Thursday, 13 June 2024
लेखांक ११ वा म्हणे अँथ्रोपोसीन!
Thursday, 6 June 2024
लेखांक १० वा कॉलरा
लेखांक १० वा
कॉलरा
कॉलराच्या
साथी हवामानाच्या हेलकाव्यावर अवलंबून नसतात. पण पूर, वादळे, दुष्काळ अशा
अरिष्टांत आणखी भर घालणारे जे अनेक साथीचे आजार आहेत त्या पैकी हा प्रमुख.
कॉलराची
पहिली ज्ञात साथ १८१७ ते १८२५ अशी टिकली. कॉलरा होतो व्हिब्रियो कॉलरा या
जंतुंमुळे आणि पसरतो दूषित अन्न
पाण्यातून. ह्याचा उद्गम गंगेच्या पठारी प्रदेशात असावा, विशेषत: पूर्वेकडील पठारी
भागात. ह्या आजाराच्या अशा खास, ओला देवी, ओला बीबी अशा देवता आढळतात त्या भागात.
कोलकाता ब्रिटिश प्रदेशाची राजधानी होती.
इथून व्यापाराबरोबर कॉलराही निर्यात झाला. कॅन्टन, कोरीया, जपान, श्रीलंका
आणि अफगाणिस्तान मार्गे मध्यपूर्वेतही हा जंतु पोहोचला. आजवर कॉलराच्या सहा साथी
येऊन गेल्या आहेत (१८१७, १८२६, १८४५, १८६२, १८८१ आणि
१८९९) आणि इंडोनेशियातून १९६१ साली सुरू झालेली साथ अजूनही जारी आहे. बाकीच्या
साथी ५ ते २० वर्षात बऱ्याचशा आपोआपच आटोपल्या तरी ही सुरूच आहे. कॉलराच्या एल
टोर ह्या उपजातीचा हा प्रताप.
ह्या
साथींचा छडा लावतालावताच एल निनोने
दक्षिणेला झोका घेतल्याचे आणि हे नियमित
घडत असल्याचे आढळले. कॉलरा आणि हवामान संशोधन हे असं निगडीत आहे. कॉलराचे जंतू
खाडीतील तवंगात, शैवालात (अल्गी) घर करून असतात. एल निनोच्या प्रभावाने पाणी उबदार
होताच हे झपाट्याने वाढतात. तिथल्या अन्न साखळीत प्रविष्ट होतात, शेवटी माणसाच्या
पोटात शिरतात आणि हाहाकार माजतो.
आर
राघवेंद्रराव नावाच्या निजामाच्या सेवेतील सरकारी
डॉक्टरने, १९४१ सालच्या नाथांच्या पालखीच्या निजाम हद्दीतील प्रवासाचं वर्णन लिहून ठेवले आहे. ‘पैठण नगरीत मुळातच कॉलरा होता. ४९ केसेसपैकी १८ रुग्ण दगावले होते.
पोटॅशियम परमँगनेट, ब्लीचींग पावडर आणि लस ही आयुधे होती. वाटेत मुंगी गावाने या
साऱ्याला असहकार पुकारला, कुंडल पारगावला सारे करूनही कॉलऱ्याची केस झालीच आणि बीड
जिल्ह्यातील दहिवंडीची बातमी ऐकून तर सारेच भांबावले. १२५ लोकवस्तीच्या त्या गावात
३० केसेस होऊन १४ बळी गेले होते. गावातर्फे पालखीला जेवण घालायची प्रथा होती. शिधा द्या आम्ही रांधून घेतो पण घरोघरच्या भांड्यातून अन्न आणू नका; असा निरोप दिला गेला.
पण गावकऱ्यांना हे मान्य नव्हतं, मग गावातील अन्न न घेता पालखी गावाबाहेरून
नेण्यात आली. अडाणी स्थानिक फूसलाव्यांचा
जाच जागोजागी होताच. लसीची सर्टिफिकिटे
वारंवार तपासली जात होती. तरीही लोकं लस न घेता वारीत घुसत होती. चुकार लोकं
सापडतंच होती. परिणामी वारकऱ्यांत काही
केसेस झाल्याच. एक मुलगाही गेला.’ अखेर सीना नदी ओलांडून
पालखी ब्रिटिश इंडियात पोहोचली आणि डॉ. रावांनी हुश्श केलं. पंढरपुरहून परतीचा
प्रवासही साधारण तसाच घडला. दहिवंडीसारखाच
अनुभव आता साऊथंड्याला आला. अखेर काही
वैष्णवजनांना वैकुंठास पोहोचवून का होईना, त्या काळाच्या मानाने, पालखी सुखरूपच पैठण मुक्कामी पोहोचली
म्हणायची.
अडाणी
स्थानिक फूसलाव्यांचा बंदोबस्त करावा, लसीकरणाची सक्तीच असायला हवी आणि
अॅम्ब्युलेन्स म्हणून बैलगाड्या मिळाव्यात अशी विनंती डॉ. राव करतात.
जगात
आज बहुतेक भागात कॉलरा नाही कारण स्वच्छ पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्थित
विल्हेवाट. सांडपाण्याचं आणि कॉलराचं काही नातं आहे हे सर्वप्रथम दाखवून दिलं ते
डॉ. जॉन स्नो ने. लंडनच्या साथीचा अभ्यास करताना त्याला असं आढळलं की एका विशिष्ट हातपंपातून पाणी वापरणाऱ्या
घरांतच मृत्यूने मुक्काम ठोकला होता.
नगरपित्यांचा विरोध मोडून काढत आणि लोकक्षोभाची तमा न बाळगता त्याने हा पंप बंद
करवीला. म्हणजे त्याचे हँडलच काढून टाकले. कॉलरा तात्काळ ओसरला. कॉलराच्या जंतुंचा
शोध नंतर लागला. त्याच्या संक्रमणाचे मार्ग आधी रोखता आले. जॉन स्नोचा हा शोध अनेक
कारणांनी क्रांतिकारी ठरला. त्याने
लंडनच्या नकाशावर मृत्यू घडलेली घरे ठिपक्यांनी दर्शवली. ब्रॉड स्ट्रीटच्या
पंपाभोवती सारे ठिपके एकवटले होते. ही पद्धतही नवलाची होती.
परंपराप्रिय
ब्रिटिशांनी ब्रॉड स्ट्रीटवरचा हा हातपंप आजही जपला आहे. आता त्याला पाणी येत नाही
पण आजही दरवर्षी सार्वजनिक आरोग्याच्या
क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कुणाला स्नोच्या स्मृतिव्याख्यानासाठी आमंत्रित
केलं जातं. व्याख्यानाच्या सुरवातीला पंपाचं हँडल काढलं जातं आणि या क्षेत्रातील
नवीन काही ऐकून झाल्यावर ते पुन्हा बसवण्यात येतं.
जिथे
कॉलरा आहे तिथेही मृत्यूदर कमी आहे कारण ‘जलसंजीवनी’. जलसंजीवनीचा शोध हा भारतातला
(आणि बांगलादेशातला). ‘साखर, मीठ, पाणी; जुलाबावर गुणकारी’ हा मंत्र दिला तो डॉ.
दिलीप महालनोबीस यांनी. वरवर साधा, अगदी घरगुती
वाटणारा हा फॉर्म्युला निश्चित करणे म्हणजे अडथळ्याची शर्यत होती. अगदी
अश्रुंइतक्याच खारट असलेल्या ह्या पाण्याने
जगभर अनेकांचे जीव वाचवले आहेत, अनेक घरचे अश्रु रोखलेले आहेत.
प्रथम प्रसिद्धी
हवामान अवधान
दैनिक सकाळ
७.६.२०२४
Thursday, 30 May 2024
लेखांक ९ वा एल निनो माहात्म्य
लेखांक ९ वा
एल निनो माहात्म्य
आपल्याला हा एल निनो मॉन्सूनपुरताच माहीत असला तरी जागतिक हवामानावर
निरतिशय प्रभाव टाकणारा हा महत्वाचा घटक
आहे. हवामानातील तीव्र बदलामुळे खाणे-पिणे-रहाणे-जगणे यावर तीव्र परिणाम होतात. या
बाबतीत असंतोष पसरला की हे नियंत्रित करणाऱ्या संस्था अप्रिय ठरतात. थोडक्यात
राज्यकर्त्यांचं कर्तेपण धोक्यात येतं. जगभरातील अनेक राजकीय उलथापालथींना एल निनोची पार्श्वभूमी आहे.
चीनला अतीशय पुरातन परंपरा लाभली आहे आणि आज या देशाला आलेल्या उभरत्या, नवथर महत्वामुळे
त्याच्या इतिहासाबद्दल आता जगभर संशोधन आणि
चिंतन (खरंतर ‘चीनतन्’) सुरू आहे. अनेक नवीन पैलू आता लक्षात येऊ लागले आहेत. चीनच्या बखरींमध्ये गेल्या ३००० वर्षांचा
इतिहास आहे. ज्या ज्या वेळी एखाद्या घराण्याचा अस्त होऊन नव्या राज्यकर्त्यांचा
उदय झाला आहे तेंव्हा तेंव्हा हवामानातील उलथापालथही दिसून येते. गेल्या ११ शतकांत
पाच वेळा साम्राज्य धुळीस मिळवली गेली आणि या पाच पैकी चार वेळा ह्या बदलाला पूर, दुष्काळ, साथी, उपासमार या साऱ्याची स्पष्ट
पार्श्वभूमी आहेच आहे. इसवी सन पूर्व शांग (इसपू११००), झोहू (इसपू ४५०) आणि हान (इसपू
२२०) घराण्यांचा घास घ्यायला हवामानही जबाबदार होतेच. हे पूर्वीचे संदर्भ असोत वा
अलीकडील टँग (इस९०७), मिंग (इस १६४४) वगैरे घराण्यांचा अस्त असो, एल निनोमुळे
अशक्त झालेला उन्हाळी मॉन्सून हा एक समान धागा आढळतो.
हा एल निनो १७८० ते १७९० च्या दशकात विशेष भरात होता. अठराव्या
शतकातील शेवटच्या दोन दशकांत तर बरंच काही घडले. आईसलँड आणि जपानमध्ये मोठे
ज्वालामुखी भडकले (१७८३). त्या झाकोळाने तिथली पीकं गेली. मेक्सिको, द. आफ्रिका,
कॅरिबियन बेटे आणि द. आशियात ठिकठिकाणी दुष्काळ पडले. वातावरण बदलामुळे डासांचे क्षेत्र वाढले. अमेरिकेच्या तत्कालीन
राजधानीत, फिलाडेल्फियात एडिस इजिप्ती (हे
डासाचे नाव आहे) पिवळा ताप घेऊन, घोंघावत येऊन पोहोचले(१७९३). १७००० केसेस झाल्या,
त्यातली १/३ लोकं मेली. लिव्हर बाद होऊन अंग पिवळं पडून, किडनी बाद होऊन, रक्त ओकत
माणसं मेली. फिलाडेल्फिया खरंतर बऱ्याच उत्तरेला, कर्कवृत्ताच्याही वर, डासांच्या
राज्याबाहेर. पण कॅरिबियन बेटांशी व्यापारी संपर्क होताच. तिथे डास आणि पिवळा ताप
दोन्ही होते. त्याच सुमारास हैती बेटांवरील गुलामांनी बंड
केले आणि तेथील शासक फ्रेंच,
आता निर्वासित होऊन फिलाडेल्फियाला आले.
आले तेही डास आणि पिवळा ताप घेऊनच आले.
शेवटी एकदाचा नोव्हेंबर उजाडला, थंडीचा
कडाका सुरू झाला, डास मेले आणि फिलाडेल्फियावासी सुटले. अमेरिकेतल्या या
नंतरच्याही नऊ पैकी सात साथी एल निनोचं
बोट धरून आल्या-गेल्या हे विशेष.
एकूणच समृद्ध राष्ट्रातून आता भूकबळी ऐवजी संसर्गजन्य आजार अधिक
बळी घेत होते. आता इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेन सारखी राष्ट्र दुष्काळापासून आपला
बचाव करू शकत होती. व्यापार वाढला होता, सामाजिक सुरक्षितता अधिक मजबूत होती,
दुरून अन्न आयात होण्याची शक्यता होती, वसाहतींतून समृद्धी बरसत होती. वाढत्या
बकाल शहरांतून आता साथी पसरत होत्या. उपासमार, कदान्न, कुपोषण वगैरेंऐवजी
डिसेंट्री, फ्ल्यू, गोवर, देवी, टायफस ह्या मारेकऱ्यांना आता बरकत आली. अठराव्या
शतकातील युरोपात दर चार मृत्यूमागे एक बळी टीबीच्या खात्यावर जमा होता.
अठरावे सरून पृथ्वीला इसवी सनाचे
एकोणीसावे शतक लागले तोवर लघु हिमयुग आटोपले होते. पण त्याच सुमारास
इंडोनेशियातील सुंबावा बेटावरील, टंबोरा ज्वालामुखी धडाडला. सुमारे १५ चौ.की.मी.
एवढा ऐवज त्यांनी आकाशात ४० कीमी उंच फेकला. ह्या झाकोळाचा परिणामही युरोप, आग्नेय
अमेरिका आणि कॅनेडाच्या किनारपट्टीवरही दिसला. यामुळे १८१६ साली युरोपात उन्हाळा
आलाच नाही. आपल्याला जसा मॉन्सून आवश्यक आणि प्रिय तसा युरोपला समर. असा समर-प्रसंग
आल्याशिवाय जीवनचक्र चालू रहाणे कठीण. ह्या दरम्यान इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम
वगैरेत अन्न टंचाईमुळे लूटमार, चोरीमारी, दंगेधोपे सर्रास होत असत. साथीला टायफस
आणि रीलॅप्सींग फिवरच्या साथी होत्याच. युरोपप्रमाणेच सहाराच्या दक्षिणेतील
देशांतही दुष्काळ पडले. एक फायदा मात्र झाला. त्सेत्से माशांमुळे पसरणारा स्लिपींग
सिकनेस आता आपोआपच आटोक्यात आला.
एकुणात एल निनो आणि त्याचे महात्म्य अगाध आहे.
प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
हवामान अवधान
३१.०५.२०२४
Thursday, 23 May 2024
लेखांक ८ साथी आणि उत्क्रांती
लेखांक ८
साथी आणि उत्क्रांती
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
आज आपण पूर्वीपेक्षा अधिक सुस्थित
आणि सुरक्षित आहोत. पण ही सुबत्ता, ही सुस्थिती अत्यंत क्षणभंगुर आहे. अनेक
निसर्ग-रोषांचे आपण अगदी सहज बळी होऊ शकतो... आणि बळी म्हणजे अगदी ठार बळी! इतके
ठार, इतके ठार की बळींच्या अफाट संख्येमुळेच पुन्हा वातावरण पालटावे, इतके ठार. म्हणजे
वातावरणबदलामुळे रोगांवर होणाऱ्या परिणामांची आपण खूप उदाहरणे बघितली. पण हे उलटे शक्य आहे का? म्हणजे रोगांमुळे, साथींमुळे वातावरण बदलले आहे, असं शक्य आहे का? हो, तशीही
उदाहरणे आहेत. पूर्वीही अफाट बळी गेल्याने हवामान बदलल्याचे पुरावे मिळत आहेत.
सरळ हिशोब आहे. इतकी माणसे
मेल्यामुळे तितके श्वास बंद झाले. श्वसनाचा, ‘अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर’ हा
बहिणाबाईंनी सांगितलेला अर्थ आपण जाणून आहोत पण श्वसन याचा जीवशास्त्रीय अर्थ
श्वासाचं येणं जाणं हा नसून, ऑक्सीजनच्या मदतीने ग्लुकोज शिलगावून ‘एटिपी’, यानेकी,
एनर्जी निर्माण करणे हा आहे. या श्वसन-क्रियेत कार्बन डायओक्साईड बाहेर पडतो.
साथीच्या थैमानानंतर जितके श्वास बंद तितका कार्बन
डायओक्साईड कमी. गुरेढोरेही मोठ्या प्रमाणावर मेली तर त्यांचाही कार्बन
डायओक्साईड (आणि मिथेन) कमी. यामुळे
लक्षणीय फरक पडून हवेतील कार्बन डायओक्साईड
घटून पुढे तापमान घटलेलं आढळतं.
दक्षिण अमेरिकेत युरोपीय पोहोचले
आणि अतिशय अमानुषपणे त्यांनी तिथली राज्ये आणि संस्कृती नष्ट केली. ह्या संस्कृती संक्रमणाच्या काळात लढायांत फारच
थोडी माणसे मेली. संपूर्ण दक्षिण अमेरिकेतली मूळ निवासी प्रजा युरोपीयनांनी
आणलेल्या नव्यानव्या, अनवट आजारांनी खलास केली. साथीचे हे थैमान इतके जबरदस्त होते
की यानंतरही हवेतील कार्बन डायओक्साईड कमी झाला आणि तिथे हवेत गारवा वाढला.
सूक्ष्म जीवांच्या उत्क्रांतीतही
हवामान आणि साथींमुळे क्रांती घडते. मागच्या लेखांकात भेटलेली ‘अंगावरची उ’ ही
सुमारे ८० हजार वर्षापासून आहे. तत्पूर्वी नव्हती. त्यामुळे तिच्या मार्फत पसरणारे
टायफससारखे आजारही नसावेत. कपड्यात मुक्काम करून रक्त पिण्यापुरते माणसाच्या
अंगावर जाणे हा तिचा शरीरधर्म. ऐंशी हजार वर्षापूर्वी हिमयुग होतं. गुहेत, कपडा
लपेटून रहाणे भाग होतं. अशा परिस्थितीत ही उ उत्क्रांत झाली असावी. माणूस विवस्त्र
फिरत राहीला असता तर ह्या प्रकारची उ उत्क्रांत झालीच नसती. उवा, जंत, बॅक्टीरिया,
व्हायरस हे सारे परोपजीवी माणसाबरोबर उत्क्रांत होत आले आहेत, होत आहेत.
एखादा जंतू माणसात शिरल्याने जर
तो माणूस तडकाफडकी मरत असेल तर त्या जंतूचेही अवघड आहे. कारण आता त्याचा पोशिंदाच मेल्यामुळे जंतूचा
प्रसार कसा व्हावा बरं? यजमान आणि पाहुणा दोघांचाही मुडदा पडण्यापेक्षा दोघेही
जित्ते राहतील तर दोघांनाही बरं नाही का? यजमानाघरी राहून त्याच्या; खोकला, जुलाब,
उच्छवास, शू अशा उत्सर्जक क्रियांद्वारे अन्यत्र
पसरणे सर्वात उत्तम. मात्र यासाठी यजमानाच्या प्रतिकारशक्तिपासून जपून रहायला हवं,
लपून रहायला हवं. इतकंच कशाला तिला फसवून मुक्काम करता आला तर उत्तम पण तिला फितवून
घेता आलं तर फारच उत्तम. परोपजीवींनी हे सारे मार्ग अनुसरलेले दिसतात.
अर्थात हा सगळा विचार ना परोपजीवी
करू शकतात ना माणसाची प्रतिकारशक्ती. जगण्याच्या, उत्क्रांतीच्या, स्पर्धेमध्ये जे
टिकले ते इतके परस्पर पूरक आहे की ते बुद्ध्याच घडवले आहे असे आपल्याला भासते.
संधीसाधू परोपजीवी आपल्या
आधीपासूनचे पृथ्वीवासी आहेत. माणसांपूर्वी तब्बल २ अब्ज वर्षापेक्षा अधिक काळ हे
इथे वावरत होते. ह्यांच्यातले जे चालू असतात ते आपलं काम बिनबोभाट आणि बेमालूमपणे
उरकतात आणि जे महाचालू असतात ते माणसाचीच
वागणूक बदलतात. असं म्हणतात की सर्दीचे जंतू हे सर्वात यशस्वी जंतू होत.
सर्दी झाल्याने माणूस शिंकत, नाक आणि हात कशाकशाला पुसत वावरत राहतो. तो शक्यतो
घरात बसत नाही, प्राणांतिक आजारी पडत नाही, मरत तर मुळीच नाही. जणू सर्दीचा व्हायरस त्याला नवी नवी माणसे गाठून
द्यायला भाग पाडत असतो. व्हायरसची प्रजा वाढत वाढत रहाते. काही माणसांत या विरुद्ध
प्रतिकारशक्ती निर्माण होतेही. मग हे गिर्हाइक बाद. पण तात्पुरतेच. कालांतराने
काही म्युटेशन घडते आणि सर्दीचा व्हायरस आपलेच रूप बदलतो आणि पहिल्याच प्रजेवर
नव्याने हल्ला करतो. त्यामुळे जगभर
सर्दावलेली माणसे असतातच असतात. देवीच्या, पोलिओच्या व्हायरसची वागणूक अशी नव्हती.
त्यामुळे त्यांचे निर्मूलन शक्य झालं पण
सर्दी निर्मूलनाचा कोणी स्वप्नातही विचार करत नाही.
कोव्हिडच्या व्हायरसचीही हीच
स्थिती आहे. तो नव्याने अति भयाण रूपात पुन्हा येऊ शकतोच पण शेवटी त्याने सर्दीचा व्हायरस होण्यात त्याचेही भले आहे;
नाही का?
प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
दि. २४.५.२०२४
Thursday, 16 May 2024
लेखांक ७ वा बाईल मेली मुक्त झाली
लेखांक ७ वा
बाईल मेली मुक्त झाली
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई
दुर्गादेवी, शिराळ शेठ अशा कथा
एवढंच सांगतात की संकटकाळी कुणा माणसाच्या काळजाला पाझर फुटण्यावरच सारी भिस्त होती. बरं हा पाझर कुणाला, कधी,
कुठे, कसा, किती आणि किती काळ फुटेल हे सारेच अनिश्चित. मंगळवेढ्याच्या
दामाजीपंतांनीही दुष्काळात धान्याची कोठारे खुली केली. पण त्यांना शिराळ शेठपेक्षा
अगदीच विरुद्ध अनुभव पदरी आला. त्यांच्या मदतीला तर साक्षात पांडुरंगालाच यावं
लागलं. या पुण्यकर्मामुळे लोकमानसांत दामाजीपंत संत झाले. संतही या भावतापातून
सुटले नव्हतेच. पंतांनंतर सुमारे २०० वर्षानी पडलेल्या दुष्काळात संत तुकारामांची
बायको, पोर आणि आई गेली. आपल्या आभाळभर दुखा:ला अध्यात्मिक डूब देऊन ते त्यांनी
सुसह्य करून घेतलं. ते म्हणतात;
देवे माया
सोडविली
देवे माया
विरहित केले
माता मेली मज देखिता
तुका म्हणे हरली चिंता
विठो तुझे माझे राज्य
नाही दुसऱ्याचे काज
तुकरामांचे हे आर्त, काळीज हेलावून सोडणारे आहे. बाईल, पोर आणि माता जाऊनसुद्धा
दुष्काळ का पडतो? त्यावर उतारा काय? वगैरे प्रश्न त्यांना पडत नाहीत आणि पडले तरी ज्या प्रश्नांची उत्तरेच
आसपास नाहीत अशा सर्व प्रश्नांवर एकच उतारा सांगून ते गेले. वाईटात चांगले शोधावे या बाण्याने ‘माया सोडविली’
वगैरे म्हणून सरळ ‘विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज’ असं म्हणत तुकाराम महाराज समाधान पावतात. किती हतबल
आणि परिस्थितीशरण होती माणसं. तुकारामाच्या तळमळीतून हेच तर प्रतीत होतं आहे. ह्याच्या पलीकडे करण्यासारखेही काही नव्हते.
दुष्काळ माणसाच्या आधीपासून आहे. हा जुना शत्रू. हळू हळू अनेक विद्यांचा विकास झाल्यावर धान्य कोठारे,
धरणे, कालवे आले; पूर आणि अवर्षण
याविरुद्ध भक्कमपणे उभे राहीले. पण जरी धान्याची कोठारे होती तरी त्यातील धान्याचं
योग्य वेळी, योग्य वितरण होण्यासाठी,
जागोजागी दामाजीपंत कुठे होते? आणि दामाजीपंतांनी अंमलात आणलेली पद्धतही आदर्श
नव्हतीच. अगदी अलिकडचा, बंगालचा १९४२चा दुष्काळही अवर्षणामुळे नसून सर्वस्वी ब्रिटिश धोरणांचा परिपाक होता, असं
अभ्यास सांगतात. याची चित्तोप्रसाद भट्टाचार्य यांनी केलेली काळी पांढरी रेखाटने
आजही अंगावर काटा आणतात. औश्वीत्झची नाझी छळ छावणी जशी आजही पहावत नाही तशी ती
चित्र. पोट खपाटीला गेलेली, हाड आणि
कातडं उरलेली, विझलेल्या डोळ्यांची ती माणसं चितारून त्या चित्रकाराने तत्कालीन
समाजाला गदागदा हलवले होते पण व्यवस्था ढीम्म हलली नव्हती.
व्यवस्था हलली ती स्वातंत्र्यानंतर.
मायबाप सरकारकडे खरोखरच माय बापाची भूमिका आली. अन्न उत्पादन, साठवण आणि वितरण
ह्यात क्रांतीकारी बदल झाले. हे सारे सरकार नियंत्रित झाले. बंगालच्या दुष्काळाच्या कटू
आठवणी जणू स्फूर्ती झाल्या. गरीबीचे आणि कुपोषणाचे जगड्व्याळ रूप पहाता भूक भागवणाऱ्या,
रोजगार देणाऱ्या, अनेक योजना अंमलात आल्या. संपूर्ण डावी वा उजवी व्यवस्था न
स्वीकारल्याने राजकीय तत्वज्ञानाबरोबरच परिस्थितीचा रेटाही धोरणांना आकार देणारा
ठरला. रेशन, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम, माध्यान्य भोजन योजना, मनरेगा आणि मोफत
शिधा वाटप वगैरेंसारख्या योजनांनी
दुष्काळ, कुपोषण आणि तत्संबंधी आजारांचे कंबरडे मोडले.
या उपायांनी, टोकाचे दारिद्र्य
कमी झाले, आर्थिक विषमता कमी झाली, या देशातील ओक्यापोक्या लोकांत निसर्गाचा दणका
सोसायची ताकद असणारा जरा दणकट कणा तयार झाला. आर्थिक लाभार्थ्यांना थेट खातेपोहोच
रक्कम, या योजनांची व्याप्ती वाढवणे,
आरोग्य सेवांचा परीघ कैक दिशांनी आणि कैक पटीनी वाढवणे, शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांची
विशेष काळजी असा अनंत हस्ते प्रयत्न झाला आणि आपण इथवर आलो. स्वातंत्र्याच्या वेळी
भारतीयांचं आयुर्मान होतं ३२ वर्ष. त्याही
पूर्वी, सुवर्णरम्य भूतकाळातील आपले पूर्वज पारलौकिक सुखात डुंबत असतीलही कदाचित
पण आपल्या पूर्वजांचं लौकिक जगणं होतं ते
असं खुरटलेलं, उणीपुरी ३२ वर्ष अथवा कमीच. आता आपलं आयुर्मान दुपटीहून जास्त
म्हणजे तब्बल ७०वर्षं झालं आहे.
या योजनांतही त्रुटी आहेत. झाले
ते सगळे सर्वोत्तम झाले असं मुळीच नाही. पण कुठे कोणा माय लेकराचा भूकबळी गेला तर,
‘बाईल मेली मुक्त जाली, देवे माया सोडविली; पोर मेले बरे झाले, देवे माया
विरहित केले’; यापेक्षा आपला प्रतिसाद वेगळा असेल हे नक्की.
प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
हवामान भान
दि . १७.५.२०२४
Monday, 13 May 2024
येते जे आतून ते का थांबविता येते?
Sunday, 12 May 2024
लेखांक ६ वा हॅन्सल, ग्रेटल, दुर्गादेवी आणि शिराळ शेठ
लेखांक
६ वा
हॅन्सल,
ग्रेटल, दुर्गादेवी आणि शिराळ शेठ
इंडोनेशियात,
१२५७ साली, एक ज्वालामुखी धडाडला. त्याची काय ताकद असेल बघा; त्याच्या राखेने
उद्भवलेल्या झाकोळाने पश्चिम युरोपातील तापमान घटलं. याने लघु हिमयुग (लिटल आईस एज) अवतरलं. युरोपात भीषण दुष्काळ पडले. दैन्य, दारिद्र्य
आणि उपासमारीने आईबापांनी पोरं सोडून देण्याच्या इतकेच काय नरमांस भक्षणाच्याही
कथा आहेत. ग्रिम बंधूंनी सांगितलेल्या
‘हॅन्सल आणि ग्रेटल’ ह्या भावंडांच्या
‘परिकथेत’, त्यांना आईबापानी जंगलात सोडून दिलेलं असतं, आणि तिथली चेटकी
हॅन्सलला खायला प्यायला घालून, धष्टपुष्ट करून मग खाणार असते. ह्या कथानकाला वास्तवाचे संदर्भ आहेत म्हणतात.
सात
वर्षाच्या ह्या महादुष्काळात (१३१५ ते १३२२) तेरावा महिना म्हणून की काय पाठोपाठ (१३४६)
‘ब्लॅक डेथ’ म्हणून ओळखली जाणारी प्लेगची साथ आली. हिने तर निम्मा युरोप गारद केला. कल्पना करा उद्या सिग्नलशी तुम्हाला
निम्मीच गर्दी लागली; सुट्टी म्हणून नाही तर भवतालचे निम्मे स्वर्गवासी झाले आहेत म्हणून, तर कसं वाटेल? ब्लॅक डेथनं युरोपवर ही
वेळ आणली.
युरोपने
अनुभवलेला हा सगळ्यात खतरनाक प्लेग. यासाठी कित्येक घटक जबाबदार असू शकतात. त्याच
वेळी मध्य आशियात अतिवृष्टी झाल्याने तिथली
उंदरांची प्रजा वाढली असेल, नव्या व्यापारी
मार्गांनी नवे उंदीरही आले असतील. थंडीत, माणूस ते माणूस आणि उष्मा वाढताच
उंदीर-पिसू-माणूस असं प्लेगचं लागण चक्र अव्याहत फिरत राहिलं असेल. साथीला
नैसर्गिक ब्रेकच लागला नसेल.
डोक्यात
होणाऱ्या उवा असतात (आठवा, ते रविवार, ते तेल, ती फणी आणि ते नखाने चिरडणे) तशा
अंगावर होणाऱ्याही असतात. अंगावर वावरणाऱ्या असतात तशा निव्वळ जननेंद्रियांवरील
केसांत बागडणाऱ्याही असतात. ह्याच उ-बाईसाहेब पापण्या आणि भुवयांमधेही वस्ती करतात!
आता मुळात त्या तिथे कशा पोहोचतात ते विचारू नका!! ते असो, आपला मतलब अंगावरच्या उवांशी (पेडीक्युलस ह्युमनीस कॉर्पोरिस) आहे. ह्या फक्त रक्त
पिण्यासाठी अंगावर येतात एरवी रहातात अस्वच्छ अंथरूणात, पांघरूणात किंवा कपड्यात. टायफस,
ट्रेंच फिव्हर, रिलॅप्सींग फिव्हर यांच्या या वाहक. ह्या साऱ्याच्या साथी यांनी
सारीकडे वाहून नेल्या. पण काही परिस्थितीत, पिसवा नसल्या तर, ह्या प्लेगच्याही
वाहक ठरू शकतात. मानव-उ-मानव असं लागण चक्र घुमायला लागतं. लोकरीचे कपडे सहसा न
धुता वापरले जातात. इथे उवांची बजबजपुरी माजते. ब्लॅक डेथ पसरायला, अस्वच्छ लोकरी
कपड्यांचा वापर हाही एक घटक होता. करणार काय, लघु हिमयुग सुरू होतं. थंडी तर
होतीच. लोकरीचे कपडे नुकतेच सामान्यांच्या आवाक्यात आले होते.
आज
आपण ज्याला ‘ब्युबोनिक प्लेग’ म्हणतो तोच हा होता का?, अशी शंका आहेच. त्या
काळच्या वर्णनांवरून नेमका अंदाज येत नाही. ‘उंदीर पडल्या’ची वर्णने अभावानेच
आढळतात. फारच वेगाने पसरलेला आणि फारच बळी घेणारा हा आजार; अॅन्थ्रॅक्स, इबोला
अथवा इंफ्लुएंझा असावा असाही कयास आहे. जंतू तर वेगाने उत्क्रांत होत असतात
त्यामुळे त्यांचे आजचे आणि तेंव्हाचे रूप भिन्नच असणार. त्या काळातली मढी उकरून,
त्यांचे नमुने घेऊन, त्यावरील जंतूंचे डीएनए तपासून, त्यांची आजच्या जंतुंशी तुलना
करून, लढवलेले हे तर्क आहेत. अधिक संशोधनाने अधिक स्पष्टता येत जाईल.
सतराव्या
शतकाच्या उत्तरार्धात युरोपातून प्लेग हटला तो जवळपास आजवर. ह्याचेही श्रेय तिथला
रॅटस रॅटस, हा पिसू-प्लेग वाहक उंदीर जाऊन त्याची जागा रॅटस
नोरवेजिकसने घेतली हे असावे. ह्या रॅटस नोरवेजिकसच्या अंगावर पिसवा होत नाहीत.
म्हणजे वैद्यकीपेक्षाही प्राकृतिक कारणांनी ही ब्याद गेली.
त्याचवेळी
भारतातही उष्मा वाढून दुष्काळ पडले होते. दख्खनच्या पठारावर १३९६-१४०७ असा तब्बल
बारा वर्ष ठाण मांडून बसलेला दुष्काळ, हा दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून प्रसिद्ध
आहे. याची भयाण भेसूर वर्णने आपल्या ऐतिहासिक साधनांत आहेतच पण जनमानसांत शिल्लक
आहेत त्या दोन कृतज्ञ स्मृती. हा ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’, कारण दुर्गादेवी
नावाच्या वंजारणीने गंगातीरावरून इथे धान्य आणून लोकांचे प्राण वाचवले. तसेच श्रियाळ
श्रेष्ठ (बोली भाषेत शिराळ शेठ) ह्या व्यापाऱ्यानेही आपली गोदामे जनतेसाठी खुली
केली. राजाने ह्या दातृत्वाची तारीफ करत त्याला
काही मागायला सांगितलं, तर याने औट घटकेचे राज्य मागून घेतलं. औट म्हणजे
साडेतीन घटिका. म्हणजे ८४ मिनिटे. एवढ्या वेळात त्याने जनहिताची अनेक फर्मानं काढली. आजही नागपंचमीनंतर
येणाऱ्या षष्ठीला, मातीच्या राजवाड्यावर ‘शिराळ शेठ’ विराजमान होतो. सारीकडे आनंदीआनंद होतो. औट
घटकेचे राज्य दिवेलागणीला संपते. उत्सव संपतो. शिराळ शेठ आता विसर्जित केला जातो. असेल
का कोणी असा श्रियाळ श्रेष्ठ? का त्या पिचलेल्या प्रजेनी, आपल्या सुप्त इच्छा-आकांक्षा अशा कथांतून
पुरवून, स्वत:ला पुलकित करून घेतलं असेल? असेलही पण दुसरीच शक्यता जास्त.
पूर्व प्रसिद्धी
दैनिक सकाळ
हवामान भान ह्या सदरात
१०.०५.२०२४
