Monday 11 December 2023

पुस्तक परिचय: कवितेच्या वाटेवर आणि वाटेवरच्या कविता

 

पुस्तक परिचय  

परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.


परवा अशोक नायगावकर आमच्या घरी आले. तसे पहिल्यांदाच आले, पण आले म्हणजे काय अगदी झोकात आले. ते नेहमी झोकातच येतात आणि अर्थात नायगावकर येतात म्हणजे आधी त्यांच्या मिशा दारातून आत येतात आणि मिशांच्या पाठोपाठ नायगावकर अवतरतात. झब्बा, झोळी अशा सगळ्या सरंजामासह नायगावकर आले आणि विसावले.  मग मनसोक्त गप्पा झाल्या, आधी इकडच्या तिकडच्या, मग परस्परांच्या लिखाणाबद्दल बोलणं झालं. वाईकरी वृत्तीला जागून मनसोक्त नाष्टा-पाणी(च) झालं. आदल्या दिवशीच्या कार्यक्रमात त्यांनी श्रोत्यांना आणि श्रोत्यांतील मला पोट धरधरून हसवलं होतं.

 कालच्या कार्यक्रमात न म्हंटलेल्या काही कविता म्हणाल का?’, असं सुचवताच काय आश्चर्य, एखाद्या शाळकरी पोराच्या उत्साहाने नायगावकर पोतडीतून वही काढून कविता सादर करायला लागले. सुरवातीला कोचात आरामशीर रेलून मामला चालला होता,  पण दोनच कडव्यात ते पुरते अस्वस्थ झाले.  मध्येच ते थांबले आणि म्हणाले, ‘हे काही खरं नाही गड्या,  हे असं कोचात बसून नाही मला कविता म्हणता येत.  आपण आपले मस्तपैकी मांडी घालून खाली बसू. अर्थातच आम्ही सगळे तात्काळ जमीनदोस्त झालो.  मग काय विचारता, कविराजांनी  एकदा मांडी ठोकली म्हटल्यावर पाठोपाठ कवितांचा पाऊस सुरू झाला. आपल्या शब्द सामर्थ्याने, त्यातील व्यंगोक्ती  आणि वक्रोक्तीने, सादरीकरणाच्या अव्याभिचारी  पद्धतीने  आम्हाला सगळ्यांना त्यांनी खिळवून ठेवले. नायगावकर कविता सादर करत नाहीत ते कविता होतात आणि आपण त्यांना बघत बसायचं असतं. खिडकीतून आश्चर्यमुग्ध होत्साते अक्राळविक्राळ पाऊस बघतो तसं. कारण पाठोपाठ घनगर्जना  व्हावी, विजा  चमकाव्या तसे त्यांचे शब्द, कल्पना, उपमा, उपरोध, आतिशयोक्ती एकामागून एक कोसळत असतात. हसावं का रडावं तेच उमजत नाही.

 

त्यांचा पहिला कविता संग्रह वाटेवरच्या कविता’ (सप्टेंबर 1992) आणि दुसरा ‘कवितेच्या वाटेवर’ (डिसेंबर 2022). तिसऱ्याची आम्ही रसिक वाट पाहून आहोत. पण ‘वाट’ आणि ‘कविता’ ह्या दोन शब्दांची आदलाबदल करून झाली. आता नवीन नाव कसं बनवायचं? ही अडचण असावी! या दोन्ही संग्रहांना कुणाची प्रस्तावना वगैरे काही भानगड नाही. पहिल्या कवितासंग्रहाला तर अनुक्रमणिकासुद्धा नाही. अर्पण-पत्रिका आणि ब्लर्बवरती तीन  वाक्य; ‘कवितेतील सामाजिकता आणि कलात्मकता यांचा समन्वय कसा व्हावा याचा विचार अशोक नायगावकर यांनी केला आहे. म्हणून त्यांची सामाजिक कविता नुसती घोषणा करत नाही वा ठराविक स्वरूपाचा आक्रोश करत नाही.  कवीचे अस्तित्व तिथे जाणवत राहते.’ दुसऱ्या संग्रहाच्या मनोगतात ‘रसिकांना दंडवत’ आणि ब्लर्बवर अरुण म्हात्रे यांनी रचलेले कौतुक-कवन.  

नायगावकर मला अतिशय गंभीर प्रवृत्तीचे कवी वाटतात. पण त्यांच्या त्या सादरीकरणाच्या नायगावकरी शैलीने  श्रोत्यांचा गैरसमज होतो. (कधी कधी त्यांचाही होतो बहुतेक!)  ते ज्या पद्धतीने कविता सादर करतात ती पद्धत कवितेच्या आशयाची फटकून आहे असं मला वाटतं.  अर्थात आशयाबरहुकूम त्यांनी  गंभीरपणे ती कविता सादर केली असती, तर इतक्या लोकांपर्यंत पोचली देखील नसती. म्हणूनच त्यांची कविता  मंचावर किंवा यूट्यूबवर पहावी, पण एकांतात पुनःपुन्हा वाचावी, अशी आहे. अशी वाचतानाही त्यांचे ते सादरीकरण मनातून मंत्रून काढल्याशिवाय तीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे नाही.   हसता हसता अंतर्मुख करणारे अनेक क्षण या कवितांच्या ओळींमध्ये लपलेले आहेत. नायगावकरांना जे सत्य श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या, वाचकांच्या आणि समाजाच्या गळी उतरवायचे आहे ते अत्यंत  जळजळीत, कटू आणि जहरीले आहे. त्यामुळे त्यांनी असा विदूषकाचा वेष धारण  केला आहे,  आपलं म्हणणं शर्करावगुंठीत आणि चेहरा भरदार मिशामंडित राखला आहे.

ज्यांना ह्या विदूषकाच्या चाळयांनी फक्त हसूच येतं त्यांच्याकडे नायगावकर चक्क कानाडोळा करतात. त्यांची, ‘वेड  लागायच्या पूर्वी सुचलेलं!’ सारखी कविता, ऐकून नाही, तर वाचून पहा.  जगण्यातली  व्यामिश्रता, आंतरविरोध, वैय्यर्थ असं सगळं एका फटक्यात त्या कवितेत गोळीबंद उतरले आहे.

टिळक , आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत’ (टिळक); ‘तुला भोज्या बनवलाय, भीमा.’ (तुझी खरंचंच भीती वाटते भीमा! ); ‘पारोशाने नदी म्हणाली, किती दिसांत ग न्हाले  नाही’ (पारोशाने नदी म्हणाली) असे त्यांचे एक वाक्यातले ह्टके फटके एकांतात कविता वाचताना मनावर वळ उठवतात. व्यासपीठावरून सादर होताना हास्याने फसफसून येणारी ही कविता, एकांतात अॅसिडसारखी फसफसून येत भाजते.भोपाळ चिकित्सा’च्या सुरवातीलाच ते म्हणतात, ‘आता त्याच त्याच कीटकांना मारायचे त्यात थोडासा बदल, इतकेच’. एका कवितेत राज साहेबांना भेटून, ‘शेती करणाऱ्या  कॉलेज विद्यार्थ्यांसाठी मोफत सन  स्क्रीन योजनेबद्दल’ आभारही मानले आहेत. एके ठिकाणी  कवी बापूंनाच बजावतो, ‘शेवटी तुम्हीहे राम’  म्हणालात हे मात्र थोडं खटकलं, काही तरी सेक्युलर म्हणायला हवं होतंत.’ एकाच वेळी एकाच वाक्याने प्रतिगामी, गांधीवादी आणि पुरोगामी असं सगळ्यांना घायाळ  करण्याचं कसब खास नायगावकरांचेच.

त्यांच्या कवितेत काहीच्या काही, नाही नाही, क्काहीच्या क्काही घडू शकतं. इथे  बहिणाबाईला मुंबईच्या ‘रंगभऱ्या’ बायका नॉन-स्टिक तवा भेट देतात किंवा अथेन्सच्या अॅक्रोपोलीसच्या खांबांशी कवी खांब खांब खांबोळी खेळतो किंवा एकदा दाताचा  प्रॉब्लेम आल्याबद्दल कवीला डोळ्याच्या डॉक्टरला दाखवतात, तर तो म्हणतो न्यूरॉलॉजिस्टला भेटा!!!!

अशा अनेक धक्कादायक कल्पना ते आपल्याकडे डागत असतात. पण  एकाचा अर्थ लावेपर्यंत दुसरी लाट  थडकते. आपली पार त्रेधा उडते. म्हणूनच की काय; मी त्यांच्या कविता वाचत आहे, आणि ते, माझी  त्रेधातिरपिट बघत, वाईच्या कृष्णाघाटावर मजेत पाण्यात पाय सोडून, खारेदाणे  खात बसले आहेत असं एक मजेदार व्हीजन मला येतं असतं.

‘खा, खा, खारेदाणे खा! पण त्याचं काय आहे नायगावकर,  ते तिसऱ्या कविता संग्रहाचं तेवढं बघा, ही रसिकांच्या तर्फे कळकळीची विनंती.

 

 

 

No comments:

Post a Comment