Thursday, 2 May 2024

लेखांक ५ वा मातीवर चढणे एक नवा थर अंती..

 

लेखांक ५ वा

मातीवर चढणे एक नवा थर अंती..

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

शेतीच्या जीवावर समृद्धी, व्यापार आणि  संस्कृती उभी राहिली खरी पण शेती सर्वस्वी हवामानावर अवलंबून असल्याने समृद्धी, व्यापार आणि   संस्कृतीदेखिल हवामानाच्या  लहरीवर अवलंबून होती.

हवामान अनुकूल होते तेंव्हा शेती-बाह्य उद्योग करणारा, शहरात रहाणारा वर्ग तयार झाला. ही सारी प्रजा आता खाणार, शेतीतून जे पिकेल तेच. पाठोपाठ हंगाम गेले तर गाव सोडणे, पुन्हा भटकत जगणे, नाही तर उपासमारीचे  किंवा रोगराईचे बळी होणे एवढेच पर्याय होते.

इसपू २५०० ते १७०० भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात सिंधु संस्कृती नांदत होती. मेसोपोटेमिया, इजिप्त आणि सिंधू संस्कृती २८ ते ३३उत्तर अक्षांशात बहरल्या. हा योगायोग नसून ही हवामानाची किमया आहे. इ.स.पू. ६००० ते ४५०० आणि पुन्हा इ.स.पू. ३३०० ते २३०० हे  सुयोग्य हवामानाचे  काळ मानले जातात. इसपू २१०० नंतर पुन्हा एल् निनोचा दुष्काळी  फेरा सुरू झाला. अवर्षणाने इजिप्त, अक्काडियन, मायेसीने, क्रेटे आणि सिंधू अशा साऱ्या संस्कृती लयास गेल्या.

पाऊस घटला, नद्या आटल्या, माणसं जगायला बाहेर पडली,  मोजक्या सुपीक प्रदेशात इतके निर्वासित आले की तिथलीही  सुबत्ता संपुष्टात आली, पर्यावरण ढासळले, कुष्ठरोग, क्षय आणि इतर अनेक आजार फोफावले, हिंसाचार वाढला आणि सिंधू संस्कृती इतिहासजमा झाली. यूनान (ग्रीक), मिश्र (इजिप्त), रोमां (रोमन) सब मिट  गये जहांसे, बाकी मगर है अबतक नामों निशां हमारा; हे देशभक्ती म्हणून ठीक आहे. प्रत्यक्षात   दौर-ए -जमॅां दुश्मन झाल्यावर हस्ती मिटायला फार सदीयां लागत नाहीत. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती’, हेच खरं.

अनुकूल काळांत बहर आणि प्रतिकूल परिस्थितीत विनाश हे चक्र सार्वत्रिक आहे. इसपू ३०० ते पुढे जवळपास ८०० वर्ष भूमध्य समुद्राच्या प्रदेशांत, नॉर्थ अटलांटिक ऑसीलेशनच्या कृपेने,  हवामान अनुकूल होते. ह्याला म्हणतात ‘रोमन वॉर्म’.  शेती पसरली, शहरे, व्यापार उदीम वेगाने वाढला. हिवाळी पाऊसमान, राबायला गुलाम; बघता बघता रोमन साम्राज्याचा उदय आणि विस्तार झाला. सारे रस्ते आता रोमला जाऊ लागले.

पण त्याच वेळी मुलुखगिरीला बाहेर पडलेले सैनिक आणि  चीन, भारत वगैरे दूरदेशी व्यापारासाठी गेलेले अनेक सैंय्या येताना अनेक नवे नवे जंतूही आणत होते. गावोगावी (अशा निदान २०० नोंदी आहेत) देवीच्या, जुलाबाच्या साथी आता नित्याच्या झाल्या. इस.१६६ ते १९०च्या दरम्यानचा ‘अॅंटोनियन प्लेग’ हा सम्राट मार्कस अॅंटोनियसचाच घास करुन  गेला (म्हणून अॅंटोनियन प्लेग). रोमनांचे जणू चरकमुनी असे गेलेन यांनी सगळ्या भयावह परिस्थितीचं वर्णन करुन ठेवलं आहे. पण तरीही नेमका शोध लागतच नाही. इथे ‘प्लेग’ म्हणजे भयंकर महामारी एवढाच अर्थ आहे. तुम्हांआम्हाला परिचित असलेला हा उंदीर-रॅण्ड प्लेग तो हा नाही. गोवर किंवा देवीच्या ह्या प्रचंड साथी असाव्यात. पण असली, यर्सीनिया पेस्टीस नावाच्या जंतूने होणाऱ्या उंदीर-रॅण्ड प्लेगाने, म्हणजेच ब्युबोनिक प्लेगानेही रोमन साम्राज्याला गाठलंच आणि ग्रासलंच.  इस. ५४२ मधे हा, राजधानी कॉन्स्टॅटीनोपलला पसरला. हा आपल्याला माहीत असलेल्या यर्सीनिया पेस्टीसपेक्षा किंचित वेगळ्या प्रकारचा होता. चार महिन्यात एक तृतीयांश लोक मेले. तेंव्हा जस्टीनियन राजा होता म्हणून हा ‘जस्टीनियन प्लेग’.

काही उंदीर प्लेगने मेले म्हणून लगेच साथ येत नाही. ती एक बहुस्तरीय प्रक्रिया असते. आधी हा आजार जंगली उंदीर वा अन्य कृदंत प्राण्यांतून माणसाजवळ बिळं करणाऱ्या उंदीर प्रजातीत (रॅटस रॅटस) यायला हवा. असले उंदीर पुरेशा प्रमाणात मेले की त्यांच्या अंगावरच्या पिसवा माणसाकडे वळतात. मग माणूस-माणूस किंवा उंदीर-माणूस-उंदीर असं लागण चक्र सुरू होतं आणि टिकून रहातं. रॅटस रॅटसचं हे बेणं भारतातून (किंवा पूर्व आफ्रिकेतून) व्यापारी बोटींतून तिकडे पोहोचलं म्हणे. व्यापार बराच काळ सुरू होता पण प्लेग इस ५३६ नंतरच का पोहोचला, ह्याचे उत्तरही रंजक आहे. ‘रोमन वॉर्म’चं पर्व होतं तेंव्हा भारत रोम दरम्यानची  बोटीतली गर्मी, संपूर्ण मूषक संहार घडवून आणे. पिसवाही मरून जात.  अर्थातच इथून निघालेले सौ चुहे ‘हज’लाही जीवंत पोहोचत नसत. रोम तो दूरकी बात. इस ५३६ ते ५३८च्या दरम्यान या मार्गावर थंडी पडली. उंदीर, पिसवा आणि यर्सीनिया पेस्टीस सुखरूप रोमन साम्राज्याच्या बंदरांवर पायउतार झाले आणि बाकी इतिहास घडला.

एडवर्ड गिब्बनने   रोमन साम्राज्याचा ऱ्हास आणि अंत कसा झाला हे सांगताना नैतिक अध:पतन, प्रशासकीय दुराचार  वगैरे कारणे गणली आहेत. पण इस. ३५० नंतर वारे पुन्हा फिरले हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आता पाठोपाठ  पीकं जाऊ लागली, खंगलेली प्रजा साथीच्या रोगांनी खाऊन टाकली, प्रचंड साम्राज्यावर सत्ता राखणं उत्तरोत्तर कठीण होत गेलं, सीमावर्ती प्रदेशांत उठाव झाले  आणि रोमन साम्राज्याचा अस्त झाला. रोमला जाणारे रस्ते आता वेगळ्याच वाटा धरु लागले.

 

प्रथम प्रसिद्धी

दैनिक सकाळ

०३.०५.२०२४

No comments:

Post a Comment