Thursday 7 December 2023

नास्तिकांचे अध्यात्म

 

नास्तिकांचे अध्यात्म 

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. 

 

सध्या इये मराठीचिये देशी नास्तिक मेळाव्यांचा हंगाम आहे. आयोजनातील वीरश्री पहाता लवकरच नास्तिकांसाठी आरक्षणाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सावधान!!! त्याच वेळी  हेअसलेमेळावे घेऊन काय साध्य होणार?, ह्या प्रश्नावर घमासान चर्चा झडत आहेत. एकुणांतच नास्तिकांत हाणामाऱ्या फार. सगळेच शहाणे, तेंव्हा असं होणारच. त्यात सर्व नास्तिकही  समान नाहीत. त्यातही देव नाहीच अशी खात्री असलेले/ल्यानुसती शंका असणारे/ऱ्या, निसर्गपूजक असे प्रकार आहेत. त्यामुळे इथे जरी मीनास्तिक असे करतातवगैरे विधानार्थी भाषा वापरली असली तरी मी आपला माझ्यापुरता बोलतो  आहे.आपुलाचि वाद आपणांसीअशा प्रकारचा हा संवाद आहे.  आमच्या गावातली एक भाजीवाली दरवेळी दर सांगताना एक डिसक्लेमर टाकत असते, ‘भाव पटला तर घ्या, न्हाय तर ऱ्हायलं’. तीच माझीही भूमिका आहे!

 

 आस्तिकांना असं वाटतं की सर्व गहन प्रश्नांची उत्तरं धर्माकडे आहेत. धर्माला चिकटून राहण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. धर्माला वगळा गतप्रभ झणी होतील ही उत्तरे, अशी त्यांना भीती असते.   तेव्हा त्यातल्या काही  गहनगूढ  प्रश्नांची उत्तरं  मी आत्ताच देऊन टाकतो.  

माणसाला प्रश्न पडतो की हे विश्व कोणी निर्माण केलं?

याचं विज्ञानाला ठाऊक असलेलं उत्तर म्हणजे, कोणीही नाही.  हे विश्व स्वयंभू आहे.  

 

हे विश्व का निर्माण झाले?

या लीलेचा हेतू काय? याचं उत्तर, याला काही हेतू नाही.  

 

माणूस कोणी निर्माण केला?

माणूस अपघात मात्र निर्माण झाला.  

 

मानव जन्माचा अर्थ काय? जीवनाचा हेतू काय?

आपल्या अस्तित्वाला हेतूबितू चिकटवून नाकाने कांदे सोलू नये. जिथे सृष्टी निर्मितीच हेतूरहित आहे तिथे मानवी जन्माची काय कथा? अर्थ कसला आलाय? खरंतर जीवनाचा अर्थ आपण त्याला जो  देतो तो; हे समर्पक उत्तर आहे. 

मीच का? हे भोग माझ्याच वाट्याला का? हा प्रश्न अनेक संदर्भात विचारला जातो. दुर्दैवाच्या दशावतारांसंदर्भात हमखास आणि   सुदैवाच्या दशावतारांबद्दल सहसा नाही. अस्तिकांना छळणारा हा एक गहन प्रश्न आहे.  चमडीचा  कर्करोग मलाच का? पासून ते माझीच बायको चवचाल का? पर्यंत काहीही प्रश्न असू शकतात. ज्ञात कारणे वगळता ह्याला, यद्यपी अज्ञात, एवढेच उत्तर आहे.

 

यातले काही प्रश्न तर सरळ सरळ विज्ञानाच्या आखत्यारीतले आहेत. विश्व नेमके कसे उत्पन्न झाले, पहीला सजीव कसा निपजला, जाणीव कशी निर्माण झाली, चमडीचा कर्करोग मलाच का? वगैरे प्रश्नांची रास्त उत्तरं कधीकाळी मिळालीच तर ती वैज्ञानिक पद्धती वापरूनच मिळतील. भवतालच्या परिस्थितीत भौतिक कारणे शोधा, ती अपुरी ठरतील त्या जागा रिकाम्या ठेवा. दैवी व दानवी बुजगावण्यांनी भरून काढू नका. प्रयत्न आणि संशोधन सुरू असू दे. काही कारणे नव्याने समजतील. नवी तावून सुलाखून घ्या. जुनी कारणे  त्यागून नव्याने जागा भरा. यथावकाश काही जागा भरल्या जातील काही नाहीच भरता येणार. त्या रिकाम्या जागांसाठी संशोधन जारी ठेवा.

 

याची  धर्माकडील उत्तरे अर्थातच शुद्ध थापा आहेत. भिन्न भिन्न धर्मात विश्वनिर्मितीची कथाच मुळी भिन्न आहे. मानव जन्माचं सार्थकच भिन्न भिन्न सांगितलं आहे. सुदैवाची आणि दुर्दैवाची कारणेच भिन्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांना धर्माने शोधलेली उत्तरे चुकीची आणि निरुपयोगी आहेत.

 

 

हे भारीतले प्रश्न संपल्यावर सांसारिक दु:ख  येतात. देवच कटाप म्हटल्यावर, नास्तिक मंडळी यांचा सामना कसा करतात, याबद्दलही अस्तिकांना मोठे कुतूहल वाटतं. परीक्षेतील अपयश ते भिशीचालक फरार आणि बायको नांदत नाही ते बायको माहेरी जात नाही; अशा सतराशे साठ अडचणी असतात. नास्तिक प्रत्येक दुःखाचं किंवा अडचणीचं कारण आधी भौतिकात शोधत असतात. त्यांना शकुन-अपशकुन, पाप-पुण्य, पुनर्जन्म, कोप अथवा प्रसन्न पावणाऱ्या देवता, यांच्याशी काही संबंध नसतो. त्यामुळे पारलौकिकाची उपासना किंवा शमन त्यांना गरजेचे वाटत नाही. ते/त्या  अनुभवींचा सल्ला घेतात.  व्रत वैकल्यात खर्च होणारी शक्ती ते/त्या  डोकं चालवण्यात, विचार करण्यात व्यतीत करतात. 

 

उपरोल्लेखित सांसारिक अडचणीपेक्षा आप्तजनांचे मृत्यू म्हणजे दुःखाचा डोंगर. यातून उद्भवणारे दुःख आणि विरह नास्तिकांनाही चुकलेले नाहीत.  धार्मिक अंत्यविधी, दहावा, बारावा, तेरावा वगैरे नास्तिकांना उपलब्ध नाहीत. हे असलं काही न केल्याने नास्तिक भावनाशून्य भासतात पण मृताप्रती ममत्वाचं श्राद्धपक्ष एवढं एकच माप नाही. हे विधी दुःख आणि विरहाचं विरेचन करून पुन्हा विवेकाची आणि सामान्य आयुष्याची सुरवात करू पहातात.मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’, अशी शिकवण देत असतात. या साध्याशा शहाणपणाच्या स्पष्टीकरणासाठी आणि पुष्टीकरणासाठी जन्म, मृत्यू, कयामत, पुनर्जन्म, पाप-पुण्याचे मोजमाप वगैरे भाकड कथांचा डोलारा उभारलेला दिसतो. 

 

नास्तिकांना या आराशीत काही रमणीय आढळत नाही. गाभ्याचा विचार त्यांनी आधीच आत्मसात केलेला असतो. ते पाषाणहृदयी नसतात तर  जन्म आणि मृत्यूचं स्वरूप त्यांनी समजावून घेतलेलं असतं. मृत्यूची निव्वळ अपरिहार्यताच नाही तर आवश्यकताही जाणून घेतलेली असते. या जाणिवेमुळेच कायमच्या विरहासाठी त्यांच्या मनाची मशागत झालेली असते आणि कर्मकांडातील वैयर्थही लक्षात आलेलं असतं. प्रिय व्यक्तीच्या सत्कार्यांचे स्मरण, एकत्र असतानाच्या सुखद आठवणीही, दु:ख  आणि विरह विरेचक असतातच.  मग नास्तिक हेच करतात. 

 

आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या भानगडीमुळे मृत्यू पचवणे सुकर होत असेल पण भूत, प्रेत, पिशाच्याच्या भीतीमुळे ते दुष्करही होऊ शकतं. आपला चुलत सासरा आता सुखात असून रंभा त्याच्या डोक्यावर तेल थापते आहे आणि उर्वशी वारा घालते आहे, हे जसं येतं; तसंच तो आता पिशाच्च होऊन, चुलत सासूला वश आहे आणि तीच्या मार्फत माझ्या घराची वाट लावणार आहे, हेही येतं. शरीर संपुष्टात येतं त्याचवेळी इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, राग, लोभ, द्वेष, मत्सर  इत्यादीं सकट मनही संपुष्टात येतं हेच खरं. मनाला आणि त्यातील भावभावनांना शरीराशिवाय वेगळं अस्तित्व नाही, आत्मा ही निव्वळ कल्पना आहे, अशा  धारणा स्पष्ट असल्याने भूत, प्रेत, आत्मे, पुनर्जन्म वगैरे पासून नास्तिकांनी सहजच मुक्ती मिळवलेली असते. असल्या कल्पनांत रममाण होण्यापेक्षा नास्तिक चुलत जावई, आपला चुलत सासरा आता चराचरात विलीन झाला आहे असं समजतो.माती असशी मातीत मिळशीवगैरे समजावून घ्यायला कोणाही नास्तिक नचिकेताला यमधर्माची निकड भासत नाही. अर्थात काही मृत्यू, अपमृत्यू, अकालीमृत्यू हे चटका लावून जातात. हे सगळं तत्त्वज्ञान कळतंय पण वळत नाही अशी संभ्रमित अवस्था येते.  पण अशावेळी नास्तिक मन अनिश्चिततेचा स्वीकार करत, कमी अधिक प्रयत्नाने शांती पावतं.  

 

अनिश्चितता हँडल करण्याचास्वीकारहा नास्तिक मार्ग आहे. मृत्यू असो, हुकलेलं प्रमोशन असो वा  न होणारे लग्न, परिस्थितीतील काही घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असणार याचा स्वीकार नास्तिकांनी केलेला असतो. त्यामुळे असल्या प्रश्नांना ते देव-दानवांना जबाबदार धरत नाहीत. त्यामुळे ते तोडगे व उपाय शोधण्यासाठी सहदेव भाडळीची पुस्तकंही  वाचत नाहीत.  शिवाय एकदा, चुकीच्या  का असेना, कारणाचे लेबल लावले की शोध थांबतो. कृतक समाधान मिळते. पण आता योग्य कारण कधीच न सापडण्याचा  धोका वाढतो. 

 यावर आस्तिक मंडळी म्हणतात कीतुम्हाला अजून दैवाचा तडाखा बसला नाही म्हणून बोलताय. एकदा का आमच्या शनिनी इंगा दाखवला की कळेलच.असेलही, पुढचं कोणी बघितलंय, कठीण समय येतां नास्तिकता गुंडाळून देवाच्या भजनी लागणे कोणाच्याही बाबतीत शक्य आहे. असं किती प्रमाणात होतं वगैरे अभ्यास माझ्या वाचनात नाहीत. पण नास्तिकांना नेस्तनाबूत करण्यासाठी दैवही विशेष उत्सुक दिसत नाही. निदान इहलोकी तरी  अन्य चार लोकांइतकीच सुख-दुःख नास्तिकांच्या वाट्याला येतात. 

 

मुळात हा तथाकथित दैवाचा तडाखा, ते दैवाचा मानतंच नाहीत.  तडाखा दैवाचा ठरवला, की त्या बरोबर त्याच्या पारलौकिक कारणांसह एक निराश हतबलता सोबत येते. याउलट नास्तिकांनी अनिश्चिततेचा स्वीकार केलेला असतो.  त्यामुळे सुखदुःखाकडे, अडचणींकडे आणि संधींकडे, यशाकडे आणि अपयशाकडे ते समदृष्टीने पाहू शकतात.   यश काय अपयश काय, दोन्हीही  अनित्य,   तात्कालिक असणार. यश मिळाले असेल तर ते टिकवण्यासाठी काय करायला हवं आणि  अपयश असेल तर त्याची कारणे काय? त्यातल्या कोणत्या कारणांचे निराकरण करता येईल? अशी सदैव प्रगतीशील मनोधारणा नास्तिक बाळगून असतात. यशापयशाकडे पाहण्याचा नास्तिक दृष्टिकोन असा असतो. सुखाने मोहरून जाणं आणि दुखा:ने कोलमडून जाणं घडत नाही असं नाही, पण आपोआप मोजूनमापूनच घडतं. स्थितप्रज्ञ म्हणतात याला. असा सम्यक दृष्टीकोन उपयुक्त ठरतो. यासाठी कोणत्याही पारलौकिक मुलाम्याची त्यांना गरज नसते. असा चिकित्सक, विश्लेषक, दृष्टिकोन असल्यामुळे इतरांचं भलं झालं, तरीही नास्तिक याच दृष्टीने विचार करतात. त्यामुळे आपोआपच मत्सर किंवा असुरी आनंद  वगैरेंपासून त्यांचे ते संरक्षण मिळवू शकतात.  खरं तर अध्यात्मात हेच शिकवतात. हे अप्राप्य प्राप्त करण्यासाठी शरीर-मन झिजवतात.   पण नास्तिक असलं काही न करता, आपल्या तर्कबुद्धीने, स्वयंप्रेरणेने,   ही मूल्ये आत्मसात करतात. निव्वळ धर्ममार्गी  मंडळीच  काही विशिष्ठ, उच्च मूल्ये बाळगून असतात, हा गैरसमज आहे. त्यातून माझ्याच धर्माची मूल्ये सर्वोच्च, हा आणखी एक गैरसमज. यातूनच कितीतरीधर्मसंकटेनिपजलेली आहेत. 

 

जीवनातील अनिश्चितता हँडल करण्याचा; अतर्क्य, अकस्मात, अनाकलनीय,  संभाव्यतांची बूज राखण्याचा;  ‘थॅंक गॉड’  हा आस्तिक मार्ग आहे. तशी धारणा असणाऱ्यांना तो उपयुक्त ठरतो.  ‘ट्रक खाली चेंदामेंदा झालेला तो टू व्हीलरवाला मीही असू शकलो असतो’, असा विचार नास्तिकांच्या मनातही येतोच की; पणट्रक खाली चेंदामेंदा झालेला तो टू व्हीलरवाला मीही असू शकलो असतो, थॅंक गॉड!’, असा मात्र येत नाही. जप, नामस्मरण अशा मूक, निरुपद्रवी क्रियांपासून ते डॉल्बीच्या दणदणाटापर्यंत ही थॅंक गॉडगिरी दिसते. अमुक झालं, हे तो तमक्याची इच्छा; तमुक झालं, अमुक माझ्या पाठीशी; असं जनात, गणात आणि मनात ते सतत बजावत रहातात. नास्तिकांना असं करायची आवश्यकता वाटत नाही. सगळेच नियम आपल्याला कळले नसले, तरी विश्व त्याच्या नियमानुसार चाललेलं आहे. आपल्या थँक्युने त्याच्या चालीत काही फरक पडणार नाही हे ते जाणून असतात. थँक्यू म्हणायचं तर ते स्वीकारणारा कोणीच नाही. जयजयकार करायचा तो कोणाचा? स्तुतिस्तोत्रं  गायची ती कोणाची आणि आरती म्हणायची ती कोणाची

 

नास्तिक सतत देवाला थॅंकत नाहीत हा  आस्तिकांना त्यांच्या उर्मटपणाचा पुरावा वाटतो. ह्यांना त्या जगंनियंत्याप्रती लीन भाव नाही, हे स्वतःला देवाच्या बरोबरीचे समजतात, असं वाटतं. नसलेल्या देवाची बरोबरी करण्यात काय मातबरी? उलट स्वत:ला भगवंताचा दूत, अंश, बायको, अपत्य किंवा चक्क अवतार म्हणवणारे/ऱ्या आस्तिकच  शेकड्याने आहेत. हे/ह्या मात्र उर्मट नाहीत! 

 

या थँक्यू म्हणण्यामध्ये त्याला मोठेपण देण्याबरोबरच स्वतःकडे धाकुटेपण घेणेही आहे. उपासनेची भाषा आणि भक्तीची देहबोली अशा चिन्हांनी आणि संकेतांनी मढलेली आहे. यात विश्वाच्या पसाऱ्यामध्ये मानवी जीवन क्षणभंगुर असून, आपण अगदी कसप्टासमान आहोत ही भावना आहे. पण एकीकडे हा कस्पट-भाव सांगत असतानाच  पृथ्वी जगाच्या केंद्रस्थानी आहे, विश्वात एकदम स्पेशल आहे, माणूस लई भारी आहे, देव तुझ्याकडे बघतो आहे, सारी सृष्टी कनवाळू देवानं मानवाच्याच उपभोगासाठी घडली आहेअशा मानवी अहं कुरवाळणाऱ्या कल्पना, धर्म रुजवत असतात. ह्या मानभावीपणाची संगती कशी लावावी

 

कधी या  थॅंक गॉडगिरीमागे काही उदात्त भावना वसत असते तर बरेचदा शुद्ध मांडवली करण्याचा डाव असतो. तू महान, कनवाळू, छप्पर फाडके देणारा दाता आहेस; मी  लहानदीन, हीन, लीन, फाटक्या झोळीचा  याचक/चिका  आहेसबब हे तुला आणि बदल्यात ते अमुक अमुक मला  अशी मांडणी असते. पण मनात हे ‘लहानपण’ जागवण्यासाठी नास्तिकांनादे गा देवाअशी आळवणी करण्याची गरज नसते. कस्पटभावासाठी आपल्यापेक्षा सर्वार्थाने पॉवरफुल असा  जगबुडी घडवणारा, आकाशातला पप्पा, सप्तस्वर्गसप्तपाताळ इत्यादी कल्पिण्याची  गरज नसते. 

कचकड्याच्या या बेगडी धार्मिक संकल्पनांपेक्षा विज्ञानाने पुरवलेली पुरावाधिष्ठित कस्पट-कल्पना अधिक प्रगाढ, प्रशांत आणि वास्तव आहे. सजीवांचे अंती एक गोत्र, असं सांगून डार्विननी सृष्टीकडे बघण्याची विशाल जीवनदृष्टी दिली आहे ती मानवाला श्रेष्ठ मानणाऱ्या धर्म कल्पनांपेक्षा कितीतरी उन्नत आहे.  अणूरेणूंच्या अंतरंगातील सूक्ष्मातीसूक्ष्म  कणांपासून ते   विश्वाचे वय, त्याचा पसारा, ग्रह-ताऱ्यांचे आकार आणि या साऱ्यात मानवाच्या क्षुद्र स्थानाबद्दलचे जे भान विज्ञान देतं, ते तर कोणत्याही धार्मिक आकलनाच्या पल्याड  आहे. विज्ञानाच्या आधी अज्ञान असतं आणि विज्ञान संपतं तिथेही  अध्यात्म नाही तर अज्ञानच  सुरू होतं.  निसर्गाकडे उघड्या डोळ्याने पाहताच आपल्याला जाणवणारे क्षुद्रत्व, विज्ञानाने वर्धमान आणि वर्धिष्णू केले आहे. म्हणूनच कस्पटभावाचा विज्ञानदीप्त नंदादीप नास्तिक मनात अखंड तेवत असतो. उक्ती आणि कृतीतून त्याचा सतत उच्चार त्यांना अनावश्यक आणि निरर्थक वाटतो.

 

ईश्वर भक्तीच्या परमोच्च क्षणी सृष्टीशी आणि ईश्वराशी तादात्म्य अनुभवायला येतं; अचाट प्रतिभेचे, नृत्य-नाट्य-चित्र-संगीतातील कळसाच्या कलाविष्काराचे, नव्या शोधाचे, निर्मितीच्या उर्मीचे, तल्लीन, क्षण साक्षात्कारी असतात असं वर्णन केलं जातं आणि मन विचारमुक्त करत करत अपार शांतीचा प्रत्यय येतो.  नास्तिकही  जिजीविषेच्या  आर्ततेने असे क्षण अनुभवतच असतात. नास्तिकांना ते नापासही नाहीत आणि नापसंतही नाहीत.   उत्तम (भक्ती)संगीतात(ही) रंगून जाणं, (रास)नृत्याच्या(ही) तालावर बेभान होणंरसाळ (स्तोत्र)काव्यानं(ही) घायाळ होणं, निसर्गाच्या अदाकारीनं  पुलकित होणं... हे होतच असतं. एकदा देव आणि त्याच्या दलालांमार्फत होणारी त्याची आपल्या आयुष्यातली लुडबूड बाजूला काढली की धर्मग्रंथ सांस्कृतिक दस्तावेज म्हणून आणि कर्मकांड सामाजिक ऐवज म्हणून उरतात.  देव गेला, धर्मग्रंथ गेले, दलाल गेले की  आपण आणि चराचर सृष्टी एवढेच उरतो.  उलट असा मध्यस्थ विरहित तादात्म्यभाव  सहज सुलभ असतो.

 

असे अनुभव नास्तिक नाकारत नाहीत आणि त्यांना ते पारखेही नाहीत. फक्त अशा अनुभवांचा अर्थ लावण्यासाठी त्यामागे भगवंताचे अधिष्ठान कल्पिण्याची किंवा त्यांचे वर्णन करण्यासाठी दैवी शक्तींना आवाहन करण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही. बस् एवढंच. पण अशी देवधर्म संकेत विरहित भाषाही अभावानेच उपलब्ध आहे. षड्ज लावताच जणू ईश्वरी स्पर्श घडला, ऐवजी अननूभूत आनंद झाला.  स्वामींनी माझ्याकडून यात्रा करवून घेतली, ऐवजी माझी तीव्र इच्छा असल्याने मी तो खडतर प्रवास केला; अशा साध्या शब्दात ते असे अनुभव मांडतील. अर्थात ‘ईश्वरी स्पर्शाची’ आणि ‘स्वामींने करवीयले’ची सर या भाषेला नाही. ही एक मोठीच अडचण आहे.

 

सगळे सणवार, उत्सव म्हणजे अशा तृप्त क्षणांच्या फॅक्टऱ्या आहेत. असे, नास्तिक सण-उत्सव निर्माण करणे नास्तिकांना शक्य झालेले नाही. समाजाला ते रुचत नाहीत आणि समाजात रुजत नाहीत ह्याचे हेही एक कारण आहे. कलेच्या, विचाराच्या, शोधाच्या परमोच्च क्षणी जे अनुभवायला मिळतं ते इथे सहजप्राप्य होतं. अशा क्षणांची सहज सोबत मिळते म्हणून लोकं देव, धर्म, कर्मकांड याकडे आकर्षित होत असावेत. त्याबरोबरच सामाजिक मान्यता, लौकिक, आधार असं बरंच काही पदरी पडत असतं. लोक मूर्ख नसतात. सतत शोषित वगैरे नसतात. काहीसे ऐषीतच असतात.

 

धार्मिक चित्र, शिल्प, कला, साहित्याचा आस्वाद नास्तिकही घेत असतात. ते/त्या  या सगळ्याकडेशोलेबघावा तसं बघतात. म्हणजे असं, कीशोलेबघताना जर का तुम्ही सतत असा विचार करत राहिलात, की ठाकूरचे हात खरंतर त्या कुडत्याच्या आत शाबूत आहेत..., तर मगशोलेबघणं अवघड आहे! म्हणजे तुम्हाला तो दिसेल पण अनुभवता नाही येणार. नास्तिकांना उत्तम (भक्ती)संगीतात(ही) रंगून जाणं, (रास)नृत्याच्या(ही) तालावर बेभान होणंरसाळ (स्तोत्र)काव्यानं(ही) घायाळ होणं अशक्य नाही ते या मुळे. तसंच मायकल एंजेलोच्या चित्रांचं, कैलास लेण्याचं, गंगालहरी सारख्या सुंदर काव्याचं आहे. नास्तिक  त्यातल्या कथा, कल्पनादेवांची आणि आदीकांची, दैवी आणि दानवी शक्तींची सगळी भुतावळ, तात्पुरती खरी मानूनच या साऱ्याचा आनंद घेतात. काम झालं की सोडून देतात. मधूनच समाज-भ्रमाचे हे विभ्रम पाहून थोडी गंमतही वाटते. मजा येते.  

 

वरील साऱ्या विवेचनातील कसप्टभाव, अनित्य, समदृष्टी, स्थितप्रज्ञ, सम्यक, स्वीकार असे शब्द वाचून, तुम्हाला आपण नास्तिकतेवरचा निबंध वाचतो आहोत का, प. पू. अभ्यंकरबुवांची दिव्य प्रवचने वाचतो आहोत; असा प्रश्न पडेल. पण नास्तिक विचार अंगी बाणवला की वरील गुणवैशिष्ठ्ये वाढीस लागतात आणि नास्तिक बाय-डीफॉल्ट   ध्यात्मिक’ बनत जातात. नास्तिक अधिक सहिष्णु, उदारमतवादी, नव्याबद्दल स्वागतशील असतात. हे सारे प्राप्त होण्यासाठी त्यांना ना शरीर कष्टवून तीर्थयात्रा कराव्या लागतात, ना मान मोडून मंत्रपठण करावं लागतं. ही जीवनदृष्टी नास्तिक विचाराचा सहजस्फूर्त, स्वाभाविक आणि अटळपरिपाक म्हणून विनाअट प्राप्त होते. म्हणूनच नास्तिकही सच्चे/च्चा  आध्यात्मिक असतात.

 

 

प्रथम प्रसिद्धी

अवतरण (मुंबई सकाळ)

दिवाळी अंक २०२३

 

No comments:

Post a Comment