Thursday 21 December 2023

दोन शिल्पं आणि एक रसिक मन

 

दोन शिल्पं आणि एक रसिक मन

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

ती दोन शिल्पं माझा पिच्छा पुरवत असतात. मधूनच  मनात तरळून जातात. मला भावुक, अंतर्मुख करून जातात. हे असं होण्यात त्या शिल्पकाराची सारी प्रतिभाच कारण आहे. पण कधी कधी मला वाटतं की रसिकमनही तेवढेच कारण आहे.  

अश्रू म्हटलं की मराठी माणसाला आई आठवते. साने गुरुजींच्या शामच्या आईनं काही पिढ्यांवर गारुड केलं आहे. आई म्हटलं की कसली सोज्वळ आणि भावुक होतात माणसं. पण ‘आई’ नावाच्या शिल्पाने अंतर्बाह्य ढवळून निघल्याचा अनुभव  मला आला तो व्हिएतनाममध्ये. तिथल्या युद्ध-संग्रहालयात.

तब्बल वीस वर्ष चाललेलं हे युद्ध (१९५५-७५). एकीकडे बलाढ्य अमेरिका तर दुसरीकडे, दुबळा व्हिएतनाम.  शेवटी इथे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. व्हिएतनामचा विजय झाला, पण व्हिएतनामलाही काही कमी भोगावं लागलं नाही. युद्ध हरण्या खालोखाल  काही वाईट असेल, तर ते युद्ध जिंकणे होय. व्हिएतनामला याचा पुरेपूर प्रत्यय आला.

अशा या युद्धाचं  उघडंवाघडं,  भीषण वास्तव, खुलेआम मांडणारं हे युद्ध संग्रहालय. छिन्न चेहरे, विच्छिन्न  शरीरे, छिन्नमनस्क  जनता आणि नापाम बॉम्बने विद्रूप झालेल्या पिढ्याचपिढ्या. ‘एजंट ऑरेंज’ने (एक रासायनिक अस्त्र) उजाड केलेली शेती, वैराण भातखाचरे,  केळीचे सुकलेले बाग, उघडे ताड  आणि बोडके माड. एकेक दालन पार करता करता किती वेळा अंगावर सरसरून काटा येतो. उभ्याउभ्या दरदरून  घाम फुटतो. डोळे गप्पकन्  मिटून आपण जिथल्यातिथे थिजून जातो. हे क्रौर्य आपल्याला  पहावत सुद्धा नाही तर  ज्यांना भोगवं लागलं, त्यांना काय यातना झाल्या असतील; या विचारानी आपण अस्वस्थ होतो.  कोणीही सहृदय माणूस हे संग्रहालय एका झटक्यात पाहुच शकत नाही. थोडा वेळ दालनाबाहेर बसायचं पुन्हा हिम्मत गोळा करायची आणि आत  शिरायचं असं करावं लागतं. युद्धस्य फक्त  कथाच  रम्या, वास्तव किती हादरवून सोडणारं असतं ह्याचं यथार्थ दर्शन इथे घडतं.

तिथे  एक ओबडधोबड पुतळा आहे. ‘मदर’ नावाचा.  सात आठ फुट उंचीचा. नाव ‘आई’ असलं तरी मुळात तो बाईचा पुतळा आहे हेही  सांगावं  लागतं. बाईपणाचं आणि त्याहूनही आईपणाचं कोणतंच लेणं तिच्या अंगाखांद्यावर नाही. ना आसपास खेळणारी चार दोन गोजिरवाणी पोरं, ना थानाला  लुचलेलं एखादं  पदराआडचं पिल्लू. मुळात तिला थानंच नाहीत. छातीच्या फासळ्याच  तेवढ्या दिसताहेत.  अस्थिपंजर   झालेलं शरीर, त्याला कसलीही गोलाई नाही. तोंड




खप्पड, त्यावर ना वात्सल्य, ना प्रेम, ना करूणा,  ना काही. आईपणाशी निगडित कोणतीही भावना नाही त्या चेहऱ्यावर. चेहरा कसला जवळजवळ कवटीच, म्हणायची इतका भेसूर. ही कसली ‘आई’ ही तर बाई सुद्धा नाही. शिवाय ही उभी आहे जमिनीतून निवडुंगासारख्या फुटलेल्या काही पोलादी पट्यांमध्ये. कमळात वगैरे उभी असल्यासारखी. पण हिच्या हातातून मोहरा वगैरे काही पडत नाहीयेत. हिचे हात तर नुसते दोन्ही बाजूला लोंबताहेत, जीव नसल्यासारखे. काही देणं तर सोडाच पण काही मागायचंही त्राण त्यांच्यात


नाही.

ज्ञूएंग होयांग हुय अशा काही तरी नावाच्या कलाकाराची ही कृती. नाव ‘मदर’ दिलंय म्हणून, नाहीतर मम्मी ऐवजी इजिप्त्शियन ‘ममी’ म्हणून खपलं  असतं  हे शिल्प. पण ह्या कलाकृतीची पार्श्वभूमी लक्षात येताच हे शिल्प आपल्याला हादरवून सोडतं.

युद्धग्रस्त, उद्ध्वस्त, व्हिएतनाममधील ही ‘मदर’ आहे. हीचं  सर्वस्वं  लुटलं गेलं आहे. बेघर, निराधार, निरापत्य अशी ही आई आहे. म्हणजे कधीतरी ती  आई होती. आता तिची मुलं नाहीत. ती बहुधा युद्धात मारली गेली. तेंव्हा आता ती निरापत्य.  आता हिला घर नाही ते बहुधा युद्धात ध्वस्त झालं. आता हिला शेतीवाडी नाही, म्हणजे असेलही जमिनीचा तुकडा, पण नापाम बॉम्बच्या रासायनिक माऱ्यात तिथलं पीक झालंय निष्प्राण  आणि जमीन झालीय आता कायमची नापीक.

हे आर्त साकार करण्यासाठी मग कलाकाराने बॉम्बच्याच कपच्या वापरल्या आहेत. त्या युद्धध्वस्त देशातल्या त्याा शिल्पकाराला अन्य काही साधन सामुग्री नाही मिळाली बहुतेक.  ह्या कपच्यांच्याच  कमळ-पसाऱ्यात ती उभी आहे, ह्या कपच्यांनीच ती बनली आहे. ज्यामुळे ती उद्ध्वस्त झाली त्या बॉम्बच्या तुकड्या तुकड्यांनीच ती आता घडली आहे. आपल्या रयाहीन, पोकळ, वठल्या शरीरातून पहाणाऱ्याचा अंत पहाते  आहे.

 

 

व्हिएतनाममध्ये सर्वस्व गमावलेल्या  आईचं शिल्प होतं. मुले गमावलेली आई  जितकी करुण तितकेच आई गमावलेले मूलही केविलवाणे.

आई विना मुलीचं काळीज पिळवटून टाकणारं शिल्प मी पहिलं स्कॉटलंडमध्ये,  एडिनबरोला, केल्विनग्रोव्ह म्युझीयममध्ये. मूर्त कारुण्य जणू  अशी ती कारुण्यमूर्ती! ह्या शिल्पाचे   नावच मुळी  मदरलेस,  ‘आईविना’! शिल्पकार जॉर्ज लॉसन हा याचा कर्ता. याची इतरही अनेक शिल्प आहेत पण हे सर्वात गाजलेलं. सर्वात लोकप्रीय. पत्थराला पाझर फोडेल असं हे  पाषाण सौंदर्य  पहायला लोकं लांबलांबहून येतात.

 


पांढऱ्या दगडातील हे रेखीव शिल्प. एका  खुर्चीत आपल्या आपल्या सहा  सात वर्षाच्या लेकीला पोटाशी घेऊन एक बाप बसला आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचे विमनस्क भाव अगदी गडद आहेत. बऱ्यापैकी देखणा, सुखवस्तू असा हा मध्यमवयीन गृहस्थ आहे. त्याचे आणि त्याच्या लेकीचे कपडे छानच आहेत.

त्याचा गाल त्यानी तिच्या डोक्यावर टेकला आहे. डाव्या हातावर  त्या चिमुरडीचं ओझं पेललं आहे आणि  उजवा हातानी  इतक्या नजकातीनं तिच्या पायाला आधार दिला आहे की लेकीबद्दलचे सारे प्रेम, आपुलकी, जवळीक, सहवेदना त्या हलक्याशा  स्पर्शातून प्रतीत होते आहे. एका हाताने आधार तर  दुसऱ्या हाताने सांत्वन आणि विश्वास देत तो बाप स्वतःचं  दुख: लपवतो आहे. ती सुद्धा पपाला अगदी बिलगून बसली आहे. तिला बहुदा आता जगात दुसरे कोणीही नाही. त्याच्या कुशीत तीला  ऊब आणि  आसरा सापडला आहे. खूप खूप रडून तिचा चेहरा अगदी म्लान झाला  आहे. बाप कुठेतरी शून्यात नजर लावून बसला आहे तर  मुलीने डोळे मिटलेले आहेत. अगदी निर्जीव असल्यासारखा तिचा डावा हात बापाच्या हातावरून ओघळला आहे.

तिचे बूट त्याच्या पायाशी लोळताहेत. हे बूट पहाणाऱ्याच्या मनात काहूर उठवतात.  कदाचित बाहेरून कुठून तरी खेळत असताना ती अचानक घरात आली असावी. कोणी काही बोललं असेल किंवा काही निमित्तानी तिला तिची नसलेली आई आठवली असेल आणि मग गडबडीने ती डॅडीच्या कुशीत झेपावली असेल. तिची समजूत काढता काढता मग त्याने हलकेच बूट उतरवले असतील...?  किंवा बाहेर जायला म्हणून तयार होता होता, पप्पाकडून  वेण्या घालून घेता  घेता,  तिला ममाची सय आली असेल आणि मग हमसून हमसून रडण्याच्या भरात बूट तसेच राहीले असतील...?

ह्या मुलीची आई कशानी वारली असावी हाही एक अनुत्तरित प्रश्न. संग्रहालयाच्या संचालकांच्या मते आजाराने अथवा अपघातात तिचे निधन झाले असावे. पण काहींच्या मते ज्या  काळातला पुतळा आहे, त्या काळी (१८७०च्या आसपास) इंग्लंडातसुद्धा,   बायका सहसा मारायच्या त्या बाळंतपणात. 

आपण अशा कितीतरी कल्पना करू शकतो. आणि आपण कितीही कल्पना केल्या तरी प्रत्यक्ष शिल्पकाराच्या मनात काय होतं, ते समजण अवघडच. 




हलकेच स्पर्शणारा पण तरीही  आधाराचा,  आश्वासक बापाचा  हात; दुखा:त होरपळणाऱ्या लेकीचा,   निर्जीव, लुळा  हात, हे सगळं कसं साकार करत असतील शिल्पकार?  त्या घट्टमुट्ट दगडाला तासून तासून त्यात जीव ओतायचा म्हणजे काही साधंसुधं काम नाही. आपल्याला जिथे संगमरवराची  ओबडधोबड शिळा दिसते तिथे मायकल एंजेलोला म्हणे थेट शिल्पाकृतीच दिसायची. ‘मी मूर्ती घडवतच नाही, ती  तिथे असतेच, मी फक्त तिच्या आजूबाजूचा  नको असलेला दगड बाजूला करतो’, असं तो सांगायचा.

अमूर्त दगडात   मूर्ती पहाणारी, कोऱ्या कागदावरचे  चित्र टिपणारी, शांततेच्या अनाहत नादात संगीत ऐकू येणारी माणसं दिव्येंद्रधारी खरी; पण त्या बॉम्ब-कपच्यांच्या ओबडधोबड मनोऱ्याने काळजात कालवाकालव होणारी, कधीकाळी, कोण्या देशी, छिन्नीने  विषण्णता कोरलेल्या त्या दगडापुढे विषण्ण होणारी, स्वर-संवादातल्या शांततेतला  अर्थ ओळखणारी, तुम्ही-आम्ही रसिक माणसंही दिव्येंद्रधारीच की. नाही का? 

 

 

No comments:

Post a Comment