पुस्तक परिचय
शतकापूर्वीचे
महाबळेश्वर
डॉ. शंतनु
अभ्यंकर, वाई.
आम्हा
वाईकरांना महाबळेश्वरची काय नवलाई असणार? मनात येताच आम्ही टुणकन उडी मारतो आणि
महाबळेश्वरला पोहोचतो. गर्दी आणि ट्रॅफिकमुळे अशी उडी नकोशी वाटली तर मी
‘महाबळेश्वर’ वाचतो. म्हणजे 1902 साली प्रसिद्ध झालेलं, दत्तात्रय कमलाकर दीक्षित, ह्या महाबळेश्वरी हौस
एजंटचा व्यवसाय करणाऱ्या गृहस्थांच्या लेखणीतून सिद्ध झालेले, ‘महाबळेश्वर. क्षेत्र व सनिटेरिअम याचे वर्णन’, नावाचे
पुस्तक वाचतो. ज्ञानप्रकाश छापखाना, पुणे
येथे छापलेले हे पुस्तक आकारांनी छोटं आहे.
सुमारे साडेतीनशे पानांचा ऐवज आहे. वडिलोपार्जित संपत्ती म्हणून किंवा
समृद्ध अडगळ म्हणून मी ते जपून ठेवलंय.
पुस्तकाची
रचना गंमतीशीर आहे. पहिली काही पाने पुस्तकाबद्दल आणि लेखक गृहस्थाबद्दलचे
अभिप्राय आपल्याला वाचायला मिळतात. ही अभिप्रायाची संपदा इथेच संपत नाही. शेवटची काही पानं पुन्हा एकदा
अभिप्राय वाचायला मिळतात. मुख्यत्वे महाबळेश्वर मुक्कामी लेखक मजकूरांनी कशी उत्तम
सेवा पुरवली याचे कौतुक येते. जस्टीस एन.
जी. चंदावरकर, प्रोफेसर भानू (फर्ग्युसन कॉलेज), श्री. सबनिस (दिवाण,
कोल्हापूर संस्थान), रावबहादुर बर्वे (कोल्हापूर), प्रोफेसर आबाजी विष्णू काथवटे (एलफिस्टन
कॉलेज), आर. एस. पुरेडी (एल.एम.एन.एस, प्रायव्हेट सेक्रेटरी अक्कलकोट), भावनगर, बरोडा संस्थानांचे
कारभारी आणि मुंबई हायकोर्टातील काही वकील यांचे अभिप्राय आहेत. यात एक मिस्टर एस.
टागोर (आयसीएस) म्हणून आहेत. हे बहुतेक रविन्द्रनाथांचे ज्येष्ठ बंधु सत्येंद्रनाथ असावेत. ‘हिज हायनेस द महाराजा
माणिक्य बहादुर ऑफ इंडिपेंडेंट त्रिपुरा बंगाल’ यांनीही काही लिहिलं आहे.
चक्क नामदार
गोपाळ कृष्ण गोखले यांचा अभिप्राय आहे. हा सुरवातीला आहे. पुढे गोपाळ गणेश आगरकर आणि
बाळ गंगाधर टिळक यांचेही अभिप्राय आहेत. पण हे पुस्तकाच्या शेवटी आहेत! म्हणजे
त्या काळच्या महाबळेश्वरातील व्यवसायनिष्ठ
हौस एजंटास, कोण महत्वाचे होते ते कळते.
आपली आणि दीक्षितांची
ओळख कशी झाली, ते आपल्याला विविध प्रकारे कसे उपयोगी पडले हे साऱ्या अभिप्राय
देणाऱ्या मंडळींनी आवर्जून नोंदवले आहे. या सगळ्यावरून सदरहू दत्तात्रय कमलाकर
दीक्षित अगदी गडबड्या, बडबड्या आणि धडपड्या माणूस असावा हे स्पष्ट लक्षात येते आणि
लेखकाप्रती प्रीती आणि आदर उत्पन्न होतो. ही उद्यमशीलता इथेच थांबत नाही.
‘डायाबिटीस क्युअर अर्थात मधुमेहारी’ नावाच्या औषधाची जाहिरातही या पुस्तकात
आहे. पंधरा दिवसात गुण येतो आणि रोग समूळ
नष्ट होण्यासाठी तीन महिने तरी औषध घ्यायला हवं असं म्हटलं आहे. 360
गोळ्यांच्या डब्याची किंमत 3 रूपये (पार्सल 5
आणे जादा) आहे. निर्माते आणि विक्रेते अर्थात
दत्तात्रय कमलाकर दीक्षित, मु. महाबळेश्वर. पुस्तकाचे ‘मिळण्याचे ठिकाण’ही हेच
आहे. ‘भाषांतरासुद्धा सर्व हक्क ग्रंथकर्त्याने राखून ठेविले आहेत’ आणि पुस्तकाची
किंमत कुठेच उघड केलेली नाही! याला म्हणतात खरा विक्रेता.
‘श्रीमत्
क्षत्रियकुलावतंस शिवराजकुलभूषण
श्रीमन्महाराज शाहू छत्रपती (GCSI,
LLD, MRAS, GCVO)’ अर्थात Knight Grand Commander, Doctor
of Laws, (MRAS चा अर्थ सापडला नाही) Grand Cross of the Royal Victorian Order ह्यांना; त्यांच्या ‘अनेक गुणांवरून पूज्यबुद्धि वाटून हे
पुस्तक, परवानगीने त्यांचे सेवेसी, परमादराने अर्पण केले आहे’ असे अर्पणपत्रिकेत
म्हटले आहे. हे वाचलं की काळजात कालवाकालव होते. शाहू या दोन अक्षरी व्यक्तीनामा
पुढे आणि मागे लगडलेल्या शब्दांच्या
बिरुदावल्या, जीत आणि जेत्यांच्या बाबतीत, बरेच काही सांगून जातात.
दत्तात्रय
कमलाकर दीक्षित यांनी ‘मालकम पेठ’ येथून लिहिलेले
फर्ड्या इंग्रजीतले एक विनंती पत्र छापले आहे. मालकम पेठ हे महाबळेश्वरचं
ब्रिटिश जमान्यातलं नाव. नहर या मूळ ठिकाणी मालकम साहेबानी पेठ वसवली म्हणून हे
नाव. पुढे ३ मैलावरील क्षेत्र महाबळेश्वरमुळे महाबळेश्वर असे झाले. कंपनी सरकारचे बरेच अधिकारी, स्वदेशासारखी हवा
असल्यामुळे इकडे येत जात राहिली. पुढे 16 मे
1829 रोजी ईस्ट इंडिया कंपनी
आणि सातारकर महाराज यांच्यात तहनामा होऊन 15 मैलाच्या परिघाची जागा कंपनीला मिळाली
आणि महाबळेश्वरचा जन्म झाला. महाबळेश्वरमध्ये जागा, बंगले घेणे, राखणे तसेच इथे
आल्यावरच्या सर्व सोयीसेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एजंट म्हणून
काम करण्यास लेखक उत्सुक आहे, असं हे पत्र सांगतं. येथे येणाऱ्या नेटीवांना,
युरोपियनांइतक्याच सहजतेने आणि ऐषोरामात राहता यावे, अशी तजवीज करण्याची आपली
महत्त्वाकांक्षा असल्याचे, ते या पत्रात आवर्जून नमूद करतात.
पुस्तकाच्या
अखेरीस सूचिपत्र (जंत्री) आणि शुद्धिपत्रही जोडले आहे. एकूणच हे पुस्तक अतिशय
कष्टपूर्वक जुळवलेले दिसते. अशीच तळमळ दिक्षितांच्या कामातही असणार. त्यावाचून
त्यांच्याकडे इतक्या बड्या मंडळींची, इतकी
प्रशंसापत्रे गोळा होतीच ना.
पुस्तकातील
भाषा आता गंमतीशीर वाटते. हे क्षेत्र कसे निर्माण झाले याचे माहात्म्य सांगताना
दीक्षित लिहितात, मनुष्य सृष्टीच्या उत्पत्तिसाठी येथे देवांनी यज्ञ आरंभीला मात्र ‘वस्त्रा
भूषणे परिधान करण्याचे नादात निमग्न असल्यामुळे’
ब्रम्हदेवची पत्नी सावित्री वेळेत आलीच नाही. सबब ‘ब्रह्मदेवाने द्वितीय पत्नी,
जी गायित्री हिच्या समागमे यज्ञ आरंभीला’. नंतर हे पहाताच सावित्री रागावून
साऱ्यांना शाप देऊ लागली. हे पाहून विष्णूनेही ‘तिला शाप
देऊन उसने फेडले आणि जलप्रलय घडविला. यावर मोठ्या त्राग्याने लागलीच जवळच्या
विलक्षण उंचीच्या कड्यावरून उडी घेऊन सत्वर समुद्रास जाऊन मिळण्याचा मार्ग तिने
स्वीकारला’. पुढे महाबळ आणि अतिबळ ह्या दैत्यांनी यज्ञात विघ्न आणिले. ब्रह्मा,
विष्णु आणि महेश त्यांच्याशी लढू लागले. पैकी अतिबळाला विष्णुंनी
वधिले. पण चिडलेल्या महाबळापुढे देवांचे काही चालेना. पुढे देवांनी महामायेस काही
युक्ती सांगावी म्हणून विनविले. देविने महाबळास
मोह घालून संगरातून माघारी अणिले. आता महाबळाने संतुष्ट होऊन देवांस
वर मागण्यास सांगितले! (देवांना वर देणारा राक्षस माझ्या माहितीत तरी हाच) तेंव्हा,
‘तू आमचे हातून मरावास’, असा वर देवांनी मागितला!! (कमाल आहे
की नाही). पुढे ‘आपण विश्वाचे स्वामी झालो, आपल्या देहाचे सार्थक झाले, मरण यावे हे उचित’,
असा विचार करून दैत्याने देवांस देह अर्पण केला!!! (इतका कठोर
आत्मपरीक्षण करणारा दैत्य विराळाच)
ही पौराणिक कथा अशी बरीच वळणे घेत पुढे जाते. सुष्ट-दुष्ट, शाप-उ:शाप,
डाव-प्रतिडाव असं करत महाबळेश्वरच्या अवखळ झऱ्यासारखी खळाळत रहाते.
पुढे बरीच रोचक माहिती आहे. 1830 साली इथे 120 कैद्यांसाठीचा
तुरुंग होता. तिथे चिनी आणि मलायी कैदी होते. (कुठून पकडून आणले होते कुणास ठाऊक.)
ह्यांना पुणे, ठाणे येथील हवा मानवेना म्हणून (कनवाळू?)
सरकारने इथे खास तुरुंग बांधला म्हणे. महाबळेश्वरचे सुरवातीचे बरेच रस्ते
ह्या कैद्यांच्या श्रमातून बांधले गेले आहेत. पुढे ह्यांच्या शिक्षा
संपल्या. १८४८ साली बंदिशाळाही बंद केली गेली. बंदी सारे मजूर वगैरे म्हणून कामे
करत विखरून गेले. नामशेष झाले. आता तर नामही विशेष शेष राहिलेले नाही.
एखाद्या भूगोलाच्या पुस्तकांत असावी अशी सविस्तर माहिती आहे इथे. इथले धावड,
कोळी, पुजारी, गुरव,
बाजार, हॉटेले, १५२
बंगले, फ्रिअर हॉल(१८६४), क्लब
महाबळेश्वर (१८८२), लायब्ररी, पोस्ट, सार्वजनिक
भक्तीची ठिकाणे, इतकेच काय स्मशानांची सुद्धा माहिती आहे. म्हणजे लेखक महाशय किती
समग्र सेवा पुरवत होते पहा. या क्लबांतून गोऱ्या मडमा आणि गुलहौशी साहेब कशी चैन
करतात तेही सविस्तर दिलेले आहे. नुकताच शोधून काढण्यात आलेल्या ‘बाडमिंटनचा नाद स्त्रियांस विशेष आहे’, असा लेखकाचा अभिप्राय आहे. हवा, पाणी इत्यादीचे गुणवर्णन आहे. पिके, जनावरांची
माहिती आहे. बटाटे, स्ट्रॉबेरी,
कोबी, टर्निप, नवलकोंद
आणि फ्रेंचबीन ह्या ‘इंग्रजी भाज्या’ इथे होतात असा उल्लेख आहे. सहा प्रकारच्या मधमाशांची माहिती आहे. रात्री घोंगडे पांघरून, कडे-कपाऱ्यातील
आग्या मोहोळातून मध काढण्याच्या पद्धतीचे चित्तथरारक वर्णन आहे. २७ प्रकारची गवते, त्यांच्या मराठी नावासकट आहेत.
वाघांचा वावर आणि हल्ला होऊ नये म्हणूनची काळजी आहे. साप आणि ते मुकाट
निघून जावेत म्हणूनचा मंत्रसुद्धा आहे.
‘वेळेचा व्यय होणेस उपयुक्त’ अशा येथील १६ पॉईंट्सची माहिती
देताना आर्थर सीट आणि ब्रह्मारण्याचे वर्णन तर बहारदार उतरले आहे. ते सारेच इथे
द्यायचा मोह होतो आहे. तो आवरतो आणि जिज्ञासूंसाठी काही पानांचे फोटो सोबत जोडतो.
आपल्या व्यवसायावर लेखकाची
निस्सीम निष्ठा आहे. त्याचाही इतिहास त्याने नोंदला आहे. हौस एजंटचा धंदा, १८४८साली पॉले माइट साहेबाने प्रथम सुरू
केला आणि त्यांच्या पश्चात मि. प्रॉंक ऑर यांनी पुढे
२०-२५ वर्ष त्यांची गादी चालवली. ‘आता
मात्र ज्याने त्याने आपले बंगले आपापल्या जातभाईंनाच राखावयास दिले असल्याने परिस्थिती
बिकट आहे’, असे म्हटले आहे. लेखकाची निरीक्षणे अशी चतुरस्र आणि चौफेर आहेत.
असं बरंच
काही या पुस्तकांत आहे. आज यातली बरीच माहिती गैरलागू आहे. लेखक दीक्षितांपैकी आज
कोणीही महाबळेश्वरात नाही. त्यांच्या घराच्या
जागेत सध्या स्टेट बँकेची शाखा आहे. त्यांचे वंशज सध्या अमेरिकेत असल्याचं
कळते. आज हे पुस्तक उघडताच त्याच्या सुवर्ण-वर्णी जीर्ण पर्णातून, फक्त वार्धक्य
गंध दरवळतो, त्या सुगंधावर स्वार होऊन आपण
शतकभर मागे जातो आणि एक वेगळ्याच महाबळेश्वरचा फेरफटका मारून येतो. समृद्ध
अडगळ म्हणजे दुसरं काय असतं?
No comments:
Post a Comment