायचा. मी हे इतकी
वर्ष कुठे बोललो नाही पण बैल माझे ऐकत असावेत. इतक्या वर्षात कोणाला त्यांनी
शिंगावर घेतलं नाही.
बैलगाडीच्या चाकाला
धाव (पट्टी) लावायचं काम चालायचं. गोल गोवऱ्या रचून त्यात लोखंडाची पट्टी तापवली जायची
आणि मग ती तप्त धाव चाकाभोवती टाकून त्याच्यावर पाणी टाकलं जायचं. चर्रर्र असा
रोमांचकारी आवाज यायचा. गार होताच धाव चांगली
घट्ट आवळली जायची. उष्णतेमुळे पदार्थ प्रसरण पावतो वगैरे हे खूप नंतर वाचले, शाळेत.
एरवीही हे मैदान
माकडवाले, दरवेशी, गारुडी, डोंबारी, जादुगार यांनी सदैव गजबजलेलं असायचं. कधीही घरातनं
बाहेर पडा, तिथे काही ना काही करमणुकीचा कार्यक्रम सुरूच असायचा. कधी सतत सात दिवस
सायकल चालवणारा माणूस असायचा, कधी सापाचं शरीर आणि बाईचे मुंडके असलेली नागकन्या असायची,
कधी हात असूनही निव्वळ पायाने केस विंचरणारी, ब्रश करणारी, ‘ष्टो’ पेटवून त्याच्यावर चहा करून, तो पिणारी पैरकलावती
असायची. एकदा तर गणित करणारे गाढवसुद्धा होतं. कुठलाही स्टॉल असला तरी ठणाणा आवाजात गाणी ठरलेली आणि कुठलाही स्टॉल नसला तर
शेजारचा मांडववाला होताच. समग्र दादा कोंडके
आणि शोलेचे डायलॉग पाठ झाले आणि पाठ राहिले ते काही उगीच नाही.
समोरच्या
गाळ्यात, चरकाबरोबर सतत घुंगराचा ताल धरणारा गुऱ्हाळवाला, त्याच्या नेत्रदीपक
कॅलेंडरांसकट दर उन्हाळ्यात हजर व्हायचा. तिथे आले, लिंबू, बर्फ मिश्रित पुंड्या
उसाचा ताजा रस, मीही काढला आहे. शिवाय आईसक्रीमचा पॉट सर्व शक्तीनिशी गरागरा
फिरवला आहे. शेजारच्या भडभुंज्याच्या
भट्टीत भुस्सा टाकलेला आहे. तो लाल पिवळा जाळाचा भपका उडवलेला आहे. चार ठिणग्या
अंगावरही घेतलेल्या आहेत. दाणे खारवण्यासाठी मिठाचे पाणी टाकल्यावर फसफसत उठणारी
वाफ, तापल्या वाळूत जोंधळे टाकताच लाह्या फुटतानाची तडतड आजही कानात आहे आणि त्या
धुराने काळवंडलेल्या खोपटात सर्वत्र भरून राहिलेला फुटाण्याचा खमंग दरवळ आजही
नाकात आहे.
शिवाय पाच पावलावर
मंडई. मैदानात करमणूक कमी पडत असेल तर मंडईत भरपूर होती. पहाटे पहाटे भाज्यांचे लिलाव चालायचे.
मग बाजार बसायला सुरुवात व्हायची. भाजीवाल्यांचे दुकान मांडणे, हलवायाचे दुकान मांडणे,
चांभाराचे दुकान मांडणे हे सगळं अगदी शिस्तबद्ध
चालायचे. त्यात एक लय होती, एक क्रम होता, ज्याची त्याची एक एसओपी होती.
काही गाळे होते.
दार उघडताच अगदी दारापर्यंत सामान टिच्चून भरलेले असायचे. मग ही मंडळी ते एकेक करून
बाहेर लटकवायची. मग काउंटर पुढे ओढला जायचा. गाळ्याच्या पायऱ्यांवर सामानाच्या राशी
रचल्या जायच्या. आता कुठे शेठजींना आत जायची जागा व्हायची. इतकं होईपर्यंत घरातलं कोणीतरी
पोरगं शेठजींना सोडवायला म्हणून यायचं. मग शेठजी चहा-नाश्ता करून दुकानात हजर झाले
की गिऱ्हाईक गटवण्याचे पहिले धडे गिरवून पोरगं
शाळेमध्ये.
दिवसभर बाजारात गिऱ्हाईकांप्रमाणेच
इतरही लोकांची गजबज असायची. कडकलक्ष्मी स्वतःच्या
अंगावर आसूड ओढून जायची. बहुरूपी पोलिसाच्या
वेशात दमबाजी करून जायचे. गोंधळी यायचे ते खाणाखुणांनी मनातलं ओळखून दाखवायचे. देवीचा
जग मिरवत वाघ्यामुरळी यायचे. उदपात्र घेऊन फिरणारे फकीर तो धूर मोरपिसाने दुकानात वारायचे.
मैदानातली आणि मंडईतली ही सारी अद्भुत मंडळी कधी कधी घरी यायची. समोरच्या
पिंपळाखाली भाकरी सोडण्यापूर्वी पाणी किंवा कोरड्यास काही मागायची.
घराच्या तीनही
बाजूला असा सतत कोलाहल. करमणुकीसाठी घराबाहेरही पडण्याची गरज नव्हती. तीनही बाजूला
गॅलऱ्या होत्या. घराच्या गॅलरीत जरी उभं राहिलं तरी करमणूकच करमणूक. पण ही सगळी
करमणूक बघता बघता, एके दिवशी, त्या थकलेल्या घराच्या एका गॅलरीनेच अंग टाकलं. अगदीच
शोभा झाली.
कितीही म्हटलं
तरी घर थकलेले होतं हेच खरं. मग नवीन ठिकाणी घर झालं आणि माणसांनी घर सोडताच ते
थकलेले घर चक्क संन्यस्त झालं. त्याची जिजीविषाच संपून गेली. रिकामं, शांत, आतून
बाहेरून पोखरलेलं ते घर, हळूहळू एकएक भिंतही खचत गेली. भीष्मांसारखं जणू ते उत्तरायणाची वाट पहात
होतं. एका उत्तरायणारंभी ते पडलंच. मग उरलेले आम्हीच पाडून टाकले. कौले-पत्रे विकले, राडे-रोडे विकले,
दारं-खिडक्या विकल्या, वासे-तुळया विकल्या, पायाचे दगडही चांगल्या भावाला गेले.
कुठल्याश्या भिंतीत, पायात गुप्तधन सापडेल अशी आशा होती ती फळली नाही. आमच्यासारखे
आमचे पूर्वजही कफल्लकच होते बहुतेक. दारावरच्या
गणेशपट्टीवरचा शारदा-गणेश मात्र मी अजून बाळगून आहे. तेव्हढीच माझी श्रीमंती. ते
सुबक, रेखीव, सर्वांगसुंदर शारदा-गणेश आता शोकेसमध्ये मजेत आहेत. गणेश लोडाला
टेकून आहे. शारदा त्याचे पाय चेपतेच आहे. इतक्या वर्षात तीही थकलेली नाही आणि
यानीही थांब म्हटलेले नाही. त्याच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान अगदी तस्सेच विलसत आहे.
ते आमचा नव्या घरातील संसार पाहून आहे असं मी आपलं समजतो.
किती सुंदर...! पुलंच्या कथकथनात शेवटल्या एक-दोन वाक्यांत कशी हुरहूर किंवा चटका लावणारी भावना असते जी अख्ख्या कथनाला एकीकडे व्यापूनही टाकते आणि तरीही दुसरीकडे एक वेगळीच उंची देखील प्राप्त करून देते, तसं काहीसं वाटलं शेवटी. त्या शारदा - गणेशाचा फोटो पाहावयास मिळेल काय...?
ReplyDelete- डॉ. अनय देशमुख.