Sunday 17 December 2023

वसुंधरेचे शोधयात्री: पुस्तक परिचय

रविवार, दि. १७  डिसेंबर २०२३ 
पुस्तक परिचय अभियान - अखंड परिचय सत्र – पुस्तक क्र. १२८२   
आठवडा – १८३ 
परिचय सत्र - २ रे 
सप्ताह कालावधी ११ डिसेंबर २०२३  ते १८ डिसेंबर २०२३ 
शीर्षक – वसुंधरेचे शोधयात्री  
लेखक – डॉ. अनुराग लव्हेकर 
प्रकाशक – राजहंस प्रकाशन   
प्रथमावृत्ती – प्रथमावृत्ती जानेवारी २०२३ 
किंमत – रु ५००/-   
पृष्ठसंख्या – ३४०   
परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

‘वसुंधरेचे शोधयात्री’, हे डॉ. अनुराग लव्हेकर याचे पुस्तक ‘राजहंस’सारख्या मातबर प्रकाशन संस्थेने काढलेले आहे. डॉ. अनुराग डी.एम.(गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी) आहे. म्हणजे पोटा-आतड्याचा डॉक्टर आहे. मूळ गाव नांदेड. सध्या असतो बेंगळुरूमध्ये. तिथल्या, या क्षेत्रातल्या अग्रगण्य हॉस्पिटलमध्ये तो अग्रगण्य कन्सल्टंट आहे. आपल्या क्षेत्राशी अजिबात संबंध नसलेल्या बाबींचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या वेड्या डॉक्टरांपैकी तो एक. 

 अनेक धाडसी प्रवासी वसुंधरेचा शोध घेत राहिले.  पूर्वी पंचक्रोशीच्या बाहेर फारसं कोणाला जावं लागायचं नाही. जाऊ नये, असा संकेतही होता. देशाटन व्हायचं ते तीर्थाटन  म्हणून. मात्र माणसाला आदीम काळापासून अज्ञात भूप्रदेशांचा शोध घेण्याची उर्मी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात, कलाहारी पासून ते टुंड्रा प्रदेशापर्यंत माणसं आहेत.   त्यांच्या भाषा आहेत, त्यांच्या संस्कृती आहेत आणि ज्यावेळी प्रवास चालत होता, तीव्र थंडी अथवा उन्हाळ्यापासून बचावाची साधने मर्यादित होती, अशा काळात या वस्त्या वसलेल्या आहेत. 

ज्ञात इतिहासात युरोपियनांना ‘प्रवासी पक्षी’ बनण्याचे पंख पहिल्यांदा फुटले आणि मग साम्राज्य विस्तारासाठी, धर्मप्रसारासाठी, संपत्तीसाठी आणि कधी कधी निव्वळ साहस म्हणून, या माणसांनी आपल्या बोटी सप्तसागरात हाकारल्या. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती  अनंत अन आशा, किनारा तुला पामराला’, असं म्हणत ‘खंड खंड सारा’ जिंकून घेतला.  या दर्यावर्दींमुळे जगाचा इतिहास आणि भूगोल बदलला. मराठीत त्यांची अगदी त्रोटक  माहिती उपलब्ध आहे. त्यांची कहाणी मांडण्याचा हा प्रयत्न.

कॉन्स्टंटीनोपल तुर्कांनी जिंकल्यामुळे आशियाकडे येणारा खुष्कीचा मार्ग बंद झाला, पर्यायी मार्गाची निकड निर्माण झाली, पूर्वेकडील संपत्ती, मसाल्याचे पदार्थ, रेशीम, यांचं प्रचंड आकर्षण हे या शोध मोहिमांमागील अर्थ-राजकीय कारण. पहिल्या भागात ही सारी  पार्श्वभूमी लेखकाने विशद केली आहे.  

युरोपातून समुद्र मार्गे आशियात यायचं म्हटल्यावर आधी आफ्रिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्यानी प्रवास घडले. होती ती फक्त शिडाची गलबते. प्रवास शिडात वारं  भरलं की मगच शक्य. त्यामुळे वाऱ्यांचा अभ्यास खूप महत्वाचा ठरला.  त्याबाबतीतले विवेचन दुसऱ्या भागात केले आहे. जाता जाता एक नोंद फक्त. युवहाल नोहा हरारीने असा उल्लेख केला आहे की त्याकाळातील नकाशात किनाऱ्यालगतच्या प्रदेशाची स-विस्तार माहिती आहे मात्र आफ्रिकेच्या अंतरंगाबाबतचे अज्ञान, काल्पनिक पऱ्या, राक्षस, चित्रविचित्र प्राण्यांची चित्रे काढून भरून काढले आहे. नंतरच्या काळात मात्र जागा कोऱ्या ठेऊन हे अज्ञान प्रकट मांडले आहे. हरारी म्हणतो, ‘अज्ञानाचा असा स्वीकार, अशा रीतीने अज्ञान मान्य करणे हे ज्ञानाच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल ठरते. रिकाम्या जागा कल्पनेने भरणे चूक आहे.’ 

तिसऱ्या भागात, ‘भारताचा शोध आणि युरोपियनांचा भारतातील साम्राज्यविस्तार’ वर्णीला आहे. विषय जिव्हाळ्याचा असल्याने मला तरी हा भाग अतिशय वाचनीय वाटला. 

अमेरिकेचा शोध तसा अपघातानेच लागला.  त्या खंडाचा पूर्व किनारा आधी पिंजून काढला गेला आणि मग गोरे आणि त्यांचे साम्राज्य आत आत पसरत गेलं. चौथ्या भागात ही साहसकथा येते. वास्तविक ही निव्वळ साहस कथा नाही. एक क्रूर, करुण, कुटील आणि कर्मधर्मसंयोगी  साहस कथा आहे. मात्र या पुस्तकात हा भाग येत नाही. हे त्या खंडाच्या शोधाबद्दल माहिती देणारे पुस्तक आहे. युरोपीयनांनी, विशेषतः स्पेन आणि पोर्तुगीज दर्यावर्दींनी अत्यंत निर्घृपणे   स्थानिकांना सर्वार्थाने उद्ध्वस्त केले. गोव्याचा इतिहासातही हे सारे आहे. अनुरागचे पुस्तक वाचून कोणांस हा ही इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा व्हावी म्हणून ही माहिती. 

 पाचव्या भागात ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स आणि दोन्ही ध्रुवांपर्यंत माणसाची मजल कशी गेली हे दिले आहे. 

भरपूर नकाशे चित्र फोटो आणि दोन परिशिष्ट पुस्तकाला जोडलेली आहेत. त्यामुळे पुस्तक जड आणि विद्वतजड असं दोन्ही झालं आहे. मात्र नकाशे अधिक स्पष्ट आणि मोठे असायला हवे होते. 

माहिती बरोबरच लेखकाचे चिंतनशील मनही आपल्याशी बोलत असते. एके ठिकाणी अनुराग म्हणतो, ‘माणसाकडे नेहमी विनाशक या भूमिकेतून पाहणे चुकीचे आहे. उदय आणि विलय हे निसर्गचक्रच आहे.  हे अव्यवाहात चालूच असते.  डायनासॉर, मॅमोथ,  प्रचंड नेचे, सरस्वती नदी वगैरे पृथ्वीवरून नष्ट झाले त्यात माणसाचा सहभाग शून्य म्हणावा इतका; त्यामुळे हवामान बदलाचा बागुलबुवा उभारण्यापेक्षा शाश्वत विकासाची नीती शोधावी.’ आणखी एके ठिकाणी लेखक म्हणतो, ‘खरंतर अशी अज्ञातात उडी म्हणजे वेडे साहसच.  असं उत्कट जगण्याच्या आग्रहास्तव सतत मृत्यूच्या सीमारेषेवर जगत राहणे आणि बेडरपणे प्रसंगी मृत्यू कवटाळणे हे सामान्य मेंदूच्या आकलनशक्तीच्या पलीकडेच आहे.  हा सारा उपद्व्याप  करताना खलाशांकडून चुका झाल्याच नाहीत असे नाही पण त्यामुळेच तर त्यांचे माणूस पण अधोरेखित झाले आणि त्यांना देवत्व नाही पण नायकत्व अवश्य प्राप्त झाले.’ 

पुस्तक तर वाचावेच पण शक्यतो लेखकाशी देखील बोलावे असं मला या निमित्ताने सुचवावसं वाटतं. त्यांना बोलायला वेळ नसावा असं आपल्याला उगीच वाटतं आणि वेळ नसला तरी स्वतःच्या लिखाणाबद्दल बोलायला सहसा सगळ्यांना आवडतं. मी बरेचदा असे फोन करत असतो. त्या लेखनाच्या अलीकडचं पलीकडचं असं काहीतरी गवसत असतं. 

हे पुस्तक वाचल्यानंतर मी अनुरागला मेसेज केला, मग फोन केला.  एका फोनमध्येच आमची दोस्ती झाली आणि त्याला मी पहिला प्रश्न केला, ‘इतकी सगळी माणसं, बोटी भरभरून भारताच्या किनाऱ्याला लागत होती, व्यापार करत होती, श्रीमंत होत होती, इथे वखारी उघडत होती, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व मिळवत होती पण एकाही भारतीयाला त्याच बोटीत बसून आपण उलटा प्रवास करावा, त्या बोटींची दिशादर्शक यंत्रणा (नॅव्हीगेशन सिस्टीम) कशी चालते हे बघावं, ही माणसे येतात तो प्रदेश, भाषा, हवामान आहे तरी कसं, याचा शोध घ्यावा असं कसं वाटलं नाही? असा उलटा प्रवास करणारा एक जरी वेडा जन्मला असता तर जगाचा नकाशा काही वेगळाच असता. एक सुद्धा कोकणचो पूत गलबत घेऊन अमरिकेस कसा न्हय गेलां? निदान आफ्रिकेस?’  

‘मला माहित नाही’, अनुरागचं प्रामाणिक उत्तर. तरीही काही शक्यता त्यानी लक्षात आणून दिल्या. बहुतेक भारतीयांचा प्रवास हा व्यापार किंवा धर्मप्रसार एवढ्या मर्यादित उद्देशानेच झाला. बौद्ध भिख्खू गेले तेही मुख्यत्वे आग्नेयेला आणि चीनला. अन्यत्र नाही. जे गेले आणि आले, त्यांनी काही लिहिलं नाही, जे लिहिलं ते जतन केलं गेलं नाही किंवा आक्रमणांत नष्ट झालं; किंवा तिन्ही. उपलब्ध रसशास्त्र आणि सामरीक गरजांची सांगड घालून आपण उत्तम बंदुका आणि दारुगोळा बनवू शकलो नाही. तसेच ज्योतिर्विद्या (म्हणजे खगोलशास्त्र, ज्योतिषविद्या वेगळी हं) आणि  गणितात पारंगत असूनही दोन्हीची सांगड घालून उत्तम नकाशे काही आपण  बनवू शकलो नाही. सहाजिकच आपल्या ‘मळ्यास कुंपण पडले’. व्यापक भू-राजकीय भान आलेच नाही आणि आपण होते तेही गमावून बसलो.’ 
अनुरागचं किंवा एकूणच इतिहासचं पुस्तक वाचायचं  ते एवढ्याचसाठी. विंदा सांगून गेले आहेत, 

इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेऊन ना नाचा;
करा पदस्थल त्याचे आणि चढून त्यावर भविष्य वाचा!

No comments:

Post a Comment