Saturday, 3 December 2022

भगीरथाचे पुत्र

 

भगीरथाचे पुत्र  

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

वैद्यकशास्त्रात नेहमी नवीन नवीन शोध लागतच असतात. शस्त्रक्रियेच्या पद्धती बदलतात, अवजारे बदलतात, यंत्र बदलतात, तंत्र बदलतात आणि उपचार अधिकाधिक तंत्रशुद्ध, अधिकाधिक बेतशुद्ध, अधिकाधिक सुरक्षित आणि अधिकाधिक खात्रीशीर बनत जातात. प्रत्येक उपचारात आणि शस्त्रक्रियेमध्ये शतकांनुशतके सुधारणा होतच आहे, पण इतर अनेक क्षेत्रातील प्रगतीप्रमाणेच गेल्या काही दशकातील  प्रगतीचा झपाटा  आश्चर्यमुग्ध करणारा आहे.

बदलत्या शल्यवास्तवाचं आपल्या डोळ्यादेखत घडलेलं उदाहरण म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया. माझी पणजी होती. रोज पार्थिवाची पूजा करायची. मातीची शंकराची पिंड करून पूजा झाल्यानंतर ती विसर्जित केली जायची. आपल्या  अधू डोळ्यांनी ती हे कसंबसं उरकायची. हळूहळू हेही जमेना. ठार आंधळी झाली ती. दिवसरात्र डोळ्यापुढे मिट्ट काळोख. मग एक डॉक्टर घरी बोलावले गेले. त्यांनी ऑपरेशनचं साहित्य घरच्या चुलीवर उकळून मागितलं. पणजीच्या डोक्याशी बसून घरच्या घरीच तो मोतीबिंदू त्यांनी काढून टाकला. तो काढताच पणजीच्या नजरेसमोर जगाचा रंगमंच उजळला. त्यांनी भलंमोठ्ठ  बँडेज बांधलं. डोकं अजिबात हलू नये म्हणून दोन्ही बाजूला वाळूच्या पिशव्या ठेवल्या. चार दिवस पणजी त्याच अवस्थेत.  बँडेज काढल्यानंतर तिला लख्ख दिसायला लागलं. लख्ख म्हणजे १९४७ सालातले लख्ख. सुई-दोरा ओवायला वगैरे नाहीच दिसायचं, चार पाच फुटापर्यंत, हिंडाफिरायला दिसायचं. स्पष्ट दिसायसाठी तो जाड जाड भिंगाचा जड जड चष्मा घालावा लागायचा. डोळ्यातील अपारदर्शक झालेले भिंग काढले होते पण त्याजागी दुसरे बसवण्याचे तंत्र तेंव्हा नव्हते. निर्भिंग नजर ही इतपतच असते. पण तरीही हा विशेष आनंदाचा प्रसंग. कारण यापूर्वी हाच प्रकार दुसऱ्या डोळ्यासाठी करून झाला होता, पण काहीतरी बिनसलं होतं आणि तो डोळा कायमचा गेला.

याउलट आज कोणी ठार आंधळे होण्याची वाट पहात नाही. मोतीबिंदूची सुरवात आहे म्हणताच पेशंट दवाखान्यात जातात. डोळ्यात थेंब टाकले जातात. काही मिलीमीटर छिद्रातून मोतीबिंदू काढून टाकला जातो. त्या जागी कृत्रिम भिंग बसवले जाते आणि स्पामध्ये जाऊन मसाज घेऊन यावं, अशा उल्हसित चित्रवृत्ती घेऊन माणसं घरी परततात. ऑपरेशन म्हणजे अक्षरशः पंधरा-वीस मिनिटांचा खेळ. अत्याधुनिक भिंगारोपणामुळे (Multifocal lens) वाचायला, लॅपटॉप, टीव्ही, सिनेमा, रस्त्यावरची गंमत असं सारं चष्मा न लावता दिसतं. जुने चष्मे अडगळीत जातात. ऐंशी वर्षाची म्हातारी आणि नजर जणू  वय सोळा, असा प्रकार. ऑपरेशन कसलं, नजरबंदीचा खेळच जणू. ही नेत्रदीपक करतूद पाहून असं वाटतं की डॉक्टरनी अजून मन  लावून प्रयत्न केले, तर या माणसाला गुप्तधन सुद्धा दिसेल! 

डोळ्यातील मूळ भिंग हे काचेचे नसतं. ते असतं स्फटिकाचे. हे स्फटिक भिंग एका पारदर्शक पाकिटात ठेवल्यासारखे असते. हे लवचिक भिंग आवश्यकतेनुसार जवळचे पाहण्यासाठी फुगीर आणि लांबचे पाहण्यासाठी पातळ होत असते. याच्या कडा ताणून किंवा सैलावून भिंगाचा आकार बदलण्याची सोय असते. मोतीबिंदू होतो म्हणजे या भिंगातील स्फटिक अपारदर्शक व्हायला लागतात. मोतीबिंदू ‘पूर्ण पिकला’ की बुबुळात मोतिया रंगाचा मणी लांबूनसुद्धा दिसतो. भिंगाचे जे पाकीट असतं ते सहसा अपारदर्शक होत नाही. याच्यातले स्फटिक मात्र अपारदर्शक होतात. पाकिटासकट (वेष्टित) मोतीबिंदू  काढणे किंवा पाकीट जैसे थे ठेवून, फक्त (अवेष्टित) मोतीबिंदू काढणे, हे शस्त्रक्रियेचे दोन प्रकार.

वयानुरूप  किंवा क्वचित इतर कारणांनी भिंग अपारदर्शक व्हायला लागते. याला इलाज नाही, कोणतेही औषध नाही, ही एक नैसर्गिक क्रिया आहे, ती थांबवता येत नाही.  हे भिंग अपारदर्शक व्हायला लागलं की कमी दिसायला लागतं. नजर पुरेशी अधू झाली की ऑपरेशनचा निर्णय घेतला जातो. वर म्हटल्याप्रमाणे, ‘पुरेशी अधू’ म्हणजे किती, याची व्याख्या शतकभरामध्ये बदलत आलेली आहे आणि त्यामुळे ऑपरेशनचं वेळापत्रकही बदलत आलेले आहे.

फार फार पूर्वी मोतीबिंदू बाहेर काढण्याऐवजी आतल्या आत डोळ्यात ढकलला जायचा (कौचींग, Couching). शुश्रुतानेही याचे वर्णन केलेले आहे. श्वेतमंडल (डोळ्याचा पांढरा भाग, Sclera) आणि कृष्णमंडल (बुबुळ, Cornea) यांच्या सीमेवर एक दैवकृत छिद्र असतं, अशी त्याची कल्पना. त्यातून एक शलाका (जाड सुई) आत सरकवून एका धक्क्यासरशी तो मोतीबिंदू आत ढकलला जायचा. भूल नव्हतीच, तेंव्हा हे काम झटपट उरकावं लागायचं. पण अशी कुशल मंडळी होती. पारावर पेशंटच्या पुढ्यात उकिडवं बसून, गप्पा मारता मारता, डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर हा कार्यभाग उरकला जायचा!  नंतर ना चष्मा, ना कृत्रिम भिंग; तेंव्हा या शस्त्रक्रियेचा उपयोग मर्यादितच. पण मुळात आयुष्यमानच जिथे जेमतेम तीस-चाळीस वर्षं होतं तिथे मोतीबिंदू हा क्वचित दिसणारा प्रश्न असणार. पण या प्रकारात यश तसे यथातथाच. दृष्टी अडवणारा हा मणी दूर झाल्यामुळे तात्काळ दिसू लागायचं, पण आत पडलेला मोतीबिंदू बरेचदा तापदायक ठरायचा, त्याची रिएक्शन यायची, निर्जंतुक पद्धत न वापरल्यामुळे सर्रास इन्फेक्शन व्हायचं आणि पुढे काही दिवसात तो डोळा, कायमचा मिटायचा. कायमचे अंधत्व विरुद्ध कामचलावू दिसण्याची शक्यता, असा हा जुगार होता. खेड्यापाड्यात क्वचित आजही असा प्रकार केलेली मंडळी दिसतात.

पण खेड्यापाड्यात कशाला जगातल्या एका मोठ्या देशाच्या, सर्वोच्च हुकुमशहासाठीही कौचींग केले गेले असे इतिहास सांगतो. जीन-पी-शु म्हणजे चिनी भाषेत कौचींग. हे तंत्र भारतातून सिल्क रूट मार्गे चीनमध्ये पोहोचलं. एक प्रकारचे अक्यूपंक्चरच की हे; म्हणून लोकप्रियही झालं. १९११ साली चिनी प्रजासत्ताकाची स्थापना होताच पाश्चात्य वैद्यकीला सरकारी पाठींबा मिळाला. कौचींगचे तंत्र मागे पडलं. वेष्टित मोतीबिंदू काढण्याची पद्धत स्वीकारली गेली. मात्र  माओ झे डोंगचे राज्य येताच (१९४९) चित्र पालटले. माओ हा चीनचा सर्वेसर्वा. सत्तेवर येताच त्यानी  पारंपारिक चिनी वैद्यकीला पाठींबा दिला. अगदी जीन-पी-शु नेही पुन्हा जोर धरला. पुढे दस्तुरखुद्द चेअरमन माओ यांनाच झाला की मोतीबिंदू. माओच्या डोळ्याला हात लावण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. पण सही करायलाही दिसेना. लोकं कागद वाचून दाखवत, पण त्यावर विश्वास कसा ठेवायचा? माओचे आधुनिक पद्धतीने  ऑपरेशन करावे की जीन-पी-शु करावे, हा मोठा गहन प्रश्न. शेवटी बीजिंगमधले मोतीबिंदूवाले भिकारी गोळा केले गेले. निम्मे जीन-पी-शु आणि निम्मे ऑपरेशनने उपचारिले गेले. आश्चर्य म्हणजे चक्क कौचींगचे तंत्र वरचढ असल्याचे ठरले! (किंवा ठरवले गेले) आणि माओचा मोतीबिंदू कौचींगनी आत ढकलण्यात  आला!! चिन्यांच्या मते यातील सर्वात अविश्वसनीय भाग बीजिंगमध्ये भिकारी सापडले हा आहे!!!

 झ्या़क दाव्हिएल्,  या फ्रेंच डॉक्टरने १७४७ साली डोळा उघडून, भिंगाच्या पाकीटाचा शिंपला उघडून, त्यातील मौक्तिक काढून टाकण्याची शस्त्रक्रिया प्रथम केल्याची नोंद आहे. त्याच्या ५०% पेशंटना दिसू लागलं म्हणे. संपूर्ण भिंग आत ढकलून देण्याच्या बेभरवशाच्या आणि धोकादायक पद्धतीपेक्षा ही पद्धत खूपच यशस्वी ठरली. पुढे जवळपास शतकभर ही द्धत वापरात होती.

याच सुमारास तंजावरचे राज्यकर्ते सरफोजीराजे  भोसले (दुसरे), (राज्यकाळ १७९८ ते १८३२),  यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा बारकाईने अभ्यास केला होता.  राजे सरफोजी स्वतः डोळ्याच्या शस्त्रक्रिया करत असत. मोतीबिंदूसाठी शुश्रुताचीच पद्धत (Couching) वापरली जात होती. डोळ्याची सूज उतरावी म्हणून जळवा लावल्याचेही उल्लेख आहेत. विविध नेत्रविकारांच्या ४४ पेशंटच्या नोंदी आणि १८  चित्र तिथल्या सरस्वती महाल ग्रंथालयामधील हस्तलिखितांत  सापडली आहेत.  सहा नोंदी मोडी लिपीमध्ये तर बाकीच्या इंग्रजीत आहेत. त्यांनी तेथे धन्वंतरी महाल नावाने इस्पितळ उघडले होते. आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी पद्धतीचे उपचार तिथे उपलब्ध होते. डॉ. मॅकबीन हा विलायती (इंग्लिश) डॉक्टर तिथे कामाला होता. टी. एस. अमृतलिंगम पिल्लई  हा वैद्यही तिथे होता. 

पुढे एकोणिसाव्या शतकात पाकीट उघडून मोती काढण्याऐवजी, पाकिटासकट सगळेच भिंग काढून घ्यायची पद्धत विकसित झाली. सॅम्युअल शार्क याने १७५३ साली पाकिटासकट भिंग काढून दाखवले. हे भिंग डोळ्याबाहेर ढकलण्यासाठी अनेक तंत्र वापरात होती.  अंगठ्याने दाब देणे, खास चिमट्याने पकडणे, वगैरे वगैरे. पुढे एका छोट्या कांडीचे टोक भिंगाला टेकवलं जाई, या कांडीतून अतीशीत असा नायट्रस ऑक्साइड वायू खेळवलेला असे. या कांडीच्या गार टोकाला तो मोतीबिंदू घट्ट चिकटून बसे आणि मग तो अलगद ओढून बाहेर काढला जाई (क्रायो पद्धत). पुढे फेकोइमल्सीफीकेशनसाठी प्रसिद्ध पावलेले डॉ. चार्ल्स केलमन यांचीच ही युक्ती.

भुलीचे आणि निर्जंतुकीकरणाचे तंत्र सुधारल्यानंतर ही पद्धत अतिशय सोपी, सुरक्षित आणि म्हणून लोकप्रिय ठरली. पण या पद्धतीचे काही तोटे होते. पाकिटासकट (वेष्टित) भिंग काढले जात असल्यामुळे काही गुंतागुंत उद्भवत असे. या पद्धतीचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे ते भिंग काढायला मोठाच्या मोठा छेद घ्यावा लागे. गाडीचे बॉनेट उघडावे तसे बुबुळ ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कापून उघडून धरले जाई. मग ते टाके घालून बंद केले जाई. हे टाके कमी जास्त घट्ट बसत आणि बुबुळ (Cornea) वेडेवाकडे ओढले जाई. कॉर्निया हा खूप महत्त्वाचा अवयव आहे. स्वच्छ, सम-फुगीर, बिन सुरकुतलेला कॉर्निया असेल, तर नजर चांगली राहते.  पण या पद्धतीत ते वेडेवाकडे  ताणले  गेल्यामुळे नजरही कुठे स्वच्छ तर कुठे अंधुक होऊन जाई.

शल्यक्रियेत झालेल्या तांत्रिक प्रगतीमुळे आता पुन्हा एकदा पाकीट जागेवर ठेवून, आतला मोती तेवढा काढण्याची पद्धत वापरली जाते (अवेष्टीत). आता मोत्याएवढा मोठा छेद घ्यावा लागत नाही.  आता तो मोती विरघळवता  येतो. जेमतेम दोन-तीन मिलीमीटरचा छेद घेऊन काम भागतं. छोटा छेद म्हटल्यावर टाके कमी किंवा नाहीतच. त्यामुळे कॉर्निया वेडावाकडा होण्याची शक्यता कमी. त्यामुळे नंतर नजरही स्वच्छ. याला म्हणतात फेको इमल्सीफिकेशन. लाडाचं नाव फेको.  डॉ. चार्ल्स केलमन  यांनी हे तंत्र अमेरिकेत विकसित केले (१९६७). केलमन निव्वळ डॉक्टरकीत रमणारे  नव्हते. गाण्याबजावण्यात त्यांना विलक्षण रस होता. टीव्ही शो, गाणे, ब्रॉडवेवर संगीतीकांची, नृत्य नाटयांची निर्मिती असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांचे. आवाजाच्या दुनियेच्या या दोस्ताला आवाजाचा वापर करून डोळ्यातील मोती, चूर करण्याची युक्ति सुचली. हेच ते फेको इमल्सीफिकेशन. इथे श्रवणातीत (आपल्याला ऐकू येऊ शकत नाहीत अशा) ध्वनिलहरींचा वापर केला जातो.   

ही पद्धत अतिशय नाविन्यपूर्ण आहे. कोणतीही नवीन गोष्ट शिकायला कष्ट, वेळ आणि चुकांची आहुती द्यावी लागते. हे करायला, त्याकाळी बहुसंख्य प्रस्थापित डॉक्टर नाखुष होते. त्यामुळे या तंत्राविरुद्ध लगेच मोठा गदारोळ उठला. ‘फेको को फेको’ अशी व्याख्यानेही होत असत. आपल्याकडेसुद्धा. पण हा झाला इतिहास. या सगळ्या मतमतांतरातून आज हे तंत्र सर्वोत्तम म्हणून सार्वत्रिकरित्या  विद्यमान झाले आहे.

आज डोळ्यात थेंब टाकून डोळ्याची बाहुली मोठी केली जाते. मग डोळ्यात थेंब टाकून  भूल दिली जाते. आता सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहात एक मिलिमीटरचे छिद्र पाडले जाते. त्यातून डोळ्यात जेली भरली जाते. आता डोळा टम्म फुगलेला राहतो. मग 1.8 मीमीचा आणखी एक छेद घेतला जातो. हा छेद मुद्दाम तिरपा-तिरपा घेतल्यामुळे, काम होताच आपोआपच बंद होतो आणि मिटून रहातो. टाके लागत नाहीत. आता मोतीबिंदूच्या पाकिटाला एक गोल खिडकी पाडली जाते. या खिडकीतून फेको इमल्सीफिकेशन करणाऱ्या मशीनची कांडी आत सरकवली जाते. यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींच्या कंपनांमुळे मोतीबिंदूच्या ठिकऱ्याठिकऱ्या  होतात. हे तुकडे या कांडीतील सूक्ष्म छिद्रातूनच शोषून घेतले जातात. पाकिटाच्या त्या निवळशंख मखरात आता कृत्रिम भिंगाची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

कृत्रिम भिंगामुळे ही शस्त्रक्रिया म्हणजे एक समृद्ध अनुभव ठरतो. कृत्रिम भिंगाचा शोध सर हरॉल्ड रिडले  यांचा. दुसऱ्या महायुद्धातील गॉर्डन क्लीव्हर या  वायुसैनिकाच्या डोळ्यात विमानाच्या काचेचे तुकडे घुसलेले होते. ही ‘काच’ काचेची नसून खास प्लास्टिकची होती. सहसा कोणत्याही परक्या वस्तूविरुद्ध आपले शरीर पेटून उठते. लगेच त्या भागात सूज येते. मात्र या तुकड्यांचा काहीही त्रास त्या सैनिकाला जाणवत नव्हता. यावरून अशा प्रकारचे प्लास्टिक (पीएमएमए पॉलीमेथीलमेथाअॅक्रीलेट) वापरून भिंग बनवता येईल अशी कल्पना सुचली. अर्थातच कल्पना आणि ती प्रत्यक्षात आणणे यामध्ये अनंत अडचणी होत्या. भिंग पाकीटासकट (वेष्टित) काढायचे तंत्र तेंव्हा वापरात होते. कृत्रिम भिंग नेमकं कुठे बसवायचं, कसं बसवायचं, ते स्थिर राहील यासाठी काय करायचं, असे अनेक प्रश्न होते. प्रयोग, अनुभव आणि तांत्रिक सुधारणांच्या झपाट्यामुळे अतिशय उपयुक्त सुरक्षित आणि आपले स्थान अढळ  राखणारी भिंगे निर्माण झाली आहेत.

आता भिंगाला अगदी सुरक्षित आणि नैसर्गिक जागा म्हणजे त्याची मूळ जागा; हे लक्षात घेऊन पाकीटात बसतील अशी भिंगे वापरली जातात. त्यामुळे पाकीटाला धक्का न लावता आतला मोतीबिंदू तेवढा काढला जातो. त्या रिकाम्या पाकीटात सध्याची भिंग अंग चोरून आत शिरतात (Foldable lens) आणि आत गेल्यानंतर आपल्या स्थानी विस्तार पावतात. जवळचे आणि लांबचेही दाखवणारी भिंगे, कोर्नियाच्या घडीवर कुरघोडी करणारी भिंगे (Astigmatic correction), अशी अत्याधुनिक भिंगे आता उपलब्ध आहेत. इतकेच काय, पण भिंग नेमकं किती पॉवरचे हवं हे मापून त्यानुसार भिंग वापरले जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने डोळ्यात बसवलेल्या भिंगाची शक्ती आणि क्षमता बाहेरून ऍडजेस्ट करता येईल असेही  तंत्र विकसित होते आहे.

पण कितीही भारी भारी तंत्र विकसित केली तरी जर ती गरजुंपर्यंत पोहोचलीच नाहीत तर उपयोग काय? याबाबतीत आपली कामगिरी पुढारलेल्या देशांना साजेशी आहे. सरकार, भारतीय डॉक्टर आणि अनेक स्वयंसेवी संस्था यांची ही मर्दुमकी. 

आज मदुराईतील अरविंद नेत्रालयाने घालून दिलेली पद्धत जगभर आदर्शवत ठरली आहे. डॉ. गोविंदप्पा वेंकटस्वामी हे त्याचे प्रणेते.  हे मुळात स्त्रीआरोग्यतज्ञ पण संधीवातामुळे त्यांना प्रसूती वगैरेला लागणारे शक्तीचे प्रयोग झेपेनात. मग ते नेत्रविशारद झाले आणि निवृत्तीनंतर त्यांनी अंधत्व निवारणाला वाहून घेतले. योगी अरविंदांच्या नावे त्यांनी अकरा खाटांचा छोटा दवाखाना सुरु केला (१९७६). आज हे संशोधन, शिक्षण आणि सेवा यासाठी जगातले एक मोठे केंद्र आहे. हेन्री फोर्डने जे गाड्यांच्या निर्मितीत केले, ते त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रीयेसाठी केले. चक्क असेम्बली लाईनच्या तत्वावर काम सुरु केले.  गावोगावी शिबिरे, शेकडो पेशंट, शिस्तबद्ध तपासणी, त्यांना केंद्रात घेऊन जाण्यासाठी आणि सोडण्यासाठी वहाने, पाठोपाठ शेकडो शस्त्रक्रिया असा हा उपक्रम. बिले भरणारे आणि फुकट असे दोन्ही प्रकारचे पेशंट; पण सेवेचा दर्जा तोच आणि आदबही तीच. मोतीबिंदूचा कारखाना काढावा अशा प्रमाणात काम, त्यामुळे किंमत कमी. अल्पमोलात   उत्कृष्ट दर्जा हे जणू  त्यांच्या कामाचे लक्षणगीत.

एकूणच डॉ. गोविंदप्पा वेंकटस्वामी यांचे प्रयत्न विलक्षण यशस्वी ठरले. तामिळनाडू/अरविंद  मॉडेल म्हणून जगभर नावाजले गेले.  त्यांच्या आधी डॉ. एम.सी.मोदी यांनी देखील अशा पद्धतीचा ओनामा घालून दिला होता. उत्तम कार्य केले होते. मात्र अरविंद नेत्रालयाचा कारभार अधिक आधुनिक, शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध होता. त्यांच्याही एक पाऊल पुढे जात, हैद्राबादला डॉ. जी.एन. राव यांनी, एल.व्ही.प्रसाद आय हॉस्पिटलमार्फत, निव्वळ मोतीबिंदू नव्हे तर डोळ्यांच्या हरतऱ्हेच्या विकारांवरील उपचार समाजाच्या तळागाळात पोहोचवले.   प्राथमिक तपासणी (व्हिजन सेंटर), संदर्भ सेवा, सातत्यपूर्ण सेवा ही यांची वैशिष्ठ्ये. आता तर सॉफ्टवेअरच्या मदतीने या साऱ्या सेवा एकमेकांशी जोडलेल्या आहेत.

यापासून स्फूर्ती घेऊन भारतभर अशा अनेक सेवा-संस्था उभ्या राहील्या आहेत. सेवा आणि गरजू यांच्यातली दरी हा वैद्यक विश्वात सतत चिंतेचा विषय आहे. म्हणूनच राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम (१९७६) आखला गेला. असा कार्यक्रम राबवणारा भारत हा जगातला पहिला देश. वीस कलमी कार्यक्रमात याचा अंतर्भाव होता. त्याकाळी १.३४% जनता उपचार असूनही अंध होती. आज भारतात उपचार असूनही अंध राहिलेला माणूस क्वचितच आढळतो. (०.३ ते ०.४%).

शल्यतंत्र विकसित करणारे तर महान आहेतच पण भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीवर आणलेली ही गंगा तहानलेल्याच्या मुखी पोहोचवणारेही भगीरथाचे पुत्रच म्हणायला हवेत, नाही का? 



पूर्वप्रसिद्धी 

महा अनुभव 

डिसेंबर २०२२ 

No comments:

Post a Comment