Thursday 23 May 2024

लेखांक ८ साथी आणि उत्क्रांती

 

लेखांक ८

 

साथी आणि उत्क्रांती

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

 

आज  आपण पूर्वीपेक्षा अधिक सुस्थित आणि सुरक्षित आहोत. पण ही सुबत्ता, ही सुस्थिती अत्यंत क्षणभंगुर आहे. अनेक निसर्ग-रोषांचे आपण अगदी सहज बळी होऊ शकतो... आणि बळी म्हणजे अगदी ठार बळी! इतके ठार, इतके ठार की बळींच्या अफाट संख्येमुळेच  पुन्हा वातावरण पालटावे, इतके ठार. म्हणजे वातावरणबदलामुळे रोगांवर होणाऱ्या परिणामांची आपण खूप उदाहरणे बघितली. पण हे उलटे  शक्य आहे का? म्हणजे रोगांमुळे, साथींमुळे  वातावरण बदलले आहे, असं शक्य आहे का? हो, तशीही उदाहरणे आहेत. पूर्वीही अफाट बळी गेल्याने हवामान बदलल्याचे  पुरावे मिळत आहेत.

सरळ हिशोब आहे. इतकी माणसे मेल्यामुळे तितके श्वास बंद झाले. श्वसनाचा, ‘अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर’ हा बहिणाबाईंनी सांगितलेला अर्थ आपण जाणून आहोत पण श्वसन याचा जीवशास्त्रीय अर्थ श्वासाचं येणं जाणं हा नसून, ऑक्सीजनच्या मदतीने ग्लुकोज शिलगावून ‘एटिपी’, यानेकी, एनर्जी निर्माण करणे हा आहे. या श्वसन-क्रियेत कार्बन डायओक्साईड बाहेर पडतो. साथीच्या थैमानानंतर जितके श्वास बंद तितका कार्बन डायओक्साईड कमी. गुरेढोरेही मोठ्या प्रमाणावर मेली तर त्यांचाही कार्बन डायओक्साईड (आणि मिथेन) कमी.  यामुळे लक्षणीय फरक पडून हवेतील कार्बन डायओक्साईड  घटून पुढे तापमान घटलेलं आढळतं.

दक्षिण अमेरिकेत युरोपीय पोहोचले आणि अतिशय अमानुषपणे त्यांनी तिथली राज्ये आणि संस्कृती नष्ट केली.  ह्या संस्कृती संक्रमणाच्या काळात लढायांत फारच थोडी माणसे मेली. संपूर्ण दक्षिण अमेरिकेतली मूळ निवासी प्रजा युरोपीयनांनी आणलेल्या नव्यानव्या, अनवट आजारांनी खलास केली. साथीचे हे थैमान इतके जबरदस्त होते की यानंतरही हवेतील कार्बन डायओक्साईड कमी झाला आणि  तिथे हवेत गारवा वाढला.

सूक्ष्म जीवांच्या उत्क्रांतीतही हवामान आणि साथींमुळे क्रांती घडते. मागच्या लेखांकात भेटलेली ‘अंगावरची उ’ ही सुमारे ८० हजार वर्षापासून आहे. तत्पूर्वी नव्हती. त्यामुळे तिच्या मार्फत पसरणारे टायफससारखे आजारही नसावेत. कपड्यात मुक्काम करून रक्त पिण्यापुरते माणसाच्या अंगावर जाणे हा तिचा शरीरधर्म. ऐंशी हजार वर्षापूर्वी हिमयुग होतं. गुहेत, कपडा लपेटून रहाणे भाग होतं. अशा परिस्थितीत ही उ उत्क्रांत झाली असावी. माणूस विवस्त्र फिरत राहीला असता तर ह्या प्रकारची उ उत्क्रांत झालीच नसती. उवा, जंत, बॅक्टीरिया, व्हायरस हे सारे परोपजीवी माणसाबरोबर उत्क्रांत होत आले आहेत, होत आहेत.

एखादा जंतू माणसात शिरल्याने जर तो माणूस तडकाफडकी मरत असेल तर त्या जंतूचेही  अवघड आहे. कारण आता त्याचा पोशिंदाच मेल्यामुळे जंतूचा प्रसार कसा व्हावा बरं? यजमान आणि पाहुणा दोघांचाही मुडदा पडण्यापेक्षा दोघेही जित्ते राहतील तर दोघांनाही बरं नाही का? यजमानाघरी राहून त्याच्या; खोकला, जुलाब, उच्छवास, शू अशा उत्सर्जक क्रियांद्वारे  अन्यत्र पसरणे सर्वात उत्तम. मात्र यासाठी यजमानाच्या प्रतिकारशक्तिपासून जपून रहायला हवं, लपून रहायला हवं. इतकंच कशाला तिला फसवून मुक्काम करता आला तर उत्तम पण तिला फितवून घेता आलं तर फारच उत्तम. परोपजीवींनी हे सारे मार्ग अनुसरलेले दिसतात.

अर्थात हा सगळा विचार ना परोपजीवी करू शकतात ना माणसाची प्रतिकारशक्ती. जगण्याच्या, उत्क्रांतीच्या, स्पर्धेमध्ये जे टिकले ते इतके परस्पर पूरक आहे की ते बुद्ध्याच घडवले आहे असे आपल्याला भासते.

संधीसाधू परोपजीवी आपल्या आधीपासूनचे पृथ्वीवासी आहेत. माणसांपूर्वी तब्बल २ अब्ज वर्षापेक्षा अधिक काळ हे इथे वावरत होते. ह्यांच्यातले जे चालू असतात ते आपलं काम बिनबोभाट आणि बेमालूमपणे उरकतात आणि जे महाचालू असतात ते माणसाचीच  वागणूक बदलतात. असं म्हणतात की सर्दीचे जंतू हे सर्वात यशस्वी जंतू होत. सर्दी झाल्याने माणूस शिंकत, नाक आणि हात कशाकशाला पुसत वावरत राहतो. तो शक्यतो घरात बसत नाही, प्राणांतिक आजारी पडत नाही, मरत तर  मुळीच नाही.  जणू सर्दीचा व्हायरस त्याला नवी नवी माणसे गाठून द्यायला भाग पाडत असतो. व्हायरसची प्रजा वाढत वाढत रहाते. काही माणसांत या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होतेही. मग हे गिर्हाइक बाद. पण तात्पुरतेच. कालांतराने काही म्युटेशन घडते आणि सर्दीचा व्हायरस आपलेच रूप बदलतो आणि पहिल्याच प्रजेवर नव्याने हल्ला करतो.  त्यामुळे जगभर सर्दावलेली माणसे असतातच असतात. देवीच्या, पोलिओच्या व्हायरसची वागणूक अशी नव्हती. त्यामुळे त्यांचे  निर्मूलन शक्य झालं पण सर्दी निर्मूलनाचा कोणी स्वप्नातही विचार करत नाही.

कोव्हिडच्या व्हायरसचीही हीच स्थिती आहे. तो नव्याने अति भयाण रूपात पुन्हा येऊ शकतोच पण शेवटी त्याने  सर्दीचा व्हायरस होण्यात त्याचेही भले आहे; नाही का?

प्रथम प्रसिद्धी

दैनिक सकाळ

दि. २४.५.२०२४

 

 

 

No comments:

Post a Comment