Thursday, 16 May 2024

लेखांक ७ वा बाईल मेली मुक्त झाली

 


लेखांक ७ वा

 

बाईल मेली मुक्त झाली

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

 

दुर्गादेवी, शिराळ शेठ अशा कथा एवढंच सांगतात की संकटकाळी कुणा माणसाच्या काळजाला पाझर फुटण्यावरच  सारी भिस्त होती. बरं हा पाझर कुणाला, कधी, कुठे, कसा, किती आणि किती काळ फुटेल हे सारेच अनिश्चित. मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांनीही दुष्काळात धान्याची कोठारे खुली केली. पण त्यांना शिराळ शेठपेक्षा अगदीच विरुद्ध अनुभव पदरी आला. त्यांच्या मदतीला तर साक्षात पांडुरंगालाच यावं लागलं. या पुण्यकर्मामुळे लोकमानसांत दामाजीपंत संत झाले. संतही या भावतापातून सुटले नव्हतेच. पंतांनंतर सुमारे २०० वर्षानी पडलेल्या दुष्काळात संत तुकारामांची बायको, पोर आणि आई गेली. आपल्या आभाळभर दुखा:ला अध्यात्मिक डूब देऊन ते त्यांनी सुसह्य करून घेतलं.  ते म्हणतात;

बाईल मेली मुक्त जाली

देवे माया सोडविली

पोर मेले बरे झाले

देवे माया विरहित केले

माता मेली मज देखिता

तुका म्हणे हरली चिंता

विठो तुझे माझे राज्य

नाही दुसऱ्याचे काज

तुकरामांचे हे आर्त, काळीज हेलावून सोडणारे आहे. बाईल, पोर आणि माता जाऊनसुद्धा दुष्काळ का पडतो? त्यावर उतारा काय? वगैरे प्रश्न त्यांना  पडत नाहीत आणि पडले तरी ज्या प्रश्नांची उत्तरेच आसपास नाहीत अशा सर्व प्रश्नांवर एकच उतारा सांगून ते गेले.  वाईटात चांगले शोधावे या बाण्याने ‘माया सोडविली’ वगैरे म्हणून सरळ विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज असं म्हणत तुकाराम महाराज   समाधान पावतात. किती हतबल आणि परिस्थितीशरण होती माणसं. तुकारामाच्या तळमळीतून हेच तर प्रतीत होतं आहे.  ह्याच्या पलीकडे करण्यासारखेही काही नव्हते.

दुष्काळ माणसाच्या आधीपासून आहे. हा जुना शत्रू. हळू हळू  अनेक विद्यांचा विकास झाल्यावर धान्य कोठारे, धरणे, कालवे आले;  पूर आणि अवर्षण याविरुद्ध भक्कमपणे उभे राहीले. पण जरी धान्याची कोठारे होती तरी त्यातील धान्याचं योग्य वेळी, योग्य  वितरण होण्यासाठी, जागोजागी दामाजीपंत कुठे होते? आणि दामाजीपंतांनी अंमलात आणलेली पद्धतही आदर्श नव्हतीच.  अगदी अलिकडचा, बंगालचा १९४२चा दुष्काळही अवर्षणामुळे नसून  सर्वस्वी ब्रिटिश धोरणांचा परिपाक होता, असं अभ्यास सांगतात. याची चित्तोप्रसाद भट्टाचार्य यांनी केलेली काळी पांढरी रेखाटने आजही अंगावर काटा आणतात. औश्वीत्झची नाझी छळ छावणी जशी आजही पहावत नाही तशी ती चित्र. पोट खपाटीला गेलेली, हाड आणि कातडं उरलेली, विझलेल्या डोळ्यांची ती माणसं चितारून त्या चित्रकाराने तत्कालीन समाजाला गदागदा हलवले होते पण व्यवस्था ढीम्म हलली नव्हती.

 

व्यवस्था हलली ती स्वातंत्र्यानंतर. मायबाप सरकारकडे खरोखरच माय बापाची भूमिका आली. अन्न उत्पादन, साठवण आणि वितरण ह्यात क्रांतीकारी बदल झाले. हे सारे  सरकार  नियंत्रित झाले. बंगालच्या दुष्काळाच्या कटू आठवणी जणू स्फूर्ती झाल्या. गरीबीचे आणि कुपोषणाचे जगड्व्याळ रूप पहाता भूक भागवणाऱ्या, रोजगार देणाऱ्या, अनेक योजना अंमलात आल्या. संपूर्ण डावी वा उजवी व्यवस्था न स्वीकारल्याने राजकीय तत्वज्ञानाबरोबरच परिस्थितीचा रेटाही धोरणांना आकार देणारा ठरला. रेशन, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम, माध्यान्य भोजन योजना, मनरेगा आणि मोफत शिधा वाटप  वगैरेंसारख्या योजनांनी दुष्काळ, कुपोषण आणि तत्संबंधी आजारांचे कंबरडे मोडले.

या उपायांनी, टोकाचे दारिद्र्य कमी झाले, आर्थिक विषमता कमी झाली, या देशातील ओक्यापोक्या लोकांत निसर्गाचा दणका सोसायची ताकद असणारा जरा दणकट कणा तयार झाला. आर्थिक लाभार्थ्यांना थेट खातेपोहोच रक्कम,  या योजनांची व्याप्ती वाढवणे, आरोग्य सेवांचा परीघ कैक दिशांनी आणि कैक पटीनी वाढवणे, शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी असा अनंत हस्ते प्रयत्न झाला आणि आपण इथवर आलो. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीयांचं आयुर्मान होतं ३२  वर्ष. त्याही पूर्वी, सुवर्णरम्य भूतकाळातील आपले पूर्वज पारलौकिक सुखात डुंबत असतीलही कदाचित पण आपल्या पूर्वजांचं  लौकिक जगणं होतं ते असं खुरटलेलं, उणीपुरी ३२ वर्ष अथवा कमीच. आता आपलं आयुर्मान दुपटीहून जास्त म्हणजे तब्बल ७०वर्षं  झालं आहे.

या योजनांतही त्रुटी आहेत. झाले ते सगळे सर्वोत्तम झाले असं मुळीच नाही. पण कुठे कोणा माय लेकराचा भूकबळी गेला तर, ‘बाईल मेली मुक्त जाली, देवे माया सोडविली; पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले’; यापेक्षा आपला प्रतिसाद वेगळा असेल हे नक्की.

 

 

प्रथम प्रसिद्धी

दैनिक सकाळ

हवामान भान

दि . १७.५.२०२४

No comments:

Post a Comment