Monday 13 May 2024

येते जे आतून ते का थांबविता येते?

इराचे, माझ्या इवल्याशा नातीचे, निरागस, निर्व्याज, खळाळते हसू पाहून मला प्रश्न पडतो, इवल्याशा जीवाला एवढं हसू येतं कुठून..
माझा प्रश्न आणि इराचे, म्हणजे साऱ्याच लहान मुलांचे उत्तर..

येते जे आतून ते का थांबविता येते?

खुदू खुदू, खदा खदा, फिदी फिदी, खिं खिं
गालावरी खळी, तिच्या आत, हास्य-कुपी 

कुपीताहे, हास्याची ही, अत्तरली, लाली 
उतरली, अलगद, सारी लाली, गाली 

आनंदाच्या उधाणाला, चांदण्याची जोड
इत्ती कशी हासतेस, कित्ती गोड गोड?



कित्ती कित्ती आसपास आहे मजा सारी 
किती किती मीही बाई आहे हासणारी 

रंगोरंगी, चंगीभंगी, आवाजाचे जग 
त्यात माझी, भर माझे, हसू झगमग 

पावसाला, पानाफुला, आईलाही वास 
खरखर दाढीचीही, माऊ मऊ, खास 

ऊन पडे, लख्ख ताजे, झळाळते, सारे 
रातकिडे, गाती राती, पेंगुळती, तारे 

पावसात, रिमझीम, सरीवर सरी 
आकाशात, ओलेचिंब, इंद्रधनू, वरी 
 
ढुढुम्मत, मधूनच, भिवविती, ढग 
पहाते मी, गच्च डोळे, मिटूनच, मग 

दुपट्यात चीपट्यात मावतच नाही 
मोठी झाले मीही, काही आता छोटी नाही 

दुडूदुडू चालण्यात संपेलच धरा 
टकामका पाहीन मी जगाचा पसारा

नवेनवे, कोरेकोरे, जग ताजेताजे
मुलखाचे कुतूहल, भांडवल माझे

रस, ध्वनी, स्पर्श, सुखे जग अनुभवी
ठायी ठायी दिसतात सुखाची कारंजी

मग फुटे हसू, फुटे हास्य खळाळते 
येते जे आतूनी, ते का थांबविता येते?
















No comments:

Post a Comment