Sunday, 31 December 2023

ऋग्वेदातील नाट्यसंहिता :- एक परिचय


ऋग्वेदातील नाट्यसंहिता :- एक परिचय 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

‘ऋग्वेदातील नाट्यसंहिता’ हे श्री. लक्ष्मीकांत धोंड यांनी लिहिलेले पुस्तक नाटकवाल्यांना तर आवडेलच पण रसिक वाचकांनाही आवडल्यावाचून राहणार नाही. हा माणूसही स्वतः अतिशय रसिक आहे. त्याच्या औरंगाबादेतील आतिथ्यशील बंगल्याचं नावही ‘रसिक’ आहे. 

श्री. धोंड हे आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावर बरीच वर्ष कार्यरत होते. त्यामुळे अनेक क्षेत्रातील अनेक मंडळींशी त्यांचा दांडगा संपर्क  आहे.  नाटक हा त्यांचा लाडाचा आणि अभ्यासाचा विषय. आकाशवाणीवर सादर करण्यापुरता त्यांनी तो ठेवला नाही. उलट नाट्यशास्त्राचं यथास्थित शिक्षण घेऊन आपल्या नाट्यजाणीवा  अधिक टोकदार केल्या.  हौशी रंगमंच, नाट्य शिबिरे, ‘गाहासत्तसई’बाबत  (गाथा सप्तशती हे आपल्याला परिचित रूप)  संशोधन आणि मंचीय  सादरीकरण यात ते गुरफटून असतात. 

 नाट्यशास्त्र शिकताना भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा पंचमवेद आहे, चारही वर्णाच्या लोकांसाठी ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गायन, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस घेऊन हा पाचवा वेद ब्रह्मदेवाने निर्माण केला, वगैरे संदर्भ त्यांनी अभ्यासले होते. हे कुठेतरी मनात होतं त्यामुळे निवृत्तीनंतर धोंडांनी याचा माग काढायचं ठरवलं आणि सविस्तर अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं. ऋग्वेदात एकूण 28 कथा सूक्ते, 22 संवाद सूक्ते आणि 31 दानस्तुती सूक्ते आहेत की ज्यामध्ये कथा, नाट्य, संवाद, स्वगत अशी नाटकाची बीजे आढळतात. 

ऋग्वेदातील पाठ्य, नाट्य, संवाद सूक्ते ही नाट्यसंहिताच आहेत, नाट्य संहितेचे प्राचीनत्व, निवडक संवाद सूक्तांचा भावानुवाद; अशा  प्रकरणात हे पुस्तक विभागलेले आहे.  शेवटी काही संवादांचा, मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच भावानुवाद देऊन, ते  प्राथमिक रुपातले नाट्यांशच  कसे आहेत हे दाखवून दिलेले आहे. 

सर्व संबंधित सूक्तांच्या जंत्रीनंतर, त्या साऱ्या कथा आपल्याला संक्षिप्त स्वरूपात वाचायला मिळतात.  बहुतेक संवादात देव, देवता, राजा, ऋषी हीच पात्र प्रामुख्याने दिसतात. कठोपनिषदात  नचिकेताने यमाकडून ज्ञान प्राप्त करून घेतल्याची आख्यायिका आहे, त्या कथेचे मूळ सूत्र ऋग्वेदात आढळते. विवाह, जन्म, पुरुषत्व प्राप्ती, वध, युद्ध, मृत्यू  अशा अनेक घटना या कथांत येतात. आपल्या पूर्वजांच्या कुंडलीत संघर्ष स्थानी, चिंता स्थानी, आनंद स्थानी कोणकोणते ग्रह होते, ते कळतं.  ऋग्वेदातील साऱ्या ऋचा छंदोबद्ध आहेत म्हणजे वाङमयनिर्मिती आधी चिंतनाची, छंद-व्याकरणाची एक दीर्घ परंपरा होती हे स्पष्ट आहे

ऋग्वेदातून पाठ्य घेतले याचा अर्थ तिथे संवाद किंवा प्रवेशरूपात काही नाट्यसंहिता आहेत असा नाही, मात्र पुढे नाटक म्हणून जे सादर केले गेले, आजही नाटक म्हणून जे सादर केलं जातं, ते बीज रुपात ऋग्वेदात आढळतं  एवढं  मात्र नक्की. अरिस्टॉटलच्या ‘पोएटिक्स’ या नाट्यशास्त्रावरच्या आद्य म्हणवल्या जाणाऱ्या ग्रंथापेक्षा भारतीय नाट्य परंपरा प्राचीन आहे असं लेखकाचं प्रतिपादन आहे. 

भरतमुनींनी अगदी बारकाईने विचार केलेला दिसतो. त्यांच्या मते कथेमध्ये आरंभ (काही कल्पना मांडली जाते), यत्न (कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे), प्राप्त्याशा (येणारे दैवी वा मानवी अडथळे), नियताप्ती (अडथळे नाहीसे होतात) आणि फलप्राप्ती  अशा अवस्था असतात. उदाहरणार्थ ऋग्वेदाच्या तृतीय मंडलातील विश्वामित्र नदी संवादात या पाचही अवस्था दिसतात. आरंभी म्हणजे नद्यांचा खराळता प्रवाह आडवा आल्याने विश्वामित्राचा तांडा अडतो. विश्वामित्र या नद्यांना प्रवाहाचा वेग कमी करण्याची विनंती करतो. या प्रसंगातही त्या ऋषींनी काही काव्य नाट्य गुंफलेले आहे.  विश्वामित्र आपला कार्यभाग साध्य होण्यासाठी नदयांची स्तुती करतो. या नद्यांनाही ऋषींनी मानव रूप दिले आहे. त्यांना मन, भावना आणि स्वभाव आहे. स्तुतीमुळे त्या सुखावतात. मात्र ‘आम्ही इंद्रदेवाच्या आज्ञेने प्रवाहित आहोत’, असे म्हणून हटायला नकार देतात. त्यांच्यातील श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी स्वभाव ही वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. नाटक आणखी उंचीवर जाते.  इंद्राबद्दल नद्यांच्या मनात असलेला पूज्यभाव बघून विश्वामित्र इंद्राची स्तुती करणारे स्तोत्र गातो. नद्या प्रसन्न होतात. विश्वामित्राला आपले काम होईल याची खात्री वाटू लागते आणि शेवटी फलप्राप्ती, म्हणजे नद्या आपला प्रवाह विश्वामित्राच्या ताफ्यातील रथांच्या चाकाच्या खालीपर्यंत आणतात.  त्यामुळे विश्वामित्र नद्या  पार करून सुखरूप जाऊ शकतो. यातील विपास आणि शुतद्री  या दोन नद्या म्हणजे आत्ताच्या बियास आणि सतलज.

आशा साऱ्या नाट्यमय सूक्तांचा अभ्यास करूनच भरतमुनींनी सिद्धांत मांडला असणार असा लेखकाचा कयास आहे. म्हणूनच ऋग्वेदातील संवाद सूक्त म्हणजे नाट्य संहिताच आहेत असा विचार लेखकाने ठासून मांडला आहे. 

जरी आज आपण नाटक वाचतो तसे, पात्राचे नाव, कंसातील सूचना आणि संवाद अशा पद्धतीने या संहिता लिहिल्या नसल्या, तरी ऋचांचा अर्थ लक्षात घेतला तर पात्रांची आपल्याला कल्पना येतेच. त्यांच्या बोलण्यातून, त्यांचं नाव, स्थान, स्वभावविशेष, अधिकार, नातेसंबंधही समजतात. या संवादातून भावनांचं प्रकटीकरण, मतैक्य, मतभेद, संघर्ष, तत्कालीन परिस्थितीवर भाष्य, अशाही गोष्टी आपल्यासमोर येतात. विविध पातळ्यांवर संघर्षाची कमी अधिक बोचणीही जाणवते.  त्यातून लहानसे का होईना नाट्य निर्माण होते. 

पुरूवस्  उर्वशी संवादात, पुरुवसापासून गर्भवती उर्वशी, त्याच्या शरीर संबंधांच्या मागणीला नकार देते!  अगस्ती लोपामुद्रा संवाद सूक्तातील प्रश्न आजही आपल्याला सुटलेला नाही. अगस्ती ऋषी विदर्भ राजाच्या कन्येशी लोपामुद्राशी विवाह करतात मात्र वृद्ध आणि विरक्त अगस्ती तिच्याशी समागम करण्यास उत्सुक नसतात. ती मात्र त्यांच्याकडे समागमाची मागणी करते. तो आपला हक्क असल्याचं सांगते. विवाह बंधनात असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांपैकी काम कर्तव्य तुम्ही पार पाडत नाही, असा अगस्तींवर आरोप करते आणि हे पटल्यानंतर अगस्ती समागमाला तयार होतात.  शेवटच्या ऋचा या अगस्ती ऋषींच्या शिष्याच्या आहेत.  जो त्यांच्यातील समागम पाहतो आणि अपराधी भावनेने काही वक्तव्य करतो.  या पात्रामध्ये लेखकाला, नाटकाबाहेर राहून नाटकावर बोलणारा, भावी रंगभूमीवरील सूत्रधार दिसतो. 

‘नाट्यसंहितेचे प्राचीनत्व’  या प्रकरणात लेखक, अन्य प्राचीन नाट्य ग्रंथांचा आणि ऋग्वेदाच्या वयाचा विस्तृत आढावा घेऊन, ऋग्वेद हा नाट्यविषयी असे काही मांडणारा जगातील आद्य  ग्रंथ असल्याचे प्रतिपादन करतो. यज्ञाच्या वेळी ऋत्विज ऋचा म्हणताना, काही मरुताच्या आणि काही इंद्राच्या वेषात येऊन म्हणत असावेत असा लेखकाचा कयास आहे. यातून तत्कालीन नाटकाचे स्वरूप विधीनाट्य स्वरूपाचे (काही विधी करताना खेळले जाणारे नाटक, उदा: गोंधळ) असावे असा निष्कर्ष लेखक काढतो. आपली आजची रंगभूमी ही विधीनाट्यातूनच उगम पावलेली आहे हे तर सर्वमान्य आहे. पुढे यजुर्वेदात बहुरूपी या अर्थी विश्वरूप असा शब्द आहे, अथर्व वेदात वाद्यांसाह नृत्य गायनाचे उल्लेख आहेत, रामायणात बालकांडात रंगशाळेचा आणि अयोध्याकांडांत भरतासाठी नाटय प्रयोग झाल्याचे उल्लेख आहेत. कामसूत्रात  आणि ‘अष्टाध्यायी’तही नाटकाचे उल्लेख आहेत.  अशा धूसर, अस्पष्ट वाटा धुंडाळत लेखक एक अखंड नाट्य परंपरा उभी करू पहातो. 

भारतीय नाटक संस्कृत रंगभूमीच्या आधीपासून सुरू होते. उपलब्ध संदर्भांनुसार ऋग्वेदातील तिसऱ्या मंडलातले विश्वामित्र नदी संवाद सूक्त हे आद्य  नाटक आणि त्याचा रचयिता, विश्वामित्र हा आद्य नाटककार असल्याचा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. 

मात्र या प्रतिपादनातील अडचणींची, त्रुटींची त्याला जाणीव आहे. म्हणूनच स्वत:च्याच संस्कृतीबद्दलच्या भारतीयांच्या अनास्थेबद्दल तो कोरडेही  ओढतो. प्रस्तुत पुस्तक लिहितानाही लेखकाला हा विदारक अनुभव आला. अनेक वेद पाठशाळांतून, ‘ऋचांचा अर्थ असा कुणालाही सांगता येत नाही, त्यातील शक्ती कमी होते’, असं म्हणत लेखकाची बोळवण करण्यात आली. प्राज्ञ पाठशाळेच्या विद्यमान अध्यक्षा, ज्येष्ठ संस्कृत विदुषी श्रीमती सरोजा भाटे, यांनी मात्र संहिता वाचून मांडणीच्या  शिस्तीचे   कौतुक केले. वेदशास्त्र, नाट्यशास्त्र आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे असा अभिप्राय दिला. 

पडदा

Thursday, 21 December 2023

दोन शिल्पं आणि एक रसिक मन

 

दोन शिल्पं आणि एक रसिक मन

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

ती दोन शिल्पं माझा पिच्छा पुरवत असतात. मधूनच  मनात तरळून जातात. मला भावुक, अंतर्मुख करून जातात. हे असं होण्यात त्या शिल्पकाराची सारी प्रतिभाच कारण आहे. पण कधी कधी मला वाटतं की रसिकमनही तेवढेच कारण आहे.  

अश्रू म्हटलं की मराठी माणसाला आई आठवते. साने गुरुजींच्या शामच्या आईनं काही पिढ्यांवर गारुड केलं आहे. आई म्हटलं की कसली सोज्वळ आणि भावुक होतात माणसं. पण ‘आई’ नावाच्या शिल्पाने अंतर्बाह्य ढवळून निघल्याचा अनुभव  मला आला तो व्हिएतनाममध्ये. तिथल्या युद्ध-संग्रहालयात.

तब्बल वीस वर्ष चाललेलं हे युद्ध (१९५५-७५). एकीकडे बलाढ्य अमेरिका तर दुसरीकडे, दुबळा व्हिएतनाम.  शेवटी इथे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. व्हिएतनामचा विजय झाला, पण व्हिएतनामलाही काही कमी भोगावं लागलं नाही. युद्ध हरण्या खालोखाल  काही वाईट असेल, तर ते युद्ध जिंकणे होय. व्हिएतनामला याचा पुरेपूर प्रत्यय आला.

अशा या युद्धाचं  उघडंवाघडं,  भीषण वास्तव, खुलेआम मांडणारं हे युद्ध संग्रहालय. छिन्न चेहरे, विच्छिन्न  शरीरे, छिन्नमनस्क  जनता आणि नापाम बॉम्बने विद्रूप झालेल्या पिढ्याचपिढ्या. ‘एजंट ऑरेंज’ने (एक रासायनिक अस्त्र) उजाड केलेली शेती, वैराण भातखाचरे,  केळीचे सुकलेले बाग, उघडे ताड  आणि बोडके माड. एकेक दालन पार करता करता किती वेळा अंगावर सरसरून काटा येतो. उभ्याउभ्या दरदरून  घाम फुटतो. डोळे गप्पकन्  मिटून आपण जिथल्यातिथे थिजून जातो. हे क्रौर्य आपल्याला  पहावत सुद्धा नाही तर  ज्यांना भोगवं लागलं, त्यांना काय यातना झाल्या असतील; या विचारानी आपण अस्वस्थ होतो.  कोणीही सहृदय माणूस हे संग्रहालय एका झटक्यात पाहुच शकत नाही. थोडा वेळ दालनाबाहेर बसायचं पुन्हा हिम्मत गोळा करायची आणि आत  शिरायचं असं करावं लागतं. युद्धस्य फक्त  कथाच  रम्या, वास्तव किती हादरवून सोडणारं असतं ह्याचं यथार्थ दर्शन इथे घडतं.

तिथे  एक ओबडधोबड पुतळा आहे. ‘मदर’ नावाचा.  सात आठ फुट उंचीचा. नाव ‘आई’ असलं तरी मुळात तो बाईचा पुतळा आहे हेही  सांगावं  लागतं. बाईपणाचं आणि त्याहूनही आईपणाचं कोणतंच लेणं तिच्या अंगाखांद्यावर नाही. ना आसपास खेळणारी चार दोन गोजिरवाणी पोरं, ना थानाला  लुचलेलं एखादं  पदराआडचं पिल्लू. मुळात तिला थानंच नाहीत. छातीच्या फासळ्याच  तेवढ्या दिसताहेत.  अस्थिपंजर   झालेलं शरीर, त्याला कसलीही गोलाई नाही. तोंड




खप्पड, त्यावर ना वात्सल्य, ना प्रेम, ना करूणा,  ना काही. आईपणाशी निगडित कोणतीही भावना नाही त्या चेहऱ्यावर. चेहरा कसला जवळजवळ कवटीच, म्हणायची इतका भेसूर. ही कसली ‘आई’ ही तर बाई सुद्धा नाही. शिवाय ही उभी आहे जमिनीतून निवडुंगासारख्या फुटलेल्या काही पोलादी पट्यांमध्ये. कमळात वगैरे उभी असल्यासारखी. पण हिच्या हातातून मोहरा वगैरे काही पडत नाहीयेत. हिचे हात तर नुसते दोन्ही बाजूला लोंबताहेत, जीव नसल्यासारखे. काही देणं तर सोडाच पण काही मागायचंही त्राण त्यांच्यात


नाही.

ज्ञूएंग होयांग हुय अशा काही तरी नावाच्या कलाकाराची ही कृती. नाव ‘मदर’ दिलंय म्हणून, नाहीतर मम्मी ऐवजी इजिप्त्शियन ‘ममी’ म्हणून खपलं  असतं  हे शिल्प. पण ह्या कलाकृतीची पार्श्वभूमी लक्षात येताच हे शिल्प आपल्याला हादरवून सोडतं.

युद्धग्रस्त, उद्ध्वस्त, व्हिएतनाममधील ही ‘मदर’ आहे. हीचं  सर्वस्वं  लुटलं गेलं आहे. बेघर, निराधार, निरापत्य अशी ही आई आहे. म्हणजे कधीतरी ती  आई होती. आता तिची मुलं नाहीत. ती बहुधा युद्धात मारली गेली. तेंव्हा आता ती निरापत्य.  आता हिला घर नाही ते बहुधा युद्धात ध्वस्त झालं. आता हिला शेतीवाडी नाही, म्हणजे असेलही जमिनीचा तुकडा, पण नापाम बॉम्बच्या रासायनिक माऱ्यात तिथलं पीक झालंय निष्प्राण  आणि जमीन झालीय आता कायमची नापीक.

हे आर्त साकार करण्यासाठी मग कलाकाराने बॉम्बच्याच कपच्या वापरल्या आहेत. त्या युद्धध्वस्त देशातल्या त्याा शिल्पकाराला अन्य काही साधन सामुग्री नाही मिळाली बहुतेक.  ह्या कपच्यांच्याच  कमळ-पसाऱ्यात ती उभी आहे, ह्या कपच्यांनीच ती बनली आहे. ज्यामुळे ती उद्ध्वस्त झाली त्या बॉम्बच्या तुकड्या तुकड्यांनीच ती आता घडली आहे. आपल्या रयाहीन, पोकळ, वठल्या शरीरातून पहाणाऱ्याचा अंत पहाते  आहे.

 

 

व्हिएतनाममध्ये सर्वस्व गमावलेल्या  आईचं शिल्प होतं. मुले गमावलेली आई  जितकी करुण तितकेच आई गमावलेले मूलही केविलवाणे.

आई विना मुलीचं काळीज पिळवटून टाकणारं शिल्प मी पहिलं स्कॉटलंडमध्ये,  एडिनबरोला, केल्विनग्रोव्ह म्युझीयममध्ये. मूर्त कारुण्य जणू  अशी ती कारुण्यमूर्ती! ह्या शिल्पाचे   नावच मुळी  मदरलेस,  ‘आईविना’! शिल्पकार जॉर्ज लॉसन हा याचा कर्ता. याची इतरही अनेक शिल्प आहेत पण हे सर्वात गाजलेलं. सर्वात लोकप्रीय. पत्थराला पाझर फोडेल असं हे  पाषाण सौंदर्य  पहायला लोकं लांबलांबहून येतात.

 


पांढऱ्या दगडातील हे रेखीव शिल्प. एका  खुर्चीत आपल्या आपल्या सहा  सात वर्षाच्या लेकीला पोटाशी घेऊन एक बाप बसला आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचे विमनस्क भाव अगदी गडद आहेत. बऱ्यापैकी देखणा, सुखवस्तू असा हा मध्यमवयीन गृहस्थ आहे. त्याचे आणि त्याच्या लेकीचे कपडे छानच आहेत.

त्याचा गाल त्यानी तिच्या डोक्यावर टेकला आहे. डाव्या हातावर  त्या चिमुरडीचं ओझं पेललं आहे आणि  उजवा हातानी  इतक्या नजकातीनं तिच्या पायाला आधार दिला आहे की लेकीबद्दलचे सारे प्रेम, आपुलकी, जवळीक, सहवेदना त्या हलक्याशा  स्पर्शातून प्रतीत होते आहे. एका हाताने आधार तर  दुसऱ्या हाताने सांत्वन आणि विश्वास देत तो बाप स्वतःचं  दुख: लपवतो आहे. ती सुद्धा पपाला अगदी बिलगून बसली आहे. तिला बहुदा आता जगात दुसरे कोणीही नाही. त्याच्या कुशीत तीला  ऊब आणि  आसरा सापडला आहे. खूप खूप रडून तिचा चेहरा अगदी म्लान झाला  आहे. बाप कुठेतरी शून्यात नजर लावून बसला आहे तर  मुलीने डोळे मिटलेले आहेत. अगदी निर्जीव असल्यासारखा तिचा डावा हात बापाच्या हातावरून ओघळला आहे.

तिचे बूट त्याच्या पायाशी लोळताहेत. हे बूट पहाणाऱ्याच्या मनात काहूर उठवतात.  कदाचित बाहेरून कुठून तरी खेळत असताना ती अचानक घरात आली असावी. कोणी काही बोललं असेल किंवा काही निमित्तानी तिला तिची नसलेली आई आठवली असेल आणि मग गडबडीने ती डॅडीच्या कुशीत झेपावली असेल. तिची समजूत काढता काढता मग त्याने हलकेच बूट उतरवले असतील...?  किंवा बाहेर जायला म्हणून तयार होता होता, पप्पाकडून  वेण्या घालून घेता  घेता,  तिला ममाची सय आली असेल आणि मग हमसून हमसून रडण्याच्या भरात बूट तसेच राहीले असतील...?

ह्या मुलीची आई कशानी वारली असावी हाही एक अनुत्तरित प्रश्न. संग्रहालयाच्या संचालकांच्या मते आजाराने अथवा अपघातात तिचे निधन झाले असावे. पण काहींच्या मते ज्या  काळातला पुतळा आहे, त्या काळी (१८७०च्या आसपास) इंग्लंडातसुद्धा,   बायका सहसा मारायच्या त्या बाळंतपणात. 

आपण अशा कितीतरी कल्पना करू शकतो. आणि आपण कितीही कल्पना केल्या तरी प्रत्यक्ष शिल्पकाराच्या मनात काय होतं, ते समजण अवघडच. 




हलकेच स्पर्शणारा पण तरीही  आधाराचा,  आश्वासक बापाचा  हात; दुखा:त होरपळणाऱ्या लेकीचा,   निर्जीव, लुळा  हात, हे सगळं कसं साकार करत असतील शिल्पकार?  त्या घट्टमुट्ट दगडाला तासून तासून त्यात जीव ओतायचा म्हणजे काही साधंसुधं काम नाही. आपल्याला जिथे संगमरवराची  ओबडधोबड शिळा दिसते तिथे मायकल एंजेलोला म्हणे थेट शिल्पाकृतीच दिसायची. ‘मी मूर्ती घडवतच नाही, ती  तिथे असतेच, मी फक्त तिच्या आजूबाजूचा  नको असलेला दगड बाजूला करतो’, असं तो सांगायचा.

अमूर्त दगडात   मूर्ती पहाणारी, कोऱ्या कागदावरचे  चित्र टिपणारी, शांततेच्या अनाहत नादात संगीत ऐकू येणारी माणसं दिव्येंद्रधारी खरी; पण त्या बॉम्ब-कपच्यांच्या ओबडधोबड मनोऱ्याने काळजात कालवाकालव होणारी, कधीकाळी, कोण्या देशी, छिन्नीने  विषण्णता कोरलेल्या त्या दगडापुढे विषण्ण होणारी, स्वर-संवादातल्या शांततेतला  अर्थ ओळखणारी, तुम्ही-आम्ही रसिक माणसंही दिव्येंद्रधारीच की. नाही का? 

 

 

Sunday, 17 December 2023

वसुंधरेचे शोधयात्री: पुस्तक परिचय

रविवार, दि. १७  डिसेंबर २०२३ 
पुस्तक परिचय अभियान - अखंड परिचय सत्र – पुस्तक क्र. १२८२   
आठवडा – १८३ 
परिचय सत्र - २ रे 
सप्ताह कालावधी ११ डिसेंबर २०२३  ते १८ डिसेंबर २०२३ 
शीर्षक – वसुंधरेचे शोधयात्री  
लेखक – डॉ. अनुराग लव्हेकर 
प्रकाशक – राजहंस प्रकाशन   
प्रथमावृत्ती – प्रथमावृत्ती जानेवारी २०२३ 
किंमत – रु ५००/-   
पृष्ठसंख्या – ३४०   
परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

‘वसुंधरेचे शोधयात्री’, हे डॉ. अनुराग लव्हेकर याचे पुस्तक ‘राजहंस’सारख्या मातबर प्रकाशन संस्थेने काढलेले आहे. डॉ. अनुराग डी.एम.(गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी) आहे. म्हणजे पोटा-आतड्याचा डॉक्टर आहे. मूळ गाव नांदेड. सध्या असतो बेंगळुरूमध्ये. तिथल्या, या क्षेत्रातल्या अग्रगण्य हॉस्पिटलमध्ये तो अग्रगण्य कन्सल्टंट आहे. आपल्या क्षेत्राशी अजिबात संबंध नसलेल्या बाबींचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या वेड्या डॉक्टरांपैकी तो एक. 

 अनेक धाडसी प्रवासी वसुंधरेचा शोध घेत राहिले.  पूर्वी पंचक्रोशीच्या बाहेर फारसं कोणाला जावं लागायचं नाही. जाऊ नये, असा संकेतही होता. देशाटन व्हायचं ते तीर्थाटन  म्हणून. मात्र माणसाला आदीम काळापासून अज्ञात भूप्रदेशांचा शोध घेण्याची उर्मी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात, कलाहारी पासून ते टुंड्रा प्रदेशापर्यंत माणसं आहेत.   त्यांच्या भाषा आहेत, त्यांच्या संस्कृती आहेत आणि ज्यावेळी प्रवास चालत होता, तीव्र थंडी अथवा उन्हाळ्यापासून बचावाची साधने मर्यादित होती, अशा काळात या वस्त्या वसलेल्या आहेत. 

ज्ञात इतिहासात युरोपियनांना ‘प्रवासी पक्षी’ बनण्याचे पंख पहिल्यांदा फुटले आणि मग साम्राज्य विस्तारासाठी, धर्मप्रसारासाठी, संपत्तीसाठी आणि कधी कधी निव्वळ साहस म्हणून, या माणसांनी आपल्या बोटी सप्तसागरात हाकारल्या. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती  अनंत अन आशा, किनारा तुला पामराला’, असं म्हणत ‘खंड खंड सारा’ जिंकून घेतला.  या दर्यावर्दींमुळे जगाचा इतिहास आणि भूगोल बदलला. मराठीत त्यांची अगदी त्रोटक  माहिती उपलब्ध आहे. त्यांची कहाणी मांडण्याचा हा प्रयत्न.

कॉन्स्टंटीनोपल तुर्कांनी जिंकल्यामुळे आशियाकडे येणारा खुष्कीचा मार्ग बंद झाला, पर्यायी मार्गाची निकड निर्माण झाली, पूर्वेकडील संपत्ती, मसाल्याचे पदार्थ, रेशीम, यांचं प्रचंड आकर्षण हे या शोध मोहिमांमागील अर्थ-राजकीय कारण. पहिल्या भागात ही सारी  पार्श्वभूमी लेखकाने विशद केली आहे.  

युरोपातून समुद्र मार्गे आशियात यायचं म्हटल्यावर आधी आफ्रिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्यानी प्रवास घडले. होती ती फक्त शिडाची गलबते. प्रवास शिडात वारं  भरलं की मगच शक्य. त्यामुळे वाऱ्यांचा अभ्यास खूप महत्वाचा ठरला.  त्याबाबतीतले विवेचन दुसऱ्या भागात केले आहे. जाता जाता एक नोंद फक्त. युवहाल नोहा हरारीने असा उल्लेख केला आहे की त्याकाळातील नकाशात किनाऱ्यालगतच्या प्रदेशाची स-विस्तार माहिती आहे मात्र आफ्रिकेच्या अंतरंगाबाबतचे अज्ञान, काल्पनिक पऱ्या, राक्षस, चित्रविचित्र प्राण्यांची चित्रे काढून भरून काढले आहे. नंतरच्या काळात मात्र जागा कोऱ्या ठेऊन हे अज्ञान प्रकट मांडले आहे. हरारी म्हणतो, ‘अज्ञानाचा असा स्वीकार, अशा रीतीने अज्ञान मान्य करणे हे ज्ञानाच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल ठरते. रिकाम्या जागा कल्पनेने भरणे चूक आहे.’ 

तिसऱ्या भागात, ‘भारताचा शोध आणि युरोपियनांचा भारतातील साम्राज्यविस्तार’ वर्णीला आहे. विषय जिव्हाळ्याचा असल्याने मला तरी हा भाग अतिशय वाचनीय वाटला. 

अमेरिकेचा शोध तसा अपघातानेच लागला.  त्या खंडाचा पूर्व किनारा आधी पिंजून काढला गेला आणि मग गोरे आणि त्यांचे साम्राज्य आत आत पसरत गेलं. चौथ्या भागात ही साहसकथा येते. वास्तविक ही निव्वळ साहस कथा नाही. एक क्रूर, करुण, कुटील आणि कर्मधर्मसंयोगी  साहस कथा आहे. मात्र या पुस्तकात हा भाग येत नाही. हे त्या खंडाच्या शोधाबद्दल माहिती देणारे पुस्तक आहे. युरोपीयनांनी, विशेषतः स्पेन आणि पोर्तुगीज दर्यावर्दींनी अत्यंत निर्घृपणे   स्थानिकांना सर्वार्थाने उद्ध्वस्त केले. गोव्याचा इतिहासातही हे सारे आहे. अनुरागचे पुस्तक वाचून कोणांस हा ही इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा व्हावी म्हणून ही माहिती. 

 पाचव्या भागात ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स आणि दोन्ही ध्रुवांपर्यंत माणसाची मजल कशी गेली हे दिले आहे. 

भरपूर नकाशे चित्र फोटो आणि दोन परिशिष्ट पुस्तकाला जोडलेली आहेत. त्यामुळे पुस्तक जड आणि विद्वतजड असं दोन्ही झालं आहे. मात्र नकाशे अधिक स्पष्ट आणि मोठे असायला हवे होते. 

माहिती बरोबरच लेखकाचे चिंतनशील मनही आपल्याशी बोलत असते. एके ठिकाणी अनुराग म्हणतो, ‘माणसाकडे नेहमी विनाशक या भूमिकेतून पाहणे चुकीचे आहे. उदय आणि विलय हे निसर्गचक्रच आहे.  हे अव्यवाहात चालूच असते.  डायनासॉर, मॅमोथ,  प्रचंड नेचे, सरस्वती नदी वगैरे पृथ्वीवरून नष्ट झाले त्यात माणसाचा सहभाग शून्य म्हणावा इतका; त्यामुळे हवामान बदलाचा बागुलबुवा उभारण्यापेक्षा शाश्वत विकासाची नीती शोधावी.’ आणखी एके ठिकाणी लेखक म्हणतो, ‘खरंतर अशी अज्ञातात उडी म्हणजे वेडे साहसच.  असं उत्कट जगण्याच्या आग्रहास्तव सतत मृत्यूच्या सीमारेषेवर जगत राहणे आणि बेडरपणे प्रसंगी मृत्यू कवटाळणे हे सामान्य मेंदूच्या आकलनशक्तीच्या पलीकडेच आहे.  हा सारा उपद्व्याप  करताना खलाशांकडून चुका झाल्याच नाहीत असे नाही पण त्यामुळेच तर त्यांचे माणूस पण अधोरेखित झाले आणि त्यांना देवत्व नाही पण नायकत्व अवश्य प्राप्त झाले.’ 

पुस्तक तर वाचावेच पण शक्यतो लेखकाशी देखील बोलावे असं मला या निमित्ताने सुचवावसं वाटतं. त्यांना बोलायला वेळ नसावा असं आपल्याला उगीच वाटतं आणि वेळ नसला तरी स्वतःच्या लिखाणाबद्दल बोलायला सहसा सगळ्यांना आवडतं. मी बरेचदा असे फोन करत असतो. त्या लेखनाच्या अलीकडचं पलीकडचं असं काहीतरी गवसत असतं. 

हे पुस्तक वाचल्यानंतर मी अनुरागला मेसेज केला, मग फोन केला.  एका फोनमध्येच आमची दोस्ती झाली आणि त्याला मी पहिला प्रश्न केला, ‘इतकी सगळी माणसं, बोटी भरभरून भारताच्या किनाऱ्याला लागत होती, व्यापार करत होती, श्रीमंत होत होती, इथे वखारी उघडत होती, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व मिळवत होती पण एकाही भारतीयाला त्याच बोटीत बसून आपण उलटा प्रवास करावा, त्या बोटींची दिशादर्शक यंत्रणा (नॅव्हीगेशन सिस्टीम) कशी चालते हे बघावं, ही माणसे येतात तो प्रदेश, भाषा, हवामान आहे तरी कसं, याचा शोध घ्यावा असं कसं वाटलं नाही? असा उलटा प्रवास करणारा एक जरी वेडा जन्मला असता तर जगाचा नकाशा काही वेगळाच असता. एक सुद्धा कोकणचो पूत गलबत घेऊन अमरिकेस कसा न्हय गेलां? निदान आफ्रिकेस?’  

‘मला माहित नाही’, अनुरागचं प्रामाणिक उत्तर. तरीही काही शक्यता त्यानी लक्षात आणून दिल्या. बहुतेक भारतीयांचा प्रवास हा व्यापार किंवा धर्मप्रसार एवढ्या मर्यादित उद्देशानेच झाला. बौद्ध भिख्खू गेले तेही मुख्यत्वे आग्नेयेला आणि चीनला. अन्यत्र नाही. जे गेले आणि आले, त्यांनी काही लिहिलं नाही, जे लिहिलं ते जतन केलं गेलं नाही किंवा आक्रमणांत नष्ट झालं; किंवा तिन्ही. उपलब्ध रसशास्त्र आणि सामरीक गरजांची सांगड घालून आपण उत्तम बंदुका आणि दारुगोळा बनवू शकलो नाही. तसेच ज्योतिर्विद्या (म्हणजे खगोलशास्त्र, ज्योतिषविद्या वेगळी हं) आणि  गणितात पारंगत असूनही दोन्हीची सांगड घालून उत्तम नकाशे काही आपण  बनवू शकलो नाही. सहाजिकच आपल्या ‘मळ्यास कुंपण पडले’. व्यापक भू-राजकीय भान आलेच नाही आणि आपण होते तेही गमावून बसलो.’ 
अनुरागचं किंवा एकूणच इतिहासचं पुस्तक वाचायचं  ते एवढ्याचसाठी. विंदा सांगून गेले आहेत, 

इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेऊन ना नाचा;
करा पदस्थल त्याचे आणि चढून त्यावर भविष्य वाचा!

शब्द कल्पिताचे: पुस्तक परिचय

शनिवार, दि. १६  डिसेंबर २०२३ 
पुस्तक परिचय अभियान - अखंड परिचय सत्र – पुस्तक क्र. १२८१  
आठवडा – १८३ 
परिचय सत्र - २ रे 
सप्ताह कालावधी ११ डिसेंबर २०२३  ते १८ डिसेंबर २०२३ 
शीर्षक – शब्द कल्पिताचे, न पाठवलेली पत्रे  
संपादक – स्वानंद बेदारकर 
प्रकाशक – शब्दमल्हार प्रकाशन   
प्रथमावृत्ती – प्रथमावृत्ती २४ मार्च २०२३ 
किंमत – रु १५००/-   
पृष्ठसंख्या – ४२४   
परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

शब्द मल्हार प्रकाशनने अत्यंत देखण्या रूपात प्रकाशित केलेल्या ‘शब्द कल्पिताचे, न पाठवलेली पत्रे’, या पुस्तकाचा परिचय मी आज करून देणार आहे.  संपादक आहेत स्वानंद बेदरकर. पुस्तकाची कल्पना स्वानंद बेदरकर यांचीच. त्यांनी विविध क्षेत्रातील नामवंतांना त्यांच्याच क्षेत्रातील गतकालीन दिग्गजांना पत्र लिहिण्याची विनंती केली. अर्थातच मायन्यातील  व्यक्तीला ही पत्रे कधीच पोहोचणार नाहीत.  म्हणून हे शब्द कल्पिताचे, ही न पाठवलेली पत्रे. 

मुखपृष्ठ,  जुन्या जीर्ण वहीच्या पानाचे, जुन्या पत्राची आठवण करून देणारे. त्यावर वर्षानुवर्ष वहीत जपून ठेवलेल्या पानाफुलांची पखरण. त्या पानाफुलांनी देखील इमाने इतबारे आपले रूप आणि रेषा जपून ठेवलेले, अगदी परागकोशासकट. आतही पानोपानी, वहीच्या रेषांत अडकलेली ही ‘स्मृतिपत्रे’ आणि ‘स्मृतिफुले’ आहेतच. मोठा आकार, नेत्रसुखद अक्षरमुद्रा आणि नेटक्या सजावटीने हे पुस्तक वाचनीय तसेच प्रेक्षणीय झाले आहे.

पुस्तकाची कल्पना साऱ्यांना मनापासून पसंत दिसतेय. तब्बल ५० नामवंतांनी हा पत्र लेखनाचा गृहपाठ सादर केला आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त पंच्याहत्तरी गाठायची होती पण पुस्तकाचा आकार पेलेनासा झाला असता. तेंव्हा आणखी एका खंडाची ग्वाही संपादकांनी देऊन ठेवली आहे. 

लेखकांची यादी नजरेखालून घातली तर सध्या  महाराष्ट्राच्या विचारविश्वावर गारुड घालून  असलेली नावे इथे दिसतील. अशोक चौसाळकर, बाबा भांड, विवेक सावंत,  विनया जंगले, अवधूत परळकर, वीणा  गवाणकर, चंद्रमोहन कुलकर्णी अशी अनेक. मायन्यातली नावे म्हणजे ह्या मंडळींना वंद्य मंडळींची, त्यामुळे ती यादीही भारदस्त आहे. कालिदासापासून ते शकुंतला फरांजपे आणि पिकासोपासून ते नामदेव ढसाळ असे अनेक आहेत यात. आसावरी काकडे यांनी तुकारामाला पत्र लिहिले आहे, तर श्रीनिवास हेमाडे यांनी शिवाजी महाराजांना; भारती पांडे यांनी पीजी वुडहाऊसला, तर आशुतोष अडोणींनी डॉ. हेडगेवारांना. अशा जोड्या वाचत जाणंही मनोरंजक ठरतं.  

मायनेही छान आहेत, विचारपूर्वक लिहिले आहेत. प्रिय मित्रा, कालिदासा (सरोजा भाटे), परम आदरणीय, शास्त्रीबोवा (बाळशास्त्री जांभेकर यांना अनंत येवलेकर यांचे पत्र), तीर्थरूप तर्कतीर्थ कृ.शि.सा.न.वि.वि.(सुनीलकुमार लवटे),  पाब्लो आबा, शिरसाष्टांग नमस्कार (श्रीराम हसबनीस), आनंदयात्री प्रिय बाकीबाब यांस (अनुजा जोशी).    अवधूत परळकर यांनी ‘मनुष्य नावाच्या प्राण्याला’, ‘भल्या माणसा’ असं संबोधून पत्र लिहिले आहे. 

सारीच पत्रे वाचनीय आहेत. 

प्रस्तावनेत संपादकाने  पत्र वाङमयाचा धावता आढावा घेतला आहे. रुक्मिणीने कृष्णाला लिहिलेल्या पत्रापासून लोकहितवादींची ‘शतपत्रे’, ‘इंदु काळे ,सरला भोळे’, ‘शामची पत्रे’, ‘प्रिय जी.ए.’ अशा नोंदी येत जातात. लाल शाईने पत्र लिहू नये, मृत्यूची वार्ता देणारे पत्र फाडून टाकावे असे सामाजिक संकेत निर्माण होण्याइतके  पत्र आपल्या संस्कृतीत सामावून गेले. पत्र म्हणजे काळाचा क्रॉस सेक्शन. मात्र इथली पत्रे वर्तमानातून भूतकाळात लिहिलेली. 

लेखकांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. पूर्वसूरींना वंदन करण्यासाठी, आपला आदरभाव, कृतज्ञभाव पोहोचवण्यासाठी, त्यांच्याबद्दल भरभरून बोलण्यासाठी, इतिहासातील कृत्याबद्दल जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्यामुळे आपल्यात काय परिवर्तन झाले ते खुलेआम  सांगण्यासाठी.  ‘हे आत्मसख्या व्हिक्टरा’ अशी सुरवात करून शंतनु गुणे यांनी व्हिक्टर फ्रँकेल  यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असा हृद्य प्रवास मांडला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. आशा बगे यांनी इंदिरा संतांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्याच सुंदर सुंदर काव्यपंक्ती वाचायला मिळतात. आसावरी काकडे  तुकोबाला, ‘देई  तुझा लाहो आता मज’ अशी साद घालतात. आपल्याकडे टीकाकारांचे मत  नोंदवून ठेवण्याचा उमदेपणा आणि टीकाकारांना निस्संदर्भ उद्दामपणाही होता.’, असं एकनाथ पगार, इतिहासाचार्य राजवाड्यांना बजावतात. 

यात कधी कधी भाषेत थोडं अवघडलेपण येतं. तुम्ही अमुक केलंत, तमुक केलंत अशी त्या माणसाला माहिती असलेलीच माहिती त्यांनाच सांगितली जाते. हिंदीत जशी ‘आपका जनम् इलाहाबाद में हुआ. आपने सतारह कहानी संग्रह, तीन खंडकाव्य एवं ग्यारह नाटक लिखे है’, अशी ओळख करून देतात, तसं काहीसं वाटतं हे. वर्तमानातील वाचकाला ह्या महनीय व्यक्तींबद्दल सांगायचं तर असं होणारच. वर्तमानातून भूतकाळात असा हा पत्र व्यवहार असल्याने दोन्ही काळांची तुलना, थोडे स्मरणरंजन आणि सद्य काळाबद्दल अनुदार उद्गार, हेही आहेच. 

लिहिणारे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत, तेंव्हा त्यांच्या कार्य कर्तृत्वाची त्यांच्या व्यासंगाची झलक इथे दिसतेच. कधी,

‘गळ्यात गळा घालून गळा काढून रडणारे 
गळ्यात गंडा बांधून ऐकतात जे कृष्णमूर्ती 
त्यातलाच एक शिंप्याच्या काचकपाटात टाय बांधून 
उभा असलेला पहीला, सुटली समस्या पुरती’

अशी मठ्ठ, इस्त्रीबाज शिष्यांची टिंगल करणारी, आरती प्रभूंची कविता येते (रवी लाखे). तर कधी 

‘पुढां स्नेह पाझरे, माघां चालती  अक्षरें,
शब्द पाठीं अवतरे, कृपा  आधीं.’ अशी ज्ञानेश्वरी तील ओवी येते. 

एकूणच हा पत्र संवाद अतीशय वाचनीय, मननीय आणि संग्राह्य अहे हे निश्चित.

Wednesday, 13 December 2023

पुस्तक परिचय संविधान – ग्रेट भेट

 

पुस्तक परिचय संविधान – ग्रेट भेट

लेखिका – निलम माणगावे

प्रकाशक – राजगृह प्रकाशन   

प्रथमावृत्ती – प्रथमावृत्ती जानेवारी २०१०   

पृष्ठसंख्या – ५६

परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

संविधान – ग्रेट भेट,  ह्या पुस्तिकेची ओळख

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

नीलम माणगावे ह्या एक कसलेल्या लेखिका आहेत. तब्बल ७० पुस्तके, आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांसाठी लिखाण, शासनाचे तसेच इतर पुरस्कार आणि साहित्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश, असे कर्तृत्व त्यांनी गाजवले आहे. ‘संविधान - ग्रेट भेट’ ही त्यांची छोटीशीच पुस्तिका आहे, जेमतेम ५६ पानांची,  मात्र मुलांसाठी कसे लिहावे याचा जणू आदर्श वस्तूपाठ आहे.  

 

या पुस्तिकेतले बहुतेक प्रसंग शाळेच्या वर्गात घडतात. माळी सर आणि विद्यार्थी यांच्या संवादातून ‘संविधान म्हणजे काय?’ हे उलगडले जाते. अर्थातच नुसतीच प्रश्नोत्तरे रुक्ष झाली असती, त्यामुळेच मुलांच्या आपापसातल्या खोड्या, दंगामस्ती, सरांनी मुलांच्या आणि मुलांनी सरांच्या घेतलेल्या फिरक्या, मुलांच्या घरातले काही प्रसंग, अशा सगळ्या मालमसाल्यामुळे संविधानासारख्या धीरगंभीर विषयावरची ही पुस्तिका  खुसखुशीत झाली आहे.

 

मुळात संविधान म्हणजे काय?, हे मुलांना समजावून सांगणं तसं  अवघड आहे. शिवाय ते तयार कसे झालं ही प्रक्रिया समजावून सांगणं हे त्याहून अवघड.  पण माणगावे  यांना मुलांच्या भावविश्वाची जाणीव असल्यामुळे त्यांनी हे छान जमवून आणलं आहे.

 

घटना बनवताना समितीच्या सदस्यांची मते लक्षात घेऊन अंतिम मसुदा तयार करण्यात आला. हे सांगताना माळी सर, म्हणजे खरंतर माणगावे बाई, भाजणीचे अगदी घरगुती उदाहरण देतात. ती बरोबर झाली आहे ना हे बघण्यासाठी जशी दोन-चार जणांना चाखायला देऊन त्यांचं मत घेतलं जातं, थोडं मीठ कमी, तिखट जास्त, हे सगळं दुरुस्त केलं जातं, तसं घटनेच्या बाबतीत झालं; असं समजावून सांगतात.

 

संविधानाच्या प्रास्ताविकातील ‘सार्वभौम’, ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’, ‘प्रवर्तित करणे’, स्वतःप्रती अर्पण करणे, वगैरे शब्दप्रयोगदेखील माणगावे बाई अशाच सहजतेने उलगडून दाखवतात. कधी एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे, तर कधी शाळेतल्या नियमांचे उदाहरण देऊन मुलांसाठी अर्थ स्पष्ट करतात. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म मनात आणि घरात बाळगायचा, रस्त्यावर उतरवायचा नाही असेही समजावून सांगतात. मुलांना अर्थातच सगळं समजतं असं नाही, काही वेळा ‘मुलं ढीम्म बसतात, कावळे भिजून बसल्यासारखी!’

 

पुढे घटनेमधील हक्क आणि कर्तव्यांबद्दल देखील मजेशीर संवाद येतात. शिक्षणाचे ‘स्वातंत्र्य’ आहे आणि ‘हक्क’ही  आहे. यातील सूक्ष्म फरक माणगावे मुलांच्या पातळीवर जाऊन समजावून सांगतात. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये; श्रद्धा, संचार, वाचन, लेखन, अभिव्यक्ती ही स्वातंत्र्ये  आणि ओघानेच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक लक्षात आणून देतात. शेवटी सांविधानिक कर्तव्यांपर्यंत आल्यावर मुलांची, ‘अरे बापरे, कर्तव्य नकोत सर हक्कच पुरेत आम्हाला’, अशी गंमतीशीर पण स्वाभाविक प्रतिक्रियाही माणगावे नोंदवतात.

 

संवादप्रधानतेमुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे. उपक्रमशील शिक्षक यावरून  छान नाटुकली बसवू शकतील. ‘माळी’ सरांपेक्षा शाळेतली बिनाआडनावाची मुलं  कशी धर्मनिरपेक्ष वाटतात आणि एरवी कौटुंबिक उदाहरणे देणाऱ्या बाई एके ठिकाणी पौराणिक कथेत शिरतात हे खटकते.

 

मात्र इतका किचकट विषय इतक्या सहजतेने उलगडून दाखवल्याबद्दल नीलम माणगावे यांचे अभिनंदन

 

Tuesday, 12 December 2023

पुस्तक परिचय : धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (श्री. विश्वास दांडेकर यांच्या पुस्तकाचा परिचय)

 

किमकुर्वत विश्वास?

परिचय डॉ. शंतनु अभ्यंकर

 

 

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।

मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥१॥

 

असा प्रश्न गीतेच्या सुरवातीलाच धृतराष्ट्राने संजयाला विचारला आहे.

असाच काहीसा प्रश्न, ‘हे धृतराष्ट्राचे आणि पांडूचे पुत्र असे कसे आणि का लढले?’,  स्वत:ला विचारून या महाभारताची संगती लावण्याचा प्रयत्न श्री. विश्वास दांडेकर यांनी, आपल्या ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’, या पुस्तकांत केला आहे.

 

सामान्यजनांसाठी महाभारत हे एक हा एक पवित्र धार्मिक ग्रंथ आहे.  इतिहास आहे. त्यातील पात्रे  देवतास्वरूप आहेत. चिकित्सक अभ्यासकांसाठी हे एक महाकाव्य आहे. एक प्रकारचा सामाजिक दस्तावेज आहे. ज्या काळी हे रचलं गेलं त्या काळातल्या प्रथा-परंपरा, देवता, पाप-पुण्याच्या कल्पना, राजकीय, सामाजिक, आर्थिक मूल्ये आणि व्यवस्था, अशा सगळ्यांमध्ये डोकावून पाहता येईल, अशी भूतकाळात रोखलेली दुर्बीण आहे.

 

अशा सुरात, पात्रांचे दैवतीकरण आणि चमत्कार वगळून, महाभारताचा अन्वय आणि अर्थ लावणारी अनेक पुस्तके आहेत. तज्ञांची आहेतच पण संशोधकांच्या रुक्ष भाषेतल्या मांडणीपेक्षा ललित अंगाने या विषयाचा वेध घेणारीही आहेत. इरावतीबाईंचे ‘युगांत’ आणि आजचा कादंबरीरूपातला लोकमान्य ग्रंथ, ‘पर्व’, हे दोन या आकाशातील लखलखते तारे.  कोणाही चोखंदळ रसिकाच्या वाचनातून भैरप्पांची, उमा कुलकर्णींनी मराठीत अनुवादित केलेली, ‘पर्व’ सुटणे शक्य नाही.

 

इरावतीबाईंकडून स्फूर्ति घेऊन ललित निबंध स्वरूपामध्ये महाभारत आणि तत्कालीन राजकारण याचा अन्वयार्थ लावण्याचा घाट विश्वास दांडेकर यांनी ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ या आपल्या पुस्तकात घातला आहे. अनेक ग्रंथांचे परिशीलन करून, अनेक विद्वानांशी चर्चा करून त्यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. भीष्म, द्रोण, कृप, आणि शल्य या ज्येष्ठांनी ‘अर्थस्य पुरुषो दास:’ हा असे उद्गार काढले आहेत. पण ‘माणूस हा संपत्तीचा गुलाम असतो’ तसाच  तो राजकारणाचाही गुलाम असतो असं दांडेकरांनी दाखवून दिलेलं आहे.

 

बृहन महाराष्ट्रात देशाटन, देशविदेशातील पंडित मैत्री आणि अनेकानेक  सभांतून  संचार, अशा मनुजा चातुर्य येण्यास आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी दांडेकरांना प्राप्त आहेत. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे हा जसा समृद्ध करणारा अनुभव असतो तसं हे लिखाणही आहे. गप्पांगणात येतात तसे लिखाणाच्या  ओघात अनेक विषय येतात. त्या त्या वेळी दांडेकर तो तो ऐवज पेश करतात आणि त्यांचा हा संग्रह पाहून आपण आश्चर्यचकित होतो.  

 

सरस्वती नदीच्या अस्तित्वाबद्दलचं ताजं संशोधन काय सांगतं? महाभारतकाळी  ‘सभा’ कशा बांधल्या जात असत? मयसभा, तोरणस्पटिकसभा, सुधन्वासभा अशा सभांचे उल्लेख येतात. म्हणजे नेमकं काय असावं? ‘धर्मयुद्ध’ नेमकं कसं लढलं जायचं? महाभारतकालीन गदा, धनुष्य-बाण, चिलखते नेमकी बनवायचे कसे आणि कशाची? रथ नेमके कसे बनवलेले असत? द्यूत खेळायचे तरी कसा? (आपल्याला वाटतो तसा तो सारीपाटासारखा खेळ नव्हता म्हणे.) असे विषयाशी थेट संबंधित प्रश्न ते विचारतात आणि त्याबद्दलचे खुलासे सादर करतात.

त्याच बरोबर, अवांतर म्हणवेत असे, पंचमस्तंभी हा शब्द कुठून आला? त्याचा स्पेनच्या आधुनिक इतिहासाशी कसा संबंध आहे? आजच्या माफिया टोळ्या आणि बकासुर यांचं नातं काय? असेही अनेक प्रश्न दांडेकर उत्तरतात.

 

अगदी मागितलेली पाच गावे सुद्धा द्यायला दुर्योधनाने नकार दिला किंवा कृष्ण शिष्टाई च्या प्रसंगी तयारी असूनही कृष्णाला तो अटक करू शकला नाही; याच्या संभाव्य भू-राजकीय कारणांशी ते पोहोचतात. याचा अलीकडच्या म्हणजे प्रतपगडच्या, पानिपताच्या, दुसऱ्या महायुद्धातल्या डावपेचांशी सांधा  जुळवून दाखवतात.

 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे कृष्णाचं मूल्यमापन एक राजकीय नेता म्हणून केलं आहे. मोठ्या चातुर्याने, हिकमतीने आणि कूटनीतीने;  नंद गोपाच्या घरी, गोकुळासारख्या एका छोट्या गावात वाढलेला हा मुलगा, महाभारतातील राजकारणाच्या केंद्रस्थानी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आला आहे. मग मगधापासून ते गांधार देशापर्यंत आणि कुरुक्षेत्रापासून विदर्भापर्यंत पसरलेली विविध राजघराणी, त्यांचे परस्पर संबंध, तत्कालीन सामाजिक, नीती नियम, धर्मकल्पना यांच्या पायावर कृष्णाचं राजकारण उभं आहे. त्याच्या उक्ती आणि कृती या तत्कालीन सामाजिक स्थितीच्या निदर्शक आहेत. त्यात भर म्हणजे कृष्णाने गीता सांगितली आहे आणि त्यामुळे तो तत्त्वज्ञाच्या पातळीवर पोहोचला आहे.  हे सारं लक्षात घेऊन दांडेकरांनी  हे निबंध लिहिले आहेत. तत्कालीन भू -राजकीय नकाशेही दिले आहेत.

 

कथनाच्या ओघात आर्यपूर्व संस्कृती, आर्यांचे आगमन किंवा आक्रमण याचीही चर्चा येते.  प्राचीन वाङमयाची काल-निश्चिती कशी केली जाते हेही सविस्तर समजावून सांगितले आहे.

आर्य आक्रमक का नॉन आक्रमक?, सरस्वती नदी होती का नव्हती? हे मी अगदी उत्सुकतेने वाचलं. पण या वादांना  निव्वळ पुरातत्वीय समजण्याचं कारण नाही. या वादांना डावे आणि उजवे असे काठ आहेत. दोन्ही काठांवर आपापले सिद्धांत घट्ट धरून दोन्ही मतांचे पंडित आहेत आणि त्यांच्या कर्कश्श कोलाहलात कोणाचेच नीट ऐकू येत नाहीये; एवढं मला समजले.  मात्र मॅक्सम्युलर सायबाची मखलाशी, गोऱ्यांची चापलूसी वगैरे भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. ‘मखलाशी’ आणि ‘चापलूसी’ हे शब्द मी इथे जाणीवपूर्वक वापरले आहेत. कारण जे वाचायला मिळते ते तेच आहे.

 

महाभारत हे सिंधु संस्कृतीत घडलेले युद्ध असावे अशी मांडणी इथे केली आहे. ‘गेल्या शतकात मांडलेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताचा पाया आता ढासळला आहे, भारतातील लोहयुगाची सुरुवात हजार दीड हजार वर्षांनी तरी मागे गेली आहे आणि ती  अजूनही मागे जाण्याची दाट शक्यता आहे.  रथ आणि घोडे सिंधू संस्कृतीला अपरिचित नव्हते, एवढं आता निश्चित झालेलं आहे. ऋग्वेदाची निर्मिती ख्रिस्तपूर्व पंधराशेच्या कितीतरी आधी झाली असण्याची शक्यता दाट आहे.  त्यामुळे वेद आणि त्यांच्यानंतर निर्माण झालेली उपनिषदे आणि पाचवा वेद समजले जाणारे महाभारत, या सर्वांच्या निर्मितीबद्दल नवी प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.’ असा सारांश श्री. रवी गोडबोले यांनी, ‘पार्श्वभूमी’ नामेकरून  लिहिलेल्या उपोद्घातात मांडला आहे. (खरंतर तो पुस्तकाच्या सुरवातीला हवा. कारण या ‘पार्श्वभूमी’वर वाचन घडलं तर ते अधिक सकस ठरेल. उचित ठिकाणी श्री. गोडबोले यांचा नामोल्लेखही  हवा होता.)

 

महाभारत हा आपला रत्नजडित राष्ट्रीय ठेवा आहे, आपल्याला वायव्य, आग्नेय  आणि ईशान्य आशियाशी जोडणारा सांस्कृतिक बंध आहे. त्यावरचे हे सुंदर पुस्तक म्हणूनच गंभीर्यपूर्वक वाचायला हवे.  

 

Monday, 11 December 2023

पुस्तक परिचय: कवितेच्या वाटेवर आणि वाटेवरच्या कविता

 

पुस्तक परिचय  

परिचयकर्ता – डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.


परवा अशोक नायगावकर आमच्या घरी आले. तसे पहिल्यांदाच आले, पण आले म्हणजे काय अगदी झोकात आले. ते नेहमी झोकातच येतात आणि अर्थात नायगावकर येतात म्हणजे आधी त्यांच्या मिशा दारातून आत येतात आणि मिशांच्या पाठोपाठ नायगावकर अवतरतात. झब्बा, झोळी अशा सगळ्या सरंजामासह नायगावकर आले आणि विसावले.  मग मनसोक्त गप्पा झाल्या, आधी इकडच्या तिकडच्या, मग परस्परांच्या लिखाणाबद्दल बोलणं झालं. वाईकरी वृत्तीला जागून मनसोक्त नाष्टा-पाणी(च) झालं. आदल्या दिवशीच्या कार्यक्रमात त्यांनी श्रोत्यांना आणि श्रोत्यांतील मला पोट धरधरून हसवलं होतं.

 कालच्या कार्यक्रमात न म्हंटलेल्या काही कविता म्हणाल का?’, असं सुचवताच काय आश्चर्य, एखाद्या शाळकरी पोराच्या उत्साहाने नायगावकर पोतडीतून वही काढून कविता सादर करायला लागले. सुरवातीला कोचात आरामशीर रेलून मामला चालला होता,  पण दोनच कडव्यात ते पुरते अस्वस्थ झाले.  मध्येच ते थांबले आणि म्हणाले, ‘हे काही खरं नाही गड्या,  हे असं कोचात बसून नाही मला कविता म्हणता येत.  आपण आपले मस्तपैकी मांडी घालून खाली बसू. अर्थातच आम्ही सगळे तात्काळ जमीनदोस्त झालो.  मग काय विचारता, कविराजांनी  एकदा मांडी ठोकली म्हटल्यावर पाठोपाठ कवितांचा पाऊस सुरू झाला. आपल्या शब्द सामर्थ्याने, त्यातील व्यंगोक्ती  आणि वक्रोक्तीने, सादरीकरणाच्या अव्याभिचारी  पद्धतीने  आम्हाला सगळ्यांना त्यांनी खिळवून ठेवले. नायगावकर कविता सादर करत नाहीत ते कविता होतात आणि आपण त्यांना बघत बसायचं असतं. खिडकीतून आश्चर्यमुग्ध होत्साते अक्राळविक्राळ पाऊस बघतो तसं. कारण पाठोपाठ घनगर्जना  व्हावी, विजा  चमकाव्या तसे त्यांचे शब्द, कल्पना, उपमा, उपरोध, आतिशयोक्ती एकामागून एक कोसळत असतात. हसावं का रडावं तेच उमजत नाही.

 

त्यांचा पहिला कविता संग्रह वाटेवरच्या कविता’ (सप्टेंबर 1992) आणि दुसरा ‘कवितेच्या वाटेवर’ (डिसेंबर 2022). तिसऱ्याची आम्ही रसिक वाट पाहून आहोत. पण ‘वाट’ आणि ‘कविता’ ह्या दोन शब्दांची आदलाबदल करून झाली. आता नवीन नाव कसं बनवायचं? ही अडचण असावी! या दोन्ही संग्रहांना कुणाची प्रस्तावना वगैरे काही भानगड नाही. पहिल्या कवितासंग्रहाला तर अनुक्रमणिकासुद्धा नाही. अर्पण-पत्रिका आणि ब्लर्बवरती तीन  वाक्य; ‘कवितेतील सामाजिकता आणि कलात्मकता यांचा समन्वय कसा व्हावा याचा विचार अशोक नायगावकर यांनी केला आहे. म्हणून त्यांची सामाजिक कविता नुसती घोषणा करत नाही वा ठराविक स्वरूपाचा आक्रोश करत नाही.  कवीचे अस्तित्व तिथे जाणवत राहते.’ दुसऱ्या संग्रहाच्या मनोगतात ‘रसिकांना दंडवत’ आणि ब्लर्बवर अरुण म्हात्रे यांनी रचलेले कौतुक-कवन.  

नायगावकर मला अतिशय गंभीर प्रवृत्तीचे कवी वाटतात. पण त्यांच्या त्या सादरीकरणाच्या नायगावकरी शैलीने  श्रोत्यांचा गैरसमज होतो. (कधी कधी त्यांचाही होतो बहुतेक!)  ते ज्या पद्धतीने कविता सादर करतात ती पद्धत कवितेच्या आशयाची फटकून आहे असं मला वाटतं.  अर्थात आशयाबरहुकूम त्यांनी  गंभीरपणे ती कविता सादर केली असती, तर इतक्या लोकांपर्यंत पोचली देखील नसती. म्हणूनच त्यांची कविता  मंचावर किंवा यूट्यूबवर पहावी, पण एकांतात पुनःपुन्हा वाचावी, अशी आहे. अशी वाचतानाही त्यांचे ते सादरीकरण मनातून मंत्रून काढल्याशिवाय तीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे नाही.   हसता हसता अंतर्मुख करणारे अनेक क्षण या कवितांच्या ओळींमध्ये लपलेले आहेत. नायगावकरांना जे सत्य श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या, वाचकांच्या आणि समाजाच्या गळी उतरवायचे आहे ते अत्यंत  जळजळीत, कटू आणि जहरीले आहे. त्यामुळे त्यांनी असा विदूषकाचा वेष धारण  केला आहे,  आपलं म्हणणं शर्करावगुंठीत आणि चेहरा भरदार मिशामंडित राखला आहे.

ज्यांना ह्या विदूषकाच्या चाळयांनी फक्त हसूच येतं त्यांच्याकडे नायगावकर चक्क कानाडोळा करतात. त्यांची, ‘वेड  लागायच्या पूर्वी सुचलेलं!’ सारखी कविता, ऐकून नाही, तर वाचून पहा.  जगण्यातली  व्यामिश्रता, आंतरविरोध, वैय्यर्थ असं सगळं एका फटक्यात त्या कवितेत गोळीबंद उतरले आहे.

टिळक , आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत’ (टिळक); ‘तुला भोज्या बनवलाय, भीमा.’ (तुझी खरंचंच भीती वाटते भीमा! ); ‘पारोशाने नदी म्हणाली, किती दिसांत ग न्हाले  नाही’ (पारोशाने नदी म्हणाली) असे त्यांचे एक वाक्यातले ह्टके फटके एकांतात कविता वाचताना मनावर वळ उठवतात. व्यासपीठावरून सादर होताना हास्याने फसफसून येणारी ही कविता, एकांतात अॅसिडसारखी फसफसून येत भाजते.भोपाळ चिकित्सा’च्या सुरवातीलाच ते म्हणतात, ‘आता त्याच त्याच कीटकांना मारायचे त्यात थोडासा बदल, इतकेच’. एका कवितेत राज साहेबांना भेटून, ‘शेती करणाऱ्या  कॉलेज विद्यार्थ्यांसाठी मोफत सन  स्क्रीन योजनेबद्दल’ आभारही मानले आहेत. एके ठिकाणी  कवी बापूंनाच बजावतो, ‘शेवटी तुम्हीहे राम’  म्हणालात हे मात्र थोडं खटकलं, काही तरी सेक्युलर म्हणायला हवं होतंत.’ एकाच वेळी एकाच वाक्याने प्रतिगामी, गांधीवादी आणि पुरोगामी असं सगळ्यांना घायाळ  करण्याचं कसब खास नायगावकरांचेच.

त्यांच्या कवितेत काहीच्या काही, नाही नाही, क्काहीच्या क्काही घडू शकतं. इथे  बहिणाबाईला मुंबईच्या ‘रंगभऱ्या’ बायका नॉन-स्टिक तवा भेट देतात किंवा अथेन्सच्या अॅक्रोपोलीसच्या खांबांशी कवी खांब खांब खांबोळी खेळतो किंवा एकदा दाताचा  प्रॉब्लेम आल्याबद्दल कवीला डोळ्याच्या डॉक्टरला दाखवतात, तर तो म्हणतो न्यूरॉलॉजिस्टला भेटा!!!!

अशा अनेक धक्कादायक कल्पना ते आपल्याकडे डागत असतात. पण  एकाचा अर्थ लावेपर्यंत दुसरी लाट  थडकते. आपली पार त्रेधा उडते. म्हणूनच की काय; मी त्यांच्या कविता वाचत आहे, आणि ते, माझी  त्रेधातिरपिट बघत, वाईच्या कृष्णाघाटावर मजेत पाण्यात पाय सोडून, खारेदाणे  खात बसले आहेत असं एक मजेदार व्हीजन मला येतं असतं.

‘खा, खा, खारेदाणे खा! पण त्याचं काय आहे नायगावकर,  ते तिसऱ्या कविता संग्रहाचं तेवढं बघा, ही रसिकांच्या तर्फे कळकळीची विनंती.