Sunday, 17 December 2023

शब्द कल्पिताचे: पुस्तक परिचय

शनिवार, दि. १६  डिसेंबर २०२३ 
पुस्तक परिचय अभियान - अखंड परिचय सत्र – पुस्तक क्र. १२८१  
आठवडा – १८३ 
परिचय सत्र - २ रे 
सप्ताह कालावधी ११ डिसेंबर २०२३  ते १८ डिसेंबर २०२३ 
शीर्षक – शब्द कल्पिताचे, न पाठवलेली पत्रे  
संपादक – स्वानंद बेदारकर 
प्रकाशक – शब्दमल्हार प्रकाशन   
प्रथमावृत्ती – प्रथमावृत्ती २४ मार्च २०२३ 
किंमत – रु १५००/-   
पृष्ठसंख्या – ४२४   
परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

शब्द मल्हार प्रकाशनने अत्यंत देखण्या रूपात प्रकाशित केलेल्या ‘शब्द कल्पिताचे, न पाठवलेली पत्रे’, या पुस्तकाचा परिचय मी आज करून देणार आहे.  संपादक आहेत स्वानंद बेदरकर. पुस्तकाची कल्पना स्वानंद बेदरकर यांचीच. त्यांनी विविध क्षेत्रातील नामवंतांना त्यांच्याच क्षेत्रातील गतकालीन दिग्गजांना पत्र लिहिण्याची विनंती केली. अर्थातच मायन्यातील  व्यक्तीला ही पत्रे कधीच पोहोचणार नाहीत.  म्हणून हे शब्द कल्पिताचे, ही न पाठवलेली पत्रे. 

मुखपृष्ठ,  जुन्या जीर्ण वहीच्या पानाचे, जुन्या पत्राची आठवण करून देणारे. त्यावर वर्षानुवर्ष वहीत जपून ठेवलेल्या पानाफुलांची पखरण. त्या पानाफुलांनी देखील इमाने इतबारे आपले रूप आणि रेषा जपून ठेवलेले, अगदी परागकोशासकट. आतही पानोपानी, वहीच्या रेषांत अडकलेली ही ‘स्मृतिपत्रे’ आणि ‘स्मृतिफुले’ आहेतच. मोठा आकार, नेत्रसुखद अक्षरमुद्रा आणि नेटक्या सजावटीने हे पुस्तक वाचनीय तसेच प्रेक्षणीय झाले आहे.

पुस्तकाची कल्पना साऱ्यांना मनापासून पसंत दिसतेय. तब्बल ५० नामवंतांनी हा पत्र लेखनाचा गृहपाठ सादर केला आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त पंच्याहत्तरी गाठायची होती पण पुस्तकाचा आकार पेलेनासा झाला असता. तेंव्हा आणखी एका खंडाची ग्वाही संपादकांनी देऊन ठेवली आहे. 

लेखकांची यादी नजरेखालून घातली तर सध्या  महाराष्ट्राच्या विचारविश्वावर गारुड घालून  असलेली नावे इथे दिसतील. अशोक चौसाळकर, बाबा भांड, विवेक सावंत,  विनया जंगले, अवधूत परळकर, वीणा  गवाणकर, चंद्रमोहन कुलकर्णी अशी अनेक. मायन्यातली नावे म्हणजे ह्या मंडळींना वंद्य मंडळींची, त्यामुळे ती यादीही भारदस्त आहे. कालिदासापासून ते शकुंतला फरांजपे आणि पिकासोपासून ते नामदेव ढसाळ असे अनेक आहेत यात. आसावरी काकडे यांनी तुकारामाला पत्र लिहिले आहे, तर श्रीनिवास हेमाडे यांनी शिवाजी महाराजांना; भारती पांडे यांनी पीजी वुडहाऊसला, तर आशुतोष अडोणींनी डॉ. हेडगेवारांना. अशा जोड्या वाचत जाणंही मनोरंजक ठरतं.  

मायनेही छान आहेत, विचारपूर्वक लिहिले आहेत. प्रिय मित्रा, कालिदासा (सरोजा भाटे), परम आदरणीय, शास्त्रीबोवा (बाळशास्त्री जांभेकर यांना अनंत येवलेकर यांचे पत्र), तीर्थरूप तर्कतीर्थ कृ.शि.सा.न.वि.वि.(सुनीलकुमार लवटे),  पाब्लो आबा, शिरसाष्टांग नमस्कार (श्रीराम हसबनीस), आनंदयात्री प्रिय बाकीबाब यांस (अनुजा जोशी).    अवधूत परळकर यांनी ‘मनुष्य नावाच्या प्राण्याला’, ‘भल्या माणसा’ असं संबोधून पत्र लिहिले आहे. 

सारीच पत्रे वाचनीय आहेत. 

प्रस्तावनेत संपादकाने  पत्र वाङमयाचा धावता आढावा घेतला आहे. रुक्मिणीने कृष्णाला लिहिलेल्या पत्रापासून लोकहितवादींची ‘शतपत्रे’, ‘इंदु काळे ,सरला भोळे’, ‘शामची पत्रे’, ‘प्रिय जी.ए.’ अशा नोंदी येत जातात. लाल शाईने पत्र लिहू नये, मृत्यूची वार्ता देणारे पत्र फाडून टाकावे असे सामाजिक संकेत निर्माण होण्याइतके  पत्र आपल्या संस्कृतीत सामावून गेले. पत्र म्हणजे काळाचा क्रॉस सेक्शन. मात्र इथली पत्रे वर्तमानातून भूतकाळात लिहिलेली. 

लेखकांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. पूर्वसूरींना वंदन करण्यासाठी, आपला आदरभाव, कृतज्ञभाव पोहोचवण्यासाठी, त्यांच्याबद्दल भरभरून बोलण्यासाठी, इतिहासातील कृत्याबद्दल जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्यामुळे आपल्यात काय परिवर्तन झाले ते खुलेआम  सांगण्यासाठी.  ‘हे आत्मसख्या व्हिक्टरा’ अशी सुरवात करून शंतनु गुणे यांनी व्हिक्टर फ्रँकेल  यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असा हृद्य प्रवास मांडला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. आशा बगे यांनी इंदिरा संतांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्याच सुंदर सुंदर काव्यपंक्ती वाचायला मिळतात. आसावरी काकडे  तुकोबाला, ‘देई  तुझा लाहो आता मज’ अशी साद घालतात. आपल्याकडे टीकाकारांचे मत  नोंदवून ठेवण्याचा उमदेपणा आणि टीकाकारांना निस्संदर्भ उद्दामपणाही होता.’, असं एकनाथ पगार, इतिहासाचार्य राजवाड्यांना बजावतात. 

यात कधी कधी भाषेत थोडं अवघडलेपण येतं. तुम्ही अमुक केलंत, तमुक केलंत अशी त्या माणसाला माहिती असलेलीच माहिती त्यांनाच सांगितली जाते. हिंदीत जशी ‘आपका जनम् इलाहाबाद में हुआ. आपने सतारह कहानी संग्रह, तीन खंडकाव्य एवं ग्यारह नाटक लिखे है’, अशी ओळख करून देतात, तसं काहीसं वाटतं हे. वर्तमानातील वाचकाला ह्या महनीय व्यक्तींबद्दल सांगायचं तर असं होणारच. वर्तमानातून भूतकाळात असा हा पत्र व्यवहार असल्याने दोन्ही काळांची तुलना, थोडे स्मरणरंजन आणि सद्य काळाबद्दल अनुदार उद्गार, हेही आहेच. 

लिहिणारे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत, तेंव्हा त्यांच्या कार्य कर्तृत्वाची त्यांच्या व्यासंगाची झलक इथे दिसतेच. कधी,

‘गळ्यात गळा घालून गळा काढून रडणारे 
गळ्यात गंडा बांधून ऐकतात जे कृष्णमूर्ती 
त्यातलाच एक शिंप्याच्या काचकपाटात टाय बांधून 
उभा असलेला पहीला, सुटली समस्या पुरती’

अशी मठ्ठ, इस्त्रीबाज शिष्यांची टिंगल करणारी, आरती प्रभूंची कविता येते (रवी लाखे). तर कधी 

‘पुढां स्नेह पाझरे, माघां चालती  अक्षरें,
शब्द पाठीं अवतरे, कृपा  आधीं.’ अशी ज्ञानेश्वरी तील ओवी येते. 

एकूणच हा पत्र संवाद अतीशय वाचनीय, मननीय आणि संग्राह्य अहे हे निश्चित.

No comments:

Post a Comment