Saturday 21 November 2015

जेम्स थर्बरची भन्नाट व्यंगचित्रे; या विषयावरील सातारा आकाशवाणीवर प्रसारित माझे भाषण.

जेम्स थर्बरची भन्नाट व्यंगचित्रे


व्यंगचित्र हा सगळ्यांनाच भावणारा प्रकार. वसंत सरवटे, ज्ञानेश सोनार, खलील खान, आर.के. लक्ष्मण वगैरेंची व्यंगचित्रे प्रसिद्ध आहेतच. पण व्यंगचित्र दरवेळी काही न्यूनच अधोरेखित करतं असं नाही.  कित्येकदा मानवी स्वभावाचे अर्क दोन चार फटकाऱ्यात आपल्यापुढे सहज उभे ठाकतात. आपल्याला अशी चित्र हसवतात पण अंतर्मुखही करतात. अशी अंतर्मुख करणारी चित्र रेखाटणारा, मानवी मनाचे खेळ चित्रात नेमके पकडणारा, जेम्स थर्बर हा अमेरिकी व्यंगचित्रकार प्रख्यात आहे. पण हा निव्वळ चित्रकार नव्हता, निव्वळ व्यंगचित्रकार तर नव्हताच नव्हता. तो उत्तम लेखक होता, पत्रकार होता, कथाकार होता. तुम्हाला ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ही सीरिअल आठवते? ज्या मूळ गोष्टीवर ती बेतलेली होती ती जेम्स थर्बरची, ‘द सीक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिटी’, ही. बायकोच्या आणि जगाच्या अपेक्षांनी कावलेला वॉल्टर मिटी हा या कथेचा नायक. जागेपणीच हा स्वप्नरंजनात मश्गुल होतो आणि थर्बर वाचकांनाही स्वप्न आणि आभासाच्या सीमारेषेवरून हिंडवून आणतो. बारीक सारीक प्रसंग, घटना, व्यक्तींवरील त्याच्या इरसाल टिपण्ण्या आजही दाद घेऊन जातात. आता हेच पहा नं, तो म्हणतो ‘मला स्त्री जातीचा राग आहे, कारण प्रत्येक गोष्ट नेमकी कुठे ठेवली आहे हे त्यांना नेहमीच माहीत असतं.’

‘कार्टून्स बाय जेम्स थर्बर इमेजेस’ असं नुसतं गुगललं की त्याची भन्नाट कार्टून्स आणि त्यांच्या लिंक्स समोर हाजीर होतील. ‘होम’, हे त्याचं असंच एक गाजलेलं चित्र आहे. चित्राची चौकट भरून राहिलेलं एक बंगलेवजा घर  आपल्याला दिसतं. त्या घरावर छत्रछाया धरणारं प्रचंड झाड आहे, समोर व्हरांडा आहे, पण त्या घराच्या मागच्या बाजूनं ते घर एका प्रचंड मोठया स्त्रीनं आपल्या कवेत घेतलं आहे. ती बाई वाकून समोर अंगणात पहाते आहे. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास, राग, वैताग, त्रागा वगैरे भावना जेमतेम दोनचार रेषात जिवंत झाल्या आहेत ...आणि अंगणातल्या कोपऱ्यात नीट पाहिल्यावर आपल्याला दिसतोय तो इवलासा, दबकत पावलं टाकत येणारा, जरा वेंधळा, घाबरलेला एक माणूस. कोण असतील हे दोघं? आपल्या रागीट स्वभावामुळे उभ्या घरादाराला आपलाच स्वभाव बहाल केलेली ही घरमालकीण तर नाही? ...आणि नको ते घरी परत जाणं आणि पुन्हा तिच्या तावडीत सापडणं, असा विचार करणारा हा मालक दिसतोय. त्या प्रचंड घरापुढे आणि घर व्यापून दशांगुळे उरलेल्या त्या बाईपुढे हा माणूस फारच थोटका दिसतो. पण त्याच्या खुज्या रेखाटनातच त्याच्या मनीच्या भावनांचा अर्क उतरला आहे हे नक्की.

थर्बरचं असंच एक गाजलेलं चित्र. इथे पती-पत्नी अपरात्री अंथरुणात उठून बसलेले दिसतात. पतिराज झोपेत असावेत कारण त्यांचे डोळे मिटलेले आहेत आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत आणि प्रसन्न भाव आहेत. स्वप्नातच त्यांनी आपल्या हाताचं पिस्तूल करून बायकोवर रोखून धरलंय. बायको मात्र या हल्यानं घाबरलेली आहे , दचकलेली आहे. विस्फारित नेत्रांनी ती नवऱ्याचं हे रूप पहाते आहे. कोणता नवरा खरा? स्वप्नात पत्नीवर पिस्तूल रोखून आनंदी दिसणारा खरा, का जागेपणी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा खरा? मानवी मनाचं खरं रूप ओळखायचं कसं? जागेपणी माणूस कसा मर्यादा सांभाळून रहातो. मग झोपेत संयमाच्या सगळ्या शृंखला गळून पडल्यावर दिसणारं नवऱ्याचं रूप हेच सत्य समजायचं का? चित्रातल्या बायको पेक्षा चित्राच्या प्रेक्षकांच्या मनात थर्बर जास्त प्रश्न निर्माण करतो.

आणखी एक चित्र तर भन्नाटच आहे. एक पार्टी ऐन रंगात आलेली दाखवली आहे. माणसांचे घोळके आहेत, प्रत्येक जण काहीतरी बोलतो आहे. पण एकूणच संभाषणाचं स्वरूप पार्टीत असतं तसंच आहे. मुख्यत्वे गॉसिप चालू आहे. अनुपस्थित व्यक्तींच्या उखाळ्यापाखाळ्या, भानगडींचं चर्वितचर्वण वगैरे वगैरे. अशा गर्दीत एकच सुटाबुटातले विद्वान दिसणारे गृहस्थ एका कोचात नुसतेच कोपऱ्यात बघत बसले आहेत. शेजारच्या कोचावरच्या  दोन उच्चभ्रु स्त्रिया एकमेकींच्या कानात कुजबुजताहेत, ‘ह्यांना खरं तेवढंच माहित असतं बाई!’ (He doesn’t know anything except facts.) म्हणजे उणीदुणी काढण्यात, कुचाळक्या करण्यात रस नसणं, गप्पातही वस्तुनिष्ठ मतं आणि माहिती मांडणं वगैरे त्या गृहस्थाचे अवगुण ठरतात. तो भरल्या पार्टीत एकटा पडतो आणि वाचाळ मंडळी मात्र एकमेकांच्या सहवासाचा आणि गप्पांचा मुक्त आनंद लुटताना  दिसतात. म्हणजे गावगप्पा टाळणं योग्य, की एखाद्या रंगीत संध्याकाळी, गावगप्पांच्या  साथीनं, गाव आणि गप्पा दोन्हीही एन्जॉय करणं चांगलं? थर्बरनं हा निर्णय आपल्यावरंच सोडलेला आहे.


श्रेष्ठ साहित्य आणि श्रेष्ठ चित्रसुद्धा दरवेळी नवा आणि वेगळा अनुभव देतं. प्रश्नांची तयार उत्तर देण्यापेक्षा उकल करण्याची वेगळी दृष्टी देऊन जातं. हे थर्बरच्या अर्कचित्रांना तंतोतंत लागू आहे. खरंतर व्यंगचित्रांबद्दल मी शब्दात काय वर्णन करणार कप्पाळ. तुमची उत्सुकता चाळवणं एवढाच माझा हेतू. ही चित्रं तुम्हाला तुमच्या सुप्त भावभावनांचं दर्शन घडवतील. जेम्स थर्बरच्याच शब्दात सांगायचं तर, ‘टवाळी उपरोध वगैरे प्रकार इतरांची, जगाची चेष्टा करतात. पण खरा विनोदवीर मात्र स्वतःकडे पाहून हसतो, लोकांना हसवतो आणि या भानगडीत लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे आपोआप गळून पडतात. हे आत्मदर्शन विलक्षण असतं हेच खरं.’

शेल्फारी डॉट कॉम या साईटबद्दल सातारा आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं माझं भाषण.


शेल्फारी डॉट कॉम

भेळेचा कागदही वाचल्याशिवाय न टाकणाऱ्या माझ्यासारख्या पुस्तकातल्या  किड्याला सातत्यानं खाद्य पुरवणारी साईट म्हणजे शेल्फारी डॉट कॉम. पण भेळेचा कागदही टाकाऊ नसतो हे खरच आहे. एकदा अशाच एका कागदावर ‘लिंग बदला’ या प्रश्नाच्या उत्तरात, ‘नर’चं लिंग ‘वानर’ असं बदललेलं होतं. त्या भेळेपेक्षा हा विनोद चटकदार होता.
शेल्फारीवर तुम्ही गेलात की एक बुकाचं शेल्फच तुमच्या नावानं टाकलं जातं.
आपण वाचलेली पुस्तक या शेल्फात आपणच हारीनं लावायची, आवड नावड कळवायची. आवडलेली पुस्तकं का आवडली आणि नावडलेली का आवडली नाहीत याची चर्चाही आपण करू शकतो. या चर्चेत अन्य समानधर्मा मंडळी बसल्या कॉम्प्यूटरवरून सहभागी होऊ शकतात. भारतीयांच्या संदर्भात बोलायचं तर सध्या चेतन भगत हा इथला ई-सम्राट  आहे. शिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम याचं ‘अग्निपंख’ ही नेटकरांच्या मनात सातत्यानं आहेच. ‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’ अशा आवेशात बलशाली, समृद्ध आणि महासत्ता भारत असं स्वप्न पेरणाऱ्या कलामांना सलाम करणारी अनेक पत्रं आपण इथे वाचू शकतो. या पत्रातला मजकूर किंवा अन्य काही भावलं तर ते मित्राला ई-मेल करायची किंवा डाउनलोड करायचीही इथे सोय आहे. पुस्तकाचं व्यसन असणाऱ्या अन्य मित्रांनाही आपण या साईटवर आमंत्रित करू शकतो. शेल्फारीचं साप्ताहिक माहिती पत्रकही  आपल्या ई-टपालात येऊन पडायची सोय आहे. आपल्या वाचण्यातल्या किंवा आवडत्या पुस्तकांबद्दल अन्य शेल्फारीकरांनी काही अभिप्राय पोस्ट केला की त्याची सूचनाही आपल्याला ताबडतोब मिळते. मुख्य म्हणजे हे सारे अभिप्राय वगैरे प्रायः सामान्य भाषेत असतात. क्लिष्ट, गुंतागुंतीची, शब्दबंबाळ भाषा; समीक्षा, सौंदर्यशास्त्र वगैरेतल्या विद्वतजड संज्ञा वगैरे प्रकार नाही. सामान्य वाचकांनी सामान्य वाचकांसाठी चालवलेली ही साईट आहे. इंग्रजी साहित्य हे अभ्यास म्हणून नाही तर ध्यास म्हणून वाचणाऱ्यांसाठी ही साईट म्हणजे, पुलंच्या काकाजींच्या भाषेत ‘मोठा मझा आहे’; आणि पी.जी. वूडहाउसच्या भाषेत सांगायचं तर ‘it gives a song on your lips and a spring in your stride! एखाद्या लेखकाचं किंवा पुस्तकाचं नाव अर्धवट आठवत असेल तर तेवढ्याही सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया या साईटवर साधली आहे. आपण जॅकल असा शब्द दिला की शीर्षकात जॅकल असलेल्या पुस्तकांची आणि संबंधित लेखकांची यादीच आपल्यासमोर झळकते. ही एक मोठीच सोय आहे. विशेषतः प्रा. विसरभोळे लोकांसाठी. आवडलेलं पुस्तक इथल्या ‘ई’कानातून ‘ई’कत घ्यायचीही सोय आहे. इकानावरून आठवलं पु. भा. भावे दुकान ऐवजी विकान हा शब्द वापरत म्हणे. दुकान या शब्दाची व्युत्पत्ती मराठीशी नातं सांगणारी नाही म्हणून हा बदल. पण आता इंटरनेटच्या ई-बाजारात दुकानही गेलं, विकानही गेलं, हाती उरलं ईकान!

या साईटचा पत्ता मला माझ्या हॉन्कॉन्ग मधल्या मित्रानं दिला, त्याला त्याच्या मेलबोर्नच्या मित्रानी ह्या साईटची शिफारस केली होती आणि या मेलबोर्नकराला आमच्या शेजारच्या वाईकर  प्राध्यापकांनी आमंत्रित केलं होतं. जग जवळ आलं म्हणतात ते हे असं. तुम्हीही या साईटवर जाऊ शकता. कुणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. जा आणि पुस्तकांच्या आणि पुस्तक प्रेमींच्या गर्दीत हरवून आणि हरखून जा.

Saturday 14 November 2015

आल्या बहु , झाल्या बहु, परंतू...

आल्या बहु , झाल्या बहु, परंतू...
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई. सातारा. पिन ४१२ ८०३
मो.क्र. ९८२२० १०३४९


आल्या बहु , झाल्या बहु परंतू या सम हीच!
हजारो बायका आल्या, प्रसूत झाल्या, प्रसूत होऊन गेल्या पण प्रसूची प्रसूती अविस्मरणीय. तीचं नाव प्रसोन्नचित्ता. होती खरीच नावासारखी. दिसायला प्रसन्न, वाणीही प्रसन्न, काळीसावळी, कमलनयनी, आत्मविश्वासाने वावरणारी, उच्चशिक्षित, एका उच्चभ्रू स्वयंसेवी संस्थेत काम करणारी, खेड्यात, आपल्या डॅनिश नवऱ्यासोबत.
आली तीच मुळी अस्खलित इंग्लिश बोलत... आणि बोलता बोलता माझी बोलतीच बंद केली तिनी. तिच्या इतके प्रश्न मला माझ्या एम्.डी.च्या परिक्षकांनीही विचारले नव्हते. प्रत्येक वेळी एक हातभर यादीच असायची प्रश्नांची तिच्याकडे. एका हातात यादी आणि दुसऱ्या हातात नवरा, अशीच यायची ती. दुसरा हात नवऱ्याच्या हातात अशी नाही; दुसऱ्या हातात नवरा अश्शीच यायची ती. तिला स्वतःच्या स्त्रीत्वाचा भलताच अभिमान होता. असं माझं सुरवातीचं मत होतं. मग ते बदललं; तिला स्त्रीत्वाचा अभिमान होता असं म्हणण्यापेक्षा स्त्रीत्वाचं भान होतं असं म्हणेन मी.
सलामीलाच तिनी मला धोबीपछाड टाकला. तिची आणि  तिच्या गरोदरपणाची  माहिती घेऊन झाल्यावर ती म्हणते कशी, ‘मी पुन्हा तुमच्याचकडे दाखवीन असं नाही हां डॉक्टर; तुम्ही मला थरो आणि प्रोफेशनल वाटलात तरंच मी येईन!’
म्हणजे मी तिला तपासण्याआधी तीच मला तपासत होती. थोडा अचंबा, थोडा राग गिळत मी तिला तपासलं. तिच्या परीक्षेला मी उतरलो होतो असं वाटलं. ‘डॉक्टरांना माझ्या शरीराबद्दल आदर असावा असं मला वाटतं, तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून तपासण्यातून ते मला जाणवलं. थँक यु डॉक्टर.’ मी जरा चक्रावलो. नेहमीपेक्षा वेगळं मी काहीच केलं नव्हतं. मी म्हणालो, ‘पण एका बाईनं, प्रसूतीसाठी एका पुरुष डॉक्टरची निवड करणं, जरा अवघडंच निर्णय असतो.’ एवढं बोलून मी माझा नेहमीचा विनोद केला, ‘बायकांची योग्य काळजी कशी घ्यायची हे पुरुषांनाच चांगलं कळणार, नाही का?’ ती हसली. पण वरवरचं. ‘तसं नाही हो डॉक्टर, बाई-पुरुष वगैरे काही नाही. पण मी आधी मुंबईला डॉ. रिबेका क्लर्कना दाखवायला गेले. त्यांनी पोट तपासायला म्हणून खर्रकन् माझा ड्रेस वर केला, मला विचारलं नाही, सांगितलं नाही!! मला खूप अपमानित वाटलं. खूप लाज वाटली. पुन्हा मी गेलेच नाही.’ हे जरा वेगळंच होतं. अशा प्रकारे कोणत्याही पेशंटनी आपल्या शरीरावरचा आपला हक्क इतक्या रोखठोक भाषेत सांगितला नव्हता.
मी पसंत पडल्यावर पुढच्याच भेटीत तिनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. बरेचसे प्रश्न नेहमीचेच होते. जगप्रसिध्द डॉक्टर, डॉ.गुगल यांच्याकडून,  तिनी परस्पर उत्तरंही मिळवली होती. मी फक्त त्यांना मान्यता द्यायची होती. वजन किती वाढावं, तपासण्या कधी आणि काय काय कराव्यात, व्यायाम कोणते, औषधं कोणती सगळ्याची कोष्टकं तिच्याकडे तयार होती. मला करायला फारच कमी काम शिल्लक ठेवलं होतं तिनी. कळा कशा जाणवतात, बाळाचं डोकं खाली सरकल्याचं कसं जाणावं, वेदना शामक औषधं कोणती, आसनं कोणती, प्रसूतीची प्रगती कशी बघतात, एक ना अनेक...
खरं तर तिला माझी गरजच नव्हती. आदिवासी बायांसारखं ती स्वतः सगळं उरकू शकेल इतकी जय्यत तयारी तिनी केली होती.
नवराही तिच्याइतकाच एन्थू होता. तो प्रसूतीच्या वेळी हजर रहाणार हे त्यानी आल्याआल्याच जाहीर केलं होतं. बेशुद्ध न पडण्याच्या अटीवर मी त्याची उपस्थिती मान्य केली. मग प्रसूतीच्या वेळी बायकोला कसा आधार द्यावा, म्हणजे मानसिकच नाही हं, शारीरिक देखिल, याचा दांडगा अभ्यास त्यानी सुरु केला. दरवेळी मला त्यातली प्रगती तो सांगायचा आणि मी दरवेळी दाद द्यावी अशी अपेक्षा बाळगून असायचा. प्रसूतीची पहिली, दुसरी आणि तिसरी अवस्था, त्यातले फरक, त्या त्या वेळी त्या बाईला होणारे त्रास, नवऱ्यानी करायची कामं, डॉक्टरनी करायची कामं, सगळं मला घडाघडा म्हणून दाखवायचा. मी तेवढ्यात मनातल्या मनात माझ्या कामांची उजळणी करायचो. न जाणो थोड्या वेळानं मलाच ‘पाठ म्हणून दाखवा’ म्हणाला तर? स्तनपानाबद्दल तर तो इतकं हिरीरीनं आणि पोटतीडकीनं बोलला की आणखी थोड्याच प्रयत्नात त्याला स्वतःलाही पान्हा फुटला असता! हा नवरा आमच्या स्टाफमध्येही चांगलाच फेमस झाला. मुळात तो गोरा, त्यातून फॉरेनर, म्हणजे आपोआपच उच्चकुलीन, त्यात त्याचं हे असं वागणं, त्यामुळे उत्सुकता कमालीची. बायकोला दिवस गेले की थेट बारशालाच उगवणारे (ते देखील मुलगा झाला असेल तरच) महाभाग सगळ्यांना माहीत होते. पुरूषाचं तेच रूप स्टाफमान्य होतं. त्यामुळे एक नवरा आपल्या बायकोच्या बाळंतपणात इतका रस घेतो ही विलक्षण घटना होती आणि ती विलक्षण नापसंतही होती. नशीब त्याला मराठी येत नव्हतं, नाही तर आमच्या स्टाफ मधल्या बायकांनी त्याला सुनावलं असतं, ‘कार्य सिद्धीस नेण्यास आमचे सर समर्थ आहेत, तेव्हा तुमची लुडबुड नकोय!’
एकदा आला तो एकदम आठ महीन्याचं पोट वागवत! कमरेवर हात, अवघडलेली चाल... हे आक्रीत पाहून माझ्यासकट सगळ्या स्टाफनी दाहीच्यादाही बोटं तोंडात घातली. मग त्यानी अलगद खुलासा केला. सतत असं सात आठ किलोचं ओझं बाळगून हिंडणं ही काही सहजसाध्य गोष्ट नाही. चालणं, वाकणं, तोल संभाळणं सगळंच अवघड. हा अनुभव स्वतः घ्यावा म्हणून त्यानी नेट वरून ही ‘अनुभवाची पिशवी’ मागवलेली होती. ती पोटावर बांधूनच तो गेले तीन दिवस वावरत होता. रबरी पिशवी त्यात पाणी आणि बॅटरीवर हालचाली करणारं एक बाळही होतं आत! प्रसूच्या कुंकवाच्या धन्याचं हे ‘सतीचं वाण’ पाहून आम्ही थक्क झालो. ‘हे वाण घेतल्यामुळे माझे कित्येक पूर्वग्रह नाहीसे झाले. आम्ही खूप जवळ आलो आहोत आता’, असं काहीतरी तो म्हणाला. (‘This bag has helped me off load a lot of baggage, I feel closer to Prasoo as never before.’)
प्रसूती प्रसंगी बायकोनी नवऱ्याच्या कसं गळ्यात पडावं, नवऱ्यानी पाठीला कुठे कसं चोळावं, बाळाच्या डोक्याला बाहेर येताना कसा आधार द्यावा, नाळ कशी कापावी हे सगळं त्याला पाठ होतं. मनातल्या मनात त्यानी त्याची कित्येकदा उजळणी केली होती. गुळगुळीत कागदावर छापलेली अनेक सचित्र विंग्रजी पुस्तकं तो बाळगून होता. त्यातल्या हसत खेळत प्रसूत होणाऱ्या बायका पाहून मलाच वरमल्यासारखं व्हायचं.
सरकारी इस्पितळी तावून सुलाखून डॉक्टर झालेले आम्ही,  हे असलं काही आमच्या गावीही नव्हतं. देवाची करणी आणि नारळात पाणी; आणि नारळात पाणी, तशा बायका होतात बाळंतीणी; हे आमचं ब्रीदवाक्य. तिथल्या आया, मावश्या, नर्सेस, डॉक्टर कुणाच्या जिभेला हाड म्ह्णून नव्हतं. कामाचा रेटा इतका प्रचंड होता की असून भागणारच नव्हतं. जिभेवर ‘हाड्’ एवढा एकच शब्द होता म्हणाना. पेशंटप्रती सन्मान, आदर हे फक्त परदेशी पुस्तकातले उल्लेख होते. एक दूरस्थ वास्तव होतं. आमच्या आसपास असलं काही नव्हतं. गरोदर स्त्रियांच्या तपासणी विभागात पाउल टाकलं की सिस्टरंच म्हणायच्या, ‘आले बाई, ढेऱ्या कुरवाळणारे...!’ स्त्रीरोग विभागातली चिमणामावशी वेटिंग हॉलमध्ये खणखणीत आवाजात गर्जायची, ‘एsss... पहिल्या पाचजनी उठा गं, आत मुतारीत जावा, चड्या काढून ठेवा आणि आतल्या टेबलावर झोपा!!’ ही असली अघोचर घोषणा ऐकून माझ्या अंगावर काटाच आला होता. मी हटकलं तर चिमणी म्हणाली, ‘मी मुद्दामच तशी बोलते, त्याबिगार त्या बायांबरोबरचे पुरुष बाहेर जातच नाहीत.’ हे मात्र खरंच होतं, तिच्या ह्या वाक्यासरशी सर्व पुरुष हतवीर्य होऊनच्या होऊन शिवाय गर्भगळीत होत्साते बाहेर निघून गेले होते. तिच्याकडे दुर्लक्ष करत मी थेट विभागप्रमुखांना गाठलं. ते मला पुढ्यात घेऊन बसले, माझं शांतपणे ऐकल्यावर मला चहा पाजते झाले आणि म्हणाले, ‘मी तुझ्या एवढा होतो, तेव्हापासून चिमणी इथे आहे, मी त्या वेळी डीनकडे लेखी तक्रार दिली तर तत्क्षणी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला!’
डॉक्टरही काही कमी नव्हते.
‘पहिलं काय आहे?’
‘मुलगा’
‘नंतर?’
‘मुलगी’
‘मग आत्ताचं हवंय का नकोय?’
‘हवंय’
‘कशाला?, एक मुलगा आणि एक मुलगी आहे ना? मग आता काय वेगळं होणार आहे? कुत्रं का मांजर?!!!’
अविश्वसनीय, अशोभनीय आणि लज्जास्पद असे संवाद ठायी ठायी चालू असायचे.
तिथल्या पेशंटच्यामानानी प्रसूच्या अपेक्षा आभाळाला पोहोचल्या होत्या. तिनी एकदा मला थेट प्रश्न केला, ‘प्रसूतीच्या वेळी मायांगावरचे केस काढण्याबद्दल (to shave & prepare the perineum) तुमच्या दवाखान्याचं धोरण काय आहे?’
बसल्या खुर्चीत मी आक्रसलो. दवाखान्याला असल्या प्रश्नात धोरण बिरण असतं? मुळात हा प्रश्न असू शकतो? कोणी बाई हे तोंडावर विचारू शकते? हे सगळंच मला धक्कादायक होतं. पण ती मात्र अत्यंत कम्फर्टेबल होती. हे सगळं डॉक्टरांना विचारणं आणि आधी माहीत असणं तिला आवश्यक वाटत होतं. तिला तो तीचा अधिकार वाटत होता. मला मात्र तो डॉक्टरांचा, दवाखान्याचा निसंदिग्ध अधिकार वाटत होता. एकदा आत पाउल टाकल्यावर, आमच्यावर विश्वास टाकल्यावर, आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा नाही का? आम्ही तुमच्या शरीराला भोकं पाडू, नैसर्गिक भोकात नळ्या घालू, तुम्हाला टोचू, फाडू, शिवू, चिकटवू... काय वाट्टेल ते करू; पण करू ते तुमच्या भल्यासाठीच नं? मग आक्षेप घ्यायचा प्रश्न येतोच कुठे?  गेली वीस पंचवीस वर्ष बायका येताहेत आणि मी shave & prepare अशी ऑर्डर खरडतो आहे. एवढं सुद्धा लिहित नाही मी. फक्त s & p. पुढचं सगळं सिस्टर करताहेत. याला कुणाचा आक्षेप असेल, असू शकतो, ही मी तरी कल्पना सुद्धा केली नव्हती. जागा खाजते, पुन्हा केस येताना ते टोचतात असं काहीबाही ती म्हणत होती. थोड्या वेळानं सावरून मी उत्तरलो, ‘टाके बीके घालायच्या वेळी केस मधे येतात...म्हणून काढलेले बरे...’
‘बरं आठवलं, टाके घालायचे म्हणताय, म्हणजे तुम्ही प्रसूतीच्या वेळी मायांगाला छेद घेता का?’ (विटपछेद, Episiotomy)
‘हो’
‘रुटीनली?’
‘पहिल्या खेपेला रूटीनली घेतो.’
‘अरेरे, तुमचं तसंच धोरण आहे का?’
पुन्हा धोरण!
मी तिला समजावून सांगितलं, ‘बाई गं, माझा एक छोटासा खाजगी दवाखाना आहे. प्रत्येक बाबतीत धोरण बिरण असं माझ्याकडे नाहीये. हां, आता इतक्या वर्षाच्या अनुभवानं मला आणि माझ्या स्टाफला कधी काय करायचं हे माहीत आहे. सहसा आम्ही चुकत नाही. पण धोरण म्हणशील तर असं काही मी कुठे लिहून ठेवलेलं नाही. मायांगाला छेद म्हणशील, तर बहुतेकदा तो घेतला जातो, कारण तोपर्यंत ती बाई इतकी कातावलेली असते की तिची झटपट सुटका महत्वाची असते आणि...’
नाही पण एका नैसर्गिक गोष्टीसाठी वैद्यकशास्त्रानं माझ्या शरीरावर घाला घातल्यासारखं वाटतं मला! हे मला नकोय!!’
माझं रूप मला आता वेगळंच दिसायला लागलं. मला आठ दहा हात फुटले असून; कात्र्या, सुऱ्या, नळ्या, सुया, दोरे, चिमटे घेऊन मी सैरावैरा पळतो आहे. वेळोवेळी बायका दिसल्या की मी त्यांच्या शरीरावर घाला घालून एक छेद घेतोय, लगेच तो शिवतोय, की पुन्हा सैरावैरा पळतो आहे, की पुन्हा दुसरी बाई! माझे इतर डॉक्टर स्नेही देखील या पळापळीत आहेत. कुणी मोतीबिंदूवर घाला घालतो आहे, तर कुणावर आतड्यावर घाला घालून जुलाब बरे केल्याचा आरोप आहे!!  
लवकर प्रसूती व्हावी, आजूबाजूच्या अवयवांना (गुदद्वार, मूत्रमार्ग वगैरे) इजा न व्हावी या उदात्त हेतूनी घेतलेल्या छेदाला ही बाई चक्क ‘हल्ला करणे’ म्हणत होती! शरीरावर घाला घातला म्हणे! जीचं करावं भलं ती म्हणते आपलंच खरं! हां, आता हे बरोबर आहे की ही शस्त्रक्रिया प्रसूतीशास्त्रात सतत वादात अडकलेली आहे. दोन्ही बाजू लावून धरणारे आहेत. पण तो आमचा प्रश्न आहे. त्यात ह्या बाईनं नाक खुपसायचं काय कारण? माझ्या डॉक्टरी इगोलाच आव्हान दिलं होतं तिनी.
प्रयत्नपूर्वक शांत रहात मी तिला समजावलं, ‘आधीच छेद घेतला नाही तर मग कधी वेडी वाकडी इजा होते, नंतर टाके घालणं खूप त्रासाचं होतं... आजूबाजूचे अवयव...अतिरक्तस्त्राव....’
‘पण इंटरनॅशनल रिक्मंडेशन तसं नाहीये.’ हातातला टॅब नाचवत ती म्हणाली. मग मीही माझ्या शेल्फातलं एक जाडजूड पुस्तक काढून, तिला संदर्भ सादर केले. टॅबपेक्षा शंभर पट जाड पुस्तक. वाच बाई वाच, उगीच टीव टीव नको. मला काहीच येत नाही असं समजू नकोस.
शेवटी पहिलीच खेप असली तरी हा छेद टाळायचा आणि टाके पडले तर नंतर, प्रसंगी भूल देऊन, टाके घालायचे अशी तहाची कलमं ठरली. होणाऱ्या (दुष्)परिणामांना आता ती जबाबदार होती. मी शांत झालो. अगदी बरंsss वाटायला लागलं मला. प्रथमच कुठल्यातरी पेशंटनी स्वतःच्या भल्याबुऱ्याची जबाबदारी जाणीवपूर्वक स्वतःच्या शिरावर घेतली होती. ‘बघा हं डाक्तर आता तुमच्याकडे आणून टाकलीय, आता तुम्ही काय ते बघा.’ ह्या असल्या बजावण्याची सवय मला; त्या मानानं ही शांतता वेगळीच होती. आता प्रामणिक प्रयत्नांचीच जबाबदारी माझी होती. मार्ग निवडण्याची  जबाबदारी प्रसूची. तीही शांत झाली. मनासारखा तह झाल्यामुळे तीही खुशीत होती. पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंग असेच समाधानी दिसत असतील, अशी एक मिश्कील कल्पना माझ्या मनात तरळून गेली.  तिच्या शरीरावरचा तिचा अधिकार तिनी शाबित केला होता, शाबूत ठेवला होता. मीही तो मान्य केला होता.
येणेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत तिचं काहीतरी म्हणणं होतं, काहीतरी भूमिका होती. कळांचं इंजेक्शन देणं, पाणमोट आपोआप फुटणं / मुद्दाम फोडणं, नाळ कापायची नेमकी वेळ, सीझर, प्रथम स्तनपान, प्रोटीनच्या पावडरी, बाळाची शी पुसणे, तिनी वापरायची अंतर्वस्त्रे, पॅड... सगळ्यासाठी तिच्याकडे विचार होता, त्याला पूरक युक्तिवाद होता! बरीचशी मतं मला मान्य होती. काही किमान अमान्य नव्हती. पण काही अव्यवहार्य होती. छोटया गावातल्या छोटया दवाखान्याच्या म्हणून काही मर्यादा असतात. मी तिची मतं मान्य केली, तिनी माझ्या मर्यादा मान्य केल्या. आम्ही बरोबरीनं चालू लागलो. पण दिवस भरत आले तरी हिच्या शंका, प्रश्न, वाटाघाटी काही केल्या आटोपेनात.
प्रसूती वेळी पाठीवर उताणं झोपावं का उकिडवं बसावं का रांगत प्रसूत व्हावं हाही तिच्यासाठी कळीचा मुद्दा होता. टेबलावर पाठ टेकून झोपून प्रसूत होणं हा तिच्या मते वैद्यकशास्त्रानं नैसर्गिक प्रसूती विरुद्ध रचलेला बनाव आहे. दोन पायावर, चार पायावर (रांगल्यासारखं) अशी प्रसूती ही खरी नैसर्गिक प्रसूती. असं काहीतरी होतानाचा एका गोरीलीणीचा आणि एका चिन्पान्ज़िणीचा जंगलातला ‘नॅचरल’ व्हिडीओही तिनी मला दाखवू केला. त्या व्हिडिओतून मी काय धडा घ्यायचा ते खरं तर मला कळलं नाही. त्यात, त्याच सगळं उरकत होत्या! डॉक्टरंच नव्हता त्यात!! मात्र तिच्या म्हणण्यात अगदीच तथ्य नव्हतं असं नाही. खेड्यापाड्यात घरी प्रसूत होणाऱ्या बायका त्यांना आरामदायी अशाच अवस्थेत प्रसूत होतात. जमिनीवर उकिडवं बसून, छताला टांगलेल्या दोरीला, दाराच्या कडीला लोंबकळत जोर करतात.
‘टेबलावर झोपलं की तपासायला सोपं जातं, जमिनीवर किंवा उकीडवं बसलेल्या बाईला  कसं तपासणार?’
‘हेच ते मी म्हणते ते, सगळं काही डॉक्टरच्या सोयीनी करणार तुम्ही. त्या बाईची सोय...’
‘पेशंटसाठी सुद्धा हेच सोयीचं असतं... बाळाचे ठोके बघावे लागतात... शिवाय सलाईन लावलेलं असतं...’
‘सलाईन?’ ती किंचाळलीच. ‘सलाईन कशाला?’
पुन्हा एकदा धोरण, स्त्रियांच्या शरीरावर वैद्यकीय हल्ला वगैरे सुरु व्हायच्या आतच मी म्हणालो, ‘बाई गं , कधी झालाच रक्तस्त्राव तर गडबडीनं सलाईन द्यावं लागतं, मग ऐन वेळी शीर सापडत नाही, म्हणून आधीच लावून ठेवलेलं बरं. शीर सलामत तो सलाईन पचास!’ मी केविलवाणा विनोद केला. पण ह्या हल्ल्यालाही तिनी साफ नकार दिला. सलाईन तिच्या धोरणात बसत नव्हतं.   
दिसामासानी प्रसू तेजपुंज दिसायला लागली. तीचं हे नैसर्गिक बाळंतपण तीला छान मानवत होतं, पण मला मानवत नव्हतं. सगळं जर का नैसर्गिकच होणार आहे आणि होऊ द्यायचं आहे तर माझ्याकडे येण्याचे कष्ट तरी ही बाई का घेत होती? काही अनैसर्गिक घडलं तर निस्तरायला मी, आणि सगळं नैसर्गिक घडलं तर मिरवायला ही! पुढे पुढे तर ह्या प्रसूच्या प्रसूतीच्या मला चित्र विचित्र भीत्या वाटायला लागल्या. एकदा ही प्रसूतीनंतर मांजरीसारखी वार खाते आहे असं स्वप्न पडलं, तर  एकदा हीचं हीनीच सगळं सुखरूप पार पाडलं आहे आणि ही जाताना बील न देता मला नारळ, थोडे तांदूळ आणि ब्लाउजपीस देते आहे असं स्वप्न पडलं!
यथाकाल तिला प्रसववेदना सुरु झाल्या. तिनी ते ताडलं. बराच वेळ तिनी घरीच काढला, इकडे तिकडे फिरली, बसली, झोपली. अगदीच असह्य झालं तेव्हा नवऱ्याला घेऊन दवाखान्यात आली. आली आणि झाली! मी सुटलो!! नवरा शेजारी होताच, त्यानं फीत कापावी तशा अविर्भावात नाळ कापली आणि तो रीतसर बेशुद्ध पडला. नवरा बेशुद्ध पडला तर काय करायचं हे तिच्या वाचनात नव्हतं, तेव्हा त्याला शुद्धीवर आणायचं  तेवढं काम मी केलं. तिला टाके पडले, ते तिनी माझ्यावर हल्ल्याचे आरोप न करता घालून घेतले. पुढे चार दिवस सगळं सुरळीत होईपर्यंत ती दवाखान्यात थांबली आणि बिल देऊन गेली.
मला वेगळी दृष्टीही देऊन गेली. मी जे शिकलो होतो, करत होतो, ते म्हणजेच रुग्णांची काळजी घेणं असं मी समजत होतो, पण पर्यायी विचारही असतो हे दाखवून गेली. परदेशात उपचारांमध्ये पेशंटच्या सहभागाला खूप महत्व आहे. आपल्याकडे रुग्णांना किती गृहीत धरलं जातं. डॉक्टर म्हणून पेशंटच्या शरीरावर हुकूमत गाजवली जाते. पेशंटच्या वतीनं डोकं चालवायचं काम आपण डॉक्टरवर सोपवलं आहे. डॉक्टरांनीही ते बिनडोकपणे गळ्यात घेतलं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या मानेवर टांगती तलवार आहे. अर्थात निर्णय प्रक्रियेत पेशंटचा सहभाग हवा असं सांगताना आणखी एक वास्तव लक्षात घ्यायला हवं. अशावेळी पेशंटही प्रसूसारखे हवेत, अभ्यासू, वास्तवाची चांगली जाण असणारे, स्वतःच्या निर्णयाची भली बुरी जबाबदारी स्वीकारणारे. प्रशिक्षित मनुष्यबळही हवं. पाळी चुकण्यापासून, पॅड बदलण्यापर्यंतची चर्चा एखद्या प्रसूसाठी ठीक आहे. एरवी डॉक्टरनी अशी चर्चा करायची म्हटलं तर १०% कामंही उरकणार नाहीत.
एका बाई डॉक्टरनी तपासणीच्या खोलीत तिला पूर्वकल्पना न देता, तिच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रेस वर केला म्हणून प्रसू वैतागली होती. मला हा वैताग रास्तच वाटतो. आता s & p असं लिहिताना दरवेळी मला प्रसूची प्रसूती आठवते. सरावल्या हातांनाही किंचित कंप सुटतो आणि मी सिस्टरना बोलावून सांगतो, ‘तुम्ही काय करणार आहे याची कल्पना दया, त्यांना विचारा आणि मगच पुढे काय ते करा.’ सिस्टर माझ्यादेखत तरी मान डोलावतात. इतपत प्रगती मी साधली आहे.

असे अन्य लेख, काही व्यक्तीचित्रं, कथा वगैरेसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा: shantanuabhyankar.blogspot.in


Thursday 12 November 2015

जमात जी.पीं.ची

जमात जी.पीं.ची
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, पिन. ४१२ ८०३.
मोबाईल क्र. ९८२२०१०३४९

    एक दिलखुलास संध्याकाळ उमलत असते. डॉक्टरांचे घोळके हास्यविनोदात रमलेले असतात. शीत तापमानाच्या उष्ण पेयांचा आस्वाद सोबतीला असतोच. अशाच एखाद्या घोळक्यातून अचानक हास्यस्फोट होतो. अगदी भला मोठा हास्यस्फोट, एक दोन स्फोटग्रस्त मंडळी लोटपोट हसून जमीनदोस्त होतात आणि टाळ्या घेत-देत दाद दिली जाते... ‘या जि.पीं.ची डोकी मोठी और चालतात बरं!’
              जी.पी. ही एक वेगळीच जमात आहे. एम्.बी.बी.एस्. जी.पी. आता कमी झाले आहेत. बहुतेक बी.ए.एम्.एस्. किंवा बी.एच्.एम्.एस्. डीग्रीवाले असतात. बहुतेकांच्या बायकाही अशाच. बहुतेकजणांनी एम्.बी.बी.एस्.ची स्वप्नं पाहिलेली असतात. प्रवेश थोडक्यात हुकलेला असतो. किंवा अपत्याला डॉक्टरंच करायचं असा चंग पालकांनी बांधलेला असतो. काहींची घरची प्रॅक्टीस असते. गादीला वारसा हवा असतो. काही तालेवार घरचे असतात. प्रॅक्टीस नाही केली तरी चालेल पण नावामागे ‘डॉ.’ असल्यास लग्नाच्या बाजारात मुलाचा भाव आणि मुलीची पत वाढते असा हिशोब असतो. काही मात्र भक्तिभावाने मिळालेल्या अॅडमिशनने पावन होऊ पहातात. मनोभावे अभ्यासही करतात. कॉलेजची फुलपाखरी वर्षं भुर्रकन उडून जातात आणि सोनेरी स्वप्नांवरचा वर्ख त्याहीपेक्षा झर्रकन् झडून जातो.
            सिनिअर मंडळींकडून काय काय ऐकायला, पहायला मिळतं ते अविश्वसनीय असतं. अचंबित करणारं असतं. भयसूचकही असतं. ज्यांच्याकडून शिकायचं ते शिक्षक आणि जिथून शिकायचं ते दवाखाने (असलेच तर) रिते असतात. शिकवणे म्हणजे ‘मोले घातले रडाया’ सारखा प्रकार. जे शिकवलं जातं त्यावर शिकवणाऱ्यांचाच पूर्ण विश्वास नसतो. स्वतः वर्गात घातलेल्या दळणावर ह्यांची स्वतःचीच चूल पेटत नाही आणि पोळी पिकत नाही. बरेचसे शिक्षक हे जी.पी. करतात हे सत्य मग रिचवलं जातं. व्यवहारी मंडळी यातून मग काय घ्यायचा तो बोध घेतात आणि भावूक मंडळी थोड्या उशिराने का होईना हे हलाहल पचवतात.
            पदवीच्या भेंडोळ्यात विद्यापीठानं ठासून भरलेलं ज्ञान, हे दोन वेळा पोट भरायला निरुपयोगी आहे ह्या निर्णयाप्रत बहुसंख्य मंडळी येतात... आणि मग जी.पी. करण्याच्या दृष्टीने व्यूह मांडला जातो... मांडावाच लागतो.
             गावातल्या एम्.डी./एम्.एस्. डॉक्टरांकडे मग धाव घेतली जाते. मिळेल त्या पगारात, पडेल ती कामं करण्याची तयारी असते या मुलांची. स्वस्तातले हुशार हरकामे मिळाल्यामुळे ‘पेशालिस्ट’ डॉक्टरही खूष आणि वैद्यक विश्वात डोकावून पहाण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थीही खूष. वर्गातल्या पोपटपंचीला आता प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळते. वर्गातल्या शिक्षणाची खुमारी वाढते. तहानलेली ही मुलं मग आधाशासारखं कामावर तुटून पडतात. झपाटून ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करतात. आया, नर्सेस, डॉक्टर वगैरेंची सारी काम टिपकागदासारखी टिपून घेतात. ‘मी’पण अर्पूनच ती दवाखान्यात काम करतात. त्यांना कसलाही गंड नसतो. असलाच तर न्यूनगंडच असतो. एम्.डी./एम्.एस्. मंडळी त्यांच्या कामावर खूष असतात. २-४ वर्षे एकाच ठिकाणी राहिली तर ही मुलं डॉक्टरांच्या अनुपस्थित ८०% कामं निश्चितपणे सांभाळू शकतात. अगदी आत्मविश्वासपूर्वक, बिनचूकपणे.
              एवढे दिवस एका ठिकाणी सहसा कुणी टिकत नाही. सहा महिने फिजिशियन, सहा महीने सर्जन, आणि सहा महिने पेडिएट्रीशिअन असा अनुभवाचा फॉर्म्युला जी.पी. सुरु करण्यासाठी पुरेसा समजला जातो. मुली मात्र बऱ्याच काळ एकेका दवाखान्यात दिसतात; विशेषतः स्त्री रोग तज्ञांकडे. त्यांचंही बरोबर आहे. ‘बाई आहे’ आणि ‘डॉक्टर आहे’ एवढ्या क्वॉलिफिकेशनवर त्या ‘बायकांच्या डॉक्टर’ म्हणून सहज एस्टॅब्लिश होतात, दणकून प्रॅक्टीस करतात. बक्कळ पैसा कमावतात. बरेचदा नवऱ्यापेक्षा जास्त! ही संधी मुलांना नसते. ते असे ‘श्री रोग तज्ञ’ होऊ शकत नाहीत. लिंगभेद म्हणतात तो हाच. ही डॉक्टरांना पेशंटकडून मिळणारी लिंगभेदी वागणूक!! अशा स्वयंघोषित Gynecologist बायकांना पेशालिस्टांच्या जगात Womenologist म्हंटलं जातं. कारण त्यांना स्त्रीरोगशास्त्रापेक्षा स्त्रियांची अधिक माहिती असते (They know more about women than about gynecology!)
              अशा पद्धतीने २-३ वर्ष कष्टपूर्वक मिळवलेलं ज्ञान पाजळत हा येरू जी.पी. व्हायला तयार होतो. या मंडळींची गीता आणि गाथा म्हणजे CIMS/MIMS आणि Golwala. ही पुस्तकांची नावे आहेत. यात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या आजारांवर, सर्वसाधारणपणे करण्याच्या उपचारांची, सर्वसाधारण रूपरेषा दिलेली असते. ही पुस्तके आवर्जून जवळ बाळगली जातात. यथावकाश डॉक्टरोपयोगी, रुग्णोपयोगी, इंजेक्शनोपयोगी, सलाइनोपयोगी साहित्याची जुळणी झाली की दवाखाना थाटला जातो.
              कमी फी, भरपूर उधारी आणि सगळ्या तक्रारींवर औषध हे सुरुवातीचे यु.एस.पी. (unique selling proposition) असतात. हे केलं नाही तर दवाखान्यात कुत्रं देखील फिरकत नाही. शिवाय वाताचे इंजेक्शन (Inj Calcium), शक्तीचे इंजेक्शन (Inj B12), अशक्तपणासाठी सलाईन (म्हणजे खरंतर मिठाचं पाणी) वगैरे मालही विक्रीला असतो.
            अंगी धाडस आणि थोडासा पूर्वानुभव असेल तर यातली काही मंडळी Penicillinची इंजेक्शन देतात. किंबहूना काही दशकांपूर्वी ही इंजेक्शन देणारे आणि न देणारे असे जीपींचे दोन वर्ग होते. देणाऱ्यांकडे, न देणारे आदरानं पहात असत. आता अॅन्टीबायोटिक्सचे इतके आणि इतके सुरक्षित प्रकार आले आहेत की Penicillin मागे पडलं आहे. याचप्रमाणे जागेवर भूल देवून बारीक सारीक ऑपरेशने करणारे आणि न करणारे, शिरेतून इंजेक्शन देणारे आणि न देणारे, स्टिरॉइडस् देणारे आणि न देणारे असेही वर्गीकरण करता येईल. अफाट दारिद्र्य, अचाट अज्ञान आणि फुकट पण अनास्थेनं ओतप्रोत भरलेली सरकारी आरोग्यसेवा, या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिस चालली नाही तरच नवल! प्रॅक्टिस चालते, अगदी धो धो चालते.
            सुरुवातीला बरेच टक्के टोणपे खावे लागतात. ‘गरीबकी बीबी सबकी भाभी’, या न्यायानं सगळ्यांशी छान जुळूवुन घेतलं जातं. पेशंटशी, केमिस्टशी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हशी, जवळच्या बड्या हॉस्पिटलशी, पेशालिस्ट डॉक्टरांशी वगैरे... या सगळ्यांत डॉक्टरांना टोप्या घालण्यात वस्ताद म्हणजे पेशंट! पण लवकरच अनुभवाच्या पाठशाळेतील विचार धन गाठीला लागतं. ‘पहिल्या पाच वाक्यातील कोणत्याही एका वाक्यात पेशंटने डॉक्टरांची स्तुती केली,  तर तो या खेपेला पैसे देणार नाही असे समजावे!’ हे असेच एक विचार मौक्तिक.
                अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला सोडवून घेण्यात ही मंडळी वाकबगार असतात. एकदा इंजेक्शन देताना पुरेशी काळजी न घेतल्यामुळे त्या ठिकाणी गळू झालं. पेशंट थंडी, ताप, वेदना वगैरेंनी हैराण होऊन शिव्या घालायला म्हणून परत आला; पण डॉक्टरांनी शांत चित्तानं, सुहास्य वदनानं त्याचं स्वागत केलं आणि मधाळ भाषेत त्याला समजावलं की, ‘बाबारे, ज्यास तू गळू समजतोस ते अन्य काही नसून, तुझ्या शरीरातली सगळी घाण मी माझ्या इंजेक्शनच्या प्रभावामुळे एका बिंदूपाशी आणून ठेविली आहे. आता त्या घाणीचा निचरा करताच तुला तात्काळ आराम पडेल.’ डॉक्टरांनी गळू कापल्यावर अर्थातच पेशंटला तात्काळ आराम पडला!!
               दिसामासानी प्रॅक्टिस वाढत जाते. चिकाटी, धडाडी, कष्टाळूपणाच्या प्रमाणात मग दवाखान्याचीही वाढ होते. सुरुवातीला निव्वळ बाकडी आणि मग सलाईच्या खाटा असणाऱ्या दवाखान्यात आता डिलिव्हरीचं टेबल येतं, पाठोपाठ ‘कुरटेशन’ची (Curetting) हत्यारे येतात. गर्भपात, हर्निया, अपेंडिक्स, टॉन्सिल्स अशा शस्त्रक्रिया पेशालिस्टांना बोलावून सुरु केल्या जातात. ही सारी विन-विन सिच्युएशन असते. अशा दवाखान्यामुळे पेशंटला घरानजिक आणि स्वस्त सेवा मिळते. जी.पी.लाही चार पैसे मिळतात आणि व्हिजिटिंग पेशालिस्टलाही दोन(च) पैसे मिळतात. पेशलिस्टांना स्वतःच्या दवाखान्यातल्यापेक्षा कमी मिळतात. कौशल्याच्या मानाने फारच कमी मिळतात. पण शेवटी ज्याच्या हाती पेशंट तो XXX! कल्हई करणं सोपं आहे पण कल्हईला भांडी जमवणं अवघड आहे... आणि कल्हईला भांडी जमवण्याचं कसब ह्या जी.पीं.कडे असतंच असतं.
              त्यातील काही धाडसी मंडळी मग एक पाऊल पुढे जातात. स्वतः निरनिराळ्या शस्त्रक्रिया शिकतात आणि करतात सुद्धा. यांना दाद द्यायला पाहिजे. आमचे सर्जरीचे सर सांगायचे की सर्जरी ही नाहक glorify केलेली branch आहे. सर्जरी गवंडीकामाइतकीच सोपी आहे. एकाच प्रकारची शस्त्रक्रिया पाहून, अॅसिस्ट करून कुणालाही ती करता येऊ शकते. म्हटलं तर खरं आहे; पण जेमतेम क्वॉलिफीकेशन असताना, पेशंटच्या जीवाची जोखीम घेवून शस्त्रक्रिया करणं, यासाठी XXत दम असावा लागतो आणि तो जी.पीं.च्या xxत तो असतो.
              माझे एक जी.पी. मित्र हर्नियाची शस्त्रक्रिया फार सुरेख करतात. काही सर्जनही त्यांची सर्जरी बघायला येऊन गेलेत. आम्ही त्यांना म्हणतो देखील तुमचे बोधवाक्य ‘सर्वेपि सुखिनः संतुl सर्वे संतु हर्नियामहाःll’ असं असायला हवं. एक जण एका विख्यात न्यूरोसर्जनकडे दशकानुदशके आहेत आणि आता बऱ्याचशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही हेच हाताळतात. एकांनी ३४ वर्ष तालुक्याच्या ठिकाणी ब्लड बँक चालवली, बदलत्या कायद्यांमुळे ती बंद करावी लागली पण त्यांचे काही शिष्य अजूनही अन्यत्र ब्लड बँकींगच्या क्षेत्रात पाय रोवून आहेत. सर्जनच्या पदरी बघून बघून शिकलेली काहीजण उरलेल्या वेळात अॅनेस्थेशियाची प्रॅक्टिस करतात. उत्तम करतात.
              मुळात फार महागड्या तपासण्या परवडणारे पेशंट जी.पीं.कडे जातच नाहीत. अगदी मोजक्याच तपासण्यांमध्ये स्वतःची कौशल्ये पणाला लावून यांना निदान करावं लागतं. काही अभ्यासू मंडळी अगदी लीलया ही कामगिरी पार पाडतात. कॉलेज सुटलं तरी यांची पुस्तकाशी जोडलेली नाळ तुटत नाही. आपण जे करतोय ते आधुनिक ज्ञानाशी सुसंगत आणि योग्यच असावं असा यांचा आग्रह असतो. मग डॉक्टरांच्या कॉन्फरन्सेस, ज्येष्ठांशी सल्ला मसलत, प्रत्येक केसच्यावेळी सविस्तर चर्चा, वगैरेतून हे स्वतःच स्वतःला तैय्यार करतात. पण अगदी कौशल्याची कमाल दाखवून जरी यांनी योग्य निदान केलं, आणि पेशंटला योग्य त्या प्रथमोपचारासह ICU, वगैरेत पाठवलं तरी यशाचे धनी होण्याचं भाग्य यांना लाभत नाही. श्रेय हे नेहमीच वलयांकित इस्पितळे पळवतात. अपश्रेयाचे धनी  मात्र हे! ही खंत फार बोचणारी असते. बरेचदा बड्या डिग्रीवाल्या डॉक्टरांपेक्षा यांची कामगिरी उजवी असते, पण लक्षात कोण घेतो?
             अर्थात अशी परिस्थिती अपवादात्मकच. बरेचदा अनुभव उलटा येतो. सुचेल त्या निदानानुसार, सुचतील ती औषधे दिल्याने बरेच घोटाळे झालेले असतात. पेशंटची परिस्थिती विचित्र झालेली असते. दरवेळी अगदी जीवावर बेतणारं किंवा गंभीरच काहीतरी होतं असं नाही पण किरकोळ घोटाळ्यांच्या त्रास पेशंटलाच भोगावा लागतो.
            असे पेशंट मग पेशालिस्टांकडे दाखवायला जातात; किंवा रितसर चिठ्ठी देवून पाठवले जातात. इथे मात्र पेशालिस्टांचा कस लागतो. पदार्थ नव्यानं तयार करणं सोपं आहे, बिघडलेला पदार्थ दुरुस्त करणं अवघड आहे. असंच काहीसं होतं. मोठ्या हिकमतीनं त्यांना योग्य निदान आणि उपाय योजना सुचवावी लागते. गंभीर घोटाळा नसेल तर बहुतेकवेळा सारं काही सावरून घ्यावं लागतं. जी.पीं.च्या चुकांवर पांघरूण घालावं लागतं. थोडक्यात तेरी भी चूप मेरी भी चूप असा मामला.
                 याला अनेक कारणे आहेत. एक तर जी.पी.कडून झालेल्या चुका निस्तरणं महत्वाचं असतं. त्यामुळे त्या चुका पेशंट देखत उगाळून पेशंटच्या मनातला अविश्वास आणि भीती फक्त वाढते. अन्य फायदा शून्य. काय गोची झाली याची समज जी.पी.ला स्वतंत्रपणे करून दिली जातेच. यामुळे पुन्हा अशी चूक टाळणं काही अंशी शक्य होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे बहुतेक पेशलिस्टांची प्रॅक्टिस जी.पीं.कडून येणाऱ्या रतीबावर अवलंबून असते. त्यामुळे जी.पी.ना दुखावणे पेशलिस्टांना परवडत नाही. खाजगीत त्यांची कितीही टवाळी केली तरी प्रत्यक्ष भेटीत ‘या सर! बसा सर!! काय म्हणताय सर!!!’ असाच मामला असतो. एकुणात ‘सर सर झाडावर आणि सरसर खाली’ असा मामला!!
               जी.पीं.चा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची पेशंटच्या मनोविश्वावर, भावविश्वावर भलतीच हुकुमत असते. एखादया पेशालिस्ट विरुद्ध चवताळलेला पेशंट शांत करायला ह्या जी.पी. लोकांच्या वाक्चातुर्याचा चांगला उपयोग होतो. पेशंटच्या मनात असलेला समज, गैर आहे हे ते सहजपणे पटवून देतात. त्याचबरोबर मनात आणलं तर एखादया पेशालिस्टाविषयी गैरसमज पसरवूही शकतात. हे सारं पेशालिस्ट ओळखून असतात त्यामुळे ते जी.पीं.ना थोडे फार वचकून असतात.
               जी.पी. आणि पेशालिस्ट यांच्यात आर्थिक हितसंबंधही असतात. गाव किती व्यापारी आहे यावर याचं प्रमाण ठरतं. मुंबईसारख्या व्यापारी राजधानीत अर्थातच सारेच हिशोब काटेकोर असतात. ‘माझे वडील जरी असले तरी तुमच्याकडे मी त्यांना पेशंट म्हणून पाठवलं होतं. त्यांना तुम्ही फुकट तपासलंत हा तुमचा चांगुलपणा आहे. त्याला मी जबाबदार नाही. वडिलांच्याही नावाचा कट मला मिळालाच पाहिजे!’ अशी ठणकावून मागणी करणारे जी.पी. भेटतात.
                कट प्रॅक्टिस, अनावश्यक इंजेक्शने, सलाईन, कमअस्सल (आणि केवळ म्हणूनच) स्वस्त औषधांचा वापर (यांना बॉम्बे मार्केटची औषधे म्हणतात) वगैरेंच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले जातात. जी.पीं.च म्हणणं असं की निव्वळ पेशंट तपासून औषध लिहून दिलं, तर पेशंट आम्हाला काहीच पैसे देत नाहीत (‘सुई नाहीतर कसले पैसे?’); दिले तरी निम्मेच देतात (‘डॉक्टर, पैसे असते तर तुमच्याकडे कशाला आलो असतो?’); उधारी बुडवतात (‘यवडी वांगी ठ्यून घ्या आन त्यो मागचा आकडा कटाप करा!’); काहींना भरपूर वेळ द्यावा लागतो (‘तुमच्या त्या पेशालिस्टांना बोलायला सुद्धा वेळ नव्हता. त्यांनी या तपासण्या केल्यात, आता तुम्हीच त्या समजावून सांगा’) आणि जी.पीं.च्या वेळेलाही मोल असतं याची जाणीव रुग्णांना नसते. त्यांना तात्काळ गुण हवा असतो (‘उद्या पेरणीला/गिरणीला जाता आलं पाहिजे बरं का? स्टाँग मधीबी स्टाँग इंजेक्शन दया’); आम्ही सलाईन नाही म्हणलं तर ते उठून दुसरा डॉक्टर गाठतात, त्यांना सलाईनचं व्यसनचं लागलेलं असतं (‘एक बाटली तरी चढवाच, लई अशक्तपणा आलाय’)... अशा अनिष्ट रुग्ण संस्कृतीमुळे डॉक्टरांनाही अनिष्ट प्रकार करावे लागतात. पण सुई, सलाईन वगैरेंच्या सत्वगुणाबद्दलच्या आधुनिक अंधश्रध्दांना हीच मंडळी खतपाणी घालत असतात हे विसरलं जातं.
               ज्ञान आणि फाजील आत्मविश्वास यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त असतं. त्यामुळे बेधडक-देधडक उपचार करणारे फार. विशेषतः खेडापाड्यात (डॉ.भाषेत पेरिफेरीला). मग पिटोसीन नावचं इंजेक्शन शक्तीसाठी टोचलं जातं. ह्या इंजेक्शनमुळे प्रसुती कळा वाढतात, या न्यायाने ‘मसल पॉवरसाठी’ हे टोचलं जातं! खरं तर ह्या औषधाचा परिणाम निव्वळ गर्भ पिशवीच्या स्नायूंवर, आणि तोही निव्वळ गरोदरपणात  होतो!! इंजेक्शन हिमॅक्सील हे अचानक रक्तस्राव झाल्यास रक्त उपलब्ध होइपर्यंत म्हणून वापरलं जातं. पण धडधाकट माणसाला भारीतलं सलाईन म्हणून हिमॅक्सील लावणारे महाभाग आहेत! याचा परिणाम शून्य, उलट दुष्परिणाम होण्याचीच शक्यता जास्त. या आणि अशा जी.पीं.बद्दलच्या कथा/दंतकथा सतत चर्चेत असतात. अशाच एका जी.पी.ला अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेची इतकी चटक लागली,  की शेवटी तालुका पत्रात ‘अमुक भागात अपेंडिक्सची दुर्घर साथ’ अशी मार्मिक बातमी छापून आली. या बातमीचा ‘उतारा’ साथीवर लगेच लागू पडला. संपादक महाशयांनी मग ‘साथ आटोक्यात’ असंही छापून वर्मी घाव घातला.
               अज्ञान आणि फाजील आत्मविश्वास यांच्यातील सेतू म्हणून यांच्याकडे व्यवहारी शहाणपणही बक्कळ असतं. अशाच एका जी.पी.कडे एकदा डाव्या पायाला फ्रॅक्चर असताना उजव्या पायाला प्लॅस्टर घालण्यात आलं. पेशंटला खाटेवर टाकताच नातेवाईक बिथरले. पण या आसामीने थंडपणे त्यांना समजावलं, ‘हे प्लॅस्टर कच्चं आहे. नुसतं मापाला घातलं आहे. मोडलेल्या पायाचं माप कसं घेणार? तेव्हा आता माप घेवून झालं की हे काढून मोडलेल्या पायाला प्लॅस्टर करण्यात येईल!’ वर ‘ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात नाक खुपसू नये!’ हे ही सांगायला डॉक्टर महाशय विसरले नाहीत. (जाता जाता आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट एवढीच की हीच, अगदी हीच कथा, मी ससूनमध्ये घडल्याचंही ऐकलं आहे!)
                  अशी तयारी कमावण्यात थोडी निडर वृत्तीही असावी लागते. अनुभवही लागतो. अनुभव हा उत्तम गुरु असला तरी चुकांच्या रुपाने कॅपिटेशन फी भरपूर वसूल करतो. त्यामुळे काही मनुजे या माहौलमध्ये मूळ धरत नाहीत. त्यांची प्रॅक्टिसही मग रडत खडत चालते किंवा जोरात चालली तरी त्यात त्यांचे चित्त रमत नाही. ते तृप्त नसतात. मग ते शेती, घरचा व्यवसाय सांभाळणे, मल्टी लेव्हल मार्केटींग, ब्युटीपार्लर, हेल्थ क्लब, जनता संपर्क अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापन, मेडिकल सर्जीकलचे होलसेल दुकान, सनदी अधिकारी, राजकारण, अभिनय वगैरे असंख्य क्षेत्रात संधी दिसताच शिरतात आणि यशस्वी होतात. या सर्व क्षेत्रात माझ्या थेट परिचयाची जी.पी. मंडळी आहेत. त्यांच्या स्वकष्टार्जित यशाचं मला विलक्षण कौतुक तर आहेच पण आदरही आहे.
               काही मंडळी स्वतः प्रॅक्टिस करण्याऐवजी एखादया पेशालिस्टाचे कायमस्वरूपी असिस्टंट म्हणून काम करतात. समुपदेशन, फॉलोअपचे पेशंट पहाणं, ICU त इमर्जन्सी ड्यूटी म्हणून काम करणं, असं काहीतरी ते झट्दिशी आत्मसात करतात आणि पेशालिस्टांचे उजवे-डावे हातच बनून जातात. ही रचना उभयपक्षी फायद्याची असते. जी.पीं.ना एक सुरक्षित घरटं मिळतं. कोणत्याही चुकांची त्यांच्यावर थेट जबाबदारी नसते. जे शिकलो, त्याच क्षेत्रात काम केल्यामुळे आत्मसन्मान राखला जातो. ‘अयशस्वी डॉक्टर’ असा शिक्का बसत नाही. मनापासून वैद्यकी आवडत असेल तर व्यावसायिक समाधानही मिळतं. पण तरीही आता यापुढे कितीही करतूद दाखवली तरी असिस्टंटचे आपण कन्सलटंट कदापि होणार नाही, याचा सल असतोच. अगदी खोल, ठसठसणारा.
               पेशालिस्टांचं तर असिस्टंट फौजेशिवाय पानंही हलत नाही. सर्व लिखापढीची कामं ही मंडळी करतात. रेकॉर्ड नीट सांभाळतात. डॉक्टरांच्या ऐवजी वेळोवेळी प्रकट होतात आणि पेशंट गणाची आस्थेनं पण प्रसन्न चित्ताने बोळवण करतात. ICUतल्या पेशंटवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात. बदलत्या परिस्थितीनुसार उपचार बदलतात किंवा निदान योग्यवेळी पेशालिस्टांना कळवतात. (त्याहून महत्वाचं म्हणजे अयोग्यवेळी कळवत नाहीत).
                                   सारीच मंडळी अशी अतिकुशल असतात का? नाही. सुरुवातीला नाहीच नाही. नंतर होतात. ICUचं जग यांनी कॉलेजमध्ये शिकलेलंही नसतं आणि पाहिलेलंही नसतं. कायद्याने त्यांना आधुनिक औषधे (म्हणजे अॅलोपॅथीची) वापरायला परवानगी नाही. पण (कुणाच्या तरी देखरेखीखाली) ICU/हॉस्पिटलमधे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करण्याची मुभा आहे. याचं कारण आपल्याकडे असलेली परिचारिका आणि पॅरामेडीकल लोकांची तीव्र टंचाई. नर्सेस मिळत नाहीत, पण त्यांच्या पगारात डॉक्टर मिळतात! भारतात डॉक्टर जास्त आणि नर्सेस अल्प आहेत. परदेशात वरील सर्व कामं त्या त्या पेशालिस्टांच्या पेशालिस्ट नर्सेस करतात. यामध्ये भारत एक पाऊल पुढे आहे. ही कामं आमचे डॉक्टर करतात! कमी तिथे आम्ही, या न्यायानं ह्या डॉक्टरांनी ही क्षेत्रं व्यापली आहेत.
                   या क्षेत्रातल्या मुली सुखी म्हणायच्या. इथे पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरुषांना तोटा होतो. कुटुंबाच्या आमदनीमध्ये पुरुषाची भूमिका दुय्यम असून चालत नाही. त्यामुळे लेच्यापेच्या पदवीच्या बळावर पुरुषांना सतत झुंजत रहावं लागतं. त्यांच्या ज्ञानाचं तोकडेपण वेळोवेळी समाजापुढे उघडं पडत असतं. त्यांचा नामोल्लेखही थंडीतापाचे डॉक्टर, साधे डॉक्टर, सुईचे डॉक्टर असा होतो. हे न्यून पाठीवरील कुबडासारखं झाकू म्हणता झाकता येत नाही.
                  मुलींची मात्र झाकली मुठ सव्वालाखाची, सहज खपून जाते. सुस्वरूप असतात त्या एम्.बी.बी.एस्/एम्.डी./एम्.एस्. डॉक्टर नवरा करतात. (मुलांना ही सोय नाही. त्यांना एम्.डी./एम्.एस्. बायका मिळत नाहीत.) असे विवाह बहुतेकदा सजातीय असतात. जातीत उच्चशिक्षित मुलगी नाही. परजातीतली चालत नाही, मग तडजोड म्हणून अशा मुलींना वरलं जातं. जे काम बाहेरच्या दवाखान्यात पगारावर करतात ते ह्या बायका नवऱ्याच्या दवाखान्यात आपण होऊन करतात. नर्स, व्यवस्थापक, कौन्सिलर, हिशोबनीस अशा सर्व क्षेत्रात पारंगत होतात. स्त्री, सखी, सचिव, भार्या अशी चौपदरी भूमिका बेफाट निभावतात. घर आणि दवाखाना असा तोल छान सांभाळतात. अगदी उच्चशिक्षित बायकोही अशी साथ देईल का नाही हे सांगता येत नाही. बहुदा नाहीच देणार. तिला स्वतःची प्रॅक्टीसही सांभाळायची असते.
                    गेली ३० वर्षे मी वैद्यकीशी संबधित आहे. जे पहिलं, ऐकलं आणि अनुभवलं त्या जी.पी.नामे जमातीविषयी ही काही निरीक्षणं. आता वाटतंय की, संपादकांनी जी.पीं.बद्दल लिहा असं सांगितलं म्हणून जी.पी. आणि स्पेशालिस्ट असे शब्द आले. उद्या स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट असा लेख लिहायला सांगितला तर तपशीलातले बदल वगळता हाच लेख लागू पडेल.
               बी.ए.एम्.एस्. आणि बी.एच्.एम्.एस्. कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा झरा आता आटु लागला आहे. नव्या युगात चलाख मुलांना अनेक क्षेत्रं खुणावत आहेत. डॉक्टरकीही आता पूर्वीइतकी वलयांकित राहिलेली नाही. डॉक्टरांच्या रामबाण इलाजाबरोबरच त्यांच्या कृष्णकृत्यांचीही चर्चा असते. कित्येक होमिओपॅथिक कॉलेजं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिवसेंदिवस कायदेही कडक होत आहेत. तुम्ही बी.ए.एम्.एस्. करून वर एम्.डी.(आयुर्वेदीय स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र) जरी झाला तरी तुम्हाला सोनोग्राफी, गर्भपात वा नसबंदी करण्याची कायदेशीर परवानगी नाही!! या मंडळींना अॅलोपॅथीची औषधे वापरायलाही परवानगी नाही, मात्र हा कायदा कठोरपणे अंमलात आणला जात नाही. पण एखादा कोर्टात गेला तर डॉक्टर दोषी ठरतो. थोडक्यात भिन्न पॅथीय प्रॅक्टीस करणाऱ्यांवर अशा कायद्याची छाया गडद होत आहे. त्यामुळे कायमचा तणाव राहतो.
               प्रत्येक बॅचमधील, अगदी एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी मंडळी शुद्ध आयुर्वेद किंवा शुद्ध होमिओपॅथीची प्रॅक्टीस करतात. ते जे करतात त्याची वैज्ञानिक वैधता हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल, पण त्यांनी प्रसृत केलेले लेख, माहिती पुस्तिका, जाहिराती वगैरेतील अतिरंजीत दावे, अर्धवैज्ञानिक, अर्धसत्य विधाने पाहता या उपचार पद्धती प्रश्नचिन्हांकित आहेत हे  निश्चित.
              एकेकाळी जी.पी.हे फॅमिली डॉक्टर होते. फॅमिली डॉक्टर ही किती उपयुक्त आणि चांगली संस्था होती असं स्मरणरंजन सगळयांनाच भावतं. मंडळी मग आपापल्या डॉक्टरच्या नावे कढ काढतात. एका संथ, स्वस्त आणि वैद्यकविश्वावर विश्वास असणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून ती संस्था उत्क्रांती झाली होती अशी रचना डॉक्टरनी किंवा समाजानी जाणीवपूर्वक निर्माण केलेली नव्हती. जीवनशैली बदलली. विद्युतगती, अवास्तव अपेक्षा आणि फट् म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याची शक्यता अशा वातावरणात फॅमिली डॉक्टर ही संस्था लयाला गेली यात नवल ते कसलं? ‘लोकशाहीमध्ये लोकांच्या लायकीप्रमाणे त्यांना राज्यकर्ते लाभतात’ असं म्हणतात. तसंच काहीसं वैद्यक विश्वाचंही आहे. लोकांना डॉक्टरही त्यांच्या लायकीप्रमाणेच मिळतात.  


प्रथम प्रसिद्धी :- अंतर्नाद, सप्टेंबर २०१०.  

Sunday 8 November 2015

अग्गोबाई! अरेच्चा!!

अग्गोबाई! अरेच्चा!!

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि. सातारा. पिन. ४१२ ८०३ 

मो.क्र. ९८२२० १०३४९

‘महिलासाठी खास व्हायग्रा’ आलंय बरं का बाजारात. नेहमीप्रमाणे ते सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. पण येईल लवकरच, इंडियात. भारतात यायला थोडा आणखी वेळ लागेल.

बातमीनुसार हे खास स्त्रियांसाठी निर्माण केलेलं कामेच्छावर्धक आहे. चांगलं देवाब्राम्ह्णांच्या साक्षीनं लग्न तर झालंय पण तिला आता ‘ह्यात’ काही इंटरेस्ट उरला नाही, ही स्थिती बरेचदा आढळते. ‘निष्काम कर्मयोग’ हा एक प्रॉब्लेमंच आहे, निदान या क्षेत्रात. आज काय डोकं दुखतंय, उद्या कंबर, परवा आणखी काही; हे असंच चालू रहातं मग. लांब रहावं म्हटलं तर नवऱ्याला वैताग, जवळ येऊ द्यावं म्हटलं तर बायकोला वैताग आणि डॉक्टरांना सांगावं म्हटलं तर त्यांनाही हे सगळं ऐकून घ्यायला आणि औषध द्यायला कटकटीचंच वाटतं.

बायकांच्या काम-निरसतेवर आधीही एक औषध होतं; टेस्टॉस्टेरॉन; म्हणजे तेच ते, पुरुष ज्या संप्रेरकामुळे ‘पुरुष’ बनतो ते! हा नर-रस नारीला कामेच्छा वर्धक ठरतो. पण तो देणं जरा गोचीकारकच असतं. तो वापरता येतो त्यातल्या त्यात पाळी बंद झालेल्या बायकांच्यात. आता मुळात अशा हरी हरी करायच्या वयात हरित मन राखणाऱ्या किती? शिवाय त्याचे नको नको ते साईड इफेक्ट असतात. त्या मुळे हे टेस्टॉस्टेरॉन काही या क्षेत्रातलं मान्यताप्राप्त औषध नाही. म्ह्णून या नव्या औषधाचं, फ्लिबेनसेरीनचं कवतिक.

फ्लिबेनसेरीन हे काही, टेस्टॉस्टेरॉनसारखं, संप्रेरक नाही. मेंदूतल्या नसानसात होणाऱ्या संदेशवहनात ढवळाढवळ करून ते कामेच्छावर्धक परीणाम साधतं. ते पुरुष संप्रेरक वगैरे नसल्यामुळे सगळ्या वयातल्या स्त्रियांना चालतं. पण सगळ्यांप्रती सारखाच परिणाम होतो असं मात्र नाही. भाग्याची अंगठी जशी कुणाला लाभते , कुणाला नाही; तसाच हा प्रकार. परिणाम जाणवायलाही किमान महिनाभर गोळ्या घ्याव्या लागतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लिबेनसेरीनने  ‘इच्छा’ वाढली तरी ‘तृप्ती’ची गॅरँटी नाही.

ह्या फ्लिबेनसेरीननी प्रश्नांचं एक मोठं मोहोळच उठवलंय.

मुळात बायका हीच एक डोकेदुखी असल्याचं सार्वजनिक मत आहे, त्यात बायकांचा अभ्यास म्हणजे आणखी डोकेदुखी आणि त्यातही ह्या असल्या बाबतीतला अभ्यास म्हणजे विचारायलाच नको. या बाबतीतला शास्त्रीय अभ्यास सुरु झाला मोकळ्या ढाकळ्या अमेरिकेत. तिथल्या मास्टर्स आणि जॉन्सन जोडीनं कामचक्र वर्णीलं आहे. कामातूरता (arousal), उच्चस्तर अवस्था (plateau), कामतृप्ती (orgasm)  आणि कामशमन (resolution) अशा टप्प्यांमधून कामक्रीडा जात असते. रोजमेरी बसून वगैरे संशोधकांनी लैंगिक उत्तेजना (stimulus) मग कामातूरता (arousal) मग कामेच्छा (desire) आणि मग कामतृप्ती (orgasm) असा क्रम मांडला आहे. रोजमेरी यांच्या मते पुरुषांची कामतृप्ती वीर्यपतनाशी संपते. स्त्रियांतमात्र कामतृप्ती (orgasm) हा शेवट नसून त्याद्वारे जोडीदाराशी  मानसिक, भावनीक, प्रेममय तादात्म्य हा कळसाध्याय आहे.

स्त्रीयांमध्ये आधी लैंगिक उत्तेजना (stimulus) मग कामातूरता (arousal) आणि मग कामेच्छा (desire) असा क्रम आहे आणि पहिल्या दोन पायऱ्या या सर्वस्वी वातावरण आणि जोडप्याच्या वागणुकीवर अवलंबून आहेत. गोळीवर नाहीत. गोळी खाल्यामुळे डायरेक्ट तिसरा अंक सुरु होणार काय? आणि झाला तरी पहिले दोन अंक न बघता तिसऱ्याची रंगत ती काय असणार? पुरुषांचे कामविचार, कामाचार ‘नाही संभोगसुख  तर नाही प्रेमभावना’ या घोषवाक्यानुसार चालतात. पण स्त्रियांचं याच्या नेमकं उलट असतं; ‘प्रेमभावाशिवाय निरर्थक आहे संभोग’ हे त्याचं घोषवाक्य. हे प्रेम, समर्पण, तादात्म्य ह्या गोळीनीच काय गोळीबारानेही साधता येणार नाही. फ्लीबेनसेरीन म्हणजे काही वशीकरण गुटी नाही.

लैगिक आचारात, ‘नॉर्मल कामासक्ती’ कशाला म्हणायचं, हे एक त्रांगडंच आहे. नॉर्मल म्हणायचं कशाला, आणि ते मोजायचं कसं? अमुक इतक्या मिठ्या? तमुक इतके मुके? का अमुक अमुक काळात तमुक तमुक, कामुक चाळे? का अमुक वेळात तमुक वेळा संभोग? नॉर्मल कामासक्ती ठरवता ठरवता एवढी त्रेधा उडते  तर कामनिरसता कशाला म्हणायचं हे ठरवणंही अवघड. शिवाय हा समागम कुणाशी? कसा? निव्वळ यौनमैथुन? का गुदमैथुनही? आणि मग मुखमैथुन?  शिवाय हस्तमैथुनाचं काय? चालेल का नाही? आणि समलिंगीसंबंध? एखाद्या समलिंगी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला फ्लीबेनसेरीन द्यायचं का नाही?

यातल्या काही किंवा सगळ्याला अनैसर्गिक मानणारी जनता आहे; या साऱ्याचा सुखेनैव उपभोग घेणारीही जनता आहे. ‘त्याची/तिची तयारी आहे, माझा होकार आहे, मग हरकत घेणारे तुम्ही कोण?’ हा त्यांचा प्रश्न आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र असं मानतं की परस्पर सहमतीनं आणि पुरेशी स्वच्छता बाळगून हे होत असेल तर कुणी मधे पडायचं कारणंच काय?

एकपतीव्रत/एकपत्नीव्रत हाच सध्याचा प्रस्थापित, समाजमान्य लैंगिक व्यवहार आहे. ‘व्रत’ म्हटलं की त्याबरोबर ‘वैकल्य’ही आलंच. वैकल्य म्हणजे स्वतः जाणून बुजून भोगलेला त्रास. जीवशास्त्राला अशी दाट शंका, नव्हे खात्रीच आहे, की माणूस हा मूलतः अनेक जोडीदार राखणारा प्राणी आहे. तेव्हा माणसानं स्वतःवर लादलेलं एकपती/पत्नीव्रताचं बंधन हे अनैसर्गिक असून, एक ‘वैकल्य’च आहे. तेव्हा कालानुक्रमे एकाच जोडीदाराबद्दलची असोशी कमी होत जाणारच; कामेच्छा सरत जाणारच. नभात चंद्रमा जरी तोच असला आणि एकांती कामीनीही जरी तीच असली तरी ‘ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी’; असा अनुभव येणारच. आता यावर गोळी हे उत्तर असूच शकत नाही.

मुळात कामेच्छा उगवते कोठून हेच धड माहीत नाही तर काम निरसतेचा काय अभ्यास करणार कप्पाळ! कामेच्छेवर परिणाम घडवणाऱ्या अनेक बाबी आहेत. आजारपण, वय,  वयानुरूप कमी कमी होणारी संप्रेरके, नात्यातील ताणतणाव, भांडणे, नैराश्य निवारक औषधांच सेवन, धार्मिक-सांस्कृतिक समजुती, कमअस्सल स्व-प्रतिमा...वगैरे, वगैरे. शिवाय तिची तयारी आणि त्याचा होकार; किंवा, तिचा होकार आणि त्याची तैयारी, ह्याचंही टायमिंग जुळायला हवं. गोळीनी हे नक्कीच होणार नाही.

थोडक्यात वर नमूद कारणांपैकी कशानी तरी कामेच्छा गेली तर ती गोळीनी थोडीच परत येणार आहे? मदन आणि रतीचे सूरच जर जुळत नसतील तर कितीही गोळ्या खाल्या तरी मदनबाण हुकणारच, रती कटाक्ष चुकणारच. ना मदन रतीरत होणार ना रती मदनरंगी रंगणार!

पण आपण कितीही आदळआपट केली, तरी काम विकार असतात हे सत्य आहे. त्यांचा जमेल तितका आणि जमेल तसा अभ्यास करायला हवा, हे ही सत्य आहे. अशाच अभ्यासातून जी आहेत ती औषधं निपजली आहेत, हे ही सत्य आहे. अभ्यास अवघड असला, तरी अशक्य नक्कीच नाही. तसं तर गर्भनिरोधन, टेस्ट ट्यूब बेबी वगैरे अशक्यच होतं एके काळी. तेव्हा प्रयत्ने किम् दरिद्रता?

अभ्यास करायचा तर कामनिरसतेची व्याख्या करायला हवी. ‘एखाद्या स्त्रीला, कायम  वा वारंवार, कामेच्छा होत नसेल आणि तिला किंवा जोडीदाराला ह्याचा त्रास जाणवत असेल, तरच ह्याला कामनिरसता म्हणता येईल’; अशी एक सर्वमान्य व्याख्या आहे.  निव्वळ एखादीला काम क्रीडेबाबत अनिच्छा आहे, पण या बाबत तिची काsssही तक्रार नाही, त्याचीही तिच्याबद्दल नाही आणि दोघांची एकमेकाबद्दलही काही तक्रार नाही; तर मग हा काही ‘आजार’ समजला जात नाही. पण याच परिस्थितीचा जर कुणाला जाच वाटायला लागला, तर ह्याला आजाराचं लेबल लावून, उपायाचा शोध घेणं आवश्यक आहे. बहुतेक कामविकारांच्या व्याख्या अशाच असतात. संबंधित व्यक्तीला जर प्राप्त परिस्थितीचा त्रास होत नसेल, तर वैद्यकशास्त्रानं तिथे नाक न खुपसणंच उत्तम. व्याख्येपाठोपाठ या विषयावरचे अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले. काही अभ्यासकांच्या मते तब्बल ४३% महिलांना हा ‘त्रास’ जडला आहे म्हणे!

हे आकडे पहाता या अवस्थेला ‘विकृती’ म्हणण्याऐवजी ‘सहज प्रकृती’ का म्हणू नये असाही प्रश्न आहे. रे मोयनिहान या पत्रकाराने ब्रिटीश मेडिकल जर्नल मधील आपल्या निबंधात असा खुला आरोप केला आहे की शास्त्रज्ञांनी काम-निरसतेवर औषध वगैरे काही शोधलं  नसून; एक तथाकथित औषध खपवण्यासाठी साठी, ‘काम-निरसता’ ह्या आजाराचा शोध औषध कंपन्यांनी लावला आहे. या आजाराची व्याख्या करू पहाणारे आणि यावर औषध शोधणारे सगळेच औषध कंपन्यांना मतलेले आहेत. निसर्गतःच कमी अधिक होणारी कामासक्ती, आजाराच्या व्याख्येत कोंबून, त्यावर ‘इलाज’  विकण्याचा हा धंदा,  गोरखधंदा आहे! जी गोष्ट ४३% जनतेला लागू आहे, त्याला ‘आजार’ कसं म्हणावं बरं? उलट एका सुंदर आणि आत्यंतिक व्यक्तीनिष्ठ अनुभवाचं हे टोकाचं वैद्यकीयीकरण आहे! शुद्ध बाजारीकरण आहे!!

पण अभ्यासक म्हणतात जिचं जळतं तिला कळतं. प्रत्यक्ष रुग्णांचे अनुभव न बघता निव्वळ लांबून शेरेबाजी करणं सोपं आहे, प्रसिद्धीही सहज मिळते पण अंतीमतः ते अहीताचंच आहे. व्यसनाधीनता, नैराश्य एवढंच काय वयानुरूप होणारी गुडघ्याची झीज आणि गुडघेदुखीही, आधी आजारात मोडली जात नव्हती. पण या साऱ्यावर आज अभ्यास आहेत, उपाय आहेत आणि या पासून फायदा झालेले शेकडो लोक आहेत. तेव्हा अभ्यासली कामनिरसता आणि शोधलं औषध तर त्यात एवढं बावचळण्यासारखं काय आहे? प्रवास चुकत माकत, ठेचकाळतंच होणार आहे, पण म्हणून आधीच हात पाय गाळून बसून कसं चालेल? औषधांचे शोध लागतात तसे आजारांचेही लागतात हे सत्यच आहे. कामनिरसता बहुआयामी आहेच, त्याचे उपायही तसेच असतील. गोळी हा फक्त एक पर्याय आहे. औषधांचा उपचार हा, समुपदेशन वगैरे  अन्य उपायांबरोबर करायचा आहे. तेव्हा गोली को गोली मारो, वगैरे फिजूल आहे.  

दुसरीकडे स्त्रीवाद्यांचा प्रत्येक गोष्टीला आक्षेप आहे. त्यांच्या मते बायकांना काय वाटतं ते आजवर पुरुषच परस्पर ठरवत आलेत. स्त्रियांची कामभावना कामतृप्ती वगैरे निव्वळ पुरुषी दृष्टीकोनातून अभ्यासली गेली आहे. बहुसंख्य संशोधक हे पुरुष असल्यामुळे असं होणारच. अगदी वैद्यकीय महाविद्यालयातल्या शरीरशास्त्राच्या पुस्तकातील स्त्रीजननेंद्रियांच्या चित्राला सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. या चित्रांमध्ये योनीमार्ग अगदी रुंद दाखवलेला असतो. वास्तविक तो अगदी फटीसारखा असतो. शिश्निका हा स्त्रीचा सर्वात महत्वाचा काम-अवयव असतो, पण वैद्यकीय पुस्तकात ह्या शिष्निकेला काडी इतकीही किंमत दिलेली नसते. पुरुषकेंद्री कामविज्ञानाचा भर यौनसंबंध कसे सौख्यपूर्ण होतील यावर आहे तर स्त्रियांचे कामसौख्य शिष्निकेच्या मर्दनात सामावले आहे. लिंगाचा योनीमार्गात प्रवेश होणं, समागम होणं, स्त्रीला कमी महत्वाचं आहे. (योनीमार्गाच्या बाहेरच्या तीन चार सेंटीमीटर पल्याड स्पर्श संवेदनाच नसतात पण लिंगाच्या लांबीला पुरुषांच्या नजरेत अवास्तव महत्व आहे. लिंगवर्धक, निरुपयोगी (पण प्रसंगी उपद्रवी) उपायांच मार्केट चांगलंच तेजीत आहे.) बरेच पुरुष वीर्यपतन झालं की हतवीर्य होऊन झोपून जातात. स्त्रीच्या कामतृप्तीसाठी शिश्निका मर्दनाची जबाबदारी त्यांच्या गावीही नसते. आपली ही गरज नवऱ्याच्या कानावर घालण्या इतका संवादही नसतो. गोळीमुळे कामेच्छा वाढली तरी तृप्तीची ग्यारेंटी नाही ते या मुळेच. ‘तरुण आहे रात्र अजुनी, तू असा निजलास का रे? अजुनी मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे?’ हा अनुभव आपल्याला वाटतो त्या पेक्षा सार्वत्रिक आहे!!

या क्षेत्रातल्या शास्त्रीय अभ्यासाला बळ आलं ते व्हायग्रा च्या यशामुळे. १९९८ मध्ये व्हायग्राचा जन्म झाला. लिंगाला ताठरता येण्यासाठी हे चांगलंच लागू पडलं. हे नसांवर नाही तर लिंगाला होणाऱ्या रक्तपुरवठयावर परिणाम करतं. लिंगाला होणारा रक्त पुरवठा व्हायग्राने वाढतो आणि परिणामी लिंगाची ताठरता वाढते. पुरुषांना फायदा होतो तर स्त्रियांनाही काही ना काही तरी फायदा असणारच; अशा विचारांनी ह्याही दिशेनी संशोधन जोरात सुरु झालं. आठ वर्षाच्या अथक परिश्रमनंतर ‘व्हायग्रा’फेम फायझर कंपनीनी व्हायग्राचा स्त्रियांच्या कामविकारांवर काहीही उपयोग नसल्याचं सांगत, संशोधन थांबवलं. याबाबतीत जननेंन्द्रीयांवर नाही तर मेंदूवर असर करणारं औषध हवं असं या टीमचं मत पडलं. फ्लिबेनसेरीन हे नेमकं असंच औषध आहे. मूलतः नैराश्य निवारक म्हणून अभ्यासलेल्या या औषधाचा हा कामेच्छावर्धक पैलू लक्षात आल्यावर त्या दिशेनं संशोधन सुरु झालं.

पण हे सारं संशोधन सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलं. औषध कंपन्यांच्या आश्रयाने  ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर द स्टडी ऑफ वुमेन्स सेक्सुअल हेल्थ’ अशा भारदस्त नावाची एक संस्था देखील स्थापन झाली. औषध कंपन्यांची तळी उचलून धरणं हे हिचं काम. लगोलग विरुद्ध गटाकडून लैंगीकतेच्या या वैद्यकीयीकरणाविरुद्ध, बाजारीकरणाविरुद्ध चळवळी सुरु झाल्या.

फ्लिबेनसेरीनचा जन्म २००९चा पण एफ.डी.ए. मान्यता मिळायला २०१५ उजाडलं. छप्पन प्रश्न आणि सतराशे साठ शंका. शिवाय यात मोठं अर्थकारण, औषधकारण, स्त्रीकारण, पुरुषकारण गुंतलेलं. एफ.डी.ए.च्या मान्यतेला जसजसा वेळ लागायला लागला तसतसं वेगवेगळी मंडळी आपआपली मत अधिकाधिक चढाओढीनं मांडायला लागली. कंपन्यांच्या आश्रीतांनी मान्यता ताबडतोब मिळावी असा सूर लावला तर स्त्रीवादी आघाडीतल्या  ‘आवर बॉडीज आवर सेल्फ्स’वाल्यांनी अमान्यता ताबडतोब मिळावी असा!

‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर द स्टडी ऑफ वुमेन्स सेक्सुअल हेल्थ’नं चार हजारावर सह्यांचं निवेदनच एफ.डी.ए.ला पाठवलं. ताबडतोब मान्यता मिळावी असं ह्यात हिरीरीनं मांडलं होतं. मग सह्यांची प्रतीमोहीम निघाली. पण मान्यता देवू नये म्हणणाऱ्या ६५२च सह्या मिळाल्या. वय, नातेसंबध, प्रणय वगैरेमुळे सुस्तावलेली कामेच्छा जर गोळीसरशी जागृत होणार असेल तर ही तारुण्यगुटी हवीच होती सगळ्यांना. ‘फायदा नाही झाला तर नाही वापरली गोळी पण उपलब्ध असायला काय हरकत आहे?’ असा हा विचार.

स्त्रीवाद्यांविरुद्ध एका गटानी ‘फिट्मफाट मोहीम’ (even the score) राबवली. ‘स्त्रियांसाठी जीवनावश्यक नसेना का, पण ‘काम-जीवनावश्यक’ असलेल्या औषधाला मान्यता देण्यात, जाणून बुजून दिरंगाई होते आहे! हा मुळी एफ.डी.ए.च्या लिंगभेदी दृष्टीकोनाचा सणसणीत पुरावाच आहे!!’ असा सनसनाटी आरोप केला गेला. ‘मेली पुरुषांसाठी तेवढी हीsss सारी औषधं (त्या वेळी पुरुषांसाठी काम विकारांसाठी तब्बल २६ औषध मान्य होती.) आणि आम्हां बायकांना काहीच नाही? पुरुषी षड्यंत्रच आहे मुळी हे! बायकांची वेळ आली की अस्सेच कच खातात मेले सगळे पुरुष! आत्ताच्या आत्ता मान्यता दया, दया, दया!!!’ असा एकूण युक्तीवाद होता. पुढे या फिट्टमंफाटवाल्यांनी सोळा खासदारही आपल्या बाजूला जुंपले, साठहजारावर सह्या गोळा केल्या, आणि प्रचाराची राळ उडवून दिली.

एकूणच मान्यता दिली तरी पुरुषी षड्यंत्र आणि न द्यावी तरीही पुरुषी षड्यंत्र असा मामला होता. या द्वादश यंत्रात पुरुष अगदी भरडून निघत होते! २०१४च्या ऑक्टोबरमध्ये एफ.डी.ए.ने या प्रकरणी दोन दिवस सुनावणी घेतली. अनेक संस्था, गट, तज्ञ, अधिकारी यांच्यासह काही कामनिरसताग्रस्त अशा पेशंट बायकाही तिथे हजर होत्या. अर्थात त्यांच्या येण्याजाण्याचा खर्च स्प्राउट या औषधकंपनीनी केला होता!

शेवटी १८ विरुद्ध ६ असा निकाल फ्लिबेनसेरीनच्या बाजूनं लागला!!

दुसऱ्याच दिवशी फ्लिबेनसेरीन बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर ४६% ने वधारले!!!