Monday, 12 December 2022

'पतंजली'ची जाहिरात आणि 'आम्ही भारताचे लोक'

‘पतंजली’ची जाहिरात आणि आम्ही भारताचे लोक  
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई  

   
रविवारची भली सकाळ. उठलो. चहा सोबत पेपर हातात घेतला आणि सकलज्ञाता, विविधौषधीशिरोमणि, भारतारोग्यत्राता म्हणवणाऱ्या कोणा  जटाधराने दिलेली, ‘अॅलोपॅथीद्वारे पसरवण्यात आलेले असत्य’ अशा मथळ्याची  अर्धे पान  जाहिरात वाचली! झीटच आली. मग सतत फोन वाजायला लागला. आमच्या फार्मकॉलॉजीच्या सरांना हृदयविकाराचा  झटका  आला होता, मेडिसीनचे सर बसल्या जागी आधी अस्वस्थ आणि नंतर अत्यवस्थ झाले होते आणि माझ्या एका परिचित वैद्यांना समोरील धन्वंतरीच्या हातातील अमृतकुंभ उपडा झाल्याचे भास होत होते!
कारण एकच. ‘ती’ जाहिरात. ही जाहिरात हे एक मासलेवाईक उदाहरण फक्त. वास्तविक असा प्रचार सतत चालू असतो. जाहिरातीतील शब्दातून जे सांगण्यात आले आहे ते तर विखारी आहेच पण जे सुचवण्यात आले आहे ते तर अत्यंत विषारी आहे.  
आयुर्वेदात तथ्य किती यावर स्वतंत्र चर्चा व्हायला हवी. पण इथे तो मुद्दाच नाही. फक्त बाबांच्या उच्चार स्वातंत्र्याचा आदर राखत काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत.  
संपूर्ण फार्मा आणि मेडिकल इंडस्ट्री खोटा प्रचार करते आहे असं बाबांचं म्हणणं आहे आणि ही जाहिरात एका फार्मा कंपनीचीच आहे!!! ह्या दोन्हीचा मेळ  कसा घालायचा? जाहिरातीत भलावण केलेली सारी औषधे ‘वैज्ञानिक पुराव्याने’ सिद्ध आहेत म्हणे. म्हणजे कमाल आहे. प्रस्थापित वैज्ञानिक संशोधनाची चार कॉलमी उणीदुणी काढल्यावर पुन्हा विज्ञानाच्याच आणाभाका?   ‘आमचे विज्ञान’ विरुद्ध ‘तुमचे विज्ञान’ असा हा सामना दिसतो. द्वेष, दुफळी, भेद हे आता इथेही शिरलेले दिसतात.

आधुनिक औषधांनी लोकांचे जीवन नरकासमान बनवले आहे असा सलामीचा दावा आहे.  आपले जीवन पूर्वीपेक्षा खरोखरच नरकासमान झाले आहे का? आरोग्यसेवांची आणि लसी, पाणी, संडास वगैरेची उपलब्धता, सरासरी आयुर्मान, माता मृत्यू, अर्भक मृत्यू, पर्यावरण असे आरोग्यमान वर्तवणारे सुमारे दोन डझन निकष आहेत. या साऱ्या निकषांवर आपण प्रगतीच केलेली दिसते. ती पुरेशी नाही, संथ आहे वगैरे आक्षेप असू शकतील पण आपण नरकात पोहोचलो आहोत हा दावा जरा अतिच होतोय, आणि त्यामुळे हसूही  येतंय.
लोकांना नेहमीच तुम्ही किती रंजलेले, गांजलेले, गरीब बिच्चारे, असा सूर आवडतो. गुरूंनी ही गोष्ट नेमकी हेरली आहे. म्हणूनच त्यांनी, तुमचे जीवन नरकासमान इथून  सुरूवात  केली आहे. म्हणजे आपोआपच हे तारणहार.  ज्योतिषी जसे, ‘तू दिलाचा  चांगला पण दुनिया वाईट बघ..’ अशी सुरवात करून गिऱ्हाइक खिशात घालतात तद्वतच हे.  
पुढे अॅलोपॅथी सरसकट खलनायक असून आपली औषधे निर्धोक असल्याचे म्हटले आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की आयुर्वेदिक औषधे बाजारात येण्यापूर्वी सुरक्षा, परिणामकारकता वगैरे कोणत्याही चाचण्या आवश्यक नसतात! केवळ पारंपारिक वापर हा इष्ट पुरावा मानला जातो.  म्हणजे ही एक आंधळी कोशिंबीरच आहे. अशा परिस्थितीत तर असे बेधडक दावे करणे अधिकच धोक्याचे आहे.  
पण अॅलोपॅथी आणि साइडइफेक्ट हे शब्द  आता शाहू-फुले-आंबेडकर यांच्याइतके जोडशब्द म्हणून रूढ करण्यात अन्य पॅथीय यशस्वी झाले आहेत. प्रत्येक औषधाला, मग त्याच्या भाळी कोणत्याही पॅथीचा टिळा लावला तरी, काही ना काही सहरिणाम असतातच. सगळेच सहपरिणाम दुष्ट नसतात.  (काही सुष्टही असतात.) प्रामाणिकपणे त्याची नोंद करणे, कारणे शोधणे आणि त्यावर उतारे शोधणे हे अॅलोपॅथीत सतत चालू असतं. औषध बाजारात येण्यापूर्वी आणि  नंतरही निरंतरपणे असा पहारा राखला जातो. म्हणूनच काही वेळा, दुष्परिणाम लक्षात येताच, औषधे माघारी घेतली जातात (रीकॉल).  असा प्रकार अन्य पॅथीमध्ये घडत नाही कारण अशी व्यवस्थाच नाही. हे चांगले का वाईट?  दुष्परिणाम नाहीत असं
सांगितलं जातं त्या मागील सत्य हे की ते तपासलेलेच नाहीत. त्यांची नोंद ठेवायची काहीही व्यवस्थाच  नाही. म्हणूनच परिणामकारकता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत आधुनिक औषधे कित्येक पायऱ्या वरचढ आहेत.  
जाहिरातीतील, ‘…टाईप वन डायबेटीजच्या रुग्णांना नॉन डायबेटीक केले आहे.’; ‘बीपी आणि बीपी कॉम्प्लिकेशन्सच्या समस्यांना संपूर्णपणे बरे केले आहे.’ वगैरे विधाने वाचून माझ्या गुरुवर्यांनी अंथरूण धरले. असले बेफाट दावे किती जबाबदारीने आणि किती अफाट पुराव्यानिशी करावे लागतील याची त्यांना पूर्ण जाणीव असल्याचा हा परिणाम. या सदृश दावे कोणी आधुनिक वैद्यक करूच धजणार नाही आणि केलेच तर त्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अॅक्टचा बडगा आहेच.  हा बडगा खरेतर या महाशयांनाही आहेच.  पण पुरेसे घी असेल तर बडग्याची तमा कोण बाळगतो?  
पण या मावेच्या मइंदाची सगळ्यात मोठी फत्ते म्हणजे  विज्ञाननिष्ठ उपचारांबाबत त्यांनी पेरलेला संशयकल्लोळ. इयागोलाही लाजवेल अशा सफाईने हे काम साधले आहे.  असल्या जाहिरातींना भुलून लोकं स्वतःच्या जीवरक्षक उपचारांकडे संशयाने पाहायला लागतात.  काही उपचार सोडून देतात आणि होतील त्या परिणामांना कवटाळतात. भयगंडाने पछाडलेले असे अनेक रोगी अनुभवास येतात. विज्ञाननिष्ठ, योग्य, प्रभावी, सुरक्षित उपचारपासून ते स्वतःला वंचित ठेवतात किंवा असे उपचार घेण्यास उशीर करतात. जणू पाणी असूनही तहानेने मरण पत्करतात! ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’चा हा साईड इफेक्टच नव्हे का?   याला जबाबदार कोण?    
असाध्य आणि प्राणघातक आजार बरे करतो, असाही दावा आहे. अगदी याच शब्दात आहे.  अशा आजारांच्या यादीत हार्ट ब्लॉकेज नावाचाही आजार आहे. ‘हार्ट ब्लॉकेज’ असा कोणता आजारच नाही. हा सामान्य भाषेतला ओबडधोबड शब्द आहे. यात अनेक आजार बसू शकतात, कोरोनरी व्हेसलमध्ये अडथळा, हृदयात रक्ताची गुठळी, हृदयाच्या स्पंदन-तंत्रामध्ये दोष असे अनेक. म्हणजे तज्ञांनी नेमके समजायचे काय? उत्तर असे की हे तज्ञांसाठी नसून अज्ञांसाठीच
आहे. संभाव्य गिऱ्हाइकांसाठी आहे. ज्याने त्याने आपल्या सोयीने अर्थ काढायचा आहे.  
भोंगळ भाषा हे इथले ब्रह्मास्त्र आहे. विरोधकांना नामोहरम करण्याची ही खाशी युक्ति आहे. सुसंबद्ध बोलण्याचा काही प्रतिवाद शक्य आहे. असंबद्ध बरळणे असेल तर वाद कसा घालणार? शिवाय इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या आजारांबद्दल इतके बेधडक दावे केले आहेत की वाचून मती गुंग होऊन जाते. प्रतिवादाला सुरवात कोठून करावी असा प्रश्न पडतो.  
आजारांचे वर्गीकरण साध्य आणि असाध्य अशा दोनच पक्षात करणे हा आणखी एक बुद्धीभ्रम. काही आजार साध्य असतात काही प्राणघातक असतात पण बरेचसे अधलेमधले असतात. डायबेटीस, ब्लड प्रेशर, गुडघ्याची झीज  हे यातले सर्वपरिचित. ह्यांना क्रोनिक मॅनेजेबल डिसीज म्हणतात.  
पण बाबांना असाध्य या शब्दाचा मोठा मजेदार अर्थ अभिप्रेत आहे. जे आजार औषधाच्या एका फटक्यात वठणीवर येत नाहीत ते सारे असाध्य.  औषधे घेत राहायला लागणे  हा अॅलोपॅथीचा मोठाच दुर्गुण आहे म्हणे.  हे अजबच आहे. तिसाव्या वर्षी डायबेटीस झालेला माणूस पूर्वी दहाच वर्षे जगत असे. आज तो सत्तरीपर्यंत सुखात जगतो. औषध घेत आणि जगण्याचा मनमुराद  आनंद घेत जगतो. समजा सत्तरीत त्याच्या किडन्या गारद झाल्या आणि हा मेला! मग आता चाळीशीतच निकामी होणारी किडनी जर औषधमात्रेमान सत्तरीपर्यंत तग धरत असेल तर हे यश म्हणायचे का अपयश? अहो किडनीच ती. जन्माला आली म्हणजे ती कधी ना कधी तरी मरणारच. पण आजचे मरण उद्यावर ढकलता आले हे काय कमी आहे? शेवटी आजचे मरण उद्यावर ढकलणे आणि तोवरचे जीवन सुसह्य करणे, हेच तर वैद्यकीचे ध्येय आहे. मग हे आजारपण साध्य होण्यासाठी किडनीला अमृत पाजणे अपेक्षित आहे काय? आणि असली रामबाण  गुटी  बाबाच्या बटव्यात तरी आहे काय?  
हा लांबवलेला पल्ला व्यर्थ म्हणायचा का? याला ‘ड्रग्जने जीवन नरकसमान होणे’, ‘लो इमयुनिटी होणे’, ‘आजार समूळ न जाणे’, ‘कायमस्वरूपी
उपाय नसणे’ असं शेलक्या शब्दात हिणवायचं का?  आणि हे सगळे आपल्याकडे आहे हा बाबाचा दावा खरा  म्हणायचा की निव्वळ पोकळ वल्गना?  
अशा प्रचारामुळे आयुर्वेदाचे तरी भले होते काय? तर नाही. बहुसंख्य वैद्य या साऱ्या प्रकारावर नाखुषच आहेत. प्रचार आणि प्रसार होतो तो औषध कंपनीचा.  काही शक्यता उरी बाळगून असलेल्या प्राचीन औषध परंपरेचे फक्त हंसे आणि थिल्लरीकरण होते.  
असे भडक, आक्रमक आणि छातीठोक दावे, त्यावर कफनीचे कवच आणि रुद्राक्षाची कुंडले! मग पॅथीचा पंथ बनतो. रुग्णाईत भक्त होतात. धन्वंतरींच्या हाती आता जलौका आणि अमृतकुंभ नव्हे तर त्रिशूळ आणि हलाहल दिसायला लागते. अफूची गोळी हीच ज्यांचा धर्म आहे अशांनी धर्माची अफूगोळी  व्यवसायात घोळली की चढणारी नशा औरच. अशा नशेत विज्ञान आणि विवेकाचा बळी जाणार हे ठरलेले. हे वेळीच रोखायला  हवे.  तरच ‘आम्ही भारताचे लोक’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खरे पाइक ठरू.  


पूर्वप्रसिद्धी 
लोकसत्ता
13.12.2022

4 comments:

  1. Ravi Sahasrabudhe, Thane24 November 2023 at 20:04

    उत्तम मुद्देसूद लेख. अगोदर वाचलेला पुन्हा वाचला. त्यातही बौद्धिक आनंद मिळतो. वाटलं होत प्रतिक्रियांचा पाऊस पडेल, म्हणून मी प्रतिक्रिया दिली नव्हती. पण इथे एकही प्रतिक्रिया दिसली नाही व आश्चर्य व खेद वाटला.

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम आणि सडेतोड लेख. आजच पहिल्यांदा वाचला.

    ReplyDelete
  3. 100% पटले , आजकाल असे निर्भीडपणे मांडणे देखील अवघड झाले आहे

    ReplyDelete
  4. उत्तम लेख

    ReplyDelete