ऋग्वेदातील नाट्यसंहिता :- एक परिचय
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
‘ऋग्वेदातील नाट्यसंहिता’ हे श्री. लक्ष्मीकांत धोंड यांनी लिहिलेले पुस्तक नाटकवाल्यांना तर आवडेलच पण रसिक वाचकांनाही आवडल्यावाचून राहणार नाही. हा माणूसही स्वतः अतिशय रसिक आहे. त्याच्या औरंगाबादेतील आतिथ्यशील बंगल्याचं नावही ‘रसिक’ आहे.
श्री. धोंड हे आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावर बरीच वर्ष कार्यरत होते. त्यामुळे अनेक क्षेत्रातील अनेक मंडळींशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. नाटक हा त्यांचा लाडाचा आणि अभ्यासाचा विषय. आकाशवाणीवर सादर करण्यापुरता त्यांनी तो ठेवला नाही. उलट नाट्यशास्त्राचं यथास्थित शिक्षण घेऊन आपल्या नाट्यजाणीवा अधिक टोकदार केल्या. हौशी रंगमंच, नाट्य शिबिरे, ‘गाहासत्तसई’बाबत (गाथा सप्तशती हे आपल्याला परिचित रूप) संशोधन आणि मंचीय सादरीकरण यात ते गुरफटून असतात.
नाट्यशास्त्र शिकताना भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा पंचमवेद आहे, चारही वर्णाच्या लोकांसाठी ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गायन, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस घेऊन हा पाचवा वेद ब्रह्मदेवाने निर्माण केला, वगैरे संदर्भ त्यांनी अभ्यासले होते. हे कुठेतरी मनात होतं त्यामुळे निवृत्तीनंतर धोंडांनी याचा माग काढायचं ठरवलं आणि सविस्तर अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं. ऋग्वेदात एकूण 28 कथा सूक्ते, 22 संवाद सूक्ते आणि 31 दानस्तुती सूक्ते आहेत की ज्यामध्ये कथा, नाट्य, संवाद, स्वगत अशी नाटकाची बीजे आढळतात.
ऋग्वेदातील पाठ्य, नाट्य, संवाद सूक्ते ही नाट्यसंहिताच आहेत, नाट्य संहितेचे प्राचीनत्व, निवडक संवाद सूक्तांचा भावानुवाद; अशा प्रकरणात हे पुस्तक विभागलेले आहे. शेवटी काही संवादांचा, मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच भावानुवाद देऊन, ते प्राथमिक रुपातले नाट्यांशच कसे आहेत हे दाखवून दिलेले आहे.
सर्व संबंधित सूक्तांच्या जंत्रीनंतर, त्या साऱ्या कथा आपल्याला संक्षिप्त स्वरूपात वाचायला मिळतात. बहुतेक संवादात देव, देवता, राजा, ऋषी हीच पात्र प्रामुख्याने दिसतात. कठोपनिषदात नचिकेताने यमाकडून ज्ञान प्राप्त करून घेतल्याची आख्यायिका आहे, त्या कथेचे मूळ सूत्र ऋग्वेदात आढळते. विवाह, जन्म, पुरुषत्व प्राप्ती, वध, युद्ध, मृत्यू अशा अनेक घटना या कथांत येतात. आपल्या पूर्वजांच्या कुंडलीत संघर्ष स्थानी, चिंता स्थानी, आनंद स्थानी कोणकोणते ग्रह होते, ते कळतं. ऋग्वेदातील साऱ्या ऋचा छंदोबद्ध आहेत म्हणजे वाङमयनिर्मिती आधी चिंतनाची, छंद-व्याकरणाची एक दीर्घ परंपरा होती हे स्पष्ट आहे
ऋग्वेदातून पाठ्य घेतले याचा अर्थ तिथे संवाद किंवा प्रवेशरूपात काही नाट्यसंहिता आहेत असा नाही, मात्र पुढे नाटक म्हणून जे सादर केले गेले, आजही नाटक म्हणून जे सादर केलं जातं, ते बीज रुपात ऋग्वेदात आढळतं एवढं मात्र नक्की. अरिस्टॉटलच्या ‘पोएटिक्स’ या नाट्यशास्त्रावरच्या आद्य म्हणवल्या जाणाऱ्या ग्रंथापेक्षा भारतीय नाट्य परंपरा प्राचीन आहे असं लेखकाचं प्रतिपादन आहे.
भरतमुनींनी अगदी बारकाईने विचार केलेला दिसतो. त्यांच्या मते कथेमध्ये आरंभ (काही कल्पना मांडली जाते), यत्न (कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे), प्राप्त्याशा (येणारे दैवी वा मानवी अडथळे), नियताप्ती (अडथळे नाहीसे होतात) आणि फलप्राप्ती अशा अवस्था असतात. उदाहरणार्थ ऋग्वेदाच्या तृतीय मंडलातील विश्वामित्र नदी संवादात या पाचही अवस्था दिसतात. आरंभी म्हणजे नद्यांचा खराळता प्रवाह आडवा आल्याने विश्वामित्राचा तांडा अडतो. विश्वामित्र या नद्यांना प्रवाहाचा वेग कमी करण्याची विनंती करतो. या प्रसंगातही त्या ऋषींनी काही काव्य नाट्य गुंफलेले आहे. विश्वामित्र आपला कार्यभाग साध्य होण्यासाठी नदयांची स्तुती करतो. या नद्यांनाही ऋषींनी मानव रूप दिले आहे. त्यांना मन, भावना आणि स्वभाव आहे. स्तुतीमुळे त्या सुखावतात. मात्र ‘आम्ही इंद्रदेवाच्या आज्ञेने प्रवाहित आहोत’, असे म्हणून हटायला नकार देतात. त्यांच्यातील श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी स्वभाव ही वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. नाटक आणखी उंचीवर जाते. इंद्राबद्दल नद्यांच्या मनात असलेला पूज्यभाव बघून विश्वामित्र इंद्राची स्तुती करणारे स्तोत्र गातो. नद्या प्रसन्न होतात. विश्वामित्राला आपले काम होईल याची खात्री वाटू लागते आणि शेवटी फलप्राप्ती, म्हणजे नद्या आपला प्रवाह विश्वामित्राच्या ताफ्यातील रथांच्या चाकाच्या खालीपर्यंत आणतात. त्यामुळे विश्वामित्र नद्या पार करून सुखरूप जाऊ शकतो. यातील विपास आणि शुतद्री या दोन नद्या म्हणजे आत्ताच्या बियास आणि सतलज.
आशा साऱ्या नाट्यमय सूक्तांचा अभ्यास करूनच भरतमुनींनी सिद्धांत मांडला असणार असा लेखकाचा कयास आहे. म्हणूनच ऋग्वेदातील संवाद सूक्त म्हणजे नाट्य संहिताच आहेत असा विचार लेखकाने ठासून मांडला आहे.
जरी आज आपण नाटक वाचतो तसे, पात्राचे नाव, कंसातील सूचना आणि संवाद अशा पद्धतीने या संहिता लिहिल्या नसल्या, तरी ऋचांचा अर्थ लक्षात घेतला तर पात्रांची आपल्याला कल्पना येतेच. त्यांच्या बोलण्यातून, त्यांचं नाव, स्थान, स्वभावविशेष, अधिकार, नातेसंबंधही समजतात. या संवादातून भावनांचं प्रकटीकरण, मतैक्य, मतभेद, संघर्ष, तत्कालीन परिस्थितीवर भाष्य, अशाही गोष्टी आपल्यासमोर येतात. विविध पातळ्यांवर संघर्षाची कमी अधिक बोचणीही जाणवते. त्यातून लहानसे का होईना नाट्य निर्माण होते.
पुरूवस् उर्वशी संवादात, पुरुवसापासून गर्भवती उर्वशी, त्याच्या शरीर संबंधांच्या मागणीला नकार देते! अगस्ती लोपामुद्रा संवाद सूक्तातील प्रश्न आजही आपल्याला सुटलेला नाही. अगस्ती ऋषी विदर्भ राजाच्या कन्येशी लोपामुद्राशी विवाह करतात मात्र वृद्ध आणि विरक्त अगस्ती तिच्याशी समागम करण्यास उत्सुक नसतात. ती मात्र त्यांच्याकडे समागमाची मागणी करते. तो आपला हक्क असल्याचं सांगते. विवाह बंधनात असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांपैकी काम कर्तव्य तुम्ही पार पाडत नाही, असा अगस्तींवर आरोप करते आणि हे पटल्यानंतर अगस्ती समागमाला तयार होतात. शेवटच्या ऋचा या अगस्ती ऋषींच्या शिष्याच्या आहेत. जो त्यांच्यातील समागम पाहतो आणि अपराधी भावनेने काही वक्तव्य करतो. या पात्रामध्ये लेखकाला, नाटकाबाहेर राहून नाटकावर बोलणारा, भावी रंगभूमीवरील सूत्रधार दिसतो.
‘नाट्यसंहितेचे प्राचीनत्व’ या प्रकरणात लेखक, अन्य प्राचीन नाट्य ग्रंथांचा आणि ऋग्वेदाच्या वयाचा विस्तृत आढावा घेऊन, ऋग्वेद हा नाट्यविषयी असे काही मांडणारा जगातील आद्य ग्रंथ असल्याचे प्रतिपादन करतो. यज्ञाच्या वेळी ऋत्विज ऋचा म्हणताना, काही मरुताच्या आणि काही इंद्राच्या वेषात येऊन म्हणत असावेत असा लेखकाचा कयास आहे. यातून तत्कालीन नाटकाचे स्वरूप विधीनाट्य स्वरूपाचे (काही विधी करताना खेळले जाणारे नाटक, उदा: गोंधळ) असावे असा निष्कर्ष लेखक काढतो. आपली आजची रंगभूमी ही विधीनाट्यातूनच उगम पावलेली आहे हे तर सर्वमान्य आहे. पुढे यजुर्वेदात बहुरूपी या अर्थी विश्वरूप असा शब्द आहे, अथर्व वेदात वाद्यांसाह नृत्य गायनाचे उल्लेख आहेत, रामायणात बालकांडात रंगशाळेचा आणि अयोध्याकांडांत भरतासाठी नाटय प्रयोग झाल्याचे उल्लेख आहेत. कामसूत्रात आणि ‘अष्टाध्यायी’तही नाटकाचे उल्लेख आहेत. अशा धूसर, अस्पष्ट वाटा धुंडाळत लेखक एक अखंड नाट्य परंपरा उभी करू पहातो.
भारतीय नाटक संस्कृत रंगभूमीच्या आधीपासून सुरू होते. उपलब्ध संदर्भांनुसार ऋग्वेदातील तिसऱ्या मंडलातले विश्वामित्र नदी संवाद सूक्त हे आद्य नाटक आणि त्याचा रचयिता, विश्वामित्र हा आद्य नाटककार असल्याचा निष्कर्ष लेखकाने काढला आहे.
मात्र या प्रतिपादनातील अडचणींची, त्रुटींची त्याला जाणीव आहे. म्हणूनच स्वत:च्याच संस्कृतीबद्दलच्या भारतीयांच्या अनास्थेबद्दल तो कोरडेही ओढतो. प्रस्तुत पुस्तक लिहितानाही लेखकाला हा विदारक अनुभव आला. अनेक वेद पाठशाळांतून, ‘ऋचांचा अर्थ असा कुणालाही सांगता येत नाही, त्यातील शक्ती कमी होते’, असं म्हणत लेखकाची बोळवण करण्यात आली. प्राज्ञ पाठशाळेच्या विद्यमान अध्यक्षा, ज्येष्ठ संस्कृत विदुषी श्रीमती सरोजा भाटे, यांनी मात्र संहिता वाचून मांडणीच्या शिस्तीचे कौतुक केले. वेदशास्त्र, नाट्यशास्त्र आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे असा अभिप्राय दिला.
पडदा
No comments:
Post a Comment