Wednesday, 13 December 2023

पुस्तक परिचय संविधान – ग्रेट भेट

 

पुस्तक परिचय संविधान – ग्रेट भेट

लेखिका – निलम माणगावे

प्रकाशक – राजगृह प्रकाशन   

प्रथमावृत्ती – प्रथमावृत्ती जानेवारी २०१०   

पृष्ठसंख्या – ५६

परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

संविधान – ग्रेट भेट,  ह्या पुस्तिकेची ओळख

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

नीलम माणगावे ह्या एक कसलेल्या लेखिका आहेत. तब्बल ७० पुस्तके, आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांसाठी लिखाण, शासनाचे तसेच इतर पुरस्कार आणि साहित्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश, असे कर्तृत्व त्यांनी गाजवले आहे. ‘संविधान - ग्रेट भेट’ ही त्यांची छोटीशीच पुस्तिका आहे, जेमतेम ५६ पानांची,  मात्र मुलांसाठी कसे लिहावे याचा जणू आदर्श वस्तूपाठ आहे.  

 

या पुस्तिकेतले बहुतेक प्रसंग शाळेच्या वर्गात घडतात. माळी सर आणि विद्यार्थी यांच्या संवादातून ‘संविधान म्हणजे काय?’ हे उलगडले जाते. अर्थातच नुसतीच प्रश्नोत्तरे रुक्ष झाली असती, त्यामुळेच मुलांच्या आपापसातल्या खोड्या, दंगामस्ती, सरांनी मुलांच्या आणि मुलांनी सरांच्या घेतलेल्या फिरक्या, मुलांच्या घरातले काही प्रसंग, अशा सगळ्या मालमसाल्यामुळे संविधानासारख्या धीरगंभीर विषयावरची ही पुस्तिका  खुसखुशीत झाली आहे.

 

मुळात संविधान म्हणजे काय?, हे मुलांना समजावून सांगणं तसं  अवघड आहे. शिवाय ते तयार कसे झालं ही प्रक्रिया समजावून सांगणं हे त्याहून अवघड.  पण माणगावे  यांना मुलांच्या भावविश्वाची जाणीव असल्यामुळे त्यांनी हे छान जमवून आणलं आहे.

 

घटना बनवताना समितीच्या सदस्यांची मते लक्षात घेऊन अंतिम मसुदा तयार करण्यात आला. हे सांगताना माळी सर, म्हणजे खरंतर माणगावे बाई, भाजणीचे अगदी घरगुती उदाहरण देतात. ती बरोबर झाली आहे ना हे बघण्यासाठी जशी दोन-चार जणांना चाखायला देऊन त्यांचं मत घेतलं जातं, थोडं मीठ कमी, तिखट जास्त, हे सगळं दुरुस्त केलं जातं, तसं घटनेच्या बाबतीत झालं; असं समजावून सांगतात.

 

संविधानाच्या प्रास्ताविकातील ‘सार्वभौम’, ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’, ‘प्रवर्तित करणे’, स्वतःप्रती अर्पण करणे, वगैरे शब्दप्रयोगदेखील माणगावे बाई अशाच सहजतेने उलगडून दाखवतात. कधी एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे, तर कधी शाळेतल्या नियमांचे उदाहरण देऊन मुलांसाठी अर्थ स्पष्ट करतात. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म मनात आणि घरात बाळगायचा, रस्त्यावर उतरवायचा नाही असेही समजावून सांगतात. मुलांना अर्थातच सगळं समजतं असं नाही, काही वेळा ‘मुलं ढीम्म बसतात, कावळे भिजून बसल्यासारखी!’

 

पुढे घटनेमधील हक्क आणि कर्तव्यांबद्दल देखील मजेशीर संवाद येतात. शिक्षणाचे ‘स्वातंत्र्य’ आहे आणि ‘हक्क’ही  आहे. यातील सूक्ष्म फरक माणगावे मुलांच्या पातळीवर जाऊन समजावून सांगतात. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये; श्रद्धा, संचार, वाचन, लेखन, अभिव्यक्ती ही स्वातंत्र्ये  आणि ओघानेच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक लक्षात आणून देतात. शेवटी सांविधानिक कर्तव्यांपर्यंत आल्यावर मुलांची, ‘अरे बापरे, कर्तव्य नकोत सर हक्कच पुरेत आम्हाला’, अशी गंमतीशीर पण स्वाभाविक प्रतिक्रियाही माणगावे नोंदवतात.

 

संवादप्रधानतेमुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे. उपक्रमशील शिक्षक यावरून  छान नाटुकली बसवू शकतील. ‘माळी’ सरांपेक्षा शाळेतली बिनाआडनावाची मुलं  कशी धर्मनिरपेक्ष वाटतात आणि एरवी कौटुंबिक उदाहरणे देणाऱ्या बाई एके ठिकाणी पौराणिक कथेत शिरतात हे खटकते.

 

मात्र इतका किचकट विषय इतक्या सहजतेने उलगडून दाखवल्याबद्दल नीलम माणगावे यांचे अभिनंदन

 

No comments:

Post a Comment