Tuesday, 12 December 2023

पुस्तक परिचय : धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (श्री. विश्वास दांडेकर यांच्या पुस्तकाचा परिचय)

 

किमकुर्वत विश्वास?

परिचय डॉ. शंतनु अभ्यंकर

 

 

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।

मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥१॥

 

असा प्रश्न गीतेच्या सुरवातीलाच धृतराष्ट्राने संजयाला विचारला आहे.

असाच काहीसा प्रश्न, ‘हे धृतराष्ट्राचे आणि पांडूचे पुत्र असे कसे आणि का लढले?’,  स्वत:ला विचारून या महाभारताची संगती लावण्याचा प्रयत्न श्री. विश्वास दांडेकर यांनी, आपल्या ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’, या पुस्तकांत केला आहे.

 

सामान्यजनांसाठी महाभारत हे एक हा एक पवित्र धार्मिक ग्रंथ आहे.  इतिहास आहे. त्यातील पात्रे  देवतास्वरूप आहेत. चिकित्सक अभ्यासकांसाठी हे एक महाकाव्य आहे. एक प्रकारचा सामाजिक दस्तावेज आहे. ज्या काळी हे रचलं गेलं त्या काळातल्या प्रथा-परंपरा, देवता, पाप-पुण्याच्या कल्पना, राजकीय, सामाजिक, आर्थिक मूल्ये आणि व्यवस्था, अशा सगळ्यांमध्ये डोकावून पाहता येईल, अशी भूतकाळात रोखलेली दुर्बीण आहे.

 

अशा सुरात, पात्रांचे दैवतीकरण आणि चमत्कार वगळून, महाभारताचा अन्वय आणि अर्थ लावणारी अनेक पुस्तके आहेत. तज्ञांची आहेतच पण संशोधकांच्या रुक्ष भाषेतल्या मांडणीपेक्षा ललित अंगाने या विषयाचा वेध घेणारीही आहेत. इरावतीबाईंचे ‘युगांत’ आणि आजचा कादंबरीरूपातला लोकमान्य ग्रंथ, ‘पर्व’, हे दोन या आकाशातील लखलखते तारे.  कोणाही चोखंदळ रसिकाच्या वाचनातून भैरप्पांची, उमा कुलकर्णींनी मराठीत अनुवादित केलेली, ‘पर्व’ सुटणे शक्य नाही.

 

इरावतीबाईंकडून स्फूर्ति घेऊन ललित निबंध स्वरूपामध्ये महाभारत आणि तत्कालीन राजकारण याचा अन्वयार्थ लावण्याचा घाट विश्वास दांडेकर यांनी ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ या आपल्या पुस्तकात घातला आहे. अनेक ग्रंथांचे परिशीलन करून, अनेक विद्वानांशी चर्चा करून त्यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. भीष्म, द्रोण, कृप, आणि शल्य या ज्येष्ठांनी ‘अर्थस्य पुरुषो दास:’ हा असे उद्गार काढले आहेत. पण ‘माणूस हा संपत्तीचा गुलाम असतो’ तसाच  तो राजकारणाचाही गुलाम असतो असं दांडेकरांनी दाखवून दिलेलं आहे.

 

बृहन महाराष्ट्रात देशाटन, देशविदेशातील पंडित मैत्री आणि अनेकानेक  सभांतून  संचार, अशा मनुजा चातुर्य येण्यास आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी दांडेकरांना प्राप्त आहेत. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे हा जसा समृद्ध करणारा अनुभव असतो तसं हे लिखाणही आहे. गप्पांगणात येतात तसे लिखाणाच्या  ओघात अनेक विषय येतात. त्या त्या वेळी दांडेकर तो तो ऐवज पेश करतात आणि त्यांचा हा संग्रह पाहून आपण आश्चर्यचकित होतो.  

 

सरस्वती नदीच्या अस्तित्वाबद्दलचं ताजं संशोधन काय सांगतं? महाभारतकाळी  ‘सभा’ कशा बांधल्या जात असत? मयसभा, तोरणस्पटिकसभा, सुधन्वासभा अशा सभांचे उल्लेख येतात. म्हणजे नेमकं काय असावं? ‘धर्मयुद्ध’ नेमकं कसं लढलं जायचं? महाभारतकालीन गदा, धनुष्य-बाण, चिलखते नेमकी बनवायचे कसे आणि कशाची? रथ नेमके कसे बनवलेले असत? द्यूत खेळायचे तरी कसा? (आपल्याला वाटतो तसा तो सारीपाटासारखा खेळ नव्हता म्हणे.) असे विषयाशी थेट संबंधित प्रश्न ते विचारतात आणि त्याबद्दलचे खुलासे सादर करतात.

त्याच बरोबर, अवांतर म्हणवेत असे, पंचमस्तंभी हा शब्द कुठून आला? त्याचा स्पेनच्या आधुनिक इतिहासाशी कसा संबंध आहे? आजच्या माफिया टोळ्या आणि बकासुर यांचं नातं काय? असेही अनेक प्रश्न दांडेकर उत्तरतात.

 

अगदी मागितलेली पाच गावे सुद्धा द्यायला दुर्योधनाने नकार दिला किंवा कृष्ण शिष्टाई च्या प्रसंगी तयारी असूनही कृष्णाला तो अटक करू शकला नाही; याच्या संभाव्य भू-राजकीय कारणांशी ते पोहोचतात. याचा अलीकडच्या म्हणजे प्रतपगडच्या, पानिपताच्या, दुसऱ्या महायुद्धातल्या डावपेचांशी सांधा  जुळवून दाखवतात.

 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे कृष्णाचं मूल्यमापन एक राजकीय नेता म्हणून केलं आहे. मोठ्या चातुर्याने, हिकमतीने आणि कूटनीतीने;  नंद गोपाच्या घरी, गोकुळासारख्या एका छोट्या गावात वाढलेला हा मुलगा, महाभारतातील राजकारणाच्या केंद्रस्थानी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आला आहे. मग मगधापासून ते गांधार देशापर्यंत आणि कुरुक्षेत्रापासून विदर्भापर्यंत पसरलेली विविध राजघराणी, त्यांचे परस्पर संबंध, तत्कालीन सामाजिक, नीती नियम, धर्मकल्पना यांच्या पायावर कृष्णाचं राजकारण उभं आहे. त्याच्या उक्ती आणि कृती या तत्कालीन सामाजिक स्थितीच्या निदर्शक आहेत. त्यात भर म्हणजे कृष्णाने गीता सांगितली आहे आणि त्यामुळे तो तत्त्वज्ञाच्या पातळीवर पोहोचला आहे.  हे सारं लक्षात घेऊन दांडेकरांनी  हे निबंध लिहिले आहेत. तत्कालीन भू -राजकीय नकाशेही दिले आहेत.

 

कथनाच्या ओघात आर्यपूर्व संस्कृती, आर्यांचे आगमन किंवा आक्रमण याचीही चर्चा येते.  प्राचीन वाङमयाची काल-निश्चिती कशी केली जाते हेही सविस्तर समजावून सांगितले आहे.

आर्य आक्रमक का नॉन आक्रमक?, सरस्वती नदी होती का नव्हती? हे मी अगदी उत्सुकतेने वाचलं. पण या वादांना  निव्वळ पुरातत्वीय समजण्याचं कारण नाही. या वादांना डावे आणि उजवे असे काठ आहेत. दोन्ही काठांवर आपापले सिद्धांत घट्ट धरून दोन्ही मतांचे पंडित आहेत आणि त्यांच्या कर्कश्श कोलाहलात कोणाचेच नीट ऐकू येत नाहीये; एवढं मला समजले.  मात्र मॅक्सम्युलर सायबाची मखलाशी, गोऱ्यांची चापलूसी वगैरे भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. ‘मखलाशी’ आणि ‘चापलूसी’ हे शब्द मी इथे जाणीवपूर्वक वापरले आहेत. कारण जे वाचायला मिळते ते तेच आहे.

 

महाभारत हे सिंधु संस्कृतीत घडलेले युद्ध असावे अशी मांडणी इथे केली आहे. ‘गेल्या शतकात मांडलेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताचा पाया आता ढासळला आहे, भारतातील लोहयुगाची सुरुवात हजार दीड हजार वर्षांनी तरी मागे गेली आहे आणि ती  अजूनही मागे जाण्याची दाट शक्यता आहे.  रथ आणि घोडे सिंधू संस्कृतीला अपरिचित नव्हते, एवढं आता निश्चित झालेलं आहे. ऋग्वेदाची निर्मिती ख्रिस्तपूर्व पंधराशेच्या कितीतरी आधी झाली असण्याची शक्यता दाट आहे.  त्यामुळे वेद आणि त्यांच्यानंतर निर्माण झालेली उपनिषदे आणि पाचवा वेद समजले जाणारे महाभारत, या सर्वांच्या निर्मितीबद्दल नवी प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.’ असा सारांश श्री. रवी गोडबोले यांनी, ‘पार्श्वभूमी’ नामेकरून  लिहिलेल्या उपोद्घातात मांडला आहे. (खरंतर तो पुस्तकाच्या सुरवातीला हवा. कारण या ‘पार्श्वभूमी’वर वाचन घडलं तर ते अधिक सकस ठरेल. उचित ठिकाणी श्री. गोडबोले यांचा नामोल्लेखही  हवा होता.)

 

महाभारत हा आपला रत्नजडित राष्ट्रीय ठेवा आहे, आपल्याला वायव्य, आग्नेय  आणि ईशान्य आशियाशी जोडणारा सांस्कृतिक बंध आहे. त्यावरचे हे सुंदर पुस्तक म्हणूनच गंभीर्यपूर्वक वाचायला हवे.  

 

No comments:

Post a Comment