Tuesday 27 December 2022

सर्व पॅथी समभावाचा अविष्कार

सर्व-पॅथी-समभावाचा आविष्कार 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

डॉक्टरांची कमतरता आणि भारतीयांची तोळामासा तबियत, अशा दोन्ही बिमारींवर शर्तीली दवा म्हणून आधुनिक आणि ‘आयुष’ अशी एकत्रित, जहाल मात्रा योजायचे सरकारने ठरवले आहे. नव्या धोरणानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात वगैरे, आधुनिक अधिक ‘आयुष’ अशी संयुक्त उपचार केंद्रे असणार आहेत. पण या बेरजेच्या औषध-कारणाने रुग्णहीत साधणार आहे का?  
इथे पॅथीपॅथीचे डॉक्टर एकाच रुग्णावर संगनमताने उपचार करतील! ह्या असल्या प्रकाराचा काही पूर्वानुभव आहे का? दोन पॅथी उपचाराने दुप्पट फायदा होतो का? असे अभ्यास झाले आहेत का? त्यातून काय साध्य झाले? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. असं केल्यामुळे दोन्हीकडील उत्तम तेवढे आपल्या पदरात पडेल; आपोआपच आपण सुवर्णमध्याला पोहोचू, अशी भावना आहे. पण दरवेळी सुवर्ण हे मध्यावरच असेल असं नाही. ते एका टोकालाही असू शकतं. 
यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. 
‘आयुष’ या निव्वळ पारंपरिक पद्धती नव्हेत, निव्वळ पूरकही नव्हेत तर पर्यायी उपचार पद्धती आहेत. ‘आयुष’वाल्यांचा असा पक्का दावा आहे. पर्यायी पद्धती म्हणजे नुसत्या वेगळ्या नावाची औषध देणाऱ्या पद्धती नव्हेत तर संपूर्ण शरीररचना, कार्य, आजारांची उत्पत्ती, स्थिती आणि लय, उपचार, त्यांचा प्रभाव आणि त्यांची परिणीती याबाबत त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे. निव्वळ कल्प किंवा साबूदाण्यासारख्या गोळ्या किंवा शरबत-ए-आजम म्हणजे ‘आयुष’ नाही. प्रत्येक ‘आयुष’ पद्धती म्हणजे जगण्याकडे बघण्याचा एक सर्वांगीण, परिपूर्ण, दैवी विचार आहे. तेंव्हा त्यांच्या क्षमतांबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मग आता त्यांची सांगड आधुनिक वैद्यकीशी का बरं घालायची आहे? असा असंगाशी संग केल्याने हे सारे तेज निष्प्रभ वगैरे होणार नाही का? खरंतर अशा संगतीने स्व-सामर्थ्याचा गंड कुरवाळला जाईल, एवढेच. अर्थात, कुणी सांगावे, नाठाळ अलॉपॅथीला वठणीवर आणायचा अंतस्थ हेतु असू शकेल.  
पण अलॉपॅथीला दूषणे देतच यातील बहुतेकांचा व्यावसायिक डोलारा उभा आहे. अलॉपॅथीमुळे जगणे नरकासमान झाले असल्याचे सांगणाऱ्या जाहिरातीही एका औषधकंपनीनी दिल्या होत्या. कंपनीचे जाऊ द्या, अलॉपॅथीशी सलगी करणाऱ्या होमिओ डॉक्टरास ‘कुलुंगी कुत्रा’ (Mongreal) म्हणावे अशी अधिकृत शिफारस आहे. होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमातील मूळ ग्रंथात आहे. मग आता संयुक्त दवाखान्यात कोणी, कुणाला, काय म्हणावे बरे? 
शिवाय ‘आयुष’मध्येच भेदाभेद आहेत. ‘आयुष’ म्हणजे आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी; अशी, आधुनिक वैद्यकी वगळता ‘इतर सर्वांची’ वळलेली मोळी आहे. मायजम्स, व्हायटल फोर्स, डायनामायझेशन वगैरे होमिओपॅथीची खासियत आहे; अल् अनसीर, अल् अखलात, अल् मिजाज वगैरे सप्तघटक युनानीची मिरास आहे; दोष, प्राण, धातू वगैरे आयुर्वेदाच्या संहितांत सांगितले आहे. पण या संकल्पनांच्या व्याख्या आणि व्याप्ती अस्पष्ट आहे. एका पॅथीचा मेळ दुसरीशी नाही. एवढेच नाही तर, काहींना जंतूशास्त्र अमान्य आहे, काहींना पुनर्जन्म मान्य आहे, काहींना प्राचीनत्व हाच पुरेसा पुरावा वाटतो तर काहींच्या प्रवर्तकाला साक्षात देवाचा मान आहे. हे सगळं खरं का खोटं?, रास्त का गैर?, वैज्ञानिक का छद्मवैज्ञानिक?; हे मुद्देच नाहीत. जे आहे ते जनतेच्या तंदुरुस्तीसाठी दुरुस्त आहे, हे गृहीत आहे. 
या विभिन्न दृष्टीकोनांचा मेळ अलॉपॅथीशी कसा घालणार? कोणत्याही बड्या इस्पितळात अनेक डॉक्टर एकाच पेशंटची तपासणी करतात. पण हे सारे त्या देहाच्या चलनवलनाबाबत समान समजूत बाळगून असतात. त्यांच्या चिकित्सेमध्ये अर्थातच एक सुसूत्रता असते. त्याचं काय? उदा: कविळीकडे पहाण्याचा प्रत्येक पॅथीचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. युनानी पद्धतीनुसार कावीळ खिलत-ए-सफरा किंवा सौदाच्या प्रादुर्भावाने होते तर आधुनिक वैद्यकीनुसार रक्त-दोष, लिव्हर-दोष अशी कारणे असू शकतात. संयुक्त-क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णाच्या तपासण्या कोण, का आणि कोणत्या प्रकारच्या करणार? दोन तज्ञांचे मतभेद झाले तर काय? यात पेशंटच्या मताला किंमत किती? कोणाचे औषध द्यायचे हे कसे ठरवणार? 
शेवटी कोणतं औषध घ्यायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या व्यक्ती-स्वातंत्र्यात आम्ही ढवळाढवळ केलेली नाही. आम्ही पर्याय उपलब्ध करून देतो आहोत, असा युक्तिवाद सरकार करू शकेल. 
पण आम्ही ‘आयुष’-ज्ञान मंडित असलो तरी येनकेन प्रकारेन आम्हाला आधुनिक औषधे वापरण्याची मुभा द्यावी अशी ‘आयुष’ संघटनांची उरफाटी पण रितसर मागणी आहे. विद्यमान सरकारने ही मागणी मान्य करण्याचा चंग बांधला आहे. याला प्रामाण्य पुरवण्यासाठी की काय, आता ‘आयुष’ अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्त्र आणि एमबीबीएस अभ्यासक्रमात ‘आयुष’ घुसवले गेले आहे. नीम हकीम तयार करणाऱ्या या निर्णयापाठोपाठ ही संयुक्त दवाखाने काढण्याची मखलाशी करण्यात येत आहे. सर्व-पॅथी-समभावाचा हा लोकशाही आविष्कार आहे. 
बॉलीवूड मसालापटात प्रत्येक धर्माचं एकेक पात्र असावं, तसं हे आहे. तितकेच बेगडी, तितकेच दिखाऊ आणि तितकेच प्रभावहीन.    

प्रथम प्रसिद्धी
दैनिक लोकमत
28 डिसेंबर 2022

No comments:

Post a Comment